प्रति :
मान्नीय आमदार भुजंगराव टोपे साहेब उर्फ दादा यासी
शिरसाश्टांग सप्रेम नमस्कार. इशेश इनंती.
कडून :
बबन बैदाबादकर
नगरशेवक
पत्र लिहीनेस कारन की दिवस खराब हेत. मापालिकेच्या निवडनूकांचा मासंग्राम चालू झाला हे. आता हे मी तुमाला काय सांगनार म्हना. आपल्याच तर छायेच्या प्रकाशामदे वाडत वाडत आपन इथवर मजल मारली. आपन ड्वोक्यावर हात ठेवन्याआधी गळ्यात काळा दोरा घालायचो, आता आर्धा इंच जाड सोन्याची चेन आली. तरि पन राज्य लेवलच्या पंचाईतीत असाल म्हनून आठवन करुन दिली. तरी हातच्या काकनाला आरसा दाखवल्याचा आगाउपना झाला असेल तर जाहीर दिलगीरी आधीच मागतो. राग मानू नये.
पुज्य गुंडेबाबांची शप्पत सांगतो की दिवस खराब हेत. कालच जोतिशाकडे गेलेतो तर तो म्हनला ‘अवघडे’. मी म्हनल आर बाबा जे हाय ते वर्तमान नका सांगू, भविश्य सांगा. तर तो म्हनला ‘भविश्यच अवघडे’. आयकून दोनी हातातल्या आटी आंगट्या डोळा लावल्या. आता दोनही हाताच्या चार चार बोटात आंगट्या घालून सुद्दा गाडी रुळावर येईना न्हाई म्हन्जे काय ? दर मयन्याला जे चार पैसे सुटतात त्यातून मार्केटमदल्या गनपतीला पाच टक्के टाकतो. कद्दी चुकनार नाय नेम. परवा टोयटा घेतली तर पैले गुंडेबाबाकडून लाथ मारुन घेतली चारी टायरांवर. फार पावरबाज आन लकी हे त्यांची लाथ. आसा धारमिकपना आन निश्टा पैलेपासुन आपल्याजवळ. तरी पन हे निवडनूकीचे दिवस आलेत ते फार खराब वाटत हेत.
ल्हान तोंडी मोटा घास म्हना हवं तर, पन हा देव पन एक नंबर वस्ताद मानूस हे. आंगट्या घालायला बोट ठेवली आठ आन ग्रह बनवले नवू. म्ह्न्जी काई आरिश्ट आलं तर ज्याची आंगटी घालायची राहिली का तर त्याच ग्रहाचा कोप झाला असं म्हनायला मोकळीक. बेश्ट दिस वगैरे बगून पुज्य गुंडेबाबांकडून स्वता लाथ खानारे. त्याशिवाय काय खरं न्हाई वाटतय ह्या येळेस.
आता तयारी कमी करतोय म्हनालात तर नाव नको. नाक्यानाक्यावर पोश्टर लागली हेत. आमचे शुभेच्चूक गल्लीबोळात पसरलेत ही पुज्य गुंडेबाबांची क्रुपा. कार्यकरती पोरं लावतात पोश्टर आन आमी नाय म्हनत नाय. म्हन्जे काय की लोकान्ला पन आपली इकास कामं कळली पायजेले. हरेक चौकात पोश्टर लावल्याशिवाय मुद्दाम कशी कळनार ? कुनाचा प्रश्न आला की फकत पोश्टरकडे बोट करायचं.
लाल मारुती सिग्नलच्या चौकात लावलेल्या पोश्टरात मात्र पोरानी गोंधळ घातलाय तो निस्तरू लागनार हे आर्जंट. त्याचं काय की तीन जंक्शन फोटो दिले पोरांना फोर कलर पोश्टरवर छापायसाठी. एका फोटोत असा माजा कानाला मोबाईल धरलेला उजवा हात आनि उजवा पाय थोडा फुडे प्रगतिचि वाटचाल चालतोय अशा पोजमदे. दुसरा फोटो काळा ग्वागल घातलेला आन एक बोट वरती केलेला. (पोरांच्या सांगन्यावरून चेह-याहून ग्वागल वेगळा ओळखू यवा म्ह्नून ग्वागलच्या काड्या चंदेरी वापरल्या हेत. पोरं लै आयडियाबाज.). आन तिसरा फोटो रुक्षारोपन कार्येक्रमात कुदळ मारतानाचा असा वाकून. (साहेब, तुमच्याशी खोट का बोलू. आपल्या रहेजा शेठचा नवीन बार झाला गेल्या महिन्यात. त्याच्या भूमिपूजनाला चिप गेश्ट म्हनून आमनत्रण मलाच. तो पहिली कुदळ मारतानाचा फोटो होता, तो दिला ठोकून रुक्षारोपनाचा म्हनून. हे पॉलिटिस्स आपल्याच क्रुपेने शिकलो साहेब). तर, ह्या पोरानी काय गोंदळ घालावा ? तिसरा फोटो मदे टाकला आन त्याच्या खाली नेमका आपल्या पक्षशेष्टींचा फोटो कोंबला चिटकून असा. आता लांबून पाहणा-याला पक्षशेष्टींच्या डोक्यात मी कुदळ घालतोय असं दिसतय ना. पंचाईत करतात पोरं. काय सांगावं.
आपली इकास कामं मात्र डज्जनभर. मागच्या वरशी आपल्या रहेजा शेटनेच नवीन अटरा बिलडींगचे प्लान बनवले. टावून शीप वगेरे. मग साईटीवर लकशात आलं की नदीतून त्या साईडला आलेल्या ओढ्याने बरोब्बर त्याच जागी अतिक्रमण केल हे. तर मग रात्रीचा दिवस करुन आमी भिंत बांदून घेउन तो अतिक्रमण करनारा ओढा दुसरिकडे वळवीला. पन इकासकामाचं कुनाला अप्रूप हाय इचारता का ? उलट आता पावसाळ्यात पानी तुंबतय म्हून आजूबाजूचे रहिवाशी पब्लिक नि एन्वायरनमेंटवाले बोंब मारतात. आता पब्लिकला रायला बिलडींग पायजे, का वोढ्यात रानार ते ? इकास कामाचा खोळंबा होतो अशानं.
एक ना दोन, बारा भानगडी. आमची कट्ट्यावर बसनारी पोरं लई टारगट. काम नाय धाम नाय पन पत्रक वाटा म्हनल तरी पैशे सोडावे लागतात त्यानला. साहेब, आज जर कुटल्या इचाराने पक्ष आन कार्यकरते चालत असतिल तर तो म्हन्जे पैशाचा इचार. म्हनल आपल्या इकासाच्या राजकारनाचा संदेश गल्लीगल्लीत पोचवा म्हनलं तर नुस्ती मावा लावून आन बिल्ला छातिवर लावून हॉर्न वाजवत घोळक्याने फिरतात. मी म्हनल शिंदळीच्यानो, शरयतीतल्या बैलांसारकं उधळता तर आधूनमधून तरी माजं नाव पुकारा की की बबन बैदाबादकर यानाच मत द्या म्हनून. पन माव्याचं पाकिट तोंडात पालथं आन मग तोंड उघडतयं कशाला. नुसतं पोरींवर शाईनी मारत फिरतात दिवसभर आन पेट्रोलची बिलं आणतात. आता आपल्याला ल्हिलेल्या पत्रात उगा खराब भाशा नको म्हणून ह्या xxxच्यांना जास्त बोलत नाय. पन शुभेच्चूक म्हनुन मात्र हरेक पोश्टरवर झळकायला पायजे प्रत्येकाला. मी म्हनल किती फोटो लावाल फुकनिच्यानो. माजा फोटो वर एक आन खाली ह्यांची भिमथडी जत्रा पोश्टरवर. हे आशे कार्यकरते असल्यावर कसा काय जिंकनार मी ?
पब्लिक पन नुसतं हरामी झालयं. मी गेल्या वर्शात अट्टाविस वेळा रस्ते नीट करुन दिले. तरीसुद्दा बोंब चालूच की सारका रस्ता उकरलेला म्हनून. आता रस्ता नीट करायचा तर काम नको काडायला ? आन काम काडलं तर उकरायला नको रस्ता ? इकासाच्या पॉलिट्स्सची कदर नाय कुनाला. कॉन्ट्र्क्टर पन लै माजले हेत. ५० टक्केपेशा जास्त देत नाही म्हनतात. आन वर वर्शाच्या आत पेमेन्ट पायजे. असच चालू राहिल तर उद्या काम झाल्या झाल्या लगोलग पेमेन्ट मागतील. अशान अराजक येनार. तुमीच सांगा अस कुटे होत का साहेब ? आन बाकीच्या वार्डात ६० टक्क्याशिवाय बात नस्ते आन आमाला फक्त ५० टक्के ? का तर शहरात मेन मेन म्हनून जे वार्ड हेत त्यात आपला वार्ड नाय म्हनून. अशी बेइमानी पसरली हे सर्वे ठिकानी.
मी काय म्हनतो. एकदा कायदा करुन घ्या. दर पाच वर्शानि निवडणूकीचं टेन्शन कशाला. धा वरशे करा. म्हन्जे वेवस्थित शेवा करु द्यात पब्लिकची. सर्वा अंगिण इकास. तन मन आनी धनाने. काय ? फुकट हळदी कुंकू अरेंज करतो आपण दर वर्शी. शिवाय बेळके वस्तीतल्या लोकानला यात्रा सहल वगैरे कुटेतरी. एकदम फ्रिमदे. सर्वे माता भगिनी खूश. (इरोधक म्हनतात बेळके वस्तीत मी दोनचार भगिनिना लग्नाआदीच ‘माता’ बनवलं, पन ते काय खर नाय साहेब. एकाद्याचं शुद्द चरित्र असेल त्याचं कसं हरन करायच एवडच काम राह्यलय इरोधकांना). पन हे धा वर्शाचं मनावर घ्याच. दर पाच वर्शानी निवडनुकीआधी इकास कामे आठवत बसायची आनि पब्लिकची शेवा केल्याचा पुरावा छापायचा म्ह्न्जे काय. दुसरी काम न्हाईत का ? पुढची इकास कामं खोळंबतात. तेवा प्वाईंट लक्शात घ्याच.
आन हे काय नव नविन ऐकु येतयं. उमेदवार शिकलेला हवा म्हने. गुने दाखल नकोत म्हने. गुन्याचं काय नाय एवडं. एफायार करायची पन कुनाची छाती नाय आपल्याइरुद्द. पन हे शिकलेला उमेदवार म्हन्जे जुल्माचं हे साहेब. आमची बाई म्हन्जे मिशेश सगुना बैदाबादकर पार आंगटा छाप, मग कसं व्हायचं. मी तर म्हनलो सगुनेला की तू पन दुस-या वार्डातून -हा की उभी. निवडून आणतो ना. मग पाच वर्श टेन्शन नाय. तर ती अडानी बाई चक्क न्हाई म्हनते ! तिला वाटलं उबं रायच म्हन्जे पुढची पाच वर्ष उबंच रायचं. पाय दुखतील म्हनते. आता काय बोलायच. पॉलिटिस्सचं काय दगड कळत नाही. डोक्यात भरलीत दगडं सगळी. चांगलं दोन दोन वार्डात इकासाच राजकारन खेळलो आस्तो. पन नशीबच भुस्काट दुसरं काय. आसं कुटुंब आन आशे कार्यकर्ते. दिवस म्हनूनच खराब हेत.
मागच्या आठवड्याचीच गोश्ट. सेक्रेट्री म्हनला रिकाम्या कुंड्या मागतात लोक. रुक्षारोपानाचं मागच्या जाईरनाम्यात होतं म्हनून मधे जन्तेला स्वताच्या हास्ते दिडशे कुन्ड्यांचे मोफत वाटप केलं. एकदम फ्रीमदे. म्हटलं कुंड्यात रुक्षारोपन करा आन जमिनिची धूप थांबवा. तर पब्लिकची मस्ती बगा. माती आन रोपटी पन द्या म्हनतात. आता माती काय कमी हाय का आपल्या शअरात? आन इथूनतिथून रोपटी उपटून कुंडीत लावायला जड व्हायला लागलं ह्यांना ! काय सांगायचं. मग लक्शात आलं आमच्या सेक्रेट्रीचा नेमीचा गाडवपना. पब्लिक रिकाम्या कुंड्या नवते मागत तर कचरा कुंड्या भरून वाहात हेत त्या रिकाम्या करा असे बोल्लेले. दर येळेला घोळ घालतय आर्धवट आमचं सेक्रेट्री.
मत मागायला गेलो तर इचारु नका एकेक आनभव. बेळके वस्तित तसा आपला लई जोर. सगळिच मतं आपली. पन ह्या सोसायट्यात ही वूच्च शिक्शनवाली मानसं. लय ड्यांबिस हो. परवा गेलेतो पत्रक द्यायला खुद्द. तर माज्यासमोरच ति सोसायटितली बाई मुलाला म्हनते कशी ‘आरे सोन्या, नखं कापताना खाली आजचा पेपर नको घेऊ, हे घे’ असं म्हनून माज्याचसमोर माजं पत्रक दिलं सोन्याला. ही आमची लेवल. त्याच सोसायटीतून बाहेर पडताना अंगावर काय कागद पडला बघतो तर माज्याच पत्रकाचं इमान करुन हवेत टाकलं दुस-या एका कार्ट्यानं ते माज्याच आंगावर ल्यांडीग झालं. आन वर दात काढून दाखवतोय ग्यालरीतुन. आता इरोधक चक्कर मारतात म्ह्नून आपन पन उगा तोंड दाकवून यायचं थितं. नायतरी हे लोक मतदानाच्या दिवशी भाएर थोडी पडतात ? आपली पावर बेळके वस्तीमदे. ह्यायेळेस फुकट छत्रीवाटप करावं लागनार फ्रिमदे.
बरं, इकास कामाची यादी काय बदल्ते म्हनता दर निवडनुकीला ? बात नको. पब्लिक सालं तेच तेच मागतं. आता खड्डे नसलेले रस्ते आन ते पन स्वच्च आन ते पन सदासर्वेकाळ ? आन बाकिची इकास कामं कोन बगनार मग ? केलेल्या इकास कामांची यादी तयार हे आपली. पत्रकच छापल ना फोर कलरमदे. आपन गटारी केल्या. (आता बजेट संपल आन गोल झाकनं करायची राहिली कुटेकुटे. बागवे रस्त्यावर एक जेष्ट आजोबा शिद्दे आतच गेले एका होलमदी. परवाच्या दिवशी पहाटेची गोश्ट. ह्या जेष्ट नागरिकाना पहाटे फिरायची लई खाज. आदीच दिसंत न्हाई त्यात सुर्य उगवायच्या आतच इथंतिथं फिरायचा सोस. आन मग आमच्यावर बोंबाबोंब). आजून म्हन्जे मोफत वाच्नालय केली. फुकट पेपर रोज सकाळी. म्हनल वाचा नि शाने व्हा तर आमची पोरं संद्याकाळी रद्दीत विकतात ते डोल्यात आलं लोकनच्या. मग आपला पक्ष रद्दी काम करतो अशी बोंब मारायला इरोधक तयारच हेत. याशिवाय पान्याचे हे मोटे दगडी रांजन लावुन दिलेत चारेक चौकात. आता त्यात कदीमदी पानी घालायचं राहून जातं. बाकीच्या इकासकामाची धांदल. कुठे कुठे बघनार साहेब. म्हनून काय रांजनात भिका-यानी –रायला सुरुवात करावी का ? ते फोटो पेपरमदी छापून आनावे इरोधकांनी ? दिवस असे खराब आलेत साहेब. तसं इरोधकांचा प्रचार, पब्लिकची बोंबाबोंब, टिविवाल्यांचे प्रश्न, पेपरमदे पाच वर्शाचा पंचनामा हे असलं काय पन मनावर घ्यायचं नाही ही तुमचीच शिकवन. पॉलिटिस्स म्हन्जे ह्या गोश्टी असनारच. न्हाव्याच्या दुकानात थोडीफार केसं असनारच, तसं.
दादा, तुमची आमदारकी अजून हे ना वर्षभर. बेस्टे. राग मानू नका. पन तुमचं बरं असतं दादा. तुमचा इकास निधी कुटे आन कसा वळतो पब्लिकच्या डोल्यात येत नाय. आमच्या इकासकामांचे मात्र साक्शी आन पुरावे देत बसावे लागतात. पुढच्या टाइमाला आमच्यासारक्या निष्टावंताचं बगा जरा. तुमी खासदार व्हा आन आमाला द्या आमदारकिचं तिकिट. दादा, हा एकच वादा करा आता आमाला.
बर आता थांबतो. काये की संपर्क कारयालय ब-याच मैन्यांनी उगडल्याने लय धूळ साचली हे. त्यामुळे श्वास घेऊन सोडायला थोडी तकलिफ होत हे. शिवाय बाहेरच पोरांनी झेंडे लावून उघड्या जिपांमदून फिरत ट्राफिक ज्याम केला हे. जाम गर्दी जमली हे. आयतीच गर्दी हे तर चौकात एक भाशण ठोकून देतो.
बाकी चाल्लय म्हना ना.
कळावे
आपला आन आपलाच निश्टावंत
बबन बैदाबादकर
ता. क. पुज्य गुंडेबाबांकडून एकदा लाथ खाऊन स्वता आनभव घ्याच ही इनंती हे साहेब. खासदारकी पक्की होऊन जाईल.
- राफा
(No subject)
खल्लास
खल्लास
राफा रॉक्स वन्स अगेन.
राफा रॉक्स वन्स अगेन.
(No subject)
जबरा पंचेस राफा (As usual)
जबरा पंचेस राफा (As usual) .........
<<(पोरांच्या सांगन्यावरून चेह-याहून ग्वागल वेगळा ओळखू यवा म्ह्नून ग्वागलच्या काड्या चंदेरी वापरल्या हेत. पोरं लै आयडियाबाज.).>>> हे तर लै आवाल्डं द्येवा
'अवघडे', अतिक्रमण करनारा
'अवघडे', अतिक्रमण करनारा ओढा... ___/\___
(No subject)
राफा इज अल्टीमेट, अरे काय
राफा इज अल्टीमेट, अरे काय फटॅक्स लिवलय, व्वा
(No subject)
झक्क्कास!! थोडं
झक्क्कास!!

थोडं लांबल्यासारखं वाटलं हे मा वै म...
जरा जास्तच मोठ्ठं झालय पत्र..
जरा जास्तच मोठ्ठं झालय पत्र.. पण काही पंचेस जबरी आहेत..
भन्नाट
भन्नाट
जब्बरी. सह्ही पंचेस.
राफा रॉक्स ...
राफा रॉक्स ...

येक्दम शॉल्लेट हे>>>>>>>>>>>
येक्दम शॉल्लेट हे>>>>>>>>>>>
नेहमीप्रमाणे झक्कास! >>
>> आंगट्या घालायला बोट ठेवली आठ आन ग्रह बनवले नवू. म्ह्न्जी काई आरिश्ट आलं तर ज्याची आंगटी
>> घालायची राहिली का तर त्याच ग्रहाचा कोप झाला असं म्हनायला मोकळीक.
म्हंटलं आजून एक जागा आहे नववी अंगठी घालायला!
लै भारी..
लै भारी..
जबरी लिहिलय.
जबरी लिहिलय.
मस्त..
मस्त..:)
बबन .... यावे स्वागत आहे
बबन .... यावे स्वागत आहे
...१ नंबर ... 
परवा टोयटा घेतली तर पैले गुंडेबाबाकडून लाथ मारुन घेतली चारी टायरांवर & बेश्ट दिस वगैरे बगून पुज्य गुंडेबाबांकडून स्वता लाथ खानारे>> जलिम भक्ति ...
पण राफा कुठय ?? त्याला सोडाना ... का पास झाला शाळेतून ?
भन्नाट .. लॉगिन केल्यावर असलं
हा... लई झ्याक वाटलं बगा...
हा... लई झ्याक वाटलं बगा... पत्र्यातील सम्दी सपश्टीकरणाना येकदम पटली.
ज ब रा ट...
ज ब रा ट...
मस्त झाले आहे!!
मस्त झाले आहे!!
(No subject)
अफलातून
अफलातून
सर्वा अंगिण इकास>>>>>
सर्वा अंगिण इकास>>>>> पॉलिट्स्सची>>>>>> मस्तच
राफा... लईच भारी ब्वा!
राफा... लईच भारी ब्वा!
(No subject)
awesome blossom मस्तच
awesome blossom

मस्तच
Pages