पुणेरी पाट्या आणि 'मॅक्डी' !

Submitted by राफा on 1 December, 2010 - 05:45



‘पुणेरी पाट्या’ संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर ?


  1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
  2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)
  3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
  4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.
  5. टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
  6. टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
  7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज)
  8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
  9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.
  10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
  11. विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.
  12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
  13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
  14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
  15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)
  16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
  17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
  18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.



- राफा

गुलमोहर: 

जबरदस्त रे राहुल!
तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
आणि बर्गर संपले >>>> हा तर कळस!

7.कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज) >> Lol

हं... नात्या, माहितीबद्दल धन्स.. ह्या लेखासंबधीही अश्विनी खाडिलकर, मामी, चिंगी ह्यांनी इशारा व सूचना दिल्या होत्याच. त्यानाही धन्स !

होय, हे अतिशय तापदायकच आहे. मधे एका वृत्तपत्रात आयशॉटचा 'निबंद' भलत्याच नावाने छापून आल्याचे मा.बो. करांचे फोन आले. मूळ लेखक आयशॉट उरफ राफा असे छापले असले तरी खाली तो मजकूर पाठवणा-याचे नाव छापले होते. (त्यांना इ-पत्र पाठवले त्याचे काहीच उत्तर आले नाही. कदाचित त्यांना काहीतरी मजकूराने रविवार साजरा करण्याशी मतलब असावा.).

मलाही नावाशिवाय माझेच लिखाण येत असतेच. २-३ महिन्यापूर्वी नेहमीचा यशस्वी वाचक असलेल्या एका सहका-यानेच माझा एक जुना विनोदी लेख मला फॉरवर्ड केला आणि लक्षात आणून दिल्यावर 'मला वाटलेच तुझाच असणार' असेही सांगितले Happy आठवड्याभराच्या अंतरात २-३ वेळा माझेच लिखाण वेगवेगळ्या लोकांकडून आलेल्या मेलमधे पाहून मी वैतागलोच. (खरे म्हणजे लिखाण लोकाना आवडते आहे ह्याचा आनंद मानावा का वैतागावे ह्याचे माझे अडीच एक सेकंद कन्फ्यूजन झाले) मग मी ब्लॉगवर तरी लेखाची /पोस्टची PDF ही द्यायला सुरुवात केली.

इथेही मी
* लिखाणाची इमेज वॉटर मार्कसहीत टाकू शकतो. पण त्यात मजा येत नाही असे मला (उगाचच)वाटते. शिवाय नंतर शोध घेताना येणा-या अडचणी वगैरे.
* 'राफा' ह्या सहीखाली एक कॉपीराईटची लाईनही टाकू शकतो पूर्ण नावाने. पण प्रिंट स्क्रीन घेणा-याला वगळायचेच असेल तर तो ती ओळ वगळू शकतोच
* PDF जोडता येईल का हे मी तपासले नाही. बहुदा येत नसावी.

हे सर्व केल्यावर एखाद्या भरपूर वेळ असणा-या नाठाळाने पूर्ण लिखाण लिहून, इमेज तयार करून नावाशिवाय फॉरवर्ड केली तर काय करणार ? (ही शक्यता कमी कारण प्रिंट स्क्रीन घेणारे ultra casual असण्याची शक्यता जास्त वाटते)

ह्या संबधी मायबोलीवरही कुठेतरी सविस्तर चर्चा झालीच असणार (कारण सगळ्याच लेखक कवींची ही समस्या आहे). तर चर्चेअंती सुचलेला नवीन / जुना उपाय नक्की काय आहे ह्यावर ?

(ह्या वेळेत एक नवीन लेख लिहून झाला असता Happy opportunity cost म्हणतात ती हीच ! )

- राफा

ता.क. हे creative writing नाही. कृपया फॉरवर्ड करू नये Wink

राहुल,

साधारण ३० वर्षांपुर्वी सुजाता नावाच एक हॉटेल कुमठेकर रस्त्याच्या सुरवातीला होत ( बहुतेक ). जेवण छानच असायच आणि पाट्या फुकट वाचायला मिळायच्या. किमान ३० पाट्या त्या उपहारगृहात असाव्यात.

ता.क. हे creative writing नाही. कृपया फॉरवर्ड करू नये >>> Lol

सगळेच या समस्येने थोड्याबहुत प्रमाणात ग्रासलेले आहेत. पण त्याला खात्रीशीर इलाज मात्र अजून सापडलेला नाही.

कुणाला माहित नसल्यास,
साहित्यचोरी रोखण्यासाठिइ या ब्लॉगवर चांगली माहिती आहे:
ब्लॉगपोस्ट चोरी: खबरदारीचे उपाय
http://www.blogwale.info/2010/04/blog-post.html
ब्लॉगपोस्ट चोरी: चोर आणि शिरजोर
http://www.blogwale.info/2010/04/content-theft.html
ब्लॉगपोस्ट चोरी: चोरी झाल्यानंतरची कारवाई
http://www.blogwale.info/2010/04/blog-post_27.html
संपूर्ण वेबपेजचा स्क्रिनशॉट कसा घ्यावा? - भाग १
http://www.blogwale.info/2010/05/how-to-take-full-screenshot-of-webpage....
ब्लॉगपोस्ट चोरी: प्रिंट स्क्रिनद्वारे वेबपेजचा स्र्किनशॉट
http://www.blogwale.info/2010/05/content-theft-screeshot-with-print.html

भन्नाट Lol

अजुन काही पाट्या :

"आमच्याकडे फणसपोळी, आंबापोळी, कोकम सरबत, आवळा सरबत तसेच मॅचिंग परकर मिळतील."

"कृपया दारावरची बेल एकदाच वाजवा आम्हाला लाईट्बिल भरावे लागते."

मलापण ईमेलनी आलं हे नावाशिवाय.. Angry असे खूपदा माबोवरचे लेख येत असतात.. लेखकाचा उल्लेखपण नसतो

Pages