ओल्या काजूंची उसळ

Submitted by शैलजा on 3 December, 2010 - 11:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो ओले काजू, २ हिरव्या मिरच्या, १० -१५ काळी मिरी, २ टेस्पू ओलं खोबरं
फोडणी साठी - हिंग, हळद आणि मोहरी
चवीसाठी मीठ आणि साखर
वरुन घालण्यासाठी बारीक चिरुन कोथिंबिर

क्रमवार पाककृती: 

काजू सोलून घ्यावेत.

कढईत तेल तापवून, त्यात हिंग, हळद आणि मोहरी यांची फोडणी करुन, वर काजू घालावेत. अर्धा वाटी पाणी घालून मंद गॅसवर मऊसर शिजू द्यावेत. काजू शिजत असताना, मिरी, हिरव्या मिरच्या व खोबरे एकत्र जाडसर वाटून घ्यावे.

काजू शिजल्यावर त्यात हे वाटण घालून,चवीपुरते मीठ व साखर घालून एकत्र करावे व ५ -१० मिनिटांनी गॅस बंद करावा. उसळ जरा ओलसरच ठेवावी.

सर्वात शेवटी वरुन चिरलेली कोथिंबिर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

ओले काजू साधारण फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मिळतात. सुकवलेले ओले काजूही मिळतात, ते वापरायचे असतील तर आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून, दुसर्‍या दिवशी सोलावेत.

हीच उसळ, हिरव्या मिरची ऐवजी अर्धा चमचा तिखट व गरम मसाला प्रत्येकी, वापरुनही करता येते. बाकी कृती वर दिल्याप्रमाणेच.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलजा, कोकणात बालपण गेलं, पण ही ऊसळ खायचीच राहीली.
प्रज्ञा१२३, .. ह्या वेळी जर मला तुझ्याकडून ऊसळ मिळाली नाही तर माझ्याशी गाठ आहे. लक्षात ठेव. दरवर्षी तुम्ही भरपूर खाता. त्यामुळे यावेळी घरात कुणलाही न देता सगळी ऊसळ मलाच पाठवून दे. तुझ्या घरच्यांना माझं नाव सांग. आतुरतेने वाट पहातेय. (ऊसळीची)नक्की पाठव.

आमची मावशी काजूची आमटी बनवायची.त्या पूढे मटण फीके लागायचे. गेल्या कित्येक वर्शात काजूची आमटि खाल्ली नाही. अशा जुन्या खपल्या ऊगाचच काढू नये.
हाणायलाच हवे हिला.

मी काजूची उसळ आयुष्यात कधीही खाल्लेली नाही, खायचं सोडा पण
कधी नुसती पाहिलेली सुद्धा नाही, इथे एक फोटो आहे वाटतं, पण तो दिसत नाहिये.
पाकृ तर सुरेख आहे, पण मला काजुची उसळ खायला कधी मिळणार? Uhoh

दक्षिणा म्हापश्याला मार्केटमध्ये कॅफे कॉर्नर म्हणुन एक हॉटेल आहे तिथे बियांची भाजी मिळते. पण सकाळीच जावे लागते.

Pages