पुणेरी पाट्या आणि 'मॅक्डी' !

Submitted by राफा on 1 December, 2010 - 05:45



‘पुणेरी पाट्या’ संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर ?


  1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
  2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)
  3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
  4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.
  5. टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
  6. टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
  7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज)
  8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
  9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.
  10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
  11. विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.
  12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
  13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
  14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
  15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)
  16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
  17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
  18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.



- राफा

गुलमोहर: 

_निल्या_ : होय, दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.
लेखाखाली लेखकाचे नाव नाही अशा स्वरुपात (इमेज/टेक्स्ट) इमेलने अजून फिरत आहे त्याचा परिणाम असावा. मलाही फोन्/इमेल आले लगेच कार्यक्रम चालू असताना व झाल्यावर (दुर्दैवाने ह्यावेळी मोडतोडही केली होती). पण आता संबंधित व्यक्तींना कळवायचा आलाय मला कंटाळा. माझ्याच ब्लॉगवर निषेध (चिडचिड Happy ) करून शांत बसलो.

क ह र

Rofl

राफा मला आज पत्ता लागला या पाट्यांचा मालक कोण त्याचा, हे मलाही मेल मधून आलं होतं Uhoh
असो आता परत कधी उगवणार ? Happy

सॉलिड हा तुम्ही राफा !
मी ह्यातले तुकडे तुकडे फेसबुकवर वाचले होते, आज संपूर्ण लेखन एकत्र वाचताना जास्त मजा आली.
बाकी तुम्ही काहीही म्हणा, आम्ही शक्य तेवढ्या लोकांना कळवूच की 'हे राफा यांचे लिखाण आहे, आवडल्यास लेखकाच्या मूळ नावासहित प्रसारित करावे !'

राफा सोडून देऊ नकोस..
स्टारप्रवाह वाल्यांना मेल टाकून तरी कळव...

हे आता whats app मधून फिरतयं. आणि अ‍ॅडिशन म्हणून जर चितळेंना मॅकडी ची एजंसी मिळाली तर काय हे लिहिलयं.

शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये. >>>>>>>>>>>.. हा माझा अजुनही आवडता उद्योग आहे...

11:05 नंतर तक्रार केल्यास दर शब्दाला दहा रुपये ह्या प्रमाणे पैसे आकारले जातील.(तुमच्या आकारा प्रमाणे नाही).

तक्रारीवर हालचाल करायची असल्यास दर शब्दाला तीस रुपये आकारले जातील. ह्यासाठीची वेळ सकाळी 11:05 ते 11:10 पर्यंत असेल. त्यानंतर मात्र तक्रारी आणि चौकश्या जोकर च्या पुतळ्याकडे कराव्यात!

येथे अतिरिक्त चौकशा करू नयेत. आम्ही चांभार नाही.

जर कोणी cash म्हणून फाटलेली नोट दिल्यास त्यास ऑर्डर केलेला पदार्थ मोडलेल्या स्वरूपात देण्यात येईल.

Pages