सुंठीची कढी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 5 June, 2011 - 11:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पूर्वी पावसाळा सुरू झाला की घरात हमखास लहान मुलांची किंवा वृध्दांची पोटदुखी सुरु होत असे. कधी अपचन, वात किंवा हवामान बदलामुळे होणार्‍या या किरकोळ पोटदुखीवर आजीकडे ''सुंठीच्या कढी''चा हमखास उपाय असे. कधी कधी आम्ही मुले पोट दुखत नसतानाही केवळ ती कढी प्यायची म्हणून पोट दुखल्याचे नाटक करत असू! Happy

अगदी झटपट होणारा हा प्रकार औषधी सूप म्हणूनही पिता येतो. क्षुधावर्धक, पाचक असे त्याचे गुणधर्म आहेत. त्यासाठी लागणारे जिन्नस देखील सहज स्वयंपाकघरात उपलब्ध असणारे :

ताक : १ कप

सुंठ पावडर : पाव चहाचा चमचा

किसलेले आले : पाव चहाचा चमचा

हिंग चिमूटभर

सैंधव, शेंदेलोण, पादेलोण : चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

ताकात वरील सर्व जिन्नस घालून ते उकळावे व गरमागरम सूपसारखे प्यावे. नंतर किमान अर्धा तास तरी काही खाऊ नये. Happy

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

ह्यातील किसलेले आले, सैंधव, शेंदेलोण, पादेलोण या पदार्थांचा वापर करून आणखी एक पाचक बनविता येते. हे पदार्थ एकत्र करून त्यांत लिंबाचा रस घालायचा. हे पाचक अगदी चिमटीभर / पाव टी स्पून जरी खाल्ले तरी तोंडाची चव सुधारते, पचनाला मदत होते व भूक लागते.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक, आजी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

nice

हे छानय. पावसाळी हवेत गरम गरम प्यायला एकदम मजा येत असेल.
ताक उकळल्यावर फुटत नाही का की याला सतत ढवळावे लागते का फुटू नये म्हणून.

भारी.. राम्बाण उपाय हा एकदम. Happy

आमच्या घरी सुंठ तुप गुळाचे पेढे बनवतात बाबा. ते जरा थोडक्यात भागते. Wink

--------------------------------------------------------------------------------------------------------

काही महिन्यांपूर्वी आमच्या सोसायटीमधल्या एकांच्य लग्नात त्यांनी सिताफळ रबडी ठेवली. भर उन्हाळ्यात.
झालं. संध्याकाळी १०-१२ लोकांचे धाबे दणाणले.

आमच्या बिल्डींगमधे एक डेंटीस्ट रहातात. तेही दणाणले.
मग बाबांनी राम्बाण पाठवला. डॉक्टर ठणठणीत बरे झाले!

मला हे सांगताना बाबा सांगत होते, " परवा डॉक्टरांना बरं वाटत नव्हतं, मग मी त्यांना औषध दिलं. " Proud

--------------------------------------------------------------------------------------------------------

ऋयाम, सुंठ-गूळ-तूप आणि हळद घालून तयार केलेला पेढा खाल्ला की घशालाही आराम मिळतो. अनेक गायक असे पेढे बरोबर बाळगतात असं ऐकलंय. Happy

" परवा डॉक्टरांना बरं वाटत नव्हतं, मग मी त्यांना औषध दिलं. " >> Proud सह्हीये!

अरुंधती मस्तच. मला नेहमी आल्याचा काढा करावा लागतो पावसाळ्यात आता ही कढी मधुन मधुन करत जाईन.

आमच्याकडचे हमखास औषध Happy

कढी पेक्षा लेकीला द्यायला मी सुंठ, गुळ, तुप लाडु करते छोटे छोटे.

आलं-लिंबाचं पाचकं तर मला खुप आवडतं. यात आई थोडा ओवा पण घालायची... एकदम तोंपासु.. आज घरी जाऊन बनवणार Happy

ऋयामा Lol

ऋयाम, Lol

पूर्वी आमच्याकडे बाटलीभर पाचक तयारच असायचं. कदाचित पावसाळ्याच्या आधी करुन ठेवत असतील.वरच्या रेसिपीसारखीच आरारुटची खीरही मस्त लागते. त्याकरता कधीतरी तोंड यावं असं वाटतं.