गझल चर्चा

Submitted by विजय दिनकर पाटील on 14 February, 2011 - 02:54

नमस्कार मंडळी,

आताशा मायबोलीवर गझलेला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून आणि नवनवीन लोकांना ह्यात येण्याची आवड लक्षात घेऊन बर्‍याच विचारांती हा धागा काढावा असे वाटले(श्री. निशिकांत देशपांडे ह्यांच्या एका गझलेवरील प्रतिसादात श्री. भूषण कटककर(बेफिकीर), डॉ. कैलास गायकवाड, श्री. निशिकांत देशपांडे आणि अस्मादिक ह्यांची एक चर्चा झाली तेथे असा धागा गझल विभागात असावा ह्यावर एकमत झाले)

गझलेचे तंत्र, मंत्र, विषय, सूटी ह्याविषयी बरेच समज/गैरसमज सद्या आपल्यातल्या बर्‍याच लोकांच्या मनात आहेत परंतु ह्या गोष्टींना सप्रमाण सिद्ध्/असिद्ध करू शकतील असे फारच थोडे जाणकार आपल्यात आहेत. ह्या धाग्यांवर अशा सर्व शंकांचा उहापोह झाला तर नवशिक्यांना खूप उपयोगी होईल ते सगळे.

तसेच सद्या प्रकाशित असलेल्या गझलांतील तांत्रीक बाबींवरही ह्या धाग्यावर चर्चा होऊन मतमतांतरे आजमावता येईल.

चला तर मग! गझलेचा काफिला पुढे नेण्यासाठी आपापला खारीचा वाटा उचलायला सज्ज व्हा!!!

गुलमोहर: 

जेव्हा प्रगत समाज थेट चंद्रावर पाऊल ठेवण्याइतपत ज्ञान प्राप्त करत होता आणि थेट चंद्रावर पाऊल ठेवत होता तेव्हा अरबी/फारशी समाजातला हा थोर गझलकार एखाद्या मदिराक्षीचा मुखडा हातात घेऊन
"चंद्र गवसला ..... चंद्र गवसला" म्हणून गझला पाडत होता.

या वाक्याचा अर्थ

'माणूस चंद्रावर पोचलेला असूनही आवडत्या स्त्रीच्या चेहर्‍याला चंद्र म्हणण्यातच धन्यता मानत आहेत किंवा बाई बाटली यांच्या मागे आहेत'

असा मला अभिप्रेत नाही. यापेक्शाही वेगळा अर्थ त्यात असू शकतो.

http://www.maayboli.com/node/24761

ह बा यांची ही रचना व कैलासरावांनी दिलेला नवीन तरही मिसरा 'अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही' या दोन्हीवरून एक मत लिहावेसे वाटले.

===============================

ही' हे अक्षर कैलासरावांनी दिलेल्या नवीन तरही मिसर्‍यात 'माणसे ही' असे आहे. म्हणजे 'ही माणसे' असा अर्थ अभिप्रेत आहे कैलारसावांना! पण काही गझलांमध्ये 'माणसेही' असा एकच शब्द घेतल्यामुळे 'माणसे सुद्धा' असा अर्थ निघत आहे. हबांच्या या गझलेमध्ये 'वसा ना सोडला मीही कधी उल्लंघनाचा' यात 'ही' हे अक्षर 'मी' ला जोडून असायला हवे असे आपले माझे मत आहे.

================================

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मी आपल्या मताशी सहमत आहे भूषणजी.

मी वाचताना मात्र 'सुद्धा' असा अर्थ घेतला हबाच्या शेरात.

तरहीच्या बाबतीत अजून लोकांना इतका सराव नाही असे दिसतेय. हळूहळू हे पाळणे सर्वांना लीलया जमेल अशी आशा आणि विश्वास आहे.

सध्या "माणूस" या शब्दाला बरे दिवस आलेले दिसते. माझी पण "माणसावर" एक गझल केव्हाचीच अर्धवट तयार आहे. Happy

आदरणिय भुषनजी,

सुंदर मिमांसा! धन्यवाद!

माझे गझलेतले ज्ञान आपल्या सारख्या जानकारांच्या तुलनेत खचीतच नाही, म्हणजे जवळ जवळ नाहीतच जमा. माझा मुद्दा इथे फक्त एकच की मराठी गझलेची व्यापकता वाढावी. भटसाहेब यांनी मराठी गझलेची केलेली जोपासना आणी नंतर हळूहळू केलेले संवर्धन स्तुत्य आहे. (' स्तुत्य ' असे म्हणतांना मी भटसाहेबांनी केलेल्या कामाला प्रमाणपत्र देण्याची भावना कोठे तरी मनात आली आणी खजील झालो). पण तो काळ असा होता की तेव्हा मराठी साहीत्यातील काव्य क्षेत्रात मुक्तछंद वैगेरे प्रकारांचा घट्ट पगडा होता आणी मराठी गझलेला मान्यता नव्हतीच पण सोबत सावत्र वागणूक पण होती. अश्या काळात भटसाहेबांनी एकाकी पण यशस्वी लढत दिली आणी गझलेला रुजवली. आपण जे काही लिहीतोय त्याला नियम आहेत हे मराठी साहीत्य क्षेत्रा निक्षून सांगण्यासाठी भटसाहेबांनी नियमावली जन्माला घातली आणी अख्ख्या दळभद्री मराठी साहीत्य क्षेत्राला मान्य करण्यास भाग पाडले. ('दळभद्री' मी जाणून बूजून वापरतोय आणी हे माझे वैयक्तीक मत आहे. 'दळभद्री' मी कोण्या व्यक्तीला नाही तर वृत्तीला म्हणतोय ज्यांनी त्या काळी मराठी काव्य क्षेत्राला स्वतःची मालकी समजली होती. आज अशी वृत्ती राहीलेली नाही कारण मराठी गझलेला कोणाच्या मान्यतेची गरज राहीलेली नाही).
आज ही गझल लिहीतांना आपण ती नियमावली प्रमाण मानतो. पण कदाचीत भटसाहेबांना ते नव्या पिढीकडून अपेक्षीत नाही/नसावे. ('नाही' हा माझा समज आणी 'नसावे' हा माझा अंदाज). या नियमावलीची व्यपकता वाढावी कारण मराठी गझल कदाचीत पोक्त जरी नाही तरी तारूण्याचा काळ ओलांडून जात आहे. या नियमावलीत आता तांत्रीक दृष्टीने भर पडावी नाही तर एके दिवशी ही नियमावली 'दळभद्री' मंडळी (परत दळभद्री मंडळी कार्यांवित होवू शकतात) कालबाह्य ठरविण्याची भीती वाटण्यास बराच वाव आहे.

मी इथे व्यापकतेची व्यापकता किती हे ही मला ठरविने अशक्यप्रायच आहे, कदाचीत माझ्या क्षमतेपलिकडचे आहे. मला हे ही माहीती नाही की भटसाहेबांनी आपल्या नियमावलीत सर्व तंत्राचा अंतर्भाव केला का? जर आपण स्त्रोत म्हणून फार्शी गझलेला प्रमाण मानले तर, (कृपया तात्पूरते तसे समजूया) सर्व तंत्र मराठी गझलेने आत्मसात केले की नाही यांची काळजी भटसाहेबांच्या नव्या पिढीने नक्की घ्यावी आणी कदाचीत त्यांनाही अपेक्षीत असावे.

<<त्यांच्या मतप्रदर्शनावरून त्यांना गझलेविषयी खूप कळकळ आहे हे दिसून येतेच आहे परंतु त्यांना काही लोकांचे(गझलकारांचे/जाणकारांचे) विचार पटत नाहीत असे दिसतेय.>>

मी इथे गझलेतल्या क्षेत्रात मूळातच एक विद्यार्थी आहे त्यामूळे कोणाचे विचार पटण्याचा किंवा न पटण्याचा प्रश्न्च येत नाही.

(सर्वांची माफी मागून मी हे लिहीण्याचे धाडस केले, कोणताही गैरसमज नको)

निलयराव,

आपली कळकळ खरेच वाखाणण्याजोगी आहे.

भटसाहेबांनी बाराखडीत न लिहीलेल्या गोष्टी बर्‍याच प्रमाणात गझलेत रुजू झालेल्या आहेत/ होऊ पाहत आहेत त्यामुळे आपोआपच ही नियमावली जरी लिखीत स्वरूपात नाही तरी तात्वीकरीत्या अपग्रेड होत आली आहे. मराठी गझलेत सातत्याने काही वेगळे करता येईल का असा विचार करणारा प्रवाह आजही अविरत वाहता आहे असे माझे मत आहे.

कणखरजी,

thats it!!!!!!! thats there you are!!!!!!!!!!!

तुम्हाला १००% कळले की मला काय म्हणायचे आहे. माझे मराठी साहीत्यातील असलेल्या अगाध (?) ज्ञानामूळे तसभरातला विषय दोन दिवस चालला. त्याबद्दल क्षमस्व!

माझा मूद्दाही संपला आणी विषयसूद्दा!

धन्यवाद! कळत नकळत कोणाची मने दूखवली असेल तर क्षमा असावी!

श्री. भूषण कटककर ह्यांच्या अलीकडील(या इथे) गझलेवर "उच्चार साधर्म्य" असणारे शेर ह्या अंतर्गत दोन शेर नमूद केले आहेत त्यावर श्री. कैलास गायकवाड ह्यांनी ते शेर गझलेत बसतील आणि तिथे कच्चा कफिया गृहीत धरता येईल असे मत मांडले आहे...ह्यावरच भूषणजींनी तो कच्चा काफिया धरता येणार नाही असे म्हटले आहे.

या अनुषंगाने काही प्रश्न समोर येतात,

१. कच्चा काफिया म्हणजे काय?
२. स्वरकाफियालाच 'कच्चा काफिया' म्हणतात की ही संज्ञा वेगळीच आहे
३. उच्चार साधर्म्य असलेले शेर गझलेत अंतर्भूत करणे योग्य आहे का?
४. असे शेर असल्यास गझलकार 'स्वर काफिया' गृहीत धरायला लावू शकतो का? जसे 'या इथे' ह्या गझलेत तो 'ए' हा होऊ शकेल.

सर्व जाणकारांनी मत प्रदर्शन करावे म्हणजे शिकाऊ मंडळींना त्याचा लाभ होईल.

धन्यवाद!!

माय गॉड!!! मी हे वाचलं कस नव्हतं??

नक्किच या चर्चेचा मला फायदा होतोय.
इथे यायलाच हव नेहमी.

http://www.maayboli.com/node/24929

कणखरराव, आपण माझ्या वरील गझलेच्या संदर्भात ही चर्चा करत आहात. मी माझी मते मांडतो.

==============================================

सर्वात पहिले मत! आशय हेलावणारा, भिडणारा असेल तर इतका क्लिष्ट विचार करण्याची गरज नाही. शेवटी काव्यात काव्याचा आशय महत्वाचा! पण या वाक्याचा अर्थच 'एक सूट' असा लावून आपल्याकडील मंडळी सुमार आशयालाही अशा सुटी घेतात व त्यावर वादही घालतात. 'आमच्या दृष्टीने हा आशय अपवादात्मक आहे' असेही ते म्हणू शकतात. मात्र हेलावणारा आशय हा कवीच्या एकट्याच्या दृष्टीने कस ठरणार? त्याला श्रोत्यांची, रसिकांची तितकीच तीव्र दाद मिळायला हवी.

(रसिकांना समजत नाही त्याला आम्ही काय करणार अशी ग्रेसाळलेली भूमिका घेणे ज्यांना अजिबात शोभत नाही तेही असे बोलतात हे दुर्दैव!)

(या चर्चेत कडवटपणा अभिप्रेत नसला तरी येथे हे वरील मत मी केवळ अशासाठीच मांडत आहे की खाली काफियांबाबत माझी जी वैयक्तीक व परभाषेत मानली गेलेली / ग्राह्य धरलेली मते देणार आहे त्यांचा उगाचच सूट म्हणून वापर होऊ नये.)

तर 'अगदीच व फक्त तंत्राचा' विचार करायचा झाला तर :

===============================================

१. कच्चा काफिया म्हणजे काय?

काफियाचे तंत्राप्रमाणे तीन प्रकार पडतात. पक्का, कच्चा आणि स्वराचा! (अकारान्त स्वरकाफिया मराठी गझलेत चालत नाही.)

अ - पक्का काफिया = गाव्,स्वभाव, तणाव, वाव

यात 'व' हे अक्षर व त्यामागील स्वर कॉमन आहेत इतकेच नाही तर मुळात तो शब्द एक नाम आहे. ते कोणतेही क्रियापद नाही. किंवा 'च', 'ही, अशी अर्थपूर्ण परंतु स्वातंत्र्य देणारी जोडलेली अक्षरे नाहीत.

पक्कया काफियाचे उदाहरणः

प्रत्येक शेर माझा जळती मशाल आहे
प्रत्येक अक्षराचा हेतू जहाल आहे

मदिरा खराब आहे जो सांगण्यास आला
तोही पिऊन गेला सगळी धमाल आहे

जाणे तिचे नि येणे, थांबून पाहि दुनिया
दुर्मीळ फार हल्ली हंसाचि चाल आहे (यातील र्‍हस्व दीर्घ चुकले कारण वृत्त माहीत नसतानाची कविता आहे.)

या कवितेचे तंत्र गझलेचे आहे. यातील मशाल, जहाल, धमाल, चाल हे शब्द मुळातच 'मूळ, पक्के काफिये' स्वरुपाचे आहेत.

आणखीन थोडे स्पष्ट होण्यासाठी:

छोटे होते
खोटे होते

असे जर काफिया रदीफ असतील तर तो पक्का काफिया.

छोटे होते
मोठे होते

असे काफिया रदीफ असतील तर तो पक्का काफिया होणार नाही.

ब - कच्चा काफिया

यात अनेकदा क्रियापदे, 'च', 'ही' अशी अक्षरे केवळ शब्दांना जोडल्यामुळे ते शब्द काफिये होतात.

उदाहरणे:

अभ्यास अन तयारी सारे उगीच आहे
जी जी निघेल इच्छा ती वेगळीच आहे

आता वरील मतल्यात काफियाच्या शब्दातील शेवटचे अक्षर म्हणजे 'च' जर स्वतंत्र काढले तर 'उगी' आणि वेगळी' असे शब्द उरतात. त्यातील 'उगी' या शब्दाचा अर्थ 'उगीच' असा होत नाही. उगी हे साधारणतः सांत्वनरुपी आहे. त्यामुळे, हा 'च' जोडला जाईपर्यंत 'वेगळीच' या काफियाशी' 'उगी' हा शब्द काफिया म्हणून जुळणार नाही.

चोरून पाहताना चोरून पाहतो मी
मीही तसाच आहे तीही तशीच आहे

यातील 'तशी' या शब्दाची छटा 'तशीच' या शब्दासारखी नाही. 'तशी' ला 'च' जोडल्याशिवाय तंत्राने तो 'उगीच व वेगळीच' या काफियांमध्ये बसणार नाही. याचाच अर्थ 'ई' अलामत असलेल्या आनंदकंदात बसणार्‍या कोणत्याही शब्दाला हा 'च' या रचनेचा काफिया बनवतो. असे अनंत काफिये घेऊन ही गझल वाढवता येईल. (गझल वाढवता येईल म्हणून ती कच्ची असे म्हणत नाही आहे. हे लक्षात घ्यावेत)

आणखीन एक मिक्स उदाहरण देतो.

टोकीदार जरी आहे ही चोच मला
अगतिकतेचे पंख मला ही बोच मला

आता या मतल्यात टोच व बोच हे पक्के काफिये झाले.

मात्र पुढील एका शेरातील काफिया बघा.

विरहावर गझला करतो अन त्या विकतो
तुझा फायदा अजूनही मिळतोच मला

यातील 'मिळतोच' हा काफिया 'च' या अक्षराशिवाय काफिया होणार नाही. व 'च' या अक्षराशिवायही त्याला एक स्वतंत्र असा अर्थही आहे. म्हणजे हा 'च' त्या शब्दाला - ज्याला 'च' शिवायही अर्थ आहे त्याला - केवळ काफिया बनवण्यासाठी आलेला आहे.

हे कच्च्या काफियांचे उदाहरण आहे.

क - स्वरकाफिया:

आज आनदात राहू पाहुया पुढचे पुढे
वास्तवे बाजूस सारू पाहुया पुढचे पुढे

यातील राहू व सारू या काफियाच्या शब्दांमधील केवळ 'ऊ' हा अलामतीचा स्वरच काफियाचे काम निभावताना दिसतो. उर्दूत हे मोठ्या प्रमाणावर झाल्यासारखे वाटेल. (झालेले आहेही, पण आपल्याला जे वाटतात ते सगळेच उर्दू काफिये स्वरकाफिये नसतात, उर्दू लिपी लिहिताना स्वर वेगळा लिहिल्यामुळे तो काफिया ते लोक वेगळा समजतात, मराठीत अत्से शक्य नाही.)

(स्वरकाफिया वापरावा की नाही वगैरे चर्चा अर्थहीन आहेत. आपला आशय सर्वोत्कुष्ट पद्धतीने ज्या फॉर्ममध्ये बसतो ते कवी ठरवतो व ते खरे तर कवीला सुचतेही आपोआपच!)

किती चांगले व्हायचे कोण जाणे
कशाला तुझे व्हायचे कोण जाणे

यात चांगले व तुझे या शब्दांमधील 'ए' हा अलामतीचा स्वर काफियाचे काम निभावत आहे. ही स्वरकाफियांची उदाहरणे आहेत.

वर आपण पक्का काफिया, कच्चा काफिया व स्वरकाफिया पाहिले.

==================================================

२. स्वरकाफियालाच 'कच्चा काफिया' म्हणतात की ही संज्ञा वेगळीच आहे

स्वरकाफियाला 'कच्चा काफिया' म्हणू नये. ती संज्ञा भिन्न मानली जावी.

==================================================

३. उच्चार साधर्म्य असलेले शेर गझलेत अंतर्भूत करणे योग्य आहे का?

वर लिहिल्याप्रमाणे अपवादात्मक उच्च दर्जाचा शेर असल्यास कुणाचीही कवीला हे विचारण्याची हिम्मत नाही की हा 'अ-तांत्रिक' शेर कसा काय ऐकवता? मात्र तेवढ्या दर्जाचा शेर असला तरच!

माझ्या ज्या गझलेचे उदाहरण आपण घेतलेले आहेत त्यात पक्के काफिये आहेत.

असते, नसते, बसते, फसते असे!

त्यात असते व कळते असे मतल्यात नाही.

अश्या गझलेत 'रस्ते', ''नमस्ते' हे शेर घेणे चुकीचे आहे. आपण 'असते, फसते, बसते' या शब्दांचा शेर ऐकवताना उच्चार जरी 'अस्ते, फस्ते, बस्ते' असा काही प्रमाणात करत असलो तरी 'ते व 'स्ते' ही अक्षरेच भिन्न आहेत.

म्हणूनच मी ते शेर केवळ उच्चारसाधर्म्याचे आहेत असे लिहून ते त्या गझलेत समाविष्ट केलेले नाहीत. निशिकांत यांच्या एका गझलेवरही मी 'त आणि स्त असाही वाद होऊ शकतो' असा प्रतिसाद दिला होता तो याचसाठी की काफियातील ते अक्षर सेमच असायला हवे.
==================================================

४. असे शेर असल्यास गझलकार 'स्वर काफिया' गृहीत धरायला लावू शकतो का? जसे 'या इथे' ह्या गझलेत तो 'ए' हा होऊ शकेल.

असे गझलकाराला करायचे असल्यास त्याला खालील दोन पैकी एक मार्ग अवलंबावा लागतो.

१. मतल्यात तशी सूट घेणे

२. मतल्यात तशी सूट घेतलेली नसल्यास मतला ऐकवून झाल्यानंतर 'जमीनीचा शेर' हे विशेष उल्लेखून दुसर्‍या शेरात तशी सुट घेऊन स्वरकाफिया अभिप्रेत आहे हे स्पष्ट करणे!

पुन्हा एकदा - या सुटी व त्यांचे नियम, पळवाटा, कायदे हे सर्व आशयाशी निगडित आहे. केवळ्या सुटी उल्लेखलेल्या आहेत म्हणून वाट्टेल त्या शेराला त्या घेण्यापुर्वी तो शेर खरच अपवादात्मकरीत्या उत्तम आहे हे आपल्याला व इतरांना पटायला हवे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'

मनापासून धन्यवाद भूषणजी!!

ह्या निमित्ताने सुटी घेताना शेर अत्त्युच्च दर्जाचा असला तरच त्या घेतल्याने इतके विचित्र दिसत नाही हे अधोरेखीत झाले.

मला या बाबतीत रीअलाईज झालेली गोष्ट म्हणजे, बर्‍याचदा आपण(म्हणजे मी गृहीत धरले तरी हरकत नाही) एका गुरू ऐवजी दोन लघु योजत असतो. अक्षरगणवृत्तात हे ही अपवादात्मकरीत्या शेर तितका सुंदर असेल तरच घ्यावे. अन्यथा प्रत्येक शेरात अशी सुट घेतली असल्यास गझल मात्रावृत्तात आहे असे समजावे/मानावे.

मी यापुढे अशा सुटी न घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, बघुया कितपत जमते ते!!

जिथे आयुष्यभर हरलो अता तेही सफ़ल झाले
कशाने एवढे सारेच माझे ग्रह प्रबल झाले?

तुझ्या श्रद्धांजलीचा शेर टाळ्या खेचतो आजी
तुझे मरणेच माझ्या गाजण्याचे भांडवल झाले

तुझ्याशी बोलणे आशय, तुझ्याशी भांडणे ही लय
तुझा सहवास असल्यानेच हे जगणे गझल झाले

तुझ्या दु:खामधे मनमोकळा रडणार होतो मी
कुणाच्या सांत्वनाने चित्त माझे चलबिचल झाले?

बिछाना मित्र झाल्यावर तुझ्यातिल काव्य जाणवले
जिणे संपायला आले नि आता मन तरल झाले

कशाला दार ठोठावेल त्याला आत घेतो मी?
किती सत्शील आहे कोण ते कोठे दखल झाले?

अगोदर मी तसा ’कणखर’ असे कार्यालयामध्ये
भितीने नोकरी जाईल ह्या इतके बदल झाले

चर्चेची गझल

तुझ्याशी बोलणे आशय, तुझ्याशी भांडणे ही लय
तुझा सहवास असल्यानेच हे जगणे गझल झाले

भांडणाला 'लय' म्हणणे नावीन्यपूर्वक! तसेच बोलण्याला आशय म्हणणेही! पण बोलणे व भांडणे हे वैविध्य आहे. विरोधी नाही. विरोधी घ्यायचेही नसेल! पुढच्या ओळीत असल्याने सह 'च' आल्यामुळे वरच्या ओळीत 'इतर कशानेही जगणे गझल जहले नव्हते' असा एक सेन्स उगाच जाणवत राहतो. तसेच, वरील ओळीत 'सहवास च्या विरुद्ध काहीतरी' किंवा 'सहवास नसता तर काय झाले असते असे काहीतरी' यावे असे उगाच जाणवत राहते. शेर मस्त!

तुझ्या दु:खामधे मनमोकळा रडणार होतो मी
कुणाच्या सांत्वनाने चित्त माझे चलबिचल झाले?

यावर मगाशीच चर्चा झाली.

बिछाना मित्र झाल्यावर तुझ्यातिल काव्य जाणवले
जिणे संपायला आले नि आता मन तरल झाले

बिछाना मित्र होणे हे आजारपणासाठी आहे हे समजते. पण त्याच्यासाठी अजून थोडा पर्यायी विचार करायला हवा होता असे वाटले. व्याधी, रोग, आजार, मरणासन्न असे काही पर्याय होते जे कदाचित अधिक थेट होते. पण शब्दांमधील तीव्रता सोडल्यास हाही शेर छानच!

कशाला दार ठोठावेल त्याला आत घेतो मी?
किती सत्शील आहे कोण ते कोठे दखल झाले?

दखल झाले हा शब्दप्रयोग बहुधा सहसा मराठीत नसावा. पहिली ओळ चांगली आहे. तसेही, घेतो मी ऐवजी घ्यावे मी हे अधिक तीव्र झाले असतेही कदाचित. आपले आपले मत म्हणा! हा शेर पोचत नाही. म्हणजे शब्दार्थ समजतो, पण हे दार घराचे दार नसणार हेही जाणवत राहते. मग मनाचे वगैरे असल्यास सपाट शेर वाटू लागतो.

अगोदर मी तसा ’कणखर’ असे कार्यालयामध्ये
भितीने नोकरी जाईल ह्या इतके बदल झाले

'कणखर' हे तखल्लुस 'लललल' असल्याने मुळातच 'गागा'ऐवजी वापरताना जाणवायची ती सूट जाणवतेच प्लस अगोदर मधील 'दर'चेही तसेच होते. मक्त्यात गोटीबंदता किंवा सफाई कमी पडल्यासारखे वाटले. तसेही खयाल काही खास वाटला नाही. एक ऐकले आहे ते असे की मक्त्यात काहीतरी गंमतीशीर, मिश्कील, अती शहाणपणाचे असे काहीतरी लिहितात अनेकदा!

तखल्लुस 'दाग' है और आशिकोंके दिलमे रहते है

थी खबर गर्म के गालिबके उडेंगे पुर्जे
देखने हमभी गये थे पै तमाशा न हुवा

मीरने स्वतःचा उल्लेख अनेकदा मीरसाहब, मीरजी असा केलेला मला आढळला.

अशी काही उदाहरणे आहेत.

'भिती' ऐवजी 'भयाने' असे करून सफाई आली असती हे सगळेच जाणतातच. Happy

-'बेफिकीर'!

असल्यानेच मधे आपण म्हणताय तसाच अर्थ अभिप्रेत आहे. तू असल्यामुळेच अदरवाईज हे जगणे काही गझल नव्हते/नाही इ.

दखल झाले हा शेर ठेवणार नव्हतो खरे तर पण त्यावर चर्चा व्हावी असे वाटलेच होते म्हणून ठेवला. माझ्या गावाकडे "माहित नाही" ह्या करीता "मला दखल नाही" किंवा "कुणाला दखल" असा वाकप्रचार वापरतात त्याच्या प्रभावाने हा शब्दप्रयोग झाला आहे.

बिछाना मित्र झाल्यावर ऐवजी 'जसे मी अंथरुण धरले' असा विचार केला होता पण बिछाना हेच पटले होते. विचारासाठी वेळ द्यायला हवा असे वाटतेच आहे पण होत नाहीये

मक्त्यात शायराला अलिखीत स्वातंत्र्य दिलेले असते असे मी ही वाचलेले आहे आणि आपले म्हणणे पटले आहे. मक्ता नसला तरी चालेल हा पर्याय आहेच. ह्या शेराच्या बाबतीत कित्येकांना हे अनुभवायला येते असे वाटले आणि माझाही अनुभव असल्याने शेर झाला.

गझलेत वृत्तांत्मकता कितपत कमी झाली आहे ह्यावर आपले मत वाचायला आवडेल.

धन्यवाद!!

सहमत आहे. परंतू नवीन गझलकारांना हा धागा माहीत नसल्यामुळे तसे झाले असावे. मधूनमधून हा धागा वर काढीत रहावे की काय असे वाटले.

-'कणखर'

अलिकडच्या काळात मायबोलीवर प्रा. सतीश देवपूरकर ह्या बुजूर्ग कवींनी बर्‍याच गझलांची केलेली रसग्रहणे, वैवकु ह्या नवकवीची गझलेच्या क्षेत्रात सुरू असलेली प्रायोगिक चळवळ, गंभीर समीक्षकांची समीक्षणे ह्या सर्व गोष्टी पाहता गझलेच्या चर्चा कसदार होण्याकडे वाटचाल सुरू आहे असे वाटत आहे. ह्या सर्व चर्चांच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित करतो. गांभीर्याने गझल/कविता करणार्‍या सर्व कवींनी आपापली मते नोंदवावीत ही विनंती

१. कवीला शेरातून काय सांगायचे आहे हे वाचकाला तंतोतंत कळते का? वाचक(मायबोलीचा) स्वतःला लागू असलेला अर्थ काढण्याच्या भानगडीत पडतो की नाही?

२. पर्यायी शेर देण्याच्या पद्धतीला मूळ कवीची परवानगी घेतली नसल्यास काही अर्थ आहे किंवा नाही? ह्या प्रकारात मूळ कवीचा संताप होणे स्वाभाविक आहे किंवा नाही?

३. नवनवीन शब्द(जे प्रमाण मराठी भाषेत नाहीत) योजणे किती योग्य आहे?

४. बर्‍याचदा मायबोलीवरचा गझलेचा प्रतिसादक(मी सुद्धा) मलाही गझलेतले कळते ह्या अविर्भावात प्रतिसाद देतो का?

५. असल्या भानगडी फक्त मराठी गझलेतच असतात किंवा काय?

धन्यवाद!!

Sad

मला वरील सर्व प्रश्न 'गझलेशी' संबंधीत नसलेले असे वाटत आहेत कणखरजी. प्राध्यापक महोदयांनी उपस्थित केलेले मुद्दे चर्चेला घेतले तर चालेल का? वरील प्रश्न हे गझल व गझलेवरील प्रतिसाद यांच्यातील वर्तन निकषांबाबत असल्यासारखे मला तरी वाटले. क्षमस्व.

“संपलो ताडीत मी कावे तुझ्या रक्तातले
आतल्या गोटात यावे हेच आता चांगले”
पहिली ओळ कानास बोचते. ताडीत शब्द खटकतो. रक्तातले कावे......हृद्य नाही वाटत. रक्तातले कावे......ते ताडताना(ताडीत) (जन्म) संपणे....... म्हणून तुझ्या आतल्या गोटात यायला हवे म्हणणे......सगळेच विस्कळीत वाटते जे अजिबात उमगतही नाही, पटतही नाही आणि भावत तर नाहीच नाही. मतला घाईघाईत लिहिल्यासारखा वाटतो. पुरेसे चिंतन केलेले दिसत नाही. आपल्या हृदयातील गूज आपल्याच हृदयात राहिलेले दिसते, ते मतल्यात उतरलेले वाटत नाही. सबब, सदर शेर पूर्णपणे फसलेला वाटतो! काफियाशरणता स्पष्टपणे दिसून येते.
मूळ मतल्यातच दम नसल्याने समानार्थी पर्यायी शेर देणे टाळीत आहे!
हेच काफिये पण पूर्ण वेगळा विचार घेवून शेर देवू शकतो. पण तोही मूड ही गझल वाचल्यावर राहिला नाही. क्षमस्व!
................................................................................................

“का अघोरी एवढी कर्तव्य ही संकल्पना
भाव मोत्याला मिळाल्यावर मरावे शिंपले”

हा शेर पण तसाच अस्पष्ट, धूसर वाटतो. कर्तव्य ही अघोरी संकल्पना का तर म्हणे मोत्याला भाव मिळाल्यावर शिंपल्यांना मरावे लागते. विचारच पटत नाही. दोन्ही ओळी एकजीव होण्यासाठी लागणारे नातेच इथे निर्माण झाले नाही. त्यामुळे हा शेरही हृद्य वाटत नाही. शिवाय शिंपल्यातला मोती हा शिंपल्यात राहणा-या जीवाने केलेली निर्मिती असते.Pearl is a secretion of an organism in the shell. खरा मोती हा महागच असतो. कारण तो natural असतो. नकली मोती स्वस्त मिळतात.
तेव्हा मोत्याला भाव मिळाल्यावर शिंपल्यांना मरण येते ही कल्पनाच अशास्त्रीय आहे. मरतो तो शिंपल्यातला जीव, ज्याच्या निर्मितीला म्हणजे मोत्याला खूप भाव मिळू शकतो. पण तरीही कर्तव्य ही संकल्पना एवढी अघोरी का? हा प्रश्नच इथे अप्रस्तूत वाटतो. इथेही पर्यायी शेर द्यायची इच्छा होत नाही!
.................................................................................................

“आज नाती जोखण्याचा प्रश्न कोठे राहिला
जे अपेक्षांना उतरते तेच होते आपले”
या शेरात देखिल अर्थांच्या बाबतीत त्रुटी जाणवत आहेत.
दुस-या ओळीत आपण “आपले होणे” असा शब्दप्रयोग करता, त्याच बरोबर अपेक्षांचा उल्लेख करता. वरच्या ओळीत नाती जोखण्याची भाषा आहे. सर्वच विचित्र वाटते. कारण सच्च्या नात्यामधे “आपले होणे” यामधे अपेक्षांची भावनाच मुळात नसते. दोन व्यक्ती कुठलीही अपेक्षा न ठेवताच एकमेकांच्या गुणदोषांसकट एकमेकांना स्वीकारतात, प्रेम करतात, तेव्हाच आपले होतात, असे दिसून येते. अपेक्षांना सच्च्या नात्यात वावच नसतो, त्यामुळे त्यांना जोखण्याचा प्रश्नच नसतो! तेव्हा अपेक्षा ठेवून आपले होणे वा नाते निर्माण होणे हे अतर्क्य वाटते. आई-मुलगा, यशस्वी पती-पत्नी, बहीण-भाऊ वगैरे नाती याची उदाहरणे आहेत, ज्यांच्या बाबतीत जोखण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्यांच्यात निर्व्याजपणा असतो, निरपेक्षपणा असतो. मुळातच शेरातील विचार चुकीचा असल्याने पर्यायी शेर देणे टाळीत आहे. क्षमस्व!
.................................................................................................

“फ़ार मोठी झेप हल्ली सोसते कोठे मला
पाहिजे तो माज कर तू बंधनांच्या शृंखले”
या शेरास मात्र पर्यायी शेर द्यावासा वाटतो! जास्त होकारात्मक विचार मांडला जाऊ शकतो, तो असा...........
“झेप मी घेईन मोठी, सांगतो पैजेवरी......
पाहिजे तो माज कर तू बंधनांच्या शृंखले!”
...................................................................................

“अंतरी का होइना सांभाळ तू हळवेपणा
लेवु दे चर्या भले खंबीरतेची कुंडले”

हा शेर मात्र खणखणीत आहे. “खंबीरतेची कुंडले” कल्पना खूपच चपखल व हृद्य आहे. या शेरात तुमची प्रतिभा व प्रद्न्या दोन्ही ओसंडताना दिसतात. उस्फूर्तपणा काळजाचा ठाव घेतो. या शेराबद्दल आपले त्रिवार अभिनंदन! सलाम आपणास!
...................प्रा. सतीश देवपूरकर

माझी मते डिफेन्सिव्ह होऊ शकतात त्यामुळे इतर कवींनी आपली मते वरील देवपूरकरांच्या मुद्दयांवर व्यक्त करावीत अशी विनंती.

समीर चव्हाण यांची डोह ही गझल

===============

गझलेला शीर्षकाची आवश्यकता नसते. मात्र हवी ती गझल लवकर सापडावी यासाठी काहीवेळा व विशेषतः आंतरजालावर गझलेला शीर्षक दिले जाते. हे शीर्षक कसे असावे याबाबत माझे मतः

त्या शीर्षकामधून कोणती व कोणत्या जमीनीतील गझल आहे हे सहज लक्षात यावे. नुसतेच 'डोह' या शीर्षकावरून मला समीर चव्हाणांचे त्या गझलेतील शेर आठवतीलच असे नाही. म्हणून सहसा पहिली ओळ (मतल्याचा पहिला मिसरा) शीर्षक म्हणून दिल्यास गझल लक्षात येणे, लक्षात राहणे, विशिष्ट शेर आठवणे हे सोपे होते असे मला वाटते.

याशिवाय, डोह या शीर्षकाची आणखी कोणाची गझलही असू शकेल, त्यातील गोंधळही मिसरा शीर्षक म्हणून दिल्यास टाळता यावा.

हा मुद्दा 'गझलेच्या काव्यगुणांशी' संबंधित नाही, त्यामुळे तितकासा महत्वाचाही नाही, पण मला वाटते शीर्षक म्हणून मिसरा दिल्यास अनेक बाबी कवीला व अनेकांना चटकन आठवू शकतात.

आपली मते अवश्य मांडावीत.

-'बेफिकीर'!

पुलस्ती यांची पानगळ ही गझलः

================

बिघडले आहे मनाच्याही ऋतूंचे चक्र का?
वर्षभर चालूच आहे आत ओली पानगळ<<<

या शेराबाबतः

पहिल्या ओळीत चक्र बिघडण्याचे कारण विचारले आहे की 'ऋतूंचे चक्र बिघडले आहे की काय' असे विचारले आहे हे माझ्या लक्षात आले नाही. दुसरी ओळ स्पष्ट आहेच पण 'ओली पानगळ' ही प्रतिमा नीटशी समजून घेता आली नाही. त्यात मला शाब्दिक चमत्कृती जाणवली. म्हणजे 'वर्षभर नुसती पानगळच चालू राहणे' असेच फक्त म्हंटले तरीही पहिल्या ओळीतील विचाराची गझलेस शोभणारी पूर्तता दुसर्‍या ओळीत होऊ शकत आहे. (म्हणजे, एकच ऋतू वर्षभर चालू आहे, मनाच्या'ही' ऋतूंचे चक्र आता बिघडले आहे की काय? / का बिघडले आहे - नुसते असे म्हंटले जाणे हाही एक परीपूर्ण व शेराला शोभेलसा खयाल वाटतो. ) ओली पानगळ यातून काय साध्य झाले असेल असा विचार करताना मला प्रथम 'अश्रू' ही संकल्पना अधिक चटकन जाणवली. पण 'ओली' हा शब्द अश्रूंकडे निर्देश करत असेलच तर 'पानगळ' हा शब्द तेथे माझ्यामतेतरी अपरिहार्य शब्द ठरत नाही (भले तो काफिया आहे). (कारण आतल्याआत अश्रूंचा ओला श्रावण - अशीही एक संकल्पना असू शकते). समजा, वर्षभर डोळ्यातून आसवे वाहत राहिली तरीही मनाच्या ऋतूंचे चक्र बिघडले असून एकच (रडण्याचा) ऋतू सतत चालू आहे हेही परिपूर्ण वाटू शकत आहे. मग 'आतमध्ये' या शब्दाच्या अपरिहार्यतेबाबत मनाला शंका पडली. मला मनाचे ऋतू, मनाच्या ऋतूंचे चक्र, चक्र बिघडणे, ऋतू आणि पानगळ, वर्षभर आणि पानगळ, या सर्व जोड्या सहज लावता आल्या. पण या यादीत 'ओली पानगळ' हे दोन शब्द समहाऊ बसवता आले नाहीत. कृपया पुलस्तींनी अधिक माहिती दिल्यास बरे वाटेल. (जाता जाता - एका वर्षात ऋतूंचे एक चक्र होते यामुळे 'वर्षभर' हा शब्द समर्थनीय आहे हे मान्य आहेच, पण 'जन्मभर' म्हंटल्यासही अर्थ जवळपास तोच राहून तीव्रता वाढेल का - असेही एक मनात आले). (शिवाय - 'आतमध्ये' या शब्दाच्या अप्रिहार्यतेबाबतही किंचित खुलासा झाल्यास मजा येईल).

मार्ग सगळ्यांचे कितीदा काटतातच सारखे
खातरी नाहीच - माझी वाट आहे का सरळ?

या शेरात मला 'कितीदा' आणि 'सारखे' हे दोन 'वारंवारतादर्शक' शब्द एकत्र घेणे अपरिहार्य वाटले नाही. दुसरे म्हणजे, आपली वाट सरळ असली तरी दुसरा येऊन आपल्याला क्रॉस होत असणे हे शक्य होतेच की?

या धाग्यावर (गझलेच्या प्रत्यक्ष धाग्याखाली उगाच विसंगत चर्चा होऊन निराळेच वाद होऊ नयेत म्हणून) गझलांवर खास चर्चा केली जायची. हा धागा विदिपांनी कालांतराने अप्रकाशित करून ठेवला होता. काल त्यांना मी हा धागा पुनर्प्रकाशित करण्याची विनंती केली कारण मला समीरच्या गझलेच्या शीर्षकाबाबत व पुलस्तींच्या त्या दोन शेरांबाबत काही म्हणावेसे वाटत होते.

कृपया गैरसमज नसावेत. निखळ चर्चेचा हेतू आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Pages