नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असेन मी नसेन मी..

नीना कुलकर्णी, शुभांगी गाखले आणि अमृता सुभाष तिघींचा अभिनय खूपच छान झाला आहे - हे वाक्य म्हणजे अंडरस्टेटमेंट आहे.

नीना कुलकर्णी यांचं नाटक मी पहिल्यांदच बघितलं. थक्क झाले वयाच्या ७१ व्या वर्षी एवढ्या ताकदीने आणि तेवढ्याच सहजतेने त्या रंगमंचावर वावरू शकतात!
आज त्यांचा सलग तिसऱ्या दिवशीचा शो होता. या व्यतिरिक्त
शेकडो किलोमीटर्सचा प्रवास करण्याचा ताण असेल तो वेगळा.

शुभांगी गोखले ( खरं तर मला नेहेमी आवडणारी ( adorable) ) - एकच नाटकात दोन अतिशय भिन्न धाटणीच्या भूमिका तेवढ्याच निराळ्या ढंगात सादर केल्या आहेत.

Amruta Subhash
अमृता सुभाष - उत्कृष्ट दिग्दर्शन.
दुसऱ्या अंक अधिक प्रभावी झालाय. मायलेकीचा शेवटचा प्रसंग अगदी हृदयद्रावक झालाय.

Sandesh Kulkarni
संदेश कुलकर्णी- फारच सुंदर लिखाण - एखाद्या हसत्या खेळत्या घरात गप्पांच्या ओघात अचानक गंभीर वळण लागावे तसे काहीसे नाटक बघताना होते. इतक्या स्वाभाविकपणे प्रेक्षक त्यात गुंतून जात नकळत नाटकाच्या त्या परमोच्च क्षणाला पोहोचतो.
कितीतरी वाक्ये टाळ्या घेणारी होती.. पटणारी होती.
जसे..
“विसरण्याचा त्रास नाही ग, मला आठवायला त्रास होतो..”

कथानक:
दीपा एकटी पुण्याला राहते - मुलगी मुंबईला तर मुलगा अमेरिकेला. आता वयोमानानुसार थोडफार (?) विसरायला लागली आहे. तिचा एकुलता एक संवाद/ आधार म्हणजे तिची धाकटी बहीण वर्षा. माय-लेक , आई-मुलगा, लेक - जावई, बहिणी - बहिणी यांच्यातील राग लोभ, रुसवे फुगवे, कुटुंबातील अडीअडचणी या सगळ्या संसाराच्या प्रवाहातून कथानक पुढे जात राहते, आणि प्रेक्षकांना आपल्यासोबत घेऊन जाते.

दुसरा अंक मला अजून जास्त आवडला - वाढत जाणारा वेग, वाढती तीव्रता, उलगडणारी कोडी, आणि अभिनयाचा चढता आलेख बहुदा यामुळे असेल.

जाता जाता..
हसता हसता अचानक चुटपुट लावणारं, तर कधी विचार करायला लावणार, कधी क्वचित आपल्याही घरात घडू शकेल.या जाणिवेने अस्वस्थ करणार नाटक तुमच्या शहरात येणार असेल तर अजिबात चुकवू नका.

jar tarchee gosht.jpg

जर तरची गोष्ट - लेखन इरावती कर्णिक . दिग्दर्शक अद्वैत दादरकर आणि रणजीत पाटील. निर्माती - प्रिया बापट
कलाकार उमेश कामत - समर, प्रिया बापट - राधा , आशुतोष गोखले- अबीर , पल्लवी अजय- सती.

सुरुवात समर आणि राधाच्या साखरपुड्याने. त्याही अगोदर पडदा उघडायच्या आधी अशा कार्यक्रमांत बोलली जातत ती टिपिकल वाक्ये.
राधा म्हणते आता आपलं सगळं एक. तुझं माझं जग एक. समर म्हणतो नाही. आपलंआपलं कायम ठेवायचं. दोघांच्या अशा काहीच गोष्टी.
पुढच्या प्रवेशात समर सतीसोबत आहे आणि राधा अबीरसोबत. समर राधा वेगळे झालेत आणि नव्या जोडीदारांसोबत पुढच्या वाटचालीची तयारी करताहेत.
मग त्यांचा सामना. आता अबीरला वाटत असतं की राधाशिवाय जगण्याला अर्थ नाही तर राधाला स्वतःची स्पेस पण असली पाहिजे हे कळतं.
मध्येच एक फ्लॅशबॅक. त्यात राधा समर वेगळं होण्याचं कारण कळतं.

या जोडप्यांच्या गोष्टी आणि समस्या पाहून मला बोअर होत होतं. तितक्यात सतीने सगळ्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पाडला आणि आपल्याला काय हवं ते शोधणं महत्त्वाचं हे त्यांना पटवून दिलं. मग सगळ्यांनी सध्या तरी एकटंच राहायचा निर्णय घेतल्यावर मला बरं वाटलं Lol इरावतीने तिच्या तोंडून शेवटच्या १५-२० मिनिटांत बरंच ग्यान पाजलं आहे. ते म्हणजे ते ग्यान आवडलं

उमेश कामतच्या ज्या काही भूमिका मी पाहिल्यात त्यात तो (ओव्हर ) कॉन्फिडंट (ओव्हर )स्मार्ट वाटत आलाय. त्याची पर्सनॅलिटीही तशीच असेल असं वाटत आलंय. इथे त्याची संवादफेक थोडी अघळपघळ, थोडी पोक्तपणाची वाटली. शेवटी शेवटी मला यशवंत दत्त यांची आठवण झाली.
त्यांच्या कॉन्फिडन्स नसलेल्या नायकाच्या भूमिका आठवल्या. उमेशचे केस खूप कुरळे केलेत.
त्याने अनेकदा संवादांतलं रिअ‍ॅक्ट होणं हुकवलं. समोरच्याचा एखादा क्लु हुकला असता किंवा बदलला असता, तरी त्याने आपले पाठ केलेले संवाद म्हणून टाकले असते असं वाटत राहिलं. समरचं पात्र वरवर सॉर्टेड पण त्याला दिलेला गेट अप , बॉडी लँग्वेज आणि संवादफेकीची शैली यामुळे गोंधळलेलं वाटणारं. त्याचे आविर्भावही त्या पात्राच्या वयाला पात्राच्या मानाने पोक्त वाटले - unless the character is punekar - कौन्सेलर = समुपदेशक या ऐवजी तो प्रत्येक वेळी कौन्सिलर म्हणाला.

राधा चारचौघींसारखी सामान्य मुलगी. यात काय अभिनयाला वावच नाही असं वाटत होतं. पण शेवटी जाणवलं प्रियाने बेअरिंग चांगलं घेतलं आहे. प्रियाचे संवाद त्या पात्राला आता आतून आलेत असे वाटले नाहीत. पाठ केलेलं म्हणून टाकलंय असे झाले.

अबीर आणि सती ही दोन्ही पात्र लाउड आहेत आणि दोन्ही अभिनेत्यांनी चांगली रंगवलीत. आशुतोष आणि पल्लवी यांच्या रिअ‍ॅक्शन्सही व्यवस्थित पोचल्या

तरुणांचं नाटक असल्याने कपडेपटही त्याला साजेसा. आशुतोष या सगळ्यांपेक्षा उंच असल्याने की काय त्याला वाकून चालायची ढब दिली होती. उमेश कायम loose limbed वाटला.

सती हे पात्र सगळ्यांत जास्त किंवा हेच एक पात्र सॉर्टेड .
.
अद्वैत दादरकर दिग्दर्शक. त्याने नाटकाला विनोदी ट्रीटमेंट दिली आहे. मला इरावतीचे संवाद अनेकदा गंभीर आणि विचार करायला लावणारे वाटले. पण तिथे प्रेक्षकांचा हशा पडायचा.

विषय , दिग्दर्शक, अभिनेते यांच्यातलं कोणी किंवा काहीच फारसं आवडतं नसूनही नाटक पाहून बरेच दिवस झालेत म्हणून पाहिलं. ठीक आहे. तरुणांना आवडेल.

माझ्या शेजारच्या सीटवरची तरुणी तिच्या आईला घेऊन आली होती. आईला हे नाटक अजिबात आवडलं नाही, असं मध्यंतरातल्या त्यांच्या बोलण्यावरून कळलं. त्या मधुकर तोरडमल, कविता लाड यांची नावं घेत होत्या.

परवा संदेश कुलकर्णी लिखित आणि अमृता सुभाष दिगदर्शित "असेन मी नसेन मी" बघितलं. केवळ अप्रतिम नाटक!
लिखाणात खूप खोली आहे. सुंदर संवाद आहेत. विषय सिरियस असला तरी मधेमधे असलेले हलके फुलके संवाद आणि विनोद (म्हणजे खदाखदा हसवणारे विनोद नाहीत तर स्मितहास्य आणणारे आणि वातावरण हलकं करणारे) छान पेरलेत.

तिघींचीही अ‍ॅक्टींग मस्त झाली आहे एकदम! अमृता सुभाषचा लाऊड अभिनय नाहीये. ती बोलत असताना हातवारे जरा जास्त करते. पण ते सोडता छान काम केलं आहे. शुभांगी गोखले एकदम सरप्राईज. त्यांनी त्यांची टिपरे स्टाईल विसरायला लावली आहे. डिक्शनमधले बदल एकदम आणि दोन्ही अंकांमधली एनर्जी जबरदस्त! पहिल्या अंकात त्या पूर्णवेळ व्हिलचेअरवर बसलेल्या आहेत, तरीही जणू संपूर्ण स्टेजभर वावर आहे इतक्या ताकदीने करतात. नीना कुलकर्णींबद्दल काय बोलावं? इतक्या वर्षांचा अनुभव दिसून येतो! विषय डिमेन्शिया आहे आणि वाढत जाणारा डिमेन्शिया नाटक जसं पुढे सरकतं तसा त्यांच्या अभिनयातून दिसून येतो. त्या पेशंट्सची बदलत जाणारी देहबोली, चालायची पद्धत, हातांचं हलणं आणि महत्त्वाचं म्हणजे बोलणं सगळंच अभ्यासकरून सादर केलं आहे. बोलता बोलता अगदी नेहमीची गोष्ट न आठवल्याने वाटणारी हतबलता आणि त्यामुळे घ्यावा लागणारा पॉज वगैरे वगैरे बारकावेही अप्रतिम!

एकंदरीत अगदी नक्की बघावं असं नाटक!

वरवरचे वधू वर हे नाटक पाहिले.
मला तर आवडलेच, पण मुलीला त्याहून जास्त आवडले..
(ती मराठी नाटक बघायला तयार झाली हे एक आश्चर्य)
तीनच पात्रे, दोन पात्रे फोनवर, एक सेट..
हसून हसून गाल आणि टाळ्या वाजवून हात दुखायला लागले अगदी ....

Pages