ड्युआयड्यांची व्यवच्छेदक लक्षणे आणि मीमांसा

Submitted by मामी on 2 February, 2011 - 13:03

जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपले
तोची ड्युआय ओळखावा
भाव तेथेची जाणावा ||

वरील पंक्तीत वर्णन केल्याप्रमाणे अनेक ड्युआयडी सांप्रतकाळी मायबोलीवर कार्यरत आहेत.

अवचिता परिमळू
ड्युआयड्यांचा सुकाळू
मी म्हणे गोपाळू
झाला गे माये ||

कोणा ओरीजिनल कर्त्याकरवित्याच्या हातात या ड्युंच्या दोर्‍या पक्षी पासवर्ड असल्याने ते नाचवतील तेथे जाऊन हवा तसा प्रतिसाद देणे हेच ड्युंचे जिवीतकार्य.

तुच घडवीशी तुच मोडीशी
कार्य करवीशी तू, तूच मारीशी
हित तुझे तू यात साधिशी
मुखी कुणाच्या देशी लोणी
कुणा मुखी अंगार ||

ड्युआयड्यांचा जन्मच याकरता झालेला असतो. किंबहुना,

बिना हेतुने जे उले त्याले ड्युआय म्हनू नही
प्रतिसादाइना बोले त्याले ड्युआय म्हनू नही

पण या सर्व ड्युंची एक ठराविक लक्षणे असतात. ती चाणाक्ष वाचकांच्या सहज लक्षात येतात. ती लक्षणे खालीलप्रमाणे :

१. ड्युंचे सर्वांत महत्वाचे लक्षण म्हणजे त्यांचे वय. हे ड्यु माबोवर ताजे ताजे जन्माला येतात आणि येताच तडक नेमक्या बाफावर जाऊन नेमकी प्रतिक्रीया देतात.

उडाला उडाला ड्युआय तो उडाला
अधलेमधले ओलांडुनी नेमक्याशी गेला
नेमक्याशी जाऊनी प्रतिसाद दिला
नमस्कार माझा त्या ड्युआयडीला

याचाच एक फायनर-पॉईंट म्हणजे अशा ड्युआयडींचं वय त्यांच्या जन्मदात्यांपेक्षा लहान किंवा फार्फार तर बरोबरीचं असतं.

२. ड्युआयडींना विधिवत जन्माला घालणारे, पुढे डीएनए चाचणीत आपले स्वत:चे पालकत्च सिध्द होऊ नये म्हणून त्यांना वेगळं व्यक्तीमत्त्व बहाल करण्याचा खटाटोप करतात. यात भाषेकडे विशेष लक्ष पुरवले जातच पण त्याचबरोबर अवतरण चिन्हे वगळणे, लिखाणात मुद्दाम शुध्दलेखनाच्या चुका करणे, थोडक्यात प्रतिक्रीया देणे असे प्रकार असतात. पण होतं काय की नेमक्या याच प्रयत्नांमुळे असे ड्युआयडी ठळकपणे उठून दिसतात.

ड्युआय डोंगा परि, मेंबर नाही डोंगा
काय भुललासी वरलीया अंगा ||

३.एकदा का संशय आला तर ड्युआयड्यांच्या पावलांचे ठसे अभ्यासावेत. ते आपल्याला नेमक्या गुहेकडे घेऊन जातात. कारण ड्यु काही ठराविक व्यक्तींच्या बाफांनाच भेट देतात. अनुकुल प्रतिसाद देणारे आपल्या जन्मदात्याच्या बाफावर रेंगाळतात तर प्रतिकूल प्रतिसादाकरता जन्माला घातलेले शत्रुपक्षात घुसलेले दिसतात. जुन्या-जाणत्या मेंब्रांना ह्या खुणा चटकन ओळखता येतात. ड्युआयडींच्या पाऊलखुणाचा मागोवा ही जरा कष्टसाध्य आणि तपस्येनंतर प्राप्त होणारी गोष्ट आहे.

तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे |

४. जसे बाटगे जास्त कट्टर असतात तसे हे ड्युआय (विशेषतः अनुकूल प्रतिसादवाले) जन्मदात्याची अफाट स्तुती करतात. ही खरंतर आत्मस्तुती असते.

मन ड्युले मेरा तन ड्युले मेरे दिल का गया करार रे
जोर से बजाये बासुरीया ||

तर शिव्याशाप देणारे ड्यु, मनातील मळमळ पूर्णपणे बाहेर काढतात.

सोड झणी वाग्बाणा, चला जोरात हाणा
ठोक हा बाफ रे ड्युआयड्या ||

५. काही असतात हेरगिरी करणारे ड्यु. हे मुद्दाम शत्रुपक्षात मित्र म्हणून घुसतात आणि जमेल तसे नेम धरून वार करतात.

सत्रांदा उड्डाणे मित्रांच्या सदनी
करी डळमळ मित्रमंडळ, वंगाळ बोलूनी |

६. काही ड्यु मिश्किल असतात. आपल्याच नेहमीच्या दोस्तांना वेगळ्या रुपात भेटून ते मजा करतात. अर्थात दोस्त लोकही ओरिजनल डॉक्युमेंटचा अभ्यास केलेले असल्याने अशा ड्युंचे पितळ लवकरच उघडे पडते.

You can cheat some people all the time
You can cheat all people some time ...but
You cannot cheat all people all time!

७. ड्युआयडी बरेचदा थोड्याच काळाकरता येतात. धुमकेतूसारखे उगवतात आणि अचानकच मावळतातही.

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती
बाफांसी टाकिली मागे, गतीसी तुळणा नसे

८. जर एखादा कोणी बरेच आयडी मॅनेज करत असेल तर पासवर्डच काय पण सदस्यनाव देखिल लक्षात ठेवणे, त्या आयडीची लिहिण्याची पध्दत लक्षात ठेवणे आणि वर याची आपल्या स्वत्:च्या आयडीशी गल्लत होऊ न देणे ..... हे सगळं वाटतं तसं सोपं नाही.

कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे माजोरी
जन्मभरीच्या श्वासाइतुके आठवले कळीनाम* (कळीनाम=पासवर्ड)
फुक्कट वाढले काम, देवा माझे फुक्कट वाढले काम!

९. अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादाशिवाय आणखी एक अतिशय खुबीचे कार्य ड्यु करतात. बाफ वर आणण्याचे. लोकांनी दिलेल्या सग्गळ्या सग्गळ्या प्रतिसादांना धन्यवाद देऊन झाल्यानंतर तिसर्‍या-चौथ्या पानावर गेलेला बाफ वर कसा आणणार? तर ड्युआयकरवी प्रतिसाद देऊन.

तुच माय बाप बंधु तुच प्राणसखा
खाली गेलेल्या बाफाचा तर, तुच पाठीराखा

१०. कधी कधी चर्चेला/कथेला वेगळे किंवा मनाजोगते वळण ड्युआय देऊ शकतात. अशा परिस्थितीत केवळ लोकाग्रहास्तव ही कथा असे असे वळण घेत आहे असे म्हणता येते.

अग अग म्हशी अन मला कुठे नेशी |

तर हे असे ड्युआय्डी. कोणी घेतात, कोणी बरे-वाईटपणे वापरतात तर कोणी ओळखतात.

तुम्हा तो ड्युआय सुखकर हो!!!

त.टी. : इथे कोणीतरी खराच 'डुआय' आहे त्यांना ड्युली आणि सन्मानपूर्वक वगळण्यात यावे. 'डुआय' सॉरी हं.

गुलमोहर: 

लेख आज वाचला. लेखातील काव्ये अगदी चपखल. खूप मनोरंजन झाले. काय मार्मिक वर्णन केलंय तुम्ही! लाजवाब लेख.
अवांतर : हेही वाचले नसेल तर वाचून पहा :
संस्थान ड्युआयडी
http://www.maayboli.com/node/36639

''ड्युआयड्यांचे आठवावे रूप, ड्युआयड्यांचा आठवावा प्रताप''
''इस लिंग बदलती दुनिया में, ड्युआयडियों की नियत ठीक नही
बकबक ना करो तुम बाफोंपर, अ‍ॅडमिन की भी नियत ठीक नही'

मामी,महान प्रतिभा!!
शि.सा. न.
आरती प्रभू ही तशी चिं.त्र्यं. खानोलकरांची लिंगबदलू ड्यु आय च की. :)) शिवाय लोकमान्य.

@ भारती बिर्जे
तै,
हितं कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम वाली तुमची पहिली पर्तीक्रिया!
हबिणंडण!

जबरदस्त... Lol
हे इतक छान राहुन कसं गेलं वाचायच..

भरमसाठ ड्युआय असणा-या गुहेचाही एक नियम असतो.
वास्तुपुरूषापेक्षा ड्युआयडी कधीही शहाणा असू शकत नाही.

मलाही दोन चार ड्युआयडी बनवायचे आहेत. कोणी अनुभवी मार्गदर्शन केरेल काय ? एक ड्युआयडी त्यांना मोबदला म्हणून देईन.

ड्युआयडी बनवणे हे आपण स्वतः जन्माला येण्याइतकेच नैसर्गिक काम आहे. ते शिकवावे लागत नाही. मी ज्यांना शिकवले त्यांचे ड्युआयडी माझाच चावा घेऊन गेले. तेव्हांपासून ते काम बंद केले. म्हणतात ना गरज सरो आणि शिक्षक मरो. तुम्हाला ड्युआयडी का बनवायचा आहे हे कळवा.
ड्युआयडी ओरिजिनलपेक्षा बुद्धीमान असेल आणि ओरीजिनल झोपल्यानंतरही माबोवावरामधे पारंगत असेल तर असा ड्युआयडी मलाही हवा आहे.
नाहीतर कथेवर "काय लिहीता तुम्ही " असे प्रतिसाद देणारे सर्वच ड्युआयडी मालक झोपला की झोपतात. असे काय कामाचे ?

मलाही दोन चार ड्युआयडी बनवायचे आहेत. कोणी अनुभवी मार्गदर्शन केरेल काय ? >>>
तुम्ही योग्य ट्रॅक वर आहात. आपला कधीच कुठला ड्युआयडी नव्हता, ती कल्पनाही आपण केली नाही असे भासवणे ड्यूआयीडी मालकांचे आद्य कर्तव्य असते. ती स्टेप तुम्ही पार पाडलीत.

आता दोन चार विचित्र ईमेल आयडीज बनवा, जे कुणाला कळले तरी आपल्यावर संशय येणार नाही.
उदा. rekhaamitabh1857@gmail.com
किंबहुना अजून कुणावर संशय यावा असे वाटत असेल तर तसा ईमेल आयडी बनवा. उदा. ManavEarth1760@rediffmail.com.

तो ईमेल आयडी वापरून माबोवर नवीन सदयत्व घ्या.
आपण ज्या टाइमझोन मध्ये रहातो त्या अथवा त्या जवळपास (+/- २ तास) टाइम झोन मधले वास्तव्य दाखवा. नाही तर आपण नेहमी रात्री अपरात्री कसा काय प्रतिसाद देतो अशी लोकांना शंका येते.

आणि हो, माझ्या प्रतिसादावर "मानव काहीही हं, मी गंमत करत होतो, मी कुठे खरंच ड्युआयडी काढणार आहे? तेथे पाहिजे जातीचे." अशी काही प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

"मानव काहीही हं, मी गंमत करत होतो, मी कुठे खरंच ड्युआयडी काढणार आहे? तेथे पाहिजे जातीचे."
काय लिहीता तुम्ही!!

मूळ आयडीचे नाव दानव परग्रहवासी ठेवा . ड्युआयड्यांची नावे प्रभूदेसाई, यक्षदेसाई, परदेसाई, आंबेदेसाई अशी ठेवा Wink

काय लिहीता तुम्ही!!!!!
--------परग्रहवासी तेरेदेसाई , ठाकूरदेसाई ,अधिकारीदेसाई,सरदेसाई इत्यादी समस्त देसाई मंडळ

उडाला उडाला ड्युआय तो उडाला
अधलेमधले ओलांडुनी नेमक्याशी गेला
नेमक्याशी जाऊनी प्रतिसाद दिला
नमस्कार माझा त्या ड्युआयडीला >>>> Lol

Pages