वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मजा केलेली दिसतेय.. ते तेव्हडे पनीरचे फोटो काढा रे कुणीतरी.. खुप त्रास होतो... असले फोटो पाहिले की Proud

वा!! काय सही आहेत फोटो. जबरदस्त मेनू आहे. खरोखरी कमाल आहे तुझी अंजली, एव्हढं सगळं केलसं. एकंदरीत प्रंप्रेला साजेसं गटग झालेलं दिसतयं. वृत्तांत येऊ द्या लवकर.

मागच्या वर्षी लालूकडे पहिल्यांदा वासंतिक कल्लोळ झाला. माझं हे पहिलं ए. ठि. ए. वे. तसं बर्‍याच वर्षांपूर्वी मी डिजेला भेटले होते पण त्या व्यतिरीक्त कुठल्याही मायबोलीकराशी/मायबोलीकरणीशी माझी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मला लालूकडे खूपच कमी वेळ मिळाला पण बर्‍याच मायबोलीकरांच्या ओळखी झाल्या. डिसीहून परत येताना सहजच संजयला म्हटलं, 'आपण करायचं का आपल्याकडे मायबोलीचं 'गेट टु गेदर' पुढच्यावर्षी?' त्याला बहुदा कल्पना आली नसावी ;). तो अगदी उत्साहानं हो म्हणाला. मग बाराबाफवर बोलताना 'पुढच्या वर्षीचा कल्लोळ माझ्याकडे' असं मी जाहिर केलं. तेव्हा सगळे उत्साहाने 'हो हो' म्हणाले. त्याच्या पुढच्या वर्षीचा कुठे करायचा याचंही बोलणं झालं. खरं तर त्याच्यावरून मी हिंट घ्यायला हवी होती पण 'भाबडा आशावाद' का काय म्हणतात ना तो होता. मधून मधून लालू मला 'तयारी कुठपर्यंत आली', 'धागा कधी काढतेस' विचारून कल्लोळाच्या 'मार्गा'वर ठेवत होती. करता करता डिसेंबरमधे धागा उघडला. पण लोकांचा उत्साह तोपर्यंत बारगळला होता ;). एकटी लालू पहिल्यापासून 'मी तुझ्याकडे कल्लोळाला येणार' म्हणत होती. रूनीपण म्हणाली 'मी येणार'. मी आणि रुनीनं कुणीही आलं नाही तरी लालू, रूनी आणि मी असा कल्लोळ करायचाच हे ठरवून टाकलेलं होतं त्यामुळे मी निवांत होते. तरी व्यक्तिशः आमंत्रण द्यायचं म्हणून सगळ्यांना फोन केले. बरेचजण येतो म्हणाले मग (अपेक्षेप्रमाणे) बारगळले. मी अगदी भारतात रहाणार्‍या लोकांनापण आमंत्रण दिलं. शेवटी शेवटी देसाई आणि भाईंनी माझ्या आमंत्रण देण्याला घाबरून बाराबाफवर यायचं सोडलं तेव्हा आमंत्रणं देणं मी आवरतं घेतलं ;). एक 'भावनेला हात घालणारी' वगैरे जाहिरात केली आणि मायबोलीवर टाकली तिथून वेबमास्तर किंवा अ‍ॅडमिननी ती पहिल्या पानावर टाकली. मग कल्लोळाची चर्चा होऊ लागली.

योगी तोपर्यंत शार्लटला आला होता, त्यामुळे तो येणार हे ठरलेलं होतं. मग खालिद आमच्या गावात आलाय याचा शोध लागला आणि त्यालाही आमंत्रण दिलं. मोहना आमच्या गावातच होती, तिला 'यायचंच' म्हणून दम दिला. मधुरीमा आणि कुटुंबियपण असणार होते. हो नाही करता करता बाराची बस निघाली. स्वाती, पन्ना बरोबर आदित्य आणि हर्षही निघाले. मेधानं आयत्यावेळी त्या बशीत उडी मारली आणि किन्नराचं काम चोख बजावत डायवरबुवांना झोपू न देता पहाटे गाडी आमच्या दारात उभी केली. वेबमास्तरांनी येतो म्हणून कळवलं होतं. सुमंगलताई पण अगदी आवर्जून सहकुटुंब आल्या. होता होता बरीच मंडळी जमली आणि कल्लोळाला बराच कल्लोळ होणार हे निश्चित झालं.

कल्लोळाचा दिवस जसा जवळ येऊ लागला तसा तणाव जाणवू लागला. सगळे तसे घरचे असल्यासारखेच होते पण एवढ्या लांबून आवर्जून येत आहेत म्हटल्यावर नीट तयारी करावी असं वाटत होतं. माझी तयारी सुरू असतानाची लगबग बघून संजय हळूच 'अगदी माहेरचे लोक येणार असल्यासारखी तयारी चालू आहे' असे म्हणाला. तो हे हळूच म्हणाला. माझ्या माहेरच्या लोकांबद्दल जोरात कसे बोलणार? सगळेजण आमच्याकडे राहतील असं ठरलेलं होतं. कल्लोळ म्हटल्यावर सर्वात महत्वाचं म्हणजे खाणंपिणं! आमच्याकडे वसंत ऋतू येऊन तसा जुना झाला होता त्यामुळे बार्बेक्यू ग्रिलींगचा बेत केला. पण पावसाचा काही भरोसा नव्हता त्यामुळे थोडं घरात ग्रिल करायचं थोडं बाहेर असं ठरवलं. सर्व पदार्थ मला घरी करणं शक्य नव्हतं त्यामुळे मोहना आणि मधुरीमाला एक एक पदार्थ करून आणता का विचारलं. त्यांना हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. योगीनं मुलांच्या गोड पदार्थांची (केक्स) जबाबदारी घेतली. थोडं जेवण बाहेरून मागवायचं ठरवलं. सकाळचा नाष्ता, दुपारचं जेवण वगैरेचे बेत ठरवले. मधुरीमानं संध्याकाळच्या जेवणाची जबाबदारी घेतली. सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी बाई आणि भाईंवर टाकली होती पण भाईंनी आयत्यावेळेस दगा दिला. त्यामुळे बाईंची जबाबदारी वाढली. शोनूनं ती वाटून घेतली.

बाराकर मंडळी पहाटे पाच वाजता आली. आल्या आल्या चहा घेणार का विचारलं पण अजून त्यांच्या चहाची वेळ झाली नव्हती. त्यांनी थोडी झोप घेणं पसंद केलं. माझी मात्र झोप ऊडाली होती. बाराकर डुलक्या घेत असताना मी आवरून स्वैपाकघरात घुसले. माझ्या आवाजाच्या चाहुलीनं आदित्य आणि हर्षपण उठले आणि त्यांनी घर explore करायला सुरूवात केली. तेव्हढ्यात सुमंगलांचा 'आम्ही निघालो आहोत' म्हणून फोन आला. मग हळू हळू एक एक जण उठून खाली आले. 'स्वातीला 'ल' कारांती ब्रेफापासून कटाक्षानं दूर ठेव' असं मेधानं सांगितल्यामुळे मी 'ली' कारांत ब्रेफा केला होता. सांबारासाठी भाज्या तोडायला बाराकरांना बागेत पाठवलं. मग गरमगरम ताजं(!) सांबार, चटणी करून ईडल्यांचा ब्रेफा झाला. चहा/ब्रेफा/कॉफी होईपर्यंत वेबमास्तरही आले. रूनीचाही फोन आला निघालो आहोत म्हणून. सगळी तयारी करे पर्यंत सुमंगलाही आल्या. मग लालू-रूनी-नितीन आले. सगळ्यात शेवटी गावातच रहाणारी मंडळी आली. मोहनाला मी जेवण घेऊन ये सांगितल्यानं ते घेऊन येईपर्यंत तिला यायला थोडा उशीर झाला. खालिद आणि त्याच्याबरोबर दैत्य(!) आणि त्याची अर्धांगिनी आली. माधव मांजरेकर म्हणून पूर्वी मायबोलीवर असायचा त्याला बोलावलं होतं पण नेमकं त्याला बाहेरगावी जावं लागलं असल्याने तो नव्हता पण त्याचे कुटुंबीय आवर्जून आले होते. संजयनं ग्रिलची तयारी केली आणि शोनूनं चिकन तंदूरी ग्रिल करायची जबाबदारी घेतली. आत किचनमधे पन्नानं मटण कबाब, व्हेज कबाब करायची जबाबदारी घेतली. पनीर तंदूरी ओवन मधे टाकलं आणि गप्पा सुरू झाल्या. पोरं इकडून तिकडे पळत होती. मधेच येउन आइसक्रीम सोडा पित होती, चिकन खात होती. एखादं कार्य चाललं असेल अशी गडबड होती. थोडक्यात घराला 'घरपण' आलं होतं. संजय आणि बुवांनी मोहितो आणि मार्गारीटाची जबाबदारी घेतली होती पण स्वाती आणि लालूच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी व्हर्जिन ड्रिंक सर्व्ह केलं. मला टकीला आणि वोडका/रमच्या बाटल्या तर रिकाम्या दिसल्या. संजयनं मधेच मला कशावरूनतरी टोमणा मारला तेव्हा त्या बाटल्यांमधल्या द्रव्याचं काय झालं ते कळलं ;). सगळ्यांचं अ‍ॅपिटायझरने पोट भरलं आणि सगळे आत येऊन बसले. मग गप्पा, हास्य विनोद, मायबोलीवरचे सध्याचे 'हॉट' विषय आणि आयडीज यांच्याबद्दल बोलणे (त्याला काही लोक गॉसिपींग म्हणतात, आम्ही उद्-बोधक चर्चा म्हणतो) सुरु झाले. वेबमास्तरांना 'पुरूषस्वप्नाच्या निमीताने' लेखावरून कोपच्यात घ्यायचा प्रयत्न झाला. मधुरीमानं जेवण वाढायची सूचना केली आणि सगळे जेवायला उठले. जेवणं झाल्यावर मग सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले. स्वातीनं 'ती फुलराणी' नाटकातला 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या प्रवेशाचं अफलातून सादरीकरण केलं. (मी कल्लोळानंतर यूट्यूबवर हा प्रवेश शोधायचा प्रयत्न केला तेव्हा अमृता सुभाषनं केलेला मिळाला. स्वातीनं केलेला नुकताच पाहिला असल्यानं अमृता डोक्यात गेली). शोनूनं एका पुस्तकातल्या उतार्‍याचं वाचन केलं. कॉपीराईट मुळे पुस्तकाचं नाव जाहिर करण्यात येणार नाही. सुमंगल आणि त्यांचे better half उर्फ किंचीत मायबोलीकर जय यांनी एक गाणं सादर केलं. स्वातीनं एक गझल म्हटली. जय, खालिद आणि वेमा यांनी कोडी घातली. कोडी सोडवेपर्यंत चहाची वेळ झाली. चहा घेऊन गावातली मंडळी निघाली तेव्हा एक फोटो सेशन झालं. मग बाकिच्या लोकांनी आमच्या कम्युनिटीमधे फिरायला जायचं ठरवलं. पाऊस पडत होता तरी सगळे निघाले. मधेच पावसाची मोठी सर आली तेव्हा लालूनं वर्षाविहारही झाल्याचं जाहिर केलं. घरी आल्यावर आदित्य, शिवानी आणि रेणूकानं त्यांचा बिझनेस प्लॅन वेमा आणि बाकीच्या लोकांसमोर ठेवला. त्याबद्दल बुवा आणि योगी जास्त सांगू शकतील.

संध्याकाळी मधुरीमाकडे जेवायला गेलो. दुपारी भरपूर जेवण झालं आहे असं म्हणत म्हणत सगळ्यांनी जेवणाचा फडशा पाडला. असंख्य चटण्या आणि लोणची, मटकीची उसळ, मूगडाळ खिचडी, फोडणीचं ताक, पोळ्या, पापड असा अस्सल मर्‍हाटी मेन्यू होता. सॅलडही होतं म्हणे पण मी उशीरा पोचल्यानं मला दिसलं नाही. डेझर्ट म्हणून मायबोलीवर कोणी 'केया' म्हणून आहे (होती) तिच्या रेसेपीनं 'कुलदीप' केलं होतं. मधुरीमाकडे नाना नेनेपण आले होते, त्यांची भेट झाली. नानांना भेटून बुवांना एकदम भरून आलं आणि त्यांनी नानांची गळाभेट घेतली.सुमंगल आणि कुटुंबीय मधुरीमाकडेच मुक्कामाला थांबणार होते. आणि तिथूनच सकाळी डिसीला परत जाणार होते. आम्ही जेवण करून आणि त्यांना बाय म्हणून परत आलो.

घरी आल्यावर आदित्य, शिवानी आणि हर्षने वेमांना वेठीला धरले आणि मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमीचे प्रयोग करायला सुरूवात केली. वेमांचा मुलांबरोबरचा पेशन्स जबरदस्त आहे हे नमूद करावसं वाटतं. तसा त्यांचा पेशन्स वाढायला असंख्य मायबोलीकरांनी मदत केली असावी असा माझा अंदाज आहे. तोपर्यंत सुमंगलांकडून आणलेल्या कोनानं आम्ही मेंदी काढायला सुरूवात केली होती. मेंदीबरोबरच गप्पा, हसणं चालू होतंच. शेवटी रात्री एक वाजता सगळे झोपायला गेले. तरी खोल्यांमधे कंपू तयार होऊन जवळपास २ वाजेपर्यंत गप्पा चालल्या होत्या.

सकाळी सगळ्यांनी उठून ब्रेफा केला आणि बाराकर मंडळी निघाली. मला थोडं वाईटही वाटत होतं. परत सगळे कधी माझ्याकडे येतील? अशी मजा परत कधी करता येईल माहित नव्हतं. ज्युनिअर मायबोलीकरांनी एकमेकांचे फोन नंबर, इमेल घेतले. नीट, सावकाश जाण्याचे परत परत सांगून त्यांना बाय करून आत आलो आणि परत गप्पा सुरू झाल्या. थोड्यावेळानं डिसीकर मंडळीपण जायला निघाली. गडबडीत त्यांच्यासाठी शिदोरी बांधलेली होती ती द्यायची राहिली. वेमांचे फ्लाईट दुपारी होते. तेवढ्या वेळात मी आणि संजयनं त्यांना नॉर्थ कॅरोलिना कसं मस्त आहे आणि तुम्ही इकडेच रहायला या असा पटवायचा प्रयत्न केला :हाहा:. याचा उलटा परिणाम झाला नाही म्हणजे मिळवली ;).

संजय वेमाना एअरपोर्टवर सोडायला निघाला. आता घर सुनं सुनं वाटायला लागलं. वेमांनी आपल्या कुटुंबीयांचा वेळ मायबोलीला दिला. आज मायबोलीशिवाय रोजचा दिवस सुरू होत नाही. सातासमुद्रापारही लोक मायबोलीच्या धाग्यानं एकमेकांशी बांधले गेले आहेत. कुठले असतील हे ऋणानुबंध? मायबोलीने आम्हाला काय दिलं याचा विचार करताना एकदम जाणवलं, अजून एक माहेर दिलं. इतक्या कौतुकानं, थोडाफार त्रास सहन करून, इतक्या लांबचा प्रवास करून, आपापली कामं बाजूला ठेवून आपुलकीनं मंडळी आली. घराचं, जेवणाचं कौतुक केलं. यायच्या आधी प्रत्येकीनं मला फोन करून विचारलं, 'तुला काही आणू का इकडून?' बुवांनी सांगितलं फार त्रास घेऊ नकोस, सगळे घरचेच लोक आहेत. त्यांनी येण्या जाण्याचं १०-१० तास ड्रायव्हिंग करून मायबोलीकरांना सुखरूप आणलं, परत नेलं. पन्ना सतत माझ्याबरोबर किचनमधे उभी होती. शोनूनं माहेरपणासाठी आमंत्रण दिलं. लालू तब्येत बरी नसताना आली. योगीनं मी आल्यावर तयारी करू, तू फार धावपळ करू नकोस सांगितलं. मधुरीमा, मोहना परत परत काय मदत हवी आहे विचारत होत्या. मधुरीमानं सुमंगला आणि कुटुंबियांची अगदी आनंदानं रहाण्याची सोय केली. निघताना स्वातीलाही चुटपुट लागली. हे सगळं जुळवून आणणं संजय आणि माझ्या लेकीच्या भरभक्कम पाठिंबा आणि सहकार्याशिवाय मला एकटीला जमलं नसतं. शेवटी भाउ-बहिण-मित्र-मैत्रिण ही नाती म्हणजे तरी काय? आज प्रत्येक आनंदाच्या, तणावाच्या वेळेस मायबोली आणि मायबोलीकर आठवतात. कोणीतरी कशावरतरी केलेल्या कोटीची आठवण येते. पटकन हसू येतं. कुणाचं देणं ठेवू नये म्हणतात. पण अजयनं दिलेल्या या देण्यातून कधी मुक्त व्हावं असं मला वाटत नाही. मी कायम मायबोलीच्या ऋणात राहिन.

अरे देवा! मला किती डाइम्स जमा कराव्या लागणार आता!! बाथरूममधे पळून रडून यावं हेच बरं! Happy
मस्त लिहिलंस - सगळा आढवा आला. Happy

नशीब, शोनूने निदान बुलेट्स टाकल्या होत्या, नाहीतर होष्टांचा वृत्तांत सर्वप्रथम आल्याने परंपरा मोडली असती! Proud

छान लिहिलयस अंजली. Happy

मधेच पावसाची मोठी सर आली तेव्हा लालूनं वर्षाविहारही झाल्याचं जाहिर केलं >> मग आता तुम्ही पण ओले फोटो टाकणार आहात का काय? Biggrin

मस्त अंजली !
शेवटी टचकन पाणी वगैरे पण.. (ही पण कल्लोळाची परंपरा आहे लक्षात ठेवा नेक्स्ट होस्ट नी.) :).
बाथरुम मधे जाऊन रडणे, पावसात ओले होणे विसरले होते लिहायला ते वरच्या सगळ्यांनी माझ्या मनातल् लिहिण्याने पुन्हा एकदा ट.पा.
बुवांनी सांगितलं फार त्रास घेऊ नकोस, सगळे घरचेच लोक आहेत. त्यांनी येण्या जाण्याचं १०-१० तास ड्रायव्हिंग करून मायबोलीकरांना सुखरूप आणलं, परत नेलं
<<<< परत नेलं (एकदाचं) Biggrin

अंजली रडवलस ना... मी चालले बाथरूममध्ये रडायला
(वेमा - तुमचे १० सेंट्स चेकने पाठवण्यात येत आहेत ;))
रचाकने जबरदस्त गटग झाले, खूप जास्त लोक नव्हते त्यामुळे सगळा ग्रूप एकत्र बसून गप्पा मारत होता. नाही तर दर गटगला अर्ध्याहून अधिक उद्बोधक चर्चा मिस होते.
स्वाती, संजय, सुमॉ सगळ्यांच्या आदरातिथ्याचे करावे तेवढ कौतुक कमीच आहे.

अंजली, किती सुंदर लिहिलं आहेस ग. मायबोली हे मायघरच आहे याचा अजून एकदा प्रत्यय आला. तुम्ही सगळे किती आनंदाने करता एकमेकांसाठी. त्यामुळेच सगळे आवर्जून येतात्/जातात अशा कल्लोळाला. छानच. Happy

मिनोती तुझे १० सेंट्स लगेच वेमांकडे पाठव. Wink
कल्लोळात करार झालाय मायबोलीसोबत - हसू किंवा रडू आले की १० सेंट्स.

अंजली, ज्या भावना तु व्यक्त केल्यास त्याच भावनांन मुळे मला सगळ्यांना घेउन येता आले. आभार म्हणत नाही. पण पुन्हा असेच भेटुया.

मस्त लिहिलंय. Happy

>>माहेर दिलं
हो, मला माहेरपणाला ये असं सांगितलं होतं. ती आज्ञा मानून मी माहेरपणाला गेले आणि आराsssम केला. Wink

अंजली, मस्त लिहिलाय वृत्तांत. Happy
स्वाती आणि शोनू यांनी त्यांचा कार्यक्रम पुन्हा एकदा बारा एवेएठीला सादर करावा ही विनंती.

.

अंजली..मेन्यूचे फोटोपाहून तोंडाला पाणी सुटलं होतं.. वृत्तांत वाचून डो.ट.पा.आ. !! Proud

छान लिहिलय. गटगला येणं जमलं नाही. त्या भागात येऊ तेव्हा नक्की भेटू तुम्हाला किंवा तुम्ही अटलांटाला या कधीही. आमची आठवडी गटग सुरुच असतात. Happy

Pages