संथ चालती ह्या मालिका, त्यांच्यावरची आमची टिप्पणी ऐका

Submitted by स्वप्ना_राज on 3 December, 2010 - 01:08

मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.

वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.

वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.

वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.

-----

गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."

"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.

"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"

"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."

बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"

कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"

कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.

"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.

इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.

तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.

रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज मोठ्या उत्सुकतेने कलर्स चेनेल वर 'शनि' चा पहिला एपिसोड पाहिला. एक एपिसोड एक तासाचा आहे. सुरुवात नेहमीप्रमाणेच देव-दानव युध्दाने झाली. आजकाल देवांना बरे दिवस आलेत. बरेच मसल्सवाले सैनिक दिसत होते. बहुतेक स्वर्गात जिम उघडले असतील. बहुतेक दानव 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' मधला कोण तो सारोमान का कोण असतो त्याच्या आर्मीतल्या सैनिकांसारखे दिसत होते. दानव आणि शुक्राचार्य ह्यांना स्वर्गात यायचं होतं. देव ह्याच्या विरोधात. शुक्राचार्य म्हणतात की स्वर्ग नाही तर कामधेनु आणि कल्पवृक्ष तरी दया. हे म्हणजे थेट भारत-पाकिस्तान सारखं झालं. त्यात इंद्राच्या नुसत्या वल्गना बघून घ्याव्यात. शुक्राचार्यांनी 'वॉर ऑफ द वर्ल्ड'मध्ये कशी जमिनीतून मशीन्स येतात तसा जमिनीतून एक धिप्पाड राक्षस काढला. इंद्राचा आता पचका होणार इतक्यात सूर्य अवतरला.

सूर्य इथे येण्याआधी त्याचं राजवाड्यात त्याची बायको संध्या हिच्याबरोबर भांडण झालं. आधी संध्या तिच्या यम आणि यमी ह्या बाळांसोबत दाखवली. दासी सांगत आली की सूर्याने औक्षण करायला बोलावलंय. म्हटल्यावर तिचा चेहेरा पडला. मग घाबरत घाबरत गेली सूर्याकडे. त्याला तिलक लावला तर हिचा हात जळजळायला लागला. काय तर म्हणे हिला सूर्याचा दाह सहन होत नाही. मी हैराण. दोन पोरं झाली कशी?? तिने सुर्याला ह्यावर उपाय करायची विनंती केली. तो म्हणाला ते तुझं तू बघ. आणि युध्दाला निघून गेला. टिपिकल नवरा. युध्दात तो, इंद्र आणि शुक्राचार्य मिळून सगळं ब्रह्मांड जाळणार हे लक्षात येताच भगवान शंकरांची एन्ट्री झाली. शंकर ओळखीचे वाटले. म्हणजे फोटोतून नाही हं. आधी कुठल्या तरी सिरीयलमध्ये शंकर म्हणूनच पाहिलंय. सगळ्यांनी आपापली बाजू मांडली. शंकर म्हणाले की लवकरच पृथ्वीवरच्या जीवांच्या पापपुण्याचा हिशोब करणारी शक्ती जन्माला येणार आहे (मला वाटत होतं हे डिपार्टमेंट चित्रगुप्ताचं आहे). तोवर युद्ध थांबवा. आता त्याचा ह्यांच्या युद्धाशी काय संबंध मला काही कळलं नाही. शंकर एव्हढंही म्हणाले की आता पृथ्वी आणि मानव ह्यांच्या निर्माणाची वेळ आली आहे. अरे, ते अजून जन्माला यायचे आहेत आणि आधीच निवाडा वगैरे काय? हे म्हणजे प्रॉडक्ट बनायच्या आधीच टेस्ट सिस्टीम तयार. असो.

इथे संध्या गेली बापाकडे. तिचा बाप म्हणजे विश्वकर्मा. त्याला म्हणते मला नवर्याचं तेज सहन होत नाही. आता हे काय बापाला सांगायचं? आधी त्यानेही हात झटकले. मग म्हणाला की तुला पोराना-नवर्‍याला सोडून तप करावं लागेल. तो इंद्रासाठी शस्त्रं बनवण्याच्या खटाटोपात. एव्हढ्यात त्याला एक शोध लागला अश्या द्रव्याचा जे एखाद्या गोष्टीच्या सावलीवर टाकलं की गोष्टीची कार्बन कॉपी तयार. संध्या ते द्रव्य घेऊन गेली. बापाला न सांगता. मग लगोलग ते आपल्या सावलीवर टाकून आपली प्रतिकृती बनवली तिने.

इथे सूर्य युध्द संपवून आला तर समोर ही छाया उभी. त्याला वाटलं संध्या आहे. त्याने बोलता बोलता तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिला काही झालं नाही. तो तिला खोदुन खोदून विचारणार एव्हढ्यात कोणीतरी बोलवायला आलं म्हणून तो गेला. मग संध्या तिला म्हणाली की सूर्याला काही सांगू नको. तू इथे राहून माझ्या मुलांना सांभाळ. मी तप करायला जाणार. छाया म्हणाली बाळ आणि सूर्य दोघांची काळजी घेईन. तर संध्या म्हणते कशी की सूर्यास्त झाला की छाया नाहीशी होते. सो आफ्टर सनसेट नवऱ्याजवळ फिरकायचं नाही. आता बघा, सूर्याला काही करायचंच असेल तर रात्र काय आणि दिवस काय, नाही का? असो. मग संध्या निघून गेली.

इथे सूर्य परत आला. आणि म्हणाला की आता विश्रांती नाही का घ्यायची? हे चान्सपे डान्स करणं झालं. मला वाटलं छाया म्हणणार माझं डोकं दुखतंय. पण ती म्हणाली की बाळ झोपलं नाहीये. लगेच सूर्य म्हणतो कसा, तू आई असलीस तरी पत्नीसुध्दा आहेत. नवर्याप्रती तुझी काही कर्तव्यं आहेत. वा रे नवरोबा! आपलं काही कर्तव्य नाही, नुसते अधिकार दिसतात. मग काय छाया गेली त्याच्या कक्षात. दरवाजा बंद झालां. मग एकदम लोक नाचताना दाखवले. सुर्याला पुन्हा एक मुलगा झाला म्हणून. सूर्याने बाळाचा चेहेरा पाहिला आणि माझं एव्हढं कुरूप काळं बाळ नसणार म्हणून बायकोला चरित्रहीन म्हणून मोकळा. छाया खरं तर संध्याइतकीच गोरी दाखवली आहे. मग बाळ काळं झालं कसं हे मलाही कळत नाहिये.

देवा रे!

ते मूल संध्येला नाही तर छायेला (आपली सावली हि काळी असते) झालाय म्हणून कदाचित ते काळे आहे. आपला एक असाच अंदाज हा .......

आम्ही सारे खवय्येत इतके भयानक पदार्थ दाखवतात ना,

कधी ते आठवत नाही पण एका बाईने गुजा वर चॉकलेटचा थर देवून त्याला मैद्याचे पारीत घालून, कचोरीसारखा आकार देवून तळले आणि पाकात टाकले.

वर म्हणे गुजा चॉकलेट कचोरी खावून नवरे खुष होतील तुमचे.

मला तर नवर्‍याला मधूमेह देवून मारायचा प्रयत्न वाटला. Sad

नागीन - रीश्तोन कि अग्निपरीक्षा नामक सिरीयल फार पूर्वी झी वर येऊन गेली सहजच तुनळीवर पहिले तर त्यात अजिंक्य देव, रोनित रॉय, पृथ्वी, दीपशिखा, रजा मुराद वैगरे मंडळी आढळली आणि मुख्य नागिणीच्या भूमिकेत "सीमा कपूर'.

मला आधी असं वाटायचं की तुम्ही इच्छाधारी साप होण्यासाठी तुमचे आई आणि वडिल दोघे इच्छाधारी साप असणं आवश्यक आहे. पण तसं नाहिये. 'नागिन सिझन २' नुसार नुस्ती आई इच्छाधारी नागिण असली तरी पुरे. बाप काही असला तरी फरक पडत नाही. तसंच वयाची १८ वर्षं पूर्ण व्हायच्या आत तुमचं लग्न झालं तर तुम्ही इच्छाधारी नागिण होत नाही. हा नियम मुलाला लागू पडतो का नाही माहित नाही. कारण अजून 'नाग' नावाची सिरियल आलेली नाही. एकूणात इच्छाधारी नागिणीला जेव्हढा भाव आहे तेव्हढा इच्छाधारी नागाला नाहिये.

हे नाग-नागिण कधीही कोणाचंही रूप घेऊ शकतात. म्हणजे आत्ता जॉनी लिव्हर तर लगेच मधुबालासुध्दा होतील. बाई किंवा पुरुष काहीही होऊ शकतात. नाग असताना त्यांच्या अंगावर कपडे नसतात (इश्श!) आणि माणूस झाले की कपडे, बायका असतील तर दागिने, मेकअप, खोट्या पापण्या सगळं काही क्षणात येतं. त्यांचे आवाजसुध्दा ज्याचं रूप घेतलंय त्याच्यासारखे होतात. नागातून माणूस होताना फटकन चेंज होतात. पण माणसातून नाग होताना ह्यांना गुडघ्यांवर बसावं लागतं. (पहा 'नागिन'). फारच लहर आली तर जोडीने असताना शरीराचा वरचा भाग माणसाचा आणि खालचा नागाचा असं ड्युएल सिमकार्ड असलेल्या फोनसारखं रुप पण घेतात. तसं करून त्यांना नेमका काय फायदा होतो ते त्यांनाच माहित.

फावल्या वेळात हे शंकराच्या पिंडीसमोर तावातावाने बोलणे, पायापर्यंत पांढरी दाढी असणार्या एखाद्या गुरुदेवाला आपल्या समस्येचं निराकरण करण्यासाठी पिडणे किंवा नागमणीचं रक्षण करणे ह्यासारखे उद्योग करतात.

Pages