अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : संबंधित धोके, शक्यता, खबरदारी व मदत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 July, 2011 - 09:46

वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....

आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?

तर कितीतरी केसेस मध्ये ते उत्तर ''नाही'' असेच म्हणावे लागेल. त्यासंदर्भात हाती आलेली आकडेवारीच बरेच काही सांगून जाते. (मिळालेल्या आकडेवारीनुसार अशा किमान ३०,००० 'परित्यक्ता' वधूंच्या केसेस नोंदविल्या गेल्या आहेत, किमान १२०० वधू फक्त ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या शेल्टर्समध्ये आश्रयाला आहेत.)

कोणत्याही अ‍ॅरेंज मॅरेजमध्ये रिस्क किंवा धोका हा असतोच. कितीही खात्री करून घेतली असली तरी सर्वच माहिती कळालेली नसते. काही माहिती लपवलेली असते. परंतु माहिती नसलेल्या स्थळी, जिथे कायदे वेगळे आहेत, ओळखीचे वा नात्याचे जवळपास कोणी नाही आणि तुम्ही तुमच्या जोडीदारावर तुमच्या उदरनिर्वाहासाठी व अन्य कारणांसाठी सर्वस्वी अवलंबून आहात तेव्हा हा धोका कैक पटीने वाढतो. विवाह हा विश्वासाच्या नात्यावर आधारलेला असतो असे म्हटले तरी आपल्या बाजूने हा विश्वास अधिक बळकट व्हावा, आपल्याकडून चौकशीत काही कसर राहू नये व नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ नये असेच प्रत्येकाला वाटत असते. त्या दृष्टीने वाग्दत्त वर व वधू या दोघांनीही आपली माहिती एकमेकांपासून दडवून न ठेवता उघड केली पाहिजे. चौकशीसाठी आपल्या मित्रमैत्रिणींचे संपर्क तपशील, आपल्या नोकरीचे ठिकाण, सहकारी इत्यादींची माहिती एकमेकांना द्यायला हवी.
पण प्रत्यक्षात तसे होत नाही.

कित्येकदा लग्न होऊन परदेशात गेलेल्या वधूला तिथे गेल्यावर आपल्या नवर्‍याचे अन्य कोणा बाई/पुरुषाशी संबंध असल्याचे कळते, किंवा नवर्‍याला दुर्धर व्यसने आहेत/ मानसिक रोग आहे हे लक्षात येते. कधी शारीरिक तर कधी मानसिक / भावनिक / वाचिक हिंसा - अत्याचारांना तोंड द्यावे लागते. ही परिस्थिती उलटही असू शकते.

कोणकोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात?

१. लग्नानंतर हनीमून उरकून पती परदेशी रवाना होतो, पत्नीला तिकिट पाठवितो म्हणून सांगतो. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. अनेकदा पत्नी गर्भवती असेल तर आणखी प्रश्न निर्माण होतात. (अशा किमान २०,००० वधूंनी लग्न व हनीमूननंतर आपल्या नवर्‍याला पाहिलेलेच नाही!!)

२. लग्नानंतर पत्नी पतीसमवेत परदेशी जाते, परंतु तिथे तिच्या वाट्याला छळवणूक, हिंसा, मारहाण, कोंडून ठेवणे, बलात्कार, कुपोषण/ उपासमार इ. येते. एक वेळ तिला परत भारतात जायची परवानगी सासरच्यांकडून मिळते परंतु तिची त्या पतीपासून झालेली मुले तिच्याबरोबर भारतात पाठवली जात नाहीत.

३. पत्नीच्या माहेरच्यांकडून हुंडा किंवा तत्सम रक्कम वसूल करण्यासाठी तिला तिच्या मर्जीविरुध्द परदेशात पती वा पतीच्या नातेवाईकांतर्फे ओलीस धरले जाते / डांबून ठेवले जाते. तुमची मुलगी हाती पायी धड हवी असेल तर अमकी रक्कम तमक्या ठिकाणी जमा करा अशा धमक्या दिल्या जातात. किंवा पत्नीला नांदवयची असेल तर अमुक रक्कम / मालमत्ता तमक्याच्या नावे जमा करा अशा धमक्या येतात.

४. पत्नी पतीच्या घरी सासरी पोहोचते तेव्हा तो तिथे त्याच्या मैत्रिणीबरोबर / जोडीदाराबरोबर राहत आहे असे लक्षात येते. त्याने केवळ आपल्या आईवडिलांच्या म्हणण्याखातर हे लग्न केलेले असते. अशा परिस्थितीत जर पत्नीकडे स्वतःचे आर्थिक स्रोत नसतील व ती पतीवर अवलंबून असेल तर पत्नीपुढे असलेले ते महासंकटच ठरते.
तिथे जर तिला काही कायदेशीर मदत / आधार नसेल, कोणाची ओळख नसेल तर आणखी संकट!

५. पतीने लग्नाचे वेळी जर त्याची नोकरी, पगार, लग्नाविषयीचे त्याचे स्टेटस, मालमत्ता यांविषयी खोटी माहिती दिली असेल तरी त्यामुळे फसवणूक झालेल्याही अनेक केसेस आहेत.

६. त्या त्या देशातील घटस्फोटाविषयीच्या उदार कायद्यांचा आधार घेऊन पतीने पत्नीस तिच्या संमती विरुध्द, तिच्या अनुपस्थितीत, तिला अंधारात ठेवून घटस्फोट दिला असल्याच्याही अनेक केसेस आढळतात.

७. अनेक पीडित स्त्रियांनी नंतर नवरा किंवा सासरच्या मंडळींवर हुंडा मागणे अथवा लग्नानंतर केलेल्या अत्याचारांबाबत फौजदारी दावे ठोकले तेव्हा त्यांना असे लक्षात आले की जोवर पती भारतात येत नाही, समन्स/ अटकेच्या वॉरंटला प्रतिसाद देत नाही तोवर त्या दाव्याचे पुढे काहीही होणार नाही.

८. अनेक स्त्रियांना आपल्या मुलांच्या कस्टडीसाठी किंवा पोटगीसाठी कोर्टात अतिशय कडवा लढा द्यावा लागला.
काहींवर स्वतःच्याच मुलांना जबरदस्ती पळवून नेण्याचे आरोप ठोकले गेले व त्याविरुध्द लढा द्यावा लागला.

९. काही स्त्रियांना भारताखेरीज अन्य देशात लग्न करण्यास भाग पाडले गेले व नंतर लक्षात आले की तिथे लग्न केल्यावर भारतातील न्यायालयांकडे त्याबद्दल फारच मर्यादित अधिकार आहेत.

१०. लग्नानंतर पती परदेशी जातो. पत्नी नंतर जाते. तिथे तिला एअरपोर्टवर आणायला कोणीच आलेले नसते. नवर्‍याने दिलेला पत्ता/ फोन इत्यादी सर्व खोटे असते किंवा तो गायब झालेला असतो. (काही केसेसमध्ये पती पत्नीचे सर्व सामान - तिची कागदपत्रे, कपडे, दागदागिन्यांसह ताब्यात घेतो व गायब होतो असेही घडलेले आहे.)

आजवर अनेक भारतीय स्त्रियांना परदेशस्थ भारतीयांशी लग्न केल्यावर आलेल्या गंभीर समस्या/ अडचणी/ सहन करावे लागणारे अत्याचार इत्यादींबद्दल सतर्क होत राष्ट्रीय महिला आयोगाने संसदेच्या महिला सबलीकरणाच्या समितीच्या सूचनांचा विचार करून काही मार्गदर्शक उपाय / खबरदारी / मदत इत्यादींबाबत काही जाहीर सूचना केल्या आहेत.

त्यानुसार वधू/ वधूच्या कुटुंबियांनी

काय करावे?

१. वर/ वधू ची इत्यंभूत चौकशी करावी. त्यांचे आर्थिक स्टेटस, वैवाहिक स्थिती (अविवाहित/ घटस्फोटित/ विधुर / विभक्त इ.), नोकरीचे तपशील, क्वालिफिकेशन, पगार, ऑफिसचा पत्ता, कोणत्या कंपनीत नोकरी, त्या कंपनीची स्थिती, इमिग्रेशन स्टेटस, व्हिसाचे तपशील, त्या देशात लग्नाचा जोडीदार नेण्याची परवानगी आहे / नाही इत्यादी.

२. आर्थिक परिस्थिती, मालमत्ता, निवासी पत्ता, कौटुंबिक तपशील, व्हिसाचे तपशील, व्होटर आहे/ कसे, सोशल सिक्युरिटी नंबर याची चौकशी.

३. लग्नेच्छुक मुलामुलीना परस्परांना भेटून मोकळेपणाने बोलण्याची, वावरण्याची संधी द्यावी, जेणेकरून भविष्यात प्रश्न टळू शकतात. मुलाच्या/ मुलीच्या परिवाराशी नियमित संपर्कात रहावे.

४. भारतात धार्मिक लग्न विधींबरोबरच ते रजिस्टर्ड करण्याचे बघावे. लग्नाचे फोटोग्राफ्स, चित्रफिती पुरावा म्हणून असू द्याव्यात.

५. ज्या देशात मुलगी वधू म्हणून रवाना होत असेल त्या देशाचे कायदे, खास करून कौटुंबिक अत्याचाराविरुध्द चे कायदे असतील त्यांच्याबद्दल तिला माहिती असावी. जर अशा अत्याचाराला तिला तोंड द्यावे लागले तर तिला तिथे कोणत्या प्रकारची सुरक्षा / सुविधा मिळू शकते हेही माहिती असावे.

६. जर वधू ला असा अत्याचार (शारीरिक/ मानसिक/ वाचिक/ भावनिक/ आर्थिक/ लैंगिक) सहन करावा लागत असेल तर तिने त्याविषयी तिच्या विश्वासातील लोकांना सांगितलेच पाहिजे.

७. पत्नी/ वधूने स्वतःच्या नावाचा वेगळा बँक अकाऊंट आपल्या निवासस्थानाजवळच्या बँकेत खोलावा.

८. परदेशी राहणार्‍या नवविवाहितेने नवर्‍याचे एम्प्लॉयर्स, शेजारी, नातेवाईक, मित्र, अ‍ॅम्ब्युलन्स, पोलिस, भारतीय दूतावासाचे संपर्क तपशील स्वतःजवळ ठेवावेत.

९. तुमच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या (व्हिसा, पासपोर्ट, बँक कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, लग्नाचे सर्टिफिकेट, इतर कागदपत्रे) छायांकित प्रती भारतात/ तुमच्या विश्वासाच्या माणसांकडे/ नात्यात ठेवून द्या.
या सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपीही तुमच्याजवळ / तुमच्या विश्वासू व्यक्तीजवळ असू द्यात.

१०. तुमच्या नवर्‍याच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची (व्हिसा, पासपोर्ट, सोशल सिक्युरिटी नंबर, मालमत्तेचे तपशील, व्होटर कार्ड क्रमांक इत्यादी) प्रतही शक्य असल्यास जवळ ठेवा.

काय करू नये?

१. घाईघाईत काहीही निर्णय घेऊ नका, तसेच कोणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका.

२. विवाहाचा उपयोग ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी/ परदेशी स्थायिक होण्यासाठी किंवा अन्य तत्सम फायदेशीर योजनांसाठी करू नका, तशा योजनांना बळी पडू नका.

३. लग्नासारखी गंभीर बाब फोन/ इमेल वरच्या संपर्काने ठरवू नका. प्रत्यक्ष मुलाला/ मुलीला व कुटुंबियांना भेटून, बोलून, इत्यंभूत चौकशी करून मगच काय तो निर्णय घ्या.

४. नुसत्या वरवरच्या देखण्या चित्राला भुलू नका. व्यवस्थित चौकशी करा, मगच होकार द्या.

५. जेव्हा मॅरेज ब्यूरो/ संकेतस्थळ/ मध्यस्थांमार्फत लग्न ठरते तेव्हा त्यांच्याकडील वधू/ वराचे तपशील बरोबर असल्याची खात्री करून घ्या.

६. गुप्तपणे लग्नाच्या वाटाघाटी करणे टाळा. त्या लग्नाबाबत जितक्या लोकांना समजेल तेवढे चांगले. त्यानिमित्ताने मुला/मुलीची खरी माहिती कळायला मदत होईल.

७. परदेशांत लग्न करणे टाळा.

८. हुंडा किंवा तत्सम मागण्यांना परदेशस्थ जावई/ मुलीच्या सासरच्या मंडळींनी पुढे केल्यास गप्प बसू नका व त्यांना बळी पडू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना संपर्क साधा.

९. पतीच्या किंवा सासरच्या मंडळींच्या क्रौर्याचे बळी ठरू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना / क्रमांकांना संपर्क साधा.

१०. परदेशी जाण्याच्या खटपटीत कोणतीही कागदपत्रे नकली बनवू नका. किंवा कोणत्याही बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नका.

११. नवरा राहत असेल त्या देशातील विवाहासंबंधातील कायदेशीर कारवाईत भाग घेणे टाळा. तुम्ही स्वदेशी नवर्‍यावर कोर्टात केस फाईल करू शकता. खास करून घटस्फोटाची केस.

१२. परदेशात तुमच्या पतीने तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीत व तुम्हाला अंधारात ठेवून तेथील कोर्टानुसार घटस्फोट दिला तरी तो भारतात ग्राह्य धरला जात नाही. जर तुम्ही त्या केसमध्ये सहभाग घेतला असेल तरच तो ग्राह्य धरला जातो.

१३. नवरा किंवा सासरच्या मंडळींची बदनामी करणे टाळा, कारण ते तुमच्यावर बदनामीचा दावा ठोकू शकतात. जे वास्तव आहे तेच बोला, आणि योग्य मंडळींसमोर : उदा : वकील, पोलिस, सोशल वर्कर, न्यायालय इत्यादी.

१४. कोणत्याही कारणास्तव कायदा स्वतःच्या हातात घेणे टाळा, व सूड उगवण्यासाठी अविचारी, हिंसक, बेकायदेशीर कृत्ये करू नका. संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधा. खोट्या तक्रारी नोंदवू नका.

परदेशांतील भारतीय महिलांच्या संघटना / मैत्री संस्था/ मदत संस्थांचे पत्ते व इतर तपशील :

list_indian_women.pdf (115.95 KB)

तुम्ही एन आर आय सेलकडे ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता :

http://ncw.nic.in/NRICell/frmNRIComplaints.aspx

तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते?

१. तक्रार नोंदविली गेल्याची पावती मिळते. तक्रारकर्त्यास त्याच्या नोंदविल्या गेलेल्या तक्रारीचा क्रमांक मिळतो, जो पुढील संदर्भ व कारवाईसाठी महत्त्वाचा असतो.

२. तक्रारीची नोंद झाल्यावर तिची तपासणी होते. त्यात कितपत तथ्य आहे, काय वास्तव आहे इत्यादींची पडताळणी केली जाते. त्यासाठी संबंधित पार्टीजना प्रश्न विचारले जाऊ शकतात.

३. कारवाई

अ] समुपदेशन : पीडित व्यक्तीला समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याद्वारे तिला तिचे कायद्याच्या दृष्टीने भवितव्य, तसेच इतर उपलब्ध पर्याय यांची माहिती करून दिली जाते.

आ] मध्यस्थांमार्फत वाद मिटविणे : एन आर आय सेलमार्फत मध्यस्थांकरवी जोडीदाराशी ऑडियो/ व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारा वार्तालाप करून किंवा व्यक्तिशः संपर्क साधून मध्यस्थी केली जाते.

इ] संबंधित वादाची सेटलमेन्ट करणे : ह्यात परिस्थितीनुसार, नवरा-बायकोच्या संमतीनुसार, कायदेशीर कारवाई निश्चित केली जाते. ती त्या देशात की भारतात हेही परिस्थिती, संमती इत्यादींनुसार बदलते. मध्यस्थीत अपयश आल्यास पत्नीला तिचे कायदेशीर हक्क समजावून दिले जातात आणि तिच्या मर्जी व संमतीनुसार तिला कायदेशीर कारवाई करण्यास मदत केली जाते.

तसेच त्याच वेळी एन आर आय सेल हेही कार्य करते :

क] त्या त्या राज्याच्या शासनाशी व पोलिसांशी कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने संपर्क करणे
ख] त्या राज्याच्या महिला आयोगाशी त्या केसला फॉलो करण्याचे दृष्टीने संपर्क साधणे
ग]परदेशातील सेवाभावी संस्था, मिशन्सच्या सहयोगाने त्या पीडित महिलेला सुरक्षित आश्रय, मध्यस्थी, सुरक्षा मिळवून देणे.
घ] लूक आऊट कॉर्नर नोटिस बजावण्याची, समन्स बजावण्याची शिफारस करणे.
च] क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या १८८, २८५ व्या कलमांन्वये, पासपोर्ट कायद्यानुसार व अन्य कायद्यांनुसार कारवाईची शिफारस करणे.

संपर्क तपशील :

Contact for NRI Marriages Case

Mailing Address :
NRI Cell, National Commission for women
4, Deen dayal upadhya Marg,
New Delhi -110002

Telephone Numbers : +91 - 11 - 23234918
Fax : +91 - 11 –23236154/ 23236988
Email : nricell-ncw@nic.in

वरील माहितीत आणखी काही महत्त्वाचे मुद्दे, माहितीची भर घातल्यास स्वागतच आहे.

धन्यवाद!

-- अरुंधती

माहिती स्रोत : राष्ट्रीय महिला आयोग संकेतस्थळ : http://ncw.nic.in/default.aspx

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेला बिग मेल्टिंग पॉट गम्मतीने म्हटलं जातं. जगाच्या काना-कोपर्‍यातुन आलेली माणसं आपली भाषा, संस्कृती सांभाळुन इथल्या जीवनशैलीशी एकरुप होतात. वेगळी सपोर्ट सिस्ट्म निर्माण करण्याची गरज नसते; यु जस्ट हॅव टु फिट इन. आफ्टरऑल धिस कंट्रि इज बिल्ट बाय इमिग्रंटस... Happy

सीमन्तिनी , सुरेख पोस्टी दोन्हीही. तुमचे अमेरिकेतील सिस्टिम दुकट्या निर्बल स्त्रीसाठी बनविलेली आहे हे विधान फार पटले.

. अब्यूज आणि फसवणूक सहन करायची नाही हे ठरविले कि सारे विश्व आपलेच. कितीतरी वेळा स्ट्रेंजर्स फार उत्तम मदत करतात.

सिमन्तिनी...

दोन्ही प्रतिसाद आवडले.... मी थोडीच त्या उद्देशाने पोस्ट लिहिली !!!.... एका महिन्यात काहीच ग्रह कोणा बद्दल होवु शकत नाही..... मुळात माझा कोणाच बद्दल कसलाच ग्रह नाही. अनेक मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, बहिण, भाउ त्या देशात आहेत. गेली २०-२५ वर्ष आहेत. त्यांच्या अनुभवा वरुन गप्पां मधुन आणि तिकडे केलेल्या ३/४ वार्‍यां मधुन जे जाणवले ते लिहिले. इकडच्या त्यांच्या अई-वडिलां च्या अनुभवातुन बर्‍याच गोष्टी समजतात. ह्यात इकड चे आयुष्य कित्ती सुंदर आणि तिकडचे कित्ती वाईट असे ढोबळ निष्कर्ष काढण्या येवढी बालीशही मी नाही.

उलट तिकडे इतर नातेवाईक नाहीत म्हणुन सोशल सर्कल इथल्या पेक्षा जास्त आहे. माझी बहीण व तिचं पुर्ण कुटुंबं बी.एम.एम मधे पुर्ण बुडुन गेलय.... नाहीतर लहान पणी ती अजीबत सोशल नव्हती.

माझा मुद्दाच तुम्ही लक्षात घेतला नाहिये. तिकडे नवी नवरी म्हणुन गेल्यावर "बाहेरचा" आधार/ सपोर्ट तयार होइ पर्यंत त्या मुलींना वेळ लागतच असेल ना..... मग त्या कशा अ‍ॅडजेस्ट करतात.... त्यातही तिकडे गेल्यावर नवरा/ त्याचे कुटूंब ह्यांच्या कडुन वाईट अनुभव आला तर त्या कशा सामोर्‍या जातात. हा मुद्दा दिस्कस होताना सपोर्ट सीस्टेम चा विषय नीघाला.

माझ्या शेजारीच एक ज्वलंत उदाहरण झाले. त्यात त्या कुटूबा बरोबर आम्हीही काळजीत होतो. शेजारची मुलगी लग्न होवुन तिकडे गेली. लग्न असेच ठरवुन झालेले. तिकडे गेल्यावर कळले, मुलगा गे आहे. त्याला नोकरीही फरशी चांगली नाही. त्याने तिला सरळ आपल्य पार्ट्नर बरोबर ओळख करुन दिली. हिने हिमतीने ३/४ महिने काढले. हिची आई विधवा. बाकीच्या बहिणी लग्न झालेल्या. तिच्या सासू बाई एक नंबर डँबिस.... त्यांना पूर्व कल्पना असल्याने त्या लग्न झाल्याअर लगेच तिकडे गेल्या. हिच्यावर वॉच ठेवायला. कोणाचा ही फोन आला तरी आसपास असायच्या. तिला एकदम बांधुन टाकलं होतं.... एके दिवशी हिने सरळ नवर्‍यालाच समजावला. त्याने हिचं गुपचुप तिकिट काढलं.... सासुला नवर्‍यानेच फिरायला न्यायच्या निमिताने बाहेर काढली आणि ही सरळ विमानतळावर गेली आणि भारतात आली. आधी तिने तेंव्हा खुप बाहेर पडायचा लोकांशी बोलायचा, ह्याच्या मित्रां बरोबर बोलायचा प्रयत्न केला होता. पण नवा देश, नवी माणसं, हाताशी वाहन नाही, नुकताच बसलेला धक्का, रस्ते/स्टेशन काही माहित नाही. नवर्‍याला तुमच्यात काहीच स्वरस्य नाही...

मुळ लेखातले आकडे पण हेच सांगतात, की अशा अत्याचारांची संख्या खुप आहे.

त्या मुळे इकडच्या/ तिकडच्य रहाण्याची तुलना करणं हे मला अपेक्षित नव्हतच..... तुम्ही विचारलत की " सपोर्ट सीस्टीम म्हणजे एका फोन वर आई/साबा हजर होणे हे का?" त्याच साठी येवढं लांब लचक लिहिलं ....

दूखावायचा हेतु नक्कीच नव्हता..... दुखावला असाल तर क्षमस्व....

दुखावण्याचा प्रश्न नाही. पण आधीच मुली घाबरून जातात, त्यात अजून एखादी पोस्त 'काही सपोर्ट सिस्टीम नाही' अशा आशयाची आली कि धीर जातो. आता आपला मुद्दा बघू या: तिकडे नवी नवरी म्हणुन गेल्यावर "बाहेरचा" आधार/ सपोर्ट तयार होइ पर्यंत त्या मुलींना वेळ लागतच असेल ना..... मग त्या कशा अ‍ॅडजेस्ट करतात.... त्यातही तिकडे गेल्यावर नवरा/ त्याचे कुटूंब ह्यांच्या कडुन वाईट अनुभव आला तर त्या कशा सामोर्‍या जातात. >> काही अनुभवांना 'अद्जेस्त' हा पर्याय नाहीये हे आपल्या मनाशी विमानात बसण्याआधी ठरवा. अगदी विमानतळावर किंवा घरी गेल्या गेल्या पहिल्या दिवशी वेडेवाकडे अनुभव आले उदा: पासपोर्ट काढून घेतले. पैसे घेतले इ इ तर ९११ किंवा वकीलात ह्या शिवाय अर्जंट मदतीसाठी फारसे पर्याय नसतात. इतर संस्था आहेत त्याचा उहापोह इथे झाला आहे. मुळात आपला पासपोर्ट कुणी काढून घेतला तर ते घर नांदायच्या लायकीचे नाही हे समजून घ्या. मारपीट केली, शिवीगाळ केली तरी "तू समजुतीने घे", "त्याचा उद्देश चांगला आहे" इ इ आपल्याच लोकांच्या समजावणीला बळी पडू नका. पहिला चान्स मिळताच वकिलातीत/संस्थेत जा कारण हा पहिला चान्स शेवटचा चान्स असू शकतो. इथेच बहुतेक मुली कमजोर होतात. आई-वडील पाठीशी नाही उभे राहिले तरी आपले आयुष्य स्वतः आखा.
दुसरी गोष्ट: काही समस्या मुलीना कशा हाताळायच्या हे माहित नसते कारण ह्या गोष्टी आपण भारतात उघडपणे बोलत नाही. उदा: पती गे आहे किंवा शारीरिक पातळीवर इतर विसंवाद आहेत. मग तिथे ३ महिने राहून उपयोग काय? तो बदलेल अशी आशा? की तो कसाही असला तरी आता देव आहे ही मानसिकता? की आपले आई-वडील त्यांचा सपोर्ट जाहीर करे पर्यंत थांबणे? बाहेर पडावे लागणार हे स्पष्ट दिसत असून कुठे बोलावे, काय करावे हे समजत नाही. इथे कौन्सेलर उपयोगी पडतो. मेडिकल इन्सुरन्स मध्ये त्याची माहिती असते. आपला मेडिकल इन्सुरन्स काढून मगच विमानात बसा. सामंजस्याने नांदणे शक्य नसेल तर सामोपचाराने दूर होण्यास कौन्सेलर इतकी सुरक्षित जागा नाही. जगी ज्यास कोणी नाही त्यास गुगल आहे. त्यामुळे रस्ते-वाहन सर्व माहिती मिळते. सासू-सासरे सामान्यपणे तुमच्या इतकी फोन/इंटरनेत वापरण्यात तरबेज नाही ह्याचा फायदा घ्या. सर्व लायब्ररीत फुकट इंटरनेत असते.
मुळात देश नवा असला, फार ओळखी नसल्या तरी तो फार मोठा अडसर नाहीये. मुख्य अडसर आहे ती मुलीची स्वतःची मानसिकता. थंड शब्दात पतीने "रात्री झोपलीस की तुला उशीने दाबून मारीन" अशी धमकी दिली ती मुलगी रात्र रात्र जागून काढे. तो ऑफिसला गेल्यावर झोपी जाई. नवी नवरी दिवसा झोपली त्यात काय! त्याने काहीही न करता फक्त तिच्या मानसिकतेशी खेळून तिला गुलाम ठेवले होते. हे कुठेही घडू शकते कदाचित आत्ता तुमच्या शेजारी होत असेल. हा मानसिकतेचा अडसर दूर करणे खरी कसोटी.

एका अफगाणी अनामिकेची ही गोष्ट आहे. १७-१८व्या वर्षी लग्न होवून इथे आली. सासर त्रासदायक. कसाबसा गुपचूप घरी फोन केला. भावाने सांगितले शहरातील सर्वात उंच इमारत शोध आणि उडी मार. तुला परत आणणे शक्य नाही आणि तुला असे त्रस्त बघणेही शक्य नाही. कच खाऊन सासरी राहिली. तिला गर्भ निरोधन शक्य नाही. गर्भवती राहिली आणि कुठेही काहीही तपासण्या नाही काही नाही. कळा सुरु झाल्यावर सासूने घरात कोंडले आणि सगळे बाहेर गेले. कशे काय नशिबाने कोणी पाहुणे आले त्यामुळे सासूला घरी परत यावे लागले. त्या पाहुण्या बाईने मध्यस्थी घालून तिला दवाखान्यात नेले. मुलगा झाला. पण आता त्या मुलीने पक्के ठरवले मी परत जाणार नाही. शेल्टर होम मध्ये राहवे लागले, कायद्याच्या यातना झाल्या. ७-८वी शिकलेली. तिने फिजिशियन सहयीकेचा कोर्स केला. पण नोकरी लागली आणि नवर्याने ३ वर्षाच्या मुलाचा ताबा मिळवला. व्हीजीटेशन साठी ती झगडतीये. स्वतःचा विसा, नोकरी आता आहे. दुखी असली तरी मानाने जगते. कधीतरी मुलगा आई मानेल/म्हणेल ह्याची रोज प्रार्थना करते. फरक फक्त मानसिकतेचा होता म्हणून हे उदाहरण लिहिले.

नव्या देशात सपोर्ट सिस्टीम हळूहळूच कळत जाते यासाठी अनुमोदन.

सिमन्तिनी, चांगल्या पोस्ट्स. लोलाने फिरवलेल्या रिक्षेत बसून आले. माबोवर ही चर्चा बर्‍याच पूर्वी होऊन गेलेली दिसते.

जर लग्न होऊन नवर्‍याबरोबर परदेशात जाणारी मुलगी सुविद्य, तंत्रज्ञानाशी ओळख असणारी असेल तर तिला मार्ग काढणे अवघड नाही. पासपोर्ट काढून घेणे, पैसे काढून घेणे यांसारखे प्रकार होतच असतात. अशा प्रकारांना तिने अजिबातच जुमानू नये. तसेच आपल्या सर्व कागदपत्रांच्या प्रती माहेरी किंवा सुरक्षित स्थळी जरूर असाव्यात. सॉफ्ट कॉपीज जवळ बाळगाव्यात व सेव्ह केलेल्या असाव्यात.

वर मी मैत्रीण संस्थेच्या लिंकमध्ये दिलेला फोन क्रमांक टोल फ्री आहे आणि तो तुमच्या फोनच्या बिलात दर्शविलाही जात नाही. अशा सुविधेचा लाभ न संकोचता बिकट प्रसंगी घ्यायलाच हवा. तिथे अजिबात घरच्या कोणाच्या विरोधाला बळी पडू नये.

खरा प्रश्न त्या मुलींचा येतो ज्या अत्यंत मर्यादित कक्षेत वावरतात व त्या कक्षा ओलांडून बाहेर जाण्याची अथवा जगण्याची त्यांची मानसिक तयारी नसते, पुरेसे शिक्षण किंवा चरितार्थासाठी आवश्यक कौशल्ये नसतात, भाषेचा अडसर असतो आणि स्वतःबद्दल असुरक्षिततेची भावना असते. तसेच जर त्या मुलीला जबरी मानसिक धक्का बसला असेल तर त्या धक्क्यातून स्वतःला सावरण्यासाठी मदत मागायला पाहिजे आणि ती कुणाकडे मागायची याची माहिती / भान नसेल तर स्थिती आणखी अवघड होते.

लग्न होऊन परदेशी गेल्यावर नवर्‍याकडून झालेल्या फसगतीमुळे मनाने उध्वस्त झालेल्या २-३ सुशिक्षित मुली मी पाहिल्या आहेत. त्यांना त्या धक्क्यातून सावरून, ती परिस्थिती स्वीकारून, ''आता आपणच काहीतरी केले पाहिजे'' याची जाणीव होऊन तशी हालचाल करायला ५-६ महिने लागले.

मी भारतात, अगदी पुण्यात तेही काका, मामा इ.सर्व नातेवाइक जवळपास असणार्‍या पण लग्न झाल्यावर नवर्‍यानं त्याला 'गर्लफ्रेंड' असल्यानं 'आपण भाउ-बहिण म्हणून राहूया' असं हनिनूनच्या रात्री सांगितलेल्या मुलीलाअगदी जवळून ओळखते. ती अशी 'भाउ-बहिण' नात्यात एक वर्ष राहिली होती.
त्यामुळे अशा बाबतीत सपोर्ट सिस्टीम पेक्षा आहे ती सिस्टीम वापरायला तुम्ही किती सक्षम आहात ही बाब जास्त महत्वाची आहे.

>> सपोर्ट सिस्टीम पेक्षा आहे ती सिस्टीम वापरायला तुम्ही किती सक्षम आहात ही बाब जास्त महत्वाची आहे.
+१

सिमंतिनी, उत्तम पोस्ट्स.

सपोर्ट सिस्टीम पेक्षा आहे ती सिस्टीम वापरायला तुम्ही किती सक्षम आहात ही बाब जास्त महत्वाची आहे.
>> खरं आहे.

सगळ्या पोस्ट्स आवडल्या. आपली सपोर्ट सिस्टीम कोण होऊ शकते हे ओळखणेही फार महत्त्वाचे आहे.
प्रत्येक नवीन ठिकाणी सपोर्ट सिस्टीम तयार करायला प्रयत्न करावेच लागतात, नवीन वर्कप्लेस असूदे नाहीतर नवीन शहर. त्यामुळे तशी मानसिक तयारी नेहेमीच ठेवली पाहिजे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे women should stand for themselves. त्या तसं करू शकत असतील तरच त्यांना empowered म्हणता येईल, मग कितीही उच्चशिक्षित/अशिक्षित असूद्या!

>>अमेरिकेत कुटुंब प्रधान मानले तरी एकूण समाजाची रचना एकटी निर्बल व्यक्ती सन्मानाने राहू शकेल (खरे तर इथल्या कुमारीमाता लक्षात घेतल्या तर दुकटी निर्बल स्त्री सन्मानाने राहू शकेल) ह्या पायावर झालेली आहे. एकूणच लोकसंख्या कमी म्हणून काही जागी मदतीस तंत्रज्ञान वापरले जाते<< +१

>स्टुडंट विसा<<
ती फक्त ३ वर्षाच्या विसावर आलेली. तिने आल्या आल्या ग्रीन कार्ड असलेला मुलगा शोधण्यास सुरुवात केली. एकदम प्लॅन तयार असल्याप्रमाणे घाईत लग्न उरकले. तिची आई आठ दिवस येणार असून सुद्धा तिच्या साठी न थांबता लग्न रजिस्टर लग्न उरकून घेतले मैत्रिंणींना बरोबर घेवून(साक्ष म्हणून).

ती फक्त ३ वर्षाच्या विसावर आलेली. तिने आल्या आल्या ग्रीन कार्ड असलेला मुलगा शोधण्यास सुरुवात केली. एकदम प्लॅन तयार असल्याप्रमाणे घाईत लग्न उरकले.>> Sorry for English. It was probably a J1 visa supported by an educational institute. But since it was for 3 years, she must be in a good program. It is unlikely her certificates are fradulent. About Green card: It is often other way around. Once form I-485 is filed for a person (in this case man), they cannot have a dependent soon. Dependent approval of a green card holder often takes 3-5 years. Hence a green card holder has a small pool of women/men to select from. They are the ones who usually rush the partner into a marriage if the partner is present in the US. Even if they don't rush the other person, it is an absolutely mutually agreeable situation for them. So the differences in that couple need to be addressed on the basis of what is happening currently rather than in past.

त्याने काहीही न करता फक्त तिच्या मानसिकतेशी खेळून तिला गुलाम ठेवले होते. हे कुठेही घडू शकते कदाचित आत्ता तुमच्या शेजारी होत असेल. हा मानसिकतेचा अडसर दूर करणे खरी कसोटी. >>>>>>> अगदी खरं. आणि हा अडसर दूर करण वाटतं तितक सोपं पण नाही. जिच्या बाबतीत हे सगळं होतं, तिला स्वतःला पण बरेचदा कळत नाही की नक्की काय चाललय आणि ही परिस्थिती कशी हाताळावी ते.

सिमंतिनी, अहो तुम्ही तर अगदी ठामपणे सांगताय की तिची सर्टीफिकेट खरी असतील म्हणून, असे झाले असेल , तसे झाले असेल म्हणून.

हि आमच्या ओळखीतली केस आहे.

दिल्ली, गाझियाबाद मध्ये अशी बरीच PhD वगैरे असलेली सर्टीफिकेट मिळतात. आणि हो स्टुडंट , सिटिझन्शी शी लग्न करु शकतात. लग्न होवून ५ वर्षे झालीत.

सिमंतिनी, अहो तुम्ही तर अगदी ठामपणे सांगताय की तिची सर्टीफिकेट खरी असतील म्हणून, असे झाले असेल , तसे झाले असेल म्हणून >> नाही तुमची माहिति खरी आहे हे ग्रुहित धरुन केलेला सुसन्गत तर्क आहे. नसेल आवडल तर माफ करा. I said its unlikely. Not a definitive statement. Anyways, the point I am trying to make is irrespective of how she got a degree or how they got married, if he seeks help about how their marriage is today that will be one small step towards solving the problem. Seeing a lawyer, counsellor on those grounds will yield him faster results in a direction he wants.

>>इतर संस्था आहेत त्याचा उहापोह इथे झाला आहे. मुळात आपला पासपोर्ट कुणी काढून घेतला तर ते घर नांदायच्या लायकीचे नाही हे समजून घ्या. मारपीट केली, शिवीगाळ केली तरी "तू समजुतीने घे", "त्याचा उद्देश चांगला आहे" इ इ आपल्याच लोकांच्या समजावणीला बळी पडू नका. पहिला चान्स मिळताच वकिलातीत/संस्थेत जा कारण हा पहिला चान्स शेवटचा चान्स असू शकतो. इथेच बहुतेक मुली कमजोर होतात. आई-वडील पाठीशी नाही उभे राहिले तरी आपले आयुष्य स्वतः आखा.<<

नवीन नवरी भारतात राहून कितीही स्वतंत्र असली तरी अमेरीकेत /इतर देशात गेल्यावर काही काळ अवलंबून राहावे लागते.

बर्‍याचश्या मानसिक आंदोलनातून सुधा जात असते, नुकतच झालेल लग्न. वगैरे. अगदी ठरवून अमेरीकेतील नवरा केला असला तरी , ९११ वगैरे महित असले तरी.... एक वेगळ्या देशाला, परीस्थीतीला जमवून घ्यावे लागते.

पैसा हि हाताशी नसतो.
एका अश्याच उदाहरणात नोकरीच नसलेला मुलाने लग्न करून बायको घेवून गेला. तिथे एकच सेल फोन. सकाळी गायब बॉर्डर्स मध्ये. हिच्याकडे फोन नाही. बाहेर बर्फ. घरात फक्त पाव व दूध. तेच खावून राहिली.
माझा पगार खास नाही म्हणून ईंटरनेट घेतले नाही असे सांगून दुसर्‍या दिवशी सकाळी जो गेला , तो रात्री आला.
एक काम होते म्हणून आलो नाही.
तिने भांडून, रडून मी हि येते, किंवा मी आणलेले पैसे दे तर नाही दिले.
पंधरा दिवस रोज दूध, पाव व तोच प्रकार नवर्‍याने केल्यावर( सकाळी नाहीसे होवून, रात्रीचे यायचे) असे झाल्यावर एक दिवस तिने शेजारची बेल वाजवली. सुदैवाने त्या अमेरीकन बाईने मदत केली व नंतर तिला मदत मिळाली.

ह्या प्रकारात मुलाचे मित्रांनी खोटी साक्षी(हो आम्ही ओळखतो, खूप मोठ्या पदावर आहे) असे लग्नाआधी अमेरीकेत मुलीने फोन केल्यावर सांगितले होते(त्यावेळी ओर्कुट, फेसबूक न्हवते). त्यामुले कोण तुझा मित्र विचारल्यावर ह्याने मित्राला फोन दिला.

मुली फसतात त्याची उदाहरणे कानावर खूप येतात पण मुलगेही फसलेले असताना त्यांच्या न्युज काही महत्व दिएल जात नाही.
कित्येल मुलींनी पण नवर्‍याला छळून फसवलेय.

आपले शिक्षण करण्याकरता इथे यायचे विसावर, मुलाकडून लोन मिळाले की शिक्षण पुर्ण करायचे. ते दोन तीन वर्षे बहाणे सांगायचे. लांब युनिवरसिटी शोधायची जिथे आपला आधीचा बॉयफ्रेंड आहे म्हणजे नवर्‍याशी कमी संपर्क. शारीरीक संबध नाकारायचे.... असे करून शेवटी आपले काम झाले की बाय बाय करायचे.

कित्येल मुलींनी पण नवर्‍याला छळून फसवलेय. >> I agree women too can torture men emotionally financially. It is not a question of gender. I know men who came to the US and discovered they were gays. Their partners (Indian or international) abused them. I myself know one such individual. They get the worst deal as there are no shelter homes for them. The law was revised early this year (or maybe it is still under revision).

.
सिमंतिनी,
Its ok. प्रश्ण आवडायचा नाही असे नाही. मूळ मुद्द्यानुसार, तो मुलगा पुर्ण रुतलाय. मुलीने घर नावावर केलेय. एक मुलगा झालाय त्याचा पपेट सारखा वापर करतेय. मुर्ख मुलाने तिच्याच बहिणीच्या कंपनी थ्रू नोकरी करतोय.
पाच वर्षात तिने स्वतःच्या बहिणीला आणले. स्वतः कडे ठेवून नवर्‍याच्या पैशाने शिक्षण केले तिचेसुद्धा. तिचे लग्न सुद्धा एका सिटिझन मुलाशी लावले. पण हि बहिण मात्र तिच्या नवर्‍याशी सध्या तरी नीट वागतेय.

हि मुलगी मात्र रोजचे भांडण करते की आता तू भारतात चल. नाहीतर आधी मी जाते, तू नंतर ये. भारतात दिल्लीत स्वतःचे घर घेतले ह्याच्याच पैशाने.

ह्या मुलाचा इतका कसा काय आत्म्विश्वास गेलाय हेच आम्हाला कळत नाहीये.
पाच वर्षात लग्न झाल्यापासून ह्या मुलीने मुलाला घरच्यांशी सबंध तोडायला लावले, फोन सुद्धा करायला द्यायची नाही. ह्या प्रकारात ह्या मुलीने एकट्याला एकदम वाटत पकडून कामं करून घेतली(घर घे, बहिणीच शिक्षण कर...). कोणाशी बोलणे नसल्याने ह्या मुलाला काय बरोबर ,काय चूक समजत न्हवते वाटतं.
तेव्हा त्या मुलाची आई म्हणायची की कसा काय हा बुळ्या झालाय, आई बापाला विचारत नाही. काय आहे त्या मुलीत.

कोणी मग कशाला लक्ष घालेल. तो फोनच घ्यायचा नाही. आता अलीकडे तो त्याच्या आईला हे किस्से सांगायला लागलाय.... आई माझी चूक झाली... माझा चॉईस चुकलाय. मी कसेतरी जगतोय.... पण बुळ्या सर्व तिच्या नावावर करून बसलाय.
डिवोर्स केसमध्ये न्यु जर्सीत तसेही बाईला (त्यात मूल असेल तर) घर वगैरे मिळण्याचे ज्यास्त चान्सेस आहेत.

ह्या मुलीचे बरेचसे पैसे भारतात सुद्धा पाठवणे चालू असते. आता मुलगा झाल्याने हा बुळ्या आणखी गोंधळलाय.

नीट ठाम काही करायचे तर एकदा हा म्हणतो मग दुसर्‍या मिनिटाला कच खातो. परत फोन केला तर हाच म्हणेल की मुलाचे कसे होणार?

एकूणात त्याचा आत्म्विश्वास पुर्ण गेलाय.... बरेच वाईट वाटते. हा डॉक्टर आहे. शिकलेला आहे. व अगदी गरीबासारखा रहातो. बायकोने सगळी कडे जॉईंट अकॉउंट खोलालेय.. पैसा आला की बँकेत की हि भारतात मूव करणार. बायको घरातच बसून असते.

झंपी , मुलगा अगदी मुर्ख , बिनडोक , भित्रा असल्याशिवाय त्याची बायको इतका त्रास देऊच शकणार नाही. फक्त त्यांच्या मुलाचा प्रश्न सोडला तर बाकी तुम्ही लिहिलेल्या बहुतेक प्रॉब्लेम ला अतिशय सहज सोडवता येऊ शकते. तुमच्या माहितीत एकंदरीतच खूप लूप होल्स आहेत असे वाटतेय. फॅक्ट्स नाहीत फक्त ऐकीव माहिती वरच्या पोस्ट्स वाटत आहेत.

बायकोने सगळी कडे जॉईंट अकॉउंट खोलालेय.. पैसा आला की बँकेत की हि भारतात मूव करणार. बायको घरातच बसून असते. >> त्याने वेगळे खाते उघडावे आणि पगार त्या खात्यात जमा करावा.

देशात घर घेताना पैसे जर याचे होते तर घरावर तो स्वतःचे नाव लावू शकत होताच.

बरे देशातले आणि अमेरिकेतले घर जरी बायकोच्या नावावर असले तरी अमेरिकेतले घराचे तरी नक्कीच लोन चालू असणार. त्याचे हप्ते तोच भरत असेल ना!! बायको काम करत नाही म्हण्जे. बायकोला जरी घर मिळाले तरी यानी नाही दिले पैसे तर ती लोन कसे फेडू शकेल ?

हि मुलगी मात्र रोजचे भांडण करते की आता तू भारतात चल. नाहीतर आधी मी जाते, तू नंतर ये. भारतात दिल्लीत स्वतःचे घर घेतले ह्याच्याच पैशाने. >> अरे मग जाऊ दे की तिला भारतात. नाहीतरी त्रास देतेय ना त्याला. ती गेली कि त्याला जरा शांतपणे नाही का रहाता येणार? मुलाचे नंतर बघता येईल.

झंपी , मुलगा अगदी मुर्ख , बिनडोक , भित्रा असल्याशिवाय त्याची बायको इतका त्रास देऊच शकणार नाही. >> हम्म आर्थिक जवळीक कशी साधावी हा गुंतागुंतीचा प्रश्न असतो. आर्थिक संवाद कसे साधायचे हे समजत नाही. "आमच्या घरी हे/हीच सर्व व्यवस्थित बघतात" अशीच वाक्ये ऐकत लहानाचे मोठे होतो. कसे जमेल एकदम? जोडपी आयकर भरताना 'Married- joint filing' भरतात पण व्यवहारात 'माझा पैसा' 'तुझा पैसा' होत राहते. आपण स्वतः व्हल्नरेबल न होता दुसर्याची आर्थिक काळजी घेणे कसे जमावे?
(जो काम करतो त्याच्या गळ्यात आपण जास्त कामे मारतो. म्हणून-) अरुंधती यांना विनंती Happy (किंवा इतर कुणी जे तयार होतील) ह्याबाबतीत काही कायदेशीर माहिती असेल (भारतीय कायद्यानुसार) तर जरूर सांगा. बा.फ. चा विषय वेगळा वाटत असला तरी ही माहिती विषयास पोषक आहे.

खोटी शिक्षणाची सर्टीफिकेट बनवून इथे अमेरीकेत आलेल्या मुलीने >>> विश्वासच बसत नाही की कोणी खोटी सर्टिफिकेट्स वर अमेरिकेत विद्यापीठात प्रवेश घेऊ शकतं. कसं शक्ययं ?

माझ्या नवर्‍याचा बाल पणीचा मित्र, जो समोरच रहातो. खुप हूषार, आय.आय.टी करुन तिकडे गेला. ग्रीन कार्ड मिळवलं. मधे येवुन पुण्याच्या एका मुलीशी लग्न केलं. तीपण इंजिनीयर. तिकडे गेले. बायकोने तिकडे पुढिल शिक्षणासाठी नाव घातले. ( सगळं विसा वगैरे नीट करुन )हळुच एका वर्षाने तिचा भाऊ पण तिकडे त्यांच्या कडे गेला. दोघेही भाऊ बहिण तिकडे पुढलं शिकले. सगळा खर्च ह्याचा. दोघांचीही शिक्षणं झाल्यावर नोकरी लागल्यावर तिने त्याला डच्चू दिला. चक्क घरातून नीघुन गेली. मध्यंतरी तिला ग्रीन कार्ड मिळालं होतच.... मग कळलं की तिचं दुसर्‍या मुलाशी आधीपासूनच अफेअर होतं. तिने पद्धत्शीर पणे ह्याचा वापर केला. त्याला व त्याच्या आई-वडिलांना भयानक धक्का बसला. शेवटी घटस्पोट झालाच.....

आता मात्र तो खुपच सावरला आहे. नव्याने जीवनाची सुरुवात एका साउथ इडियन मुली बरोबर केली आहे. एक गोड मुलगी पण आहे.... पण मधला घाव त्याचं कुटुंब अजूनही विसरु शकत नाही. अगदी जवळचा मित्र असल्याने त्याचे वडिल अनेकदा मन मोकळं करतात.....

त्यामुळे कोण कोणाचा कसा वापर करेल सांगता येत नाही. हे आर्थातच त्या मुलीने केलं ते ग्रीन कार्ड मिळवण्या साठी. कुठु तरी मला पुढे जायचे आहे.... मग मी कोणाचाही वापर करायला मागे पुढे पहाणार नाही......

सगळं जग ह्या मुलाला बावळट म्हणेल... पण साधं असणं, वापरलं जाणं, "मामा" बनणं हा ही एक स्वभाव असू शकतो. त्याच्या मनात काहीच छक्के पंजे येत नाहीत. ते सगळं कुटुंबच साधं आहे. एकदम सरळ. नशीबाने त्यांना त्यांच्या साधेपणाची फारच मोठी शिक्षा दिली.......

झंपी , मुलगा अगदी मुर्ख , बिनडोक , भित्रा असल्याशिवाय त्याची बायको इतका त्रास देऊच शकणार नाही.>>>>

प्रत्येक वेळेला मुर्ख, बिन्डोक. भित्रा असणंच गरजेचं नसतं.... तो त्याचा साधेपणा असू शकतो. जगाच्या चालीरीती न समजणे, दूसर्‍याची चालुगीरी चालवुन घेणे, चलाखपणा चा आभाव, साधारण दूसर्‍यला न दूखावायची वृत्ती, ह्याला आजकाल बिनडोक म्हणत असावेत कदाचित.

माझ्या ओळखीत एक काका आहेत, आता म्हातारे आहेत. पण त्यांच्या बायकोने त्यांना व त्यांच्या आईला जन्मभर छळलं..... अगदी धाकात ठेवलं. त्यांच्या मुलीचं जेंव्हा लग्न झालं तेंव्हा ती आई पासुन सुटका मिळणार म्हणुन अत्यानंदात होती. ते गृहस्थ रेल्वे मधे फार मोठ्या पदावर होते. पण अत्यंत साधे. एकदम लोकप्रिय व्यक्ति.... पण उलटुन न बोलणे हा त्यांचा स्वभाव होता.

काय असतं की पुरुष जर अन्याय सहन करत असेल तर तो " बिन्डोक, बावळट" पण हेच जर स्त्री सहन करत असेल तर ती "गरीब बिच्चारी". हे असे आपल्या मनावर पिढ्या न पिढ्या बिंबवलं गेलं आहे.

झंपी , मुलगा अगदी मुर्ख , बिनडोक , भित्रा असल्याशिवाय त्याची बायको इतका त्रास देऊच शकणार नाही. >> पण मुलगा असा असेल तर अमेरीकेपर्यंत पोहोचेलच कसा?

धागा जमेल तसा वाचत आहे. मूळ लेख आणि प्रतिसाद दोन्ही अतिशय माहितीयुक्त वाटत आहेत.

मध्ये एका ठिकाणी एक उल्लेख वाचला त्याबाबत एक अवांतर मतः

>>> अरुंधती कुलकर्णी | 22 June, 2013 - 15:05

मुलीने अगोदरच्या पतीशी घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.<<<

'कायद्याने गुन्हा आहे' अशी शब्दरचना करायला हवी असे वाटते, कायदेशीर गुन्हा म्हणजे कायद्याला मान्य असू शकणारा अपराध असे काहीतरी वाटते. (हे मी निव्वळ उगीचच लिहिले आहे, विशेष काही नाही).

चु भु द्या घ्या

बेफिकीर, थँक्स वाक्यरचनेतली चूक लक्षात आणून दिल्याबद्दल. पोस्ट लिहायच्या गडबडीत अनवधानाने चूक झाली. दुरुस्त करते. Happy

>>>मुलगा अगदी मुर्ख , बिनडोक , भित्रा असल्याशिवाय त्याची बायको इतका त्रास देऊच शकणार नाही.

खालचा व्हिडिओ आणि त्याखालची चर्चा वाचण्यासारखी आहे.

http://www.ted.com/talks/leslie_morgan_steiner_why_domestic_violence_vic...

अजून एक साइट, आपण अ‍ॅब्युजिव्ह रिलेशन मधे आहोत का ते पहाण्यासाठी

http://www.loveisrespect.org/is-this-abuse/is-this-abuse

Good link Aparna. Definition of abusive is important. A marriage that lacks communication skills is not uncommon. A woman who could sustain US academia for 3 years, who married for GC, who got her sister in the US etc etc suddenly wants to leave for India and no one knows the reasons why, no one cares to know why. A man who is qualified and can earn enough to maintain two properties and two dependents feels henpecked. This is not a healthy marriage for either one of them. Something needs to be changed and hopefully answer is not 'partners'.

Pages