गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.

(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)

मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे लेख आधी वाचा:
गर्भारपण आणि काळजी -१
गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार

काही साधारण सल्ला
१) गरोदर पण हे आजारपण नाही. आपल्या आई, आजी, पणजी यांनीं कोणत्याही आधुनिक सोयी नसताना मुलांना जन्म देऊन वंश आपल्यापर्यंत आला याचा अर्थ हाच कि बहुतेक आधुनिक सोयींची गर्भारपणात आवश्यकता नाही. सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या या "अत्यावश्यक" नाहीत. त्या विमा उतरवण्या सारख्या आहेत. आपण विमा उतरवला नाहीत तर आपण उद्या मरता असे नाही. या चाचण्या एक म्हणजे आपल्या मानसिक समाधानासाठी आहेत आणि दुसरे म्हणजे जर गर्भारपणात काही समस्या उद्भवली तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज होऊ शकतो.
२) ज्या भगिनी मायबोली किंवा तत्सम सामाजिक स्थळावर येऊ शकतात त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची नक्कीच नाही. म्हणजेचा आपल्याला मिळणारा आहार हा अत्यंत निकृष्ट दर्ज्याचा नक्कीच नाही. गर्भ हा एखाद्या पम्पासारखा असतो. पंपाला विहिरीत किती पाणी आहे याच्याशी घेणे देणे नाही.जोवर पाण्याची पातळी अगदी खदखदत होत नाही तोवर पंप आपले पाणी खेचत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पोषक द्रव्याची अत्यंत गंभीर अशी कमतरता होत नाही तोवर गर्भाला आपले पोषण मिळत राहते. त्यामुळे सर्व गरोदर भगिनींनी आपल्या गर्भाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल चिंता करणे सोडून द्यावे.
३) जोवर आपल्या मनात भय निर्माण होत नाही तोवर आपण त्यांच्या वस्तू विकत घेणार नाही या विपणन( मार्केटिंग) च्या मुलतत्वा प्रमाणे सर्व कंपन्या आपल्या बाळाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल होणार्या मातांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. म्हणजे मग त्यांना आपली आहार पूरक द्रव्ये विकणे सोपे होते.
४) गरोदरपणात स्त्रीचे ९ महिन्यात १२ किलो पर्यंत वजन वाढते. यात सरासरी मुलाचे ३ किलो, वार(प्लासेन्ता) २ किलो, गर्भजल २ किलो आणि गर्भाशय २ किलो असे ६ किलो आणि आईचे ३ किलो असे वितरण आहे. १२ किलोच्या पेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईच्या अंगावर चढते ( आणि नंतर ते कधीच उतरत नाही असा अनुभव आहे). एक लक्षात ठेवा अंबानींच्या घरी ५ किलोची मुले जन्माला येत नाहीत. तेंव्हा आपले वजन वाढले नाही तर आपल्या डॉक्टरन भेटा. जर सोनोग्राफीत मुलाचे वजन व्यवस्थित वाढत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. ( माझ्या बायकोचे दोन्ही गर्भारपणात फक्त ५ आणि ६ किलोने वजन वाढले होते आणि दोन्ही मुलांची व्यवस्थित वेळेस प्रसूती झाली आणि मुलांची वजने उत्तम होती.
५) गर्भारपणात प्रवास करणे किती सुरक्षित आहे?-- यावर आपल्याला वेगवेगळे डॉक्टर वेग वेगळा सल्ला देताना आढळतील. पण परत एकच गोष्ट
मी सांगू इच्छितो. गरोदर पण हे आजारपण नाही. पहिले ३ महिने थोडी जास्त काळजी घ्यावी. जर रक्तस्त्राव झाला तर ताबडतोब प्रवास बंद करावा आणि आपल्या डॉक्टर न भेटावे. अन्यथा जवळ अंतराचा (१०-१५ किमी पर्यंत) प्रवास करणे निषिद्ध नाही. लांबचा प्रवास (>५०० किमी )नक्किच टाळावा.
यात सुद्धा सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा कारण रेल्वेत बसणारीला खड्डे आणि गतीरोधकाचा(स्पीड ब्रेकर) हादरा बसत नाही. रेल्वे एकदम धक्क्याने चालू होत नाही कि जोरात ब्रेक लावून थांबत नाही. लोकल मध्ये सुरुवातीला आपल्या डॉक्टरांकडून आपण गरोदर आहोत हे सर्टीफिकेट घेऊन अपंग आणि व्यंग लोकांच्या डब्यातून निस्स्न्कोच्पणे प्रवास करावा.(पोट दिसायला लागल्यावर आपल्याला कोणीही सर्टीफिकेट मागणार नाही. यानंतर सुरक्षित म्हणजे बसचा प्रवास- कारण बसची चाके मोठी असल्याने लहान सहन खड्डे कमी लागतात. सर्वात वाईट म्हणजे रिक्षा कारण तीन चाकांपैकी एक चाक नक्की खड्यात जाते. त्यापेक्षा आपली दुचाकी जास्त सुरक्षित असते. पण आपल्याला चक्कर येत असेल तर वाहन चालवणे टाळावे.
६) गर्भारपणात सुरुवातीला काही जणींना फार मळमळते अगदी पोटात पाणी ठरत नाही. अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने उलट्या थांबवण्यासाठी गोळ्या (गर्भारपणात सुरक्षित असलेल्या) घेऊ शकता. पण तरीही पहिले तीन महिने जोवर मुलाचे अवयव तयार होत असतात(organogenesis) आपण जितक्या कमी गोळ्या घ्याल तितके चांगले. यात फोलिक आम्ल चा समावेश नाही. फोलिक एसिड हे एक ब गटातील जीवनसत्त्व आहे आणि ते ५ मिलि ग्राम रोज असे घेतात. हे मुलाच्या मेंदूच्या वाढीस मदत करते. ते याहून जास्त घेतल्यास आपल्या लघवीतून टाकून दिले जाते(,त्याचा दुष्परिणाम काहीच नाही).
पहिल्या तीन महिन्यात गर्भाचे वजन १०० ग्राम च्या आसपास पोहोचते तेंव्हा आपला आहार अगदी शून्य असेल तरीही गर्भाला काहीही फरक पडत नाही
तेंव्हा आपल्या बाळाचे पोषण कसे होईल याची चिंता करणे सोडून द्या.

हे नक्की वाचा
१) गरोदरपणात पाय का दुखतात ?--
हृदयाकडून पाया कडे जाणारया रक्त वाहिन्या पोटामध्ये दुभंगून त्यातला एक हिस्सा हा पोटातील अवयवांकडे जातो आणि दुसरा सरळ पायाकडे जातो. यातील पोटाच्या अवयवांकडे जाणारया रक्तवाहिन्यांपैकी गर्भाशयाची रक्त वाहिनी मोठी होऊन गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हा रक्त पुरवठा अधिक वाढवण्यासाठी पायाच्या रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि गर्भाशयाच्या रक्त वाहिन्या प्रेसरण पावतात. जेणेकरून येणारे बरेचसे रक्त गर्भाशयाला (आणि पर्यायाने वाढणाऱ्या गर्भाला) पुरवले जावे. यामुळे पायाच्या स्नायुंना होणारा रक्त पुरवठा ( आणि त्यात असलेले कैल्शियम) कमी होतो. याला उपाय म्हणून पायाच्या रक्तवाहिन्या जर प्रसरण पावल्या तर गर्भाशयाचा रक्त पुरवठा कमी होईल. यामुळे आपले डॉक्टर आपल्याला कैल्शियमच्या गोळ्या देतात जेणेकरून आपल्या रक्तातील कैल्शियम वाढेल आणि पाय दुखणे कमी होईल. संध्याकाळी नवर्याकडून किंवा सासूकडून पाय चेपून घेणे हाही यावर एक उपाय आहे.( भगिनींनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावा)
२) गर्भजल -- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कमी झाला तर त्याच्या मूत्रपिंडाला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे गर्भाची लाघवी कमी होते आणि पर्यायाने गर्भजल कमी होते. तेंव्हा गर्भजल कमी होणे हि साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळ पाणी किंवा इतर तत्सम पदार्थ घेऊन गर्भजल वाढत नाही. रोज एक नारळाचे पाणी प्यायल्याने (नारळवाल्याला फायदा होतो) गरोदर स्त्रीला फायदा होतो हे सिद्ध करणे कठीण आहे. किंवा त्याने कमी असलेले गर्भजल वाढते हे हि खरे नाही.
३) पोट दिसत नाही -- आपले पोट दिसणे याचा गर्भाच्या वाढीशी संबंध नाही तो आपल्या शरीराच्या ठेवणीशी आहे. आपल्या पोटाचे स्नायू जितके शक्तीचे(मसल टोन) असतात तितके पोट कमी दिसते. लठ्ठ किंवा आडव्या अंगाच्या स्त्रियांचे पोट लवकर दिसते. पहिल्या बाळंतपणात पोट कमी दिसते. (दुसर्या बाळंत पणात बऱ्याचशा स्त्रिया अंग कमावून असल्याने). बाळाचे वजन साधारण पाच महिन्याला ६०० ग्राम, सहा महिन्याला १२०० ग्रॅम आणि सात महिन्याला २ किलो च्या आसपास असते. त्यामुळे सहा महिनेपर्यंत पोट दिसत नाही हि अगदी नैसर्गिक गोष्ट आहे त्याचा बाऊ करू नये.
"गर्भ नीट पोसला जात नसेल ते बघून घे" असा दीड शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या " अनुभवी" स्त्रिया कमी नाहीत. आपल्या अशा बोलण्याने त्या होणार्या आईला किती मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल हा सारासार विचार नसतो.
४) सूर्य व चंद्र ग्रहण-- यात बाहेर गेल्याने गर्भावर परिणाम होतो या जुन्या (गैर)समजुती किंवा अंधश्रद्धा असल्याने त्याबद्दल जास्त न बोलणे श्रेयस्कर आहे. आपण कधी ग्रहणात बाहेर फिरल्याने गाईचे वासरू किंवा शेळीचे करडू जन्मजात व्यंग असलेले पाहिले आहे काय? मग हि गोष्ट मानव नावाच्या प्राण्यात होईल असे कसे समजावे. आपण न धड पुढे, न धड मागे असे अधांतरी झालो आहोत. ( म्हणजे काल मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बैठकीला जाणार होतो पण मध्येच मांजर आडवे गेले म्हणून गेलो नाही या सारखे आहे)
५) बाळंत पणात होणार्या मळमळ आणि उलट्या यावर -- आले किसून त्यात लिंबाचा रस, साखरसाधे मीठ आणि चवीपुरते सैंधव/ पादेलोण मिसळून बाटलीत भरून ठेवावे आणि दर थोड्यावेळाने घेत राहावे. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही शिवाय हा पारंपारिक उपचार डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी के ई एम रुग्णालयात प्रयोग करून सिद्ध केला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा घटक आले हा असून त्याने आपला CTZ (केमोरीसेप्टर ट्रिगर झोन) आणि उल्तीचे केंद्र यांना शांत करण्याचे गुण आहेत असे आढळून आले आहे. इतर सर्व घटक हे प्रामुख्याने ते चविष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. लिम्बात "क" जीवनसत्त्व सुद्धा आहे. आवळा सुपारी सुद्धा गुणकारी आढळून आली आहे ती सुद्धा त्यातील आल्याच्या रसामुळे तेंव्हा यातील आपल्याला जे आवडते ते निर्धास्तपणे घेतले तर चालेल. डॉक्टर आपल्याला DOXINATE च्या गोळ्या लिहून देतात यासुद्धा सुरक्षितच आहेत. परंतु एक मूलमंत्र म्हणजे पहिल्या तीन महिन्यात होता होईल तितकि औषधे टाळावीत.

गरोदरपणातील आहार

हा एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत असा दोन्ही विषय आहे यावर बरीच उलट सुलट मते आहेत आणि डॉक्टरनमध्ये सुध्धा मतभेद आहेत तेंव्हा त्या वादात पडताना मी साधारण अशी मते मांडत आहे ज्यावर साधारणपणे तज्ञांचे एकमत आहे.
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.
काही मुलभूत विधाने -- १) गरोदरपणात पहिले तीन महिने गर्भाचे अवयव तयार होत असतात. अवयव म्हणजे केवळ हात पाय नव्हे तर मेंदू हृदय यकृत से महत्त्वाचे अवयव. यामुळे या काळात बाहेरचे चमचमीत अन्न टाळावे कारण या काळात आपले पोट बिघडले तर त्यामुळे आणि त्यानंतर घ्यायला लागणाऱ्या औषधाने आपल्या गर्भावर परिणाम होऊ नये यासाठी. याचा अर्थ चमचमीत खायचेच नाही असा मुळीच नाही. आपल्याला भेळ शेवपुरी पाव भाजी, चिकन मटण आवडते तर ते पदार्थ घरी करून खावे. एक तर बाहेरील तेलाच्या आणि पदार्थांच्या दर्ज्याची खात्री देत येत नाही आणि त्यांच्या स्वच्छते बद्दल न बोलणे ठीक.
२) अमुक पदार्थ खा आणि तमुक खाऊ नका असे कोणतेही निर्बंध नाहीत. पण अति सर्वत्र वर्जयेत या नात्याने अतिरेक टाळा.
पपई किंवा तत्सम पदार्थ खाल्यामुळे गर्भपात होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. मी गेली अनेक वर्षे गरोदर कुमारिका वरील उपाय थकले कि गर्भपातासाठी डोक्टरांकडे येताना पाहत आलो आहे.
३) फळे आणि सुकामेवा हा जरूर आणि जितका जमेल तितका खावा. (सुकामेवा उष्ण पडेल या वर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खाऊ नका).
४) दुध पिण्यास कोणताही प्रतिबंध नाही. आपल्याला पचेल ते खावे.
५) तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांनी ऐसिडीटी होते कारण गरोदर स्त्रीच्या शरीरात गर्भाच्या सहय्य्तेसाठी प्रोजेस्टीरोन हे द्रव्य तयार होत असते त्यामुळे गर्भाला त्रास न व्हावा यासाठी आपल्या जठरातून आतड्यात अन्न उतरण्यासाठी वेळ लागतो( gastric emptying time) यामुळे अन्न जठरात जास्त वेळ राहून आपल्याला ऐसिडीटी आणि जळजळ होते. यास्तव असे पदार्थ(खायचेच असले तर) सायंकाळी खाऊ नयेत अन्यथा रात्री आडवे पडल्यावर अन्न आणि आम्ल घशाशी येत राहते. (दुर्दैवाने आपले सर्व चमचमीत पदार्थ तळलेलेच असतात).
६) पोळी भात भाकरी यापैकी आपल्याला जे आवडेल ते खावे. त्यात कोणतेही पथ्य नाही.
७) आपल्या आई वडिलांना मधुमेह असेल किंवा आपले वजन गरोदर पानाच्या अगोदर जर जास्त असेल तर आपल्याला गरोदर पणात होणारा मधुमेह होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पहिल्या महिन्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
८) "आता तुला दोन जीवांसाठी खायचे आहे" यासारखा चुकीचा सल्ला नसेल. कारण अगोदर म्हटल्याप्रमाणे पहिल्या पाच महिन्यात गर्भाचे वजन फक्त ५०० ग्राम ने वाढते आणि आपले वजन सुमारे ५० किलो असेल तर दुप्पट खाल्ल्यामुळे (१०१ टक्क्यासाठी २०० टक्के खाणे) काय होईल ते आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अगदी पूर्ण दिवसांचे मूल सुद्धा ३ किलोचेच असते जेंव्हा आईचे वजन ६० किलो (किंवा जास्त) तेंव्हा सुद्धा १०५ टक्क्या साठी २०० टक्के खाल्ले तर काय होईल? अशा सल्ल्यामुळेच बहुसंख्य बायका गर्भारपणात अंग "जमवून" बसतात जे नंतर कधीच उतरत नाही. (माझे शरीर वातूळच आहे. मी काहीच खात नाही मी नुसता तुपाचा वास घेतला तरी माझे वजन वाढते अशा सर्व सबबी मी ऐकत आलो आहे. )
९) पानात उरलेले अन्न टाकायचे नाही हा सल्ला योग्य असला तरीही पानात आधीच भरपूर घेऊ नये हा सल्ला कोणी ऐकताना दिसत नाही.
१०) आपल्या काही ग्रॅम ते ३ किलोच्या गर्भाला किती पोषक द्रव्ये लागतील याचा आपण अंदाज घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि आपण खातो आहे ते बाळासाठी नक्कीच पुरेसे आहे. तेंव्हा मायबोलीवर ज्या भगिनी हे लिखाण वाचत आहेत ( म्हणजेच ज्यांच्या कडे संगणक आहे) त्यांच्या बाळाला कोणत्याही अन्न द्रव्याची कमतरता भासेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गर्भाला पोषणद्रव्ये व्यवस्थित मिळतात कि नाही हि चिंता नसावी.
११)कोणताही पदार्थ आवडतो म्हणून पोट भरेस्तोवर खाउ नये. अहो डॉक्टर भूकच इतकी लागते कि सहनच होत नाही. डोहाळेच लागतात इ.कारणे देऊन आपण खात गेलात तर आपले वजन १०-१२ किलो ऐवजी २० ते ३० किलोने वाढेल आणि मग आपल्याला पाठ दुखी कंबरदुखी अशा तर्हेच्या व्याधीना शेवटच्या तीन महिन्यात सामोरे जावे लागेल. ( वि. सु.--आपण वजन किती वाढवायचे आहे हे प्रत्येक भगिनीने ठरवावे तो सल्ला देणारा मी पामर कोण?)
१२) ज्यांना भूक फार लागते त्यांनी भरपूर फळे खावीत म्हणजे भूकही भागेल आणि शरीराला आवश्यक सुक्ष्मद्रव्येहि भरपूर मिळतील.
१३) क्रमांक ८ चा सल्ला प्रसूत झालेल्या स्त्रियांसाठीही तितकाच लागू असतो. जन्माला आलेल्या बाळाचे वजन ३ किलो असते हे वजन ५ महिन्याला दुप्पट म्हणजे ६ किलो असावे आणि १ वर्षाला तिप्पट म्हणजे ९ किलो असावे. म्हणजे मुलाला दुध पाजण्यासाठी आपण दुप्पट खाल्ले तर आपला आकार दुप्पट होईल हे गृहीत धरा. मुलीचे वजन जर भरपूर वाढले नाही तर बाळंतपण व्यवस्थित केले नाही असा आक्षेप येईल या भीतीने अनेक आया आपल्या मुलीला जबरदस्तीने डिंकाचे लाडू शतावरी घातलेली मलई युक्त खीर भरपूर खाऊ घालतात. ( हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत). हे पदार्थ खायला घातले कि भरपूर दुध येईल हा एक गैरसमज आहे. अगदी रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया मुलांना एक वर्ष पर्यंत व्यवस्थित दुध पाजत असतात तेंव्हा ज्या स्त्रीला व्यवस्थित आहार मिळत आहे तिला दुध कमी येईल अशी शक्यता सुतराम नाही. हा सर्व त्यांच्या मनाचा खेळ असतो. गाईला दुध कमी आल्याने वासरू हाडाडले असे आपण कधी ऐकले आहे काय? मग मनुष्यप्राण्यात असे होईल हे का गृहीत धरायचे? बाल अन्न बनवणार्या आणि गरोदर स्त्रियांसाठी पोषक आहार बनवणार्या कंपन्यांचा हा चावटपणा आहे. नवीन आयांच्या मनात शंका निर्माण करायची म्हणजे मग आपल्या वस्तू विकणे सोपे जाते.
१४) नवजात मुलाच्या जठराची क्षमता फक्त ३० मिली असते आणि ४ महिन्याच्या बाळाची फक्त ५० मिली तेंव्हा कोणत्याही स्त्रीला दोन्ही बाजूना मिळून ५० मिली दुध येणार नाही असे होतच नाही. हा संभ्रम वरील कंपन्यानी आपल्या फायद्यासाठी निर्माण केलेला असतो. याला खतपाणी आळशी बायका देताना आढळतात. रात्री उठून मुलाला दुध पाज्ण्यापेक्षा बाटली तोंडात देणे त्यांना सोयीचे वाटते वर अग माझं दुध त्याला पुरत नव्हत मग काय करणार लक्टोजन द्यायला सुरुवात केली. मुलाला दुध पुरत नव्हतं हे आपणच ठरवलं मग काय बोलणार.

डॉक्टर आहारात सुधारणा करा आणि केवळ सप्लिमेंट वर अवलंबून राहू नका असे सांगतात याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. जीवन सत्त्वांचा शोध लागायच्या अगोदर ती अस्तित्वात नव्हती का? म्हणजे आजही अशी शक्यता आहे कि अशी काही सूक्ष्म द्रव्ये आपल्या पोषणासाठी आवश्यक आहेत ज्यांचा शोध लागायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी आहारात मिळतील त्या गोष्टी जीवन सत्त्व किंवा टोनिक च्या गोळ्यात मिळणार नाहीत. शेवटी या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला दिलेला तात्पुरता टेकू आहे. मूळ शरीराची बांधणी मजबूत करायला हवी यासाठी चौरस आहार आवश्यक आहे.
कुपोषण आणि अर्ध पोषण यात फरक आहे (UNDER NOURISHMENT AND MALNOURISHMENT). अर्ध पोषण म्हणजे सर्व घटकांचा अभाव पण कुपोषण म्हणजे असमतोल आहार ज्यात आपल्याला मिळणारे कर्ब,चरबी आणी काही वेळेस प्रथिने पूर्ण प्रमाणात मिळतात पण जीवनसत्त्वे आणी खनिजे नाहीत. म्हणजेच माणूस लठठ असेल तरी निरोगी असेलच असे नाही. गरोदरपणात डॉक्टर तुम्हाला या सूक्ष्म घटकांच्या गोळ्या देतात त्या गर्भाला काही कमी पडू नये यासाठी आणी त्या ९ महिन्यात उगाच धोका नको यासाठी. पण मूळ मुद्दा कुपोषणाचा. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर पुढच्या गरोदरपणात तो परत वर येतोच. पहिल्या ३ महिन्यात फक्त जीवन सत्त्वे (यात फोलिक एसिड येते) दिली जातात कारण पहिल्या ३ महिन्यात लोहाचा मुलावर कुपरीणाम होऊ शकतो असे आढळले आहे. म्हणून लोह हे ३ महिन्यानंतर दिले जाते.

व्यायाम आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. ते आपल्या प्रकृती आणी इतर बाबी पाहून चांगले सांगू शकतील.
असे जालावर सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे होईल. सबब क्षमस्व. तरीही व्यायाम जरूर करा कारण गरोदरपण हे आजारपण नाही शरीर लवचिक ठेवण्यासाठी, गर्भाच्या चांगल्या पोषणासाठी आणी सुलभ प्रसूती होण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहेच.

-डॉ. सुबोध खरे
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

same here....पित्त सोडलं तर दुसरा काहीही त्रास नाहीये आता. ५-६ दिवस तिखट खाणं पूर्ण बंदच ठेवते आणि दही-भात खाते. शनिवारी डॉक्टर उपाय सांगतीलच.

घरच्यांनी छान सांभाळून घेतलं, झालं बाई सगळं व्यवस्थित>>>>>>> खूप छान.

आमचेही हे दोन महिने आणि डिलिव्हरी सुरळीत पार पडावी. बास. fingers crossed.

खूप शुभेच्छा Happy
होईल सगळं व्यवस्थित Happy

गोंडस बाळ हातात आलं की आधीचं काहीच आठवणार नाही, बघा तुम्ही Happy

होईल सगळं व्यवस्थित Happy

गोंडस बाळ हातात आलं की आधीचं काहीच आठवणार नाही, बघा तुम्ही Happy ~ +१२३४५

चिन्मयी, हा पित्त/ reflux चा त्रास मलाही खूप झालेला..डॉ ना सांगितले तर ते म्हणाले आता डेलिव्हरी बेड वर जाईपर्यंत हे होणारच..तेव्हा काळजी करू नको सगळं प्रमाणात खा.
वर तुम्ही म्हणलात तसं..आपणच डाएड मधे चेंज करून बघत रहायच..
हे दोन महिने मस्त एंजॉय करा.. Happy

मागच्या ग्रहणात फार काही पाळायचं नव्हतंच. भारतात दिसणारच नव्हतं ते.
आता रविवारचं होणारं ग्रहण मोठं आहे. शनिवारी रात्री १० पासून वेध का काय ते लागणारेत. रविवारी पहाटे ४.४५ पासून दुपारी १.३८ पर्यंत पाळायचं आहे. काही न खाता पिता जमेलसं वाटत नाही. आठवा महिना लागलाय नुकताच. त्यामुळे स्वतःच्या आणि बाळाच्या तब्येतीची काळजी आधी घेईन..... वेळेस अंधश्रद्धेची रिस्क घेऊन. बाहेर उन्हात न जाणे आणि ग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहणे एवढं काटोकोरपणे पाळेन. बाकी बघू. जमेल तसं.

हो, 1.38 म्हणजे जरा जास्त आहे
खाणंपिणं व्यवस्थित होऊद्यात.बाकी सेफली, स्वतःला त्रास करून न घेता मजेत (दुसऱ्या आग्रह करणाऱ्या लोकांसाठी) शो ऑफ म्हणून जितकं पाळता येतं तितकं पाळा ☺️☺️

अगदी बरोबर मिस अनु (गोगा :दिवा:))
>>शो ऑफ म्हणून
आता करा मग नंतर बाळाला ताकत देऊन पुन्हा स्वतःच्ची ताकत परत आली की त्या शो ला ऑफ करा.
|| जय जय रघुवीर समर्थ ||

मागच्या वेळी मी जेव्हा ग्रहणाविषयी इकडे विचारले होते तेव्हा प्रतिकूल प्रतिसाद असतील हे अपेक्षित जरी असले तरी काही इतके टोकाचे असतील असे वाटले नव्हते.

काहींनी चांगला विचार केला त्यांची आभारी आहे. काहींना पटले नाही पण प्रतिसाद संयमित होता त्यांचा मताचाही आदर आहे.

पण MeghaSK ही बाई प्रचंड डोक्यात गेली. Such a sick mentality. हिच्यामुळे जो मनस्ताप , त्रास मला झाला त्याची जबाबदारी घेईल का ही? नक्कीच नाही, हजार उलट प्रश्न करेल मुद्दामून, कारण समोरच्या ला त्रास द्यायचा आणि स्वतः महान व्हायची कीड लागलेली असते अश्या मेंदूना.

ह्या धाग्यावर अवांतर प्रश्न विचारणारी मी पहिली नाही की शेवटची ही नाही. बर या आधी मी काही प्रश्न विचारले होते तेव्हा कुठे होती ही बाई. तुझे शास्त्र तुझ्या जवळ ठेव. मला विश्वास असो वा नसो, नाही घ्यायची मला रिस्क. तुला पटत नसेल तर जसे तू मला माझ्या आधीच्या प्रश्नांना इग्नोर केले तसे आता कर ना. जर ते तू वाचले असतेस तर कदाचित तुला माझी स्थिती कळली असती, पण स्वतः महान होणे जास्त गरजेचे दुसऱ्या च्या भावना पेक्षा, नाही का

इथे लिहिले नसते पण उद्याच्या ग्राहणाने तुझी चीड आणणारी आठवण आली, म्हटले ही मळमळ का साचवून घेऊ मनात म्हणून काढून टाकली.

मी परत इकडे काही सल्ला मागणार नाही हे माझ्यापुरते ठरलंय, चिन्मयी थँक्स तुझी नेहमीच मदत झालीये, तुला शुभेच्छा

Navmata होऊ घातलेल्या सख्यांनो, kasha ahat सगळ्यांच्या tabyeti? तुम्हाला शुभेच्छा!

मी परत इकडे काही सल्ला मागणार नाही हे माझ्यापुरते ठरलंय>>>>>>असं काही नसतं हो समीक्षा. क्षणीक असतं सगळं. कधीतरी चीडचीड निघते दुसरीकडे. इथे छान समजून घेणारी, समजावून सांगणारीही माणसं आहेतच की. एकमेकांच्या अनुभवाचा उपयोग होईलच ना. त्यामुळे एकमेकां सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ.. Happy

https://youtu.be/TVQnD8t8EiY

https://youtu.be/FHnAzaQ_ho4

ग्रहण व गर्भारपण वर हे विडिओ बघण्यात आले.>>>>> या डॉक्टर सुप्रिया पुराणिक, मी पण फॉलो करतेय हा त्यांचे विडिओज्. छान शब्दांत समजावून सांगतात. नक्की बघा तुम्हीपण समीक्षा.

समीक्षा ताई, थोडा शांतपणे विचार करा. तुम्ही इंटरनेटवर लिहीत आहात म्हणजे किमान शालेय शिक्षण झाले असेल, विज्ञान शिकला असाल. ग्रहण म्हणजे सूर्याच्या व ग्रहाच्या रेषेत दुसऱ्या ग्रहाने/उपग्रहाने येणे.
तुम्हाला जे लोक (आई वडील सासू सासरे इत्यादी) ग्रहणात अमूक पाळा तमूक पाळा हे सल्ले देत आहेत त्यांचा तुम्हाला मनस्वी राग/चीड यायला हवी. त्याऐवजी तुम्ही या भंपक गोष्टींची फिकीर करू नका असा मोलाचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीचा द्वेष करत आहात.
समजा तुम्हाला लोकांनी सांगितले की तुम्ही स्त्री आहात म्हणून नवऱ्याच्या ताटातच जेवले पाहिजे, नवऱ्याची मारधोड सहन केली पाहिजे, मासिक पाळीत बाजूला जाऊन बसले पाहिजे, घरातून बाहेर पडताना नखशिखांत बुरखा घालूनच पडले पाहिजे, नोकरी नाहीच करायची, वगैरे तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? या प्रथाविरोधात आवाज उठविण्याऱ्याला तुम्ही पाठिंबा द्याल की त्याचा द्वेष कराल.
ग्रहण काळात गरोदर बाईने अमूक तमूक बंधने पाळावीत या समजुतीत व मी वर उल्लेख केलेल्या अनिष्ट प्रथामंध्ये काही फरक नाही.
थोडा शांतपणे विचार करा.

चिन्मयी मी पाहते सुप्रिया पुराणिकांचे विडिओ नेहमी, पण ग्रहण आणि बाळ यासाठी माझी काळजी वेगळी आहे, ती आता इकडे सांगू इच्छित नाही.

टवणे काका, मला कळते तुमचे म्हणणे. ह्या बाई सोडून इतरांनी लिहिलेय की ग्रहण का पाळू नये. माझे त्यांच्याबाबत काही बोलणे नाही, उलट मी त्यांच्या मताचा आदरच केलाय. पण ह्या बाईचा प्रतिसाद मनस्ताप देणारा मानसिक छळ करणारा होता. बर ह्या बाईने व्यवसाय डॉक्टर लिहिलाय तिच्या प्रोफाइल मध्ये, मग जेव्हा मला डॉक्टर सल्ल्या ची गरज होती तेव्हा ही बाई शांत का होती?. मला डॉक्टर खरेंनी मदत केली. मग जर मदतीला नाही येऊ शकत तर किमान त्रास देणारे तरी लिहू नये एवढेच.

समीक्षा....अहो मेघाताईंचा तो प्रतिसाद चुकीचा होता असं नाही म्हणता येणार. फक्त शब्द थोडे harsh वापरले त्यांनी. बाकी सगळ्यांनी जे सांगितलं तेच त्यांनीही सांगितलं. थोड्सं तिखट भाषेत. तुमच्यासाठी किंवा तुमच्या बाळासाठी काही वाईट intentions नसणार.
बाकी तो एकच प्रतिसाद आठवून त्रास करुन घेऊ नका. तुमचं second trimester चालू झालं असेल ना. काळजी घ्या. आनंदी रहा. फक्त आनंदी राहण्याचाही खूप चांगला परिणाम होतो बाळावर.
ग्रहणाचा इतका विचार करताय तो कौटुंबिक दडपणामुळे असेल वा स्वतःची भीती असेल तुमची. काहीही झालं तरी तब्येतीची हेळसांड करु नका. आधी आपल्याला काय गरजेचं आहे ते पाहू. बाकी वर प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे "शो ऑफ" करायचा. नाईलाज असतो. ग्रहण उघड्या डोळ्यांनी न बघणे (किंवा न बघणेच)आणि घराबाहेर न जाणे एवढंच काटेकोरपणे पाळा. बाकी शो ऑफ.

दुनिया गयी भाड मी... तुम्हाले जे बरे वाटते ते करा... उपाशी रेव्हून मनाचीsशांती मिळेल असा वाटते तर उपाशी राहा....

काही अनाहूत सल्ला --

१) ग्रहणामुळे बाळावर परिणाम होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. ग्रहणामुळे कुत्र्यामांजरांची पिल्ले, गाईची वासरे, हरणाची पाडसे किंवा कोणत्याही प्राण्याची पिल्ले विकलान्ग होताना दिसत नाहीत. त्यामुळे याची काळजी नसावी

२) बहुसंख्य मुलींना आपल्या बाळाची काळजी वाटत असते आणि हे नैसर्गिक आहे. डॉक्टरांनी कितीही सांगितले कि बाळ व्यवस्थित आहे तरी हि अज्ञाताची भीती जात नाही हे खरे

३) ग्रहणात बाहेर पडल्यामुळे काहीही होत नाही हे पटत असले तरी बहुसंख्य वेळेस घरच्या वरिष्ठ मंडळींचा सल्ला अव्हेरणे बऱ्याच मुलींना शक्य नसते. त्यातून विषाची परिक्षा कशाला पहा असा सल्ला आई किंवा सासूबाईंकडून मिळाल्यामुळे अशा नाजूक मनस्थितीतील मुली सहसा त्यांना डावलून असे करणे शक्य नसते. त्यातून कापणे चिरणे करण्यासाठी घरच्या इतर स्त्रिया तयार असल्यामुळे तुला काम करायची गरजच काय असा प्रश्न निर्माण होतो.

४) चुकून बाळाला काही झाले तर हि भीती ( निराधार असली तरीहि) त्यांना असे करू देत नाही.

५) आज माझ्याकडे ६ अपॉईण्टमेन्ट घेतलेल्या गर्भार मुली आज अमावस्या आणि उद्या ग्रहण म्हणून आल्या नाहीत. ( आता सोमवारी त्यांना दवाखान्यात जास्त वेळ थांबावे लागेल हे माहिती असले तरीही)

६) PURIST - लोकांचे म्हणणे सत्य आहे कि ग्रहणाचा बाळावर परिणाम होत नाही.

७) पण माझ्यासारखे PRAGMATIST लोक बऱ्याच वेळॆस अतिरेकी पणा करू नका म्हणजे तहानलेल्या आणि उपाशी राहू नका. ज्यामुळे "तुम्हाला त्रास होईल" असे काहीहि करू नका.

८) १२ तास तुम्ही काही खाल्ले प्यायले नाही तर बाळावर काहीही परिणाम होत नाही हि निसर्ग काळजी घेत असतो.
रस्त्यावर दगड फोडणाऱ्या बायका किंवा आदिवासी बायका १२च काय २४ तास सुद्धा उपाशी राहिल्या तरी बळावर कोणताही परिणाम होत नाही.

९) बाकी घरच्या जवळच्या नातेवाईकांना दुखावून काही निष्पन्न होत नाही हे अनुभवाने समजलेले असते.

१०) फक्त एकच लक्षात ठेवा घरच्यांना वाईट वाटू नये म्हणून काही गोष्टी करत असलात तरी तुम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही एवढी काळजी घ्या.

परफेक्ट प्रतिसाद डॉ. सुबोध खरे Happy
८ व्या मुद्द्याबद्दल फक्त मला असं वाटतं की त्या बिचाऱ्या बायकांना सवय असते तशा कष्टांची म्हणून त्यांना ते सहन होतं. आपण उगाच तसा प्रयोग विशेषतः गरोदरपणात करायला जाऊ नये.

असं म्हणतात की 8 व्या महिन्यात विशेष काळजी घ्यावी.
आम्ही 10 च्या आत नाश्ता उरकणार आहोत .
आणि १:38ला स्वयंपाक सुरू करून सव्वादोन पर्यंत स्मपवून लगेच जेवायला घेणार आहोत.
तुम्ही तसं करू शकता
ग्राहन पाळणं होईल आणि उपाशी राहायला नको

आणखी एक गोष्ट कळली नुकतीच, सुर्यग्रहन असेल आणि ढगाळ वातावरण किंवा पाऊस इत्यादी असेल तर काहिच पाळले नाही तरी चालते

आम्हीही दहाच्या आत नाश्ता आणि दुपारचा स्वैपाक उरकणार
आणि नंतर गच्चीवर जाऊन ग्रहण पाहणार. डिसेंबरमधल्या ग्रहणासाठी घेतलेले सोलर फिल्टर आणि गॉगल्स शिल्लक आहेत ते बरं झालं. नाही तर आत्ता लॉकडाऊनमुळे मिळाले नसते कुठे.

यापुढे कोणत्याही गरोदर मातेला आहार व्यायाम व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर तिने सेपरेट धागा काढावा ही विनंती
ओळखीच्या वूड बी mother ला या धाग्याची लिंक पाठवणे सोयीचे जाते पण आता या सूंदर धाग्याला ग्रहण लागत आहे

चिन्मयी, मिळाली का तुला काही माहिती मिळाली का संतुलन बाळंत लेप बद्दल, मलाही सांग.

तुझी तारीख आता जवळ आली असेल ना, प्लिज मला कळव काय झाले मुलगा की मुलगी , आणि जमल्यास तुझा अनुभव शेअर कर, इकडे किंवा विपु करून

काळजी घे

समीक्षा, अजून तरी नेटवर वाचून माहिती मिळतेय. पण खरंच कुणाला अनुभव आहे का ते कळायला हवं होतं म्हणून इथे विचारलं होतं. no response. Sad
माझी डिलिवरी डेट जवळ येतेय त्यामुळे जरा जीवाची घालमेल वाढलेय. मन शांत ठेवणं थोडं कठीण जातंय. त्यात रात्रीची झोप पार उडालेय. जेमतेम २-३ तासच झोप होतेय. बघू. कसं काय होतंय. मी नक्की सांगेन तुम्हाला.

तुम्हीही काळजी घ्या. मुळात शक्य तेवढा आराम करा, शांत झोप घ्या(नंतर गरज असली तरी मिळणार नाही). खाणंपिणं नीट ठेवा. वजन नियमीतपणे वाढतंय यावर लक्ष ठेवा.

माझं पहिले ५ महिने वाढलंच नाहि आणि नंतर जास्त झपाट्याने वाढलं. गरजेचं होतं तेवढं वाढलंय पण कमी वेळात वाढल्याने आता हत्तीसारखे पाय घेऊन फिरतेय.

डिलिवरी डेट जवळ येतेय त्यावेळी जरा जीवाची घालमेल वाढतेच. त्यात सध्याच्या परिस्थितीमुळे आणखी दडपण आल्या सारखे होत असणार.
मला माझ्या एका कलिगला ऑनबोर्ड करायचं कर्मकठीण काम होतं त्यावेळी मग मी तशा हेवी मिटिंग्ज झाल्या की शांतपणाची गाणी ऐकायचे. तुम्हाला कशाने शांत वाटेल ते शोधा आणि करा. हेच करा तेच करा असं काही नसतं. आपल्या जीवाला कशाने बरं वाटतं ते करायचं. काहीजण वीणकाम करतात त्यांचाही तोच उद्देश असू शकतो.. (फक्त उदा.)
मागच्या आठवड्यात कलिगने एका गोड मुलीला जन्म दिला. आताच त्या गोड बाळीचे फोटो पाहात होते.. Happy
शुभेच्छा.

Pages