ड्युआयड्यांची व्यवच्छेदक लक्षणे आणि मीमांसा

Submitted by मामी on 2 February, 2011 - 13:03

जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपले
तोची ड्युआय ओळखावा
भाव तेथेची जाणावा ||

वरील पंक्तीत वर्णन केल्याप्रमाणे अनेक ड्युआयडी सांप्रतकाळी मायबोलीवर कार्यरत आहेत.

अवचिता परिमळू
ड्युआयड्यांचा सुकाळू
मी म्हणे गोपाळू
झाला गे माये ||

कोणा ओरीजिनल कर्त्याकरवित्याच्या हातात या ड्युंच्या दोर्‍या पक्षी पासवर्ड असल्याने ते नाचवतील तेथे जाऊन हवा तसा प्रतिसाद देणे हेच ड्युंचे जिवीतकार्य.

तुच घडवीशी तुच मोडीशी
कार्य करवीशी तू, तूच मारीशी
हित तुझे तू यात साधिशी
मुखी कुणाच्या देशी लोणी
कुणा मुखी अंगार ||

ड्युआयड्यांचा जन्मच याकरता झालेला असतो. किंबहुना,

बिना हेतुने जे उले त्याले ड्युआय म्हनू नही
प्रतिसादाइना बोले त्याले ड्युआय म्हनू नही

पण या सर्व ड्युंची एक ठराविक लक्षणे असतात. ती चाणाक्ष वाचकांच्या सहज लक्षात येतात. ती लक्षणे खालीलप्रमाणे :

१. ड्युंचे सर्वांत महत्वाचे लक्षण म्हणजे त्यांचे वय. हे ड्यु माबोवर ताजे ताजे जन्माला येतात आणि येताच तडक नेमक्या बाफावर जाऊन नेमकी प्रतिक्रीया देतात.

उडाला उडाला ड्युआय तो उडाला
अधलेमधले ओलांडुनी नेमक्याशी गेला
नेमक्याशी जाऊनी प्रतिसाद दिला
नमस्कार माझा त्या ड्युआयडीला

याचाच एक फायनर-पॉईंट म्हणजे अशा ड्युआयडींचं वय त्यांच्या जन्मदात्यांपेक्षा लहान किंवा फार्फार तर बरोबरीचं असतं.

२. ड्युआयडींना विधिवत जन्माला घालणारे, पुढे डीएनए चाचणीत आपले स्वत:चे पालकत्च सिध्द होऊ नये म्हणून त्यांना वेगळं व्यक्तीमत्त्व बहाल करण्याचा खटाटोप करतात. यात भाषेकडे विशेष लक्ष पुरवले जातच पण त्याचबरोबर अवतरण चिन्हे वगळणे, लिखाणात मुद्दाम शुध्दलेखनाच्या चुका करणे, थोडक्यात प्रतिक्रीया देणे असे प्रकार असतात. पण होतं काय की नेमक्या याच प्रयत्नांमुळे असे ड्युआयडी ठळकपणे उठून दिसतात.

ड्युआय डोंगा परि, मेंबर नाही डोंगा
काय भुललासी वरलीया अंगा ||

३.एकदा का संशय आला तर ड्युआयड्यांच्या पावलांचे ठसे अभ्यासावेत. ते आपल्याला नेमक्या गुहेकडे घेऊन जातात. कारण ड्यु काही ठराविक व्यक्तींच्या बाफांनाच भेट देतात. अनुकुल प्रतिसाद देणारे आपल्या जन्मदात्याच्या बाफावर रेंगाळतात तर प्रतिकूल प्रतिसादाकरता जन्माला घातलेले शत्रुपक्षात घुसलेले दिसतात. जुन्या-जाणत्या मेंब्रांना ह्या खुणा चटकन ओळखता येतात. ड्युआयडींच्या पाऊलखुणाचा मागोवा ही जरा कष्टसाध्य आणि तपस्येनंतर प्राप्त होणारी गोष्ट आहे.

तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे |

४. जसे बाटगे जास्त कट्टर असतात तसे हे ड्युआय (विशेषतः अनुकूल प्रतिसादवाले) जन्मदात्याची अफाट स्तुती करतात. ही खरंतर आत्मस्तुती असते.

मन ड्युले मेरा तन ड्युले मेरे दिल का गया करार रे
जोर से बजाये बासुरीया ||

तर शिव्याशाप देणारे ड्यु, मनातील मळमळ पूर्णपणे बाहेर काढतात.

सोड झणी वाग्बाणा, चला जोरात हाणा
ठोक हा बाफ रे ड्युआयड्या ||

५. काही असतात हेरगिरी करणारे ड्यु. हे मुद्दाम शत्रुपक्षात मित्र म्हणून घुसतात आणि जमेल तसे नेम धरून वार करतात.

सत्रांदा उड्डाणे मित्रांच्या सदनी
करी डळमळ मित्रमंडळ, वंगाळ बोलूनी |

६. काही ड्यु मिश्किल असतात. आपल्याच नेहमीच्या दोस्तांना वेगळ्या रुपात भेटून ते मजा करतात. अर्थात दोस्त लोकही ओरिजनल डॉक्युमेंटचा अभ्यास केलेले असल्याने अशा ड्युंचे पितळ लवकरच उघडे पडते.

You can cheat some people all the time
You can cheat all people some time ...but
You cannot cheat all people all time!

७. ड्युआयडी बरेचदा थोड्याच काळाकरता येतात. धुमकेतूसारखे उगवतात आणि अचानकच मावळतातही.

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती
बाफांसी टाकिली मागे, गतीसी तुळणा नसे

८. जर एखादा कोणी बरेच आयडी मॅनेज करत असेल तर पासवर्डच काय पण सदस्यनाव देखिल लक्षात ठेवणे, त्या आयडीची लिहिण्याची पध्दत लक्षात ठेवणे आणि वर याची आपल्या स्वत्:च्या आयडीशी गल्लत होऊ न देणे ..... हे सगळं वाटतं तसं सोपं नाही.

कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे माजोरी
जन्मभरीच्या श्वासाइतुके आठवले कळीनाम* (कळीनाम=पासवर्ड)
फुक्कट वाढले काम, देवा माझे फुक्कट वाढले काम!

९. अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादाशिवाय आणखी एक अतिशय खुबीचे कार्य ड्यु करतात. बाफ वर आणण्याचे. लोकांनी दिलेल्या सग्गळ्या सग्गळ्या प्रतिसादांना धन्यवाद देऊन झाल्यानंतर तिसर्‍या-चौथ्या पानावर गेलेला बाफ वर कसा आणणार? तर ड्युआयकरवी प्रतिसाद देऊन.

तुच माय बाप बंधु तुच प्राणसखा
खाली गेलेल्या बाफाचा तर, तुच पाठीराखा

१०. कधी कधी चर्चेला/कथेला वेगळे किंवा मनाजोगते वळण ड्युआय देऊ शकतात. अशा परिस्थितीत केवळ लोकाग्रहास्तव ही कथा असे असे वळण घेत आहे असे म्हणता येते.

अग अग म्हशी अन मला कुठे नेशी |

तर हे असे ड्युआय्डी. कोणी घेतात, कोणी बरे-वाईटपणे वापरतात तर कोणी ओळखतात.

तुम्हा तो ड्युआय सुखकर हो!!!

त.टी. : इथे कोणीतरी खराच 'डुआय' आहे त्यांना ड्युली आणि सन्मानपूर्वक वगळण्यात यावे. 'डुआय' सॉरी हं.

गुलमोहर: 

मामी, Biggrin
दिप्या, कोतबो साठी डु आय घेणं वेगळं. बर्‍याचदा आपली वैयक्तिक समस्या पब्लिक फोरमवर मांडताना लोक संकोचतात. कारण आपल्याला ओळखणारे लोक चर्चा करतिल, खिल्ली उडवतिल, सहानभुती दाखवतिल अशी भिती असते आणि असं होवू शकतं. त्यामूळे मग अशा वेळी डु आय चा आसरा घेत असतिल लोक. कोतबो मधल्या सगळ्याच समस्या काही खोट्या आणि गंमत म्हणून लिहिलेल्या नसणार. एखाद्याला /एखादीला जेन्युअन समस्या पण असेल ना.

अल्पना, अगदी बरोबर. खूपदा माझ्या ऐका मैत्रिणीची अशी समस्या आहे, अशी सुरवात करतात तिथे. तिथे टोपणनाव घेणे योग्य आहे.
पण....

मामी, आता डू आय ची कर्तव्ये आणि पत्थे , असा एक लेख लिहून टाका बरं. खर्‍याखुर्‍या डुआयडीज नी, या क्षेत्रात आल्यावर घ्यावयाची काळजी, या सदराखाली पण माहिती द्यावी.

मामी, अशक्य लिहिले आहे. साक्षात दंडवत तुम्हाला. Happy
अल्पनाला अनुमोदन. जर खरंच काही वैयक्तिक समस्या असतील आणि इथे लोक ओळखतात म्हणुन लोक ड्युआय घेत असतील तर मला तरी चूकीचे वाटत नाही.

दिनेशदा, "मी ड्युआयडी का झालो" असा एक लेख तयार होतोय... Proud

सगळ्या ड्युआयड्यांकडून त्यांच्या व्यथा जाणून घेण्याची प्रोसेस सुरू झालिये...... Happy

सगळ्यांनीच लेखाला उचलून धरल्यामुळे वरील सगळेच माझे ड्युआय आहेत की काय असं मला स्वत:लाच वाटायला लागल होतं. पण अर्थात लक्षण क. ४ नुसार कोणी अवाजवी स्तुती न केल्याने ही शक्यता फेटाळून लावत आहे. Happy

दिनेशदा, सुचना विचाराधीन आहे. समिती नेमलेली आहे. अहवाल येताच पुढिल कार्यवाहीला सुरुवात करता येईल. Happy

मी इथला बराच जुना ड्युआय...
ही सगळी व्यवच्छेदक लक्षणं मला बरोब्बर लागू पडतात. माझे ओरिजिनल एकदम असल्यानं अस होतय. एकदा का ते तयार झाले कि मग कारखाना सुरू...

एक मिनिट
मी ओरिजिनल आणि ते ड्युआय आहेत.. आता फायनल
भित्यापाठी ब्रह्मड्युआय !

हे ड्युआयडी प्रकरण काय आहे ते मला खरंच माहीत नाही, पण मामी तुमच्या लेखातले विनोदी श्लोक वगैरे फार आवडले. खुसखुशीत लिखाण वाटले. Happy

मी ड्युआय तर आहेच आहे.. त्याशिवाय मला मुलीचा हुबेहूब आवाजही काढता येतो. फोन करून बघा..

मजेदार लेख आहे, हे डुआय प्रकर्ण खूप गूंता-गूंतीचे दिसते ! 'IDENTITY' नावाच्या परदेशी चित्रपटाची ईथे आठवण येते आहे Biggrin

मी सुद्धा डूआय आहे असे समजा Proud

रच्याकने असेच मायबोलीवर फिरत फिरत वाचले की मागे एकदा मोहिनी या डूआयने नवरा मुंबई पोलीसात क्राईम ब्रांचचा पोलीस निरिक्षक असल्याचे सांगत त्याचा मोबाईल नंबर पण दिला होता........काय बरे.........आठवला

88283 25578

Biggrin

मामी तुझे सलाम!!!

बाळकवी हा माझा ड्युआयडी आहे अशी चर्चा इथल्या यशस्वी कलाकारानी केलेली. नंतर माझ्या सुदैवाने बाळकवी स्वतःच जाऊन त्यापैकी एकाला भेटले.

पण मज्जा करायला एखादा ड्युआयडी असणेही वाईट नाही.

मी एक ड्युआयडी घेतो आहे. ओळखेल त्याला भेटताच कॅडबरी. ओळखताच 'हबाच हा!' असे पटकन सांगा.

म्हं...बरेच ड्यु आयडीही धाग्याला भेट देऊन गेलेले दिसत आहे.... Happy काय डेरींग आहे..!
पण, मामी के हाथ से बच के कहां जाओगे...? Proud

हबा, हे तर काहिच नाही. माझ्यावर तर हल्लीच तीन तीन ड्युआय्डींचे आरोप झालेत. आणि त्यातला एक ड्यु आयडी तर चक्क भेटलाय माबोकरांना हल्लीच. त्यामुळेच असेल कदाचित, पण हल्ली दोषारोप करणारे तोंड लपवून फिर्तायत.

...

एखाद्या माणसावर विनाकारण ड्यु आयडीचे आरोप करण हा एक प्रकारे त्याचा मानसिक छळ करण्याचाच प्रकार आहे आणि मला त्याचा मनस्ताप होतो आहे.

हा मूर्खपणा करणार्‍यांना त्यासाठी भरपूर वेळ असेलही, मला तेव्हढा वेळ नाही. जेव्हढा काही वेळ मिळतो तो क्वालिटी टाईम म्हणून माबोवर व्यतित करण्याचा माझा प्रयत्न असतो.

असुदे, 'डुय आयडी' बनुन भूंग्याच्या "विपु"त "काय घालाय्चाय तो धुमाकुळ" घाल.

नोट :हा सल्ला मोफत आहे.

भूंग्या पर्सनली घेउ नकोस... Happy

>>>> एखाद्या माणसावर विनाकारण ड्यु आयडीचे आरोप करण हा एक प्रकारे त्याचा मानसिक छळ करण्याचाच प्रकार आहे आणि मला त्याचा मनस्ताप होतो आहे.

हा मूर्खपणा करणार्‍यांना त्यासाठी भरपूर वेळ असेलही, मला तेव्हढा वेळ नाही. जेव्हढा काही वेळ मिळतो तो क्वालिटी टाईम म्हणून माबोवर व्यतित करण्याचा माझा प्रयत्न असतो. <<<<<

असुदे, यामजकुराशी सहमत.
मलाही असाच त्रास देण्यात आलेला मागे! अन हा मूर्खपणा करणार्‍यान्ना आजही भरपुर वेळ आहे... Proud

.मी इथला एक जुना जाणता ड्यु आय ( फेक हा शब्द अचूक). पुन्हा का सांगतोय ? विषयच तसा आहे. पुन्हा पुन्हा चघळण्यासारखा... आणि वर काढायचा होताच हा धागा.. आढेवेढे कशाला घेऊ ?

इतर फेक आणि माझ्यात फरक हा कि मी आधी फेक झालो आणि चांगला स्थिरस्थावर झाल्यावर, स्वभावविशेष कळाल्यावर, मोर्चेबांधणी माहीत झाल्यानंतर मग माझ्या ओरिजिनलला बोलवल. पण माझा ओरिजिनल (पक्षी बाहुलाकार) एकदम नेभळट निघाला. पहिल्याच प्रयत्नात पकडला गेला. त्याच पकडलं जाणं माझ्या लगेच लक्षात आलं. ( अनुभव दांडगा आहे ना !)..

फेक प्रोफाईल ने वावरताना घ्यायची काळजी हा माझा आवडता विषय. काय करावं यापेक्षा काय करू नये हे महत्वाचं.

फेक प्रोफाईल बनवण हे एक पवित्र काम आहे. जसं एथिकल हॅकिंग असत तसच एथिकल फेकिंग पण. इतर फेक प्रोफाईल्स ओळखण्याकरता फेकची मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं.

संतांनी म्हटलेच आहे

चोरों को सारे नजर आते है चोर

अर्थात फेक प्रोफाईल ओळखण्याकरता त्यांच्यासारखा विचार करता आला पाहीजे. तो बे एके बे करून साध्य होणार नाही. मायबोली वर माझे कमीत कमी साडेसहाशे फेक प्रोफाईल्स आहेत. त्यांच्यासाठी मी रजिस्टर ठेवलेलं आहे. फेक प्रोफाईलचे नाव, प्रोफाईलची माहीती, लिंग, वय, पासवर्ड असे कॉलम्स त्यात आहेत. तसच आता कुठल्या प्रोफाईलने लॉगिन झालोय हे विसरू नये म्हणून मॉनिटरला यलो चिट लावून ठेवायची समय मी लावून घेतली आहे. एका एक्सेल फाईल मधे प्रत्येक प्रोफाईलच्या सवयी / लकबी फीड केल्या आहेत.

उदा. माझे सगळेच फेक कविता करत नाहीत. काही करतात. आणि यातले एकही एकमेकांना प्रतिसाद देत नाहीत !! बसा बोंबलत..

फेक प्रोफाईल कडे एखादी विशेष कला असणं अतिशय गरजेचं आहे. उदा. मला मुलीचा हुबेहूब आवाज काढता येतो. फोन करून पहा. कुठल्याही वेळी, दिवशी.. कुठल्याही नंबरवरून. त्यामुळं तुम्ही कन्फुज व्हाल. हे असं कन्फुज करता आलं कि प्रोफाईल यशस्वी झालं असं समजावं.

फेक प्रोफाईल्स सतत कार्यशील रहावीत म्हणून हल्ली मी माणसं कामाला ठेवली आहेत. त्यामुळ चुका होतच नाहीत. म्हणजे चुका होतात त्या ही एकदम ओरिजिनल. वाईट इतकच वाटत माझ्याकडं हे ज्ञान असताना बाहुलीकार ( पक्षी माझा ओरिजिनल) मात्र ढ राहीला. ओरीजिनलच्या माथी फेकचा शिक्का बसला आणि मी फेक असून उजळ माथ्याने वावरतोय... कुणाकडं सांगणार ही व्यथा ( कुणी आहे का तिकडं ..ओरिजिनल वाला?)

Pages