पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपा, अगदी सोप्प आहे.... कुस्करलेले १ केळे, गुळ/साखर किंवा दोन्हि थोडे थोडे, सव्वा ते दिड वाटी कणीक, आणि दुध हे एकत्र करुन घावण टाकणे. वरुन तुप सोडावे.

भरताची वांगी भाजून , ती ज्वारीच्या पीठात मिक्स करुन इतर मीठ,तिखट वगैरे घालून अतिशय चविष्ठ थालीपीठ तयार होतात.

डेन्टल ट्रीटमेंट चालू असताना दात काढल्यादिवशी केवळ गार आणि लिक्विड वस्तूच द्यायला सांगितल्या आहेत.
मिल्कशेक्स, आइसक्रीम, तांदळाची खीर हे सोडून अजून काय देता येईल.
हे सगळे दूध बेस्ड गोड आयटेम्स आहेत.
अजून वेगळे काय देता येऊ शकेल?
इथे हा विषय काढल्याबद्दल माफ करा. विपु मधे कळवलंत तरी चालेल.

नारळाचे पाणी, पेज, सरबत.
इलेक्ट्रॉल, जेली, चायना ग्रास (हे चावावे लागत नाही.)

गार केलेली पेज? बरी लागते?

नारळाचे पाणी अजून उष्णता नाही वाढवणार? आधीच हेवी औषधं (अ‍ॅन्टिबायोटिक्स + पेन किलर्स) चालू आहेत.

अगदी पातळ पेज करायची. त्याने पोटात थंडावा राहिल.
सध्या गरम होतेय ना फार, म्हणून नाचणीची आंबिल पण चालेल.
थोडीफार ताकद पण मिळायला हवी ना, त्यासाठी नारळाचे पाणी. चालेल.

नी कोल्ड सूप्सचा पण ऑप्शन बघता येईल. ईथे ते दिनेशदांनी दिलेलं पंपकिन सूप गार पण चांगलं लागतं. अजून अशी काही कोल्ड सूप्स असतील तर ती देता येतील.

नी साळिच्या लाह्या ताकात भिजवून त्यात मीठ घालून मिक्सरवरून काढून पातळसर पेयासारखं करू शकतो. ताकद येते साळिच्या लाह्यांनी.

नी, आंबिल , सोलकढी, आवळा किंवा जांभुळ सरबत, ज्युस (कलिंगड्,मोसंबी), गोड चालत असेल तर आमरस (मिक्सरवर फिरवुन)
तुम्हाला दुधाचे गोड पदार्थ नको आहेत की गोड पदार्थ नको आहेत

औषधं हेवी आहेत त्यामुळे उष्णता वाढवणारं काही नकोय. त्यामुळे ज्यूसेस बाद.
दूध आणि गोड असंच केवळ झालंय.
ते दोन्ही नसेल असं अजून काय असेल ते बघतेय.

दक्षे, साळीच्या लाह्या पुण्यात कुठे मिळतील गं?

नाचणीची आंबिल, बटाटा/रताळं इ.ची सत्त्वं, गव्हाचं, अ‍ॅरोरूटचं सत्त्वं - हे सगळे थंड प्रकार आहेत. दूधसाखर किंवा ताक-जिरं कसेही करता येतात. गरम-गार कसेही चांगले लागतात.
तुळशीचं बी चांगलं थंडाव्याला. पाण्यात भिजवून घेतात. चावावं लागत नाही.

अगदीच बेसिक आहे पण बटाटा किंवा रताळ्याचं सत्व कसं करतात?
गव्हाच्या सत्वाची पिठी आज बघितली मंत्री फ्लोअर मिल मधे. ती घेऊन येईन. नाचणीचे पण मिळते.
आंबील गार खातात? मला गरमच खातात असं वाटलं होतं.

बटाटा चिरल्या/किसल्यावर पाण्यात टाकायचा. त्याचा स्टार्च पाण्यात गोळा होतो आणि जराशाने खाली साका बसतो. हे असंच्या असंसुद्धा शिजवू शकतेस. मंद आचेवर सतत ढवळत रहायचं, गुठळी होऊ द्यायची नाही. (झाली तर नंतर ब्लेंडरमधून फिरवायचं. हाकानाका.) फार वेळ लागत नाही. शिजला की स्टार्च पारदर्शक आणि चिकट व्हायला लागतो. चांगला घोटून घेऊन त्यात दूधसाखर किंवा ताक-हिंग-जिरं मिसळून द्यायचं.

साठवणीचा करायचा तर तो साका बसल्यावर वरचं पाणी काळजीपूर्वक काढून टाकायचं. साका ताटलीत पसरून सावलीत वाळवायचा आणि पावडर बाटलीत भरून फ्रीजमधे ठेवायची. दोनतीन चमचे शिजवायची वेळेला.

(मग एरवीही इतर कशासाठी बटाटा चिरलास की हाताला सवय लागेल सत्त्व काढायची. Happy )

गहू दोनतीन दिवस रोज पाणी बदलत भिजवायचे. मग मिक्सरमधून पाणी घालूनच दळायचे. गाळून चोथा काढून टाकायचा. (तोसुद्धा पुन्हा पाणी घालून अगदी कोळून घ्यायचा.) आता याचाही वर सांगितला तसाच साका खाली बसतो. लगेच किंवा साठवणीचा करायची तीच पद्धत.

एकदा वीकेन्डला करून ठेवलेस तर आठवडा-दोन आठवड्यांची सोय झाली.

नाचणीचं सत्त्व तयार मिळेलच.

काकडी किसून तिचं पाणी चालेल - ती थंड असते. दुध्याचंही.
पन्हं चालेल. कैरी थंड असते.

नी, तुला खाऊवाले पाटणकरांकडे बटाट्याचं, रताळ्याचं सत्व मिळेल बहुतेक. गावात जाणार असशील तर त्यांच्या दुकानात चक्कर मार.

उष्णतेसाठी बार्ली वॉटर चांगले. चवही येते तोंडाला.
नारळाच्या पाण्याच्या पावडरीचे सॅशे मिळतात "श्रीजल" नावाने. चांगले आहेत ते.

दक्षे, साळीच्या लाह्या पुण्यात कुठे मिळतील गं? >>>
खाऊवाले पाटणकर, त्यांच्याच समोर बेहेरे किंवा चितळेच्या चौकात देसाई. पुर्वी बेहेरे आणि देसाई आंब्यांसाठीच प्रसिद्ध होते, पण हल्ली बरेच इतरही पदार्थ मिळतात. मस्त उकडीचे मोदक, पुरण/खवा पोळी, बाकी बरेच फ्रेश आणि एक्स्लुसिव पदार्थही असतात. चवीची आणि ताजेपणाची खात्री आहे.

इथे मागे कच्च्या केळाची भाजीची पाकॄ लिहीलेली कोणीतरी. सर्चमध्ये सापडत नाही. कशी करायची असते ती भाजी?

Pages