तो -भाग २

Submitted by ग्रामिण मुम्बईकर on 2 June, 2011 - 11:32

http://www.maayboli.com/node/25958 तो -भाग १

नवीन सृष्टी निर्माण करताना काही गोष्टी पाळाव्या लागतात. त्यातलीच एक कार्यकारणभाव. कोणती गोष्ट कशामुळे झाली. ती तशी नसती तर काय झालं असतं? परत ह्याची प्रत्येक कॅरेक्टरच्या दृष्टीने वेगळी इंटरप्रीटेशन्स सांभाळणं. मग सगळं खरडल्यावर ते त्रयस्थपणे वाचून वाचकाला काय कसं वाटेल याचा अंदाज घेणं. कसला मेंटल स्ट्रेस येतो साला! त्यात ही इथे नाही. ह्या एकटेपणाचं ओझं वेगळंच... त्याचा वेडा स्वसंवाद पुन्हा एकदा सुरू झाला. चहावाल्याला नेहमीप्रमाणे लिहून ठेवायची खूण करून तो निघाला. आपल्या बायकोला प्रचंड आवडणार्‍या सिरीयलच्या लेखक आपल्याकडचा चहा पितो यातच त्याला जास्त आनंद होता.
घशात चहा पोळत होता आणि डोक्यात कादंबरी. ती जवळ नसतानाच आता त्याची ही कादंबरी कादंबरीतल्या त्या दोघांच्या संबंधांवर येऊन थांबली होती. कोणीतरी कोणाचातरी जीव घेत सुटलंय. बाप्ये, पोरं, बाया, म्हातारेकोतारे कोणाचीच आणि कसलीच गय होत नाहीये. आदिम जमातींनी ही कधी केल्या नसतील अशा अमानुष कत्तली पावलापावलावर होतायत. आणि त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि ती दोघं आपापल्या घरात दबून बसलीत. ह्याची कशी लावायची संगती? सांगड घालायची का? मुळात असं काही असतंच का अस्तित्वात? या विचारासरशी त्याला ती आठवली नसती तरच नवल. त्याचं विस्कळीत विचार अतिशय मनापासून बोलून दाखवणं तिला भारीच आवडायचं. तिला काही फारसं कळे असं नाही पण मग तिची साधीशीच उत्तरं तो अगदी डोक्यावर घ्यायचा! ती त्याचं सर्वस्व होती ते असंही. कादंबरी परत बाजूला टाकली. उशीखाली गुप्त झालेला मोबाईल शोधून काढला. एव्हाना पूर्ण चार्जला गेलाच होता. तिला फोन लावला. बिझी... अनेव्हलेबल... नॉट रिचेबल... स्विच्ड ऑफ...
तो परत चहा प्यायला बाहेर पडला. चहावाल्याला कटिंगची खूण केली. ऑईलच्या निळ्या पिंपातलं पाणी जर्मनच्या त्या पोचे गेलेल्या लोट्याने तोंडावर यथेच्छ मारलं आणि निथळत्या चेहर्‍याने बाजूच्या फळीवर बसला. असा पाचच मिनीटात हा लेखक परत टपरीवर आल्याचं पाहून चहावाल्याचं कुतूहल चाळवलं होतं. पण कॉलरकडून ओला होत जाणार्‍या शर्टाची पत्रास न ठेवता त्याला डोळे मिटून चहाची मसाला वाफ फुंकत फुंकत चेहर्‍यावर घेत बसलेला पाहून तो ही गप्पच बसला. अठ्ठावीस टिळ्यांच्या आठवणीत अठ्ठावीस फुंकरी मारून तो गार चहा एका घोटात त्यानं संपवला आणि डोळे उघडले. अठ्ठावीस, एकोणतीस, तीस मग एकतीस... असं किती दिवस अजून? डोळ्याला पारखं करून ते काजळ ती माझ्या कादंबरीला कधी लावणार? की फक्त पोपडे उडालेल्या भिंतीच तिच्या काजळाच्या नशिबी आहेत? आणि माझ्या पेनाच्या नशिबी फक्त सिरीयल्स? छे! आता इथपासून मागे जाऊन तो लेखक का झाला आणि मग पोट्यापाण्यासाठी सिरीयल्सच्या जंगलात का आणि कसा शिरला इथवर मागे जाण्याचे त्राण त्याच्यात नव्हते. फक्त सिरीयल्सचा लेखक म्हणूनच त्याची प्रतिभा संपायच्या आत त्याला काहीतरी करणं, करून दाखवणं गरजेचं होतं. आणि त्याला तिची प्रचंड आठवण येत होती. उत्तम लिहायची ऊर्मी दाबली जाणं किंवा ती दाबावी लागणं हीसुद्धा हिंसाच की. कादंबरीत तरी तलवारी आणि दंगली आहेत. इथेतर फक्त आणि फक्त रोजचीच जिंदगी. मग आता ही हिंसा, तिच्यावरचं त्याचं आणि त्याच्यावरचं तिचं बेफाट प्रेम, तरीही त्यांचं असं दूरवर, एकमेकांना प्रचंड मिस करताना, गप्प बसून रहाणं ह्याची आता संगती काय? सांगड घालावीच लागणार... कादंबरीत संगती न लावूनही चालण्यासारखं होतं. काही भाग गाळून आधी पुढचं लिहून मग बारक्याशा फ्लॅशबॅकमधे येता येतं. पण इथे सांगड घालावीच लागणार होती.
मागे एकदा त्याचा रूम पार्टनर नसताना ती त्याच्याचसोबत राहायला आली होती. त्यानंतर असं आख्खा आठवडाभर सोबत राहाण्याची संधी त्यांना आजवर मिळालीच नव्हती. त्याची एक सिरीयल संपली होती आणि दुसरी काही सुरू होत नव्हती. वर वर बेफिकीरी दाखवत आतून थोडं थोडं टेन्स होत जाण्याचा तो काळ. त्यांचं नातं अजून फुलत होतं. काही नाजूक पायवाटा अजून सरायच्या होत्या. तिला त्याच्या लेखनाबद्दल भारीच कुतूहल. एका रात्री तिच्या अनावृत्त पाठीवरून बोटं फिरवत तो लोळत पडला होता. दोघेही टक्क जागेच. त्या बोटभर स्पर्शात त्यांचं असणं एकवटलेलं. मग अशा वेळेस कसल्या ऊर्मीने ताडकन्‍ उठून तो टेबलपाशी जातो आणि कादंबरीतलं एखादं प्रकरण एकटाकी पूर्ण करतो? ती यावरून कधीच भांडत नसे. पण प्रश्न मात्र पडायचे तिला भारी भारी. तोच एकदा बोलून गेला होता तिला, लेखन त्याच्या व्यक्त होण्याची गरज आहे आणि ती सर्वांशाने व्यक्त होण्याची जागा. "होऽऽऽ." तिनेही मग मोठ्ठा होकार भरला होता ते ऐकून आणि म्हणाली होती, "देवपूजा महत्वाचीच पण म्हणून काही कोणी रोजची कामं सोडत नाही..." त्यांच्या हसण्यात, खिदळण्यात, मस्ती करण्यात मग एका मोहक प्रेमाची छटा कायमची येऊन वसली होती. हळुहळू आठवडा सरला. दोघंही एकमेकांना बर्‍यापैकी ओळखू लागले होते, एकमेकांना एकमेकांच्या आवडणार्‍या आणि नावडणार्‍या गोष्टींसकट. त्याचं उठल्या उठल्या तोंडात ब्रश धरून पेपर वाचत बसणं तिला मुळीच आवडायचं नाही. आणि त्याच्या खोलीतल्यात्या वीतभर आरशावर तिनं टिकल्यांची आरास मांडणं त्याच्या डोक्यात जायचं. तेव्हापासून खूप काही घडलं होतं. चोवीस तास एकत्र असण्यापासून चोवीस तासाच्या अंतरावर असण्यापर्यंत. एक सिरीयलची असिस्टंटशिप संपवून नव्या सिरीयलचा लेखक होण्यापर्यंत. पण कादंबरी मागेच पडत चालली होती. सिरीयलच्या सवयीनं त्याची कादंबरी ही तो एपिसोडिकच लिहू लागायचा. वैतागून त्याने डझनावारी कागद जाळले होते.
शब्दातली का होईना पण सृष्टी जाळली त्याने... हिंसा केली. थोडाच काळ का होईना पण एपिसोडिक, उथळ, काळं पांढरं लिहून कादंबरीच्या आत्म्याशीच छळ मांडला त्याने... हिंसाच केली. आणि मग पुन्हा त्याला लिहीणं जमत नसल्याचा आरोप परिस्थितीवर करून त्यानं स्वतःच पीडिताचा आव आणला. मग त्याच्या कादंबरीतला तो ही असंच करतोय का? निव्वळ माणुसकीच्या नात्यानेसुद्धा बाहेर पडण्याची हिंमत तो दाखवू शकत नाही. कादंबरीतली ती सुद्धा घरातल्या घरात सुरक्षित असूनही फार तगमग होत असल्याचा आव आणून बसलीये. पण नुसतं बसून राहून काळ थांबत नाही. तो त्याच्या गतीनं सरकत रहातोच. त्यानं पिडीताचा आव आणून त्रस्त होणं किंवा कसलीतरी उत्तरं द्यायच्या आविर्भावात हिंसक वागणं ह्या दोन्ही गोष्टींनी काळाला तसाही फरक पडणार नव्हताच. दर साठ सेकंदांनी मिनीट भरणारच. शेवटी त्यानं कादंबरी गुंडाळून जागेवर ठेवून दिली. खानावळीचं आलेलं जेवला. पलंग आवरला. ताणून दिली. तीला फोन करण्यात अर्थ नाही आणि फोन लागत नाही म्हणून तिच्या आठवणींत रमण्यात तर नाहीच नाही, त्याला उमजलंच होतं एव्हाना.
पार संध्याकाळ होता होता उठला. फोनची रिंग वाजत होती. ईपीचा फोन, त्याच्या पेटंट सदैव वाघ मागे लागल्यासारख्या घाईत. "अरे नवीन प्रोजेक्ट आहे. आत्ताच्या आत्ता भेटून जा... लगेच नीघ. कधी निघतोयस???". आवरून आंघोळ करून छानपैकी तो बाहेर पडला. प्रोजेक्ट डन करून आला. आता रोज डबल काम. कथा-पटकथा-संवाद सगळंच. डिरेक्टरसोबत रोज मिटींग्ज. प्रोड्युसरच्या ऑफिसमधेच लिहीत बसायचं. हवा तितका चहा हातात गरमागरम. परतल्यावर सिरीयलचे एपिसोड्स आहेतच. चार पाच तासांपूर्वीची थांबलेपणाची आत्यंतिक भावना. त्यातून अनावर झालेली झोप. त्याच्या हॅंग होऊन तापत बसलेल्या डोक्याला झोप हाच उत्तम उपाय होता. नव्या, हव्या तशा मिळालेल्या कामामुळे म्हणा किंवा झोपेमुळे म्हणा किंवा गाढ झोपेत पडलेल्या तिच्या स्वप्नांमुळे म्हणा तो प्रचंड एनर्जेटिक होता. त्याला फार उड्या वगैरे माराव्याशा वाटत होत्या. बेल वाजली. रूममेटला आनंदाची बातमी सांगावी म्हणून त्याने जवळपास धावतच दार उघडलं.
"अब्बे मेरेको फिलीम मिल गई बे..." असं म्हणत त्याने रूममेटला आत खेचलंच. "चल पार्टी करते मस्त!" या त्याच्या वाक्यावर रूममेटची प्रतिक्रिया मात्र अजबच होती. "तू घरचं जेव मी एअरलाईन्सचे पनीर खातो.", असं म्हणून बॅग भरू लागला. "मी घरचं जेवू??" त्याने वळून पाह्यलं. दारात ती होती. तिची थकलेली पण कौतुकभरली नजर खूप काही सांगत होती. त्याला तिला उचलून घ्यायचं होतं. आरडत ओरडत गोल गोल फिरवायचं होतं... "मी निघतोच आहे दोन मिनीटात. थोऽऽऽडा धीर धर." या रूममेटच्या वाक्यावर दोघंही हसत सुटले. "अरे पण ही तुला कधी भेटली?", तो. "एक्स्पेक्टेड क्वेश्चन! खालीच. सोबत वर आलो. आणि बेल मारली." रूममेट.
तो रूममेटला व्यवस्थित टॅक्सीपर्यंत सोडून आला. तोवर तीने घरच्या बागेतली करवंदं, गरे, कैर्‍या, चिवडा, चकली, आंबावडी असा खजिना उघडलाच होता. ती फ्रेश व्हायला गेली; त्याने कादंबरीचं बाड पुन्हा हाती घेतलं. पूर्ण करायला.
त्याच्या स्वतःच्या जगण्याला समकालीन अशी त्याची वेगवान कादंबरी, नसते फ्लॅशबॅकीय ब्रेक न मारता, दंगलीनंतरचा काळा काळ, त्याच्या कादंबरीतल्या त्याच्या आणि तिच्यासाठी एक नवीन सुरूवात. त्याच्यासाठी पुढचं प्रकरण फक्त...

गुलमोहर: