ओल्या काजूंची उसळ

Submitted by शैलजा on 3 December, 2010 - 11:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो ओले काजू, २ हिरव्या मिरच्या, १० -१५ काळी मिरी, २ टेस्पू ओलं खोबरं
फोडणी साठी - हिंग, हळद आणि मोहरी
चवीसाठी मीठ आणि साखर
वरुन घालण्यासाठी बारीक चिरुन कोथिंबिर

क्रमवार पाककृती: 

काजू सोलून घ्यावेत.

कढईत तेल तापवून, त्यात हिंग, हळद आणि मोहरी यांची फोडणी करुन, वर काजू घालावेत. अर्धा वाटी पाणी घालून मंद गॅसवर मऊसर शिजू द्यावेत. काजू शिजत असताना, मिरी, हिरव्या मिरच्या व खोबरे एकत्र जाडसर वाटून घ्यावे.

काजू शिजल्यावर त्यात हे वाटण घालून,चवीपुरते मीठ व साखर घालून एकत्र करावे व ५ -१० मिनिटांनी गॅस बंद करावा. उसळ जरा ओलसरच ठेवावी.

सर्वात शेवटी वरुन चिरलेली कोथिंबिर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

ओले काजू साधारण फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मिळतात. सुकवलेले ओले काजूही मिळतात, ते वापरायचे असतील तर आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून, दुसर्‍या दिवशी सोलावेत.

हीच उसळ, हिरव्या मिरची ऐवजी अर्धा चमचा तिखट व गरम मसाला प्रत्येकी, वापरुनही करता येते. बाकी कृती वर दिल्याप्रमाणेच.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलजा माझी मैत्रीण आहे मालवणातलीच. तिच्या सासूबाई त्यांच्या दारचे काजू पाठवतात दर वर्षी. जे आलेत काजू ते अगदी सोनं मिळाल्याप्रमाणे जपून ठेवलेत. आता करतेच उसळ.

खर्~~~~~~~~~~~~~~~च तोंडाला पाणी सुटले. आमच्या ओळखिचे एक आहेत ते आठवणीने दरवर्षी आम्हाला आणून देतात.
पुण्यात कोठे व कधि मिळतात?

प्रॅडी, विपू पहा प्लीज.
प्रज्ञा,मजा आहे की मग. पुण्यात कोठे मिळतात ठाऊक नाही अजून.

आम्हि लहान असतान ते कोवळे काजु सोलुन खुप खायचो. हात एवढे खराब झालेले असायचे. ति काजुचि बोंडे पण मला खुप अवडतात. खुप वर्षात नाहि खाल्ले. ह्या आठवणीने मन अगदि कातर झाले.

मी पण नव्हते बघितले ओले काजु कधी. कोणत्या दिवसात मिळतात? आत्ता मिळतिल का गोव्यात? (अनायसे तिथे प्रोजेक्ट चालू आहे, कोणाबरोबर तरी मागवता येतिल फिल्डवरून)

खरच तोंपासु. ओल्या काजुची उसळ खाऊन अनेक वर्ष झालीत.
ओल्या काजुंचा एक फोटो इथे सापडला बघा. रेसिपी मात्र इथे शैलजाने दिलीए तीच वाचा हं. Happy
http://www.mumbai-masala.com/maincourse/cashew_curry.html

कौपिनेश्वराच्या बाहेर मिळतात का हे ओले काजू? सकाळी किती वाजायच्या आत गेलं तर मिळतील? साधारण किती भाव असतो (कुणी शेंड्या लावायला नकोत म्हणून विचारतेय Wink ).

मला ही उसळ खाल्ली की पित्तं होतं Sad त्यामुळे या उसळीबरोबर जेवणात सोलकढी असणं अपरीहार्य... सोलकढी म्हणजे मसालेभात हवा... त्यात पुन्हा ओले काजू आलेच.
ही पाकृ वाचताना हा तोंपासु मेनू डोळ्यासमोर नुसता नाचत होता आणि मी खात होते गवारीची भाजी आणि पोळी Sad म्हणून अशी प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया निघून गेली.
सॉरी!!

हो गं याने पित्त होतं. गरम पडतात. मी एकदाच एका मुंजीत ही उसळ खाल्लीय.
थोडीशीच खाल्लेली बरी आणि वर सोलकढी.

शैलु, कित्ती ते मनाचे हाल करता तुम्हि लोकं??? Sad आता माका खावंक कधी बोलवतसं??? Proud
कह्रच अजीची आतह्व इली. एकदा मी तिका मदत म्हणुना ओले काजुगर सोलाक गेली तर म्हणते कशी, "चेडवा थकडे लांब जा. हयसर हात घालु नुको हाता कुसतले.. आमका सवय हा उगाच हाताची, कपड्यांची वाट लागतली." Sad
रच्याकने एका मैत्रिणिच्या ल्ग्नात ही भाजी खाल्लेली त्याका आता वर्शा लोटली.. Sad

अरे देवा, मंजू सॉरी वगैरे कशाला ते? स्मायल्या नाही का पाहिल्यास? Happy
अल्पना, टीपा मधे लिहिलं आहे की! "ओले काजू साधारण फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मिळतात"

शैलजा... ओले काजू बाजारात आले की तातडीत गटग ठरवून खायला घाल सगळ्यांना...

आजोळी घरचीच झाडं असल्याने दरवर्षी भरपूर वेळा होते की ही उसळ.... एक नंबर झक्कास.... उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणातून परत येताना वाटेत माणगावच्या बाजारात थांबून मुद्दाम ओले काजू खरेदी करायचे आणि मग पुढचे काही दिवस पुरवून पुरवून खायचे... त्यासुमारास कधी जर मामा आलाच तर आईची स्टँडींग ऑर्डर असते त्याला.. ओले काजू घेऊन यायची...

अजून जळावू पदार्थ म्हणजे बटाट्याची ओले काजून घालून केलेली भाजी....

>>शैलजा... ओले काजू बाजारात आले की तातडीत गटग ठरवून खायला घाल सगळ्यांना...
आजोळी घरचीच झाडं असल्याने दरवर्षी भरपूर वेळा होते की ही उसळ.... >> चालेल रे हिम्या, आता तुझ्या घरचीच झाडं आहेत म्हटल्यावर तू आणशीलच सगळ्यांना पुरतील इतके ओले काजू, मग उसळ करायची जबाबदारी माझी. Proud

आशू.. रोज नाही.. फक्त सिझन मध्ये....

शैलजा... सहकारनगरच्या रस्त्यावर पोहोचायचं आणि कोणालाही विचारायचं.... एकतर रिलॅक्सचा पत्ता तरी सांगतील नाही तर टिपीकल पुणेरी लूक देतील... काय बाईये हिला साधं रिलॅक्स माहिती नाही...

छान चव होती ओल्या काजूंच्या उसळीला! Happy
ओले काजू गरम पाण्यात भिजत ठेवले थोडावेळ. त्यामुळे नंतर पटापट सालं काढता आली.
खोबर्‍यासाठी नारळ फोडला, त्या नारळाच्या पाण्यातच शिजवले काजू!
बाकी सगळे पाकृमध्ये सांगितल्याप्रमाणे...हिरव्या मिरच्या आणि काळीमिरी वापरून!

मुंबईत दादरला शिवाजीमंदिरच्या बाजूला नेहा कलेक्शन्स नावाचे दुकान आहे. तिथे एक माणूस ओले काजू विकायला बसतो.

छान रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

Pages