संथ चालती ह्या मालिका, त्यांच्यावरची आमची टिप्पणी ऐका

Submitted by स्वप्ना_राज on 3 December, 2010 - 01:08

मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.

वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.

वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.

वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.

-----

गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."

"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.

"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"

"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."

बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"

कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"

कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.

"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.

इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.

तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.

रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार बिग्ग बॉसच्या घरात नुकत्याच दाखल झालेल्या पामेला अ‍ॅन्डरसनने मुंबई विमानतळावरून आपल्या सामानातून खास शिवून घेतलेले सुमारे २००००० अमेरिकन डॉलरचे १० ब्लाऊजेस गायब झाल्याची तक्रार नोंदवली आहे. ह्यातल्या काही ब्लाऊजेस वर Swarovski Crystal जडवलेले होते तर काहींवर प्लॅटिनम आणि पॅलेडियम ह्यांची नक्षी होती. ह्यातलाच एक ब्लाऊज घालून ती "आता वाजले की बारा" ह्या गाण्यावर नृत्यही सादर करणार होती. पण हे ब्लाऊजेस चोरीला गेल्याने तिचा हिरमोड झाला आहे.

तरी साडी नेसूनच बिग्ग बॉसच्या घरात प्रवेश करायचा तिचा निर्धार कायम असल्याने ब्लाऊजसदृश कपडा घालून तिला काल वेळ मारून न्यावी लागली. परंतु त्यानंतरही आपले ब्लाऊजेस न मिळाल्यास आपण निषेध म्हणून साडीशिवाय अन्य वस्त्र परिधान करू असा निर्वाणीचा संदेश तिने दिल्याने सुरक्षा यंत्रणा ह्या गुन्ह्याची उकल करण्यास कंबर कसून सज्ज झाल्या आहेत. ह्या कामी भारतीय गुप्तचर यंत्रणेला ब्रिटनची एमआयसिक्स, इस्त्रायलची मोसाद व अमेरिकेची सिआयए मदत करणार आहेत. ह्या गुन्ह्याच्या तपासाच्या प्रगतीची माहिती आपल्याला रोजच्या रोज मिळायला हवी अशी सूचना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्याची माहिती एका अधिकार्‍याने आपले नाव जाहिर न करण्याच्या अटीवर ह्या वृत्तप्रतिनिधीला दिली.

दरम्यान 'अतिथी देवो भव' ह्या भारतीय परंपरेला जागून पामेलाताईंना त्यांचे ब्लाऊज वेळेत शिवून देण्यास आपण एका हातावर तयार आहोत असं अनेक शिंप्यांनी ह्या प्रतिनिधीला सांगितलं आहे.

----

अभिला म्हणे एव्हढा पैसा मिळवायचा आहे की मृत्यूलासुध्दा शमिकाजवळ यायला त्याची परवानगी काढावी लागेल. त्यासाठी त्याला बिग्ग बॉसच्या घरात पाठवलं पाहिजे. कोणी सांगावं पामेला अ‍ॅन्डरसनसुध्दा त्याच्या प्रेमात पडेल.

बाजारातून गायब झालंय तूप, रवा, बेसन
अभिजित पेंडसेच्या प्रेमात पडलीये पामेला अ‍ॅन्डरसन

कथा हमारे रामायणकी:

कैकयीने दशरथाने युध्दात दिलेल्या वरांचा वापर करून भरताला राज्याभिषेक आणि रामाला चौदा वर्ष वनवास मागून घेतला. भरताने रामाच्या पादुका उराशी कवटाळून त्याच्या वतीने चौदा वर्ष राज्यकारभार करायचं ठरवलं. राम, लक्ष्मण आणि सीता वनाच्या दिशेने निघून गेले. कौसल्या, सुमित्रा आणि दशरथाच्या दु:खाला पारावार उरला नाही.

ह्या गोष्टीला काही दिवस उलटताहेत तोच भल्या पहाटे एक रथ प्रासादाच्या दरवाजाबाहेर येऊन उभा राहिला. रथाला सर्व बाजूंनी वेली आणि रानफुलांनी सजवलं होतं. रथात नक्की कोण आहे हे न कळल्यामुळे गोंधळून द्वारपालांनी सुमंताला पाचारण केलं. त्याने बाहेरून रथाचं निरिक्षण केलं. "ट्रोजन हॉर्स" ची कथा नुकतीच वाचली असल्याने त्याचा संशय बळावला. अनेक वर्षं मंत्री असल्याने महाराजांच्या अनुपस्थितीत काही निर्णय घेतल्यास प्रकरण आपल्या अंगावर शेकू शकतं हे लक्षात येताच त्याने महाराजांकडे धाव घेतली.

महाराज दशरथ, तिन्ही राण्या, भरत, शत्रुघ्न आणि सुमंत अशी वरात पुन्हा रथाजवळ आली. महाराजांच्या आज्ञेवरून भरत आणि शत्रुघ्न ह्यांनी रथाचा दरवाजा उघडला तर काय....

आतून साक्षात प्रभू रामचंन्द्र लक्ष्मण आणि सीतेसह उतरले. बॅकग्राउन्डला ढोलताश्यांचा आवाज.
"बाळ राम, तुम्ही सारे परत कसे आलात?" दशरथाने आनंदाने विचारलं. मागे कैकयी काजळ घातलेले डोळे मोठे करत उभी.

"कोट्यावधी एसएमएस आले तात आम्हा तिघांसाठी. त्यामुळे आम्ही वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतोय अयोध्येत. वनवास कॅन्सल" रामाने हसत खुलासा केला.

कंटाळा आला पेक्षा टीव्ही चालू असतानाच. कंटाळा प्रतिबंधक उपाय.
मायबोलीच्या सॉफ्टवेअर मध्ये गडबड आहे. हा धागा उपग्रह वाहिनी या ग्रुपमध्ये उघडलाय. त्याचा मी सदस्य आहे, त्यामुळेच संथ चालती या मालिका दिसतेय. तरी आता परत सदस्य व्हायला लागले.
म्हणजे घराच्या फक्त मुख्य दारालाच चावी नाही लावावी लागत, तर प्रत्येक खोलीत शिरतानाही लागते. Happy

"हॅलो, आई"
"सुमी, तुला १०० वर्ष आयुष्य आहे बघ, आत्ताच मी आणि बाबा तुझी आठवण काढत होतो"
"काय करायचंय १०० वर्ष आयुष्य घेऊन?"
"रडतेयस का ग सुमे? जावईबापू काही बोलले का?"
"बोलले तर. तो एक चान्स सोडतोय? परवा मला म्हणतो कसा - ती भाग्यलक्ष्मीमधली काशी बघ, एव्हढी तुरुंगात आहे तरी कशी नीटनेटकी रहाते. नाहीतर तू, नुसता अवतार असतो स्वतःच्याच घरात पण. अग, परवा बेल वाजली म्हणून दरवाजा काढला मीच, साफसफाई करत होते तरी. हा बसला होता पेपरात तोंड खुपसून. बाहेरची सेल्सगर्ल विचारते कशी 'मेमसाब घरमे है क्या?'. अस्सा राग आला ना की 'नही है, मर गयी' म्हणून तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला मी. तरी ह्याने ऐकलंच, अश्या गोष्टी बर्‍या ऐकू येतात, काही कामाचं सांगितलं तर बहिरा होतो लगेच. मग काय, त्या सेल्सगर्लचं बोलणं ऐकून दात काढलेन. तरी बरंय स्वतःच्या सगळ्या बहिणी नुसत्या औषध आहेत दिसायला."

"अग पण...."
"आणखी ऐक. त्या दिवशी उशीर झाला म्हणून विरारच्या लोकलमध्ये चढले. तर बोरीवलीला उतरताना युध्द करावं लागलं नुसतं. घरी जाताजाता भाजी घेतली. घरी पोचते तर काय हा २-३ टोळभैरव मित्रांना घेऊन बसलेला. त्यांचं चहापाण्याचं करावं लागलं मला. आणि वर ते गेल्यावर मला म्हणतो कसा - काय ग तुझा तो अवतार. कुठे मारामारी करून आलीस की काय? ती अर्चना बघ, रात्री अपरात्री त्या मानवला शोधायला रस्त्यातून धावत सुटते तरी डोक्यावरचा एक केस इकडचा तिकडे नाही आणि तुझ्या नुसत्या झिंज्या झाल्या होत्या."

"सुमे, अग...."

"हे पण काहीच नाही. काल डोकं दुखत होतं म्हणून थोडी झोपले होते. तर ऐकवलंच - म्हणे एक डोकं दुखतंय तर काय चेहेरा करून बसलेस. त्या अर्चनाला एव्ह्ढा ताप आलाय तरी चेहेरा कसा टवटवीत - नुकतीच ब्यूटीपार्लर मधून फेशियल करून आली आहे असं वाटावं. मग मलाही राग आला, म्हटलं जाते मी माहेरी, मला द्या डिव्होर्स आणि करा त्या काशी किंवा अर्चनाशी लग्न"

"सुमे, झालं तुझं बोलून? आता ऐक. ह्या रविवारी जावईबापूंना घेऊन जेवायला ये इथे."
"आई, एव्हढं रामायण सांगितलं तरी पालथ्या घड्यावर पाणी. जेवायला काय बोलावतेस त्याला?"
"सुमे, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. फक्त एक कर. काहीतरी कारण काढून तू त्यांच्या आधी ये इथे. कळलं?"
"बरं बाई"

रविवार उजाडतो. सुमी आणि तिचे आईवडील दिवाणखान्यात बसलेले. एव्हढ्यात बेल वाजते. सुमीला खूण करून तिची आई दरवाजा उघडते. बाहेर घामाघूम झालेले जावईबापू उभे.

"अहो, काय वैताग आहे. लिफ्ट बंद आहेत दोन्ही तुमची. ६ मजले चढून येईतो जीव जायची पाळी आली. छ्या!"

"इश्य, अहो जावईबापू, नुस्ते जिनेच तर ना चढायचे होते. तो मानव बघा, एव्हढी सामानाने भरलेली हातगाडी रस्त्यावरून ओढत घेऊन गेला. घामाचा एक टिपूस नाही हो आला, नाही का?" सासूबाईंनी "एक लोहारकी" ठेऊन देतात आणि जावईबापूंचा चेहेरा प्रेक्षणीय होतो.

----

"काय ग, आज गप्प गप्प आहेस? नवर्‍याशी भांडून आलीस की काय?"
"नाही ग, सासूबाईंनी वैताग आणलाय. साध्या साध्या गोष्टींवरून क्कॅक क्कॅक चालू असतं सारखं"
"अग, मग त्यांना बिग्ग बॉसच्या पुढचा सिझनमधे पाठव कन्टेस्टन्ट म्हणून"
"ठीक आहेस ना? त्याने काय होणार आहे?"
"तिथे पण अश्याच थयथयाट करतील आणि एलिमिनेट होतील. मग वाईल्ड कार्डने परत घरात जातील तेव्हा सुतासारख्या सरळ झालेल्या असतील. कमाल खान आणि डॉली बिन्द्रासारख्या!"

म्हणजे घराच्या फक्त मुख्य दारालाच चावी नाही लावावी लागत, तर प्रत्येक खोलीत शिरतानाही लागते.

टाईट सिक्युरीटी... बिग बॉस चे घर आहे भाऊ Happy

अरे नविन धागा? तो आधीचा फारेंडाचा धागा कुठे गेला?

अर्थात या विषयातील अनिभिषिक्त सम्राज्ञी स्वप्नाच आहे Happy

अश्विनी, ह्यात फक्त काही निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा लेखनाचा धागा आहे. नाव तेच दिलंय कारण त्याच्याशी संबंधित आहे. Happy

'संथ चालती या मालिका' - स्वप्नाच्या नजरेतून (चष्मा असेल तर चष्म्यातून)
किंवा 'संथ चालती या मालिका'चे विशेष भाग
असे शीर्षक देता येईल.

अश्विनी, साधनाची सूचना होती. आधीही काही जणांनी सुचवलं होतं. हा बीबी उघडलाय खरा, आता ह्यात लिहायला मजकूर सुचो म्हणजे झालं Proud नाहीतर माझा पचका व्हायचा Wink

अल्पना, भरत, अखी - आपल्या सगळ्यांच्या सूचनेनुसार नाव बदललंय. आवडतं का बघा, नाहीतर बदलू. शेक्सपियर म्हणालाच आहे "नावात काय आहे?" Happy

स्वप्ना, धन्स गं.... Happy

आता रेग्यूलरली त्या ग.पा. वर नाही येता आलं तरी इकडे येऊन तुझं जबरी लिखाण वाचायला मिळेल Happy

परवा लॅपटॉप साफ करताना काही जुन्या पोस्टस मिळाल्या त्या आधी टाकते:

जुनी पोस्ट १:

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात संध्याकाळी बसणार्‍या भूकंपाच्या धक्क्यांची उकल करण्यात भूगर्भतज्ञांना अखेर यश आले आहे. हे धक्के रिश्टर स्केलवर "७.९" ह्या तीव्रतेचे असल्याने सर्वत्र एकच घबराट पसरली होती.
ह्या धक्क्यांचे केन्द्रबिंदू झी मराठीच्या कार्यक्रमांचे चित्रीकरण होत असलेल्या जागा आहेत हे निश्चित झाल्यामुळे सरकारी यंत्रणेसकट सामान्य नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे असं आमचा प्रतिनिधी कळवतो.

संध्याकाळी ७ ते ९ ह्या कालावधीत प्रक्षेपित होत असलेल्या मालिकात सध्या काही धक्कादायक घटना घडत असल्याने प्रृथ्वीचे अंतःकरणही ढवळून निघाले आहे. त्यामुळे टेक्टोनीक प्लेटसची कालवाकालव (की हलवाहलव!) झाल्याने हे धक्के बसत आहेत. ह्या घटना पुढीलप्रमाणे:

१. कु़ंकू (७ वाजता) - नरसिंह आणि जानकी ह्यांची दिलजमाई झाली आहे. ही घटना पुढील वर्षाच्या आत घडणार नाही असं छातीठोकपणे सांगणार्‍या टीव्हीतज्ञांची त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली आहे. चिऊमाता सुमित्रा ह्यांचे किल्लेदरांच्या वाड्यात पुनरागमन झाले आहे.
वेड्यांच्या इस्पितळात त्यांच्यावर इतके उच्च दर्जाचे उपचार केले गेले की त्यांची मानसिक अवस्था तर सुधारलीच पण चेहेर्‍यातदेखील ओळखू न येण्याइतका बदल झाला आहे. मानसिक उपचारांच्या क्षेत्रात हे क्रांतीकारी पाउल असल्याचे वैद्यकीय जाणकारांचं मत आहे.

२. भाग्यलक्ष्मी (७:३० वाजता) - काशीचा वेडा नवरा (जास्तच!) शहाणा झाला, दीर पांगळा झाला आणि जाऊ तिच्या विरोधात गेली आहे. तिची सासू धबधब्यात पडूनही जिवंत असणारच ह्याची प्रेक्षकांना खात्री असल्याने त्याचा एव्हढा धक्का बसला नाही.

३. माप्रिप्रिक (८ वाजता) - जयला शमिकाच्या बहिणीचा शोध लागलेला आहे आणि येत्या काही दिवसात तो तिला शमिका आणि तिच्या आईच्या समोर उभी करणार आहे. हीही घटना पुढील वर्षातच घडेल असा तज्ञांचा कयास होता. पण ही घटना आता लवकरच घडणार आहे.
त्यामुळे अभिला अचानक सिक्स पॅक्स आले तरच ह्या मालिकेच्या प्रेक्षकांना भविष्यात धक्का बसेल.

४. लज्जा (८:३० वाजता) ह्यात मात्र धक्कादायक घटनांची जंत्रीच आहे. मनुची काकू तिच्या बाजूने उभी राहिलेली आहे. मनूच्या काकांना अ‍ॅक्सिडेन्ट झाला आहे. खरं तर गाडीने धक्का दिल्यावर ते शेजारच्याच गाडीवर पडले होते तरी जगतात का मरतात अशी स्थिती होती ती
बहुतेक आता कुठला डॉक्टर आपल्यावर उपचार करणार ह्या भीतीने असावी. आता तर मनूने मंगेशच्या विरुध्द वॉरन्ट काढण्यास आवश्यक असलेल्या कागदपत्रांवर सही केलेली आहे. त्या सीआयडीवाल्याला पटवावं असं तिला वाटलं तरच प्रेक्षकांना पुढील धक्का बसेल.

९ च्या पवित्र रिश्ता मध्ये मात्र "जैसे थे" स्थिती असल्याने धक्के बसणं बंद झालं आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रेक्षकांनी ७ ते ९:३० ह्या काळात टेबलाखाली बसून सिरियल्स पहाव्यात अशी आपत्कालीन मदत करणार्‍या संस्थामार्फत सूचना आहे.

जुनी पोस्ट २:
काही वर्षांपूर्वी मुसलमान लोक रस्त्यावर नमाज पढून ट्रॅफिक जॅम करत असत म्हणून महाआरत्या चालू झाल्या होत्या. आता टीव्हीवर दिसेल त्या मालिकांचे महाएपिसोडस असतात.
शनिवारी लज्जा आणि पवित्र रिश्ता ह्या दोन्ही मालिकांचे महाएपिसोडस एकाच वेळेस असल्याने मात्रृदैवताची गोची झाली होती. टीव्ही गाईडवर दोन्ही सिरियल्सचे एक तासाचे रिपिट टेलिकास्टस
दिसेनात तेव्हा तर तिने जगबुडी आल्यासारखं केलं. शेवटी मी सुचवलं की दोन्हीकडच्या सिरियल्स आलटून पालटून बघ. कधी नव्हे तो माझा सल्ला मानण्यात आला. आता तिला मानवची बायको कोण असं विचारलं तर बहुतेक मनू असं उत्तर मिळेल स्मित

काल 'झेंडा' पहात असताना स्टार प्रवाह वर अचानक सुचित्रा आणि आदेश बांदेकर अवतीर्ण झाले. आमच्या प्रेमविवाहाला २० वर्ष झाली वगैरे सांगायला लागले तेव्हा मी जरा बुचकळ्यात पडले. तरी बरंय बांदेकर भाऊजींची सध्या सेनेच्या कुठल्यातरी पदी नियुक्ती झाल्याचं पेपरात आलं होतं.
नाहीतर मला हा काहीतरी प्रचाराचा भाग वाटला असता. ही आगामी "तुजविण सख्या रे" ह्या नव्या मालिकेची जाहिरात होती. आता हे 'प्रिया', 'सख्या' हे लोण कुठपर्यंत जाऊन ठेपणार आहे देवाला ठाऊक. काही आगामी मालिकांची शीर्षकं अशी असायला हरकत नाही:

१. सांग माझ्या साजणा
२. नाथाविना अनाथ मी
३. तुझ्याच यादेसवे प्रियकरा
४. येई परतून राजसा
५. लाडक्या तुझ्याचसाठी

मी मराठी वर संध्याकाळी ७ वाजता नवी मालिका सुरू होत आहे - मंगळसूत्र. ह्यात रडूबाई द ग्रेटेस्ट अलका कुबल आहेत. म्हणजे ७ वाजता झी मराठी वर कुंकू आणि मी मराठी वर मंगळसूत्र.
आता स्टार प्रवाह वर "हिरवा चुडा" आणा, ईटीव्हीवर "जोडवी" आणि सामवर "नथ". ह्या चॅनेल्सच्या पॅकेजना "सवाष्ण पॅक" म्हणायला हवं आता.

जुनी पोस्ट ३:
कालचा माप्रिप्रिकचा एक(च) सीन पाहिला.

आशूदी आणि अभि समोरासमोर येतात. ते एकमेकांना ओळखतात म्हटल्यावर घरच्यांच्या प्रतिक्रिया येणेप्रमाणे:

जय (प्रेम चोप्रासारखा चेहेरा करायचा असफळ प्रयत्न): तू हिला कधीपासून ओळखतोस?
शमिका: मलाही तेच विचारायचं आहे. इतके दिवस तू मला का बोलला नाहीस की तू आशूदीला ओळखतोस म्हणून?
अभि: (अर्धशिशी, दातदुखी आणि पोटदुखी एकदम उपटल्यासारखा चेहेरा करत): एक मिनीट, एक मिनीट, एकदम प्रश्नांचा भडिमार करू नका माझ्यावर.
शमिकाची आई (निरुपा रॉयसारखा चेहेरा करत) : त्याचं बरोबर आहे, तुम्ही सगळे शांत रहा, अभि, बाळा, सांग तू आशूला कसं ओळखतोस?

मग अभिबाळ सद्गुणी असल्याने शांतपणे खुलासा करतो. मी स्क्रिप्ट लिहिलं असतं तर संवाद पुढीलप्रमाणे ठेवावे असं सांगून दिग्दर्शकाला फेफरं आणलं असतं:

अभि: (जयकडे पाहून) काय रे टोणग्या, तू एवढ्या मुलींना फिरवतोस तेव्हा मी कधी विचारलं का की तू ह्यांना ओळखतोस का म्हणून? मी एकीला काय ओळखतो तर एव्हढा गजहब? अमीरोंका खून खून, गरीबोंका खून पानी? (शमिकाकडे पाहून) आणि ए टवळे, तुझी बहिण काय एलिझाबेथ टेलर आहे का लिझ हर्ली आहे का पामेला अ‍ॅन्डरसन आहे ग सगळ्या मुलांनी ओळखायला? आता तोंड वर करुन विचारते आहेस पण आपली ओळख झाल्यानंतर, आपलं जमल्यानंतर, लग्न ठरल्यानंतर तरी कधी एक दिवस तुझ्या ह्या लाडक्या आशूदीचा फोटो दाखवलास का कधी मला? मला काय ब्रह्मा-विष्णू-महेश हिचा फोटो स्वप्नात येऊन दाखवणार होते का? काय साला कटकट आहे? पदरचे पैसे खर्च करून हिची ट्रीटमेन्ट केली मी आणि आता सगळे जाब विचारताहेत.

शमिकाची आई: अभि बेटा.
अभि: ओ भावी सासूबाई, उगाच निरुपा रॉयसारखा चेहेरा नका करू. शोभत नाही हो तुम्हाला. आणि काय हो? स्वतःच्या दंडावर एव्हढा मोठा तो टॅटू करून घेतलात तेव्हा ह्या तिन्ही मुलींना नाही एकेक करून घ्यायला
सांगायचा? तेव्हढ्यावरून ओळखता आलं नसतं का ह्या आशूला? तुमच्याकडे टॅटू करून घ्यायला पैसे नाही का उरले? अरे हो, मला वाटतं तुमच्या भल्याथोरल्या दंडावर टॅटू केल्यावर त्या माणसाकडची शाई संपली असेल.
सॉरी हं! आता एक कृपा करा. ह्या आशूने त्या कड्यावरून उडी मारली होती असं मला त्या कोळ्यांनी सांगितलं होतं...तिला द्या पुन्हा तिथून ढकलून म्हणजे तिची स्मृती परत येईल. आणि हो, तेव्हढं आशूच्या ट्रीटमेन्टचं बिल पाठवून देतो. इन्टरेस्टसकट माझ्या बॅन्केत जमा करा. फुकटची फौजदारी आजपासून बंद!

जुनी पोस्ट ४:
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आफ्रिकन प्रतिनिंधींचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या (निदान आजच्या तरी!) मुख्यमंत्र्यांना भेटलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्रीयुत बराक ओबामा ह्यांच्या मुंबईवास्तव्यादरम्यान त्यांच्या हॉटेलच्या केबलटीव्हीवरून "कलर्स" हे चॅनेल दाखवण्यात येऊ नये अशी कळकळीची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. ह्यामागे शिवसेनेचा किंवा अन्य कोणाही राजकीय पक्षाचा "हात" नाही ह्याची मुख्यमंत्र्यांना ग्वाही दिल्यानंतर त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की कलर्स चॅनेलवरून सध्या दाखवण्यात येणार्‍या बिग्ग बॉस ह्या कार्यक्रमात बिग्ग बॉसच्या आलिशान घरात राहणार्‍या सदस्यांची सध्या अपुर्‍या अन्नपुरवठ्यामुळे चपात्या, फळे ह्यासारख्या गोष्टीवरून भांडणं होत आहेत. अशीच स्थिती चालू राहिली तर त्यांच्या करूण स्थितीमुळे कळवळून जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आफ्रिकन देशांसाठी राखून ठेवलेला मदतनिधी बिग्ग बॉसच्या
सदस्यांना देऊन टाकतील अशी भीती आफ्रिकन देशांना वाटत आहे. मुख्यमंत्र्यांनी ह्यावर जरूर विचार करू असं आश्वासन त्यांना तूर्तास दिलं आहे.

गेले काही दिवस सिरियल्स दृष्टीस पडत नाहियेत त्यामुळे ह्या काही जनरल पोस्टस ऑफलाईन टाईप केल्या होत्या.

आधीच खुलासा केलेला बरा की पुढच्या पोस्टींचा उद्देश पळभर हसण्या-हसवण्याचा आहे, कोणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा नाही. तरी त्या दुखवल्या गेल्या असतील तर मी माफ़ी मागते. Sad

भीष्मांनी धाकटा भाऊ विचित्रवीर्यासाठी अंबा, अंबिका आणि अंबालिका तिघींचे स्वयंवरातून हरण केलं. हस्तिनापुराच्या वाटेवर आडव्या आलेल्या शाल्वराजाचा पराभव करुन त्या तिघींना सुखरूप हस्तिनापुरात माता सत्यवतीच्या महालात घेऊन आले. माता सत्यवतीला पाहताच टाहो फ़ोडून अंबा तिच्या गळ्यात पडून मुसमुसून रडू लागली. सत्यवतीने तिला खांद्यावर थोपटून उगी केलं आणि रडण्याचं कारण विचारलं. "मी मनाने कधीच शाल्वनरेशाला आपला पती मानलं आहे राजमाता. मी दुसया कोणाचा विचारही मनात आणू शकत नाही. मी काय करू तुम्हीच सांगा"

सत्यवतीने भीष्माकडे पाहिले तेव्हा त्यांच्या चेहेयावर आश्चर्य दिसलं. "देवी अंबा, हे तुम्ही आम्हाला आधी का सांगितलं नाही?" त्यांनी अंबेला विचारलं.

"तुमच्या भयानं महाराज"

"भीष्मा, राजकुमारी अंबेला आत्ताच्या आत्ता सन्मानाने शाल्वनरेशांकडे पाठव्ण्यात यावं असा आमचा आदेश आहे" सत्यवतीने सांगितलं. "अंबिका आणि अंबालिका ह्यांना विचित्रवीर्याच्या महालात घेऊन जाण्याचे आदेश आम्ही दासींना देतो."

"माते, हा अनर्थ करू नका" अंबिका आणि अंबालिका एकासुरात ओरडल्या.

सत्यवतीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. "तुम्हीही कोणाला पती म्हणून निवडलं आहे का? कोण आहेत ते राजे?"

"शाल्वनरेश" दोघींनी एकसुरात सांगितलं.

आता आश्चर्यचकित होण्याची पाळी अंबेची होती. "शाल्वनरेश? हे कसं शक्य आहे? त्यांच्यावर तर मी प्रेम करते"

"दररोज संध्याकाळी शाल्वनरेशांना भेटायला बगिच्यात न जाता ’माप्रिप्रिक” पाहिलं असतंस तर हा प्रश्न विचारला नसतास" अंबिका आणि अंबालिका फ़णकायाने म्हणाल्या.

मूळ शायराची माफ़ी मागून:

अर्ज किया है......

न मिलता गम तो बदबदीके अफ़साने कहा जाते
न होती केकता कपूर तो सास और बहू कहा जाते

बाकी पोस्टस उद्या......

"दररोज संध्याकाळी शाल्वनरेशांना भेटायला बगिच्यात न जाता ’माप्रिप्रिक” पाहिलं असतंस तर हा प्रश्न विचारला नसतास" अंबिका आणि अंबालिका फ़णकायाने म्हणाल्या >>>> Rofl

Pages