गझल चर्चा

Submitted by विजय दिनकर पाटील on 14 February, 2011 - 02:54

नमस्कार मंडळी,

आताशा मायबोलीवर गझलेला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून आणि नवनवीन लोकांना ह्यात येण्याची आवड लक्षात घेऊन बर्‍याच विचारांती हा धागा काढावा असे वाटले(श्री. निशिकांत देशपांडे ह्यांच्या एका गझलेवरील प्रतिसादात श्री. भूषण कटककर(बेफिकीर), डॉ. कैलास गायकवाड, श्री. निशिकांत देशपांडे आणि अस्मादिक ह्यांची एक चर्चा झाली तेथे असा धागा गझल विभागात असावा ह्यावर एकमत झाले)

गझलेचे तंत्र, मंत्र, विषय, सूटी ह्याविषयी बरेच समज/गैरसमज सद्या आपल्यातल्या बर्‍याच लोकांच्या मनात आहेत परंतु ह्या गोष्टींना सप्रमाण सिद्ध्/असिद्ध करू शकतील असे फारच थोडे जाणकार आपल्यात आहेत. ह्या धाग्यांवर अशा सर्व शंकांचा उहापोह झाला तर नवशिक्यांना खूप उपयोगी होईल ते सगळे.

तसेच सद्या प्रकाशित असलेल्या गझलांतील तांत्रीक बाबींवरही ह्या धाग्यावर चर्चा होऊन मतमतांतरे आजमावता येईल.

चला तर मग! गझलेचा काफिला पुढे नेण्यासाठी आपापला खारीचा वाटा उचलायला सज्ज व्हा!!!

गुलमोहर: 

चर्चेची सुरूवात मीच करतो :

बद्दीउजमां खावर ह्यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप कमी गझल लिहील्या परंतु त्या खूपच प्रभावी होत्या असे वाचले आहे. खावर ह्यांच्याबद्दल आणि त्यांच्या गझलेबद्दल कुणी सविस्तर माहिती इथेच देईल का? लिंक नसाव्यात म्हणजे सर्वांनाच आनंद घेता येईल

भाऊ,

जरा हेही पहा...
http://www.maayboli.com/karyashala
या आधी अनेक वेळा चर्चा/कार्यशाळा झाल्या आहेत. त्याखेरीज काही नविन चर्चा आहे का? नवोदीतांनी मायबोलीचे सर्व विभाग आणि पूर्वीचेही सर्व लेखन वाचायला जरा वेळ काढला तर अधिक ऊपयुक्त ठरेल. नाही का?

धाग्याला शुभेच्छा कणखरराव!

खावर यांच्या गझला येथे देईन! त्यांच्या गझलांबाबत मत प्रामाणिकपणे लिहितो.

खूपच पारंपारिक शेर आहेत. अनेक गझला वाचल्यानंतर काही शेर उत्तम मिळतात. ते भटसाहेबांचे समकालीन आहेत असे समजले. भटसाहेबांच्या व त्यांच्या गझलेत दर्जात्मक तफावत बरीच आहे असे मला तरी वाटते. अर्थात, या धाग्यावर टीका करणे हा हेतू नाही. पण आपण 'खूपच प्रभावी' असे म्हणाला आहात म्हणून लिहीले. क्षमस्व!

-'बेफिकीर'!

योग,

कार्यशाळेचे धागे पहाल तर ते २००७ आणि २००८ सालचे आहेत. इथे रोजच लोकांना नवनवीन शंका निर्माण होतात गझल लिहीत असताना.

'गझल नेहमी प्रेझेंट मधे असते' असे म्हणतात तेव्हा इथे ही चर्चा नक्कीच उपयुक्त ठरेल. शिवाय रिपीटेशन झाले तर त्यातून आपल्यासारख्यांची उजळणीही होईल

हा धागा मायबोलीवर प्रकाशित झालेल्या गझलांवर जर काही तांत्रिक / आशयासंदर्भात चर्चा करायची असल्यास त्यासाठी 'प्रामुख्याने' वापरला जावा असा आधीचा हेतू होता. त्याचबरोबर कणखर यांनी काढलेल्या मुद्यांसारखे मुद्देही महत्वाचेच ठरतील!

पण आपण 'खूपच प्रभावी' असे म्हणाला आहात म्हणून लिहीले. क्षमस्व!>>> मी ते फक्त वाचले होते भूषणजी..माझे खावरचे बिल्कुल वाचन नाहीये म्हणून तर शंका विचारली आहे Happy

धाग्याबद्दल खूप आभार कणखर आपले.

मला उत्तम्/चांगला शेर याची सर्वमान्य लक्षणे यावर चर्चा व्हावी असे वाटते.

म्हणजे शेर हा केवळ वर्णनात्मक न राहता, दुसर्‍या मिसर्‍यात त्याने इतका प्रभावी समारोप करायला हवा की तोंडातून आपसूकच दाद यायला हवी.मग ते दु:खातिरेक, शोकांतिका, योगायोग्,एखाद्या अवडंबराची मार्मिक खिल्ली आदि गोष्टीं चा अंतर्भाव असलेले हवे.

बरेच उर्दू शेर हे,दु:खाची वर्णने,प्रेम-प्रेयसी,दारु,धर्मगुरुची खिल्ली या विषयावर लिहिलेली असल्याने एका प्रसंगाचे अथवा दु:खाचे वर्णन्,अश्या स्वरुपाची रहातात. त्यामुळे तो ''पंच'' अथवा विरोधाभास येत नाही.

तरी याबाबत आपणां सर्वांची मते जाणून घ्यायला आवडतील.

डॉक,

आपोआप दाद निघायला हवी ह्या गोष्टीवर मी आपल्याशी सहमत आहे. शेरात 'व्वॉव!' इफेक्ट असायलाच हवा हे माझेही मत आहे. ह्याच कारणास्तव मी माझी आजची गझल 'कविता' विभागात हलवली आहे.

लूट ले जाये कोई मुझको नसीबोंवाला
इसलिये मैने गिर्रेबान खुला रखा है

अशा अनंत उर्दू शेरांत तो 'व्वॉव!' इफेक्ट आहे असे मला वाटते

१. शेर कसा आहे ते लिहीणार्‍याला स्वतःला लगेचच समजते असे माझे मत आहे त्यावरही उहापोह व्हावा!!

२. कालानुरूप शेरांमधे नावीन्याची अपेक्षा जाणकार वाचकांकडून केली जाते. हे नावीन्य कशातून येते/येत असावे?

अर्थात कणखर्,उर्दू शेरांत व्वॉव इफेक्ट आहेच. पण बहुसंख्य नाही हे मला सूचित करायचं आहे.

भारंभार गझलांत हे व्वॉव इफेक्ट वाले शेर अजरामर होवून जातात हा इतिहास आहे.

उनके आनेसे जो आति है चेहरे पे रौनक
वो समझते है बीमार का हाल अच्छा है

------------------------------------------------

किंवा गालिबची ही गझल पहा.

मज़े जहाँ के अपनी नज़र् में ख़ाक नहीं
सिवाय ख़ून-ए-जिगर, सो जिगर में ख़ाक नहीं

मगर ग़ुबार हुए पर हव उड़ा ले जाये
वगर्ना ताब-ओ-तवाँ बाल-ओ-पर में ख़ाक नहीं

ये किस बहीश्तशमाइल की आमद-आमद है
के ग़ैर जल्वा-ए-गुल राहगुज़र में ख़ाक नहीं

भला उसे न सही, कुछ मुझी को रहम आता
असर मेरे नफ़स-ए-बेअसर में ख़ाक नहीं

ख़्याल-ए-जल्वा-ए-गुल से ख़राब है मैकश
शराबख़ाने के दीवर-ओ-दर में ख़ाक नहीं

हुआ हूँ इश्क़ की ग़ारतगरी से शर्मिंदा
सिवाय हसरत-ए-तामीर घर में ख़ाक नहीं

हमारे शेर हैं अब सिर्फ़ दिल्लगी के 'असद'
खुला कि फ़ायेदा अर्ज़-ए-हुनर में ख़ाक नहीं

व्वॉव इफेक्ट आहे..नो डाउट्,पण तेच शेर अजरामर व रसिकांच्या मनात घर करुन रहातात असे मला वाटते.

किंवा फिराक गोरखपुरी यांची ही गझल.

बरेचसे विचार्/खयाल हे जुनेच किंवा परिच याचेच आहेत....पण तोंडातून आपोआप वाह निघते.

कुछ इशारे थे जिन्हें दुनिया समझ बैठे थे हम
उस निगाह-ए-आशना को क्या समझ बैठे थे हम

रफ़्ता रफ़्ता ग़ैर अपनी ही नज़र में हो गये
वाह री ग़फ़्लत तुझे अपना समझ बैठे थे हम

होश की तौफ़ीक़ भी कब अहल-ए-दिल को हो सकी
इश्क़ में अपने को दीवाना समझ बैठे थे हम

बेनियाज़ी को तेरी पाया सरासर सोज़-ओ-दर्द
तुझ को इक दुनिया से बेगाना समझ बैठे थे हम

भूल बैठी वो निगाह-ए-नाज़ अहद-ए-दोस्ती
उस को भी अपनी तबीयत का समझ बैठे थे हम

हुस्न को इक हुस्न की समझे नहीं और ऐ 'फ़िराक़'
मेहरबाँ नामेहरबाँ क्या क्या समझ बैठे थे हम

ह्यावरून जुन्या नव्याचा फरक कसा करायचा हाही मुद्दा महत्वाचा आहे असे लक्षात येते. कशा प्रकारच्या शेरांची मांडणी जुनाट मानली जाते?

शेरात 'व्वॉव!' इफेक्ट असायलाच हवा हे माझेही मत आहे. ह्याच कारणास्तव मी माझी आजची गझल 'कविता' विभागात हलवली आहे>>>

या गोष्टीशी मी असहमत आहे. माझेही हेच मत असायचे. ही लिंक पहावीत.

http://www.sureshbhat.in/node/2017

मात्र शेवटी हा एक प्रवास असणार असे वाटते. कारण आता असे वाटते की समजा जादूमय, चमत्कृतीयुक्त, शब्दांचे खेळ असलेले शेर रचले आणि वाहवा मिळवली तरी ते रचताना त्यातील हेतू जर 'वाहवा' मिळवण्याचा असला तर ते योग्य नाही. ज्येष्ठ गझलकार श्री प्रदीप कुलकर्णी यांच्याशी एकदा दीर्घ चर्चा करायचा योग आला होता. तसेच श्री बशर नवाझ साहेबांशीही अनेकदा चर्चा केली. काही प्रमाणात स्वतःचे विचार, काही प्रमाणात या ज्येष्ठांचे विचार व हळूहळू गझला रचत गेल्याने सतत नवीन विचारांना चालना मिळत राहण्याची एनर्जी यामुळे सध्या अशी मते बनलेली आहेत.

१. शेर सच्चा असावा. शब्दांच्या आकर्षणाने रचलेला नसून 'खर्‍या आशयाने' नटलेला असावा. मग काफियासाठी हा शब्द मस्त आहे, ती रदीफ घेतली तर सुंदर वाटेल, हे वृत्त आपण कधी योजलेच नाही असा हेतू नसावा.

२. मुशायरा हा कवितेचा हेतू नसावा. कारण मुशायर्‍यासाठी टाळीचा शेर रचण्याची इच्छा होते व कवितेबाबतचा गंभीर हेतू डायल्युट होतो.

३. कोणत्याही गझलेचे, कल्पनेचे, वृत्ताचे, काफिया - रदीफचे अनुकरण करण्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हेतू नसावा. (कुणी अनुकरण करते असे म्हणायचे नाही आहे, हे केवळ एक मत आहे.)

या शिवाय:

गझलेचा शेर सहज समजणारा असावा
गझलेचा शेर बोलल्यासारखा असावा
एकाच आशयाचे अनेक शेर वेगवेगळ्या गझलांमध्ये आले तरी काहीही बिघडत नाही.
एकच जमीन चार वेळा वापरली तरी काहीही बिघ्डत नाही. त्यातून आपली प्रगतिच होते.
शाब्दिक करामती, चमत्कार, नाट्यमयता यांचा समावेश हेतुपुरस्पर नसावा.

चर्चेसाठी म्हणून 'कणखर' यांचीच ही खालची रचना घ्यावीशी वाटली.

गुंगलो स्वप्नात इतका, झापडे सरलेच नाही
तांबडे फुटले कधीचे पण मला कळलेच नाही

व्योमगंगा हे लांबलचक वृत्त वापरायची गरज होती का असा प्रश्न पडतो. 'गुंतलो स्वप्नात, नाही जाग आली.. तांबडे फुटले असे स्वप्ने म्हणाली' असा शेर केला तर काही बिघडले असते का असे वाटले.

जिंकण्यासाठीच सारे खेळ येथे खेळलो मी
शुद्ध खेळाची मजा घेणे कधी जमलेच नाही - जिंकण्यासाठीच येथे खेळलो मी, शुद्ध खेळाची मजा नाही मिळाली ! असा शेर केल्यास अस्पष्ट होईल का? (याच पद्धतीने इतर शेरही मॉडिफाय करणे शक्य असावे किंवा नसावेही कदाचित)

जन्मभर दुनिया तमाशा पाहते माझा चवीने
आपल्यांशी मात्र माझे भांडणे सुटलेच नाही - यात दोन्ही ओळींचा संबंध कसा आहे? 'मात्र' या शब्दातून येणारी छटा अशी आहे की 'हे असे असे झाले मात्र हे नाही झाले' ! मग दुनियेने कसला तमाशा पाहिला?

नेहमी माझ्या चुका पदरात घेशी संयमाने
पण म्हणूनच एकदाही सुधरणे घडलेच नाही -

आशय अतिशय सुंदर आहे. पण प्रवाहीपणा, सफाई कमी पडली असावी. नेहमी पदरामधे घेतेस माझे दोष सारे, यामुळे मीही सुधारावे असे सुचलेच नाही! हा अधिक सफाईदार व्हावा.

का तुला दु:खात होतो त्रास इतका सांग 'कणखर'
'प्रेम आयुष्यावरी माझे खरे जडलेच नाही'

तखल्लुस हवे असे काही नाहीच! कणखर हे तखल्लुस घेतले असले तर 'कणखर' या शब्दाचा जो अर्थ आहे, म्हणजे नाव म्हणून नव्हे तर मुळातच जो अर्थ आहे त्याला शेरात वाव मिळावा या दृष्टीने शेर रचण्याचा हेतू असायला हवा असे वाटते. वरील मक्त्यात 'कणखर' हे त्रासाचे विशेषण होऊ शकत नाही. यावरून लक्षात येते की कणखर हे शायराचे नाव आहे. मग ते कृत्रिम वाटू शकते. एवढा कणखर तरीही त्रास दु:खांचा तुला का अशी ओळ कदाचित न्याय्य व्हावी. मात्र मक्त्याचा एक अर्थ असा होत आहे की आयुष्यावर प्रेम जडलेच नसल्यामुळे मला दु:खांचा त्रास होतो आणि दुसरा अर्थ असा होत आहे की आयुष्यावर प्रेम जडले नाही तरीही मला त्रास होतो. हा दुसरा अर्थ अभिप्रेत असेल तर 'प्रेम आयुष्यावरी जेव्हा तुझे जडलेच नाही' असे केल्यास स्पष्ट व्हावे. तसेही आयुष्यावरी , दुनियेवरी यापैकीच्या शब्दांमधील 'वरी' टाळून 'वर' घेता येतो का हे बघणे आवश्यक असते असे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र जर पहिला अर्थ अभिप्रेत असेल तर मक्ता निरर्थक ठरेल. कारण आयुष्यावर प्रेम जडलेच नसले तर दु:खांचा तास व्हायलाच नको.

(मी काही मक्त्यांमध्ये तखल्लुस नाव याच अर्थी वापरलेले आहे. पण प्रयत्न असा आहे की सर्वच मक्त्यांमध्ये ते शब्दार्थ याच नात्याने वापरले जावे.)

वरील गझलेत चुका पदरात घेणे व खेळाची मजा हे दोन शेर गझलेचेच शेर असल्याने ती कविता विभागात हालवण्याचे मला तरी काही कारण वाटत नाही. इतर शेर अधिक वर जाऊ शकले असते असे वाटत आहे.

लांब वृत्त का घ्यायला हवे असा एक प्रश्न मी तरी कायम विचारतो स्वतःला!

अधिक उणे लिहीले असल्यास क्षमस्व!

-'बेफिकीर'!

भूषणजी,

व्वॉव इफेक्ट हा काव्याच्या(तगज्जुल) बाबतीत असावा असे मत आहे.

माझ्या रचनेचे केलेले रसग्रहण संपूर्णतया पटले. मुळात ही रचना मलाच बर्‍यापैकी कृत्रिम्/अपूर्ण वाटली आहे. त्यामुळे रचनेतून माझे समाधान झाले नाही फक्त ह्याच कारणास्तव मी कविता विभागात हलवली आहे.

तखल्लुस बद्दल सहमत आहे परंतु कधी कधी तो शायराच्या नावासाठी वापरला जातोच. बर्‍याच उर्दू गझलांमधे आपण हे पहात आलोय. प्रत्येक गझलेला मक्ता असलाच पाहिजे असे नाही ह्या मताशीही सहमत.

बाकी माझे वरचे प्रश्न अजून कुणी नजरेखालून घातले नाहीयेत असे दिसतेय, इथे परत देतोय

१. शेर कसा आहे ते लिहीणार्‍याला स्वतःला लगेचच समजते असे माझे मत आहे त्यावरही उहापोह व्हावा!!

२. कालानुरूप शेरांमधे नावीन्याची अपेक्षा जाणकार वाचकांकडून केली जाते. हे नावीन्य कशातून येते/येत असावे?

३. ह्यावरून जुन्या नव्याचा फरक कसा करायचा हाही मुद्दा महत्वाचा आहे असे लक्षात येते. कशा प्रकारच्या शेरांची मांडणी जुनाट मानली जाते?

धन्यवाद!!

वा, अगदी उपयुक्त धागा ! नव्या किंवा जाणत्या गझलकारांनाच नव्हे तर माझ्या सारख्या निव्वळ आस्वादकांनाही उपयुक्त आहे! अभिनंदन आणि शुभेच्छा !

शेर लिहिणार्‍याला तो कळत असावा असे वाटते. काही कवी असे आहेत की जे म्हणतात की आमची कविता आम्हालासुद्धा कळत नाही. कारण ती कविता रचताना आम्ही ट्रान्समध्ये असतो.

खरे तर आपण ट्रान्समध्ये असो की फ्रान्समध्ये शेर कळणे आवश्यक. किमान स्वतःला तरी. मात्र शेर कळणे न कळणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. समजा शेरातील संदर्भ एखाद्याला माहीतच नसेल किंवा त्या विषयाची त्याला अ‍ॅलर्जी असेल तर तो रसिक त्या शेराकडे आस्वादात्मक दृष्टीने पाहणारच नाही. तसेच, एखादा होवून गेलेला विषय असेल आणि त्या संदर्भात शेर रचला गेला असेल तर झालेलाच विषय आहे म्हणूनसुद्धा तो शेर उत्तम असला तरी दाद मिळत नाही. (दाद म्हणजे मुशायरे की काय होताता त्याबद्दल मी म्हणत नाही आहे.)

माझे असे मत झालेले आहे की त्या गझलकाराच्या पार्श्वभूमीचा विचार करूनच खरेतर दाद देता येऊ शकते. प्रत्येक शेर मीर, गालीब किंवा अगदी भटांशीसुद्धा तोलून मापून पाहण्याची गरज नसावी. शेर हा ज्या त्या गझलकाराच्या अनुभवातून किंवा अभ्यासातून आलेला असतो. तो चांगला आहे किंवा नाही हे तपासण्याआगोदर पूर्णपणे स्वच्छ (ब्लँक) पणे पाहिले (म्हणजे नवीनच वाचतो आहे असे.) तरच आपण खरी दाद देऊ शकू.

हा धागा आलेलाच आहे तर माबोच्या सभसदांना विनंती आहे की व्यक्तिगत रागलोभ विसरून गझला पाहव्यात. काहीजण सर्व गझलांवर प्रतिसाद देत नाहीत यासंबंधी मला बोलायचे नाही. मात्र निर्भेळ वृत्तीने माबोवरच्या गझलांकडे पाहिल्यास त्यात आता नक्कीच जान दिसते.

धन्यवाद!

खरे तर आपण ट्रान्समध्ये असो की फ्रान्समध्ये शेर कळणे आवश्यक. किमान स्वतःला तरी.>>>>>

मात्र निर्भेळ वृत्तीने माबोवरच्या गझलांकडे पाहिल्यास त्यात आता नक्कीच जान दिसते.

>>>>>

अत्यंत महत्वाच्या बाबी या दोन ओळींत अधोरेखीत झाल्या आहेत.

मात्र निर्भेळ वृत्तीने माबोवरच्या गझलांकडे पाहिल्यास त्यात आता नक्कीच जान दिसते>>>

क्षमस्व! क्रान्ती, देशमुख व अभिजीत हे सध्याचे अपवाद सोडून मला जान दिसत नाही.

ज्ञानेश, नचिकेत आठवले यांनी लिहिणे सोडले की काय?

जान दिसते हे 'एका विशिष्ट कालावधीच्या तुलनेत' 'एका विशिष्ट कालावधीतील गझलांबाबत' असे स्टेटमेन्ट आहे का? की तांत्रिक गुणात्मकतेबाबत? तंत्राबाबत असल्यास खूपच सुद्ध गझला आहेत.

यावरही चर्चा व्हावी असे वाटते.

धन्यवाद!

-'बेफिकीर ' !

क्षमस्व! क्रान्ती, देशमुख व अभिजीत हे सध्याचे अपवाद सोडून मला जान दिसत नाही>>>>>>

मला या यादित्,बेफिकिर्,निशिकांत्, हबा,विदिपा व अत्यंत सुखद आणि सच्ची सुरुवात असलेल्या विशाल कुलकर्णी यांचे नाव जोडावेसे वाटते.

मुटेजी,कौतुक्,ज्ञानेश्,आनंदयात्री,मिल्या या दिग्गजांचे लेखन कमी झाले आहे हे खरे.

गालिबच्या या गझलेचे पुढचे २ शेर आठवले,ते देतोय.

उनके देखे से जो आ जाती है मुँह पे रौनक
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है।

देखिए पाते हैं उशशाक़ बुतों से क्या फ़ैज़
इक बराह्मन ने कहा है कि ये साल अच्छा है।

हमको मालूम है जन्नत की हक़ीकत लेकिन
दिल के ख़ुश रखने को ‘ग़ालिब’ ये ख़याल अच्छा है।

मुटेजी,कौतुक्,ज्ञानेश्,आनंदयात्री,मिल्या या दिग्गजांचे लेखन कमी झाले आहे हे खरे. >>
डॉकसाहेब, माझे नाव add केल्याबद्दल आपले आभार...

पण माझ्या मते बेफिकीर लिखाणाच्या बाबतीत चोख असतात आणि त्यांना जे म्हणायचे असते तेच ते नेहमी म्हणतात. त्यामुळे त्यांनी त्यांची यादी दिली.. प्रत्येकाची मते वेगवेगळी असणारच. असो. प्रत्येकाचे फॅन निराळे, प्रत्येकाची दैवतं निराळी... आणि म्हणूनच प्रत्यक्ष भेटलेलो नसतानाही हे आपण माझ्या केवळ गझला वाचून लिहिले आहेत याबद्दल आपले विशेष आभार! Happy

कृपया अनुभवी, दिग्गज अशा शाब्दिक चर्चेत मला ओढू नये ही विनंती.. मुळात मी आपल्यापैकी कुणाकडूनच गझलेचे प्राथमिक शिकलेलो नाही.. मी गझल लिहायला शिकलो ते माबोवरील कार्यशाळेत. त्यामुळे आपली वाटचाल-जडणघडण वेगळी आहे. अर्थात गझल हाच आपल्याला जोडणारा समान धागा असल्यामुळे इथे होणारी त्याबद्दलची प्रत्येक चर्चा मला नवनवीन गोष्टी शिकवते. i enjoy being here with u all... पण तरीही एक उल्लेख करणार नाही, आणि मग दुसरा करणार... lets stop this...

आणि तसंही थोरपण दामटून, वातावरण निर्मिती करून मिळत नाहीच, आणि मिळालेच तर ते वरवरचे असते. त्यामुळे आपले लेखन/आपल्या रचना यांच्यातर्फेच आपली कीर्ती पसरली तर उत्तम; नाही का? Happy
चुभूद्याघ्या...

आपले लेखन/आपल्या रचना यांच्यातर्फेच आपली कीर्ती पसरली तर उत्तम; नाही का? >>>>

होय.:)

गझलेतील जान :-

१. आनंदयात्रींशी सहमत, मुळात अशी यादी नसावी व नावे घेऊही नयेत.

२. गझलेतील जान या संदर्भात मी ती नावे घेतलेली होती आणि 'विनय' वगैरे म्हणून नव्हे तर सत्यवचन म्हणून माझेही नांव त्यात घेतले नाही.

३. गझलेतील जान याचा मी अंदाज केलेला अर्थ म्हणजे 'शब्दशः जीव' नसून गझलेतील विचार, विचारांचे नावीन्य, विचार मांडण्याची शैली, अहंपणा नसण्याची पातळी (न्युट्रॅलिटी / स्वतःहीकडे पाहण्याचा त्रयस्थ दृष्टिकोन वगैरे), आम माणसाला 'आपला विचार' वाटावा या पातळीला शेर नेणे वगैरे बाबी असाव्यात. या दृष्ट्ने पाहिले तर वैभव देशमुख अस्सल लिखाण करतात असे वाटते. क्रान्ती जरी तरही ओळींवर लिहीत असल्या तरीही त्यात त्यांचे स्वतःचे विचार अनेक स्त्रियांना आम / आपलेच विचार वाटत असावेत असे वाटते. या पातळीला एक दोन शेरांमध्ये अनेक जण पोहोचू शकतील मात्र प्रत्येकवेळी हे संभव होत नसते. या दोघांच्याबाबतीत ते अनेकवेळा संभवते. नवीन विचार व विचार मांडण्याची शैली यात अनुक्रमे नचिकेत व ज्ञानेश खूप पुढे आहेत असे मला व्यक्तीशः जाणवते. अभिजीत यांची गझल तरल वाटते. वरील निकष हे माझे वैयक्तीक निकष असून ते प्रत्येकाला पटतील असे नाही. पण ते निकष ग्राह्य धरल्यास 'विचारांमधील नावीन्य' या बाबीत अनंत ढवळे हे नाव मला खूपच पुढचे वाटते. पण ते खूप कमी लिहीतात.

४. मी भारंभार व कृत्रिम गझला रचलेल्या असल्याने माझे नाव त्यात घेतले नाही. जे आहे ते परखडपणे लिहिण्यात गैर काय्?मी अनेक हझला रचल्या, अनेकदा अहंता आली, तेच तेच विचार वृत्तांमुळे भिन्न पद्धतीत आले, तरहीमध्ये सहभाग घेतलाच! दिडशे गझलतंत्रातील रचना रचल्यानंतर, म्हणजे किमान ७५० शेर रचल्यानंतर त्यातील दहा गझला बर्‍या किंवा पन्नास शेर बरे असण्यात काही विशेष नाही. पण प्रत्येक शेर भारी व्हावा या टप्यावर पोहोचायचे आहे. खोटे कशाला लिहायचे?

असो!

गझलेतील जान या शब्दावर चर्चा झाल्यास बरे वाटेल.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

सुंदर चर्चा सुरू आहे.

वेगवेगळ्या गोष्टींचा सविस्तर उहापोह होत आहेच तरी खालील प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिले आहे. कृपया सर्वांनी आपापल्या परीने त्यावर मते मांडावीत,

१. उत्तम्/चांगला शेर याची सर्वमान्य लक्षणे यावर चर्चा व्हावी

२. कालानुरूप शेरांमधे नावीन्याची अपेक्षा जाणकार वाचकांकडून केली जाते. हे नावीन्य कशातून येते/येत असावे?

३. कशा प्रकारच्या शेरांची मांडणी जुनाट मानली जाते?

आपण सगळेच गझलेचे विद्यार्थी आहोत आणि ते विद्यार्थीपण आयुष्यभर जपण्याचे व्रत आपण घ्यायला हवे. तेव्हा कोण बरा/चांगला/उत्तम/उत्कृष्ट्/निकृष्ट ही चर्चा करण्यात राम नाही.

त्याच्याऐवजी सर्वांनी चर्चेला घेतलेल्या गझलेस अनुसरून लिहावे म्हणजे मजा येईल - हा आग्रह नक्कीच नाही, विनंती आहे. व्यक्तिगत पातळीवर चर्चा होऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते.

मला चांगले वाटलेले शेर मी देत आहे. यापुढेही जसे आठवतील तसे अ‍ॅड करेन.

मला भेटायला आले,मला भेटून जाताना
मला भेटायचे नाही.,असे ठरवून गेलेले................... डॉ .ज्ञानेश

कायदे तोडावयाचे वेड आता संपले..
कुंपणे ओलांडण्याचा छंद नाही फारसा....... डॉ.ज्ञानेश

मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली
तरीही कुठे थांबले हे तडे जायचे..............डॉ.ज्ञानेश

ठेवणीतला नकोस दागिना करू मला,
वापरातला तुझा रुमाल होत जाउदे !.......डॉ.ज्ञानेश

शिकून घ्या रे सगळे ओझे अपुले आपण पेलाया
खुशाल टाका मान, असे उरले खांदे निर्धोक किती?..........डॉ.ज्ञानेश

उल्लेख झुंजण्याचा झाला न कोणताही,
माझ्या पराभवाची दाही दिशात चर्चा.............. डॉ.ज्ञानेश

नवे साल आता विचारे जुन्याला, मला उत्तरे तूच आणून दे
रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे...... डॉ.ज्ञानेश

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?..... डॉ.ज्ञानेश

मुद्दाम सगळे शेर ज्ञानेशचे दिले आहेत....... मला या शेरांतील सच्चेपणा भावतो. चांगला शेर ''असा'' असावा असे प्रकर्षाने वाटते.

उत्तम्/चांगला शेर याची सर्वमान्य लक्षणे यावर चर्चा व्हावी>>>

विजयराव आपण म्हणता त्याप्रमाणेच 'सर्वमान्य' म्हणण्यापेक्षा आपापल्या दृष्टीने ती लक्षणे कोणती यावर चर्चा शक्य होईल.

असे वाटते की तळहातावर कापुस ठेवला तर आपल्याला काही जाणवणार नाही. पण तितक्याच आकाराचा लोखंडाचा तुकडा ठेवला तर हात त्या वजनाने काहीसा खाली जाईल. हातात काहीतरी घेतले अशी जाणीव होईल. शेर वाचून त्याचे वजन (येथे वजन म्हणजे मीटर नाही) जाणवावे असे मला वाटते. याबाबतः

१. पहिल्या ओळीचा दुसर्‍या ओळीत प्रभावी समारोप ही माझ्यामते तांत्रिक अट धरली जावी. ती आशयाशी संबंधीत अट मानली जाऊ नये. प्रभावी समारोप होणे हे वृत्त, काफिया, रदीफ याच्याप्रमाणेच मानले जावे असे मला वाटते. म्हणजे ज्यात असा समारोप होत नाही तो मुळात शेरच नाही असे मानले जावे. असे केल्यास भिन्न भिन्न वर्णनाच्या दोन ओळींचे शेर होणे व ते शेर समजले जाणे व त्यांना शेर म्हणून दाद मिळणे बंद होईल!

२. हा बर्‍यापैकी कृत्रिम काव्यप्रकार असल्याने (काफिया रदीफ व वृत्ताची बंधने यामुळे) शेर त्याच त्या जमीनीतही अधिकाधिक सच्चा असायला हवा हे त्यातून जाणवायला हवे. मी मागे एक शेर रचला होता. 'वाहवा होणार आहे राख माझी पाहुनी, हे जसे सांगीतले मी, जाळले नाही कुणी'! आता यात प्रत्यक्षात न जळलेला माणूस बोलत आहे. मग हा सच्चा शेर कसा? तर तो शेर रचताना जी पार्श्वभूमी मनात होती ती अशा माणसांबाबत होती कीज्यांना माझी कधीच वाहवा झालेली पाहवत नाही. ही भावना सच्ची असली तरी बास! पण वाचून वाचून 'शेर सच्चा आहे की खोटा' हे सहज समजू शकते. त्यावर 'भटांचा प्रभाव आहे की उर्दूचा' हेही समजू शकते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एखाद्या चांगल्या गझलेचा प्रभाव आहे का हेही समजू शकते. हा फक्त काळाचाच भाग असावा. आता मायबोलीवर मी रचलेल्या एका गझलेतील एक शेर गालिबच्या एका शेरासारखा आहे असे स्वाती आंबोळे यांनी म्हंटलेले होते. त्या गझलेतील इतर बारा शेर गालिबसारखे नाहीत हे दाखवून मी त्यांचा विरोध केलेला होता. तो शेर असा!

गझलचा शेर ओवीसारखा नसतो असे नाही
व्यसन नसल्यामुळे संता तुझे लेखन कवन झाले

आता गालिबचा शेर (मक्ता) असा आहे

ये मसाईले तसव्वूफ, ये तेरा बयान गालिब
हम तुझे वली समझते जो न बादाख्वार होता

स्वाती आंबोळे यांचे म्हणणे पटण्यासारखेच होते. इतकेच काय मलाही पटले की तो शेर तसाच झाला. मात्र माझे एक सख्खे काका आहेत ज्यांनी आमच्या संपूर्ण नातेवाईकांमध्ये माझ्याबद्दल असे उठवले की त्यांच्या मुलाला मद्यपानाची सवय भूषणने लावलेली आहे. त्यावरून मोठे वाद झाले. आणि एक दिवस एका कौटुंबिक गेट टुगेदरमध्ये मला माझ्या कविता म्हणण्यास सांगीतले. त्यात मदिरेवरचे काही शेर होते. काकाही तिथे होते व त्यांनी ते शेर मला बंद करायला लावले व स्वतः काही धार्मिक स्तोत्रे म्हणायला सुरुवात केली. बाकीच्यांना खरे तर त्यांचा राग आला पण ते बुजुर्ग असल्यामुळे कुणी काही बोलले नाही. मी रचलेला तो शेर त्याबाबत होता. आता माझी भावना खरीच आहे हे मी इतरांना कसे पटवून देणार ? अशा वेळेस बाकीची गझल मदतीला धावते. तेरापैकी तेराच्या तेरा शेर अनुवादाप्रमाणे असल्यास खोटेपणा समजतो. बरेचसे शेर अनुवादाप्रमाणे असल्यासही समजतो. नुकतीच निशिकांत यांनी इलाहींच्या रदीफेवर एक गझल रचली होती. ते लगेच जाणवले. ते स्वतः ते लिहिणारच होते पण त्या आधीच माझा प्रतिसाद आला. त्यामुळे, गझल रचताना आपल्या स्वतःच्या अनुभुती किंवा अनुभुतींबाबतच्या 'रास्त / शक्य असू शकणार्‍या' काल्पनिकता यावरच शेर रचल्यास ती गझल सच्ची व्हावी असा अंदाज आहे.

३. कवीचा विचार हाच आपलाही विचार किंवा आपलीही अनुभुती वाटणे हे उत्तम शेराचे लक्षण मानले जावे असे वाटते. हे सिद्ध होतानाही आपण पाहतोच इन्टरनेटवर! एखादा एखाद्या शेराला दाद देतो तर दुसरा दुसर्‍याच शेराला! आपली अनुभुती आक्रसत आक्रसत जितकी गाभ्यापर्यंत पोहोचवता येईल किंवा वाढवत वाढवत जितकी व्यापक करता येईल तितकी मांडणी व आशय रसिकाशी आयडेन्टिफाय होईल असे वाटते.

४. सूक्ष्मता हे उत्तम शेराचे लक्षण मानतात अएस जाणकार म्हणतात.

५. वरील सर्व घटक उपस्थित असल्यानंतर काहीशी मिश्कीलता, काहीसा ट्विस्ट, काहीसा विरोधाभास, काहीशी नाट्यमयता हे घटक 'असले काय नसले काय' या दर्जाचे होतात असेही म्हंटले जाते. पण असल्यास मजेशीर वाटते हेही खरे!

६. पाच शेर म्हणजे पाच विचार असणे आवश्यक असा एक महत्वाचा विचार मी ऐकला. याचा अर्थ असा की काफिया कोणता घेता येईल याला प्राधान्य असणे चूक! पुन्हा वैभव देशमुख ! यांनी स्वर काफिया अनेकदा वापरला. त्यांच्या गझलेत आपण सहसा दहा दहा शेरही पाहणार नाही. पण प्रत्येक शेर हा एक विचार असतो.

=======================================

हे सगळे झल्यानंतर प्रश्न येतो की रसिकाला काय सच्चे वाटेल, काय आपलेसे वाटेल यावर नियंत्रण काय? म्हणूनच रसिकाची अभिरुचीही तयार व्हावी लागते. मराठी गझल रसिकाची आजची अभिरुचीही भटसाहेबांच्या गझलची आहे. असावी की नसावी हा विषयच नाही. तो विचार करण्याची गरजच नाही. मात्र आपण जर काही वेगळे लिहीत असलो तर सातत्याने रसिकासमोर येईल व रसिकाला ती टेस्ट उत्पन्न होईल हे आपल्याला पाहायला हवे.

तसेच, स्वतः रसिक होण्यातील अनेक टप्पे पार करणे हेही महत्वाचे आहे. आपल्यालाच आपल्या चार दिवसांपुर्वीच्या दोन ओळी न आवडणे हे महत्वाचे आहे. आपल्याला एखाद्याची खूप आवडलेली गझल सहा महिन्यांनी सामान्य वाटणे हे महत्वाचे आहे. आपली भूक नवीन विचारांची, नवीन शैलीची आणि नवीन पंचची आहे की नाही हे तपासणे महत्वाचे आहे.
=======================================================

बाकीचे दोन घटक नंतर चर्चेला घेऊयात! वरील बाबींवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Pages