संथ चालती ह्या मालिका, त्यांच्यावरची आमची टिप्पणी ऐका

Submitted by स्वप्ना_राज on 3 December, 2010 - 01:08

मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.

वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.

वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.

वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.

-----

गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."

"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.

"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"

"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."

बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"

कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"

कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.

"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.

इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.

तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.

रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स मंडळी. कित्येक दिवस कोणी इथे फिरकलंच नव्हतं म्हणून ही पोस्ट इथे टाकावी का नाही ह्या विचारात होते. तुमच्या प्रतिसादांनी हा प्रॉब्लेम सोडवला. Happy

"आज मी तुम्हाला भगवदगीतेतला एक महत्त्वाचा श्लोक शिकवणार आहे." चष्म्याच्या वरून वर्गाकडे बघत बाईंनी जाहिर केलं. "अध्याय दुसरा, श्लोक २२

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि
तथा शरीरानि विहाय जिर्णान्य न्यानि संयाति नवानि देही

ह्याचा अर्थ काय होतो? जसा माणूस जुने कपडे टाकून नवे कपडे धारण करतो तसा आत्मा जुनं शरीर टाकून देऊन नवं शरीर धारण करतो. उपाध्ये, हसायला काय झालंय? विनोदी कथा सांगतेय मी इथे?"

"न..न...नाही बाई, ही मेधा म्हणत होती की माप्रिप्रिकमधे आशूदीच्या आत्म्यानेसुध्दा अशीच शरीरं बदललेली दिसताहेत. आत्त्ताचं हे तिचं तिसरं शरीर"

वि.सू.१ - कोणाच्याही धार्मिक भावना दुखावायचा उद्देश नाही. दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व!
वि.सू.२ - गीता पाठ नसल्यामुळे श्लोक आंतरजालावरून नकलून घेतला आहे. चुका झाल्या असल्यास क्षमस्व!

पवित्र रिश्तामध्ये 'सेन्सोडाईन' टूथपेस्टची अ‍ॅडही करुन झाली. करतील तेवढं कमीच आहे.

त्या सिरियलमध्ये फक्त एका मेन्टल असायलमची अ‍ॅड करणं बाकी आहे. ती त्यांनी शेवटच्या एपिसोडमध्ये (कधी असलाच तर!) करावी कारण तोपर्यंत ती सिरियल पहाणार्‍या बर्‍याच प्रेक्षकांना तिथे जायची गरज भासणार आहे!

भल्या पहाटे लाऊडस्पीकरच्या खरखराटाने लोकांना झोपेतून खडबडून जाग आली. २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट नसूनही "जहा डाल डाल पर सोनेकी चिडिया करती है बसेरा" किंवा "है प्रीत जहाकी रीत सदा" अशी गाणी ऐकायला लागणार की काय ह्या शंकेने लोक पांघरूणं फेकून देऊन खिडकीकडे धावले. फायनल मॅच तर उदया आहे. काय बरं कारण असावं?

रस्त्याच्या मधोमध एक गाडी उभी होती. त्यावर एक मोठा लाऊडस्पीकर ठेवला होता. यथावकाश तो चालू होऊन त्यातून पुढील दवंडी पिटली गेली.

ऐका हो ऐका, आमच्या येथे श्रीकृपेने चि.सौ.कां शमिका राजे आणि चि. अभिजित पेंडसे ह्यांचा शुभविवाह होत आहे. वधू-वर लग्नात घेण्यासाठी उखाण्याच्या शोधात आहेत. तरी समस्त जनांना कळवण्यात येत आहे की त्यांनी असे उखाणे झी मराठीकडे पाठवावे. त्यातून शमिका आणि अभिजित त्यांना पसंत असे उखाणे निवडतील. हे उखाणे पाठवणार्‍या 'भाग्यवान' प्रेक्षकांना हया शुभविवाहाला - आहेर न आणता - उपस्थित रहायची संधी मिळेल होऽऽऽऽ

दवंडी पिटून झाली आणि दुसर्‍या दिवशीपासून झीकडे उखाण्याचा ओघ सुरू झाला:

१. पहिली रिया, मग प्रिया, मग अश्विनी (आशूदी)
सोडल्या तिघीजणी आणि झालो शमिकाचा धनी

२. अलिकडे भारत, पलिकडे अमेरिका
नाव घ्यायला सांगू नका, मी आहे कुमारिका

३.इवल्या इवल्या हरणाचे इवलाले ग पाय
अभिजितराव अजून आले नाहीत, पोटदुखीने पडले की काय

४.कर्दळीच्या वनात चंडोलपक्षी लपला
शमिकाशी लग्न करून अभि जन्माचा धुपला

५.चांदीच्या ताटात जिलबीचे तुकडे
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे

६. तेलाच्या दिव्याला तुपाची वात
शमि-अभिचे झाले लग्न, आता प्रेक्षकांची वाट

७.किटलीत किटली, बोनचायनाची किटली
अभिजीतरावांच्या हातात कायम कायमचूर्णची बाटली

(मूळ उखाणे http://www.onesmartclick.com/marathi/marathi-ukhane.html)

स्थळः अभि-शमिका ह्यांच्या रिसेप्शनचं. हॉल निवडक प्रेक्षकांनी आणि त्यांनी आणलेल्या भेटवस्तूंनी खच्चून भरलाय. अभि-शमिका अभिनंदनासाठी येणार्‍या पाहुण्यांचं स्वागत करण्यात दंग. एव्हढ्यात एक तरूण पायर्‍या चढून स्टेजवर येतो. हातात एक पुष्पगुच्छ.

त्याला बघून शमिका ओरडते "अय्या, संजय भावोजी. तुम्ही कसे आलात? आणि हे हो काय? एकटेच आलात? काशीवहिनींना नाही आणलंत बरोबर?"

संजय त्रासलेल्या चेहेर्‍याने "दोघींपैकी नेमकी कोण काशी आहे हे कळलं असतं तर नक्की घेऊन आलो असतो. तुझं बरं आहे रे अभिजित. तुझ्या बायकोला ३-३ बहिणी असल्या तरी एकही डिट्टो तिच्यासारखी दिसत नाही. नाहीतर तुझं कठीण होतं बघ. माझ्या बायकोसारखी दिसणारी ही बया कुठून आलीय देव जाणे!"

अभिजित पेंडसे थोडा विचार करतात "संजय, नाही म्हणजे हा तुझा पर्सनल प्रश्न आहे. पण विषय निघालाच आहे तर काही सुचवू का? म्हणजे बघ पटलं तर"

संजय उत्सुकतेने "सांग रे, काहीही ट्राय करायला तयार आहे मी."

अभिजितः तू पुन्हा वेडा झाल्याचं नाटक कर. म्हणजे तू पूर्वी खरंच वेडा होतास तेव्हा कश्या केसांच्या झिंज्या होत्या, डोळे मोठे करून पहायचास आणि गाईच्या शेपटीसारखे नेहमी हात हलवायचास, अगदी तस्सं कर. ती कोण बबली आहे ना ती २ मिनिटांत पळून जाईल. आणि तुझी खरी काशी तुला परत मिळेल. नाही मिळाली तर माझं नाव बदल."

संजयः अरे हो रे, हे माझ्या डोक्यातच नाही आलं. हा घे तुझा पुष्पगुच्छ. मी पळतो घरी.

शमिका: अभी, मी काय म्हणते, तुझी युक्ती यशस्वी होईलच कारण तुझं नावच मुळी "अभिजित" आहे. पण समज नाहीच झाली तर की नाई आपण तुझं नाव "शाहरूख पेंडसे" ठेवू यात. मला शाहरूख फार आवडतो.

संजय निघून जाताच अभिका (ब्रॅड पिट आणि जोली 'ब्रॅन्जेलिना', सैफ आणि करिना 'सैफिना' तसं अभि-शमिका म्हणजे अभिका!) खाली बसतात. २ मिनिटं होतात न होतात तोच संपूर्ण डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेला एक तरुण त्याच्या बायकोबरोबर स्टेजच्या पायर्‍या चढू लागतो.

"अय्या माही!" शेजारी अभिजित आहे हे विसरून शमिका त्याच्या दिशेने धावते. "अय्या अभिजित!" माहीची बायको साक्षी अभिजीतच्या दिशेने धावते. एक क्षणभर माही आणि अभिजित एकमेकांकडे रोखून पहातात.

"कसलं धम्माल सरप्राईज. तुम्ही इथे कसे?" शमिका मोठ्या प्रेमाने माहीला विचारते.

"अरे वा! साक्षीने मला तुमच्या कहाणीबद्दल सगळं सांगितलंय. केवढे अडथळे पार करून तुम्ही ह्या क्षणापर्यंत आला आहेत. तुमचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे" - माही

"अरे! कौतुक तर आम्ही तुमचं करायचं. इतक्या वर्षांनी कप आणलात ना तुम्ही. चक्क ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंकेला हरवलंत. मान गये उस्ताद." - अभि

"तुमची ती शेवटची सिक्सर तर अजूनही स्वप्नात येते" - शमिका
"इतका काही मी मोठा नाही हं" माही.

"मी माहीशी लग्न नसतं केलं तर नक्की तुझ्याशी केलं असतं" - साक्षी अभिला उद्देशून
"कसचं कसचं" अभि.

"आमच्याबद्दल तुम्हाला माहित आहे हे ऐकून मला तर बाई स्वर्ग दोन बोटं उरलाय. आता जेवल्याशिवाय जायचं नाही हं." शमिका लाजतलाजत म्हणते.
"हो, हो" माही घाईघाईने म्हणतो.

ते दोघं स्टेजच्या पायर्‍या उतरून जाईपर्यंत शमिका माहीकडे आणि साक्षी अभिजितकडे पहात असतात.

खाली उतरल्याबरोबर माही साक्षीला म्हणतो "झालं समाधान तुझं? कधीपासून अभिजित-अभिजितचा धोशा लावला होतास तो."
"तर काय? तुमचं नशीब समजा तुम्ही कप जिंकलात. हरून आला असतात तर माझी तुम्हाला रोज माप्रिप्रिक बघायला लावायची धमकी मी खरी करून दाखवली असती."
"म्हणून तर तिरुपतीला नवस बोललो होतो मी. केस काय परत येतील. बालबाल बच गये"

स्वप्ना _____________/\_____________ Rofl

मंदार, नुतनजे, धन्स!

स्थळ: हॉस्पिटल
वेळः प्रेक्षकांच्या दृष्टीने नेहमीसारखीच वाईट
नरसिंह किल्लेदार, आत्याबाई, जानकीचा भाऊ आणि वाकनीस चिंतातुर चेहेर्‍याने बसलेत.

एव्हढ्यात खोलीतून एक डॉक्टर बाहेर येतो. त्याचा चेहेरा त्यांच्यापेक्षाही चिंतातुर.

नरसिंह: डॉक्टर, कसं आहे माझं कुंकू, आपलं माझी जानकी?
डॉक्टर: आम्ही प्रयत्नांची शर्थ करतो आहोत मिस्टर किल्लेदार.

नरसिंह: डॉक्टर, पैश्यांची चिंता करू नका.
डॉक्टर: अहो, तुम्ही राजकारणी म्हटल्यावर ते आलंच की.

आत्याबाई: कसंही करा आणि आमच्या जानकीला वाचवा डॉक्टर
डॉक्टर: आत्याबाई, अहो, वैद्यक शास्त्रालाही मर्यादा आहेतच. पण मिस्टर किल्लेदार, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे.

नरसिंह: बोला डॉक्टर
डॉक्टर: तुम्हाला कल्पना असलेली बरी. हे पहा, मिसेस किल्लेदारांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे. त्यामुळे त्यांची एक नस दुखावली गेलेली आहे. त्यामुळे त्यांना, त्यांना, त्यांना.....

कॅमेरा आळीपाळीने नरसिंह, आत्याबाई, जानकीचा भाऊ, डॉक्टर आणि वाकनीस ह्यांच्यावर फिरतो.
नरसिंह: (करड्या आवाजात) त्यांना काय डॉक्टर??
डॉक्टर: त्यांना तात्पुरतं अंधत्व आलंय.
आत्याबाई: (मटकन खाली बसत) अरे देवा!
वाकनीसः तात्पुरतं अंधत्व ? म्हणजे काय डॉक्टर?

डॉक्टर: सांगतो, त्यांना शुध्दीवर आल्यावर काहीही दिसणार नाही. पण त्यामुळे त्या जन्माच्या आंधळ्या झाल्या आहेत असं मात्र नाही. त्यांची दृष्टी परत येईल. पण एका महिन्यात, सहा महिन्यात, वर्षात, दहा वर्षात...कधी येईल ते मात्र कोणीच सांगू शकत नाही.

नरसिंह: ह्यावर काहीच उपाय नाही का डॉक्टर?
डॉक्टर: मिस्टर किल्लेदार, वैद्यक शास्त्रात काहीही नाही.
आत्याबाई: अरे देवा!
नरसिंह: आत्याबाई, सावर स्वतःला. ही वेळ हातपाय गाळून बसण्याची नाही.

वाकनीसःडॉक्टर, तुम्ही म्हणालात ह्यावर वैद्यक शास्त्रात काहीही उपाय नाही. म्हणजे दुसरा काही उपाय आहे का?
डॉक्टर: म्हटलं तर आहे.
नरसिंह: कोड्यात बोलू नका डॉक्टर, एक भवानीमाय तसं बोलते तेव्हढं पुरे आहे. स्पष्ट सांगा.
डॉक्टर: ठीक आहे मिस्टर किल्लेदार, स्पष्टच सांगतो. मिसेस किल्लेदार गच्चीवरून पडल्या तेव्हा त्यांना हे अंधत्व आलं. त्यांना पुन्हा दृष्टी मिळवून द्यायची असेल तर त्यांना पुन्हा गच्चीवरून ढकलून द्या. मी छातीठोकपणे सांगतो की त्यांना पुन्हा दिसू लागेल.

स्वप्ना...तुला कळकळीची विनन्ती...तु प्रवाहवरची बन्ध रेशमाचे बघ. मला सिरिअलपेक्शा तुझी समीक्शा जास्त आवडते.

धन्स लोक्स!

ऐकलंत का? आपल्या डायनाचा मोठा मुलगा आहे ना, हो हो, विल्यमच. त्याचं की नाही लग्न आहे. इश्श! कोणाशी म्हणून काय विचारताय? अहो, केट मिडलटनशी. हिस्टरी रिपिटस इटसेल्फ बरं का. प्रिन्स चार्ल्सने नाही का एका राजघराण्याशी संबंध नसलेल्या मुलीशी लग्न केलं होतं, तसंच हा राजकुमार पण एका सर्वसामान्य मुलीशी लग्न करतोय म्हटलं. आता बापाचे कित्ते गिरवायचं इथंच थांबवलं तर बरं होईल म्हणा. ते जाऊ द्यात. तर काय सांगत होते? हा, आई गेली तर केवढं लहान होतं पोर. बघता बघता किती मोठ्ठा झालाय. परवा, टीव्हीवर दाखवत होते तेव्हा मीठ-मोहर्‍यांनी टीव्हीचीच दृष्ट काढलीन मी. उगाच कोणाची नजर नको लागायला.

तर ह्या शाही लग्नाचं आमंत्रण तुम्हा-आम्हालाही आहे बरं का? आपल्या भारतीयांना कसे विसरतील? इतकी वर्ष राज्य केलंय ना आपल्यावर. त्यांच्या आनंदात आपल्यालाही सामिल करून घेणारेत ते. आपलं ट्रॅव्हल लिव्हिंग चॅनेल आहे ना त्यावर २५ एप्रिल पासून ह्यावर अनेक कार्यक्रम आहेत. अगदी वर्‍हाडी मंडळी कोण कोण आहेत त्यापासून ते लग्नाच्या तयारीपर्यंत सगळं सगळं दाखवणार आहेत. मी तर बाई डोळ्यात प्राण आणून बसलेय अगदी. त्यांचं लग्न लागलं की इथूनच अक्षता फेकून आशिर्वाद पण देणार आहे. देवा रे! कॅमेलाबाई झी टीव्हीवरच्या मालिका बघत नसू देत नाहीतर बिचार्‍या केटची जानकी नाहीतर अर्चना व्हायची Sad

मी तर रुखवताचं सगळं सामानसुध्दा तयार ठेवलंय. ट्रॅव्हल लिव्हिंग वर ते कुठे पाठवायचं ते सांगितलं की लगेच पाठवून देणार. सध्या केटसाठी एखादा मस्त उखाणा शोधतेय. तुम्हाला सुचला तर कळवा हं मला. मग भेटूच लग्नात.

स्वप्ना Happy अरे हल्ली कोणी मउवा बघत कि नाही , गौरी मेली अस वाटत ,तोच नवी गौरी आली आहे चेहरा बदलून नाव काय आहे त्या अभिनेत्री च ?

"बघ,बघ, कसा तोर्‍यात बसलाय ते. आपल्याकडे ढुंकूनही बघत नाही आजकाल"
"चालायचंच बाबा, एकेकाळी आपली सद्दी होती. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे"

"हो ना, पूर्वीच्या काळी निरुपा रॉयने ’बेटे, मैने तुम्हारे लिये मूलीके पराठे और गाजरका हलवा बनाया है’ असं म्हटलं रे म्हटलं की तमाम आया डोळ्याला पदर लावायच्या. आईचं मुलावरचं प्रेम ह्यातूनच तर सिध्द व्हायचं"

"आणि आज? ’ईईईई....गाजराचा हलवा आणि मुळ्याचे पराठे? हा काय हिंदी पिक्चर आहे? चांगला साजूक तुपातला गोड शिरा कर आई. कित्ती दिवस झाले खाऊन” असं म्हणाली पिंकी आज आईला. तरी बरंय, परवापरवापर्यंत बर्गर आणि पिझ्झाशिवाय ’पान’, आपलं ’ताट’, हलायचं नाही तिचं. काय दिवस आलेत रे बाबा" गाजराच्या हलव्याने मान हलवली.

"ह्म्म्म्म, ती कोण केकता कपूर आली आहे ना मराठीत सिरियल घेऊन. तिच्या त्या माप्रिप्रिकमध्ये ती शमिका बघावं तेव्हा अभिला आणि घरच्यांना गोड शिरा खायला करून घालत असते. आजकाल सगळ्या तरुण मंडळीत त्याची क्रेझ झाली आहे. वाढदिवसाला पण म्हणे केकऐवजी गोड शिराच कापतात. परवा ती ’मीठेमे मीठा क्या है’ ची जाहिरात लागली होती तर कुणाल जोरात ओरडून म्हणाला "रवेका शिरा’!"

"ह्या केकतेच्या......परवा कुणालची आई शेजारच्या वहिनीला सांगत होती की केकतेला म्हणे मोदक, चिवडा आणि पोहे आवडतात. आजकाल ’कांदेपोहे' समारंभ होत नाहीत त्यामुळे आम्हाला तसंही कोणी विचारत नाही. म्हटलं, चला, या निमित्ताने तरी आपल्याला टीव्हीवर झळकायची संधी मिळेल. पण कसचं काय?" पोह्याने आपली कैफ़ियत मांडली.

"त्या शमिकाने तर लग्नात उखाणा पण शिर्‍यावरच घेतला म्हणे, ऐनवेळी अभिचं नाव त्यात घातलं हे त्याचं नशिब" मुळ्याचा पराठा पुन्हा वैतागला.

"ते तर काहीच नाही, त्या जानकीला काही दिसत नाहिये तरी म्हणे नरसिंहासाठी तिला त्याच्या आवडीची डिश बनवायची आहे. कुठली माहित आहे का? रव्याचा गोड शिरा" गाजराचा हलवा शिरा ताणून ओरडला.

"जाऊ देत हो, चला आपण विल्यम आणि केटच्या लग्नाचं प्रक्षेपण पाहू यात. तेव्हढं दु:ख विसरायला होईल" पोह्याने सुचवलं.

विल्यम आणि केट हे "मॅन अ‍ॅन्ड वाईफ़" असल्याचा निर्वाळा प्रिस्टने दिला. लाजतलाजत केट म्हणाली "आय हॅव अ‍ॅन अनाउन्समेन्ट टू मेक. एव्हरीवन नोज अबाउट द डेज ऑफ़ द ब्रिटीश राज इन इंडिया. आय वॉन्टेड टू हॅव ट्रॅडिशन फ्रॉम इंडियन वेडींग टूडे. आय अ‍ॅम गोईंग टू रिसाईट टू लाईन्स ऑफ़ व्हॉट इज कॉल्ड अ‍ॅन उखाणा इन अ‍ॅन इंडियन स्टेट नेम्ड मॅहाराष्त्रा’

थोडं थांबून केट्बाई बोलल्या
"शिर्ह्यात शिर्हा रव्याचा शिर्हा
विल्यमच्या र्‍हाजमुकुटात कोहिनूर हिरा"

पोह्याने टीव्हीवर शिरा भरलेली डिश फेकून मारली.

बिरबल महालात आला तेव्हा अकबर बादशाह चिंताग्रस्त होऊन बसला होता. समोर ठेवलेल्या पंचपक्कांनाच्या ताटाकडे त्याने ढुंकूनही पाहिलं नव्हतं.

"आदाब अर्ज है जहांपनाह" बिरबल म्हणाला. पण बादशहाचं लक्ष नव्हतं.
""आदाब अर्ज है जहांपनाह" बिरबल पुन्हा म्हणाला.

"कोण बिरबल? अगदी वेळेत आलास बाबा"
"काय झालं जहांपनाह? फार काळजीत दिसताय."
"अरे काय सांगू तुला? आत्ताच एक मंत्री भेटून गेले. खुल्या बाजारातून रवा, साखर आणि केळी सगळं गायब झालंय. काळा बाजार तेजीत आलाय अगदी. हे काय चाललंय काय?"

"काळजी नसावी हुजूर. २ दिवसात ही समस्या सोडवतो. तुम्ही निश्चिंत असा"
"खरंच?"
"खाविंदांच्या पायाची शपथ"

४-५ दिवसांनी बिरबल महालात आला तेव्हा अकबर एकदम खुशीत होता. त्याने बिरबलाचं हसतमुखाने स्वागत केलं.
"तुम तो जादूगर निकले. काय केलंस तरी काय? आमचे मंत्री म्हणत होते की रवा, साखर आणि केळी पुन्हा खुल्या बाजारात मिळू लागलेत. बहोत खूब!"

"खाविंदांची कृपा आहे सारी"
"पण केलंस तरी काय तू? जरा हमभी तो सुने"

"खाविंदांची परवानगी असेल तर एक शेर अर्ज करतो"
"तू आणि शेरोशायरी? ऐकावं ते नवलच. ऐकव ऐकव"

"शुक्रिया,

बाजारातून गायब झाले रवा, केळी आणि साखर
बाजारातून गायब झाले रवा, केळी आणि साखर

पेंडशांच्या घरात शिर्‍यानेच साजरे होतात
.......ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर"

"अरे बापरे! हे पेंडसे म्हणजे ते माप्रिप्रिकवाले तर नाहीत?" अकबराने घाबरून विचारलं. २ बेगमा असल्यामुळे त्याला बिचार्‍याला "माप्रिप्रिक" चा डबलडोस मिळायचा.

"जी हुजूर वोही. आता ते उठताबसता शिरा खातात म्हटल्यावर शहरातल्या तमाम बायका तेच बनवायला लागल्या. बारसं आहे कर शिरा, वाढदिवस आहे कर शिरा, लग्न आहे कर शिरा....म्हणून टंचाई निर्माण झाली होती."
"अस्सं, मग तू काय केलंस?"
"जहापनांह, तुम्हाला मी सांगायला नकोच, ह्या वर्षी राज्यात बीटाचं खूप पीक आलंय. एव्हढ्या बीटाचं काय करायचं हा प्रश्नच होता. "माप्रिप्रिक"शी संबंधित एका व्यक्तीशी माझी लहानपणापासूनची दोस्ती आहे. त्या व्यक्तिला सांगून मी शिर्‍याचं रूपांतर बीटाच्या हलव्यात केलं. आता पेंडसे आज्जींना डायबिटीस झाला असल्याने हलव्यात साखर नसणार आहे. ह्या आठवड्यातल्या एपिसोड पासून पेंडसे बिनसाखरेचा बीटाचा हलवा खात आहेत. आपोआप साखर, केळी आणि रवा ह्यांची मागणी खाली गेली."

"भई मान गये तुम्हे. चलो इसी बातपे कुछ मीठा हो जाये - खूप दिवसात रव्याचा शिरा खाल्ला नाहिये"
अकबराने टाळ्या वाजवताच २ सेवक ताट घेऊन आले. ते पुढ्यात येताच अकबर आणि बिरबल हसत सुटले. .....कारण ताटात बीटाच्या हलव्याने भरलेल्या वाट्या होत्या!

Pages