नैवेद्य १) मोदक

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 August, 2011 - 15:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

तांदळाचे पिठ
मिठ

१ ओला नारळ खरवडून
गुळ
खसखस
चारोळी/काजु/आक्रोड/मनुका
वेलची/केसर
तुप

क्रमवार पाककृती: 

तापलेल्या भांड्यात तुप टाकुन खसखस घाला. आता त्यावर गुळ घाला व मंद गॅसवर वितळू द्या.
गुळवितळला की लगेच खोबर व चारोळी/काजु/आक्रोड/मनुका/बदाम पैकी काही आवडत असेल ते घाला किंवा जे घरात असेल ते थोडे थोडे घाला.
थोडा वेळ परतुन गॅस बंद करा.

आता १ ते दिड ग्लास पाणी घेउन त्यात मिठ टाकुन गरम करण्यासाठी ठेवा. आता पाणी उकळायच्या आधी जे भांड्याच्या तळातुन बुडबुडे यायला लागतात तेंव्हा तांदळाचे पिठ अंदाजे टाकत ढवळा व लगेच गॅस बंद करा म्हणजे मोदक वातड होत नाहीत. जास्त पिठ टाकु नका. पिठ ओलसर राहील एवढेच टाका.

पिठ परातीत काढा व थोडे थंड झाले की पाण्याने मळायला घ्या. जास्त पाणी लावु नका. हलकेच हात भिजेल एवढेच घेत रहा व चांगले मळून घ्या.

आता मोदक करायला घेताना परत थोडे पिठ जरा मळा व लिंबाएवढा गोळा घेउन त्याची पातळ वाटी करा.

वाटीत तळाला नारळाचे सारण भरा. आता वाटीच्या बाहेरच्या बाजुला दुमडत कमी अंतरावर कळ्या करा. मग वाटीच्या वरच्या भागाच्या कळ्यांना हलके आतल्या बाजुला गोल गोल फिरवत वरच्या दिशेने जुळवा. टोकाची शेंडी टोकदार करा.

आता हे मोदक २० ते ३० मिनिटे मोदक पात्रात वाफवुन घ्या.

मोदकांबरोबर आमच्याकडे करंज्या (शिंगर्‍या) व खापट्या (पिठाची चपटे गोल) करण्याची पद्धत आहे.

वाढणी/प्रमाण: 
गणपती बाप्पालाच २१ लागतात :स्मित:
अधिक टिपा: 

प्रथम वंदनिय गणपती म्हणुन गणपतीच्या मोदकाने सुरुवात करत आहे. तसे आमच्याकडे नागपंचमी ह्या पहिल्या श्रावणातल्या सणालाच नागोबाच्या नैवेद्यासाठी मोदक करण्याची प्रथा आहे.

उकळवणी घेताना काही जणं पाण्याबरोबर दुध किंवा तेलही घालतात.

वाटी वळताना काही जणं ती पातळ होण्यासाठी हाताला तेल लावतात. मी नेहमी पाणीच वापरते.

मोदकाच्या सारणात आक्रोड जास्त चांगला लागतो हा माझा अनुभव आहे.

साखरचौतीच्या गणपतीला नारळाच्या सारणात गुळाऐवजी साखर घालतात.

(नागपंचमीच्या दिवशी ऑफिसला जायच्या घाईमुळे सगळे फोटो काढू शकले नाही त्याबद्दल क्षमस्व. पण परत केल्यावर सगळे फोटो इथे लोड करण्याचा प्रयत्न करेन.)

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागूकाकींना शि. सा. न.

सुबक आणि अत्यंत देखणे मोदक. आवरण तर केक फाँडंटचं केलंय की काय असं वाटावं इतकं गुळगुळीत दिस्तंय. Happy

>>>मृ, जागूकाकी काय????? लहान आहे ती.

ते माहिती आहे. पण त्यांच्या पाककृती आणि मुख्यतः हे अत्यंत उच्च दर्जाचं कौशल्य लागणारे मोदक बघून ५०-५५ वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीने केलंय असं वाटतं. म्हणून आदरार्थी. Happy

मोदक वाफवण्याआधी गार पाण्यात बुडवून घ्यावे लागत नाहीत का?

जागु, हे मोदक म्हणजे तुझ्याकडे फुललेली ब्रह्मकमळाची फुलंच दिसतायत ग. किती पांढरेशुभ्र आणि सुबक केलेयस.

सावली, दुर्गा, दिपा, अरुंधती, मवा, प्राची, अवनी, आरती, सिंडरेला, पल्लवी, भरत, तोषवी, स्वाती, प्रिया, बिल्या, प्रज्ञा, नताशा, राधिका धन्स.
साक्षी पहीलाच आला मिठाचा तर त्याच्यावरच भागवायच ? अरेरे. पण तो लकी असणार ना.

मृण्मयी
जागूकाकींना शि. सा. न.
बचाओ बचाओ. मृण्मे पुढच्यावेळी मोदक वाकडे तिकडे करेन मग मला ताई म्हणशिल ना ग ? Lol

साधना Happy तुला ह्या गणपतीला पण अश्विनीला घेउन यायच आहे मोदक खायला.

मामी धन्स गो.

हे अत्यंत उच्च दर्जाचं कौशल्य लागणारे मोदक बघून ५०-५५ वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीने केलंय असं वाटतं. >>>> हे मात्र १००% खरं Happy

अप्रतिम!!! खरच कसले सुंदर दिसत आहेत्.....तुझ्या घरचे खरच लकी आहेत
मला नक्कि माहित नाही तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहात ते.. पण पाककले वरचे एखादे मस्त पुस्तक लिहा ना चित्रांसह... आणि शक्य झाले तर बागेवरचे ही

अप्रतिम, खुपच सुरेख दिसतायत मोदक ................. Happy

फोटो बघत असतानाच चटकन हात पुढे करून त्यातला एखादा मोदक गटवावासा वाटतोय ........ Happy

Pages