दशकपूर्तीच्या निमित्ताने - १

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

२१ मे २०११ रोजी मला मायबोलीचं सदस्यत्व घेऊन १० वर्षं होतील. (आहे, कल्पना आहे की काही लोकांना ११, १२ अगदी १४ सुद्धा झालीत! ) पण इथे येऊन एक दशक होऊ घातलंय हे लक्षात आलं आणि अलिकडेच मायबोलीवर '..निमित्ताने' लेखन बरंच वाचनात आलं. तेव्हा या दशकपूर्तीच्या 'निमित्ताने' जरा निवांतपणे मागं वळून पाहू आणि या दहा वर्षातल्या अनुभवांबद्दल लिहूया असं वाटलं.

तसं अनेकांनी स्वतंत्रपणे लिहिलं आहे, काहींनी जुन्या मायबोलीत माझे मायबोलीवरचे अनुभव या धाग्यावर तसंच नवीन मायबोलीत मायबोलीची ओळख आणि अनुभव या धाग्यांवर लिहिलं आहे. तसं मलाही कधी लिहावं वाटलं नाही, किंवा मुद्दाम विचार केला नाही आणि ते टाळलं गेलं असेल, तुम्हाला अतिशय जिव्हाळाच्या असलेल्या गोष्टीबद्दल कधीकधी बोलता येत नाही हेही कारण असावं. (संपूर्ण लेखनातले हे एकमेव 'हृद्य' वाक्य असू शकते.) आता लिहायचं ठरवल्यानंतर थोडा विचार केल्यावर असं लक्षात आलं की एका पोस्टच्या/लेखाच्या आवाक्यातलं ते नाही. तेव्हा ओळख झाल्यापासून पुढे आलेले/वाचलेले अनुभव, केलेलं काम याबद्दल विषयानुसार स्वतंत्र लेख लिहित जावं असं वाटलं.

हे लेखन पूर्णपणे केवळ मला ज्या त्या वेळी आलेल्या अनुभवांवर आणि मला त्यावेळी काय "वाटले" होते यावर आधारीत आहे. कालांतराने त्यात बदलही झालेले आहेत. तरीही आता सगळं समजलंय असं मुळीच म्हणायचं नाही आहे. उदय यांनी अलिकडेच कुठेतरी लिहिलंय की मायबोली म्हटलं की चार आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीची आठवण येते. आपण सगळेच या चार आंधळ्यांसारखे आहोत. पण आपल्याला काय जाणवते आहे ते एकमेकांना प्रामाणिकपणे सांगितले, आणि दुसर्‍यांनी विश्वासाने ऐकून घेतलं तर हा 'हत्ती' समजायला जास्त मदत होईल. आपल्याला वाटतं त्यापेक्षा वेगळं काही असू शकतं याची शक्यता गृहित धरली तरी खूप झालं.

या लेखनात आलेले जुने तपशील, घटनांचा काळ शक्य तितके अचूक लिहायचा प्रयत्न आहे पण काही चुका, विसंगती आढळल्यास जरूर सांगा.

"प्रथम तुज पाहता.."

मायबोलीचे सदस्यत्व घ्यायला २००१ चा मे महिना उजाडला तरी त्याआधी म्हणजे ९९,२००० मध्ये कधीतरी मायबोलीबद्दल कळलं होतं. माझा मामेभाऊ Partu ('पर्टू') ने मला मायबोलीशी ओळख करुन दिली. त्यावेळी पर्टू आणि त्याचे वडील, म्हणजे माझा मामा Mkarmik (आत्ताचे 'एम.कर्णिक', बनूताईंच्या कविता लिहिणारे..) मायबोलीचे मेंबर होते. पर्टु Chef होता आणि तो रेसिप्या टाकायचा. त्याचा 'पर्टुच्या रेसिपीज' असा रेसिपींचा एक विभागच पूर्वीच्या मायबोलीत होता.

तर पर्टुने सांगितल्याप्रमाणे मी मायबोलीला भेट दिली. प्रथमदर्शनीच एकदम आवडून जावं असं मला तेव्हा काही जाणवलं नाही. परदेशात येऊन काही वर्षं होऊन गेली होती. इथंही माणसांचा गोतावळा जमला होता, नोकरी-व्यवसायात बस्तान बसत होतं, तेव्हा एकटेपणा घालवायला, गरज म्हणून मला मायबोलीकडे यायची आवश्यकता नव्हती. इन्टरनेटवर मराठी(देवनागरी) भाषा दिसणं हे मात्र एक आकर्षण होतं. पण साईटवर मात्र बहुतेक ठिकाणी रोमन लिपी वापरुन मराठी लिहीलेले होते. ते वाचताना माझी पुरेवाट झाली. 'जीव वेडावला..' म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी तेव्हा लगेच घुसले नाही. पण अधूनमधून फिरकत असे.

मे २००१ मध्ये काही विशेष कारण झाल्याचं आठवत नाही पण मी एकदाची मायबोलीकरीण झाले! कोणाशी ओळखपाळख नसल्याने सुरुवात करायला सर्वात सोपं ठिकाण हे 'अंताक्षरी' होतं. मी मराठी अंताक्षरीच्या धाग्यावर गेले, तिथं अर्थातच नेहमीप्रमाणे अनेकदा आलेलं असतं तसं 'ल' आलं होतं..झालं! मी मायबोलीवरची सुरुवात "लिंबोणीच्या झाडामागे" या (चुकीच्या) गाण्याने केली! "निंबोणीच्या झाडामागे ही सुरुवात बरोबर आहे, लिंबोणीच्या झाडामागे नव्हे" अशी सूचना तेव्हा धाग्याच्या डोक्यावर नव्हती आणि तेव्हा ते चूक समजलंही जात नसावं त्यामुळे मी सुटले.

हिंदी अंताक्षरीवरही गेले, तिथे मी गाणं कोणतं लिहिलं आठवत नाही, पण मला (आणि माझ्या जन्मवेळ, ठिकाणासह असलेल्या साग्रसंगीत प्रोफाईलला) बघून Jojo ने 'खुदको क्या समझती है, कितना अकडती है, कॉलेजमे जुनी जुनी आयी एक लडकी है" हे गाणं लिहिलं. तेव्हा तिथे Milindaa (मिलिंदा) पण होता. हे असं स्वागत झालं पण तेव्हा एक स्वागत समिती होती त्यांनी पुष्पगुच्छ दिल्यावर मला जरा बरं वाटलं.

बाकी ठिकाणी बरेचसे विशिष्ठ शहरातले लोक दिसत होते म्हणून मी "आम्ही कोल्हापुरी" कडे मोर्चा वळवला. गाववाले निदान लगेच 'आपलं' म्हणतील म्हणून, म्हणजे मी कंपूच शोधला असं म्हणायला हरकत नाही. Happy तेव्हा तिथे पर्टु, Paragkan(परागकण), Saee, Madya, Bahurangi असे काहेजण असायचे. तिथे एकदम कोल्हापुरी भाषेत बोलायला मजा यायची.

देवनागरीचा वापर थोडा वाढला असला तरी रोमन चालू होतेच त्याबरोबरच minglish नावाचा एक भयाsssण प्रकार हह आणि storvi बोलायच्या. 'नात्या' ला त्या relationya म्हणायच्या एवढे एकच उदाहरण देणे माझ्याच्याने शक्य आहे! पेशवा आणि असामी या लेखकद्वयीने 'त्या वळणावर' नावाची एक कथा की दीर्घ कादंबरी रोमन लिपी वापरुन मराठीत लिहिली होती! त्याच्या देवनागरीकरणाचे सत्कार्य कोणीतरी केले पण तरी नंतरही त्या वळणावर फिरकायची माझी हिंमत झाली नाही. (मी तेव्हाच हळूहळू सगळ्यांना 'मराठी साईट आहे, मराठी लिहा, देवनागरी लिहा' अशी भुणभुण करायला सुरुवात केली त्यामुळे नंतर मी असामीच्या आणि हवाईच्या डोक्यात गेले आणि minglish माझ्या! Happy असामीने मला "spear me" अशी विनंती केली जी मी धुडकावून लावली!)

लहान मुलांबाबत प्रश्नांच्या धाग्यांवरही मी अधूनमधून जायचे. तेव्हा मैत्रेयीने (maitreyee)'परदेशात आपले मूल वाढवताना' या धाग्यावर काही प्रश्न विचारले होते तिला मी उत्तर दिलं. मी इथे दिलेलं उत्तर तिला फारच आपुलकीने दिलेला सल्ला वाटला आणि तेव्हापासून मैत्रेयी माझी मैत्रीण आहे (बहुतेक).

२००१ च्या सप्टेंबरमध्ये ९/११ चा हल्ला झाला त्यावेळी इराक-अमेरिका युद्धाबद्दलच्या चर्चेत मी V and C मध्ये भाग घेतल्याचं आठवतं.

त्यानंतर २००१-२००२ मध्ये मी मायबोलीवर फारशी सहभागी झाले नाही. त्यावेळी लॉगिन केले नाही तर तीन महिन्यांनी आयडी बंद (inactive) होत असे. तसा तो झालाही. एक वर्षांपेक्षा जास्त काळाचा ब्रेक झाल्यानंतर मी अॅडमिनना मेल पाठवून आयडी चालू केला आणि पुन्हा मायबोलीवर आले त्यानंतर एवढा मोठा खंड त्यात कधीच पडला नाही. २००३ मध्ये मी परत आले ते आजतागायत इथे आहे.

तर ह्या "ब्रेक के बाद" केलेल्या पुनरागमनाबद्दल आणि बसवलेल्या बस्तानाबद्दल पुढच्या भागात.

प्रकार: 

लालु दशकपूर्तीच्या निमित्ताने अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !

'खुदको क्या समझती है, कितना अकडती है, कॉलेजमे जुनी जुनी आयी एक लडकी है">>> Lol हे बाकी भारी होतं.
पण खुपच आखडतं घेतलसं २ वर्ष फक्त एका पानात बसवलीत. Proud

तेव्हापासून मैत्रेयी माझी मैत्रीण आहे>>> Proud वाचतेयस ना मै?
मिंग्लिशही आठवतंय आणि पर्टूच्या रेसिपी बीबीसुद्धा. २००१ मध्ये मी सुद्धा डोकावून गेले पण कंटाळा आला इथे रमायचा. मग उगवले ते २००३ मध्ये. जपानमध्ये असताना मराठी वाचायला मिळणं ही पर्वणीच होती. त्यामुळे इथे गोष्टी, ललितं वाचायला बरं वाटायचं. असो, लिहू तेवढं थोडंच आहे.

छान सुरवात , लालू. मला पण पर्टु च्या रेसिपीज , मिंग्लीश आठवलं. जनरल टाईमपास की असाच काहीतरी एक बीबी पण होता न.

२००१ मधे मी पहिल्यांदा इथे आले तेव्हा बरीचशी परदेशस्थ मंडळी इथे होती आणि तेव्हा मी देशात होते त्यामुळे त्यांच्या गप्पांशी फारसं रिलेट करता यायचं नाही पण अधून मधून कधीतरी चक्कर टाकायचे अशीच.

लालू, मस्त लिहिलंयस Happy खूप प्रांजळपणे आणि ओघवतं. पुढचा भागही लवकर टाक. ते पर्टू अजून येतात का माबोवर? त्यांच्या रेसिपीजची लिंक देशील का? मी तर २००७ मध्ये माबोकर झाले, त्यामुळे एवढं जुनं काहीच माहित नाही.

लालू, दहा वर्षाची झाली. अभिनंदन.
पण हात का आखडता घेतला आहेस ? लिहिण्यासारखे खूप आहे तूझ्याकडे !!

लालू कित्ती साधं , सोप्पं, सहज, अन छान लिहिलय्स गं. खुप छान वाटलं वाचताना Happy
अन ते >>>दुसर्‍यांनी विश्वासाने ऐकून घेतलं तर हा 'हत्ती' समजायला जास्त मदत होई <<< भारी आवडलं Happy

वा लालू... भूतकाळाची सफर तुझ्या निमित्ताने मस्त घडतेय.

खरंतर मिंग्रजीचे बोलु कौतुके परत सुरू करायला हवं...
स्टो, हह बरोबर अजून एक खंदी वीरा असायची तिथे, ती म्हणजे डीप टी. तिचं नाव होतं दिप्ती आणि आयडी होता DeepT... Proud
देवनागरीची सुविधा देखील अस्तित्वात नव्हती तेव्हापासून रोमन मधे मराठी लिहिलं होतं. मी तर आख्खं नाटकही तसंच लिहिलं होतं तिथे. आता ते जाऊन वाचवतही नाही. कसं काय तेव्हा एवढ्या गप्पा झोडायचो रोमनात कुणास ठाउक! Happy

waa redu ... ghost timechi journey uchya nimittane goodach happentey. Proud

pan minglish hee motherspeaki war birthla comeleli deadaathichi cousin sister yesti. herla step behavenuk getli nasti tar still alive asti! (and gossip doaayla herchya like good language not!)

वा लालू ... भूतकाळाची सफर तुझ्या निमित्ताने छानच घडतेय. Proud

पण मिंग्लिश ही मायबोलीवर जन्माला आलेली मराठीची(अरे देवा!) चुलत बहिण होती. तिला सावत्र वागणूक मिळाली नसती तर अजून जिवंत असती! (आणि गॉसिप करायला तिच्यासारखी चांगली भाषा नाही!)

Lol Lol

लालू, चांगलं लिहिलंयस.

ह्ह, काय लिहिलंयस ते कळतही नाहीये आणि वाचवत तर त्याहून नाहीये. हे भगवान......:अओ:

.

मस्त लालू.

बसवलेल्या बस्तानाबद्दल पुढच्या भागात>> पुढचा भाग जरा मोठा असेल अशी अपेक्षा करतो Happy

ते रेडू आणि डेडाथि का............ही केल्या कळत नव्हतं.. Uhoh
थँक्स मंजुडी.. आता झोप तरी लागेल..

लालू.. मस्त लेख. मला मायबोलीचा तो काळ आठवायला प्रचंड आवडतं!! कितीतरी दिवस आयडीसुद्धा न घेता अधाशासारखी वाचत सुटले होते! Happy

दहा वर्षे? अरे बापरे!
एकुणातच हे स्मरणरंजन आवडले. अजुन लेखनाच्या प्रतिक्षेत.
मायबोलीवर गेल्या दहा वर्षात होऊन गेलेल्या विविधांगी स्थित्यंतरे वगैरे यावर वाचायला आवडेल. Happy

लालू, किती मस्त वाटतय हे वाचायला.

निवांत किनार्‍यावर बसून लाटांची गाज ऐकत बसावं तसं काहीसं.

लालू Happy बरे झाले या निमित्ताने फायनली तू हा "निमित्ताने"वाला लेख लिहायला घेतलास! या निमित्ताने मी पण स्वतःची १०+ वर्षापूर्वीची पोस्टे वाचून घेते. सुरुवातीची विनाकरण मनमिळाऊ पोस्ट आता कसली... म्हनजे अगदीच... "एंबरॅसिंग" वाटताय्त नाही Wink नको बाई, लिंका देऊ नकोस तसल्या पोस्टींच्या... उगीच ही आताची कष्टाने कमावलेली जा ख पोझिशन पाण्यात जातेय Lol

लालू, मस्त होतय हे लिखाण. पुढचे भाग वाचायची खूप उत्सुकता आहे. मी देखिल ९९ साली मायबोलीवर प्रथम आले, हळूहळू रुळत होते पण कोणाशी आभासी ओळखीवर कोणितरी मानलेलं नातं जोडायला जाणं विचित्र वाटलं आणि ते प्रकार टाळण्यासाठी इथे येणच बंद केलं.
आत्ता २०१० साल उजाडलं आयडी घ्यायला. Happy

धन्यवाद लोकहो. Happy धीर धरा, ही 'मालिका' आहे. इथून पुढेच तर खरी सुरुवात होईल. अजून बरेच लेख येणार आहेत. (कंटाळा आला तर सांगा.)

हह, Lol
आडो, मंजूडीने हहच्या पोस्टचेच मराठी भाषांतर केले आहे.

Pages