ड्युआयड्यांची व्यवच्छेदक लक्षणे आणि मीमांसा

Submitted by मामी on 2 February, 2011 - 13:03

जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपले
तोची ड्युआय ओळखावा
भाव तेथेची जाणावा ||

वरील पंक्तीत वर्णन केल्याप्रमाणे अनेक ड्युआयडी सांप्रतकाळी मायबोलीवर कार्यरत आहेत.

अवचिता परिमळू
ड्युआयड्यांचा सुकाळू
मी म्हणे गोपाळू
झाला गे माये ||

कोणा ओरीजिनल कर्त्याकरवित्याच्या हातात या ड्युंच्या दोर्‍या पक्षी पासवर्ड असल्याने ते नाचवतील तेथे जाऊन हवा तसा प्रतिसाद देणे हेच ड्युंचे जिवीतकार्य.

तुच घडवीशी तुच मोडीशी
कार्य करवीशी तू, तूच मारीशी
हित तुझे तू यात साधिशी
मुखी कुणाच्या देशी लोणी
कुणा मुखी अंगार ||

ड्युआयड्यांचा जन्मच याकरता झालेला असतो. किंबहुना,

बिना हेतुने जे उले त्याले ड्युआय म्हनू नही
प्रतिसादाइना बोले त्याले ड्युआय म्हनू नही

पण या सर्व ड्युंची एक ठराविक लक्षणे असतात. ती चाणाक्ष वाचकांच्या सहज लक्षात येतात. ती लक्षणे खालीलप्रमाणे :

१. ड्युंचे सर्वांत महत्वाचे लक्षण म्हणजे त्यांचे वय. हे ड्यु माबोवर ताजे ताजे जन्माला येतात आणि येताच तडक नेमक्या बाफावर जाऊन नेमकी प्रतिक्रीया देतात.

उडाला उडाला ड्युआय तो उडाला
अधलेमधले ओलांडुनी नेमक्याशी गेला
नेमक्याशी जाऊनी प्रतिसाद दिला
नमस्कार माझा त्या ड्युआयडीला

याचाच एक फायनर-पॉईंट म्हणजे अशा ड्युआयडींचं वय त्यांच्या जन्मदात्यांपेक्षा लहान किंवा फार्फार तर बरोबरीचं असतं.

२. ड्युआयडींना विधिवत जन्माला घालणारे, पुढे डीएनए चाचणीत आपले स्वत:चे पालकत्च सिध्द होऊ नये म्हणून त्यांना वेगळं व्यक्तीमत्त्व बहाल करण्याचा खटाटोप करतात. यात भाषेकडे विशेष लक्ष पुरवले जातच पण त्याचबरोबर अवतरण चिन्हे वगळणे, लिखाणात मुद्दाम शुध्दलेखनाच्या चुका करणे, थोडक्यात प्रतिक्रीया देणे असे प्रकार असतात. पण होतं काय की नेमक्या याच प्रयत्नांमुळे असे ड्युआयडी ठळकपणे उठून दिसतात.

ड्युआय डोंगा परि, मेंबर नाही डोंगा
काय भुललासी वरलीया अंगा ||

३.एकदा का संशय आला तर ड्युआयड्यांच्या पावलांचे ठसे अभ्यासावेत. ते आपल्याला नेमक्या गुहेकडे घेऊन जातात. कारण ड्यु काही ठराविक व्यक्तींच्या बाफांनाच भेट देतात. अनुकुल प्रतिसाद देणारे आपल्या जन्मदात्याच्या बाफावर रेंगाळतात तर प्रतिकूल प्रतिसादाकरता जन्माला घातलेले शत्रुपक्षात घुसलेले दिसतात. जुन्या-जाणत्या मेंब्रांना ह्या खुणा चटकन ओळखता येतात. ड्युआयडींच्या पाऊलखुणाचा मागोवा ही जरा कष्टसाध्य आणि तपस्येनंतर प्राप्त होणारी गोष्ट आहे.

तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे |

४. जसे बाटगे जास्त कट्टर असतात तसे हे ड्युआय (विशेषतः अनुकूल प्रतिसादवाले) जन्मदात्याची अफाट स्तुती करतात. ही खरंतर आत्मस्तुती असते.

मन ड्युले मेरा तन ड्युले मेरे दिल का गया करार रे
जोर से बजाये बासुरीया ||

तर शिव्याशाप देणारे ड्यु, मनातील मळमळ पूर्णपणे बाहेर काढतात.

सोड झणी वाग्बाणा, चला जोरात हाणा
ठोक हा बाफ रे ड्युआयड्या ||

५. काही असतात हेरगिरी करणारे ड्यु. हे मुद्दाम शत्रुपक्षात मित्र म्हणून घुसतात आणि जमेल तसे नेम धरून वार करतात.

सत्रांदा उड्डाणे मित्रांच्या सदनी
करी डळमळ मित्रमंडळ, वंगाळ बोलूनी |

६. काही ड्यु मिश्किल असतात. आपल्याच नेहमीच्या दोस्तांना वेगळ्या रुपात भेटून ते मजा करतात. अर्थात दोस्त लोकही ओरिजनल डॉक्युमेंटचा अभ्यास केलेले असल्याने अशा ड्युंचे पितळ लवकरच उघडे पडते.

You can cheat some people all the time
You can cheat all people some time ...but
You cannot cheat all people all time!

७. ड्युआयडी बरेचदा थोड्याच काळाकरता येतात. धुमकेतूसारखे उगवतात आणि अचानकच मावळतातही.

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती
बाफांसी टाकिली मागे, गतीसी तुळणा नसे

८. जर एखादा कोणी बरेच आयडी मॅनेज करत असेल तर पासवर्डच काय पण सदस्यनाव देखिल लक्षात ठेवणे, त्या आयडीची लिहिण्याची पध्दत लक्षात ठेवणे आणि वर याची आपल्या स्वत्:च्या आयडीशी गल्लत होऊ न देणे ..... हे सगळं वाटतं तसं सोपं नाही.

कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे माजोरी
जन्मभरीच्या श्वासाइतुके आठवले कळीनाम* (कळीनाम=पासवर्ड)
फुक्कट वाढले काम, देवा माझे फुक्कट वाढले काम!

९. अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादाशिवाय आणखी एक अतिशय खुबीचे कार्य ड्यु करतात. बाफ वर आणण्याचे. लोकांनी दिलेल्या सग्गळ्या सग्गळ्या प्रतिसादांना धन्यवाद देऊन झाल्यानंतर तिसर्‍या-चौथ्या पानावर गेलेला बाफ वर कसा आणणार? तर ड्युआयकरवी प्रतिसाद देऊन.

तुच माय बाप बंधु तुच प्राणसखा
खाली गेलेल्या बाफाचा तर, तुच पाठीराखा

१०. कधी कधी चर्चेला/कथेला वेगळे किंवा मनाजोगते वळण ड्युआय देऊ शकतात. अशा परिस्थितीत केवळ लोकाग्रहास्तव ही कथा असे असे वळण घेत आहे असे म्हणता येते.

अग अग म्हशी अन मला कुठे नेशी |

तर हे असे ड्युआय्डी. कोणी घेतात, कोणी बरे-वाईटपणे वापरतात तर कोणी ओळखतात.

तुम्हा तो ड्युआय सुखकर हो!!!

त.टी. : इथे कोणीतरी खराच 'डुआय' आहे त्यांना ड्युली आणि सन्मानपूर्वक वगळण्यात यावे. 'डुआय' सॉरी हं.

गुलमोहर: 

>>>>मामी एक मुद्दा राहिला. लिंगबदल !!!
शिवाय आई आणि बाबांना जन्माला घालायचा चमत्कार इथे होऊ शकतो.

दिनेशदा Wink तुमचा या बाबतीतला अभ्यास दांडगा आहे यात संशय नाही. Rofl

मंदार, बाबा काळ्याचे पांढरे नाही, होत्याचे नव्हते झाले मायबोलीवर येऊन, केस रे.

मला तर कल्पक डु आय डी रजिस्टर करुन, मग ते इच्छुक सभासदांना, योग्य त्या मोबदल्यात द्यावेसे वाटताहेत.

नूसत्या पूर्णविरामाने काही डु आय, करता येत नाहीत. काय ?

>>>> मला तर कल्पक डु आय डी रजिस्टर करुन, मग ते इच्छुक सभासदांना, योग्य त्या मोबदल्यात द्यावेसे वाटताहेत.

आयला, मग मी नै का गेले कित्येक वर्षापासून विचारतोय अ‍ॅडमिनला की "लिंबुटिंबु" या आयडीचा लिलाव करायचा का? Biggrin

लिंबूकाका Biggrin काका, लिलाव नाही तरी खरेदी विभागात किंवा छोट्या जाहीराती मधे टाका नक्की विक्रीची जाहीरात.

धन्यवाद मंडळी.

दिनेशदा, 'लिंगबदला'चा मुद्दा एकदम योग्य.

तुम्ही जुने लोक जे सांगताय त्यावरून 'तो' पुराना किस्सा ऐकायची फारच उत्सुकता लागलीये. प्लीज 'फाईल नं. ४२० - आत्महत्या ड्युआयडयांची' ही CID फाईल ओपन करा ना. Happy

हो हो मन्दार, करायला पाहिजे तसं
"अनुल्लेखासहित" आयडी विकली जाईल का पण? Proud
की विकली जाऊ नये म्हणूनच लॉबिन्ग होतय अनुल्लेखाचं? Lol Lol

इथे नेहमीचे यशस्वी "ड्युआयडीकर्स" फिरकलेले दिसत नाहीत अजून......... की फक्त रोमातूनच नजर टाकतायत......... Proud Lol

मामी, जाऊ द्या हो, गे(मे)लेल्या लोकांबद्द्ल वाईट बोलायचे नसते.
परशुरामाने नै का कित्ती वेळा पृथ्वी, नि:क्षत्रिय केली होती. तरी परत परत क्षत्रिय निर्माण झालेच ना, तसे रक्ताच्या एका थेंबापासून वगैरे...

दिनेशदा, लिंबुटिंबु... तुम्ही उत्सुकता चाळवू नका...... Lol

दिनेशदा, चला आता मनावर घ्या आणि होऊन जाऊ द्या.........सगळ्या जुन्या फाईल्स बाहेर काढा......

नाहीतर प्रत्युत्तर म्हणून लवकरच एखाद्या ड्युआयडीचे "मायबाप"........ "आम्ही ड्युआयडी का झालो" या नाण्याच्या दुसर्‍या बाजूवर प्रकाश टाकणारा लेख लिहितील...... Rofl (मायबाप हो ऐकताय ना.... Proud )

भुंगा, जास्त नाही उकरत..
पण एका आयडीने लिंगबदल करुन, मुलगाच कसा जन्माला येईल, यावर बीबी काढला होता. अनेक जेष्ठ सभासद त्याला भुलले होते. त्यावरुन मी भडकलो होतो.

मामी, जाऊ द्या हो, गे(मे)लेल्या लोकांबद्द्ल वाईट बोलायचे नसते.
>>>> Biggrin

मायबाप प्रक्रणाची बरीच मोठी शिक्रण बनली होती असं दिसतयं....... Happy

भुंगा, जास्त नाही उकरत..

>>>>>

दिनेशदा, तुम्ही फक्त सुरू करा हो....... बाकी त्यातून आणि काय काय उकरायचं ते आम्ही बघतो ना...... Proud

आता एकाएकी सगळ्या बाफांवर ड्युआयड्यांचे प्रतिसाद दिसतील. कारण पाऊलखुणा पुसल्या गेल्या पाहिजेत ना! Happy

खरं तर त्या सभासदाचे नाव घ्यायला हरकत नाही, पण तिलाही त्या आठवणी नको असतील.
एक डुप्लिकेट आय डी, तूझाच आहे, असे बोलत सगळ्यांनी तिच्यावर हल्ला केला होता आणि त्याचा तिला खूपच मनस्ताप झाला होता. ते दोघेही इथे अजून आहेत.

मामींनी इथे विनोदाने लिहिले आहे, पण त्या बीबी वर डू आय का घ्यावासा वाटतो, त्यांची मानसिकता काय असते, अशी गंभीर चर्चा (वरिजिनल आयड्यांनी) केली होती. मग बरीच खाजगी मेलामेली झाली होती. "म्हणजे तूम्हाला सांगतो, मला शंका नाही तर खात्रीच आहे, कि अमका तमका, अलाण्याफलाण्या नावाने लिहितो म्हणून.... "

मग मी त्या सगळ्या डू आय ची यादीच दिली होती (तशी आता पण देऊ शकेन.)

मला प्रिय असणार्‍या वनस्पति क्षेत्रातला एक दृष्टांत देतो. बांडगूळ आणि झाडाच्या फांद्यांवर वावरणार्‍या इतर वनस्पतींमधे फरक असतो. बांडगुळ आपली मूळे खोडात खुपसून त्याचा जीवनरस शोषते. बाकीच्या वनस्पति खोडाचा केवळ आधार घेतात. जमिनीवर त्यांना पूरेसा सुर्यप्रकाश मिळत नाही. त्यांना थोडी उंची गाठायची असते. मग आपले जीवन त्या सूखाने जगतात.
बांडगूळ धोकादायकच पण बाकीच्या वनस्पतींचा लाँग टर्म मधे धोका असा असतो, कि त्यांच्या वजनाने ती फांदी मोडून कोसळू शकते.

बहुत काय लिहिणे ?

वा दिनेशदा, तुमचाही विषयाचा सखोल अभ्यास दिसतो. शिवाय तुमच्या जमेस अनुभवही आहे. पीएच्डी ची जागा रिकामी आहे का? अप्लाय करू का? Happy

मामी मस्त लिहीलंय, Lol

माझे बरेच डूआय आहेत, बरेचसे मला पण आठवत नाहीत आता! काही काही तर माझ्याच लेखांवर वाईट्ट प्रतिक्रिया देऊन जातात, माणसाच्या कंट्रोलमधून रोबोट सुटल्यासारखे. Proud

चिमण टकलू हैवान हा एक आय्डी ना? Proud
तुझा कार्तिक कॉलिंग कार्तिक मधला कार्तिक झालाय (नोटः तुझा आवाज कायमचा बसलेलेला आहे की नाही ते माहिती नाही) Happy

Pages