संथ चालती ह्या मालिका, त्यांच्यावरची आमची टिप्पणी ऐका

Submitted by स्वप्ना_राज on 3 December, 2010 - 01:08

मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.

वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.

वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.

वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.

-----

गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."

"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.

"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"

"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."

बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"

कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"

कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.

"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.

इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.

तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.

रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स वरदा. Happy वरची पोस्ट D - 1 ची. पुढील पोस्ट D - २ ची.

अरुंधतीमध्ये रडारड चालू असताना अपघाताची चौकशी करायला पोलीस आले, पद्मिनीराजेंनी सुपारी दिलेला माणूस धडपडत आला, मागून दिग्विजयभाऊ आले. पण एकदाही दरवाज्यावरची बेल वाजलेली ऐकायला आली नाही की कोणी दरवाजा काढायला गेलं नाही. आणि आमच्या घरी दरवाजा कोणी काढायचा ह्यावरून रात्रंदिनी युध्दाचा प्रसंग असतो. बहुतेक सरंजामेचं घर 'मेरा दर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिये' म्हणून सदोदित उघडं असेल बुवा.

तर दिग्विजयभाऊनी पोलिसांना सांगितलं की मला ह्या माणसाने मारायचा प्रयत्न केला मग पोलीस त्याला घेऊन गेले. इथे पद्मिनीराजे दिग्विजयची दृष्ट काढायला निघाल्या तेव्हा त्याने त्या माणसाने सुपारी देतानाचं पद्मिनीराजेचं बोलणं टेप करून ठेवलं होतं ते सर्वांना ऐकवलं. मग पद्मिनीराजेनी आपण दिग्विजयच्या वडिलांना का मारलं ते सर्वांना सांगितलं. त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून वाढवलेली कंपनी नावारूपाला येताच त्यांना दिग्विजयच्या वडिलांनी बाजूला केल्याचा राग आला म्हणे. पण दिग्विजयच्या वडिलांनी आपली सारी इस्टेट दिग्विजयच्या नावावर केली त्यामुळे त्याचा अपघात घडवून त्याला आंधळा करणं पद्मिनीराजेना भाग पडलं. हे सर्व संदर्भासहित स्पष्टीकरण चाल असताना तिथे हजार असलेली मंडळी - अरुंधती, सायली, अरुंधतीचा भाऊ, दीर, नणंद - यथाशक्ती धक्का बसल्याचा अभिनय करत होती. आपण सुजाण प्रेक्षक असल्याने आपल्याला धक्का बसत नाही. हे असले धक्के पचवून खरं तर आता आपल्याला विजेचा धक्का तरी बसेल की नाही शंकाच आहे.

आता उरलेल्या एपिसोडसमध्ये 'बुढिया गोईंग जेल, जेल्मे बुढीया चक्क पिसिंग एन्ड पिसिंग एन्ड पिसिंग', अरुंधती-दिग्विजय मिलन वगैरे गोष्टी यथासांग पार पडतील. अनेक एपिसोडपूर्वी अरुंधतीच्या वडिलांनी आत्महत्या केली होती पण त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती हे बहुतेक मालिकेतले सगळे विसरले असले तरी दुर्देवाने माझ्या लक्षात आहे. अर्थात मालिकेचा कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला असल्याने तो बघायला परत येण्याचे चान्सेस नाहीत. देव मृतात्म्याला शांती देवो.

स्वप्ना_राजः

तू तिथे मी - भाग पहिला (समस्त चिमां पंख्यांची बिनशर्त माफी मागून)

चार पांढरे पाय.....घोड्याचे. घोड्यावर चिमां असणार हे आपल्याला लगेच कळून येते. तो घोड्याला थोपटतो आणि तिथून निघतो. घोडा नशीबवान. त्याचं एव्हढ्यात निभावलं. आपण मालिकेच्या (किंवा जगाच्या) अंतापर्यंत सडणार.

मग एक घर. लगबग चालू आहे. एक जरीची साडीवाली बाई (पैठणी असेल. मला साड्यातलं काही कळत नाही) इकडेतिकडे करत आहे. एक नोकर तोरण घेऊन येतो. त्याला ती सूचना देते. फोनवर बोलत तिचा नवरा येतो (रमेश भाटकर). त्याला पण ती तयार होण्याच्या सूचना देते. मग आतून एक मुलगी येते. आईला 'मी कशी दिसते' वगैरे विचारते. मग आणखी एक माणूस येतो. तो ह्या मुलीचा काका. काकू कुठूनतरी येतात. एकूणात त्या जरीवाल्या बाईच्या मोठ्या मुलीला, मंजिरीला, बघायला कोल्हापूरचे कोणी सरदारघराण्यातले मुधोळकर म्हणून लोक येणार आहेत ते आपल्याला कळतं. हे पहिलंच स्थळ असतं म्हणून तोरण वगैरे असावं अशी आपण समजूत करून घ्यायची का? बरं बायामंडळी छानसे कपडे घालून सजलेल्या. पण पुरुषमंडळींच्या अंगावरच्या कपड्याबद्दल सॉल्लीड अनास्था. मुलीच्या वडिलांच्या अंगावरच्या सदर्‍याचं वर्णन पुलं म्हणतात तसं 'मळखाऊ' ह्या एकाच शब्दात करणं योग्य. काकांचा शर्ट 'शालू हिरवा पाचू नी मरवा' असा गर्द हिरवा. ह्यांचंही घराणं सरदारांचं असं त्यांच्या बोलण्यात येतं. पण मुलीच्या बाबांचा 'स्वतःच्या स्वकर्तृत्वावर विश्वास' म्हणे. बरं झालं सांगितलं. नाहीतर मला वाटलं असतं की 'शेजार्‍याच्या स्वकर्तृत्वावर विश्वास' आहे.

तर मंजिरी ब्यूटी पार्लरमध्ये गेली आहे ती अजून आलेली नाही. फोन घरी विसरून गेली आहे. घरचे हवालदिल.

मग एक बंद पडलेली गाडी. आणि तिचं बोनेट उघडून आत डोकं घालून बसलेली हिरवीण. एक बाईक जवळ थांबते. तिच्यावरचा माणूस 'काय मॅडम, गाडी मध्येच थांबवलीय? रस्ता काय तुमच्या मालकीचा अहे?" असे गौरवोद्गार काढतो. लगेच हिरवीण डोकं वर काढून बघते. कुठल्याही मालिकेत हिरवीणीच्या पहिलावहिल्या शॉटमध्ये उडतात तसे तिचे केस वार्‍यावर उडतात. हा माणूस तिचा मित्र असतो. तो तिला 'त्यात काय डोकं घालून बसली आहेस? तुला काय कळतं त्यातलं?' असे उद्गार काढतो. ह्याचा निषेध म्हणून बोनेट उघडल्यावर जेजे काही दिसतं त्या सर्व बाबींची इत्यंभूत माहिती मिळवल्याखेरीज मी स्वस्थ बसणार नाही असा मी पण केला आहे. असो. मग ती मित्राला आपली गाडी बंद पडली आहे, घरी सोड वगैरे सांगते. आणि तालिबानी लाजतील अश्या रीतिने ओढणीने चेहेरा झाकून बाईकवर बसते.

दोघं बाईक वरून जात असताना मागून एक गाडी येते. ती ह्यांना ओव्हरटेक करून जाताना चिखल उडवते. मग हे दोघे बाईक त्या गाडीसमोर आडवी घालतत. गाडीतून कोण उतरतं सांगा पाहू मुलांनो? बरोब्बर! चिमां.
मित्र चिमांवर गुरकावतो. हिरवीण चिमांवर गुरकावते. मग चिमां तिच्यावर गुरकावतो. आणि कपडे धुवायचे पैसे काढून मित्राच्या हातात ठेवतो. हिरवीण चिखलाने भरलेले हात चिमांच्या कोटावर उठवते आणि पर्समधून नव्या कपड्याचे पैसे त्याला देते.मग बाईक पुढे निघून जाते.

इथे घरात सर्व काळजी करत असताना बेल वाजते. मग मुलीचे बाबा, आई, बहिण, काका, काकू ह्यांचे भेदरलेले क्लोजअप्स. दरवाजा उघडून एलियन किंवा predator ह्यांपैकी कोणीतरी एक येणार आहे अश्या रीतीने दाराकडे पहातात. काका दरवाजा उघडतात. मुलाची आई आणि कोणीतरी एक बाई आलेले असतात. मग त्या दोघी बसतात. मुलीचे आईवडिल बसतात. बहिण, काका (वेटरसारखे हात पुढे बांधून), काकू उभे.
काका हिरवीण आली आहे का बघायला जातात. हिरवीण घराच्या समोर उतरते. तिला पहायला मुलगा येणार आहे हे कळताच मित्र 'मुझे कुछ केहना है' असं म्हणतो. हिरवीण जन्मजात माठ असल्याने तिला काही कळत नाही. आपण माठ नसल्याने आपल्याला कळतं. ती त्याला 'आपण उद्या बोलू' अस सांगून सटकते. मला वाटलं मित्र 'उद्या फार उशीर झाला असेल मंजिरी' असं म्हणेल पण नाही.

तिला पाहून काकांचा हिरवा जीव भांड्यात पडतो. ते आत येऊन मंजिरी आली असं जाहिर करतात. भावी सासूबाई विचारतात 'आली म्हणजे? कुठे बाहेर गेली होती का?" पुन्हा घाबरलेले चेहेरे. मग काका 'म्हणजे तयार होऊन आली' असा खुलासा करतात. अरे, गेली होती बाहेर तर स्प्ष्ट सांगा ना. त्यात काय घाबरायचं? भावी सासूबाई 'सत्यजित एव्हाना यायला हवा होता' असं म्हणतत. मुलीचे बाबा म्हणतात 'अहो, होतो उशीर कधीकधी'. सासूबाई लगेच 'ते आमच्या सत्यजितच्या बाबतीत होत नाही. एक वेळ घड्याळ चुकेल' वगैरे बोलतात. मुंबैच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला लावा म्हणावं त्या सत्यजितला.

मंजिरीबाई कुठल्याश्या चोरदरवाज्याने आत गेल्या असाव्यात कारण त्या भावी सासूसमोरून जात नाहीत. वरच्या खोलीत साडी नेसून तयार होतात. मग आई विचारते 'तू लग्नाला तयार आहेस ना?' काय पण मूहूर्त शोधलाय? हे आधी नाही का विचारायचं? मग मंजिरी आधी पहाण्याचा कार्यक्रम होऊ देत. त्यांना मी पसंत पडू देत वगैरेबोलते. हायला, मुलाने पसंत केलं की झालं? मुलीला नको मुलगा पसंत पडायला? असो. मग ती आपल्याला 'हूरहूर का काय म्हणतात तशी वाटते आहे' असंही म्हणते. मी फिदीफिदी का काय म्हणतात तशी हसले. राडा, भिडू नकोस असे शब्द वापरणारी हिरवीन आणि हूरहूर? आईसाहेब 'मान खाली घालून बस' आणि 'लाजायला शिक' असे संतापजनक 'लास्ट मिनिट' सल्ले देतात.

तर यथावकाश हिरवीण, चहाची किटली, ट्रे, कप आणि बश्या खाली येतात. बरणीत तुडुंब भरलेल्या चकल्या नकोत, पोहे नकोत पण गेला बाजार ग्लुको बिस्किटं तरी ठेवा की चहाबरोबर. नुस्ता चहा? सासूबाई तिला ज्या पध्दतीने (आपादमस्तक) पहातात ते बघून मला पुलंचं 'बायका बायकांकडे जितकं निरखून पहातात तितके पुण्यातले पेन्शनरही नाही हो पहात' हे आठवलं. मग त्या मंजिरीला 'मुंहदिखलाई' देतात. आईसाहेब लगेच 'मंजिरी, त्यांना चहा दे'. एव्हढ्यात बेल वाजते. पुन्हा सगळे बघतात. भावी सासूबाई म्हणतात 'सत्यजित आला असेल'. काका तत्परतेने दार उघडतात.

मग दोन पाय दिसतात.....बूट घातलेले. चिमांचे असतात. मंजिरी मान खाली घालून बसलेली असते. चिमांला पाहून सगळे दचकतात. मग चिमांची आई 'अरे हे कसले डाग? चिखलाचे दिसतात' असं म्हणून त्याच्याजवळ जाते. मंजिरी दचकते. मग चिमां येऊन बसतो. त्याची आई 'सत्यजित पुराण' सुरू करते. चिमां द्टावतो. मग मंजिरीची आई 'अग, चहा दे त्यांना' म्हणून तिचा पुन्हा वेटर करते. चिमां 'आपण कधी भेटलो होतो का' असा भेदक प्रश्न विचारतो. हिरवीण घाबरून चहाने ट्रे भरून टाकते.

इथे पहिला एपिसोड संपतो. हुश्श!

पहिला सेल्समन - 'नाही, त्याची गरज नाही हो. खरंच नाही. नाही, नाही, धन्यवाद'. फोन आपटतो.
दुसरा सेल्समन - 'काय झालं रे? चिडलायस एव्हढा'

पहिला सेल्समन - अरे यार, लोकांचा काय सौजन्य सप्ताह चालू आहे काय?
दुसरा सेल्समन - का रे? काय झालं काय?

पहिला सेल्समन - इन्शुरन्स प्रोडक्टबद्दल सांगायला गेलो तर ओळीने चार लोक मला 'किती कष्ट करता तुम्ही. थोडी विश्रांती घेत जा' म्हणाले. एकदोघांनी तर 'तुमच्या प्रीमियमचे पैसे पण आम्ही भरतो' असं म्हटलं. आज कोणी रागावून फोन बंद पण नाही केला.
दुसरा सेल्समन - दुनिया पागल है, या फिर मै दिवाना

पहिला सेल्समन - थट्टा सुचतेय तुला?
दुसरा सेल्समन - चिडू नको रे. मी पैज लावतो की त्या सगळ्या लोकांनी अरुंधतीचा लास्ट एपिसोड पाहिला असेल.
पहिला सेल्समन - का? असं काय दाखवलं त्यात?

दुसरा सेल्समन - अरे ती अरुंधती पद्मिनीराजेकडे पैसे घ्यायला नव्हती आली. दिग्विजयच्या पहिल्या कमाईचे पैसे द्यायला आली होती. तिच्या मनाचा उमदेपणा पाहून पद्मिनीराजेच्या डोळ्यात अश्रू आले रे. मग लगेच त्या तिच्या घरी गेल्या. तिथे त्यांनी आपले डोळे उघडले असल्याचं सांगितलं. मग सगळी संपत्ती दिग्विजयाच्या नावावर करून आपण एक प्रेस कॉन्फरन्स बोलावून आपल्या गुन्ह्यांची कबुली देणार असल्याचं सांगितलं. लगेच दुसर्या दिवशी २-३ कॅमेरामन्स आणि १-२ रिपोर्टरसारखे दिसणारे लोक त्यांच्या हॉलमध्ये जमा झाले. पद्मिनीराजे काही बोलणार एव्हढ्यात अरुंधती, तिचा दीर आणि दिग्विजय तिथे आले. त्यांनी पद्मिनीराजे सरंजामे फाऊन्डेशनची स्थापना करून आपण अंध व्यक्तींसाठी काम करणार असल्याचं जाहीर केलं. मग लगेच अरुंधतिच्या दिराचा आणि सायलीचा साखरपुडा झाला. मग एक समारंभ दाखवला त्यात पुन्हा मुलाखत घेणार्‍याने पद्मिनीराजेना त्यांच्या सुनेबद्दल विचारलं, त्यांनी अशी सून मिळाली हे आपलं भाग्य असल्याचं सांगितलं. अरुंधतीला तिच्या सासुबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी अशी महत्त्वाकांक्षी सासू मिळाली हे आपलं भाग्य असं सांगितलं.

पहिला सेल्समन - तो मुलाखत घेणारा टीव्हीतून बाहेर आला असता तर मी पण ही मालिका एकदाची संपली हे माझं भाग्य असं सांगितलं असतं. काय पकाऊ सिरीयली काढतात. मग पुढे काय?

दुसरा सेल्समन - पुढे काय? पद्मिनीराजे, दिग्विजय, अरुंधती, तिचा दीर, तिचा भाऊ (ह्याची बायको नव्हती) आणि सायली सगळ्यांचा एकत्रित फोटो काढला. आणि मग ७ च्या नव्या सिरियलबद्दल सांगायला अरुंधती आली.

पहिला सेल्समन - आणि त्या पद्मिनीराजेने २ लोकांचे खून केले होते, दिग्विजयला आंधळं केलं होतं त्याची शिक्षा नाही?
दुसरा सेल्समन - अरे, वेडा आहेस का? ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल बाबा.

सोनीवर घाणेरडेपणाचा अतिरेक चालू आहे, तुकड्यांत बघायला मिळालं, क्या हुआ तेरा वादा....विबासं करूनच्या करून वर बायकांना मारझोड हा नवा ट्रेंड येत आहे... शुभ विवाह, विबासं + मारझोड+ माहेरच्यांना हुंड्यावरून त्रास......

अरे काय हे, काहितरी नविन दाखवा...जांभई पण येत नाही इतके मख्ख झालोत आम्ही आता Sad

मी फकस्त बडे अछ्छे आणि कॉमेडि सर्कस बघते ...

आशु बडे अच्छे मध्ये पण तेच कौटुंबिक कलह आणि मतभेद आहेतच की. Sad बोर होतं मला त्या साक्षी तन्वर ला पहायला Sad असो...

दक्षिणा & aashu29 >>बडे अच्छे पण बोरच होते. . पण घरी बघतात. . मि फक्त कॉमेडी सर्कस आणि कधिकधि क्राईम पेट्रोल बाआस Lol

अरे देवा, आवडत नाही म्हणून बघवता तरी कश्या सिरीयल? Proud
२ मिनिटाच्या वर बघवत नाही चुकुन चॅनल लागला गेला तरी............. छ्या! कठिण आहे.

झंपी बघत नाही पण अधे मधे तुकडे दिसतात.

दक्षिणा, मला तरी बरी वाटते बडे अछ्छे, व्हिलन आली की मी चॅनल बदलते Happy मला राम कपूर आवडतो.

स्वप्ना_राज-> क्लास.. तुम्हाला _/\_ Lol

काल चुकून channel बदलताना 'पिंजरा' मालिकेचा एक scene बघितला..त्यात ती नारायणी तिच्या (पाप्याचं पितर) नवर्याला चक्क बदडत होती..काहीही अ आणि अ दाखवतात!! :O

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सुप्रसिध्द खाजगी गुप्तहेर श्रीयुत शेरलॉक होम्स ह्यांचा मृतदेह अरबी समुद्रातून बाहेर काढण्यात आला. त्यांच्या खिशात 'माझ्या मृत्युसाठी श्री सतीश राजवाडे ह्यांना जबाबदार धरण्यात यावं' अशी चिठ्ठी सापडल्याने ह्या प्रकरणाचा तपास करणारे पोलिसही चक्रावून गेले होते. परंतु श्रीयुत शेरलॉक होम्स ह्यांचे परमस्नेही डॉक्टर वॉटसन ह्यांनी खुलासा केला आहे की सध्या झी मराठी वर चालू असलेल्या लोकप्रिय 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ह्या मालिकेतल्या घना ह्या 'पात्रा'चे दोन्ही काका पोटापाण्यासाठी काय करतात हे शोधून काढायची कामगिरी होम्स ह्यांच्यावर होती. मालिका सुरु होऊन महिने उलटले तरी काहीही धागेदोरे हाती न लागल्याने श्रीयुत होम्स अतिशय निराश झाले होते. आणि निराशेच्या ह्या भरातच त्यांनी हे पाऊल उचललं असावं असंही डॉक्टर वॉटसन पुढे म्हणाले. 'घनाच्या दोन्ही काकांना घरात असेतो कोणी मारणार नाही' असा 'हिरण्यकश्यपू इस्टाईल' वर असावा अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

तरी श्रीयुत राजवाडे ह्यांनी हा तपशील लवकरात लवकर जाहिर करावा. हीच श्रीयुत होम्स ह्यांना खरी श्रध्दांजली होईल अशी टिप्पणी दुसर्‍या एका मराठी चॅनेलवरील मालिका लिहिणार्‍या लेखकाने आपले नाव जाहिर न करण्याच्या अटीवर केली.

श्रीयुत राजवाडे ह्यांस प्रोफेसर मोरियार्टी ह्यांजकडून सुपारी देण्यात आली असावी अशी अफवा मूळ धरू लागली आहे. ह्याबाबतीत मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.

मनमोहन सिंग ऑफिसात येऊन खुर्चीवर बसतात न बसतात तोच फोन वाजतो.

मनमोहन सिंग: हॅलो, हॅलो, कोण बोलतंय?
पलीकडूनः बस काय सरजी, ओळख्लं नाही? मी ओबामा बोलतोय

मनमोहन सिंग: (थोड्या घुश्श्यात) आता काय बोलायचं राहिलंय बाकी? ते पण बोलून टाका
ओबामा: बाप रे! आज एकदम भडकू मूडमध्ये? सोमवार सकाळ म्हणून की काय?

मनमोहन सिंग: कसली सकाळ? तुम्ही सगळा आठवडा नासवला आमचा. आधी आपल्या पायाखाली काय जळतंय ते पहावं माणसाने आणि मग दुसर्‍याच्या भानगडीत नाक खुपसावं.
ओबामा: चिडू नका हो. असं बघा, आमच्या पायाखाली बरंच काही जळतंय. त्याच्या धुराकडे आमच्या जनतेचं लक्ष जाऊ नये म्हणून तुमच्या इकॉनॉमी आणि पॉलिसी बद्दल बोललो हो. आता तुम्हाला पटवून द्य्यायला काय करू?

मनमोहन सिंग: कृपा करून आणखी काही करू नका. केलीत तेव्हढी मेहेरबानी पुरेशी आहे.
ओबामा: तरी पण गरीबासाठी काही सेवा असेल तर सांगा.
मनमोहन सिंग: हं, तसं एक काम आहे खरं. आमच्या देशात एक घन:श्याम काळे म्ह्णून मुलगा आहे बरं का. त्याला किनई तुमच्या देशात यायची फार फार इच्छा आहे. गेले १०-१२ वर्ष प्रयत्न करतोय. पण जमत नाहिये. आता कुठे त्याला एक ऑफर आली आहे. व्हाईट हाऊसकडून एक लेटर मिळालं तर बरं होईल. म्हणजे कुठे माशी शिंकणार नाही.

ओबामा: एव्हढंच ना, आत्ता देतो लेटर. पण हा काळे काय बायकोचा नातेवाईक आहे का?
मनमोहन सिंग: अनुभवाचे बोल वाटतं? नाही, पण आजकाल त्याच्या अमेरिकेला जाण्यावरून बरीच चर्चा चालली आहे. सरकार ह्याबाबत काही करत नाही अशी ओरड सुरु व्हायच्या आत आपलं काम केलेलं बरं, काय?

ओबामा: अगदी अगदी. काम झालंच म्हणून समजा. आता हसा बघू.
मनमोहन सिंग हसतात. आणि ते पाहून आत आलेला त्यांचा खाजगी सचिव बेशुध्द पडतो.

--------

न्यूज चॅनेल्सवर ब्रेकिंग न्यूज - प्रधानमंत्रीजीके निजी सचिव यकायक बेहोश. क्या नयी चाल चल रहा है पाकिस्तान?

स्वप्नील जोशीचं फेसबुक पेज - मालिकेत लवकरच एक ट्विस्ट येणार. बघत रहा 'एका लग्नाची दुसरी गोष्ट'

महादेवचे बरेच एपिसोडस मागच्या आठवड्यात पहाता आले नाहीत. शेवटी एक पहायला मिळाला.

बिचारी पार्वती कुठल्याश्या वृक्षाखाली शांतपणे बसली होती. तिला कार्तिकेयाची आठव्ण येत होती. शंकर विष्णू आणि ब्रह्मदेवासोबत कॉन्फरन्सला गेला होता. हिचं काम आटपलं की काय एव्हढ्यात अशी शंका मला आली. पण तसं बघाल तर स्वयंपाक सोडला तर तिला काय काम असणार? कैलासावर इकडून तिकडे फिरताना ती पदराने जमीन झाडत असते. सगळीकडे बर्फ म्हणजे लादी पुसायची भानगड नाही. कपडे धुवायचे तर तिची एकटीची साडी वगैरे, बापड्या शंकराचा तोही प्रश्न नाही. हुश्श करून ती बसणार एव्हढ्यात बरेचसे दाढीवाले मुनी तिथे आले. मानवजातीत धर्माचा प्रसार करायला कोणीतरी हवं आणि त्यासाठी पार्वती-शंकराची कन्या हवी असं त्यांचं म्हणणं होतं. अरे, ही काय फॅक्टरी आहे काय? मागणी तसा पुरवठा. बरं, अधर्म करायला पुरुष चालतात पण धर्माचा प्रसार कराय्ला स्त्रीच हवी. मज्जा आहे! वर पार्वतीला म्हणतात की तुला कन्या झाली की तुझा वेळही जाईल. म्हटलं बाबांनो, तिला जरा जगाकडे पहायला वेळ द्याल की नाही? आणि कन्या धर्मप्रसाराला गेली की पार्वतीचं मनोरंजन कसं करणार?

पार्वतीला ही चिंता नसावी. लगेच तिने शंकराला बिनतारी संदेश पाठवला. की मी तू इथे नसताना मुलगी जन्माला घालत आहे, परवानगी द्यावी. शंकराने बिनतारी संदेश पाठवला - महान उद्देश की पूर्ती के लिये अनुमती है. मग पार्वतीने त्या झाडाखाली, म्हणजे कल्पवृक्षाखाली मातीची मूर्ती बनवली आणि त्याला विनंती केली की ह्यात प्राण घाल. अहो आश्चर्यम! रेडिमेड मुलगी तय्यार! अगदी मापाच्या कपड्यांसकट - मुलगी आईपेक्षा जरा मॉडर्न आहे कारण तिने स्लिव्हलेस घातलाय. शंकर ते पाहून डोक्यात राख घालून घेणार नाही आणि तांडव करणार नाही अशी आशा करू यात.

मुलीचं नाव 'अशोकसुंदरी' म्हणे. तेव्हाच्या काळात फॉर्म नव्हते भरायला लागत म्हणून बरंय. नाहीतर केव्हढी भूर्जपत्रं खर्ची पडली असती.

बाकी माझा जन्म कुठल्याही महान उद्देशाच्या पूर्तीसाठी झालेला नाही ह्याचं मला अलिकडे फार दु:ख व्हायला लागलंय.

आसं कसं? ह्या सिरीयल्सवर लिहिण्यासाठी तुझा आणि तूला लिहिता याव म्हणून सिरीयल्सची योजना झालेली आहे.

बाप्रे!!!!
स्वप्ना राज,
अहो इथे मायबोलीवर कसली खणाखणी होते माहितेय ना? अन तुमची पोस्ट म्हनजे धर्मिक भावना दुखावणे नाही, डायरेक्ट त्यांचा खून Wink

बट व्हॉट यू से इज राईट! मी तुमच्या सोबत आहे.

इब्लिस, तुमचं बरोबर आहे. ह्या पोस्टस मी टाकता कामा नये. कोणी आक्षेप घेतला तर भांडाभांड करत बसायला मला वेळही नाही आणि इच्छाही नाही.

अशोक सुंदरी ! मग तिनेच, सम्राट अशोक म्हणून जन्म घेतला का ? कारण धर्मप्रसाराचे काम त्यानेच तर केले.

पुर्वी मराठी पुस्तकात, चर्च ला गिरीजाघर असे म्हणत असत. मला कळत नसे, पार्वती आणि चर्च चा काय संबंध, असेल ते. आता पोर्तुगीज भाषेची तोंडओळख झाल्यावर कळले. इग्रेजा, म्हणजे पोर्तूगीज भाषेत, चर्च. त्याचाच अपभ्रंश झाला असणार.

कालच्या एपिसोडमध्ये एकदाचा त्या त्रिपुरांचा विध्वंस झाला. ती जागा उज्जैन म्हणून ओळखली जाणार. अशोकसुंदरीला तो राक्षस पळवून पाताळात घेऊन गेला. ती मोठी झाल्यावर म्हणे त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. राक्षसांमध्ये पण मुलगी झाली की तिला मारायचे का क्कॉय? म्हणून लहान मुलींना पळवून त्या मोठ्या झाल्यावर त्यांच्याशी लग्न करायची वेळ यावी. तिथे पार्वतीने 'अशोकसुंदरी, पुत्री कहा हो तुम?' म्हणत अर्धा कैलास झाडला. मग डोळे मिटले आणि ती पाताळात आहे हे तिला कळलं. हे आधीच केलं असतं तर? मग क्षणार्धात तिथे पोचली. तोवर अशोकसुंदरीने त्या राक्षसाला शाप दिला होता की माझा नवरा तुझा वध करेल. त्या नवर्‍याने हिला काळी का गोरी पाहिलं नाही अजून. बिचारा कुठेतरी सुखात जगत असेल. आणि हिने त्याच्यामागे हे नस्तं लचांड लावून दिलंय. वर पार्वतीमाता म्हणते 'उचित है'. हे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!

मग त्रिपुरांचा विध्वंस करून शंकर कैलासावर आले. लगेच अशोकसुंदरी साता जन्मांची ओळख असल्यासारखी बोलायला लागली. गळ्यातला साप बघून म्हणते 'इन्का नाम क्या है?'. महादेव म्हणतात 'नागराज'. तो साप एक नाही आणि दोन नाही. 'लंडन लुकिंग टोकियो टॉकिंग' स्टाईल आपला तिसरीकडेच पहातोय. मग तिने चंद्राबद्दल विचारलं. महादेवांनी तिला झोपताना विष्णूच्या मत्स्यावताराची गोष्ट सांगितली. हे शंकर-पार्वती स्वतःच संसारात एव्हढे गुरफटलेत. लोकांना काय मोक्ष देणार? अ ओ, आता काय करायचं

तसं कुटुंबवत्सल देव पाहून मजा वाटली म्हणा. एकदम आपल्या माणसांसारखे वाटत होते. बाय्को आणि मुलीबरोबर बसलेले महादेव पाहून मला राहून राहून मुन्नाभाई एमबीबीएस आठवत होता. महादेव बीवी बच्चोंसमेत

तसं कुटुंबवत्सल देव पाहून मजा वाटली म्हणा. एकदम आपल्या माणसांसारखे वाटत होते. बाय्को आणि मुलीबरोबर बसलेले महादेव पाहून मला राहून राहून मुन्नाभाई एमबीबीएस आठवत होता. महादेव बीवी बच्चोंसमेत>> Happy

मी एकदा देवांच्या फोटो विकणार्‍या दुकानात गेले होते. तिथे एका बाईने गणपती, शंकर आणि पार्वती यांचा एकत्र फोटो आहे का विचारले. तेव्हा दुकानदाराने तिला सांगितले की त्याच्याकडे फ्यामिली फोटो नाही. त्याची मला आठवण झाली.

Rofl
स्वप्ना __/\__
महान आहेस तू
ती सिरियल माझ्या डोक्यात जाते
आणि आई, आजी मनोभावे हात वैगेरे जोडून पहात असतात
अजुनच डोकं फिरत मग माझं
आता उद्या पासून तुझ्या पोस्टी वाचुन दाखवणारेय त्यांना मी Rofl

'मला किनई बाई भीष्म पितामहांबद्दल फार फार आदर वाटतो'. दुपारच्या जेवणानंतर झाकपाक करता करता द्रौपदी म्हणाली.
धर्मग्रंथ वाचण्यात गढलेल्या युधिष्ठीराला आधी तिचं बोलणं ऐकू आलं नाही. पण चुकीच्या फटक्यावर बाद झालेला फलंदाज तंबूत परतताना जशी उगाचच बॅट फिरवत जातो तशी गदा फिरवणार्‍या भीमाचा हात हवेतच थांबला.
युधिष्ठीराकडून काही उत्तर आलं नाही तेव्हा द्रौपदीने ठेवणीतला आवाज लावला. 'अहो, काय म्हणतेय मी? ऐकलं का?'

'काय म्हणालीस?" युधिष्ठीर गडबडीने म्हणाला. दुपारचं जेवण झालं असलं तरी रात्रीचं अजून व्हायचं होतं.
'मी म्हणते मला भीष्म पितामहांबद्दल फार फार आदर वाटतो"

युधिष्ठीर दचकला. हे नवं काय प्रकरण आहे ह्याचा त्याला अंदाज येईना. वस्त्रहरण प्रकरणानंतर द्रौपदीचं एकूणात कुरू वंशाच्या ज्येष्ठ मंडळींबद्दल चांगलं मत नव्हतं. मग आज काय झालं? पण काही बोललं तर प्रकरण आपल्या अंगावर शेकतं हे त्याला अनुभवाने माहित झालं होतं. काही बोललं नाही तरी ते शेकणारच हीही खात्री होती.

'ह्म्म्म्म' एक निरुपद्रवी शब्द उच्चारून त्याने खडा टाकला.
'म्हणजे बघा ना? त्यांनी ब्रह्मचारी रहायची शप्पथ घेतली ती आजतागायत पाळली आहे'.
'हो ना' हे प्रकरण कुणीकडे जातंय ह्याचा पाचापैकी एकाही पांडवाला अजून अंदाज येत नव्हता. अर्जुनाने मनातल्या मनात कृष्णाचा धावा केला.

'त्यांनी लग्न केलं असतं तर माझी गायत्री झाली असती'
'गायत्री?' युधिष्ठीराचे ओठ फक्त हलले. त्यातून शब्द बाहेर आला नाही.
'मला सासू हवी वाली' नकुलाने हातवारे करून त्याला सांगितलं म्हणून बरं.

'ती हो मला सासू हवी मधली मीराची सासू. तिला किनई त्या काकूआजींनी ती आदर्श पत्नी असल्याचं सिध्द करायला सांगितलंय. तराजूच्या एका पारड्यात तिच्या नवर्‍याला बसवणार आणि दुसर्‍या पारड्यात एक हंडा ठेवणार. नवर्‍याच्या वजनाइतकं पाणी त्यात विहिरीचं पाणी शेंदून आणून घालायचं आणि त्या पाण्याने नंतर शिवलिंगाला अभिषेक करायचा. तेही सूर्यास्त व्हायच्या आत. आता तुम्हा पाच जणांच्या वजनाइतकं पाणी मला शेंदावं लागलं तर माझी काय गत झाली असती विचार करा तुम्हीच' द्रौपदी भीमाकडे बघून डोळे वटारत म्हणाली. त्याने बिचार्‍याने रात्री २ किलो कमी भात खायचा संकल्प केला.

'अग पण काकूआजीने गायत्रीला ते करायला सांगितलं. मीराला नाही. त्या न्यायाने कुंतीमातेला हे दिव्य करावं लागलं असतं ना' सहदेवाला राहावलं नाही. प्रश्न लॉजिकचा होता.

'अहो हो, पण तुमचे वडिल अकाली गेले ना. म्हणून त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला असता. किती झालं तरी सासूच ती. तिचा काय नेम सांगता येतो? ' द्रौपदी ठसक्यात म्हणाली आणि अर्जुनाने मनातल्या मनात कृष्णाला साष्टांग घातला.
(कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. दुखावल्या गेल्यास क्षमस्व)

Pages