नमस्कार मंडळी,
आताशा मायबोलीवर गझलेला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून आणि नवनवीन लोकांना ह्यात येण्याची आवड लक्षात घेऊन बर्याच विचारांती हा धागा काढावा असे वाटले(श्री. निशिकांत देशपांडे ह्यांच्या एका गझलेवरील प्रतिसादात श्री. भूषण कटककर(बेफिकीर), डॉ. कैलास गायकवाड, श्री. निशिकांत देशपांडे आणि अस्मादिक ह्यांची एक चर्चा झाली तेथे असा धागा गझल विभागात असावा ह्यावर एकमत झाले)
गझलेचे तंत्र, मंत्र, विषय, सूटी ह्याविषयी बरेच समज/गैरसमज सद्या आपल्यातल्या बर्याच लोकांच्या मनात आहेत परंतु ह्या गोष्टींना सप्रमाण सिद्ध्/असिद्ध करू शकतील असे फारच थोडे जाणकार आपल्यात आहेत. ह्या धाग्यांवर अशा सर्व शंकांचा उहापोह झाला तर नवशिक्यांना खूप उपयोगी होईल ते सगळे.
तसेच सद्या प्रकाशित असलेल्या गझलांतील तांत्रीक बाबींवरही ह्या धाग्यावर चर्चा होऊन मतमतांतरे आजमावता येईल.
चला तर मग! गझलेचा काफिला पुढे नेण्यासाठी आपापला खारीचा वाटा उचलायला सज्ज व्हा!!!
वर दिलेल्या दुव्यावरील अअजो
वर दिलेल्या दुव्यावरील अअजो ह्यांची गजल वाचली...मला तरी ती गेय आणि लयबद्ध वाटतेय.
बाकी गजलेबद्दल काही बोलण्याइतपत मला ह्या विषयातले फारसे गम्य नाही.
वरील तुमचे म्हणणे अत्यंत
वरील तुमचे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे.>>>
अजयजी,
असू शकेल...परंतु ते माझे मत आहे. आपणां सर्वांना ज्ञात आहेच की वृत्ताला लय असते आणि लयीचा डायरेक्ट संबंध 'नादा'शी असावा. आणि ती नादनिर्मिती लघु गुरूंच्या एका विशीष्ट काँबीनेशन ने होत असावी असा माझा अंदाज आहे, ह्यात माधव ज्युलियनांवर अथवा छंदोरचनेवर टिका करणे हा उद्देश नाही किंवा तेवढी माझी पात्रताही नाही परंतु,
छंदोरचनेतल्या 'सरसिरूहलोचना' ह्या वृत्ताचे उदाहरण घेऊ(हेच का? ह्याला माझ्याकडे उत्तर नाही, जे दिसले ते अशा बेसिसवर घेतले आहे)
ललललल ललललल ललललल गालगा
आता सलग १५ लघु असलेल्या ह्या वृत्तात गझल रचता येईल काय? किंवा एखाद्याने रचलीच तर ती कितपत सहज वाटेल? मला तरी रचता येणार नाही.
मी मांडलेले मत हे साती ह्यांनी वर विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून होते.
अभ्यासाच्या दृष्टीकोनातून छंदोरचनेला तोड नाही परंतु त्यातल्या बर्याच वृतांचा प्रॅक्टीकली वापर करता येणे प्रचंड जिकीरीचे आणि कृत्रिम होऊ शकते असे मला वाटते.
धन्यवाद!!!
खावर ह्यांच्या
खावर ह्यांच्या गझलांचा/शेरांचा विश्लेषणात्मक उहापोह कुणी करील काय?
कणखर, <<त्यातल्या बहुसंख्य
कणखर,
<<त्यातल्या बहुसंख्य वृत्तांचा गझल/कविता रचण्याच्या दृष्टीने उपयोग शुन्य आहे.>>
आपण लिहिलेले वाक्य असे आहे. ज्यामध्ये कविता असाही उल्लेख आपण केलेला आहेत. म्हणजेच फक्त गझलकरता आपण असे लिहिले नाहीत.
दुसरे म्हणजे मराठी कविता या या वृत्तात कराव्यात यासाठी माधवरावांनी हे पुस्तक लिहिलेले नाही. आपण निरखून पाहिलेत तर यातील अनेक ओळी संस्कृत आहेत. म्हणजेच उपलब्ध असलेली वृत्ते त्यांनी दिलेली आहेत. ज्यमध्ये आधीच कोणीतरी लिहून ठेवले आहे.
छंदोरचना हे मार्गदर्शक आहे. नियमावली नाही किंवा सोल्युशन नाही. त्याच्या आधाराने वृत्त हाताळणी तसेच आखणी सोपी जाते इतकेच.
<<नादनिर्मिती लघु गुरूंच्या एका विशीष्ट काँबीनेशन ने होत असावी>>
हे आपले म्हणणे मलाही पटते. परंतु त्याचा अर्थ मी असा घेतो की कवीच्या मनात असणारी नादनिर्मिती. कदाचित रसिकाला किंवा समीक्षकाला ती रुचणार नाही. मला वाटते की प्रामाणिक प्रयत्न करताना इतरांचा विचार बाजूलाच ठेवावा. लघु-गुरू चे कोणतेही कॉम्बीनेशन जर कवीने निवडले तर ते त्याला निवडू द्यावे. त्यात्या काव्याचे नियम पाळले गेले असतील तर त्याचा जास्त ऊहापोह करू नये असे मला वाटते.
म्हणजेच फक्त गझलकरता आपण असे
म्हणजेच फक्त गझलकरता आपण असे लिहिले नाहीत.>>> सहमत आहे अजयजी...साती ह्यांचा प्रश्न मात्र गझलेशीच निगडीत होता
छंदोरचना हे मार्गदर्शक आहे. नियमावली नाही किंवा सोल्युशन नाही. त्याच्या आधाराने वृत्त हाताळणी तसेच आखणी सोपी जाते इतकेच.>>> अगदी कबूल
दुसरे म्हणजे मराठी कविता या या वृत्तात कराव्यात यासाठी माधवरावांनी हे पुस्तक लिहिलेले नाही>>> बरोबर आहे परंतु छंदोरचना रेफरन्स ला घेणारे सगळे नवीन कवी मात्र तो प्रयत्न करू पाहतात हा स्वानुभव आहे. आणि मग ह्यातून निर्मिती करता न येण्याचे फर्स्ट्रेशन यायची शक्यता नाकारता येत नाही.
त्यात्या काव्याचे नियम पाळले गेले असतील तर त्याचा जास्त ऊहापोह करू नये असे मला वाटते.>>> हेच मी, शरदजी आणि भूषणजी ह्यांनी साती ह्यांना वर काही प्रतिसादांतून सांगीतले आहे.
धन्यवाद!!
कणखर, सहमत. बर्याचवेळा
कणखर,
सहमत.
बर्याचवेळा काहीतरी अवघड करायचे या उद्देशाने अशा वृत्तरचनांचा वापर होवू शकतो. मात्र जर त्या वृत्तातच ओळ सुचली तर पुढे जावे. हे जमणे कठीण. परंतु उत्तम कवीला काय अशक्य?
नवख्या कवीने ल आणि गा जेथे अधुनमधुन असतील अशा वृत्ताचा वापर करावा.
म्हणजे त्याचे भाग असे असतील साधारणपणे....
गालगा, गागालगा, गालगागा, गालगालगा, लगागा इ.
र्हस्व अक्षरे जेथे सलग असतील तेथे कठीण पडते. मात्र एका गुरूचे दोन लघु करायची सवलत असल्याने सलग गुरू असले तरी कठीण जात नाही.
धन्यवाद.
मात्र एका गुरूचे दोन लघु
मात्र एका गुरूचे दोन लघु करायची सवलत असल्याने सलग गुरू असले तरी कठीण जात नाही.>>>> हे दोन लघुंचा एक गुरू असे अजयजींना म्हणायचे असावे. एका गुरूचे दोन लघु करायला परवानगी नाही हे आपणांपैकी बर्याच जणांना ज्ञात असेलच.
नवीन कवींचा गैरसमज होऊ नये म्हणून स्पष्टीकरण देत आहे अजयजी, आगाऊपणा बद्दल क्षमस्व!!!
धन्यवाद!
एका गुरूचे दोन लघु करायला
एका गुरूचे दोन लघु करायला परवानगी नाही हे आपणांपैकी बर्याच जणांना ज्ञात असेलच.>>>
हा मुद्दा लक्षात आला नाही.
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला
यात एका गुरूचे दोन लघु आहेत की?
ललगालगालगागा ह्यांत पहिल्या
ललगालगालगागा ह्यांत पहिल्या दोन लघुंऐवजी एक गुरू घेता येणार नाही असे मला म्हणायचे होते.. शब्दरचनेमुळे दोन्ही ठिकाणी घोळ झाला असावा कदाचित!!
जर वृत्तच 'ललगालगालगा' असे
जर वृत्तच 'ललगालगालगा' असे असले तर करता येणार नाही. पण आनंदकंदमधल्या ' गागालगालगागा' पैकी पहिल्या गा चे 'लल' करतात अनेकदा!
हम्म्म्म्म, तेच म्हणायचे होते
हम्म्म्म्म, तेच म्हणायचे होते की वृत्तच तसे असेल तर......
धन्यवाद
कणखर, एका गुरूचे दोन लघु
कणखर,
एका गुरूचे दोन लघु करायची सवलत असल्याने सलग गुरू असले तरी कठीण जात नाही>>
असेच मी म्हटले होते. याने नवीन कवींचा घोळ व्हायची अजिबात शक्यता नाही.
मात्र आपणच उलटसुलट विधान करून गोंधळ करता आहात.
एका गुरूचे दोन लघु करायला परवानगी नाही हे आपणांपैकी बर्याच जणांना ज्ञात असेलच.<<
हे आपले म्हणणे पूर्णतः चूक आहे.
एका गुरूचे दोन लघु करायला परवानगी आहे.
अनेक गझलांमध्ये आपल्याला असे दिसून येईल.
मात्र, ज्याठिकाणी दोन लघु सलग असतील त्याठिकाणी त्या दोन लघुंचा एक गुरू करण्याची सवलत घेऊ नये.
लयीत म्हणत असताना दोन लघु आणि एक गुरू यांचा उच्चारण्याचा कालावधी सारखाच असतो. तरीही असे केल्याने वृत्त बिघडते.
हम्म्म्म अजयजी, गोंधळ होतो
हम्म्म्म अजयजी, गोंधळ होतो खरा कधी कधी!! पण मग आपल्यासारखे कान धरून शिकविणारे मास्तर असल्याने निश्चिंत व्हायला होते
एका गुरूचे दोन लघु करायला
एका गुरूचे दोन लघु करायला परवानगी आहे. अर्थ बरोबर असला तरी समजून घेताना गोंधळ उडतो, हे खरे आहे. माझा पण गोंधळ उडाला होता.
यापेक्षा
दोन लघुंचा एक गुरू करायला परवानगी आहे. हे वाक्य समजायला जास्त सोपे आहे.
पुन्हा २ विसंगत
पुन्हा २ विसंगत विधाने
<<<मात्र, ज्याठिकाणी दोन लघु सलग असतील त्याठिकाणी त्या दोन लघुंचा एक गुरू करण्याची सवलत घेऊ नये.
लयीत म्हणत असताना दोन लघु आणि एक गुरू यांचा उच्चारण्याचा कालावधी सारखाच असतो. तरीही असे केल्याने वृत्त बिघडते.>>>:अजयजी
<<<यापेक्षा
दोन लघुंचा एक गुरू करायला परवानगी आहे. हे वाक्य समजायला जास्त सोपे आहे.>>>:मुटेजी
मराठी गझल शिकायची इच्छा
मराठी गझल शिकायची इच्छा असलेल्या नवकवींनी स्व. सुरेश भटांव्यतिरीक्त अजून कुठल्या मराठी गझलकारांच्या गझल अभ्यासण्याची गरज आहे?
व्यक्तिपरत्वे मते वेगवेगळी येतील याची कल्पना आहे तरीही सर्व जाणकारांनी आपापली मते द्यावीत ही नम्र विनंती!!
अहो मुटेजी, दोन लघुंचा एक
अहो मुटेजी,
दोन लघुंचा एक गुरू करायला परवानगी आहे. हे वाक्य समजायला जास्त सोपे आहे.
परंतु पूर्णतः चुकीचे आहे.
एका गुरूचे दोन लघु करता येतात. मात्र दोन लघुंचा एक गुरू करता येत नाही सर्रासपणे.
कणखर यांचा प्रश्न, मराठी गझल
कणखर यांचा प्रश्न,
मराठी गझल शिकायची इच्छा असलेल्या नवकवींनी स्व. सुरेश भटांव्यतिरीक्त अजून कुठल्या मराठी गझलकारांच्या गझल अभ्यासण्याची गरज आहे?
माझ्या मते होय.
भटांनी त्यात्या काळाप्रमाणे गझल लिहिली. त्यांच्या अनेक गझलांमध्ये अनावश्यक आक्रमकता दिसते. त्याचप्रमाणे काळानुरूप विषयांची मांडणी बदलत जाते. त्यामुळे सर्वांच्या (म्हणजे जशा उपलब्ध होतील तशा) गझला वाचणे अधिक इष्ट.
अर्थात, महाराष्ट्रात कोठेही गझल म्हटले की सुरेश भटांचेच नाव पुढे येते. कारण त्यांनी मराठी गझलेला तसे योगदान दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरच्या गझला खरेतर वाचाव्यात. म्हणजे हिंदी किंवा उर्दू. कारण इतर भाषिक गझलांमध्ये अजूनही तंत्राची सरमिसळच आहे.
मात्र वेगवेगळ्या गझलकारांच्या गझला वाचाव्यात हे नक्की!
रदीफ पाहिजेच असे नाही असे
रदीफ पाहिजेच असे नाही असे एकजण म्हणाले. मी एक गझल देणार आहे तशी चालते का कोण सांगेल तपासून कुठे द्यायची असते?
रदीफ पाहिजेच असे नाही असे
रदीफ पाहिजेच असे नाही असे एकजण म्हणाले.<<<<
बरोबरच आहे. गैरमुरद्दफ गझल असतेच की..!
अजयजी, आपण सुंदररीत्या मुद्दा
अजयजी,
आपण सुंदररीत्या मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद!!
मला गझलकारांची नावे अपेक्षित होती, असो.
निलय | 29 March, 2011 -
निलय | 29 March, 2011 - 09:12
१) गझलचे दोन प्रकार - अक्षर गण वृत्त आणी मात्रा वृत्त
२) एका गझलेत किमान ५ शेर असावेत आणी नसलेत तर ती गझल अपूर्ण म्हणून स्वःताच्या वहीतच राहू द्यावे आणी प्रदर्शित करण्याची घायी करू नये
३) गझल अक्षर गण वृत्तात बांधणे ही अपेक्षा पण अट्टाहास नको. एका गझलेला गझल म्हणून मान्यता मात्रा वृत्तात बांधली तरी पावते.
४) गझल लिहा हा आग्रह आणी लिहीतांना कोणत्या वृत्तात बांधल्या नाही गेली तरी चालेल पण लिहीत रहा ही कळकळीची विनंती. सरावानेच तंत्र अवगत होत असतात
५) आणी हो! भट साहेबांच्या चरणी माफी मागून ही विनंती करतो की कोणी त्यांची ठेकेदारी घेवू नये. कारण इथे बरेच चांगली आणी सकस गझलकार आहेत. उदा - इलाही जमादार
टिप- भट साहेब आणी मी, दोघेही अमरावतीचेच, त्यामूळे कोणीही प्रांतवादाबद्दल शंका घेवू नये. (आजकाल ही वृत्ती फोफावत चालली आहे)
६) गझलेत शक्यतोवर सांसदीय भाषेचा प्रयोग करावा
७) शेवटचे ! जर कोणाला (गैर) समज असेल की त्याला गझल फारच कळते आणी टीका करण्याचा अधिकार आहे, त्या सर्वांना आर्जवाची विनंती की टीका करण्यापेक्षा मार्गदर्शन करावे. न जाणो, आपल्या पैकी कूणातही भटसाहेबांसारखी प्रतीभा असू शकते ('भटसाहेबांपेक्षा' असे म्हणन्याची माझी हिंमत आणी कूवत नाही)
टीप - काही चूकले असेल तर माफी असावी
निलय | 29 March, 2011 - 11:13
एक गझल लिहायला काय लागतं?
प्रतिभा! प्रतिभा!! प्रतिभा!!!
आणी जे काही लिहितोय ती गझलच आहे हे समजण्या इतपत सामान्यज्ञान!
बाकी सर्व मराठी डॉक्टरेट करायला कामी येतं.
अजून्ही काही उरलेलं कामी येतं गझलेची चिरफाड करण्यासाठी ????????????????
निलय | 30 March, 2011 - 14:50
आदरणिय गंगाधरजी,
सर्व प्रथम सर्वांची माफी मागून लिहिण्याचे धाडस करतोय कारण इथे गैरसमज फार होतो.
तुमच्या मताशी सहमत आहे पण मराठी गझलेचा स्त्रोत फारशी गझलच आहे (माझे सामान्यज्ञाने). मग आपण स्वतःची नियमावली बनवून मराठी गझल मर्यादीत करण्या पेक्षा फारशी गझलेच्या तंत्रालाच हात घालून मराठी गझलेची व्यापकता का वाढवू नये. मराठी गझलेची व्यापकता पूढच्या १०० वर्षांत असे व्हावे की हेच कळू नये की गझल हा प्रकार फारशी भाषेतून मराठीत आला की मराठीतून फारशी भाषेत गेला.
गंगाधर मुटे | 30 March, 2011 - 18:07
निलयजी,
गझल फारशी भाषेतून आली की अरबी भाषेतून, याच्याशी मला फारसे देणेघेणे नाही.
कारण एवढ्या खोलात जाऊन गझल लिहिणे मला तरी अशक्य आहे.
कारण मुळातच गझल हा प्रकार "बाई आणि बाटली" याभोवतीच पिंगा घालत असावा, असे मान्य करण्याइतपत पुरावे आढळतात.
जेव्हा प्रगत समाज थेट चंद्रावर पाऊल ठेवण्याइतपत ज्ञान प्राप्त करत होता आणि थेट चंद्रावर पाऊल ठेवत होता तेव्हा अरबी/फारशी समाजातला हा थोर गझलकार एखाद्या मदिराक्षीचा मुखडा हातात घेऊन
"चंद्र गवसला ..... चंद्र गवसला" म्हणून गझला पाडत होता.
तात्पर्य हेच की गझल अप्रगत समाजात जन्माला आली आणि तिने रसिकांना शिक्षण सुद्धा त्याच तर्हेचे दिले.
म्हणून आपणही तीच री ओढत बसायचे काय?
की नव्या तंत्रज्ञानाकडे, प्रगतीकडे समाज झेपावेल अशा तर्हेने गझलेला घडवायचे????
किमान एवढातरी विचार मला एक गझलकार म्हणून पडतोच.
बेफिकीर | 31 March, 2011 - 10:26 नवीन
श्री गंगाधर मुटे,
आपला वरील प्रतिसाद 'कणखर' यांनी सुरू केलेल्या 'गझल चर्चा' या धाग्यावर अधिक महत्वाचा ठरला असता असे वाटते.
(अवांतर - उर्दू / फारसी शायरी म्हणजे फक्त गझल असे नसावे. त्यात नझ्म, रुबाया, वासोख्त, मर्सिये वगैरे इतरही काही प्रकार असावेत. पण विषय गझलेचा आहे तर 'गझल हा प्रकार बाई बाटली भोवती पिंगा घालतो' या मतावर एक दिलचस्प चर्चा अशीही घडू शकेल की मराठी काव्य व परभाषिक 'किंवा विशेषतः उर्दू' काव्य यांच्यातील क्वालिटेटिव्ह तुलना करता येईल का? पण तो 'उर्दू व्हर्सेस मराठी' हा विषय कणखर यांच्या धाग्यावरील विषय ठरू शकणार नाही. मात्र ' गझल म्हणजे बाई बाटली भोवती पिंगा' हा विषय त्यांच्या धाग्यावर नक्कीच येऊ शकावा. म्हणून या प्रतिसादाद्वारे मी कणखर यांना अशी विनंती करतो की तुमचा प्रतिसाद तेथे कॉपी पेस्ट करावात व तेथे अधिक चर्चा घडवून आणावी. ह बा यांच्या या रचनेवरील चर्चा पुढे अनेक विषयांवर गेली व अश्या चर्चेसाठी धागे उपलब्ध असतानाही गेली.)
चुभुद्याघ्या
-'बेफिकीर'!
(अती अवांतर - प्रगत संस्कृतीची गझल कशी असावी याचे काही ढोबळ निकषही त्या चर्चेत निघतात का बघुयात. त्यातही मग पुण्यापेक्षा मुंबई प्रगत, सातार्यापेक्षा पुणे प्रगत, खटाव पेक्षा सातारा प्रगत आणि नेमाडेवस्तीपेक्षा खटाव प्रगत असेही घटक कदाचित निघू शकतील.)
(अती अती अवांतर - गझल हा 'प्रामुख्याने' पुरुषानेच रचण्याचा / रचलेला काव्यप्रकार आहे का / असावा का यावरही चर्चा तेथे होऊ शकेल. तसेही ते पान 'वाहते पान' नाहीच आहे. कारण तो विषय 'विरंगुळ्याचा' नसावा हे अॅडमीनला माहीत असावे. हा 'पुरुषानेच रचण्याचा' विषय काढण्याचे कारण प्रामुख्याने असे आहे की स्त्री गझलकारा सहसा बाई आणि बाटली भोवती पिंगा घालणार नाही. अर्थात, पुरुष गझलकार समलिंगी संभोगी होते व ते त्या संस्कृतीत मान्य होते हे स्पष्ट आहे. मात्र तीच सवलत संस्कृतीने स्त्रियांना दिलेली होती की नव्हती हे स्पष्ट नाही. काही स्त्रिया स्वतःहून तशी सवलत घेत असतील तर गोष्ट वेगळी! पण तसे नसल्यास स्त्री गझलकारांची गझल पुरुष आणि स्वयंपाक वगैरेभोवती पिंगा घालते का हेही चर्चिले जाईलच.)
(प्रचंड अवांतर - गझलेने रसिकांना काही शिक्षण दिले किंवा नाही याचीही चर्चा होऊ शकेल.)
(पूर्ण अवांतर - तांत्रिक प्रगतीकडे झेपावणारी गझल कशी असावी याची उदाहरणेही तेथे काहीशी स्पष्ट करता येऊ शकतील.)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने सांगोपांग चर्चा व्हावी अशी सर्व गझलकार, गझलेचे इतर जाणकार आणि गझलरसिकांना नम्र विनंती
धन्यवाद!!
कणखरराव धन्यवाद, मी काही
कणखरराव धन्यवाद,
मी काही वेळानंतर लिहितो.
श्री. विशाल कुलकर्णी ह्यांचे
श्री. विशाल कुलकर्णी ह्यांचे एक मत
--------------------------------------
विशाल कुलकर्णी | 31 March, 2011 - 12:19 नवीन
<<कारण मुळातच गझल हा प्रकार "बाई आणि बाटली" याभोवतीच पिंगा घालत असावा, असे मान्य करण्याइतपत पुरावे आढळतात. >>>
माफ करा पण हे विधान मला थोडेसे अवास्तव वाटतेय. फारशी किंवा अरबी गझलकारांच्या (तत्कालीन) बाबतीत हे सत्य असु शकेल कदाचित पण म्हणून सरसकट गझलांना किंवा गझलकारांना त्या पंक्तीत बसवता येणार नाही. अगदी 'जफर'पासून ते रघुपति सहाय, डॉ. इकबाल, मीर, साहीर यांच्या गझला काही वेगळेच सांगतात. या क्षेत्रातला माझा अभ्यास अगदीच तोकडा आहे. पण जाणकार काय ते सांगतीलच
----------------------------------------
विशालराव, आपला मजकूर ह. बा. च्या गझलेवरील प्रतिसादातून उचलण्याचा उद्देश, ती चर्चा इथे व्हावी हा आहे. आगाऊपणाबद्दल क्षमस्व!!
वरील प्रतिसादांबाबत माझी नम्र
वरील प्रतिसादांबाबत माझी नम्र मते येथे लिहीत आहे. चर्चा व्हावी.
=====================================================
१) गझलचे दोन प्रकार - अक्षर गण वृत्त आणी मात्रा वृत्त>>>>
हे गझल ज्या वृत्तांमध्ये लिहीली जाते त्यांचे दोन प्रकार आहेत. गझलेचे नव्हेत. गझलेचे गैरमुरद्दफ, रदीफ असलेली, रिवायती (पारंपारिक) , जदीद (आधुनिक) असे प्रकार मानले जात असावेत.
२) एका गझलेत किमान ५ शेर असावेत आणी नसलेत तर ती गझल अपूर्ण म्हणून स्वःताच्या वहीतच राहू द्यावे आणी प्रदर्शित करण्याची घायी करू नये>>>
किमान पाच शेर असा संकेत आहे असे वाटते.
३) गझल अक्षर गण वृत्तात बांधणे ही अपेक्षा पण अट्टाहास नको. एका गझलेला गझल म्हणून मान्यता मात्रा वृत्तात बांधली तरी पावते.>>> सहमत आहे. तसेही, ओळ सुचते तशीच गझल रचली जाते असा एक अनुभवही!
४) गझल लिहा हा आग्रह आणी लिहीतांना कोणत्या वृत्तात बांधल्या नाही गेली तरी चालेल पण लिहीत रहा ही कळकळीची विनंती. सरावानेच तंत्र अवगत होत असतात>>>
सरावानेच तंत्र अवगत होतात याच्याशी सहमत! वृत्तात काही गफलती होणे हे सुरुवातील होतेच असे वाटते. मात्र अजिबातच वृत्ताचा गंध नाही असे नसावे असे वाटते.
५) आणी हो! भट साहेबांच्या चरणी माफी मागून ही विनंती करतो की कोणी त्यांची ठेकेदारी घेवू नये. कारण इथे बरेच चांगली आणी सकस गझलकार आहेत. उदा - इलाही जमादार>>>
भटसाहेबांची ठेकेदारी म्हणजे काय हे लक्षात आले नाही. तसेच 'ती ठेकेदारी न घेण्याचे कारण येथे इलाहींसारखे गझलकार आहेत' हे वाक्यही समजले नाही.
टिप- भट साहेब आणी मी, दोघेही अमरावतीचेच, त्यामूळे कोणीही प्रांतवादाबद्दल शंका घेवू नये. (आजकाल ही वृत्ती फोफावत चालली आहे)>>>
हे गझलेशी संबंधीत मत असेल असे वाटत नाही. त्यामुळे त्याबाबत मौन बरे!
६) गझलेत शक्यतोवर सांसदीय भाषेचा प्रयोग करावा>>>
सहमत आहे.
७) शेवटचे ! जर कोणाला (गैर) समज असेल की त्याला गझल फारच कळते आणी टीका करण्याचा अधिकार आहे, त्या सर्वांना आर्जवाची विनंती की टीका करण्यापेक्षा मार्गदर्शन करावे. न जाणो, आपल्या पैकी कूणातही भटसाहेबांसारखी प्रतीभा असू शकते ('भटसाहेबांपेक्षा' असे म्हणन्याची माझी हिंमत आणी कूवत नाही)>>>
आपण मराठी गझल या क्षेत्रात काय काम केले आहेत ते कृपया माहीत करून द्यावेत. 'केलेच नाही आहेत किंवा केले नसून कसे काय बोलता' असे हा प्रश्न विचारण्यातील हेतू नसून वरील वरील विधान आपण कुणाला उद्देशून, का आणि कोणत्या अनुभवावर करत आहात ते समजून घ्यायची इच्छा आहे. समांतररीत्या, भटसाहेबांची प्रतिभा दर्शवणारे काही शेरही उदाहरणादाखल दिल्यास चर्चा अधिक स्पष्ट होईल असे वाटते. (यात 'त्यांच्याकडे प्रतिभा नव्हती' असे उद्दाम वाक्य मला म्हणायचे आहे असा विचार मनी आणू नये अशी विनंती!)
टीप - काही चूकले असेल तर माफी असावी>>> माझेही या प्रतिसादात काही चुकले असेल तर माफी असावी.
श्री गंगाधर मुटे यांच्या प्रतिसादाबाबतचे मत पुढील प्रतिसादात द्यायचा प्रयत्न करतो.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
निलय | 29 March, 2011 -
निलय | 29 March, 2011 - 11:13
एक गझल लिहायला काय लागतं?>>> अनेक गोष्टी लागत असाव्यात असे मला वाटते.
प्रतिभा! प्रतिभा!! प्रतिभा!!!>>> हा अत्यंत महत्वाचा घटक असावा असे वाटते. पण याशिवाय कारागिरीलाही महत्व आहेच असेही वाटते.
आणी जे काही लिहितोय ती गझलच आहे हे समजण्या इतपत सामान्यज्ञान!>>>
सहमत आहे.
बाकी सर्व मराठी डॉक्टरेट करायला कामी येतं.>>>
यातील बाकी सर्व म्हणजे काय ते लक्षात आले नाही.
अजून्ही काही उरलेलं कामी येतं गझलेची चिरफाड करण्यासाठी ????????????????>>>>
गझलेची चिरफाड होणे अत्यावश्यक आहे असे वाटते. याच फोरमवर अनेक गझला आहेत. स्वतःला स्वतःच्या गझलेतील चुका / दोष ./ कमतरता समजत नसतीलही, पण दुसर्याला समजतात. जसे, माझ्या एका गझलेत एक बांगडिचा शेर होता जो मला योग्य वाटला पण अनेकांना संदिग्ध व त्यामुळेच सामान्यही वाटला. अशी चिरफाड होणे आवश्यक आहे असे मला वाटते.
===========================================================
निलय | 30 March, 2011 - 14:50
आदरणिय गंगाधरजी,
सर्व प्रथम सर्वांची माफी मागून लिहिण्याचे धाडस करतोय कारण इथे गैरसमज फार होतो.
तुमच्या मताशी सहमत आहे पण मराठी गझलेचा स्त्रोत फारशी गझलच आहे (माझे सामान्यज्ञाने). मग आपण स्वतःची नियमावली बनवून मराठी गझल मर्यादीत करण्या पेक्षा फारशी गझलेच्या तंत्रालाच हात घालून मराठी गझलेची व्यापकता का वाढवू नये. मराठी गझलेची व्यापकता पूढच्या १०० वर्षांत असे व्हावे की हेच कळू नये की गझल हा प्रकार फारशी भाषेतून मराठीत आला की मराठीतून फारशी भाषेत गेला.>>>>
मराठी गझलेने त्याच (फार्सी / उर्दू) गझलेचे तंत्र स्वीकारलेले आहे. मराठीने काहीही वेगळे केलेले नाही. इतकाच फरक आहे की त्या भाषांमध्ये उच्चारानुसार मात्रा 'गृहीत' धरतात तसे आपण 'अजून' करत नाही. मराठी गझलेचि व्यापकता किती वाढावी याबाबत आपण नोंदवलेले मत मला अनावश्यक वाटले. गझल कोणत्याही भाषेतून कोणत्याही भाषेत गेलेली असो, ती चांगली असायला हवी असे मला वाटते.
सुंदर उहापोह भूषणजी, श्री.
सुंदर उहापोह भूषणजी,
श्री. निलय यांनी स्वतःची स्पष्ट ओळख करून दिली तर आपणा सर्वांना एक सवंगडी मिळाल्याचा आनंद होईल असे मलाही वाटते.
त्यांच्या मतप्रदर्शनावरून त्यांना गझलेविषयी खूप कळकळ आहे हे दिसून येतेच आहे परंतु त्यांना काही लोकांचे(गझलकारांचे/जाणकारांचे) विचार पटत नाहीत असे दिसतेय. कुणाचे हे त्यांनी स्पष्ट केले तर त्या त्या व्यक्तिला आपले मत आधिक स्पष्टपणे निलय ह्यांना सांगता येईल.
जनरल स्टेटमेंट्स करणे टाळता आले तर सर्वांनीच टाळावे ही विनंती.
गझल बाई आणि बाटली भोवतीच
गझल बाई आणि बाटली भोवतीच घोटाळते आहे ह्या मुटेजींच्या मताशी मी व्यक्तीशः असहमत आहे.
रिवायती गझल त्या काळात ह्या दोन विषयात आधिक गुंतली होती हे खरे आहे परंतु त्यानंतर तरक्कीपसंद(सुधारणावादी) आणि जदीद असे प्रकार हे उर्दू गझलेत कधीचेच निर्माण झाले आहेत.
विशेषकरून इकबाल, फिराक आणि जोश या शायरांनी तरक्कीपसंद गझलच आधिक प्रमाणात हाताळली आहे असे मला वाटते.
गझलेचा प्रत्येक शेर हा स्वतःशी रिलेटेड असावा असे मत वाचले आहे. असे मानायचे झाल्यास, माणसाला स्वतःस अनुभवायला मिळणार्या गोष्टींभोवतीच गझल फिरत रहाणार असे वाटते शिवाय ते गझलेवर मर्यादा आणणारे होईल असे मला वाटत नाही कारण मानवी आयुष्यातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर्/अनुभूतींवर प्रभावी शेर रचले जाण्याची कित्येक उदाहरणे आपण मराठी गझलेतही पाहतो. कालानुरूप गझल मांडण्याची पद्धत बदलत जाईल परंतु गझलेतून हे विषय कायमचे हद्दपार होणे निव्वळ अशक्य आहे असे मला स्वतःला वाटते.
धन्यवाद!!
गंगाधर मुटे | 30 March, 2011
गंगाधर मुटे | 30 March, 2011 - 18:07
निलयजी,
गझल फारशी भाषेतून आली की अरबी भाषेतून, याच्याशी मला फारसे देणेघेणे नाही.>>>>>
सहमत आहे. मराठीत 'गझलचे तंत्र काय असते' यावर लेख उपलब्ध असल्यानंतर तिची मूळ भाषा काय याचा संबंध उरत नाही. आपण आपल्या भाषेत त्या तंत्रात गझल रचू शकतो.
कारण एवढ्या खोलात जाऊन गझल लिहिणे मला तरी अशक्य आहे.>>>>
त्या भाषांचा / गझलांचा अभ्यास हे 'मराठी गझल लिहिण्यासाठी खोलात जाणे' आहे असे मला वाटत नाही.
कारण मुळातच गझल हा प्रकार "बाई आणि बाटली" याभोवतीच पिंगा घालत असावा, असे मान्य करण्याइतपत पुरावे आढळतात.>>>>
या विधानाशी मी असहमत आहे. तसेच ज्या स्वस्त पद्धतीने आपण 'बाई आणि बाटली' हे उल्लेख केलेले आहेत तितक्या स्वस्त पद्धतीने ते उल्लेख गझलेत नसतात. आपल्याला त्या भाषेमधील गझला आवडायलाच हव्यात असा आग्रह कुणीच धरू शकणार नाही. पण आपले हे वरील मत (माफ करावेत ) पण पुरेशा माहितीतून आले आहे असे मला वाटत नाही. शेकडो उदाहरणे अशी देता येतील की ते शेर आपल्या संतकाव्याच्या तोडीस तोड आहेत. किंबहुना खूप सोप्या पद्धतीने त्या काव्यापेक्षा 'काही वेळा' श्रेष्ठही! आपले हे मत वाचून मला सर्वश्री बशर नवाझ साहेबांचा 'मीर-ओ- मिर्झा की जुबां जाननेवाले कितने' हा मिसरा आठवला.
जेव्हा प्रगत समाज थेट चंद्रावर पाऊल ठेवण्याइतपत ज्ञान प्राप्त करत होता आणि थेट चंद्रावर पाऊल ठेवत होता तेव्हा अरबी/फारशी समाजातला हा थोर गझलकार एखाद्या मदिराक्षीचा मुखडा हातात घेऊन
"चंद्र गवसला ..... चंद्र गवसला" म्हणून गझला पाडत होता.>>>.
माझ्यामते नील आर्मस्ट्राँगने विसाव्या शतकात चंद्रावर पाऊल ठेवले असावे व ते लक्षात घेता चंद्रावर पाऊल ठेवण्याचा अभ्यासही त्याच शतकात चालू झाला असावा. इसविसन ६२७ पासून गझलतंत्रातील काव्य अस्तित्वात आहे व भारत देशात इसविसन १२००, इसविसन १५०० आणि प्रामुख्याने इसवीसन १७२३ पासून ते जोरकसरीत्या अस्तित्वात आहे. आपण ज्याला 'गझला पाडणे' म्हणता त्या पाडलेल्या गझला विश्वभरात डोक्यावर घेतल्या गेलेल्या आहेत व त्याही सुसंस्कृत व उच्च अभिरुचिच्या समुदायाकडून! याचे कारण त्यांचा आशय! नुसतेच 'बाई - बाटली' केले असते तर आपल्याकडील लावणी (बाई या घटकासाठी, बाटली नव्हे) व दादा कोंडके हे कोणत्याही उर्दू गझलेपेक्षा श्रेष्ठ ठरले असते. (अर्थात, काही लावण्या चांगल्या आहेतही ). गझल निदान 'पाडावी' तरी लागते. मुक्तछंद मिर्झा सौदा यांनी खुद्द दिल्लीच्या बादशहाला तोंडावर सांगितल्याप्रमाणे संडासला बसल्यावर दहा मिनिटात सहा कविता या रेटनेही निर्माण करता येतो. प्रेयसीच्या मुखड्याला चंद्राची, त्यातही मराठमोळ्या कवींप्रमाणे पोर्णिमेच्या नव्हे तर 'वाढत्या सौंदर्याचा ' म्हणून चौदहवीच्या चंद्राची उपमा देणे हे प्रत्यक्षात चंद्रावर पाऊल ठेवण्यापेक्षा काव्यात्म आहे व तोच गझलेचा आत्मा आहे. समाज किती प्रगत आहे हेही उर्दू गझलेत व मराठी गझलेतही वारंवार दिसते.
तात्पर्य हेच की गझल अप्रगत समाजात जन्माला आली आणि तिने रसिकांना शिक्षण सुद्धा त्याच तर्हेचे दिले.>>>
प्रत्येक येणार्या क्षणाला समाज गेल्या क्षणापेक्षा अधिक प्रगत बनत असतो. आजच्या तुलनेत मिर्झा गालिब यांचा समाज अप्रगत होता. मात्र गझलच्या माध्यमातून ते दोनशे वर्षे पुढच्या समाजावर भाष्य करत होते. (असे समीक्षक म्हणतात, मला स्वतःला तेवढे समजत नाही.) श्री गंगाधर मुटे, एक महत्वाची गोष्ट मी शिकलो ती ही की गझलेमध्ये जीवनातील अत्यंत फंडामेंटल बाबींवर भाष्य अधिकतर केले जाते. त्यामुळे गझलमधील आशय सार्वकालीन होऊ शकतो. आजही प्रेम, विरह, अबोला, रुसवा, ताटातूट, एकतर्फी प्रेम, दारू, जीवनातील अपयश, सुखदु:खे, एकाकीपणा, जीवन हा एक प्रवास आहे असे वाटणे, मृत्यूचे अस्तित्व जाणवत राहणे या बाबी जीवनात आहेतच. केवळ आपण एसेमेस करू शकतो किंवा इन्टरनेटवर कुणाशीही संपर्कात राहू शकतो याचा अर्थ असा नाही की त्या बाबी नष्ट झाल्या. तेव्हा गझलेला कालबद्ध करणे योग्य होणार नाहि असे मला वाटते.
म्हणून आपणही तीच री ओढत बसायचे काय?>>>
यात 'री' ओढण्याचा प्रश्न येणार नाही. एखादा माणूस बाई बाटली यात गुंतलेला नसेल तर त्याला गझल रचायला लक्षावधी मुद्दे उरतात. त्याचे स्वतःचे जीवन हेच एक मोठे पोटेन्शिअल प्रोव्हायडर असते. आपल्या या विधानाचा अर्थ असा होतो की आज जे गझल रचत आहेत ते 'माणूस चंद्रावर पोचलेला असूनही आवडत्या स्त्रीच्या चेहर्याला चंद्र म्हणण्यातच धन्यता मानत आहेत किंवा बाई बाटली यांच्या मागे आहेत' प्रत्यक्षात तसे नाही हे आपल्याला अनेकांच्या गझलांवरून आढळावे. इतकेच काय तर क्रान्ती या गझलाकारा उत्तम गझल रचतात व त्या स्त्री गझलकारा आहेत. त्यामुळे आपले मत डळमळीत होते. .
की नव्या तंत्रज्ञानाकडे, प्रगतीकडे समाज झेपावेल अशा तर्हेने गझलेला घडवायचे????>>>
उदाहरणादाखल आपल्या 'आजवरच्या' (नवीन न रचता) गझलांमधील शेर कृपया द्यावेत.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
(आपण 'गझल परिचय' या लेखावर तो प्रतिसाद दिलात, पण सर्वांचे असे ठरलेले आहे की अशि चर्चा या धाग्यावर करायची, म्हणून मी येथे प्रतिसाद देत आहे.)
चर्चा चालू द्यावी, वाचतो आहे.
चर्चा चालू द्यावी, वाचतो आहे.
(त्या धाग्यावरचा प्रतिसाद संपादित करतोय.)
Pages