दशकपूर्तीच्या निमित्ताने - १

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

२१ मे २०११ रोजी मला मायबोलीचं सदस्यत्व घेऊन १० वर्षं होतील. (आहे, कल्पना आहे की काही लोकांना ११, १२ अगदी १४ सुद्धा झालीत! ) पण इथे येऊन एक दशक होऊ घातलंय हे लक्षात आलं आणि अलिकडेच मायबोलीवर '..निमित्ताने' लेखन बरंच वाचनात आलं. तेव्हा या दशकपूर्तीच्या 'निमित्ताने' जरा निवांतपणे मागं वळून पाहू आणि या दहा वर्षातल्या अनुभवांबद्दल लिहूया असं वाटलं.

तसं अनेकांनी स्वतंत्रपणे लिहिलं आहे, काहींनी जुन्या मायबोलीत माझे मायबोलीवरचे अनुभव या धाग्यावर तसंच नवीन मायबोलीत मायबोलीची ओळख आणि अनुभव या धाग्यांवर लिहिलं आहे. तसं मलाही कधी लिहावं वाटलं नाही, किंवा मुद्दाम विचार केला नाही आणि ते टाळलं गेलं असेल, तुम्हाला अतिशय जिव्हाळाच्या असलेल्या गोष्टीबद्दल कधीकधी बोलता येत नाही हेही कारण असावं. (संपूर्ण लेखनातले हे एकमेव 'हृद्य' वाक्य असू शकते.) आता लिहायचं ठरवल्यानंतर थोडा विचार केल्यावर असं लक्षात आलं की एका पोस्टच्या/लेखाच्या आवाक्यातलं ते नाही. तेव्हा ओळख झाल्यापासून पुढे आलेले/वाचलेले अनुभव, केलेलं काम याबद्दल विषयानुसार स्वतंत्र लेख लिहित जावं असं वाटलं.

हे लेखन पूर्णपणे केवळ मला ज्या त्या वेळी आलेल्या अनुभवांवर आणि मला त्यावेळी काय "वाटले" होते यावर आधारीत आहे. कालांतराने त्यात बदलही झालेले आहेत. तरीही आता सगळं समजलंय असं मुळीच म्हणायचं नाही आहे. उदय यांनी अलिकडेच कुठेतरी लिहिलंय की मायबोली म्हटलं की चार आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीची आठवण येते. आपण सगळेच या चार आंधळ्यांसारखे आहोत. पण आपल्याला काय जाणवते आहे ते एकमेकांना प्रामाणिकपणे सांगितले, आणि दुसर्‍यांनी विश्वासाने ऐकून घेतलं तर हा 'हत्ती' समजायला जास्त मदत होईल. आपल्याला वाटतं त्यापेक्षा वेगळं काही असू शकतं याची शक्यता गृहित धरली तरी खूप झालं.

या लेखनात आलेले जुने तपशील, घटनांचा काळ शक्य तितके अचूक लिहायचा प्रयत्न आहे पण काही चुका, विसंगती आढळल्यास जरूर सांगा.

"प्रथम तुज पाहता.."

मायबोलीचे सदस्यत्व घ्यायला २००१ चा मे महिना उजाडला तरी त्याआधी म्हणजे ९९,२००० मध्ये कधीतरी मायबोलीबद्दल कळलं होतं. माझा मामेभाऊ Partu ('पर्टू') ने मला मायबोलीशी ओळख करुन दिली. त्यावेळी पर्टू आणि त्याचे वडील, म्हणजे माझा मामा Mkarmik (आत्ताचे 'एम.कर्णिक', बनूताईंच्या कविता लिहिणारे..) मायबोलीचे मेंबर होते. पर्टु Chef होता आणि तो रेसिप्या टाकायचा. त्याचा 'पर्टुच्या रेसिपीज' असा रेसिपींचा एक विभागच पूर्वीच्या मायबोलीत होता.

तर पर्टुने सांगितल्याप्रमाणे मी मायबोलीला भेट दिली. प्रथमदर्शनीच एकदम आवडून जावं असं मला तेव्हा काही जाणवलं नाही. परदेशात येऊन काही वर्षं होऊन गेली होती. इथंही माणसांचा गोतावळा जमला होता, नोकरी-व्यवसायात बस्तान बसत होतं, तेव्हा एकटेपणा घालवायला, गरज म्हणून मला मायबोलीकडे यायची आवश्यकता नव्हती. इन्टरनेटवर मराठी(देवनागरी) भाषा दिसणं हे मात्र एक आकर्षण होतं. पण साईटवर मात्र बहुतेक ठिकाणी रोमन लिपी वापरुन मराठी लिहीलेले होते. ते वाचताना माझी पुरेवाट झाली. 'जीव वेडावला..' म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी तेव्हा लगेच घुसले नाही. पण अधूनमधून फिरकत असे.

मे २००१ मध्ये काही विशेष कारण झाल्याचं आठवत नाही पण मी एकदाची मायबोलीकरीण झाले! कोणाशी ओळखपाळख नसल्याने सुरुवात करायला सर्वात सोपं ठिकाण हे 'अंताक्षरी' होतं. मी मराठी अंताक्षरीच्या धाग्यावर गेले, तिथं अर्थातच नेहमीप्रमाणे अनेकदा आलेलं असतं तसं 'ल' आलं होतं..झालं! मी मायबोलीवरची सुरुवात "लिंबोणीच्या झाडामागे" या (चुकीच्या) गाण्याने केली! "निंबोणीच्या झाडामागे ही सुरुवात बरोबर आहे, लिंबोणीच्या झाडामागे नव्हे" अशी सूचना तेव्हा धाग्याच्या डोक्यावर नव्हती आणि तेव्हा ते चूक समजलंही जात नसावं त्यामुळे मी सुटले.

हिंदी अंताक्षरीवरही गेले, तिथे मी गाणं कोणतं लिहिलं आठवत नाही, पण मला (आणि माझ्या जन्मवेळ, ठिकाणासह असलेल्या साग्रसंगीत प्रोफाईलला) बघून Jojo ने 'खुदको क्या समझती है, कितना अकडती है, कॉलेजमे जुनी जुनी आयी एक लडकी है" हे गाणं लिहिलं. तेव्हा तिथे Milindaa (मिलिंदा) पण होता. हे असं स्वागत झालं पण तेव्हा एक स्वागत समिती होती त्यांनी पुष्पगुच्छ दिल्यावर मला जरा बरं वाटलं.

बाकी ठिकाणी बरेचसे विशिष्ठ शहरातले लोक दिसत होते म्हणून मी "आम्ही कोल्हापुरी" कडे मोर्चा वळवला. गाववाले निदान लगेच 'आपलं' म्हणतील म्हणून, म्हणजे मी कंपूच शोधला असं म्हणायला हरकत नाही. Happy तेव्हा तिथे पर्टु, Paragkan(परागकण), Saee, Madya, Bahurangi असे काहेजण असायचे. तिथे एकदम कोल्हापुरी भाषेत बोलायला मजा यायची.

देवनागरीचा वापर थोडा वाढला असला तरी रोमन चालू होतेच त्याबरोबरच minglish नावाचा एक भयाsssण प्रकार हह आणि storvi बोलायच्या. 'नात्या' ला त्या relationya म्हणायच्या एवढे एकच उदाहरण देणे माझ्याच्याने शक्य आहे! पेशवा आणि असामी या लेखकद्वयीने 'त्या वळणावर' नावाची एक कथा की दीर्घ कादंबरी रोमन लिपी वापरुन मराठीत लिहिली होती! त्याच्या देवनागरीकरणाचे सत्कार्य कोणीतरी केले पण तरी नंतरही त्या वळणावर फिरकायची माझी हिंमत झाली नाही. (मी तेव्हाच हळूहळू सगळ्यांना 'मराठी साईट आहे, मराठी लिहा, देवनागरी लिहा' अशी भुणभुण करायला सुरुवात केली त्यामुळे नंतर मी असामीच्या आणि हवाईच्या डोक्यात गेले आणि minglish माझ्या! Happy असामीने मला "spear me" अशी विनंती केली जी मी धुडकावून लावली!)

लहान मुलांबाबत प्रश्नांच्या धाग्यांवरही मी अधूनमधून जायचे. तेव्हा मैत्रेयीने (maitreyee)'परदेशात आपले मूल वाढवताना' या धाग्यावर काही प्रश्न विचारले होते तिला मी उत्तर दिलं. मी इथे दिलेलं उत्तर तिला फारच आपुलकीने दिलेला सल्ला वाटला आणि तेव्हापासून मैत्रेयी माझी मैत्रीण आहे (बहुतेक).

२००१ च्या सप्टेंबरमध्ये ९/११ चा हल्ला झाला त्यावेळी इराक-अमेरिका युद्धाबद्दलच्या चर्चेत मी V and C मध्ये भाग घेतल्याचं आठवतं.

त्यानंतर २००१-२००२ मध्ये मी मायबोलीवर फारशी सहभागी झाले नाही. त्यावेळी लॉगिन केले नाही तर तीन महिन्यांनी आयडी बंद (inactive) होत असे. तसा तो झालाही. एक वर्षांपेक्षा जास्त काळाचा ब्रेक झाल्यानंतर मी अॅडमिनना मेल पाठवून आयडी चालू केला आणि पुन्हा मायबोलीवर आले त्यानंतर एवढा मोठा खंड त्यात कधीच पडला नाही. २००३ मध्ये मी परत आले ते आजतागायत इथे आहे.

तर ह्या "ब्रेक के बाद" केलेल्या पुनरागमनाबद्दल आणि बसवलेल्या बस्तानाबद्दल पुढच्या भागात.

प्रकार: 

हा लेख वाचून मी धावत जाऊन माझं प्रोफाईल बघितलं.. नाहीं, नाही अजून ८ च वर्षं झालीत..
मला वाटलं १०, म्हणजे आता लेख लिहीणं आलंच...
अजून दोन वर्षं प्रॅक्टीस करता येईल.. Proud

मै Proud . मी उलटा विचार करते तिथल्या पोस्ट्स वाचल्यावर. म्हणजे बघ, भविष्यकाळात आपल्या पोरांना आपण "ग्रेट आया" होतो हे दाखवायला त्या पोस्ट्सचा किती उपयोग होइल. पोरांना इमोशनल ब्लॅकमेल करायला असा लिखीत पुरावा दुसरीकडे कुठे मिळणार. Proud

देसाई, अहो आग्रह नाहीय दहा वर्ष पूर्ण झाल्यावर लिहायचा Proud पण हल्लीची ट्रेंड बघता लिहावं लागेलसं दिसतंय. तेव्हा तुमचं लिहून झालं की कॉपी मला पाठवा Happy

तुम्हाला अतिशय जिव्हाळाच्या असलेल्या गोष्टीबद्दल कधीकधी बोलता येत नाही हेही कारण असावं. (संपूर्ण लेखनातले हे एकमेव 'हृद्य' वाक्य असू शकते.) >>> मास्टरस्ट्रोक Proud
फक्त अशा लेखांचा पूर येईल काय याची काळजी वाटतेय!!! Wink

मालिका? Proud
वाचते आहे. Happy
मायबोलीच्या कित्येक उपक्रमांत तुझा सक्रीय सहभाग असतो, बर्‍याच उपक्रमांचं नेतृत्वही केलं आहेस, तेव्हा तुझे अनुभव बहुरंगी आणि चिंतनीय असतील यात शंकाच नाही.

(मेरावाला हृद्य! :P)

इंटरेस्टिंग! 'त्या' मायबोलीच्या काळाबद्दल अजून खूप खूप लिहा. वाचायला आवडेल.

मलातर एकदम चिल्लीपिल्ली असल्यासारखं वाटतय.

लालु,
तुझी आणि माझी ओळख कशी झाली आठवतेय का Proud
जेंव्हा तुझ असामी आणि काही इतर मंडळींशी भांडण कि असच काही वादावादी चालु होती गुळपट चवीच्या पदार्थां वरून , त्या वेळी चिवड्यातले बेदाणे , हॉट मिक्स मधले बेदाणे आणि इतर तिखट पदार्थात विनाकारण गोड कोंबाणार्‍या लोकांना तू आणि पण मी विशिष्ठ शहरातली असून झणझणीत चवीला सपोर्ट करत होते , तेंव्हा पासून आपण मैत्रीणी आहोत Proud

माझं नाव येणार का ह्या मालिकेत?>>> सशल, तू (बहुतेक) मैत्रिण असशील तर येईल की Proud

डिजे, लालूला कन्फर्म करु देत की तुम्ही मैत्रिणी आहात ते. Wink

लालू मैत्रिणी - अमैत्रिणी अश्या वर्गवार्‍या करणार नैये... हो की नै गं रेडू? (क्षमाच पण मोह आवरला नाहीये!) Happy

>> मला परवा २०० बटाटेवडे मिळाले
ते हल्ली कोणालाही मिळतात! (धूम ठोकणारी बाहुली.......... :P)

१२ पूर्ण झाल्यावर/ होताना एका तपाचे आख्यान पाडावेच की काय मग मी?
>> आहो ताई, आधी तो खो-खो चा आढावा पाडा की जरा. (हलकेच घे ग! )(चिमटा काढून भेदरलेली भावली?)

आणि एक शंका, ते विशिष्ट शहर म्हणजे तिथे काहिही उणे नसते ते का? सांगा की कोणितरी.

अहो केवळ गंमत म्हणून लिहीलेले असते, ते केवळ गंमत म्हणून वाचायचे. त्याची चिकीत्सा करत बसण्याजोगे काही नाही. मेंदूचा वापर करावा लागेल इतके गंभीर, मह्त्वाचे काही नसते लिहीले मिंग्लिशमधे.
तसे समजते बरेचसे, फार तर एक क्षण विचार करावा लागतो एव्हढेच. पण तेव्हढाहि वेळ नसेल तर नाद सोडून द्यावा.
त्यातून त्यात मराठी भाषेचा अपमान वगैरे काही नाही. मिंग्लिश लिहिणार्‍या लोकांनी मराठीतहि फार छान छान कविता, माहितीपूर्ण लेख, विनोदी असे लिहीले आहे, ते वाचा.

मस्त ग लालू.. जुन्या आठवणी जाग्या केल्यास.
म्हणजे, हल्ली पुष्पगुच्छ मिळत नाही की काय?? मलाही मस्त वाटलं होतं पुष्पगुच्छ पाहून!
"लिंबोणीच्या झाडामागे" - प्रिया, चाफा.. वाचताय का? Happy

Pages