ड्युआयड्यांची व्यवच्छेदक लक्षणे आणि मीमांसा

Submitted by मामी on 2 February, 2011 - 13:03

जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपले
तोची ड्युआय ओळखावा
भाव तेथेची जाणावा ||

वरील पंक्तीत वर्णन केल्याप्रमाणे अनेक ड्युआयडी सांप्रतकाळी मायबोलीवर कार्यरत आहेत.

अवचिता परिमळू
ड्युआयड्यांचा सुकाळू
मी म्हणे गोपाळू
झाला गे माये ||

कोणा ओरीजिनल कर्त्याकरवित्याच्या हातात या ड्युंच्या दोर्‍या पक्षी पासवर्ड असल्याने ते नाचवतील तेथे जाऊन हवा तसा प्रतिसाद देणे हेच ड्युंचे जिवीतकार्य.

तुच घडवीशी तुच मोडीशी
कार्य करवीशी तू, तूच मारीशी
हित तुझे तू यात साधिशी
मुखी कुणाच्या देशी लोणी
कुणा मुखी अंगार ||

ड्युआयड्यांचा जन्मच याकरता झालेला असतो. किंबहुना,

बिना हेतुने जे उले त्याले ड्युआय म्हनू नही
प्रतिसादाइना बोले त्याले ड्युआय म्हनू नही

पण या सर्व ड्युंची एक ठराविक लक्षणे असतात. ती चाणाक्ष वाचकांच्या सहज लक्षात येतात. ती लक्षणे खालीलप्रमाणे :

१. ड्युंचे सर्वांत महत्वाचे लक्षण म्हणजे त्यांचे वय. हे ड्यु माबोवर ताजे ताजे जन्माला येतात आणि येताच तडक नेमक्या बाफावर जाऊन नेमकी प्रतिक्रीया देतात.

उडाला उडाला ड्युआय तो उडाला
अधलेमधले ओलांडुनी नेमक्याशी गेला
नेमक्याशी जाऊनी प्रतिसाद दिला
नमस्कार माझा त्या ड्युआयडीला

याचाच एक फायनर-पॉईंट म्हणजे अशा ड्युआयडींचं वय त्यांच्या जन्मदात्यांपेक्षा लहान किंवा फार्फार तर बरोबरीचं असतं.

२. ड्युआयडींना विधिवत जन्माला घालणारे, पुढे डीएनए चाचणीत आपले स्वत:चे पालकत्च सिध्द होऊ नये म्हणून त्यांना वेगळं व्यक्तीमत्त्व बहाल करण्याचा खटाटोप करतात. यात भाषेकडे विशेष लक्ष पुरवले जातच पण त्याचबरोबर अवतरण चिन्हे वगळणे, लिखाणात मुद्दाम शुध्दलेखनाच्या चुका करणे, थोडक्यात प्रतिक्रीया देणे असे प्रकार असतात. पण होतं काय की नेमक्या याच प्रयत्नांमुळे असे ड्युआयडी ठळकपणे उठून दिसतात.

ड्युआय डोंगा परि, मेंबर नाही डोंगा
काय भुललासी वरलीया अंगा ||

३.एकदा का संशय आला तर ड्युआयड्यांच्या पावलांचे ठसे अभ्यासावेत. ते आपल्याला नेमक्या गुहेकडे घेऊन जातात. कारण ड्यु काही ठराविक व्यक्तींच्या बाफांनाच भेट देतात. अनुकुल प्रतिसाद देणारे आपल्या जन्मदात्याच्या बाफावर रेंगाळतात तर प्रतिकूल प्रतिसादाकरता जन्माला घातलेले शत्रुपक्षात घुसलेले दिसतात. जुन्या-जाणत्या मेंब्रांना ह्या खुणा चटकन ओळखता येतात. ड्युआयडींच्या पाऊलखुणाचा मागोवा ही जरा कष्टसाध्य आणि तपस्येनंतर प्राप्त होणारी गोष्ट आहे.

तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे |

४. जसे बाटगे जास्त कट्टर असतात तसे हे ड्युआय (विशेषतः अनुकूल प्रतिसादवाले) जन्मदात्याची अफाट स्तुती करतात. ही खरंतर आत्मस्तुती असते.

मन ड्युले मेरा तन ड्युले मेरे दिल का गया करार रे
जोर से बजाये बासुरीया ||

तर शिव्याशाप देणारे ड्यु, मनातील मळमळ पूर्णपणे बाहेर काढतात.

सोड झणी वाग्बाणा, चला जोरात हाणा
ठोक हा बाफ रे ड्युआयड्या ||

५. काही असतात हेरगिरी करणारे ड्यु. हे मुद्दाम शत्रुपक्षात मित्र म्हणून घुसतात आणि जमेल तसे नेम धरून वार करतात.

सत्रांदा उड्डाणे मित्रांच्या सदनी
करी डळमळ मित्रमंडळ, वंगाळ बोलूनी |

६. काही ड्यु मिश्किल असतात. आपल्याच नेहमीच्या दोस्तांना वेगळ्या रुपात भेटून ते मजा करतात. अर्थात दोस्त लोकही ओरिजनल डॉक्युमेंटचा अभ्यास केलेले असल्याने अशा ड्युंचे पितळ लवकरच उघडे पडते.

You can cheat some people all the time
You can cheat all people some time ...but
You cannot cheat all people all time!

७. ड्युआयडी बरेचदा थोड्याच काळाकरता येतात. धुमकेतूसारखे उगवतात आणि अचानकच मावळतातही.

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती
बाफांसी टाकिली मागे, गतीसी तुळणा नसे

८. जर एखादा कोणी बरेच आयडी मॅनेज करत असेल तर पासवर्डच काय पण सदस्यनाव देखिल लक्षात ठेवणे, त्या आयडीची लिहिण्याची पध्दत लक्षात ठेवणे आणि वर याची आपल्या स्वत्:च्या आयडीशी गल्लत होऊ न देणे ..... हे सगळं वाटतं तसं सोपं नाही.

कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे माजोरी
जन्मभरीच्या श्वासाइतुके आठवले कळीनाम* (कळीनाम=पासवर्ड)
फुक्कट वाढले काम, देवा माझे फुक्कट वाढले काम!

९. अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादाशिवाय आणखी एक अतिशय खुबीचे कार्य ड्यु करतात. बाफ वर आणण्याचे. लोकांनी दिलेल्या सग्गळ्या सग्गळ्या प्रतिसादांना धन्यवाद देऊन झाल्यानंतर तिसर्‍या-चौथ्या पानावर गेलेला बाफ वर कसा आणणार? तर ड्युआयकरवी प्रतिसाद देऊन.

तुच माय बाप बंधु तुच प्राणसखा
खाली गेलेल्या बाफाचा तर, तुच पाठीराखा

१०. कधी कधी चर्चेला/कथेला वेगळे किंवा मनाजोगते वळण ड्युआय देऊ शकतात. अशा परिस्थितीत केवळ लोकाग्रहास्तव ही कथा असे असे वळण घेत आहे असे म्हणता येते.

अग अग म्हशी अन मला कुठे नेशी |

तर हे असे ड्युआय्डी. कोणी घेतात, कोणी बरे-वाईटपणे वापरतात तर कोणी ओळखतात.

तुम्हा तो ड्युआय सुखकर हो!!!

त.टी. : इथे कोणीतरी खराच 'डुआय' आहे त्यांना ड्युली आणि सन्मानपूर्वक वगळण्यात यावे. 'डुआय' सॉरी हं.

गुलमोहर: 

मामी,

काश...... तुम मेरा ड्यु आयडी होती.... Proud Rofl

जबरी लिहिलेय...... Lol

ड्यु आयडी हा..... ड्युआयडी हा
छळतो तुला छळतो मला......
ड्युआयडी हा ड्युआयडी हा....... Proud

झकास मामी Lol

काही डुआयडी चांगले सीझन करून मगच वापरात येतात. म्हणजे मायबोली वय काही वर्ष भरपूर महिने पण पाऊलखुणा तर मोजक्याच.... Wink

मस्तच लेख!
या प्रकारचे ड्य. आय. ना टारगेट करणारे लेख प्रत्येक मराठी संस्थळावर वाचले आहेत.
इथेही या अगोदर आणि ४-५ वर्षांपूर्वी जरा जास्तच असे प्रकार होऊन गेलेत.
पण या लेखात निरुपणात्मक लिहिण्याची शैली भारीच!

मजा आली.

मामी, तुला समस्त मायबोलीकरांतर्फे "ह.भ.प." ही उपाधी बहाल करत आहोत, याचा आपण स्वीकार करावा... Proud

छान विश्लेषण व क्रिएटिव्ह मांडणी !
सहज मनात विचार आला - डॉ.जेकेल व हाईड सारख्या मनात येणार्‍या विधायक व विध्वंसक प्रतिक्रिया व्यक्त करायला डु.आयडी घेणं तसं कांही घृणास्पद नसावं ! Wink

मामी Rofl

एकेकाळी तुंबळ युद्ध झालं होतं हो इथे. त्यात अनेक ड्यू आयड्यांनी आत्महत्या केल्या (मीच लावली होती ती आग. आता उत्साह नाही उरला ) अजूनही त्यापैकी काहि परत दिसतात. त्या कुणाच्या आहेत ते पण माहीत आहे मला. पण विचार करतो, असूदे.. (नाही नाही असूदे तसा नाही .. ) >>> दा :d

अनिलभाई म्हणजे तुमचे ते सगळे खरे आयडी आणि आमचे ते (सगळे-१) डु-आयडी?? >> :d

ह्या डु आयडींना पाच वर्षांपुर्वी कोण काय बोलले ते सुद्धा लक्षात असते >> अगदी अगदी... आपण तर तो आयडी सुध्दा विसरून जातो.

बायदिवे, "अनुल्लेख करणारे ते ओरिजनल, अन बाकी अनुल्लेख करत नाहीत ते सगळे ड्युआय" असा काहिसा निकष होऊ शकतोच ना? Wink

आपण लिहिलेल्या मताला प्रतिवाद करणारा आपलाच ड्युआय अजून कोणी केलेला दिसत नाही, म्हंजे दोन्ही बाजूने आपणाच चेस खेळल्यासारखे!!!

भन्नाssssssट, मामी!>>>>>अनुमोदन........नविन माहिती .......मजा आली.

मामी एक मुद्दा राहिला. लिंगबदल !!!
शिवाय आई आणि बाबांना जन्माला घालायचा चमत्कार इथे होऊ शकतो.

भन्नाट एकदम..
विचार करतेय एखादा ड्युआय आपला पण असावा... पण असुन काय करणार???? इथल्या डुआयएवढी हुशारी आपल्याकडे कुठाय????

मामी लई ब्येष्ट बघा....
काय जबरदस्त वर्णन आणि निरूपण...
ओव्या तर लई झ्याक...
साष्टांग दंडवत तुम्हास्नी....

Pages