संथ चालती ह्या मालिका, त्यांच्यावरची आमची टिप्पणी ऐका

Submitted by स्वप्ना_राज on 3 December, 2010 - 01:08

मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.

वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.

वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.

वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.

-----

गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."

"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.

"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"

"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."

बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"

कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"

कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.

"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.

इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.

तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.

रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायका/पोरी जाम येड्या होतात. >>>>>>>> अजुन बरेच काही होतात .. भोगावे आम्हाला लागते ना..
आता साडी कशी नेसायची ..... हे नेट वरुन कसे आणि कोणत्या प्रकारे सांगायचे ? चपाती ला इंग्लिश मधे कसे सांगावे ? पिठ मळायचे असते हे कसे सांगायचे ? करवा चौथ ला जाळीतुनच कशाला नवर्याला बघतात काय स्पष्टीकरण देउ.. ?

एक तर भारतात मैत्रिणी मिळत नाही आणि बाहेरच्या केल्या की हे भोगावे लागते .....

सगळ्या आमच्याच राशीला मिळतात ... .... Sad Happy

उदयन.. अरे गुगल कर ना..

साडी कशी नेसायची >> युट्युबवर १०० व्हिडिओज आहेत..
चपाती ला इंग्लिश मधे कसे सांगावे >> फोटो दाखवुन (मेकिंग ऑफ रोटीचा पण व्हिडिओ मिळेल युट्युबवर)
पिठ मळायचे असते हे कसे सांगायचे >> युट्युबवर व्हिडिओज आहेत..
करवा चौथ ला जाळीतुनच कशाला नवर्याला बघतात >> गुगलवर उत्तर आहे. शोधा म्हणजे सापडेल.

अर्थात तू हे सगळं दाखवत बसू नकोस. त्यांना सांग की गुगल करायला.

उदयन....अहो..त्या परदेशीमैत्रिणींपैकी एकीशी कायमचे सूत जुळवा आणि तिला स्वतःच्या आईच्या ताब्यात देऊन टाका....
तिचे/ तुमचे गुगलायचे कष्ट वाचतील....;)

उदय...सल्ला ऐक लग्नाचा.......एखादी मड्डम बघ.....

हे भगवान ................

इथे बोलायचे वांदे............. तुम्हीतर आयुष्य भर बोलायला लावत आहे... ट्रांसलेटर विकत घ्यावे लागेल Biggrin

ट्रांसलेटर विकत घ्यावे लागेल >>> गरज नाही. मुली लौकर नविन भाषा शिकतात, फक्त ग्रामर तेव्हढं सहन करावं लागेल. Biggrin

एकताचा नंबर.....नक्को बाई....त्यापेक्षा उदयन, पटवाच हो एक मड्डम. देशमुख हेच तुमच्या आगामी सीरियलचे हिरो हिरवीण.... ( ह्यानंतर ' नन्नन्ना ननननना' अशी सलील कुलकर्णींची ट्युन वाजते)

Actor Calling Actor (एफएम ९२.७ वरचा कार्यक्रम)

Dad, आमीर खान मराठी सिख रहा है ये सुनकर मैनेभी मराठी सिखनेकी ठान ली. किसीने सुझाव दिया इस लिये मैने झी मराठी पे ७ बजहकी सिरियल 'तू तिथे मी' देखनी शुरू कर दी. लेकिन frankly Dad, ऐसा लगता है के ये सिरियल सदियोंसे चल रहा है. ये सिरियल बंद क्यो नही हो रहा Dad?

बेटा, इस बातपे मुझको दो पंक्तीया याद आ रही है, अर्ज करता हू, मुलाहिजा फर्माओ
डॅssssssड.............

के नदिया से दरिया, दरिया से सागर, सागर से गहरा जाम
हो हो हो जाममे डूब गयी यारो मेरे जीवनकी हर शाम, बेटे.....हर.....शाम.

लेकिन Dad, इसका मेरी प्रॉब्लेमसे क्या कनेक्शन?

देखो बेटा, हालाकी इसमे दो राय नही है के ये जो सिरियल्स चल रहे है वो चलतेही जाये इस लिये इनके ओरिजिनल प्लॉटमे इतना पानी डाला जा रहा है की दूधमे मिलावट करनेवाले भी शरमा जाये. इसके चलते पानीके tankers के पीछे 'मेरा भारत महान' के बजाय 'तू तिथे मी' लिखा जाये ये तो लाझमी है. बाकी फोन जल्दीसे रखो क्योंकी call waiting मे आझमी है.

स्वप्ने..... ____________/\____________ धन्य आहेस माते अशक्य हसतेय Happy

"जोडी तुझी माझी" चे काही भाग संपूर्ण बघायचे आहेत कुठे बघता येतील ? यु ट्यूब वर बघितलं तर जवळ जवळ सगळेच भाग पाच -पाच मिनिटांचेच आहेत Sad

सुजा अग, स्टार प्रवाहवर मिळेल बघायला, मी गुगल सर्चमध्ये स्टार प्रवाह असं दिलं होतं मागे, नरेद्र जाधव यांचा एपिसोड बघण्यासाठी, मला मिळाला बघायला,

ती. प्रिय सौ. आईस,

चि. अनुष्काचा शि. सा. न. तू सांगितल्याप्रमाणेच केलेय ना इमेलची सुरुवात? कशी आहेस तू? तुला माहिताहे? तू भारतातर्फे मंगळावर पाठवलेल्या यानातून जाणारी पहिली भारतीय महिला अंतराळवीरबाला आहेस हे कळल्यापासून शाळेत माझी वट सोल्लीड वाढलेय. माझ्या शेजारी ती पियू बसते ना ती तर मला रोज तुझ्याबद्दल विचारत असते.

बरं, ते जाऊ देत. तू शनिवारी निघालीस तेव्हा मला सांगितलं होतंस ना की "तू तिथे मी" मध्ये काय होतं ते तुला पाहून सांगायचं म्हणून. ए आई ग्, मला ना शनिवार, रविवार आणि सोमवारचे एपिसोडस पहायलाच नाही मिळाले. शनिवारी बाबा एव्हढा खुश होता की त्याने आम्हाला मस्त पिझ्झा खायला नेलं होतं. मग आम्ही अलिबागला गेलो त्या बंगल्यात किनई टिव्हीच नव्हता. पण तू काळजी करू नकोस. पियुची आई दररोज ही सिरीयल बघते. मी तिला विचारून नीट लिहून ठेवलं सगळं.

हा दादा होळकर कोण? त्याने आणि प्रियाने म्हणे कोण ती आर्या तिला पळवून न्यायचा प्लान केला. तसं करून सत्यजितला आपल्याशी लग्न करायला लावायचा प्रियाचा प्लान होता म्हणे. पण मंजिरीने ते पाहिलं. आणि आर्याला सोडवलं. मग तिने आर्याला सांगितलं की तिचं आणि सत्यजितचं लग्न झालं होतं, प्रियाचं नव्हे. आर्याला मंजिरी चांगली आहे हे कळलं. हे सगळं प्रियाला सांगू नको असं आत्याने आर्याला सांगितलं. मग सत्यजितने दादा होळकरला आपल्या ऑफिसात बोलावलं आणि आपलं वैर (हा शब्द बाबाने सांगितला) संपवायला काय करू असं विचारलं. दादाने रेड फादर, सॉरी, तांबडे बाबा शी बोलायची acting केली. सत्यजितने एक वेड्यांचा डॉक्टर आणि एक पोलीस आधीच बोलावून ठेवले होते. असं कोणीही बोलावलं की वेड्यांचा डॉक्टर आणि पोलीस येतात का ग आई? मग मागच्या महिन्यात आत्या आणि आजी आले होते तेव्हा 'सगळा वेड्यांचा कारभार आहे' असं तू पुटपुटत असायचीस तेव्हा का नाही बोलावलंस त्याला? आजचा एपिसोड बघून तर मला वाटलं की तो डॉक्टर त्या सत्यजितच्या घरात आला असता तर एव्हढे वेडे बघून स्वत:च वेडा झाला असता. एनीवे, त्या सत्यजितने त्या डॉक्टरला म्हटलं की होळकर वेडा आहे, इथे कोणी नसताना तांबडे बाबा शी बोलतोय. मग होळकर म्हणाला की मी वेडा नाही. तांबडे बाबा म्हणजे मीच. मीच त्याला निर्माण केलंय असं काहीतरी. मला ना ती पियुची आई काय बोलली ते नीट कळलं नाही. इन अ नटशेल, होळकरने आपण अनेक खून केल्याचं कबुल केलं आणि त्या डॉक्टर आणि पोलीस दोघांनी त्याला धरून नेलं. मंजिरी आणि सत्यजित ह्यांनी प्रियाला अद्दल घडवायचा प्लान बनवला. हे लोक आत्ता एव्हढं प्लानिंग करताहेत ते त्यांनी आधी का नाही केलं काय माहीत.

ओक्के, आता आजचा एपिसोड. आज मंजिरी सत्यजितच्या घरात आली आणि तिने प्रियाला मला सत्यजितबरोबर परत संसार करायचाय असं सांगितलं. मग प्रिया पेटलीच. तिने सत्यजित माझ्याशी लग्न करणार आहे असं म्हटलं. Oh My God! ह्या दोन्ही लेडीज वेड्या आहेत. मला तर तो सत्यजित क्युट किंवा handsome वाटत नाही अजिबात. बाबाला constipation झालं की तो कसा चेहेरा करून असतो ना तस्सा चेहेरा असतो त्याचा नेहमी. एनीवे, मग प्रियाने आपली बढाई (हा शब्द तू आत्या अमेरिकेबद्दल सांगायला लागली की वापरतेस ना?) मारताना आपण कसं त्या आशिषला युझ केलं, त्याला कसं मारलं वगैरे वगैरे ऐकवलं. मग त्याचं फुटेज दाखवलं परत सगळं. शी! बोअर् झालं बाबा मला तर. पण आता ३-४ दिवसच बघायचं आहे म्हणून बघितलं. तेव्हढ्यात तो सत्यजित आला. पण मंजिरीने त्याला मला परत यायचं म्हटल्यावर तो नाही म्हणाला तिला. म्हणे मी प्रियाशी लग्न करणार आहे. मला शुभ्राविषयी काही वाटत नाही असं म्हटलं. मग मंजिरी गेली. प्रियाने आनंदाने जाम सेंटी डायलॉग्ज मारले. अग, तुझा विश्वास बसणार नाही. पण तिने 'आपण कधी लग्न करायचं' हा एक प्रश्न त्याला ३-४ वेळा विचारला. हॉरिबल! तर तो म्हणाला तू म्हणशील तेव्हा करू. बाबा तिथे काहीतरी शोधायला आला होता तेव्हा हा सीन बघून म्हणाला 'धिस गाय इज आऊट ऑफ हिज माईन्ड'. मग 'आगीतून फुफाट्यात' असंही काहीतरी म्हणाला. म्हणजे काय ते मला इमेलमधून कळव हं.

सो, प्रिया एकदम happy झाली तेव्हा तो तिला म्हणाला की आर्या सुहासची मुलगी आहे ती मला नको. प्रियाने विचारलं की तुझी ती लाडकी आहे ना? तर तो म्हणाला की माझी मुलगी माझ्याजवळ नव्हती म्हणून मी तिचे लाड केले. पण आता आपलं लग्न होणार आहे तर मला ती नको. मग प्रियाने तिला abortion वगैरे कसं करता आलं नाही ते त्याला ऐकवलं. आणि म्हणाली की तिला दूर कुठेतरी orphanage मध्ये टाक. हाउ हॉरिबल!

इथे ना आजचा एपिसोड संपला. मला लगेच उत्तर पाठव हं. आम्ही सगळे इथे मजेत आहोत.

Take care. Sleep tight, don't let the martians bite (हे दादाने लिहायला सांगितलं)

तुझी चि. अनुष्का

यो मॉमी डिअरेस्ट,

मी 'व्हॉटसप' म्हटलं तर चिडशील. सो, कशी आहेस? आज माझ्याकडून इमेल बघून, काय म्हणतात ते, हं, तीन ताड उडाली नसशीलच कारण तिथे स्पेसमध्ये तरंगतच असणार तुम्ही. Happy ओके, ओके, आता असं म्हणून नकोस की मी बाबासारखे पीजे मारतो म्हणून. कसं आहे ना, उप्स, मला तुझ्या त्या मंजिरीसारखं बोलायची सवय लागली बघ एकच एपिसोड बघून. येप, यू रेड इट राईट. कालचा 'व्हेअर यू देअर आय' म्हणजेच 'तू तिथे मी' चा एपिसोड मी पाहिला. अनुष्काची टेस्ट होती ना आज त्यामुळे तिची जाम टरकली होती. पुस्तकांत डोकं घालून बसली होती काल. माझ्या अगदी हातपाया पडली. मग म्हटलं बडा भाई होनेके नाते आपुनका भी कुछ फर्ज बनता है. सो आय सेड येस.

But frankly mom, मला तुला काय लिहायचं तेच कळत नाहीये. २-३ पाच मिनिटांचे Ad breaks, अनेक flashbacks आणि जेव्हढे लोक सीन मध्ये आहेत त्यांच्यावर एकदा फ्रंटने, एकदा लेफ्टने आणि एकदा राईटने असे क्लोजअप्स. Background ला लाउड म्युजिक (आणि मी मात्र माझ्या रुममध्ये लावतो तेव्हा चिडतेस!). हे पण, एपिसोडची सुरुवात promising होती हां. ती प्रिया (awesome man!) जे काही बोलली होती ते त्या आर्याला ऐकवायचा सत्यजित ड्यूडचा प्लान होता. त्याप्रमाणे आर्याने सगळं ऐकलं. मग तो एकदम चिडला आणि प्रियाला म्हणाला की माझ्या मुलीमुळे मी गप्प होतो पण आता तुझा बुरखा मी फाडलाय (फॉर द रेकॉर्ड, प्रियाने बुरखा नव्हता घातला मॉम), तू आता निघून जा वगैरे. खूप इमोशनल डायलॉग्ज मारले त्याने. तेव्हा मी माझे व्हॉटसेप मेसेजेस चेक करत होतो त्यामुळे डीटेल मध्ये नाही सांगू शकत तुला. मग प्रियाने इमोशनल डायलॉग्ज मारले. इथे मी मेसेजेस पाठवत होतो. त्यामुळे तेही नाही सांगू शकत. सॉरी. मी एव्हढं ऐकलं की तो म्हणाला तू जे काही बोललीस ते रेकॉर्ड झालंय. तुला शेवटची संधी देतो. इथून जा आणि परत येऊ नकोस. शेवटी सत्यजित, आत्या, आजी कोणीच भीक घालत नाही म्हटल्यावर ती जायला निघाली. तेव्हढ्यात ती मंजिरी आली. प्रियाने चिडून मंजिरीच्या कानाखाली जाळ काढायला हात उचलला होता तो मंजिरीने धरला. मी एकदम सरसावून बसलो. म्हटलं चला, आता मस्त catfight बघायला मिळेल. बट नो सच लक. मंजिरीने लव्ह वगैरे वर काय म्हणतात ते, आजी फार सल्ले द्यायला लागली की तू म्हणतेस ते, हा, प्रवचन, प्रवचन दिलं तिने लव्हबद्दल. मग ते व्यवस्थित ऐकून घेऊन प्रिया गेली. ओह, बाय द वे, बाबा त्या प्रियाकडे फार टक लावून बघत होता हं. ती गेल्यावर sigh करून गेला स्टडीमध्ये. मला पण वाटतं तो सत्यजित ड्यूड mad आहे. प्रिया सोडून मंजिरी आवडते त्याला. ओह वेल, मग मंजिरी माझं काम झालं असं म्हणून निघून गेली. जाताना त्या आर्याच्या गालाला हात लावून 'टेक केअर' म्हणून गेली. व्हॉट अ निरुपा रॉय!

मग मंजिरी आणि तो सोन्या (इज धिस हिज रियल नेम?) हॉटेलमध्ये बोलत होते. इथे ३-४ flashbacks दाखवले - सत्यजितने मंजिरीवर डाऊट घेतला तो, मग त्याला आशिषने खरं सांगितल्यावर तिच्या पाया पडून माफी मागितली तो, मग मंजिरीने तो व्हिडीओ पहिला तो. बोअरिंग स्टफ! मग सत्यजितच्या घरात नेत्रा, आत्या, आजी वगैरे लेडीज मंजिरी का थांबली नाही, तिने ह्या घरात परत यायला पाहिजे असं डिस्कशन करत होते. mom, तू घरात असताना किती काम करतेस. ह्या लेडीज काही काम करताना दिसत नव्हत्या. स्ट्रेंज! दे नीड टू गेट अ लाईफ. दुसऱ्याच्या पर्सनल स्टफबद्दल बोलणं राँग आहे ना? एंडला हे सत्यजित आणि मंजिरीचं matter आहे त्यांनाच sort out करू देत असं डिसाईड केलं त्यांनी.

ओह बॉय, मला हे एव्हढं लिहायची सवय नाही. आय एम टायर्ड. बट ऑल धिस फॉर माय सुपरमॉम. तुला तिथून अर्थ दिसते का? मार्सवर आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर मागच्या मान्सूनमध्ये पडला होता त्यापेक्षा जास्त मोठे खड्डे आहेत का? असतील तर प्लीज फोटो काढ आणि मला मेल कर. मला फेसबुकवर अपलोड करायचे आहेत. आय एम शुअर लोकांना काही फरक कळणार नाही. तुला अजून एक पण मार्शन दिसला नाही? दिसला तर प्लीज फोटो काढ आणि मला मेल कर. मला फेसबुकवर अपलोड करायचे आहेत.

टेक केअर, ciao....

अमिताभ

हॅलो राणीसरकार,

कश्या आहात? आता माझी कटकट नाही म्हणजे मजेतच असणार. ओके, ओके, तू विचारायच्या आत सांगतो की दोन्ही पिल्लांपैकी एकही ही मेल वाचत नाहीये. खरं तर, दोघेही आज इथे नाहीयेत. अमिताभची आज फुटबॉल match आहे आणि अनुष्का मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला गेलेय. येप, यू गेस्ड इट राईट. आज तुझी सिरियल पाहून अपडेट द्यायचं काम मज पामरास मिळालंय. ह्यात आनंदाची गोष्ट एव्हढीच आहे की माझ्याबरोबर शेजारचा बोसबाबू आणि वर्मा दोघेही होते. त्यांच्या बायका ७ ते ९ झी हिंदी, कलर्स वगैरे वर मालिका बघत बसतात. त्यामुळे वैतागले होते. इथे त्यांना भाषा कळत नाही. त्यामुळे वैतागायचा प्रश्नच येत नाही. उलट दोघांनी खूप एन्जॉय केली बरं का तुझी सिरियल.

वेल, आजच्या एपिसोडमध्ये आधी तुझा तो सत्यजित आपल्या आजीबरोबर बोलत होता. तेच ते दळण. ती म्हणत होती की तू मंजिरीला का थांबवलं नाहीस. आणि हा देवदासासारखा चेहेरा करून म्हणत होता की मला आर्याचा विचार केला पाहिजे. मंजिरी हे कधीच विसरू शकणार नाही की ती प्रियाची मुलगी आहे. त्याच्या चेहेर्यावर एव्हढे रडके भाव होते की वर्मा म्हणाला 'यार, इसके फॅमिली मे किसीकी डेथ हुई है क्या?'. म्हटलं नाही रे बाबा, त्याची बायको घर सोडून गेली आहे म्हणून तो दु:खी आहे. ह्यावर त्याने 'फेक मत यार' म्हणून मलाच वेड्यात काढलं. मग तो पाचेक मिनिटं गप्प होता. बहुतेक आपल्या आयुष्यात असं झालं तर काय बहार येईल अशी सुखस्वप्नं रंगवत असावा. मग ती आत्या सत्यजितकडे आली. विषय तोच. ही आत्या थोडी सर्किट आहे काय? काय राजकुमार वगैरे बोलत होती मला काही कळलं नाही. च्यायला, कोण ह्या मालिकेचे संवाद लिहितं?

मग पुढचा सीन त्या मंजिरीची मुलगी, शुभ्रा आणि मंजिरीचा खडूस बाप. त्याने तिला मंजिरी कोल्हापूरवरून् निघालेय असं सांगितलं. तिने एकटीच निघालेय का विचारलं तर तो म्हणाला नाही सोन्याकाका आहे तिच्याबरोबर. आणखी कोणी नाही. मग पुढच्या सीनमध्ये मंजिरी भुतासारखी हजर झाली. परत त्या शुभ्राने बाबा नाही का आला असं विचारलं त्यावर तिने नाही म्हणून सांगितलं. हा सत्यजित लकी आहे. दोन्ही मुली त्याच्यासाठी जीव टाकतात. इथे मी एक महिनाभर टूरवर असतो तर दोन्ही पोरं एका शब्दाने विचारत नाहीत की बाबा आहे का परागंदा झाला. मात्र दिवसातून दहा वेळा तुझी आठवण काढतात. असो. पुढचा सीन सत्यजित आणि आर्या. तिने तू कोण आहेस, माझा बाबा नाहीस ना असं म्हटलं तेव्हा तो म्हणाला मी तुझा बाबा आणि तू माझी मुलगी. मग दु:ख माणसाला strong करतं वगैरे डायलॉग झाले. महा बोअर!!

फायनल सीन आर्या आणि आत्या मधला. आर्याने मंजिरी (जसं काही तिचं बारसंच जेवली आहे!) कोण वगैरे विचारलं तेव्हा आत्याने flashbacks मधून मालिकाकथासार सांगितलं. बोसबाबू आत्तापर्यंत गप्प बसला होता त्याला एकदम वाचा फुटली 'उडी बाबा, वो हमारे बेन्गोली सिरियल मे भी ऐसेही flashbacks दिखाते है. भोयोन्कर, आय टेल यू, अतिभोयोन्कर'. आता हा बंगाली परंपरेला जागून टीव्ही जाळतोय का काय ह्या भीतीने वर्माने त्याला धरून ठेवलं होतं. तोवर आत्याने 'मंजिरी आणि तुझा बाबा ह्यांच्यामध्ये तुझी ममा आली' हे सत्य आर्याला सांगितलं. आता हे आधीच केलं असतं तर ही सिरियल तू इथून निघायच्या आधीच नसती का संपली? मग आर्याने 'ती परत येणार नाही का?' असं विचारलं. मी मनात म्हणालो 'अजून २ एपिसोड्स उरलेत. न येऊन सांगते कोणाला'. आत्याला बऱ्याच मराठी सिरियल्सचा अनुभव गाठीशी असावा कारण तिने ती येईल आणि तुझे लाड पण करेल असं अगदी ठामपणे तिला सांगितलं.

एपिसोड संपला तेव्हा वर्मा म्हणाला 'यार एक बात बता. मराठी सिरियल्समे सिझन्स नही होते ना?'. बाप रे! एसीत पण मला नुसत्या विचाराने घाम फुटला. डोळ्यासमोर आलं की तू व्हिनसवरच्या एक्सपीडिशनवर गेलेयस आणि मी दररोज 'तू तिथे मी' च्या सिझन २ चे अपडेट्स देतोय की शुभ्रा आणि आर्या एकाच मुलाच्या प्रेमात पडल्या आहेत, प्रिया परत आलेय, आर्या, शुभ्रा, प्रिया, मंजिरी, आत्या, नेत्रा सगळ्या एकच वयाच्या दिसताहेत आणि सत्या "इंटरनेशनल बिझनेसमन" होऊन फ्रान्समध्ये स्थायिक झालाय (खिडकीतून् आयफेल टॉवरचा फोटो). Happy

बाकी सब ठीक माय लेडी. चल, मी लॉगआऊट करतो आता. आज पिल्लांना घेऊन बाहेर जातोय जेवायला.
सी यू एन्ड टेक केअर

(अजूनतरी) फक्त तुझाच आशुतोष Wink

mataraani.com चा अ‍ॅडमिन वाकडं तोंड करून बसला होता.
'काय रे बाबा, काय झालं?' कोणीतरी त्याला विचारलं.
'अरे काय सांगू बाबा. वेबसाईट सॉल्लिड स्लो झालेय म्हणून मातारानींनी झापलं मला काल.'.
'वेबसाईट स्लो झालेय? का बरं?'
'अरे ती भारद्वाज फॅमिली आहे ना. शिंक आली तरी 'हे मातारानी हमारी रक्षा करना' म्हणून रिक्वेस्ट पाठवतात. बाकी कोणाच्या रिक्वेस्टस मातारानींपर्यंत पोचतच नाहियेत. साला, असा denial of service attack आत्तापर्यंत पाहिला नव्हता. त्यात भरीला भर त्या सिमरनचं दुसरं ससुराल झालंय. आणि ती बॉबी जासुस असल्यासारखी तिथे पण डिटेक्टिव्हगिरी करत फिरतेय. आधी झेपत नाही तिथे उडी घ्यायची आणि मग आहेच 'मातारानी रक्षा करना', ,'मातारानी आपका लाख लाख शुकर है'. वैताग लोक!'
'मग आता तू काय करणार?'
"मी काय करणार? मातारानीला रिक्वेस्ट पाठवलेय 'मातारानी इस भारद्वाज फॅमिलीसे मेरी रक्षा करना'"
'तुझी रिक्वेस्ट कशी पोचणार त्यांच्यापर्यंत?'
तु.क. टाकून अ‍ॅडमिन म्हणाला 'काल जन्माला आला आहेस का? ऑफलाईन रिक्वेस्ट पाठवली!"

सगळेच चैनल वाले महा पुरुषांच्या जीवावर उठलेत
सगळ्या महा पुरुषांना कौटुंबिक त्रास कसा झाला यापुढे चुकुनच एखादी मालिका जाते महा पुरुषांच्या घरातील चार पाच बायका कशा जुन्या विचारांच्या होत्या आणि त्यांनी महापुरुषाचा सुधारक पत्नीचा कसा छळ केला ।
उदा । उंच माझा झोका
महादेव रानडे यांच्या मृत्यू पश्चात रमाबाई रानडे २४वर्षे जगल्या
त्यांनी जे काही कार्य केले ते याच दरम्यान
परंतु झी च्या मते । त्यांना घरातील लालपांड्या टकल्या बायकांनी त्रास दिला हे दाखवणे जास्त महत्वाचे …
उद्या देव न करो आणि लोकमान्य टिळकांवर एखादी सिरियल बनो
नाहीतर त्यात ."गो भांडण करणे माझा जन्म सिद्ध असतो, शिंचे तु मला काय शिकवतेस "असले बोल टिळक पत्नीस नाहीतर मातेस शोभून नाही दिसणार

तर नागिनच्या शनिवारच्या एपिसोडमध्ये एक इच्छाधारी नागीण आणि ते इच्छाधारी मुंगुस बाकीच्या मानवांसोबत एका पबमध्ये गेले. बहुतेक मानवी रूप धारण केल्यावर त्यांना इंग्लिश आणि हिंदी वगैरे भाषा आपोआप येत असाव्यात. आम्ही पामर मानव असल्याने 'ही गोज, शी गोज, इट गोज' करत शाळेत घोकंपट्टी केली. असो. तर मग बहुतेक त्या मुन्गुसाला बरं वाटत नव्हतं अशी त्याने एक्टिंग केली आणि ती नागीण त्याला घेऊन तिथल्या एका खोलीत आली. त्या पबमध्ये बहुतेक अश्याच सोयीसाठी ती वेल-फर्निश्ड रूम होती. नागीनिला तो इच्छाधारी मुंगुस आहे हे माहीत होतं (त्याच्या शरीराच्या वासामुळे म्हणे!) पण तिला ते माहीत आहे हे त्या मुन्गुसाला माहीत नव्हतं. त्यामुळे तिला सरप्राईज करायचा त्याचा बेत फसला. आधी त्यांचं ते एकमेकांच्या अंगचटीला येणं पाहून ते आपली 'सदियोंकी दुष्मनी' विसरून प्रेमाचा झिम्मा खेळत आहेत की काय असंच वाटलं मला. ह्या सिरीयलीत काही होऊ शकत ना. पण नाही ते म्हणे एकमेकांना मारायचा प्रयत्न करत होते. असोत बापडे! पूर्वीच्या काळी व्हिलन आणि हिरो ह्यांना एकमेकांना असंही मारता येतं हे माहीत नव्हत हे बरं. नाहीतर काय काय बघायला लागलं असतं. मग त्यांनी ऑफिशियली एकमेकांशी मारामारी सुरु केली. ते प्राण्याच्या रूपांत आले की कपडे गायब, परत मानवी रूपात आले की तेच कपडे अंगावर येत. ही जादू कशी जमत होती देवाला ठाऊक. मग ती हिरोईन नागीण (जी मुंगसाशी लढणाऱ्या नागिणीची कझिन होय! ह्यांच्या आया बहिणी-बहिणी आणि त्याही इच्छाधारी नागीण होत्या म्हणे. बापांचा उल्लेख अर्थातच नाही. १०० वर्षं तप केल्याने इच्छाधारी नागीण होता येतं हेही लक्षात ठेवा) तिच्या मदतीला आली. दोघींनी मिळून त्या मुन्गसाच्या (मानवी) तोंडात दारू ओतली आणि त्याला खिडकीतून ढकलून दिलं. फैसला ऑन द स्पॉट! तो मानवी रूपात खाली पडला, मेला (बहुतेक!) आणि मग परत मुंगुस रूपात आला. इथे त्या हिरवीण नागिणीने आपले आधीचे पिवळे डोळे हिरवे करून कसलासा मंत्र म्हटला आणि आपल्या कझिनच्या अंगावरच्या जखमा बर्या केल्या. मग ते डोळे काळे झाले. मला तर वाटलं होतं की लाल/नारिंगी होतील. असो. ह्यापुढे काही पाहिलं नाही.

काल ससुराल सिमरका मध्ये ती सिमर आणि देविका (पाताळलोकातली देवी) लाव्हाच्या रसावर उभ्या होत्या. म्हणजे बहुतेक पाताळलोकात पोचल्या असाव्यात. त्यांच्यापुढे एक अतिमेकअप केलेली बयो उभी होती ती vamp. सिमरच्या हातात त्रिशूळ. ते तिने 'जय संतोषी मां' वगैरे पिक्चरात देवीचं काम करणाऱ्या बायका धरतात तसं धरलं होतं. संवाद शब्दश: आठवत नाहीत. पण सार येणेप्रमाणे: vamp ने विचारलं तुम मेरा विनाश करोगी. सिमर देवी उत्तरल्या - तुम्हारा विनाश करने के लिये मेरी भक्ती ही काफी है. मग vamp ने विकट हास्य केलं, डोळे मोठ्ठे केले. सिमरने आपले डोळे आणखी मोठे केले. ती देविका मंद का काय म्हणतात तसं सात्त्विक वगैरे हसत होती (ह्यालाच वेडगळ हसू ही म्हणतात!). आणखीही काही संवाद झाले. त्यात मध्ये २ वेळा मातारानीच्या सिंहाचा आणि दोन वेळा मातारानीचा क्लोजअप येऊन गेला. मग त्या vamp ने भूकंप करूंन जमीन हलवायला सुरुवात केली. सिमर आणि देविका इथेतिथे फेकल्या गेल्या. पण मग सिमरने 'जय मातारानी' असा घोष केला आणि ती एकदम तो त्रिशूळ घेऊन आकाशात उडाली. सुदैवाने मला बाहेर जावं लागलं त्यामुळे पुढे काय झालं ते मला माहीत नाही.

Pages