संथ चालती ह्या मालिका, त्यांच्यावरची आमची टिप्पणी ऐका

Submitted by स्वप्ना_राज on 3 December, 2010 - 01:08

मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.

वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.

वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.

वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.

-----

गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."

"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.

"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"

"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."

बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"

कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"

कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.

"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.

इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.

तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.

रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहाहाहाहहा, जबरदस्त...स्वप्ना...
मान गये...
काय अफाट लिहीतेस
:हहपुवा:

६४२-४६३४४, प्रज्ञा९,स्वाती२, सायली - खूप धन्स Happy

>>स्वप्ना, कसं सुचतं गं तुला?
रोज रोज ह्या बिनडोक सिरियल लागतात ना त्या शेणामुळे डोकं सुपीक झालं असणार, दुसरं काय?

अहो, अहो, शुक शुक, हो हो तुम्हीच. केव्हढे दचकलात? मला ओळखलं नाहीत बहुतेक. अहो, मी मायबोलीकर. मागे ओबामांना कुंकूच्या सेटवर घेऊन आलो होतो नाही का? हा, आठवलं ना?

ब्रेकिंग न्यूज पाहिली असेलच तुम्ही सोमवारची. हो, ओसामाला मारल्याची. लोक काय काय उलटसुलट बोलताहेत. कोणी म्हणतंय ओसामाला मारलेलंच नाहिये, दुसर्‍याच कोणालातरी मारलंय. कोण म्हणतंय ओसामा काही वर्षांपूर्वीच मेला होता. कोण म्हणतंय आता अमेरिकेची आणि पाकिस्तानची कट्टी होणार. तर कोण म्हणतंय पाकिस्तानला आणखी मदत मिळणार. पण मला आतली सगळी खबर माहित आहे. कान करा इकडे, तुम्हाला पण सांगतो. पण हे आपल्यातुपल्यातलंच हं. कोणा चॅनेलला सांगून ’ब्रेकिंग न्यूज’ करू नका.

तर काय झालं, १० वर्ष होत आली तरी लेकाचा ओसामा सापडेना तेव्हा ओबामांनी मला मागल्या गुरुवारी ओव्हल ऑफ़िसमध्ये बोलावून घेतलं. मला म्हणाले ’गड्या, हा ओसामा सापडला नाही तर मी काय इथे परत येईनसं वाटत नाही. काय तरी करायला हवं हे नक्की. पण कुठे दडून बसलाय काही ठिकाणाच लागत नाहिये"
मी म्हणालो "मिस्टर प्रेसिडेन्ट, सर, २ व्यक्ति आहेत ज्या ओसामाचा पत्ता नक्की सांगू शकतील"
"काय म्हणतोस काय? लवकर बोलावून घे त्यांना इथे"
"सर, त्या व्यक्ति भारतात आहेत, इथे येणार नाहीत. पण आपली आज्ञा असेल तर मी जाऊन त्यांच्याशी बोलून घेतो."

त्यांनी हो म्हटलं आणि मी लगेच भारतात आलो - चक्क व्हाईट हाऊसच्या खर्चाने! आहात कुठे? तर प्रथम गेलो ’कुंकू’तल्या "भवानीमाय" कडे. तिने सगळी गोष्ट ऐकून घेतली. आणि मग एकदम म्हणाली "जा, चालता हो". मला कळेना माझं काय चुकलं. मी काही बोलणार एव्हढ्यात म्हणाली "एक अंधाराकडे जाईल आणि एक प्रकाशाकडे". मला तर काही कळेचना. कोण अंधारात? कोण प्रकाशात? पण मी आपला व्हाईट हाऊस म्हण्जे पांढरं तेव्हा प्रकाश, आणि ओसामा व्हाईट हाऊसमध्ये जाणं शक्य नाही तेव्हा तिथे ओबामा जाणार. आणि पर्यायाने ओसामा अंधाराकडे म्हणजे "वरती" असा सोयिस्कर अर्थ काढला.

पण एव्हढं करूनही माझा मूळ प्रश्न अनुत्तरितच. ओसामाला शोधायचं कुठे. मग मी गेलो ’भाग्यलक्षमी"च्या ’गुरुआई’कडे. ही बाई सरळ माझ्याकडे बघायला तयार नाही, सारखी आपली तिसरीकडे पहातेय. पण ओबामांचं काम. त्यामुळे नेट धरला. म्हटलं "गुरुआई, काहीही कर, पण ओसामाचा पत्ता सांग". गुरुआईने दूर नजर लावली. हातात सूप, सुपात तांदूळ. त्यात हात फ़िरवत म्हणाली. "अरं लेकरा, तुमी समदीजनं त्याला शोधताय त्ये डोंगरदर्‍यात, कडेकपार्‍यात. पन त्यो तिथं न्हाई. त्यो दडून हाये एका मोठाल्या घरात, मोठ्या शहरात, आजूबाजूला पर्वत हायती. घराला उंच उंच भिंती हायंती. बघ त्याच्या घरातली मानसं कचराबी अंगनात जाळत्यात."
"आई, उपकार झाले. पण हा देश कोणता ते तरी सांग".
"अरं, एव्हढंबी कळंना व्हयं? ज्या देशातले राजकारनी आमाला त्यो कुटं हाये ते म्हाईत नाई म्हनून सांगत्यात ना अक्षी तिथंच सापडंल बघ त्यो"

माझी ट्यूब पेटली. आईला नमस्कार करून आणि ओबामांसाठी तिचा अंगारा घेऊन निघालो. उसगावात, आपलं अमेरिकेत, पाऊल ठेवताच क्षणाची उसंत नाही. आईचा अंगारा कपाळाला लावून ओबामांनी सुरू केलीच की मोहिमेची आखणी. मी आपलं मनातल्या मनात "गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीरमामाकी जय" म्हणून टाकलं. Happy हो, शुभकार्याला बाप्पाचा आशिर्वाद हवाच!

आता हेलिकॉप्टर्स कुठून निघाली, कशी पोचली वगैरे तपशील तुम्हाला वर्तमानपत्रातून कळला असेल. तो सांगत बसत नाही. तर अमेरिकन सैनिक गोळीबार करत 'त्या' घरात घुसले. त्यातले दोघे तिसर्‍या मजल्यावरच्या एका खोलीकडे गेले. आता हे मला कसं कळलं? अहो, ओबामांच्या सिच्युएशन रूममध्ये मी पण होतो की. (क्लिंटनबाईंच्या मागे बसलो होतो म्हणून फ़ोटोत दिसत नाहिये, उगाच शोधत बसू नका). हा, तर काय सांगत होतो - हे सैनिक खोलीकडे गेले आणि २ सेकंद खोलीच्या दाराबाहेर थबकले. सिच्युएशन रूममध्ये आम्ही सगळे गॅसवर. आणि एकदम "माझिया प्रियाला प्रीत कळेना" ऐकायला आलं. आईशप्पथ! मी बसल्या जागी उडालोच. ओबामांनी माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. मीही खांदे उडवले.

सैनिकांना खोलीत जाण्याचा आदेश मिळाला. त्यांनी दार ढकललं तर ते उघडलं. सावधानतेने त्यांनी आत डोकावून पाहिलं तर काय? आत चक्क लॅपटॉपवर "माप्रिप्रिक" चालू होतं. आणि बाजूला जमिनीवर ओसामा मरू्न पडला होता. त्याने मरायच्या आधी स्वत:चेच डोळे फ़ोडून घेतले होते. आणि मग डोक्यात गोळी घालून घेतली होती.

अहो, असे ’आ’ वासून काय बघताय माझ्याकडे? सांगतो, सांगतो, तिथून अटक केलेल्या त्या बाईने जे सांगितलं ते सगळं तुम्हाला सांगतो. तुम्ही काही महिन्यांपूर्वी ती बातमी वाचली असेल ना की पाकिस्तानात भारतातल्या सिरियल्सचा किती परिणाम होतोय. त्यांच्याकडच्या लग्नात एक ’निकाह’ सोडला तर बरेचसे विधी ह्या सिरियल्समधल्या लग्नसमारंभांसारखे असतात. झालं, ह्यामुळे आपली तरूण पिढी बिघडतेय अशी ओरड मुल्लांनी सुरू केली. अश्याच एका मौलवीने ओसामाला ह्याविषयी कळवलं. मग काय, खरंखोटं पडताळून पहाण्यासाठी ओसामाने भारतातल्या सिरियल्सची सीडी मागवली म्हणे. तो कुरियर आला होता ना, तो अल-कायदाचे संदेश वगैरे घेऊन नव्हता आला. ही सीडी घेऊन आला होता. नेमकं रविवारी रात्री निवांतपणे ह्या सिरियल्स बघाव्यात म्हणून ओसामा बसला. त्याच्या नशिबाने ह्या सिरियल्स मराठी निघाल्या. आता तुम्ही म्हणाल ओसामाला मराठी कळतं का? त्याच्यासाठी व्हॉईसओव्हर करून पाठवला होता. समजून घ्या की राव!

तर, त्याने कसंबसं कुंकू पाहिलं. मग ४-५ डोकेदुखीच्या गोळ्या मागवून घेतल्या म्हणे. भाग्यलक्ष्मी अर्ध संपलं असावं आणि त्याबरोबर ओसामाचा संयमही. कारण त्या महिलेच्या म्हणण्यानुसार डोकेदुखीच्या गोळ्या मागवल्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी त्याच्या जोरात ओरडण्याचा आवाज आला होता. म्हणजे ह्याच वेळी त्याने आपले डोळे फ़ोडून घेतले असावेत. पण परवानगीशिवाय खोलीत जायला बंदी घातलेली, त्यामुळे कोणी आत जायचं धाडस नाही केलं.

बहुतेक ह्यानंतर त्याला कीबोर्ड/माऊस सापडला नसावा अणि माप्रिप्रिक चालू झालं असावं. आता त्यातले संवाद तर सहनशक्तीच्या पलीकडे असतात हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. शेवटी ओसामाने आपल्या सुटकेचा मार्ग शोधलाच. गोळीचा आवाज आल्यावर ओसामाची आज्ञा मोडून सगळे आत घुसले. पण ओसामा आधीच "ऑन द स्पॉट" ठार झाला होता. खाली येऊन आता काय करायचं ह्याचा बाकीचे लोक खल करत असताना अमेरिकन सैनिक आत घुसले.

तर अशी आहे ओसामाच्या अंताची कहाणी. आता तो नक्की कसा मेला हे जगाला सांगणं म्हणजे भारताला श्रेय द्यावं लागेल आणि वर अमेरिकेचं नाक कापलं जाईल. त्यामुळे तो गोळीबारात मेला वगैरे वगैरे सांगितलं गेलं.

रच्याकने, तुम्हाला तो एसएमएस आला का हो?

पाकिस्तानात कोणीही सुरक्षित नाही, ओसामा बिन लादेनसुध्दा
भारतात मात्र कोणीही सुरक्षित राहू शकतं, अजमल कसाबसुध्दा.

आता मी एक प्लान बनवतोय. ओसामाकडे असलेली सीडी कसाबपर्यंत पोचवायचा. विश मी लक.

टीपः ह्या पोस्टीतला सगळा मजकूर स्वप्नरंजन आहे, वास्तवाशी ह्याचा काहीही संबंध नाही.

स्वप्ना, मस्त जमलंय.
खरे तर मी बाकिच्या पोस्ट पण वाचतो, पण मला त्यातले बरेचसे संदर्भ माहित नसतात. त्यामूळे ..

रेव्यु, मंदार, नुतनजे, स्वाती२,रोहित ..एक मावळा , अखी, दिनेशदा - मनापासून आभार. Happy

स्वप्ना सही.....

पाकिस्तानात कोणीही सुरक्षित नाही, ओसामा बिन लादेनसुध्दा
भारतात मात्र कोणीही सुरक्षित राहू शकतं, अजमल कसाबसुध्दा.>>>>

एकदम खरे आहे....

साल: २०४५
स्थळ: पेंड्शांचं घर

घरातली सगळी मंडळी दिवाणखान्यात गोळा झाली आहेत. सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या. एका कोपयात नुकतेच ’सिनियर सिटिझन’ झालेले अभि आणि शमिका उभे आहेत. त्यांच्या पायाशी २ मोठाल्या बॆगा.

"आई, सगळं घेतलंस ना नीट? तुझ्या डायबिटीसच्या गोळ्या? बाबांचं कायमचूर्ण? वैद्य पाटणकर काढा? तुमचे चष्मे?" कडेवर एक आणि बोटात एक पोर घेतलेली मुलगी विचारते.
"अग अभिका, किती वेळा विचारशील? भरलंय हो मगाशीच सगळं नीट" शमिका म्हणते.

"बाबा, ही घ्या तुमच्या लोणावळ्याच्या बसची तिकिटं. तरी म्हणत होतो की दुसरीकडे कुठेतरी जा म्हणून. आता ह्या वयात लोणावळ्यात मगनलालची चिक्कीसुध्दा खायला यायची नाही तुम्हाला. निदान पुण्याला तरी जायचं."

"अरे शमिजीत, तुला माहिताहे ना? अनेक वर्षांपूर्वी मी आणि तुझी आई लोणावळ्यालाच जाणार होतो."

"काय तरी बाई अगोचरपणा तुम्हा मुलांचा. हे काय वय आहे आमचं...." शमिका चष्म्याच्या वरून लटक्या रागाने अभिजितकडे बघत म्हणते.

"तेच म्हणत होते मी." अभिची आज्जी आपले मिचमिचे डोळे आणखीन मिचमिचे करत म्हणते. "काय तरी पोरकटपणा. ह्या शमिकाच्या घरचं वळणच तसलं. तरी माझा सुरुवातीपासूनच विरोध होता ह्या लग्नाला....."

"आई, अहो जाऊ द्या. तुम्हाला आठवतंय ना? आधी हे दोघं निघाले होते तेव्हा नेमका त्या आशूच्या लग्नामुळे घोळ झाला होता. मग तो निस्तरेपर्यंत माधुरीचं लग्न येऊन ठेप्लं. ते होतंय ना होतंय तोच मेघनाचं डोहाळंजेवण, ते झाल्यावर आशूचं डोहाळंजेवण, मग शमिजीतचा जन्म, मग माधुरीचं डोहाळंजेवण, अभिकाचा जन्म......डोकं म्हणून वर नाही. मग मुलांची आजारपणं, शिक्षण, लग्नं, त्यांच्या मुलांचे जन्म......इतक्या वर्षांनी आता कुठे दोघांना थोडा वेळ मिळतोय स्वत:साठी."

"मला काय? वाट्टॆल ते करा" आजी फ़णकायाने आत निघून जातात. अभिची आई त्यांच्यामागून जाते.

"शमि, तू एक गोष्ट विसरली नाहीस ना?" आशूदी विचारते.
"कुठली ग?"
"अग तो गुलाबी गाऊन? मी तुला खास दिला होता तो. तू म्हणाली होतीस की तो रंग अभिला आवडतो म्हणून"
"मला आवडतो? पण तो गाऊन मला घालायचाय का शमिकाला? आणि इतक्या वर्षांनी शमिका मावणार आहे का त्यात? खीखीखी"

"अभि! तू दात काय काढतोयस? मला तर बाई कसंतरी होतंय. जावई, सुना, नातवंडं आली आणि आता कसलं हनिमूनला जायचं. तुला काहीच वाटत नाही?"
"मला काय वाटायचंय? ’अभि’ तो मै जवान हूं"

अग, कालचा एपिसोड पहायला हवा होतास तू. हनिमूनला जाणार अभि आणि शमिका. पण घरातल्या सगळ्यांची राऊन्डटेबल कॉन्फरन्स भरली होती. हा काय चर्चेचा विषय आहे? कैच्या कै.

’आटपाट नगराची गोष्ट ऐकायची आहे? बरं, ऐका हं. एक होतं आटपाट नगर. त्यात होतं एक गरीब कुटुंब - आई आणि मुलगी दोघीच. मुलीचं लग्न ठरलं - एका श्रीमंताघरच्या मुलाशी. पण तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता. तिने ते लग्न मोडलं. निराश झालेल्या तिला एक दुसरा तरुण भेटला. तिला वाटलं हाच आपल्या स्वप्नातला राजकुमार. पण कसचं काय? ह्या राजकुमाराचे पाय मातीचे होते. फ़सवलंच त्याने तिला. नंतर तिला कळलं की अशी फ़सणारी ती पहिली मुलगी नव्हती. तिने ह्याविरुध्द लढायचं ठरवलं आणि मग मात्र तिच्या मदतीला एक खराखुरा धाडसी सरदार आला. त्यांना मदत करायला आणखी काही लोक पुढे आले आणि त्यांनी त्या दुष्ट तरुणाचा पाडाव केला. त्याला राज्याबाहेर हाकलून दिलं. त्या मुलीचं आणि सरदाराचं लग्न झालं. आणि ते सुखाने नांदू लागले. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफ़ळ संपूर्ण झाली.......

अंहं, पण इथे गोष्ट संपली असं तुम्हाला वाटलं तर ते चूक आहे. सरदाराचं शौर्य पाहून त्याच्या वरिष्ठांनी त्याला बढती तर दिलीच वर आणखी एका मोहिमेची जबाबदारी सोपवली. त्या मुलीकडे सरकारकडून दूत आले आणि तिला राज्यात होणाया निवडणूकीत उभं रहायला सांगू लागले. तो सरदार मोहिम फ़त्ते करू शकेल का? ती मुलगी निवडणूकीला उभी राहील का? जिंकेल का?

साठा उत्तराची कहाणी कधी तरी सुफ़ळ संपूर्ण होईल का?

प्रसंग १:
स्थळः कर्नाटकातलं राजभवन
बीजेपीचे सदस्य जोरजोरात घोषणा देताहेत - भारद्वाज, लोकशाहीका खुनी, भारद्वाज हाय हाय, कछुआ जलाओ, भारद्वाज भगाओ

गव्हर्नर भारद्वाज तिथे येतात आणि शांतपणे सगळ्यांकडे बघतात. काही वेळाने बीजेपीचे सदस्य आपोआप शांत होतात. ते पाहून भारद्वाज आपल्याबरोबर आणलेल्या पिशवीत हात घालतात आणि प्रत्येक सदस्याच्या हातावर प्रसाद ठेवायला लागतात.

"हे काय?" एक सदस्य प्रश्नार्थक मुद्रेने विचारतो.
"प्रसाद! नेहमी आईसाठी न्यायचो. आज तुमच्यासाठी आणलाय"

सगळ्या बीजेपीवाल्यांच्या डोळ्यात पाणी येतं. "तुमचं बरोबर आहे, आम्हीच चुकत होतो. आणा हो राष्ट्रपती राजवट.आम्ही हू का चू करणार नाही"

प्रसंग २:
स्थळः राजस्थान
शेन वॉर्न तावातावाने बोलतोयः I am telling you mate, I am not at fault here. I had told this guy to get us a favorable pitch. He didn't have the decency to reply to my messages.

समोर उभे असलेले आरसीएचे संजय दिक्षीत शांतपणे पिशवीतून प्रसाद काढून वॉर्नच्या हातात ठेवतात.
शेन वॉर्न: What is this?
सौ. शिल्पा राज कुन्द्रा: Shane, that's what we call Prasad. It's a gift from God - to be considered as His blessing.
शेन वॉर्न अजून गोंधळून उभा. प्रसादाचं नक्की काय करायचं त्याला कळत नसतं.
सौ. शिल्पा राज कुन्द्रा: You are supposed to eat it silly
शेन वॉर्न:ओह, आय सी, आय सी. अर्धा प्रसाद खातो. आणि एकदम 'मेणाहुनी मऊ विष्णूदास" होतो.
शेन वॉर्न: I say mate, I am awefully sorry for this row. You were right and I apologize. Please forgive me.
सौ. शिल्पा राज कुन्द्रा: Shane, why have you eaten only half of the Prasad?
शेन वॉर्न: I have kept the other half for Ricky. He will need it sooner or later.

प्रसंग ३:
स्थळः सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त
पाकिस्तानच्या आयएसआयचा अहमद शुजा पाशा मूठ आवळून ओरडतो: जनाब, हम और कितने बार कहे की इन आतंकवादी घटनाओंमे पाकिस्तानकी सरजमी इस्तेमाल नही की जा रही? आप सब जर्नालिस्टस ये प्लीज नोट करे.
इतक्यात चहा येतो. त्याबरोबर एक तबकही. त्यात मिठाई असते
उपस्थित असलेल्या भारतीय नेत्यांपैकी एक ते पाशाच्या समोर धरतो: लिजिये,खाईये
"क्या है ये?"
"हम इसे प्रसाद कहते है. यू तो हमेशा सब हमही खा जाते है लेकिन आज खास आपके लिये"
पाशा एक वडी तोंडात घालतो आणि एकदम त्याचा आविर्भावच बदलतो. "हमे ये कह्ते हुए बेहद अफसोस हो रहा है के सारी आतंकवादी घटनाओंमे हमाराही हात रहा है. लेकिन आजसे ये सब काम बंद. हम अब भाइचारेसे रहेंगे. हमारी दिलोजानसे येही कामना है की हिंदुस्थान सुखी रहे"

Pages