गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.

(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)

मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे लेख आधी वाचा:
गर्भारपण आणि काळजी -१
गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार

काही साधारण सल्ला
१) गरोदर पण हे आजारपण नाही. आपल्या आई, आजी, पणजी यांनीं कोणत्याही आधुनिक सोयी नसताना मुलांना जन्म देऊन वंश आपल्यापर्यंत आला याचा अर्थ हाच कि बहुतेक आधुनिक सोयींची गर्भारपणात आवश्यकता नाही. सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या या "अत्यावश्यक" नाहीत. त्या विमा उतरवण्या सारख्या आहेत. आपण विमा उतरवला नाहीत तर आपण उद्या मरता असे नाही. या चाचण्या एक म्हणजे आपल्या मानसिक समाधानासाठी आहेत आणि दुसरे म्हणजे जर गर्भारपणात काही समस्या उद्भवली तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज होऊ शकतो.
२) ज्या भगिनी मायबोली किंवा तत्सम सामाजिक स्थळावर येऊ शकतात त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची नक्कीच नाही. म्हणजेचा आपल्याला मिळणारा आहार हा अत्यंत निकृष्ट दर्ज्याचा नक्कीच नाही. गर्भ हा एखाद्या पम्पासारखा असतो. पंपाला विहिरीत किती पाणी आहे याच्याशी घेणे देणे नाही.जोवर पाण्याची पातळी अगदी खदखदत होत नाही तोवर पंप आपले पाणी खेचत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पोषक द्रव्याची अत्यंत गंभीर अशी कमतरता होत नाही तोवर गर्भाला आपले पोषण मिळत राहते. त्यामुळे सर्व गरोदर भगिनींनी आपल्या गर्भाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल चिंता करणे सोडून द्यावे.
३) जोवर आपल्या मनात भय निर्माण होत नाही तोवर आपण त्यांच्या वस्तू विकत घेणार नाही या विपणन( मार्केटिंग) च्या मुलतत्वा प्रमाणे सर्व कंपन्या आपल्या बाळाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल होणार्या मातांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. म्हणजे मग त्यांना आपली आहार पूरक द्रव्ये विकणे सोपे होते.
४) गरोदरपणात स्त्रीचे ९ महिन्यात १२ किलो पर्यंत वजन वाढते. यात सरासरी मुलाचे ३ किलो, वार(प्लासेन्ता) २ किलो, गर्भजल २ किलो आणि गर्भाशय २ किलो असे ६ किलो आणि आईचे ३ किलो असे वितरण आहे. १२ किलोच्या पेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईच्या अंगावर चढते ( आणि नंतर ते कधीच उतरत नाही असा अनुभव आहे). एक लक्षात ठेवा अंबानींच्या घरी ५ किलोची मुले जन्माला येत नाहीत. तेंव्हा आपले वजन वाढले नाही तर आपल्या डॉक्टरन भेटा. जर सोनोग्राफीत मुलाचे वजन व्यवस्थित वाढत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. ( माझ्या बायकोचे दोन्ही गर्भारपणात फक्त ५ आणि ६ किलोने वजन वाढले होते आणि दोन्ही मुलांची व्यवस्थित वेळेस प्रसूती झाली आणि मुलांची वजने उत्तम होती.
५) गर्भारपणात प्रवास करणे किती सुरक्षित आहे?-- यावर आपल्याला वेगवेगळे डॉक्टर वेग वेगळा सल्ला देताना आढळतील. पण परत एकच गोष्ट
मी सांगू इच्छितो. गरोदर पण हे आजारपण नाही. पहिले ३ महिने थोडी जास्त काळजी घ्यावी. जर रक्तस्त्राव झाला तर ताबडतोब प्रवास बंद करावा आणि आपल्या डॉक्टर न भेटावे. अन्यथा जवळ अंतराचा (१०-१५ किमी पर्यंत) प्रवास करणे निषिद्ध नाही. लांबचा प्रवास (>५०० किमी )नक्किच टाळावा.
यात सुद्धा सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा कारण रेल्वेत बसणारीला खड्डे आणि गतीरोधकाचा(स्पीड ब्रेकर) हादरा बसत नाही. रेल्वे एकदम धक्क्याने चालू होत नाही कि जोरात ब्रेक लावून थांबत नाही. लोकल मध्ये सुरुवातीला आपल्या डॉक्टरांकडून आपण गरोदर आहोत हे सर्टीफिकेट घेऊन अपंग आणि व्यंग लोकांच्या डब्यातून निस्स्न्कोच्पणे प्रवास करावा.(पोट दिसायला लागल्यावर आपल्याला कोणीही सर्टीफिकेट मागणार नाही. यानंतर सुरक्षित म्हणजे बसचा प्रवास- कारण बसची चाके मोठी असल्याने लहान सहन खड्डे कमी लागतात. सर्वात वाईट म्हणजे रिक्षा कारण तीन चाकांपैकी एक चाक नक्की खड्यात जाते. त्यापेक्षा आपली दुचाकी जास्त सुरक्षित असते. पण आपल्याला चक्कर येत असेल तर वाहन चालवणे टाळावे.
६) गर्भारपणात सुरुवातीला काही जणींना फार मळमळते अगदी पोटात पाणी ठरत नाही. अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने उलट्या थांबवण्यासाठी गोळ्या (गर्भारपणात सुरक्षित असलेल्या) घेऊ शकता. पण तरीही पहिले तीन महिने जोवर मुलाचे अवयव तयार होत असतात(organogenesis) आपण जितक्या कमी गोळ्या घ्याल तितके चांगले. यात फोलिक आम्ल चा समावेश नाही. फोलिक एसिड हे एक ब गटातील जीवनसत्त्व आहे आणि ते ५ मिलि ग्राम रोज असे घेतात. हे मुलाच्या मेंदूच्या वाढीस मदत करते. ते याहून जास्त घेतल्यास आपल्या लघवीतून टाकून दिले जाते(,त्याचा दुष्परिणाम काहीच नाही).
पहिल्या तीन महिन्यात गर्भाचे वजन १०० ग्राम च्या आसपास पोहोचते तेंव्हा आपला आहार अगदी शून्य असेल तरीही गर्भाला काहीही फरक पडत नाही
तेंव्हा आपल्या बाळाचे पोषण कसे होईल याची चिंता करणे सोडून द्या.

हे नक्की वाचा
१) गरोदरपणात पाय का दुखतात ?--
हृदयाकडून पाया कडे जाणारया रक्त वाहिन्या पोटामध्ये दुभंगून त्यातला एक हिस्सा हा पोटातील अवयवांकडे जातो आणि दुसरा सरळ पायाकडे जातो. यातील पोटाच्या अवयवांकडे जाणारया रक्तवाहिन्यांपैकी गर्भाशयाची रक्त वाहिनी मोठी होऊन गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हा रक्त पुरवठा अधिक वाढवण्यासाठी पायाच्या रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि गर्भाशयाच्या रक्त वाहिन्या प्रेसरण पावतात. जेणेकरून येणारे बरेचसे रक्त गर्भाशयाला (आणि पर्यायाने वाढणाऱ्या गर्भाला) पुरवले जावे. यामुळे पायाच्या स्नायुंना होणारा रक्त पुरवठा ( आणि त्यात असलेले कैल्शियम) कमी होतो. याला उपाय म्हणून पायाच्या रक्तवाहिन्या जर प्रसरण पावल्या तर गर्भाशयाचा रक्त पुरवठा कमी होईल. यामुळे आपले डॉक्टर आपल्याला कैल्शियमच्या गोळ्या देतात जेणेकरून आपल्या रक्तातील कैल्शियम वाढेल आणि पाय दुखणे कमी होईल. संध्याकाळी नवर्याकडून किंवा सासूकडून पाय चेपून घेणे हाही यावर एक उपाय आहे.( भगिनींनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावा)
२) गर्भजल -- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कमी झाला तर त्याच्या मूत्रपिंडाला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे गर्भाची लाघवी कमी होते आणि पर्यायाने गर्भजल कमी होते. तेंव्हा गर्भजल कमी होणे हि साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळ पाणी किंवा इतर तत्सम पदार्थ घेऊन गर्भजल वाढत नाही. रोज एक नारळाचे पाणी प्यायल्याने (नारळवाल्याला फायदा होतो) गरोदर स्त्रीला फायदा होतो हे सिद्ध करणे कठीण आहे. किंवा त्याने कमी असलेले गर्भजल वाढते हे हि खरे नाही.
३) पोट दिसत नाही -- आपले पोट दिसणे याचा गर्भाच्या वाढीशी संबंध नाही तो आपल्या शरीराच्या ठेवणीशी आहे. आपल्या पोटाचे स्नायू जितके शक्तीचे(मसल टोन) असतात तितके पोट कमी दिसते. लठ्ठ किंवा आडव्या अंगाच्या स्त्रियांचे पोट लवकर दिसते. पहिल्या बाळंतपणात पोट कमी दिसते. (दुसर्या बाळंत पणात बऱ्याचशा स्त्रिया अंग कमावून असल्याने). बाळाचे वजन साधारण पाच महिन्याला ६०० ग्राम, सहा महिन्याला १२०० ग्रॅम आणि सात महिन्याला २ किलो च्या आसपास असते. त्यामुळे सहा महिनेपर्यंत पोट दिसत नाही हि अगदी नैसर्गिक गोष्ट आहे त्याचा बाऊ करू नये.
"गर्भ नीट पोसला जात नसेल ते बघून घे" असा दीड शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या " अनुभवी" स्त्रिया कमी नाहीत. आपल्या अशा बोलण्याने त्या होणार्या आईला किती मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल हा सारासार विचार नसतो.
४) सूर्य व चंद्र ग्रहण-- यात बाहेर गेल्याने गर्भावर परिणाम होतो या जुन्या (गैर)समजुती किंवा अंधश्रद्धा असल्याने त्याबद्दल जास्त न बोलणे श्रेयस्कर आहे. आपण कधी ग्रहणात बाहेर फिरल्याने गाईचे वासरू किंवा शेळीचे करडू जन्मजात व्यंग असलेले पाहिले आहे काय? मग हि गोष्ट मानव नावाच्या प्राण्यात होईल असे कसे समजावे. आपण न धड पुढे, न धड मागे असे अधांतरी झालो आहोत. ( म्हणजे काल मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बैठकीला जाणार होतो पण मध्येच मांजर आडवे गेले म्हणून गेलो नाही या सारखे आहे)
५) बाळंत पणात होणार्या मळमळ आणि उलट्या यावर -- आले किसून त्यात लिंबाचा रस, साखरसाधे मीठ आणि चवीपुरते सैंधव/ पादेलोण मिसळून बाटलीत भरून ठेवावे आणि दर थोड्यावेळाने घेत राहावे. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही शिवाय हा पारंपारिक उपचार डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी के ई एम रुग्णालयात प्रयोग करून सिद्ध केला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा घटक आले हा असून त्याने आपला CTZ (केमोरीसेप्टर ट्रिगर झोन) आणि उल्तीचे केंद्र यांना शांत करण्याचे गुण आहेत असे आढळून आले आहे. इतर सर्व घटक हे प्रामुख्याने ते चविष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. लिम्बात "क" जीवनसत्त्व सुद्धा आहे. आवळा सुपारी सुद्धा गुणकारी आढळून आली आहे ती सुद्धा त्यातील आल्याच्या रसामुळे तेंव्हा यातील आपल्याला जे आवडते ते निर्धास्तपणे घेतले तर चालेल. डॉक्टर आपल्याला DOXINATE च्या गोळ्या लिहून देतात यासुद्धा सुरक्षितच आहेत. परंतु एक मूलमंत्र म्हणजे पहिल्या तीन महिन्यात होता होईल तितकि औषधे टाळावीत.

गरोदरपणातील आहार

हा एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत असा दोन्ही विषय आहे यावर बरीच उलट सुलट मते आहेत आणि डॉक्टरनमध्ये सुध्धा मतभेद आहेत तेंव्हा त्या वादात पडताना मी साधारण अशी मते मांडत आहे ज्यावर साधारणपणे तज्ञांचे एकमत आहे.
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.
काही मुलभूत विधाने -- १) गरोदरपणात पहिले तीन महिने गर्भाचे अवयव तयार होत असतात. अवयव म्हणजे केवळ हात पाय नव्हे तर मेंदू हृदय यकृत से महत्त्वाचे अवयव. यामुळे या काळात बाहेरचे चमचमीत अन्न टाळावे कारण या काळात आपले पोट बिघडले तर त्यामुळे आणि त्यानंतर घ्यायला लागणाऱ्या औषधाने आपल्या गर्भावर परिणाम होऊ नये यासाठी. याचा अर्थ चमचमीत खायचेच नाही असा मुळीच नाही. आपल्याला भेळ शेवपुरी पाव भाजी, चिकन मटण आवडते तर ते पदार्थ घरी करून खावे. एक तर बाहेरील तेलाच्या आणि पदार्थांच्या दर्ज्याची खात्री देत येत नाही आणि त्यांच्या स्वच्छते बद्दल न बोलणे ठीक.
२) अमुक पदार्थ खा आणि तमुक खाऊ नका असे कोणतेही निर्बंध नाहीत. पण अति सर्वत्र वर्जयेत या नात्याने अतिरेक टाळा.
पपई किंवा तत्सम पदार्थ खाल्यामुळे गर्भपात होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. मी गेली अनेक वर्षे गरोदर कुमारिका वरील उपाय थकले कि गर्भपातासाठी डोक्टरांकडे येताना पाहत आलो आहे.
३) फळे आणि सुकामेवा हा जरूर आणि जितका जमेल तितका खावा. (सुकामेवा उष्ण पडेल या वर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खाऊ नका).
४) दुध पिण्यास कोणताही प्रतिबंध नाही. आपल्याला पचेल ते खावे.
५) तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांनी ऐसिडीटी होते कारण गरोदर स्त्रीच्या शरीरात गर्भाच्या सहय्य्तेसाठी प्रोजेस्टीरोन हे द्रव्य तयार होत असते त्यामुळे गर्भाला त्रास न व्हावा यासाठी आपल्या जठरातून आतड्यात अन्न उतरण्यासाठी वेळ लागतो( gastric emptying time) यामुळे अन्न जठरात जास्त वेळ राहून आपल्याला ऐसिडीटी आणि जळजळ होते. यास्तव असे पदार्थ(खायचेच असले तर) सायंकाळी खाऊ नयेत अन्यथा रात्री आडवे पडल्यावर अन्न आणि आम्ल घशाशी येत राहते. (दुर्दैवाने आपले सर्व चमचमीत पदार्थ तळलेलेच असतात).
६) पोळी भात भाकरी यापैकी आपल्याला जे आवडेल ते खावे. त्यात कोणतेही पथ्य नाही.
७) आपल्या आई वडिलांना मधुमेह असेल किंवा आपले वजन गरोदर पानाच्या अगोदर जर जास्त असेल तर आपल्याला गरोदर पणात होणारा मधुमेह होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पहिल्या महिन्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
८) "आता तुला दोन जीवांसाठी खायचे आहे" यासारखा चुकीचा सल्ला नसेल. कारण अगोदर म्हटल्याप्रमाणे पहिल्या पाच महिन्यात गर्भाचे वजन फक्त ५०० ग्राम ने वाढते आणि आपले वजन सुमारे ५० किलो असेल तर दुप्पट खाल्ल्यामुळे (१०१ टक्क्यासाठी २०० टक्के खाणे) काय होईल ते आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अगदी पूर्ण दिवसांचे मूल सुद्धा ३ किलोचेच असते जेंव्हा आईचे वजन ६० किलो (किंवा जास्त) तेंव्हा सुद्धा १०५ टक्क्या साठी २०० टक्के खाल्ले तर काय होईल? अशा सल्ल्यामुळेच बहुसंख्य बायका गर्भारपणात अंग "जमवून" बसतात जे नंतर कधीच उतरत नाही. (माझे शरीर वातूळच आहे. मी काहीच खात नाही मी नुसता तुपाचा वास घेतला तरी माझे वजन वाढते अशा सर्व सबबी मी ऐकत आलो आहे. )
९) पानात उरलेले अन्न टाकायचे नाही हा सल्ला योग्य असला तरीही पानात आधीच भरपूर घेऊ नये हा सल्ला कोणी ऐकताना दिसत नाही.
१०) आपल्या काही ग्रॅम ते ३ किलोच्या गर्भाला किती पोषक द्रव्ये लागतील याचा आपण अंदाज घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि आपण खातो आहे ते बाळासाठी नक्कीच पुरेसे आहे. तेंव्हा मायबोलीवर ज्या भगिनी हे लिखाण वाचत आहेत ( म्हणजेच ज्यांच्या कडे संगणक आहे) त्यांच्या बाळाला कोणत्याही अन्न द्रव्याची कमतरता भासेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गर्भाला पोषणद्रव्ये व्यवस्थित मिळतात कि नाही हि चिंता नसावी.
११)कोणताही पदार्थ आवडतो म्हणून पोट भरेस्तोवर खाउ नये. अहो डॉक्टर भूकच इतकी लागते कि सहनच होत नाही. डोहाळेच लागतात इ.कारणे देऊन आपण खात गेलात तर आपले वजन १०-१२ किलो ऐवजी २० ते ३० किलोने वाढेल आणि मग आपल्याला पाठ दुखी कंबरदुखी अशा तर्हेच्या व्याधीना शेवटच्या तीन महिन्यात सामोरे जावे लागेल. ( वि. सु.--आपण वजन किती वाढवायचे आहे हे प्रत्येक भगिनीने ठरवावे तो सल्ला देणारा मी पामर कोण?)
१२) ज्यांना भूक फार लागते त्यांनी भरपूर फळे खावीत म्हणजे भूकही भागेल आणि शरीराला आवश्यक सुक्ष्मद्रव्येहि भरपूर मिळतील.
१३) क्रमांक ८ चा सल्ला प्रसूत झालेल्या स्त्रियांसाठीही तितकाच लागू असतो. जन्माला आलेल्या बाळाचे वजन ३ किलो असते हे वजन ५ महिन्याला दुप्पट म्हणजे ६ किलो असावे आणि १ वर्षाला तिप्पट म्हणजे ९ किलो असावे. म्हणजे मुलाला दुध पाजण्यासाठी आपण दुप्पट खाल्ले तर आपला आकार दुप्पट होईल हे गृहीत धरा. मुलीचे वजन जर भरपूर वाढले नाही तर बाळंतपण व्यवस्थित केले नाही असा आक्षेप येईल या भीतीने अनेक आया आपल्या मुलीला जबरदस्तीने डिंकाचे लाडू शतावरी घातलेली मलई युक्त खीर भरपूर खाऊ घालतात. ( हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत). हे पदार्थ खायला घातले कि भरपूर दुध येईल हा एक गैरसमज आहे. अगदी रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया मुलांना एक वर्ष पर्यंत व्यवस्थित दुध पाजत असतात तेंव्हा ज्या स्त्रीला व्यवस्थित आहार मिळत आहे तिला दुध कमी येईल अशी शक्यता सुतराम नाही. हा सर्व त्यांच्या मनाचा खेळ असतो. गाईला दुध कमी आल्याने वासरू हाडाडले असे आपण कधी ऐकले आहे काय? मग मनुष्यप्राण्यात असे होईल हे का गृहीत धरायचे? बाल अन्न बनवणार्या आणि गरोदर स्त्रियांसाठी पोषक आहार बनवणार्या कंपन्यांचा हा चावटपणा आहे. नवीन आयांच्या मनात शंका निर्माण करायची म्हणजे मग आपल्या वस्तू विकणे सोपे जाते.
१४) नवजात मुलाच्या जठराची क्षमता फक्त ३० मिली असते आणि ४ महिन्याच्या बाळाची फक्त ५० मिली तेंव्हा कोणत्याही स्त्रीला दोन्ही बाजूना मिळून ५० मिली दुध येणार नाही असे होतच नाही. हा संभ्रम वरील कंपन्यानी आपल्या फायद्यासाठी निर्माण केलेला असतो. याला खतपाणी आळशी बायका देताना आढळतात. रात्री उठून मुलाला दुध पाज्ण्यापेक्षा बाटली तोंडात देणे त्यांना सोयीचे वाटते वर अग माझं दुध त्याला पुरत नव्हत मग काय करणार लक्टोजन द्यायला सुरुवात केली. मुलाला दुध पुरत नव्हतं हे आपणच ठरवलं मग काय बोलणार.

डॉक्टर आहारात सुधारणा करा आणि केवळ सप्लिमेंट वर अवलंबून राहू नका असे सांगतात याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. जीवन सत्त्वांचा शोध लागायच्या अगोदर ती अस्तित्वात नव्हती का? म्हणजे आजही अशी शक्यता आहे कि अशी काही सूक्ष्म द्रव्ये आपल्या पोषणासाठी आवश्यक आहेत ज्यांचा शोध लागायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी आहारात मिळतील त्या गोष्टी जीवन सत्त्व किंवा टोनिक च्या गोळ्यात मिळणार नाहीत. शेवटी या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला दिलेला तात्पुरता टेकू आहे. मूळ शरीराची बांधणी मजबूत करायला हवी यासाठी चौरस आहार आवश्यक आहे.
कुपोषण आणि अर्ध पोषण यात फरक आहे (UNDER NOURISHMENT AND MALNOURISHMENT). अर्ध पोषण म्हणजे सर्व घटकांचा अभाव पण कुपोषण म्हणजे असमतोल आहार ज्यात आपल्याला मिळणारे कर्ब,चरबी आणी काही वेळेस प्रथिने पूर्ण प्रमाणात मिळतात पण जीवनसत्त्वे आणी खनिजे नाहीत. म्हणजेच माणूस लठठ असेल तरी निरोगी असेलच असे नाही. गरोदरपणात डॉक्टर तुम्हाला या सूक्ष्म घटकांच्या गोळ्या देतात त्या गर्भाला काही कमी पडू नये यासाठी आणी त्या ९ महिन्यात उगाच धोका नको यासाठी. पण मूळ मुद्दा कुपोषणाचा. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर पुढच्या गरोदरपणात तो परत वर येतोच. पहिल्या ३ महिन्यात फक्त जीवन सत्त्वे (यात फोलिक एसिड येते) दिली जातात कारण पहिल्या ३ महिन्यात लोहाचा मुलावर कुपरीणाम होऊ शकतो असे आढळले आहे. म्हणून लोह हे ३ महिन्यानंतर दिले जाते.

व्यायाम आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. ते आपल्या प्रकृती आणी इतर बाबी पाहून चांगले सांगू शकतील.
असे जालावर सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे होईल. सबब क्षमस्व. तरीही व्यायाम जरूर करा कारण गरोदरपण हे आजारपण नाही शरीर लवचिक ठेवण्यासाठी, गर्भाच्या चांगल्या पोषणासाठी आणी सुलभ प्रसूती होण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहेच.

-डॉ. सुबोध खरे
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पायाखाली उशी घेऊन झोपा, खुर्चीवर किंवा कोठेही बसताना पाय टेकले पाहिजेत असे बसा, लोम्बकळत ठेवू नका पाय.. छोटासा walk घ्या थोड्या थोड्या वेळाने

5 जून आणि 21 जूनला ग्रहण आहे तर वेध कधीचा आहे आणि गरोदरपणात ग्रहण कसे पाळावे सांगा प्लिज.
विश्वास असो नसो बाळासाठी कुठले रिस्क घ्यायला नको.
प्लिज मदत करा

विश्वास असो नसो बाळासाठी कुठले रिस्क घ्यायला नको.>>>>कै च्या कै, एकतर सरळ विश्वास आहे म्हणा आणि पाळा, नाहीतर सरळ विश्वास नाही म्हणून इग्नोर करा की,

समीक्षा,तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस.चल तुझा विश्वास आहेच तर ग्रहणात झोपून रहावे,काहीही खाऊ पिऊ नये असे म्हणतात.भाजी चिरणे इ.गोष्टी करू नये म्हणतात.वेधकाळात अगदी वॉशरूम्ला जाऊ नये.हे माझ्या मैत्रिणीला सांगितले गेले होते.आम्ही दोघी एकदमच प्रेग्नंट होतो.मी काहीही पाळले नव्हते.तिने पाळले.
तू इतके पाळू शकत असलीस तर पाळ,जेणेकरून तुला समाधान मिळेल.

ग्रहण रात्री ११,१५ ला सुरू होणार आहे. तेव्हा भाजी चिरणे वगैरे गोष्टी आपसूकच टळतील. तर अजिबातच टेंशन घेऊ नका. शांत झोपा सकाळी उठाल तेव्हा ग्रहण संपलेले असेल

देवकीताई थँक्स
मला एकीने सांगितले की झोपायचे पण नसते, नाहीतर बाळाला दिसत नाही, चिरले तर ओठ चिरलेला असतो, शेकले तर बाळाच्या पाठीवर भाजलेला व्रण येतो, म्हणून भीती वाटते, 21 तारखेचे ग्रहण तर पहाटे 4 पासून दुपारी 1.30 पर्यंत आहे, इतका वेळ कसे आणि काय करायचे कळत नाहीये, जर चुकूनही यात काही खरे असेल तर माझ्या बाळाला त्रास नको याची भीती वाटतेय, आत्ताशी 12 वा आठवडा चालुये मला

अग बाई,मी वर लिहिले आहे ते करणार आहेस का? पटते तरी का तुला?तू खायचे नाही तर बाळाला कसे मिळणार?
गरोदरपण हे अतिशय नैसर्गिक अ सते. त्या स्टेजचा छान आनंद घे.सतत घाबरु नकोस.

मी त्यावेळी चिरले आणि खूप khallehi. बाळ चिरलेल्या ओठांचे झाले नाही.व्यवस्थित होते.

मी पण
(म्हणजे मुळात मला ते आहे हे लक्षात नव्हते आणि मी ऑफिसमध्ये होते.)
तरीही याने स्वतःला गिल्ट येणार असल्यास,कोणाचे प्रेशर असल्यास नीट ग्रहणापूर्वी खाऊन पिऊन, डिहायड्रेट होणार नाही अशी काळजी घेऊन पाळा.जर झोपायचे नाही, बसून राहायचे असे असेल तर आवडते पुस्तक वाचा, कँडी क्रश खेळा, कोणतीतरी विनोदी सिरीयल घेऊन बिंज वॉच करा.
सर्व व्यवस्थित आहे.आपली दैवते प्रेग्नन्ट बाईने काही तास शरीराची गैरसोय न केल्याबद्दल शिक्षा देतील इतकी खुनशी नाहीत.ती आपल्या सारखीच दुसऱ्याच्या चुका थोड्याफार चालवून घेणारी आहेत असं माना.

यात डिस्काउंट आहे.झोपू नका म्हटलेय
लोळत पडून पिक्चर पाहू नका, गप्पा मारू नका असे काही म्हटलेले नाहीय ☺️☺️
परवा पुजारी लोकांनी देवाला गरम होते म्हणून थम्सअप आणि पर्क चा नैवेद्य दाखवलाय.
आपण थोडे कस्टमायझेशन करू शकतोच.

मी गरोदर असताना ३ ग्रहणॅ येउन गेली.. मी काहीही पाळले नाही...
माझ्या साबा म्हणाल्या ह्या सर्व अन्ध्श्रद्धाआहेत आणि अर्थात माझंही तेच मत आहे..
श्रीराम जप केला ग्रहणकाळात. बास..

रच्याकने माझं बाळ उत्तम आहे (टच्वूड) Happy Happy

आधीचा प्रतिसाद जरा रागातच दिला होता,sooo sorryy
माझ्या दोन्ही मुलांच्या वेळी ग्रहणे होती मी काहीच पाळले नाही कारण याने काहीही फरक पडत नाही असे मला फर्मली माहीत होते,
पण तुम्ही जर द्विधा असाल तर मग पाळा कारण चिराचीर करणार आणि नंतर सतत डोक्यात तेच ठेवले की अग बाई मी चिरले,खाल्ले आता बाळावर काही परिणाम होईल का? असे विचार येत राहिले तर मात्र बाळावर negative परिणाम होऊ शकतात असं मला वाटत

law of attraction !!!

मला एकीने सांगितले की झोपायचे पण नसते, नाहीतर बाळाला दिसत नाही,
-->>>

झोपू नका हे पहिल्यांदा ऐकले .

या प्रथा जुन्या काळात सुरु झालेल्या आहेत. वीज नव्हती आणि ग्रहण झाले कि अंधार होत असे मग अशा वेळी उगाच भाजी कापायला वगैरे गेलात तर इजा व्हायची शक्यता . बनवला नियम - ग्रहणात काही चिरायचे नाही .
तेच घराबाहेर पाडण्याबाबत- अचानक रात्र झाली असे वाटून जनावरे त्रास देउ शकतात परत रस्ता दिसणार नाही - बनवा नियम - ग्रहणात घराबाहेर पडायचे नाही.

समीक्षा - तुम्ही कोणतीही गोष्ट सर्वाना विचारून करता का? हि सवय सोडा. तुमची आई किंवा साबा जे म्हणतात तेच फॉलो करा. हजार जणांना विचाराल हजार नियम सांगतील.

कुठल्या जमान्यात आहोत आपण ? इ. स. २०२०!

ग्रहण चे हे सो कोल्ड नियम कधी कुणी सांगितले त्याला काही reference?

हे श्रद्धा /अंधश्रद्धा किती पालन केल्यास देवाचा कोप होत नाही? म्हणजे झोपू नये असे recommendation असेल पण 6 तासाच्या ग्रहणात 2 तास झोपले तर ?
असे किती नियम आहेत? सर्व नियम न पालता आले तर कितपत हानिकारक?

शिवाय कुठले कुठले आजार linked आहेत ग्रहणाशी?

कुणी उलट रिसर्च केलाय का?
Cleft lip/palate , visual impairment etc etc चे केसेस स्टडी करून किती affectrd babies च्या मातांनी गर्भावस्था मध्ये ग्रहण नियमावली चे पालन केले नाही यावरील संशोधन चा डेटा व conclusion काय आहे?
जर असे संशोधन झाले नसेल तर गेलाबाजार रूनमेष भाऊंचा एखादा धाग्याचा रेफरेंस ( जिथे 100+ प्रतिसाद पैकी 10 मी प्रेग्नेंसी मध्ये ग्रहण नियमfollow नाही केले पण बेबी सहीसलामत, २० प्रतिसाद- नियम followedबेबी सहीसलामत, 1 - followed everything as per protocol but baby born with congenital anomalies , etc आणि उरलेले ६९ प्रतिसाद रूनमेशचेच) पण चालेल .

On a serious note,

हा धागा गर्भावस्था.आणि आहारावर आहे,बरेच expecting parents हे वाचतात/वाचतील. तुमच्या श्रद्धा बद्दल काही बोलायचे नाही पण हे असले टोपीक avoid केलेले बरे. त्यापेक्षा प्रेग्नेंसी व childbirth वर जितके scientific knowledge घेता येईल ते घ्या (पुस्तकें, तुमचे obstetrician बरोबर चर्चा, youtube वरील experts विडिओ etc) त्यामुळे आयुष्यातल्या या नव्या phase (प्रेग्नेंसी) ब द्ददल दडपण कमी होईल. हवे तर Dr Supriya puranik यांचा YouTubeवर ग्रहण या विषयावर एक दोन विडिओ आहेत ते पाहून घ्या. त्यात सामान्य जनांस समजेल अशा शब्दात सांगितले आहे.

Conclusion: जास्त टेंशन घेउ नका हो असल्या बिनबुडाच्या गोष्टींच. त्यापेक्षा बेबी साठी तयारि काय करायची ते बघा. एकदा बेबी आलं की उसंत मिलणार नाही. तेव्हा रात्र आहे की दिवस ते समझलं तरी बस होइल.

P.s. कुणी interested असल्यास नवा धागा काढा
विषय: गर्भावस्था व अंधश्रद्धा
गर्भावस्था व अनाहूत सल्ले
गर्भावस्था व अगोचर प्रश्न/ comments (e.g. पोटाकडे बघून - अग्गबाई कितवा महिना? पोट थोडं छोटंच दिसतंय नि? खातेस जेवतेस की नाही? आमच्या बारक्याच्या टाईमाला मला असले कडक डोहाले होते ई.ई. )

Megha sk तुमचा त्रागा समजू शकते पण या साठी विचारांची बैठक आधीपासूनच पक्की हवी,गरोदरपण सुरू झालेल्या बाईला हा सल्ला देऊन उपयोग नसतो,थोडं त्यांच्या कलाने घ्यावच लागतं,
इथे सल्ला विचारला जातो पण तेव्हा ती बाई एकटीच असू शकेल,सोबत कुणी येण्याचं जमत नसेल किंवा इतर ही अनेक कारणं असू शकतात,किमान गर्भवती मातेला सल्ला देताना तरी आपण त्यांना त्रास होणार नाही असा विचार करून प्रतिसाद द्यायला काय हरकत आहे

मेघा - तुम्ही तुमच्या बाळाची दृष्ट काढली नाही कधी? कधी त्याला काळा टीका लावला नाही? कोणी काय पाळावे न पाळावे सांगणारे आपण कोण नाही का.

@समीक्षा.. तुमचा विश्वास असेल तर पाळा... घरी रहा... पण माझ्या preganancy मध्ये मी हेच शिकले की आपण स्वतः खुश राहायला हवं ..कसलाही टेन्शन न घेता... तो संपूर्ण काळ एन्जॉय करा... ती वेळ पुन्हा येत नाही ...मी माझ्या वेळेला छान दुर्बिणीतून पाहिलेला ग्रहण आणि फोटो पण काढलेले.... मी अमेरिकेत असल्यामुळे पाहता आलं..भारतात मोठ्यांनी भीतीने कदाचित नसतं पाहू दिलं...माझे इतर काही issues होते ..त्यामुळे मी टेन्शन घ्यायचे... पण आता वाटत की मी एन्जॉय करायला हवं होतं.... असो.. सगळं उत्तम आहे आज....त्यामुळे खुश रहा ..एन्जॉय करा....

आपल्याला विश्वास ठेवायचा असेल वा नसेल पण आसपासची घाबरवून सोडणारी, दडपण आणणारी माणसं delete or ignore करता येत नाहीत. so आपलाच दृष्टीकोन बदलूया. नाही बघायचं ना ग्रहण, नको बघूया. तसंही पाऊस सुरू होतोय. भिंग लावून पण सुर्य दिसेलसं वाटत नाही. त्यापेक्षा एखादा चांगला movie बघूया. नाही ना चिरायची भाजी, आराम करूया की. तेवढीच एक दिवस सुट्टी. झोपायचं नाही ना, मग कुठली तरी भारीपैकी series binge watch करूया or नवर्याला आपल्यासोबत जागं ठेऊन छान निवांत गप्पा मारूया. एवढा निवांत वेळ मागून पण मिळणार नाही एरव्ही.
या अवस्थेत आपलं मन शांत ठेवता येईल असं सगळं करूयात. ऊगीच त्रागा होईल, भीती वाटेल, नंतर मन खात राहील असे प्रकार करण्यात काही राम नाही.
इथे सल्ला मागणारे लोक थोडे बुजलेले वा त्रासलेले वा घाबरलेले असताता. त्यांना अजून घाबरवून न सोडता, blunt वा तिखट प्रतिक्रिया न देता जमलं तर त्चांच्या कलाने घेण्याचा प्रयत्न इतर माबोकरांनि करावा.

नमस्कार!
मी नुकतेच मायबोलीवर नोंदणी करून सदस्य झाली आहे.

माझा प्रश्न:
मी ३२ आठवड्याची गर्भवती आहे. वजन ६८ झाले आहे (गर्भावस्थे अगोदर ५८). आता एक समस्या उद्भवली आहे. रक्तातील हिमोग्लोबीन लेवल १०.७ आहे, गर्भातील पाणी कमी झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. (गर्भजल पातळी ७ पेक्षा कमी) माझ्या डाॅक्टरांनी L-ARGININE 500MG ही सप्लिमेंट सुरू केली आहे.
पण १५ दिवसात गर्भातील पाण्याची पातळी न वाढल्यास लगेच प्रसूती करावी लागण्याची शक्यता आहे.

वरील सप्लिमेंट सोबत अजून काय करता येईल जेणेकरुन गर्भातील पाणी वाढवण्यात मदत होईल आणि अकाली प्रसूती चा धोका टाळता येईल. कृपया योग्य मार्गदर्शन आणि उपाय सुचवावेत.

फ्लुईड्स वाढवा . पाणी , ज्यूस , इतर लिक्विड्स.
आणि अल्ट्रासाऊंड मध्ये ऍम्नीऑटिक फ्लुइड मेझरमेन्ट नेहमीच बरोबर असेल असे नाही. परत एकदा मोजायला सांगा.
महत्वाचे म्हणजे पॉझिटिव्ह राहा .

समीक्षा असे काही नसते. मि ही ग्रहणात ऑफिस ला गेले, भाजी चिरली, खोबरे खवले, झोपले , भांडी घासली आणि माझ बाळ मस्त जन्माला आल. काही होत नाही. भरपूर पाणी पी, भरपूर फळे खा.
काही लोक बोलतात , गर्भार बाई ने उपवास करावा , पाणी देखील पीउ नये!
शक्य आहे का ते???

सातवा महिना संपत आलाय. पित्ताचा त्रास खूपच होऊ लागलाय. सतत छातीत, घशाशी जळजळ होतेय. मग ऊलटी. पण ऊलटी होऊनही मोकळं वाटत नाही. परत जळजळ आहेच. खाणं पिणं सांभाळून आहे. चालणं फिरणंही होतंय. डाव्या कुशीवर झोपून झोपून त्या बाजूच्या बरगड्या दुखायला लागल्यात. तरीही तशीच झोपतेय. डॉक्टर शनिवारी भेटायचाय. तोपर्यंत काही उपाय सुचवू शकाल का? बाळाची हालचाल पण जास्तच असते. त्यामुळेही uneasy वाटत राहतं.

सकाळी कोरडं खाल्लं तर बरं वाटतं. (जसं की चुरमुरे, लाह्या, गव्हाचे बिस्कीट पाणी न पिता )
दूध सहन होतंय का? होत असेल तर ते घ्या.
मला 9महिने त्रास झाला होता पित्ताचा वगैरे, पण डाळिंब, संत्री किंवा मोसंबी खाल्ली तर बरं वाटायचं.. (फळं दुपारी)

ताजा ताजा अनुभव आहे Happy

Try करून पाहा..

thank u किल्ली... try करतेच. दुधाशी फार वाकडं नाहीये. दही खाल्लं तर त्रास होईल का?

मला वाटते तरी आंबट नकोसं वाटत होतं, ताजे दही थोडी साखर घालून try करा
तुम्हाला कसं suit होतंय तसं

संत्री आंबट निघाली तर खात नसे मी
टरबूज चालेल का तुम्हाला, ते try करा

मला dr नि ondem md लिहून दिली होती
त्रास एवढा होता की सकाळी ondem नाही घेतली तर दिवसभर काहीच पचत नसे
हे 9महिने चालू होतं, delivery होताच सगळं पित्त नॉर्मल झालं
असं वाटायचं काय चालूये, कुठे अडकले, मला कधी काही खाता येणार की नाही वगैरे,

कुठले वास सहन व्हायचे नाहीत.
घरच्यांनी छान सांभाळून घेतलं, झालं बाई सगळं व्यवस्थित

एवढा त्रास सोडला तर बाकी काहीही त्रास नव्हता

Pages