अन्नं वै प्राणा: (६)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

शूरवीर पाय घट्ट रोवून उभे,
झाडंही त्यांच्याकडून उभं राहायला शिकली - अकबरनामा

untitled.JPG

१९ जानेवारी, २००९. कुलाब्यातल्या ओबेरॉय ट्रायडण्टच्या सभागृहात देशातले पाचशे उद्योगपती आणि राजकीय नेते जमलेले असतात. निमित्त असतं इकनॉमिक टाइम्सतर्फे दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचं. कार्यक्रमाचं स्थळ ट्रायडण्ट, पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यातली रुग्णवाहिका कामा हॉस्पिटलाची आणि उपस्थितांसाठीचं भोजन ताजमधून आलेलं. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर ट्रायडण्टला होणारा हा पहिला कार्यक्रम. शिवाय हल्ल्यानंतर पंतप्रधानांची पहिली मुंबईभेट, त्यामुळे हा समारंभ अतिशय महत्त्वाचा. पण बहुतेक सर्व निमंत्रित कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले असतात ते 'इकनॉमिक टाइम्स अवॉर्ड फॉर कॉर्पोरेट एक्सलन्स' हा पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांना अभिवादन करण्यासाठी. पंतप्रधान मंचावर विराजमान झाल्यावर टाइम्स ग्रूपच्या दीना वकील पहिल्या पुरस्कारविजेत्यांचं नाव जाहीर करतात. ट्रायडण्टचे दिनाझ शर्मा, अदिती सहगल आणि राजेश कदम यांचं नाव पुकारताक्षणी सभागृहातली प्रत्येक व्यक्ती टाळ्यांचा कडकडाट करत उभी राहते. आनंद महिन्द्रा ऐंशी वर्षांच्या बिक्की ओबेरॉय यांना मंचावर हात धरून घेऊन येतात. पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून ते शांतपणे आपल्या जागेवर जाऊन बसतात. पुढची नावं पुकारली जातात. ताजचे मुख्य सुरक्षाधिकारी महावीर राठौड, शेफ हेमंत ओबेरॉय आणि व्यवस्थापक करमबीर कांग. पंतप्रधान काही मिनिटं करमबीर कांगांचे हात हातात घेऊन नुसतेच उभे राहतात. एरवी भावनांचं प्रदर्शन न करणार्‍या पंतप्रधानांचे डोळे ओलावलेले असतात. सभागृहातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असतं. टाळ्यांचा कडकडाट सुरू राहतो. पण करमबीर कांगांच्या चेहर्‍यावर कुठल्याच भावना नसतात. चेहरा शांत, निग्रही. पुरस्कार स्वीकारून ते भाषणासाठी पोडियमकडे जातात. त्यांचं भाषण सुरू असताना पंतप्रधानांसकट सगळे उभेच. 'ताज-ट्रायडण्ट असो किंवा सीएसटी किंवा कामा हॉस्पिटल, त्या रात्री शौर्य गाजवणारे सर्व सामान्य होते. मात्र त्यांनी दाखवलेलं शौर्य आणि निष्ठा असामान्यच. ताज परिवारातर्फे मी हा सन्मान विनम्रपणे स्वीकारतो', एवढं बोलून करमबीर कांग खाली उतरतात. कार्यक्रम सुरू असूनही सभागृहातले सर्वजण कांगांशी हस्तांदोलन करायला एका रांगेत उभे राहतात. या रांगेत उद्योगमंत्री कमलनाथ असतात, राहुल बजाज असतात, अनिल अंबानीही. पाचशेच्या पाचशे पाहुण्यांशी हस्तांदोलन होईपर्यंत मंचावर पंतप्रधानही उभेच असतात. डोळ्यातलं पाणी पुसण्याच्या फंदात न पडता.

पुण्याच्या टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये करमबीर कांगांना भेटताना मला गेल्या वर्षी पाहिलेली ही ध्वनिचित्रफीत सतत आठवत राहते. माझ्याबरोबर असलेल्या सुचित्रेच्या आठवणी मात्र खूप वेगळ्या. २६ नोव्हेंबरच्या रात्री ती ताजमध्ये होती. बंगलोरला एका बहुराष्ट्रीय कंपनीत संशोधिका असलेली सुचित्रा एका परिषदेसाठी मुंबईला आली होती. परिषदेचा तो पहिला दिवस होता. दिवसभराचा शीण घालवायला काही मित्रमैत्रिणींबरोबर ती ताजच्या हार्बर्स बारमध्ये बसली होती. रात्री साडेनऊ वाजता पहिले काही मोठे आवाज आले, तेव्हा तिला वाटलं की फटाके फुटतायेत, कारण ताजच्या क्रिस्टल रूममध्ये एक बोहरी लग्नसमारंभ सुरू होता. पण मग काचांच्या फुटण्याचा आवाज आला, आणि सर्वत्र एकच गोंधळ उडाला. पुढचे अठरा तास ती ताजमध्ये होती. तिच्या डोळ्यांसमोर अनेकजण मृत्युमुखी पडले. मात्र त्या रात्री तिच्यासारख्या शेकडो पाहुण्यांचे प्राण वाचवले ते ताजच्या कर्तव्यनिष्ठ कर्मचार्‍यांनी. स्वतः गोळ्या झेलल्या, पण आपल्या पाहुण्यांचं त्यांनी रक्षण केलं. अतिरेकी बारकडे येत आहेत असं लक्षात आल्यावर टेबलाखाली लपून बसलेल्या सुचित्रेलाही बारमधल्या एका कॅप्टननंच सुखरूप दुसर्‍या मजल्यावरच्या एका स्वयंपाकघरात लपवलं. तिथे ती अठरा तास होती. तिच्याबरोबर असलेल्या पन्नासेक लोकांची पूर्ण काळजी त्या अठरा तासांत ताजच्या कर्मचार्‍यांनी घेतली. दोन लहान मुलांसाठी दूध आणायला एक शेफ तीनदा वेगळ्या मजल्यावर असलेल्या पॅन्ट्रीत जाऊन आला. सुचित्रेची सुटका दुसर्‍या दिवशी झाली तेव्हासुद्धा त्या पूर्ण गटाला बाहेर पडेपर्यंत ताजच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्याभोवती कोंडाळं करून संरक्षण दिलं होतं. ताजच्या कर्मचार्‍यांनी त्या रात्री विलक्षण शौर्य दाखवलं. या कर्मचार्‍यांचं त्या भयानक प्रतिकूल परिस्थितीत मनोधैर्य उंचावलं ते ताजचे व्यवस्थापक श्री. करमबीर कांग यांनी.

karambeerkang.jpg

करमबीर कांग आणि ताज यांचं अद्वैत आहे. गेली वीस वर्षं कांग ताजमध्ये कार्यरत आहेत. त्या रात्री करमबीर कांग वांद्र्याच्या ताज लॅण्ड्स् एण्डला होते. गोळीबाराची बातमी कळताच ते ताजला आले तेव्हा अतिरेक्यांनी सहाव्या मजल्याचा ताबा घेऊन आग लावली होती. ताजचा तो प्रसिद्ध घुमट जळत होता. आतमध्ये स्फोट होत होते, गोळीबार सुरू होता, मृतदेह जमिनीवर पडले होते. कुलाब्याला येताच कांगांनी ताजच्या कर्मचार्‍यांच्या मदतीनं कामाला सुरुवात केली. पाहुण्यांना सुरक्षित स्थळी हलवणं, त्यांची काळजी घेणं, पोलिसांना मदत करणं या कामी सर्व कर्मचारी लागले. ताजच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या करमबीर कांगांच्या घरात त्यांच्या पत्नीचा आणि दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह तिथेच पडून होते. पण तरीही पुढचे साठ तास करमबीर कांग ताजचं रक्षण करण्यात गुंतले होते.

"मी ताजला आलो तेव्हा माझ्या पत्नीशी माझा संपर्क तुटला होता. सहावा मजला पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर होता. मी अग्निशमन दलाला अनेकदा विनंती केली, पण त्यांना काही कारणामुळे तिथपर्यंत पोहोचताच आलं नाही. पाचव्या मजल्यावरून गोळीबारही सुरू होता. आमच्या पाहुण्यांची सुरक्षा माझ्यासाठी तेव्हा सर्वांत महत्त्वाची होती. मी त्याकडेच लक्ष दिलं. आमचे कर्मचारी उत्तम काम करत होते. प्रत्येक पाहुण्याला सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांना खायलाप्यायला दिलं जात होतं."

कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाल्यानंतरही काम करत राहण्याची ही शक्ती करमबीर कांगांना मिळाली कुठून?

"मी माझ्या आईवडिलांशी फोनवरून बोललो. ते म्हणाले की, लोकांचे प्राण वाचवणं हे तुझं कर्तव्य आहे. आधी तुझं काम कर. श्री. रतन टाटाही पूर्णवेळ तिथे होते. आम्हांला धीर देण्यासाठी. मी नेहमी त्यांना माझा आदर्श मानत आलो आहे. अतिरेकी हॉटेलात होते तेव्हा अनेकदा मी त्यांच्या डोळ्यांत पाणी पाहिलं. पण एकदाही त्यांचे खांदे झुकले नाहीत. माझ्या पत्नीच्या आणि मुलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही त्यांनीच मला धीर दिला."

"त्या रात्रीनंतर आठवड्याभरात आम्हांला सहाशे ईमेल आले. ताजच्या कर्मचार्‍यांनी प्राण वाचवलेल्या लोकांनी पाठवलेले ते ईमेल होते. आमच्या कर्मचार्‍यांचे आभार मानणारे, त्यांचं कौतुक करणारे. त्या रात्री ताजला ५४२ कर्मचारी होते. गोळीबार सुरू झाल्यावर एकही कर्मचारी हॉटेल सोडून गेला नाही. एनएसजीचे कमांडो आल्यावरही अनेक कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी हॉटेलात थांबले. ड्यूटीवर नसणारे अनेक कर्मचारी गोळीबाराच्या बातम्या टीव्हीवर पाहून ताजला आले. नौशेर नावाचा आमचा एक सुरक्षाधिकारी आहे. तोही त्या दिवशी ड्यूटीवर नव्हता. पण तो रात्री लगेच ताजला आला, आणि पुढचे दोन दिवस घरी गेला नाही. आमचे अनेक कर्मचारी गोळीबारात मारले गेले. वासाबीत गोळीबार सुरू होता तेव्हा तिथल्या चार शेफनी गोळ्या झेलल्या आणि दहा जणांचे प्राण वाचवले. किती आणि काय सांगू? फक्त पुरुषच नव्हेत, तर स्त्रीकर्मचार्‍यांनीसुद्धा त्या रात्री असंख्य पराक्रम केले. उपनिषदांमध्ये एक गोष्ट आहे. तुमची बुद्धी आणि तुमचे अनुभव तुमचे विचार ठरवतात, असं त्या गोष्टीत सांगितलं आहे. म्हणूनच आमच्या कर्मचार्‍यांनी त्या रात्री जे धाडस दाखवलं, ते आमच्या कार्यसंस्कृतीमुळे असावं, असं मला वाटतं."

करमबीर कांग यांनी उल्लेखलेली गोष्ट छांदोग्योपनिषदातली. श्वेतकेतूची. उद्दालक नावाचे एक ऋषी होते. अतिशय ज्ञानी आणि तितकेच प्रेमळ. श्वेतकेतू हा त्यांचा मुलगा. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे बाराव्या वर्षी श्वेतकेतूची मुंज झाली आणि तो गुरूगृही गेला. त्याची स्मरणशक्ती तीव्र होती. वाचनाची आवड होती. त्यामुळे व्याकरण, विज्ञान, भाष्य, कला अशा उपलब्ध सर्व विषयांचं ज्ञान त्यानं लवकरच मिळवलं. गुरूगृही असलेली सर्व पुस्तकं त्यानं वाचली होती. 'माझ्याकडे असलेलं सर्व ज्ञान मी तुला दिलं आहे. तुला माझ्या आश्रमात असलेले सर्व ग्रंथ तोंडपाठ आहेत', असं गुरूंनी सांगितल्यावर मग श्वेतकेतू घरी परतण्यास निघाला. त्याचे वडील त्याची आतुरतेनं वाट बघत होते. बारा वर्षांनंतर त्यांचा मुलगा त्यांना भेटणार होता. त्याच्या हुशारीची, व्यासंगाची कीर्ती त्यांच्याही कानी आली होतीच.

श्वेतकेतू घराकडे चालत आला तेव्हा मात्र उद्दालक ऋषी चपापले. श्वेतकेतूच्या नजरेत अवघ्या जगाबद्दल तुच्छता होती. त्याची मान ताठ होती. ज्येष्ठांसमोरही तो आदरानं झुकत नव्हता. उद्दालक ऋषी काळजीत पडले. आपल्या मुलाला वाचलेल्या ग्रंथांमुळे, मिळवलेल्या ज्ञानामुळे अहंकाराची बाधा झाली आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. वाचनाचा, ज्ञानाचा अहंकार बरा नव्हे, फक्त ग्रंथ वाचून खरं ज्ञान मिळत नाही, हे आपल्या मुलाला कळायला हवं, असं त्यांना वाटलं. ते श्वेतकेतूला म्हणाले, 'मुला, उद्यापासून पंधरा दिवस तू जेवायचं नाहीस. फक्त पाणी प्यायचं. कितीही भूक लागली तरी अन्नाचा कणही पोटात जाता कामा नये'. श्वेतकेतूनं विचारलं, 'का?' उद्दालक म्हणाले, 'कळेल. मी सांगतो तसं कर'.

सोळाव्या दिवशी श्वेतकेतूला वडिलांनी बोलावलं. त्याचे डोळे खोल गेले होते. खांदे झुकले होते. उद्दालक ऋषी म्हणाले, "मला आता तू ऋग्वेदातल्या ऋचा म्हणून दाखव'. श्वेतकेतूनं तोंड उघडलं, पण त्याला काहीच आठवेना. खरं म्हणजे त्याला समस्त वेद तोंडपाठ. अर्ध्या झोपेतून उठवलं तरी तो सांगाल ते घडाघडा म्हणू शकत असे. आता मात्र त्याला काहीच आठवत नव्हतं. त्याला रडू फुटलं. आपलं सर्व ज्ञान कुठे गेलं? स्मृतीनं असा दगा दिला कसा? आपण गेली बारा वर्षं इतके ग्रंथ वाचले, त्याचा आता काय उपयोग?

उद्दालक ऋषी म्हणाले, 'मुला, तुला अजूनही लक्षात आलेलं दिसत नाही. तू पंधरा दिवस जेवला नाहीस आणि तुझी स्मरणशक्ती काम करेनाशी झाली. आपली बुद्धी कार्यरत असते ती अन्नामुळे. आपण जे जेवतो, त्यातल्या सकस भागामुळे बुद्धी काम करते. चांगल्या, धैर्यवान माणसाची खरी ओळख ही त्याची बुद्धी आहे. पण बुद्धी म्हणजे फक्त हुशारी नव्हे. बुद्धी म्हणजे आपली वागणूक. आपलं चारित्र्य. ही बुद्धी ग्रंथ वाचून येत नाही. अन्नातून येते. कशी? आपले विचार आणि आपली स्मरणशक्ती एकमेकांना पूरक आहेत. स्मरणशक्ती नसेल, तर चांगले विचारही नसतील. म्हणजेच आपली वागणूक, आपले विचार आपल्या अन्नावर अवलंबून असतात. तुला ज्या ज्ञानाचा अहंकार होता, ते ज्ञान तुला फक्त पंधरा दिवसांत सोडून गेलं. ग्रंथांतून मिळालेलं ज्ञान हे वरवरचं असतं. म्हणून खरं ज्ञान मिळव. हा निसर्ग, इथली माणसं, आणि त्यांनी तुला दिलेलं व तू स्वतःकरता निवडलेलं अन्न यांतूनच तुला खरं ज्ञान मिळेल. उत्तम विचार मिळतील'.

मनुष्याचे जे जे उत्तम गुण आहेत, ते सर्व अन्नातून येतात, असा आपल्या पूर्वजांचा समज होता आणि म्हणूनच स्वयंपाकाला फार महत्त्व होतं. स्वयंपाकाचं जणू एक शास्त्रच निर्माण झालं होतं. स्वयंपाकासाठी जिन्नस कसे असावेत, स्वयंपाकी कसा असावा, त्याने स्वयंपाक कसा करावा, जेवण कसं वाढावं, कसं जेवावं, जेवणापूर्वी व जेवणानंतर काय करावं, या सार्‍यांचा काटेकोर विचार झाला होता. मनुष्याचे विचार आणि त्याचे अंगभूत गुण त्याच्या भोजनावर अवलंबून असतात हे सांगणार्‍या अनेक कथा प्राचीन भारतीय वाङ्मयात आहेतच, शिवाय बाहेरून आलेल्या प्रवाशांनी, राज्यकर्त्यांनीही या भारतीय विचाराला आपलंसं केलं. उदाहरणार्थ, अकबर. भारतीय अन्नविचारामुळे प्रभावित होऊन अकबरानं आपली जीवनशैली आखली, बदलली. अकबरावर असलेला हा भारतीय प्रभाव होता अबुल फझल इब्न मुबारक या त्याच्या वजिरामुळे.

annamvaiheader.jpg

अबुल फझलचा जन्म भारतातला. त्याचे अजोबा सिंध प्रांतातले. पर्शियाशी या कुटुंबाचा तसा थेट संबंध नव्हता. मात्र अबुल फझलचे आजोबा व वडील शेख मुबारक पर्शियन भाषेत पारंगत होते. शेख मुबारकांनी अनेक प्राचीन पर्शियन ग्रंथांचा अभ्यास केला होता. अनेक हिंदू ग्रंथही त्यांनी अभ्यासले होते, आणि म्हणून 'इस्लाम हाच सर्वश्रेष्ठ' अशी त्यांची विचारसरणी नव्हती. अबुल फझल व त्याचा भाऊ फैझी या दोघांनाही हीच शिकवण मिळाली होती. अबुल फझलवर मुख्यतः खुस्रो या पर्शियन राजाचा फार मोठा प्रभाव होता.

खुस्रो हा इसवी सनाच्या सहाव्या शतकात इराणमध्ये होऊन गेलेला एक फार कर्तृत्ववान असा राजा. त्याच्या आधिपत्याखाली असलेल्या प्रदेशाला पार्स असं नाव होतं. अनहिता देवीचा पुजारी असलेल्या पहिल्या अर्देशीरानं या साम्राज्याची स्थापना केली होती. झोराष्ट्रीय धर्माच्या छत्राखाली राज्य करणारा अर्देशीर हा पहिला राजा. खुस्रो हा अर्देशीराचा विसावा वंशज. या खुस्रोनं आपल्या प्रदेशात रस्ते बांधले, धरणं बांधली, नवीन शहरं वसवली. पण याशिवाय त्यानं एक फार महत्त्वाचं काम केलं. भारतातून संस्कृत ग्रंथ मागवून त्यांची भाषांतरं त्यानं करवून घेतली. भारताचा पर्शियाशी पूर्वीपासून व्यापारी संबंध होताच. दोन्ही देशांतील विद्वानांमध्ये देवाणघेवाणही चाले. अनेक पर्शियन कलाकार भारतात कामासाठी येत असत, अनेक भारतीय वैद्य पर्शियन अमीरउमरावांच्या सेवेत असत. खुस्रोमुळे अनेक भारतीय शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, व्याकरणकार पर्शियात स्थायिक झाले. खुस्रोनं त्यांना सर्व सोयीसुविधा देऊ केल्या, आणि पर्शियन भाषेत उत्तम ग्रंथनिर्मिती करून घेतली. शिवाय पर्शियन व भारतीय विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःही ग्रंथ लिहिले.

खुस्रोनं लिहिलेल्या, लिहून घेतलेल्या ग्रंथांमुळे अबुल फझलचा दृष्टिकोनच बदलला. ज्ञान हेच खरं व शाश्वत, ते ज्ञान कोणत्या धर्माकडून आलं, ते महत्त्वाचं नाही, हे त्याच्या वडिलांचं मत त्याला पटलं, आणि त्यानं हे आयुष्यभर लक्षात ठेवलं. त्याचा भाऊसुद्धा याच विचारसरणीचा होता. वयाच्या चोविसाव्या वर्षी अबुल फझल अकबराच्या दरबारात रुजू झाला. वर्षभरापूर्वीच फैझीही दरबारात राजकवी म्हणून रुजू झाला होता. फैझीच्या मनमोकळ्या स्वभावामुळे अकबराशी त्याची उत्तम मैत्री झाली होती. अबुल फझल दरबारात आल्यावर लवकरच तोही अकबराच्या विश्वासातला मित्र झाला. अकबर निरक्षर होता. अहंमन्य उलेमांचा त्याला विलक्षण तिटकारा होता, आणि म्हणूनच निकोप दृष्टी असलेले हे दोन भाऊ त्याला लगेच आवडले. या मैत्रीमुळेच अबुल फझल पुढे अकबरनामा लिहू शकला.

अकबरनामा हा ग्रंथ मूळ फारसी भाषेत लिहिला आहे. या ग्रंथाचे तीन भाग. पहिल्या भागात तैमुरलंगापासून हुमायूंपर्यंतच्या अकबराच्या पूर्वजांचा समग्र इतिहास आहे. दुसर्‍या भागात अकबराच्या आयुष्यातील पहिल्या शेहेचाळीस वर्षांचा घटनाक्रम आहे. तिसर्‍या भागाचं नाव ऐन - इ - अकबरी, म्हणजे अकबराची शासनव्यवस्था. या भागात अकबराच्या शासनव्यवस्थेतले वेगवेगळे विभाग, तिथले अधिकारी, त्यांचा कारभार, अकबराच्या राजवाड्यातले विभाग, राजघराण्यातल्या व्यक्तींचा दिनक्रम, त्यांचे पोशाख, त्यांचे छंद, सण, रीतीरिवाज, नाणी, धातुशास्त्र, दागिने, शिकारीचे नियम, वेगवेगळे प्राणी, झाडं, फुलं यांबद्दल लिहिलं आहे. ऐन - इ - अकबरीच्या शेवटच्या भागात हिंदुस्थानातले वेगवेगळे धर्म, त्यांचे रिवाज, भारतीय साहित्य, संगीत, संस्कृती, आयुर्वेद यांचा आढावा घेतला आहे. अबुल फझल जितका ज्ञानी तितकाच तो खादाडही होता. चार माणसांचं जेवण तो एकावेळी फस्त करत असे. त्याचा मुलगा अकबराच्या मुदपाकखान्यात कामाला होता. त्यामुळे असेल कदाचित, पण अबुल फझलनं अकबराच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल, मुदपाकखान्यातील एकंदर व्यवस्थेबद्दल अतिशय विस्तारानं लिहिलं आहे.

अकबराच्या राजवाड्यात आणि तो प्रवासात असताना पाणीपुरवठ्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र विभाग होता. त्याचे अतिशय विश्वासू अधिकारी या विभागात काम करत असत. बाबर, हुमायूं या आपल्या पूर्वजांप्रमाणे अकबर फक्त गंगेचं पाणी पीत असे. गंगेच्या पाण्यात औषधी गुण आहेत, आणि गंगेचं पाणी प्यायल्यामुळे मनुष्य अमर होतो, असा त्याचा समज होता. प्रवासात किंवा छावण्यांमध्येही त्याच्यासाठी गंगेचं पाणी आणलं जाई. रोजच्या स्वयंपाकासाठी गंगा, चेनाब आणि यमुना या तीन नद्यांचं पाणी वापरलं जाई. काही विश्वासू नोकर गंगेच्या काठी कायम वस्तीस असत. रोज मडक्यांमधून राजवाड्यात पाणी पाठवण्याची जबाबदारी त्यांची असे. फतेहपूर सिक्री किंवा आग्र्यास मुक्काम असताना सोरम नावाच्या गावातून पाणी येत असे. अकबराचा पंजाबात किंवा उत्तर भारतात इतरत्र मुक्काम असेल, तर पाणी हरिद्वारहून आणलं जाई. पाण्याची चव घेण्यासाठी, पाण्यातून विषबाधा होऊ नये, यासाठीही काही विश्वासू सेवकांची नेमणूक झाली होती. पाणी थंड करण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेटचा वापर केला जाई. हे रसायन बंदुकीच्या दारूत वापरलं जातं. पाणी थंड करण्यासाठी वापरण्याअगोदर पोटॅशिअम नायट्रेटचं स्फटिकीकरण केलं जाई. मग एका चांदीच्या सुरईत एक शेर पाणी घालून सुरईचं तोंड झाकून ठेवत. थोड्या वेळानं त्या सुरईत अडीच शेर पोटॅशिअम नायट्रेट पाच शेर पाण्यासह घालत. त्यानंतर सुरईतलं पाणी पाऊण तास घुसळलं जाई. थंड पाणी तयार. एका रुपयाला चार मण पोटॅशिअम नायट्रेट विकत मिळत असे. पाणी साठवण्याच्या खास जागेला आबदार खाना म्हणत. फळांची साठवणूक मेवा खान्यात केली जाई. मसाले साठवण्यासाठी हवेज खाना, भांड्यांसाठी रिकाब खाना, रोट्या आणि नान भाजण्यासाठी नानबा खाना होते.

अकबर जास्तीत जास्त काळ पंजाबात राहू लागल्यापासून बर्फ वापरण्यासही सुरुवात झाली. लाहोरपासून पंचेचाळीस मैलांवर असलेल्या पन्हान या गावातून बर्फ आणला जात असे. एका रुपयाला दोन-तीन शेर बर्फ विकत मिळत असे. हे विक्रेते फार चढ्या भावानं बर्फ विकतात, असं अकबराचं म्हणणं होतं. पण बर्फ फार लांबून आणावा लागतो, तसंच वाटेत तो वितळू नये, म्हणून काळजी घ्यावी लागते, त्यामुळे उलट ही किंमत कमी आहे, आम्हांला या भावाने बर्फ विकणं खरं म्हणजे परवडतच नाही, असं विक्रेत्यांचं म्हणणं होतं. यावर तोडगा काढण्यासाठी अकबरानं आपल्या सेवकांनाच पन्हानहून बर्फ आणण्यास फर्मावलं. त्यानं सेवकांच्या तीन तुकड्या केल्या. पहिली तुकडी बोटींमधून बर्फ घेऊन आली. दुसर्‍या तुकडीनं घोडागाडीतून बर्फ आणला, तर तिसर्‍या तुकडीनं खांद्यावर वागवत बर्फ आणला. अकबरानं एकूण खर्चाचा ताळेबंद मांडला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, बोटीतून किंवा घोडागाडीतून बर्फ आणायला फारसा खर्च येत नसे. मग अकबरानं बर्फ आणण्यासाठी खास सेवक नेमले. दहा बोटींची व्यवस्था केली गेली. एक बोट रोज सकाळी राजधानीत येत असे. एका बोटीवर चार सेवक असत आणि या बोटीतून बारा पेट्या बर्फ आणला जाई. एका पेटीत बारा शेर बर्फ असे. घोडागाडीतून मात्र दोन पेट्या आणल्या जात. वाटेत चौदा ठिकाणी घोडे बदलले जात. खांद्यावर बर्फ वाहून आणण्यास बराच वेळ लागे. अठ्ठावीस सेवक खांद्यावरून बर्फ वाहून आणण्याच्या कामी नेमले होते. चौदा ठिकाणी या सेवकांसाठी विश्रांतीगृहं उभारली होती. एकूणात या नवीन व्यवस्थेमुळे विक्रेत्यांचं नुकसान झालं तरी अकबराचा बर्फावर होणारा मोठा खर्च वाचला. हिवाळ्यात एका शेराला तीन दाम, पावसाळ्यात चौदा दाम आणि उन्हाळ्यात नऊ दाम इतकाच खर्च येई. (एक दाम म्हणजे रुपयाचा चाळीसावा भाग. अधेला म्हणजे अर्धा दाम आणि पाओला म्हणजे पाव दाम. जेतल हा एका दामाचा पंचविसावा भाग. गॉन विथ द विंड या चित्रपटात र्‍हेट बटलर स्कार्लेट ओ'हारा ला म्हणतो, "फ्रॅन्कली, माय डिअर, आय डोन्ट गिव्ह अ डॅम". यातला डॅम हा शब्द दामचा अपभ्रंश. असो.) सामान्यांना बर्फ विकत घेणं अर्थातच परवडत नसे. राजवाड्यात आणि सरदारांच्या घरी मात्र बारा महिने बर्फ वापरला जाई. राजवाड्यातल्या कर्मचार्‍यांना उन्हाळा सुखकर व्हावा, म्हणून त्यांना अर्ध्या किमतीत बर्फ विकला जात असे.

अकबराच्या मुदपाकखान्याचं व्यवस्थापनही भन्नाट होतं. अबु फझल लिहितो - ’बादशाहाची बुद्धिमत्ता इतकी उच्च कोटीची नसती, त्यांची जाण इतकी उत्कृष्ट नसती, त्यांची दयाबुद्धी समस्त मानवजातीचा उद्धार करण्यास सक्षम नसती, तर त्यांनी कधीच अन्नाचा व झोपेचा त्याग करून संन्यास घेतला असता. मात्र त्यांच्या उत्तम अंगभूत गुणांमुळे रयतेवर राज्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देवानेच सोपवली आहे, आणि ही जबाबदारी ते उत्तमरीतीने पार पाडत आहेत. आणि सार्‍या जगाच्या उद्धाराची, कल्याणाची जबाबदारी त्यांच्या माथी असली तरी ’आज रात्री जेवायला काय आहे?’ असा प्रश्न ते कधीही विचारत नाहीत. रोज ते फक्त एकदाच जेवतात, आणि पोट भरण्यापूर्वीच पानावरून उठतात. त्यांच्या कामातील व्यग्रतेमुळे जेवणाची वेळ निश्चित नसते, पण मुदपाकखान्यात आचार्‍यांची जय्यत तयारी असते. मसाले, वाटणं अशी सगळी तयारी असल्याने एका तासाच्या आत शंभराहून अधिक पदार्थ तयार केले जातात. जनानखान्यासाठी मुदपाकखान्यात मात्र पहाटेपासूनच स्वयंपाकाची तयारी सुरू होते. मध्यरात्रीपर्यंत या मुदपाकखान्यातील आचारी कामात व्यग्र असतात.’

मुदपाकखान्यात अत्यंत विश्वासू आचार्‍यांचीच नेमणूक केली जात असे. मुदपाकखान्याच्या प्रमुखाला मीर बकावल असं म्हणत. सर्वांत कामसू आणि उत्कृष्ट अशा आचार्‍यालाच हा सन्मान मिळे. हकीम हुमाम हा अकबराच्या मुदपाकखान्यातला पहिला मीर बकावल. मीर बकावलाच्या काम करण्याच्या पद्धतीवर अनेकांचं मन:स्वास्थ्य, आरोग्य अवलंबून असल्यानं ही निवड फार काळजीपूर्वक केली जाई. खुद्द वजीर मीर बकावलाला मदत करत असे. रोज कुठले पदार्थ करायचे याचा सल्ला एक ज्येष्ठ हकीम देत असे. राजवाड्यातल्या व्यक्तींच्या तब्येती पाहून तो पदार्थ सुचवत असे. एखाद्याचं पोट बिघडलं, किंवा एखाद्या राणीनं 'बादशाहांना काल रात्री अंमळ लवकर थकवा आला' असं सांगितलं, तर हकीम त्याप्रमाणे पाककृती सुचवत असे. मीर बकावलाला मदत करण्यासाठी पर्शिया, अफगाणिस्तान, उझबेगिस्तान, तजाकीस्तान, मंगोलिया या देशांतून आलेल्या निष्णात आणि प्रामाणिक आचार्‍यांचा ताफा असे. शिवाय धान्यांच्या, वाणसामानाच्या, भाजीफळांच्या खरेदीसाठी रोखपाल, कोठारांचे अधिकारी, अन्नाची चव घेणारे असे सगळे मीर बकावलाच्या हाताखाली काम करत असत. मुदपाकखान्यात रांधल्या जाणार्‍या पदार्थांची नोंद ठेवण्यासाठी, नवीन पाककृती लिहून ठेवण्यासाठी एक खास लेखक नेमलेला असे. मुदपाकखान्यात व्यसनी, आळशी व्यक्तीची नेमणूक केली जात नसे. नोकरीवर घेण्यापूर्वी त्या व्यक्तीची कसून चौकशी केली जाई. गुप्तहेर हे काम करत असत. मुदपाकखान्यात नोकरीवर रुजू होताना त्या व्यक्तीच्या दहा नातेवाइकांना जामीन राहावं लागे. मुदपाकखान्यात अकारण गप्पा मारताना कोणी दिसल्यास त्याला लगेच समज दिली जाई. तरीही त्याने परत तीच चूक केल्यास त्याला मुदपाकखान्यातून काढून टाकलं जाई.

वर्षाच्या सुरुवातीला खजिनदाराचे साहाय्यक मुदपाकखान्यासाठी लागणार्‍या रकमेचा अंदाज घेऊन ती रक्कम मीर बकावलाच्या सुपूर्त करत. मीर बकावल त्या पैशाच्या थैल्या सीलबंद करून मुदपाकखान्यातल्या तिजोरीत ठेवी. रोजच्या खर्चाची नोंद मीर बकावल ठेवत असे. महिन्याच्या पहिल्या दिवशी घेतलेल्या वस्तूची किंमत महिनाभर तीच ठेवावी, असा नियम होता. सर्व पावत्या मीर बकावलाच्या सह्यांनंतर एकत्र तिजोरीत ठेवल्या जात. महिन्याच्या शेवटी प्रत्येकाला पगार देऊन झाल्यानंतर त्या महिन्यात झालेल्या खर्चाचा ताळेबंद मीर बकावलाच्या सहीने मुख्य खजिनदाराकडे दिला जाई. प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीला धान्यकोठाराचा मुख्य अधिकारी (दीवान - इ - बुयूतात) आणि मीर बकावल आवश्यक ते वाणसमान खरेदी करत असत. उदाहरणार्थ, सध्याच्या उत्तर प्रदेशातल्या बहराईच इथून सुखदा या जातीचा तांदूळ, ग्वाल्हेरहून देवजिरा तांदूळ, राजौरीचा जिनजिन तांदूळ, सध्याच्या हरयाणातील हिस्सारचं (हिसार - इ - फिरुझा) तूप आणि काश्मीरहून बदकं, पाणकोंबड्या इत्यादी. मुदपाकखान्यासाठी लागणार्‍या प्राण्यापक्ष्यांची काळजी घ्यायला सेवक असत. मेंढ्या, बर्बरी जातीच्या बकर्‍या, बदकं, कोंबड्या यांना भरपूर खायला घातलं जात असे. त्यांना काय आणि किती खायला द्यायचं याची व्यवस्थित आखणी केली होती. ऊस, खोबरं, जायफळ, दालचिनी, कडधान्यं, बांबूची पानं हे बकर्‍यामेंढ्यांचं खाद्य होतं. कोंबड्याबदकांना कडधान्यांबरोबर सोन्याचांदीच्या तारा खायला घालत. या प्राण्यांचं मांस चविष्ट आणि सुगंधी व्हावं, हा त्यामागचा हेतू. विकत घेतल्यानंतर कोणताही प्राणी जास्तीत जास्त एक महिना जिवंत ठेवत. यमुना नदीच्या काठी राजवाड्याचा खास खाटिकखाना होता. नदीच्या पाण्यानं स्वच्छ धुतलेलं मांस सीलबंद पेटार्‍यांतून राजवाड्यात पाठवलं जाई. राजवाड्यात परत ते मांस कमीत कमी दोनदा स्वच्छ केलं जाई. या कामी व इतर स्वयंपाकातही वापरलं जाणारं पाणी कमीत कमी तीनदा गाळून घेतलेलं असे. मुदपाकखान्याच्या मागच्या बाजूला काही भाज्या पिकवल्या जात. या भाज्या गुलाबजलावर पिकवत. रोज लागणार्‍या भाज्यांचे वेगळे वाफे होते. या भाज्या विकत आणल्या जात नसत.

बादशाहच्या राजवाड्यात रोज शेकडो पदार्थ तयार केले जात. मीर बकावल त्यांतल्या प्रत्येक पदार्थाची जबाबदारी एका साहाय्यकावर सोपवत असे. स्वयंपाक करताना आचार्‍यांशिवाय इतर कोणालाही मुदपाकखान्यात प्रवेश नसे. आचार्‍यांनी घातलेल्या अंगरख्याच्या बाह्या दुमडलेल्या असाव्यात, नाकातोंडावर रुमाल बांधलेला असावा असे नियम होते. तयार केलेल्या पदार्थाची चव आधी बकावल बघत असे. त्यानंतर मीर बकावल व पदार्थांची चव घेण्यासाठी नेमलेला सेवक तो पदार्थ चाखून बघत. अकबर व त्याच्या राण्यांसाठी तयार होणारे अन्नपदार्थ तांब्यासोन्याचांदीच्या आणि चिनीमातीच्या ताटांमधून वाढले जात. मीर बकावल सोन्याच्या आणि चांदीच्या ताटल्या लाल फडक्यांत आणि तांब्याच्या व चिनी मातीच्या ताटल्या पांढर्‍या फडक्यांत व्यवस्थित बांधत असे. मग त्यांच्यावर त्या पदार्थाचं नाव लिहून लाखेचं सील लावलं जाई. राजवाड्यात किती ताटल्या पाठवल्या व त्या पदार्थांची नावं एका खास वहीत लिहून घेतली जात. त्यावर मीर बकावल दोन साक्षीदारांसमोर सही करत असे. मग बकावल व मुदपाकखान्यातले इतर सेवक ती ताटं राजवाड्यात घेऊन जात. या लवाजम्यासमोर व मागे सशस्त्र सैनिक असत. मीर बकावलाची सही असलेल्या भांड्यांमधून त्याचवेळी रोट्या, पोळ्या, लोणची, दही आणि आल्याचा कीस येत असे. या पदार्थांवरची आच्छादनं उघडून परत त्यांची चव घेतली जाई. त्यानंतर जमिनीवर उंची गालिचे अंथरून त्यावर ही ताटं मांडली जात. या खास गालिच्यांना दस्तरख्वान असं म्हणत. अकबर रोज एकटाच जेवत असे. फक्त सणासुदीच्या दिवशी दरबारातल्या निवडक मंडळींबरोबर तो जेवे. अकबर जेवयाला सुरुवात करी तेव्हा सर्व सेवक त्याच्यासमोर उभे राहत. जेवणाआधी काही भाग गोरगरिबांसाठी बाजूला काढला जाई. अकबर सर्वांत पहिले एक वाटीभर दही खाई. मग पुलाव आणि नंतर रोटी. जेवणानंतर हात धुतल्याक्षणी बादशाहला विडा लागे. अकरा पानांचा एक विडा असे. ही पानं गुलाबपाण्यात बुडवून ठेवलेली असत. चुन्यात केशर मिसळत, आणि सुपारीही गुलाबपाण्यात बुडवून मऊ केलेली असे. त्यानंतर अकबर अर्धा तास प्रार्थना करत असे. त्याच्या प्रार्थनेत व्यत्यय न येऊ देता सर्व ताटं शांतपणे परत मुदपाकखान्यात नेली जात. हीच पद्धत राजवाड्यातल्या इतर सदस्यांना जेवण वाढताना पाळली जाई.

अकबराच्या मुदपाकखान्यातले खानसामे बादशाहासमोर पदार्थ ठेवताना मोठ्या गमती करत. एकदा अकबरानं समोरच्या ताटावरील मखमली रुमाल दूर केला तर आता शुभ्र टपोर्‍या मोत्यांचा कंठा. त्यानं तो कंठा उचलण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो कंठा म्हणजे प्रत्यक्षात पनीरची एक मिठाई होती. कधी कोंबडीच्या एखाद्या पदार्थाला फळांचा आकार दिला असे. कधी मेंढीचं मांस हिरेमोत्यांच्या आकारात असे. एकदा बादशाहाकडे आलेल्या एका जेसुइट पाहुण्यानं ताटातली टम्म फुगलेली पुरी बोटानं फोडली तर त्यातून म्हणे एक चिमणी बाहेर पडली आणि उडून गेली. रोजचं दही सात रंगांत असे. केशर, हळद, पालक यांच्यापासून तयार केलेले रंग तूपात घातले जात. कापूर, गुलाबाच्या पाकळ्या, बडीशेप, संत्र्याची पानं घालून पाणी सुगंधी करत. अनेक पदार्थांमध्ये सोन्याचांदीच्या तारा किंवा मोत्यांचं चूर्ण घालत. मिठायांना अस्सल सोन्याचा वर्ख असे.

मुदपाकखान्यात तीन प्रकारचे पदार्थ बनत. शाकाहारी पदार्थांना (सूफी संत शाकाहारी होते, म्हणून) सूफियाना म्हणत. दुसर्‍या प्रकारात भात आणि मांसाचा वापर होई, तर काही पदार्थ फक्त मांस वापरून केले जात. अबुल फझलनं ऐन - इ - अकबरीत या तिन्ही प्रकारच्या पदार्थांसाठी लागणार्‍या साहित्याची एक भलीमोठी यादी दिली आहे. उदाहरणार्थ, चार व्यक्तींसाठीच्या झर्द बिरिन्ज, म्हणजे झाफरानी पुलावासाठी दहा शेर तांदूळ, पाच शेर खडीसाखर, साडेतीन शेर तूप, पिस्ते, बदाम, किसमिस अर्धा शेर प्रत्येकी, पाव शेर मीठ, पाव शेर आलं, दीड मिस्काल केशर, तीन मिस्काल (एक मिस्काल = ४.६००३ ग्रॅम) दालचिनी एवढं साहित्य लागेल. खुश्खा, शिरीबिरिन्ज, पाहित (म्हणजे हल्लीची दाल फ्राय), चिख्खी, साग, हलवा या शाकाहारी पदार्थांसाठीचं साहित्य व प्रमाण अबुल फझलनं दिलं आहे. कुबुली (मांस व चणे घालून केलेला पुलाव), दझ्दबिर्यान, कीमा पुलाव, शुल्लाबिर्यान, कीमा शोर्बा, हलीम, कुतब ('ज्याला हिंदू लोक संबुसा असं म्हणतात'), याखनी, सीगकबाब, दमपुख्त, दुपियाझा असे अनेक पदार्थ राजवाड्यात रोज रांधले जात. हे सर्व पदार्थ बदामाच्या, अक्रोडाच्या किंवा द्राक्षाच्या बियांच्या तेलात बनत असत. पोळ्या करायलाही बदामाचं तेल वापरत. तव्यावर भाजलेल्या या पोळ्यांना चपाती किंवा तनक तबकी म्हणत. रोट्यांना बुजुर्ग तनुरी म्हणत.

पुलाव आणि बिर्यानवरून आठवलं. बिर्याणी हा खास उत्तर हिंदुस्थानी पदार्थ असून तो भारतात मुघल राज्यकर्त्यांनी आणला, असा अनेकांचा समज आहे. पण तो फारसा बरोबर नाही. बिर्याणी हा दक्षिण भारतातला खास पदार्थ, आणि बाबरच काय, पण तैमुरलंग भारतात येण्यापूर्वीपासून भारतात बिर्याणी केली जात असे. दह्यात मुरवलेलं मांस, मसाले घालून शिजवलेला भात, म्हणजे मांसोदन आणि पल्लाव, म्हणजे पुलाव हे दोन पदार्थ अगदी रामायणातसुद्धा सापडतात. भारतावर मुघल आक्रमण झालं त्याच्या कितीतरी आधीपासून आपले पर्शियाशी, मध्यपूर्व आशियातील देशाशी व्यापारी संबंध होते. आपला भारतीय पल्लाव या व्यापार्‍यांनी तिकडे नेला, आणि तो पिलाफ, पुलाव, पिलाव या नावानं ओळखला जाऊ लागला. बिर्याणी हा शब्दही या व्यापार्‍यांनीच भारतात प्रचलित केला. बिरिन्ज म्हणजे पर्शियनमध्ये भात. फिरतीवर असताना एका मोठ्या भांड्यात मांस आणि भात शिजवणं व्यापार्‍यांना आणि सैनिकांना सोयीचं ठरे. भारतातला मांसोदन मग या व्यापार्‍यांनी आपल्याबरोबर नेला आणि (बिरिन्जवरून) बिर्यान / बिर्याणी या नावानं भारतात परत आणला. बिर्याणीबरोबर रायते वाढण्याची पद्धतही दक्षिण भारतीय. रायते हा मूळ कन्नड शब्द. बिर्याणीचा तिखटपणा कमी करण्यासाठी जोडीला रायते असे. हे रायते उत्तर भारतात गेले, आणि दह्यातल्या काकडीची जागा बुंदी, पुदिना आणि अननसानं घेतली. आजही उत्तर भारतापेक्षा दक्षिणेत बिर्याणी अधिक लोकप्रिय आहे. बिर्याणीचे प्रकारही दक्षिणेतच अधिक सपाडतात. आंध्र प्रदेश, तामिळ नाडू, केरळ या राज्यांमध्ये अनेक प्रकारच्या बिर्याण्या केल्या जातात. शिवाय बोहरा, खोजा, मेमन या समुदायांतील बिर्याण्या वेगळ्या.

कबाब, कोर्मा, शोरबा हे पदार्थही आपल्याकडे मुघल राज्यकर्ते येण्यापूर्वीपासून होते. त्यांची पर्शियन नावं आपण स्वीकारली. पाककृतींत मात्र अगदी छोटे बदल झाले. मुघलांना हिंग आणि लसूण वर्ज्य. हे पदार्थ खाल्ले की घामाला उग्र वास येतो, असं त्यांचं म्हणणं होतं. मसाले आपण वापरत होतोच, त्यांची वेगवेगळ्या प्रमाणात पूड करून वापरायला मुघलांनी सुरुवात केली. बदाम, पिस्ते, अक्रोड रोजच्या पदार्थांमध्ये वापरले जाऊ लागले. पदार्थ देखणा कसा करता येईल, याकडे लक्ष द्यायला सुरुवात झाली. हे सारे बदल अकबराच्या कारकिर्दीत झाले.

अकबरानं फळांच्या लागवडीला भरपूर उत्तेजन दिलं. फळांच्या उत्पादनावर कर आकारला जात नसे. इथल्या शेतकर्‍यांना द्राक्षांची लागवड कशी करायची, हे शिकवायला त्यानं पर्शियातून तज्ज्ञ आणले होते. काबुल, कंदहार, काश्मीर या ठिकाणांहून अकबरासाठी टरबुज आणि द्राक्ष ही फळं आणली जात. काश्मीरात आठ शेर द्राक्षांची किंमत एक दाम होती, आणि एक मण द्राक्षांच्या वाहतुकीचा खर्च होता दोन रुपये. याशिवाय आंबे, अननस, संत्री, फणस, नारळ ही फळं अकबराला आवडत. अकबराच्या कारकिर्दीत अनेक प्रकारची फळं बाजारात मिळू लागली. उन्हाळ्यात साखरेच्या पाकात मुरवलेली फळं विकायला ठेवलेली असत. या फळांना मुर्रब म्हणत.

अकबराचा आहार फारसा नव्हता, असं अबुल फझल लिहितो. अर्थात तरीही अकबरासाठी रोज कमीत कमीत चाळीस पदार्थ तयार होत. हिंदू व पारशी धर्माच्या प्रभावामुळे अकबर अनेक उपास करत असे. प्रत्येक महिन्याचा पहिला दिवस, प्रत्येक शुक्रवार, रविवार व सोमवार, नवरोझ या दिवशी अकबराचा उपास असे. शिवाय संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात अकबर उपास करत असे. उपासाच्या दिवशी अकबर मांसाहार व मद्यपान करत नसे. भाज्या घातलेला पुलाव, बिर्याण्या, कणकेचा शिरा, सरबतं, कुल्फी असा त्याचा उपासाचा फराळ असे. हिंदू धर्माच्या प्रभावामुळे त्यानं गोहत्येवरही बंदी घातली. यामुळे व अकबराच्या उपासांमुळे त्याचे सरदार आणि सल्लागार, नातेवाईक नाराज होते. पारशी धर्मगुरू दस्तुर मेहरजी राणा अकबराला धार्मिक बाबतींत सल्ला द्यायचे. यावेळीही अकबरानं दस्तुर मेहरजी राणांचा सल्ला घेतला होता. "जहाँपनाह, आपण उपवास करता ते अगदी योग्य आहे. मांसाहारही क्वचित करता, हेही अगदी योग्य. अन्नाप्रती दाखवलेल्या या आदरामुळे आपलं कर्तृत्व अधिकच झळाळून उठणार आहे, याची खात्री बाळगावी. आपल्यासारख्या कर्तृत्वशाली बादशाहानं असंच वागणं योग्य आहे", दस्तुरांनी अकबराला सांगितलं होतं.

अकबरानं उपास करायला सुरुवात केल्यावर त्याचं मद्यपानही खूप कमी झालं. भांग मात्र त्यानं आयुष्यभर सोडली नाही. मद्यपान करताना किंवा भांगेची नशा करताना अकबराला फळं खायला आवडत. त्याच्यासमोर फळांची ताटं ठेवली जात. या फळांना बाहेरून सोन्याचांदीचा वर्ख लावलेला असे. क्वचित फळांची सरबतं तो मद्यात मिसळत असे. अकबराचं मद्यपान अतिशय मर्यादित होतं, आणि इतरांनीही प्रमाणाबाहेर मद्यपान करू नये, असं त्याला वाटत असे. मुराद आणि दानिआल ही त्याची दोन मुलं अतिरिक्त मद्यपानामुळे मरण पावली होती, आणि तेव्हापासून आपल्या प्रजेनं मद्यपान करू नये, यासाठी त्याचे प्रयत्न सुरू झाले. इस्लाममध्ये मद्यपानास परवानगी नाही, तुम्ही चांगले मुसलमान असाल, तर मद्यपान करू नका, असं तो लोकांना सांगत असे. राजवाड्यात मद्यपान होत असलं, मद्य तयार केलं जात असलं तरी प्रजाजनांसाठी मद्याच्या विक्रीवर त्यानं बंदी घातली होती. मात्र मद्यपानावर बंदी असली तरी लोक लपूनछपून दारू पितातच, हे त्याच्या लक्षात आलं. किंबहुना मद्यपानावर बंदी घातल्यावर दारुबाजांचं प्रमाण वाढल्याचं आढळल्यावर अकबरानं स्वत:च फतेहपूर सिक्रीला दारूचं दुकान उघडलं. या दुकानात कमी किमतीत दारू मिळत असे. मात्र या दारूचा उपयोग फक्त औषध म्हणूनच करण्याची अट होती. दारू विकत घेण्याआधी दुकानदाराकडे आपलं नाव, वडिलांचं आणि आजोबांचं नाव, घराचा पत्ता असं सगळं लिहून देणं सक्तीचं होतं. मात्र लोक सर्रास खोटी नावं लिहून देत. हे दुकान सुरू झालं आणि लोकांची आजारपणं भलतीच वाढली. या दारूत डुकराचं मांस घालतात, अशीही अफवा नंतर पसरली. बरीच काळजी घेऊनसुद्धा औषधासाठीच असलेली ही दारू घेऊन लोक रस्त्यात झिंगून पडत, किंवा हाणामारी करत. मग या सर्वांना शिक्षा केली जाई. पण या शिक्षेचा उपयोग शून्य. दुसर्‍या दिवशी परत रस्त्यांवर मारामार्‍या ठरलेल्या. अकबरानं स्वस्त दारूचं दुकान उघडणं, ही एक फार मोठी गोष्ट होती. त्यानं लपूनछपून दारू पिणार्‍यांवर, दारूच्या व्यसनात पार बुडालेल्यांना शोधून काढलंच, शिवाय त्यांनी दारूच्या व्यसनापासून दूर राहावं म्हणून प्रयत्नही केले.

खरं म्हणजे अकबराचं संपूर्ण घराणंच मद्यपानाचं व मांसाहाराचं विलक्षण चाहतं. मध्य आशियातल्या थंड प्रदेशातून आल्यामुळे मद्य व मांस मुघलांच्या जीवनाचे अविभाज्य भाग होते. शिवाय मद्य व मांस हे पुरुषार्थ गाजवण्यासाठी आवश्यक, असा समज होता. मांसाहारामुळे ताकद येते, शौर्य गाजवता येतं, असं हकीम सांगत. सततच्या लढाया आणि भलामोठा जनानखाना यामुळे या ताकदीची आवश्यकता सर्वांनाच सतत भासे. त्यामुळे दारू आणि मांसाहार यांबाबत कोणतीही कंजुषी केली जात नसे. असं असलं तरीही या दोन्ही गोष्टींच्या आहारी न जाणं अकबराला शक्य झालं. बाबराला मात्र हे असलं काही जमलं नाही.

humayun-and-babur.jpg

हुमायूं व बाबर

बाबर हा दिल्लीचा पहिला मुघल बादशाह. वडिलांकडून तो तैमुरलंगाचा पाचवा वंशज आणि आईकडून तो चंगीझखानाचा वारस होता. त्याचा जन्म सध्याच्या कझाकस्तानातल्या फरघना इथे झाला. तो अकरा वर्षांचा असतानाच त्याचे वडील वारले आणि तो फरघना प्रांताचा राजा झाला. पुढे मध्य आशियात साम्राज्यविस्ताराच्या आकांक्षेमुळे त्यानं दोनदा समरकंद जिंकलं, पण दोन्ही वेळा त्याला ते गमवावं लागलं. या प्रयत्नांत फरघनाही हातचं गेलं, आणि त्याने आपला मोर्चा अफगाणिस्तानाकडे वळवला. काबुल जिंकल्यावर त्यानं भारतावर स्वारी केली. पाचव्या प्रयत्नात त्यानं पानिपतला इब्राहिमखान लोधीचा पराभव केला आणि दिल्लीचं तख्त मिळवलं. बाबर अत्यंत बुद्धिवान, रसिक आणि मुत्सद्दी होता. तो कट्टर सुन्नी मुसलमान असला तरी धर्मवेडा नव्हता. कोणात्याही धर्मात हस्तक्षेप न करण्याचा आदेश त्यानं आपल्या सरदारांना आणि हुमायूंला दिला होता. तो निसर्गप्रेमी होता. विद्वान आणि कलेचा भोक्ता होता. तो उत्कृष्ट सुलेखनकार होता. तुर्की आणि फार्सी भाषांमध्ये त्यानं कविता केल्या होत्या. तुझक - इ - बाबरी अर्थात बाबरनामा हे आत्मचरित्रही त्यानं तुर्की भाषेत लिहिलं.

बाबर हिंदुस्थानात कायमचा राहिला तरी त्याला हा देश फारसा आवडला नव्हता. आपल्या आत्मचरित्रात तो लिहितो - 'हिंदुस्थानात मनाला भुरळ घालतील अशी सुखं फार कमी. माणसं दिसायला कुरुप. या लोकांना मित्रांच्या संगतीत मजा कशी करायची ते कळत नाही. या लोकांकडे बुद्धी नाही, आकलनशक्ती अतिशय कमी, व्यवहारांत सभ्यता नाही, आणि वागण्यात सहानुभूती आणि दया नाही. यांच्यात हस्तकौशल्याचा आणि संशोधकवृत्तीचा अभाव आहे. इथल्या लोकांकडे सौंदर्यदृष्टी नाही. इमारती ओबडधोबड आहेत. रस्ते वाईट, नद्यांमध्ये वाहतं पाणी नाही. हिंदुस्थानात चांगले घोडे नाहीत, तोंडाला पाणी सुटेल असं उत्तम मांस नाही, द्राक्षं नाहीत आणि सुवासिक, गोड खरबुजं नाहीत. हिंदुस्थानात अजिबातच चांगली फळं नाहीत. बर्फाचं थंडगार पाणी नाही. बाजारात चांगले अन्नपदार्थ मिळत नाहीत. इथे स्नानगृहं नाहीत, शाळा नाहीत, मेणबत्त्या नाहीत. इतकंच काय, पण मेणबत्त्या ठेवण्याची घरंही यांना माहीत नाहीत.

मग तरी बाबर भारतात का राहिला? तो लिहितो - ’हिंदुस्थानाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो फार मोठा देश आहे. हा देश सोन्याचांदीनं भरला आहे. इथे हिरेमाणकं अमाप आहेत. आजवर मी आकारानं इतके मोठे हिरे कुठे पाहिले नव्हते. दुसरं म्हणजे इथली लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे इथे कामांसाठी, धंद्यांमध्ये नोकर भरपूर मिळतात. शिवाय ते फार पैसेही घेत नाहीत. व्यवसाय करणारे लोकही इथे खूप आहेत. बापजाद्यांच्या काळापासून शेकडो वर्षं एकच धंदा करणारी असंख्य घराणी इथे आहेत. पण हे लोक अल्पसंतुष्ट असल्यानं यांच्या धंद्यांचा उपयोग आम्ही करून घेऊ शकतो’.

दिल्लीची सत्ता मिळवल्यानंतर बाबरावर इब्राहिम लोधीच्या आईनं विषप्रयोग केला. बाबराच्या पदरी हिंदुस्थानी खानसामे असल्याची खबर तिला लागली. या आचार्‍यांच्या मदतीनं बाबराच्या पुलावात तिनं विष मिसळलं. अर्थात बाबराला लगेच उलटी झाल्यानं हे विष फारसं बाधलं नाही, पण त्यानं आयुष्यात त्यानंतर हिंदुस्थान्यांना फारसं जवळ केलं नाही.

हिंदुस्थानात राहण्याचा निर्णय पक्का झाल्यावर बाबरानं आपली आवडती फळं मध्य आशियातून आणवली. भारतात पर्शियातून द्राक्षं फार पूर्वीच आली होती. या द्राक्षांची मोठ्या प्रमाणात बाबरानं लागवड केली. समरकंदाहून उत्तम टरबुजं आली. शिवाय अंजीर, बदाम, पिस्ते, अक्रोड यांची आयातही मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली. एवढं असलं तरी बाबराला कायम फरघना, समरकंद यांची आठवण येत असे. तो लिहितो - 'बुखारा हा समरकंदमधला सर्वांत मोठा प्रांत आहे. इथे उत्कृष्ट प्रतीची फळं तयार होतात. खरबुजं तर इतक्या प्रकारची आणि इतकी गोड असतात की त्यांची तुलना इतर कुठल्याच प्रांतात पिकणार्‍या खरबुजांशी करता येणार नाही. फरघना प्रांतातल्या अक्षी नावाच्या गावात पिकणारी खरबुजं खूप गोड आणि नाजूक असतात, तरी बुखार्‍यातल्या खरबुजांची त्यांना सर नाही. बुखार्‍यातले मनुकेही प्रसिद्ध आहेत. सारक म्हणून या मनुकांचा उपयोग होतो. इथल्या पाळीव कोंबड्या आणि बदकं सुरेख चवीची आहेत. पण सगळ्यांत उत्तम काय असेल तर इथलं मद्य. समरकंदला असताना प्रत्येक मैफिलीत मी बुखार्‍याचंच मद्य आणायला सांगत असे. इथलं हवामान सुखद आहे. देश सुंदर, पाणी मुबलक, खाद्यपदार्थ स्वस्त. मिस्र आणि सीरियात प्रवास करून आलेले लोक मान्य करतात की समरकंदची बरोबरी करणारा प्रदेश जगात अस्तित्वात नाही'.

भारतात बाबराला फारसं करमलं नसलं तरी अफगाणिस्तानात मात्र त्याने बरीच चैन केली. मित्रांबरोबर शिकारीला जाणं, मेजवान्यांमध्ये रमणं यांत त्याचा बराच वेळ गेला. काबुललाही त्यानं उसाची व टरबुजांची लागवड केली होती. शिवाय आपल्या सेवकांना त्यानं तिथे उत्कृष्ट मद्य तयार करण्याचं प्रशिक्षणही दिलं. तसं पाहिलं तर बाबरानेही वयाच्या एकोणतिसाव्या वर्षापर्यंत दारूला स्पर्श केला नव्हता. तो लिहितो - ’माझ्या लहानपणी दारू प्यावी, असं मला कधीच वाटलं नाही. तशी इच्छाच कधी झाली नाही. दारू प्यायल्यावर होणार्‍या सुखाची अनुभूती मी कधी घेतलीच नव्हती. माझे वडील कधीतरी माझ्यासमोर दारूचा चषक ठेवायचे, पण मी त्यांना कायम नकार द्यायचो. वडिलांच्या मृत्यूनंतर काही काळ दारूला स्पर्श करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. नंतर तारुण्यात प्रवेश केल्यावर स्त्रियांच्या, मित्रांच्या सहवासात मद्यपान करण्याची इच्छा होत असे. पण मी दारू पीत नाही, हे ठाऊक असल्यानं कोणी मला मद्यपानाबद्दल विचारतच नसे. त्यांना स्वत:हून दारू मागणं शक्य होतं, पण माझा स्वभाव संकोची असल्यानं मी कधी स्वत:हून दारू मागितली नाही’. पुढे अफगाणिस्तानातल्या हेरात शहरात त्याच्या काही सरदारांनी त्याला मद्यपान करण्याविषयी विचारलं, आणि बाबरानं मद्याचा पहिला घोट घेतला. ’मी विचार केला, सरदार स्वत:हून आपल्याला मद्यपानाचा आग्रह करत आहेत, आणि हेरातसारख्या सुंदर शहरात आपण आहोत. इथे सुंदर स्त्रिया, अप्रतिम देखणा निसर्ग, मनोरंजनाची सर्व साधनं आहेत. आता मद्यपान केलं नाही, तर मग कधी करणार?’ बाबरानं अफगाणिस्तानातला जास्तीत जास्त वेळ उत्कृष्ट द्राक्षांपासून बनवलेल्या मद्यांसमवेत घालवला. रोजच पार्ट्या असत, आणि बाबराच्या बहुतेक सर्व वेळ मौजमजा करण्यात जाई. एका पार्टीचं वर्णन करताना बाबर लिहितो - ’दुपारी आम्ही नौकेत बसून निघालो. नौकेत उत्तम मद्यं होती. रात्रीपर्यंत मद्यपान सुरूच होतं. रात्री उशिरा नौका किनार्‍याला लागली तेव्हा आमची शुद्ध हरपण्याच्या बेतात होती. सर्वांनाच दारू भलतीच चढली होती. किनार्‍यावर चाकर घोडे घेऊन आमची वाट बघत होते. मी हाती मशाल घेऊन घोड्यावर स्वार झालो, आणि छावणीकडे जायला निघालो. काही वेळानंतर मला घोड्यावर बसायचा कंटाळा आला, म्हणून खाली उतरलो आणि एका हातात घोड्याचा लगाम व दुसर्‍या हाती मशाल घेऊन पायी चालायला सुरुवात केली. मग पायी चालायचा कंटाळा आल्यावर घोड्याला घेऊन धावायला सुरुवात केली. दुसर्‍या दिवशी दुपारी झोपेतून उठ्ल्यावर माझ्या सेवकांनी सांगितलं की मध्यरात्री मी धावत छावणीत आलो होतो. एका हाती मशाल होती आणि दुसर्‍या हाती लगाम. पण घोडा गायब झाला होता. मी बहुतेक मद्यधुंद अवस्थेत घोड्याला मोकळं सोडलं असावं. मला काहीच आठवत नव्हतं. मात्र बिछान्यात शिरण्यापूर्वी मी उलटी केली, हे लक्षात होतं.’

आपल्या आत्मचरित्रात बाबरानं दारू पिण्यात घालवलेल्या अनेक रात्रींची वर्णनं केली आहेत. या मैफिलींमध्ये बरेचदा कविताही केल्या व ऐकवल्या जात. एकदा काबुलला असताना बाबरानं एक स्पर्धा आयोजित केली. तुर्की भाषेत कविता रचणार्‍या प्रत्येकाला दारूचा एकेक बुधला देण्याचं त्यानं जाहीर केलं. आपल्या कवितांच्या चोपड्या घेऊन कवींनी बाबरासमोर रांगच लावली. बाबरानं त्या रात्री शेकडो बुधले दारू वाटली. आपण जरा जास्तच मद्यपान करतो, हे लक्षात आल्यामुळे असेल कदाचित, बाबरानं वयाच्या चाळीसाव्या वर्षी दारू पिणं सोडायचं, असं ठरवलं. चाळीशी गाठायला फक्त एक वर्ष शिल्लक आहे, हे त्याच्या लक्षात असल्यानं त्यानं दुप्पट जोमाने दारू प्यायला सुरुवात केली, आणि पुढे तो आपला हा निश्चयही विसरला. चाळीसावा वाढदिवस उलटून गेल्यावरही त्याचं मद्यपान सुरूच राहिलं. राणा संगाला हरवल्यानंतर मात्र त्याने खरोखरंच मद्यपान सोडलं. आपली तब्येत खालावते आहे, याची त्याला जाणीव झाली होती. आपण इतकी दारू प्यायलो नसतो, तर नक्कीच जास्त जगलो असतो, या विचारानं तो अनेकदा खंतावत असे.

मरेपर्यंत बाबर हिंदुस्थानाबद्दल नावड बाळगून राहिला. इथले लोक, इथलं पाणी, इथलं अन्न, इथली फळं, यांपैकी त्याला काहीच आवडलं नाही. अगदी इथले आंबेसुद्धा नाहीत. नाही म्हणायला इथल्या माशांबद्दल आणि संत्र्यांबद्दल त्यानं जरा प्रेमानं लिहिलंय. हिंदुस्थानाबद्दल आपुलकी असणारा पहिला मुघल बादशाह म्हणजे अकबर. अकबरानं हिंदुस्थानातल्या धर्मांबद्दल द्वेषभावना बाळगली नाही. हिंदू व ख्रिस्ती धर्माप्रमाणेच त्यानं पारशी जीवनपद्धतीचाही अभ्यास केला. आपल्या प्रजेला धार्मिक स्वातंत्र्य दिलं. अर्थात हे श्रेय अबुल फझलचं आणि म्हणूनच खुस्रोचं. खुस्रोच्या प्रजाजनांच्या नशिबी मात्र धार्मिक स्वातंत्र्य नव्हतं.

खुस्रोच्या मृत्यूनंतर दोन शतकांनी पर्शियावर अरबांनी आक्रमण केलं. प्राण वाचवायचे असतील तर धर्मांतर करणं भाग होतं. अनेकांनी धर्मांतराला विरोध करून पाहिला, पण त्यांना फासावर लटकवलं गेलं. शांतताप्रिय झोराष्ट्रीय नाइलाजानं इस्लाम स्वीकारते झाले. मात्र कसाबसा आपला जीव वाचवलेले काही धर्म टिकवण्यासाठी भारतात यायला निघाले. आपल्या देशातून पळ काढण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. भारतात आपल्यावर धार्मिक अत्याचार होणार नाहीत, याची या मंडळींना खात्री होती. जहाजात बसताना त्यांच्यातल्या एका धर्मगुरूनं एका कागदावर एक कविता लिहून तिथल्या मातीत पुरून ठेवली. त्या कवितेत म्हटलं होतं - 'हे पंचमहाभूतांनो, आम्ही आमच्या मातृभूमीचा निरोप घेत आहोत. तिला सांगा की, तिच्यावर आम्ही प्रेम करत राहू. तिचं नाव या जगात कायम दुमदुमत राहील, याची आम्ही काळजी घेऊ. तिनं आम्हांला दिलेल्या अन्नामुळे आम्ही तिला संपन्न करू शकलो. तिनं दिलेल्या अन्नाच्या सामर्थ्यावरच यापुढेही आम्ही कर्तृत्व गाजवू. आम्ही आता भारतात जात आहोत. तिथेही आम्ही नंदनवन निर्माण करू'.

खुस्रोच्या पार्समधून पळून आलेले पारसी गुजरातच्या जाधव राणाच्या परवानगीनंतर दुधातल्या साखरेप्रमाणे भारतात मिसळले. इथली भाषा, संस्कृती, पोशाख यांना आपलंसं केलं. या भूमीलाच आपलं मानून इथे शेती आणि इतर उद्योग सुरू केले. पुढे भारतावर मुघलांनी आक्रमण केल्यानंतरही त्यांनी आपली वेगळी धार्मिक ओळख कायम ठेवली. भारतातही त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती केली गेली, पण या आक्रमणालाही त्यांनी निग्रहानं तोंड दिलं, आणि आपली संपूर्ण शक्ती आपल्या समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी पणाला लावली.

tmpt1.jpg

अठराव्या व एकोणिसाव्या शतकात पारशांच्या कर्तृत्वाला विशेष धुमारे फुटले. सोहराबजी मंचरजी, अर्देशीर दादी, सर जमशेदजी जिजिभॉय यांसारख्या अनेक मान्यवरांनी भारताच्या प्रगतीस हातभार लावला. श्री. जमशेदजी टाटा हे नावही नंतर या सन्माननीय यादीत आलं. जमशेदजींनी भारतीय उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली असली तरी टाटांचं घराणं हे पुजार्‍यांचं. जमशेदजी या घराण्यातले पहिले उद्योगपती. जमशेदजींनी भारताला स्वयंपूर्ण करण्याचं स्वप्न पाहिलं आणि टाटा ग्रूपनं त्यासाठी कायम प्रयत्न केले. या प्रयत्नांतूनच द ताज महाल हॉटेल जमशेदजींनी सुरू केलं. जमशेदजींना केवळ गोर्‍यांसाठी असलेल्या वॉटसन हॉटेलात प्रवेश नाकारला म्हणून चिडून त्यांनी हे हॉटेल बांधलं, असं म्हटलं जातं. पण ते बरोबर नाही. मुंबईतलं सर्वोत्कृष्ट हॉटेल आपल्या मालकीचं असावं अशी टाटांची इच्छा होती, आणि त्यातूनच ताजचा जन्म झाला. श्री. सीताराम खंडेराव वैद्य आणि श्री. डी. एन. मिर्झा या दोन स्थापत्यविशारदांनी एकत्र येऊन या हॉटेलाचा आराखडा तयार केला होता. बांधकामाची जबाबदारीही या दोघांनीच सांभाळली होती. त्या काळी हे हॉटेल बांधायला चार कोटी रुपयांचा खर्च आला होता.

जमशेदजींनी हे हॉटेल भव्य व्हावं, यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. आयफेल टॉवर बांधण्यासाठी वापरलेलं लोखंडच जमशेदजींनी ताजचा तो प्रसिद्ध घुमट बांधण्यासाठी आयात केलं होतं. जगभरातून विकत घेतलेली शेकडो चित्रं हॉटेलात होती. विजेचे दिवे असलेली ही मुंबईतली पहिली इमारत. शिवाय वाफेवर चालणारी एलेव्हेटर वापरणारं हे पहिलं भारतीय हॉटेल. १९०३ साली ताजचं उद्घाटन झालं. दहा वर्षांनंतर ताजसमोर गेटवे ऑफ इंडियाची वास्तू उभी राहिली.

पहिल्या दिवसापासून ताजवर लोकांनी मनापासून प्रेम केलं. टाटांनीही ताजच्या माध्यमातून समाजाला मदत केली. पहिल्या महायुद्धाच्या काळात सर्वच्या सर्व खोल्यांचं रूपांतर हॉस्पितलात करण्यात आलं होतं. तसंच ताजच्या उत्पन्नाचा साठ टक्के हिस्सा समाजोपयोगी कार्यांसाठी खर्च करण्यास जमशेदजींनी सुरुवात केली होती. ही प्रथा आजतागायत पाळली जाते. २६ नोव्हेंबराच्या हल्ल्यानंतरही टाटांनी अनेकांना मदतीचा हात दिला. हल्ल्यात मरण पावलेल्या ताजच्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना त्यांचा पगार कायम मिळत राहणार आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला टाटा ग्रूपच्या कंपन्यांमध्ये नोकरी दिली गेली आहे. याशिवाय टाटा ट्रस्टच्या मार्फत त्या हल्ल्यात इतरत्र जखमी झालेल्यांच्या उपचारांचा पूर्ण खर्च केला गेला. अनेकांना नोकर्‍या दिल्या गेल्या. हल्ल्यानंतर दीड महिन्यात ताज पूर्ववत सुरू झालं. हॉटेल बंद होतं त्या काळात ताजच्या एकाही कर्मचार्‍यानं सुट्टी घेतली नाही. शेकडो कोटींचं नुकसान होऊनही एकाही कर्मचार्‍याला कामावरून कमी करण्यात आलं नाही.

दोन वर्षांपूर्वीचे आघात पचवून ताज परत दिमाखात उभं आहे. त्या रात्रीच्या भयंकर आठवणींचा सुचित्रेला होणारा त्रास आता बराच कमी झाला आहे. कधीमधी भीती वाटलीच तर ती डोळ्यांसमोर करमबीर कांगांचा किंवा 'डोण्ट वरी मॅडम, वी आर ऑल हिअर टू हेल्प यू' म्हणणार्‍या कॅप्टनचा चेहरा डोळ्यासमोर आणते. मग तिला बरं वाटतं. ताज परत सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी ती तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर ताजला गेली. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. त्या दिवशी तिच्यासारखेच अनेक तिथे होते. नुसती झुंबड उडाली होती. दारात करमबीर कांग प्रत्येकाचं स्वागत करत होते. ताजला जात राहणं ही सुचित्राची आता गरज बनली आहे. ताजला गेलं की तिला शक्ती मिळते. पुढचा बराच काळ तिला कसलीच भीती वाटत नाही. सुचित्रेसारखेच इतर असंख्य आहेत. स्वतःसाठी, मित्रांसाठी, प्रियजनांसाठी ताजला जाणारे. तिथला लखलखाट, तिथले कर्मचारी माणसातल्या चांगुलपणाबद्दल खात्री निर्माण करतात. संकटं येतच असतात. त्यांना तोंड द्यायचं, पुन्हा उभं राहायचं, हे शिकवतात. अनेकजण करमबीर कांगांना मुद्दाम भेटतात. काही न बोलता हस्तांदोलन करून परत जातात. त्या स्पर्शातून त्यांना दु:ख सहन करण्याची ताकद मिळते. जगात वाइटापेक्षा चांगलंच खूप आहे, हे तो स्पर्श त्यांना सांगून जातो. दोन वर्षं झाली तरी ताजच्या सहाव्या मजल्यावर जाण्याचं धैर्य मात्र करमबीर कांगांना अजून झालेलं नाही.

****

श्री. वीर संघवी, श्रीमती सलमा हुसेन (आयटीसी - वेलकम ग्रूप), श्री. प्रणव दीक्षित (हिन्दुस्तान टाइम्स ब्रन्च), श्रीमती प्रीती ललवानी ( द ताज महाल हॉटेल अ‍ॅन्ड टॉवर्स, मुंबई) यांना मनःपूर्वक धन्यवाद.

***

टिपा -

१. सॉरी, यू पिक्ड द राँग सिटी - जेडब्ल्यूटी या संस्थेनं केलेली जाहिरात. प्रताधिकार - जेडब्ल्यूटी, मुंबई.
२. हुमायूं व बाबर - मुघल शैली, सोळावे शतक, राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली यांच्या सौजन्याने.
३. शी इज द ताज - द ताज महाल हॉटेलचं चित्र द ताज महाल हॉटेल अ‍ॅण्ड टॉवर्सच्या सौजन्याने. प्रताधिकार - द ताज महाल हॉटेल अ‍ॅण्ड टॉवर्स.
४. 'हे पंचमहाभूतांनो..' - 'किस्सा - इ - संजाना' या ग्रंथातील कवितेचा इंग्रजी अनुवादावरून केलेला स्वैर अनुवाद.

***

संदर्भ -

१. Â -in- I Akbarî by Abû L - Fazl Âllâmi - Translated from the original Persian by H. Blochmann (Calcutta Madrasa), Royal Asiatic Society of Bengal, Calcutta, 1939

२. The Akbar Nâmâ of Abu - L - Fazl - Translated from the Persian by H. Beveridge - Low price publications, Delhi, 1902

३. Âin - I - Âkbari by Abul Fazl - I - Âllami - Translated into English by Col. H. S. Jarrett, Revised and further annotated by Sir Jadunath Sarkar, Royal Asiatic Society of Bengal, 1948.

४. Babar Nama - Translated into English from Persian by Dr. H. V. S. Smithonson, Tashkent University Press, Tashkent, 1924

५. The history of India as told by its own historians - The posthumous papers of Late. Mr. H. M. Elliot, Ed. Prof. John Dawson, Susil Gupta (India) Ltd, Calcutta, 1954

६. The Parsees - Their History, manners, Customs and Religion - Mr. Dorabjee Framjee, Smith Elders & Co., London, 1858

***

स्रोत - भांडारकर प्राच्य-विद्या संशोधन मंदिर, पुणे, यांचे ग्रंथालय

***

क्रमशः

प्रकार: 

चिनुक्स, ___/\____ . फारच सुरेख आणि संशोधनात्मक लेख. बाकीचेही वाचतेय.

'रुक्मिणी स्वयंवर' या पोथीतही, तत्कालीन जेवणाचे जे विविध प्रकार होते त्यांचे साग्रसंगीत आणि सुरेख वर्णन आहे.

अन्न आणि विचार यांचा संबंध नक्कीच असतो..>>
त्याच उपनिषदामध्ये पुढे अन्नाच्या भागापासून मन कसे तयार होते ह्याविषयी विवेचन आहे.

१) उत्तम लेख नेहमीप्रमाणेच दर्जेदार.

२) करमबीर माझ्यासाठी हीरो आहेत. साधारण मनुष्य सहचर/ सहचरी गेल्यास कामात किंवा मुलाबाळांच्यात स्वतःला रमवितो. नोकरी गेल्यास घरचे सहाय्य करतात; पण त्या दिवशी करमबीरांचे सर्वस्वच नियतीने हिरावून नेले. किती असीम ते धैर्य, तो मनोनिग्रह. एक लॅपटॉप व मोबाइल एवढेच त्यांच्यापाशी उरले असे वाचले होते कारण घरातील गोष्टी, फोटो वगैरे जळाले. मी त्यांना अनेकदा पत्र लिहायचे ठरविले पण ते धैर्य अजूनही नाही. आता ते दोन वर्षे अभ्यास रजेवर आहेत असे वाचले. त्यांचे डोळे किती निर्विकार दिसतात पाहिले आहे का? मनाचा थरकाप होतो व एक असह्य संतापही येतो हे कृत्य करणार्‍यांबद्दल. आयुष्यातील काही अन्याय सहन केले नाही पाहिजेत असे वाटते.

लेखात दोन वेगवेगळे ट्रॅक्स आहेत म्हणून अभिप्रायही दोन. Happy

छान

अतिशय आवडला लेख.

अकबराच्या काळातले स्वयंपाक आणि त्याची तयारी- सगळेच अबब! थक्क करणारे प्रकार!

ताज, त्याचे कर्मचारी, करमबीर कांगा- अतिशय हृद्य लिहीले आहेस चिनूक्स!

जबरदस्त, मजा आली वाचायला!
आधी ताजबद्द्ल वाचायला लागल्यावर या लेखमालिकेने एकदम वाट का बदलली ते कळेना, पण शेवटी दोन्ही ट्रॅक छान जुळून आले आहेत.
पोळ्या करायला बदामाचे तेल>>> व्वा! याला म्हणायचे शान, थाट, राजेशाही इ.इ.

Pages