अन्नं वै प्राणा: (५)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

I am going to kill you, Rice Plate Reddy, and teach the whole world how to eat holy broccoli. Mind it. - Quick Gun Murugan

annamvai.jpg

कार्ल्याला पोहोचतो तेव्हा जेमतेम अकरा वाजलेले असतात, पण सूर्य आग ओकत असतो. त्यात स्टेशनापासूनच्या वाटेवर भरपूर गर्दी. सगळीकडे माणसांचा, गाड्यांचा कोलाहल. पायर्‍यांपाशी सगळी जमीन लालकिरमिजी झालेली असते. त्या रक्ताळलेल्या जमिनीवर चारपाच कोंबड्यांची मुंडकी पडलेली असतात. आजूबाजूला पिसांचा खच. त्यातून वाट काढत मी पायर्‍या चढायला सुरुवात करतो. पायर्‍यांवरही लोकांची तुफान गर्दी. बायका खूप नटूनथटून आलेल्या असतात. अनेक पुरुषांच्या हातात कोंबडी उलटी लटकत असतात. ही सगळी गर्दी वर असलेल्या एकविरा देवीच्या मंदीरात जाण्यासाठी असते.

लेण्यांच्या समोरच हे मंदीर. मंदीरासमोर भलीथोरली रांग. लेण्यांसमोरच्या मोकळ्या जागेतही भरपूर गर्दी. या गर्दीतही चैत्यगृह, मंडप, विहार उठून दिसतात. विहारांमधल्या मंचकांवर लोक दाटीवाटीनं बसलेले किंवा झोपलेले असतात. दुसर्‍या मजल्यावरच्या लेणीं तरी नीट पाहता येतील, म्हणून पायर्‍या चढून वर गेलो तर लघवीचा भपकारा नाकात जातो. चैत्यगृहात पोरांचा स्तुपावर नाणी टाकण्याचा खेळ सुरू असतो. चैत्यगृहातले स्तंभ, त्यावरील शिलालेख, स्तंभशीर्षावरची शिल्पं, दोन हजार वर्षं झाली तरी जसंच्या तसं टिकून असलेलं अवाढव्य लाकडी छत यांकडे कोणाचंच लक्ष नसतं. एक जपानी जोडपं या सार्‍या प्रकाराकडे हताशपणे बघत उभं असतं. पाच मिनिटांनी ते निमूटपणे तिथून चालते होतात. आम्हीही त्यांच्या मागोमाग निघतो.

भाज्याला मात्र शुकशुकाट असतो. सर्वत्र पसरलेल्या रखरखाटातही ही शांतता सुखावून जाते. कॅनव्हासवर रिकामी जागा भरून काढायला यलो ऑकर वापरतात. इथे मात्र सर्वत्र तोच रंग भरून राहिलेला, आणि त्या पार्श्वभूमीवर काळी लेणीं. बाहेर ऊन असलं तरी विहारांमध्ये गारवा असतो. आतल्या एका मंचकावर मी जाऊन असतो.

दोन हजार वर्षांपूर्वी डोंगरांतून कोरलेली ही लेणीं. भारतात सुमारे बाराशे लेणीं आहेत, महाराष्ट्रातच हजारभर असतील. त्यांपैकी ही सर्वांत प्राचीन. एका गावी फार काळ राहू नये, आणि एका घरी फक्त दोनदा भिक्षा मागावी, असे दोन नियम संघातील भिक्षूंना बुद्धानं सांगितले होते. आता एका घरी दोनदाच भिक्षा मागायची असेल, तर तसंही एका गावी फार काळ राहताच येणार नाही. त्यामुळे हे भिक्षू सतत फिरतीवर असत. पावसाळ्यात मात्र या भिक्षूंना त्रास होई. नदीनाले ओसंडून वाहत असत. त्यामुळे एका जागी अडकून पडावं लागे. यातून मार्ग काढण्यासाठी मग भिक्षू बुद्धाकडे गेले. बुद्धानं त्यांना पावसाळ्यातले चार महिने लाकडी घरांमध्ये एकत्र राहण्याची परवानगी दिली. पण मग नवीनच प्रश्न उभा राहिला. या लाकडी घरांना वाळवीचा त्रास तर होताच, पण उरलेले आठ महिने या घरांत कोणीच राहत नसल्याने पावसाळा येईपर्यंत ही घरं मोडकळीस आलेली असत. बुद्धाच्या मृत्यूनंतर बरेच नियम शिथिल झाले, आणि भिक्षूंना राहण्यासाठी ही लेणीं निर्माण केली गेली. बौद्ध धर्म स्वीकारलेल्या राजांनी लेणींसाठी पैसा पुरवला आणि इराणमधून कारागीर आणले गेले. या कारागिरांनी उन्हापावसात मेहनतीनं ही शिल्पं निर्माण केली. पावसाळ्यात पाण्यातून चालताना जैन भिक्षू हिंसा होते म्हणून व्यथित होत म्हणून जैन भिक्षूंसाठीही लेणीं निर्माण केली गेली.

अहिंसा आणि करुणेचा मार्ग बुद्ध व महावीरानं दाखवला. अहिंसा व करुणा एकत्र आले की मनुष्य सहिष्णू होतो. ही सहिष्णुता माणसाला माणूस बनवते. माणसातलं माणूसपण ओळखायला शिकवते. सहिष्णुता एकदा अंगी बाणली की धर्माच्या, जातीच्या भिंती सहज ओलांडता येतात. मग निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो.

कार्ल्याची रक्ताळलेली जमीन आणि लघवीचा वास आपण आजही किती असहिष्णू आहोत, हे लक्षात आणून देतात. ही असहिष्णुता आपल्या ऐतिहासिक वारशापुरतीच नसते. आपल्यापेक्षा वेगळं असलेल्या सगळ्याबद्दलच ती असते. सार्वत्रिक.

ही असहिष्णुता नाहीशी व्हावी म्हणून बुद्धानं अनेक नियम घालून दिले होते. अंगी ऋजुता यावी, अहंकार नष्ट व्हावा, मोहमायेत मन अडकू नये, निर्वाणाशिवाय दुसरं काही ध्येय असू नये, हा या नियमांमागचा हेतू. कुठली वस्त्रं परिधान करावीत, प्रवास कसा करावा, ध्यान कसं करावं, आजारपणात काय काळजी घ्यावी, इतरांशी कसं वागावं, कुठल्या गुन्ह्याला काय शिक्षा असावी, यांसाठी अनेक नियम होते. या नियमांचं काटेकोर पालन अत्यावश्यक असे. कुठे जरा चूक झाली की शिक्षा आणि केलेल्या चुकीची जाहीर कबुली. जैन धर्मातही असे अनेक नियम होते. या नियमांचं पालन केलं तर आपण निर्वाणाप्रत पोहोचू, अशी भिक्षूंनाही खात्री असल्यानं या नियमांचं पालन केलंही जाई.

हे नियम सांगण्यामागे अजून एक हेतू होता. आपल्यानंतर आपला संघ कायम राहावा, आपले शिष्य मार्ग चुकू नयेत, त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव असावी, अशी बुद्धाची इच्छा होती. या नियमांना नाव होतं पातिमोक्ख (प्रातिमोक्ष). विनयपिटक या ग्रंथात या नियमांची सविस्तर चर्चा केली आहे. बुद्धाच्या हयातीत भिक्षूंसाठी बुद्धानं एकूण १५२ नियम सांगितले होते. विनयपिटक हा ग्रंथ बुद्धाच्या निर्वाणानंतर रचला गेला. यात भिक्षूंसाठी २२७ व भिक्षुणींसाठी ३११ नियम सांगितले आहेत. विसुद्धिमग्ग या ग्रंथातही बुद्धानं सांगितलेले नियम सापडतात. हा ग्रंथ म्हणजे खरंतर बौद्ध विश्वकोश म्हणता येईल. यात व्याकरण, सांख्य, न्याय, योग, आयुर्वेद, मीमांसाशास्त्र यांचं सखोल विवेचन आहे. बुद्धाच्या निर्वाणानंतर साधारण आठशे वर्षांनी बुद्धघोषानं हा ग्रंथ रचला. बौद्धसंस्कृतीविषयी सखोल माहिती जातककथांतूनही मिळते. बुद्धाच्या पूर्वजन्मांच्या कथा म्हणजे जातककथा. पूर्वजन्माच्या या नीतिकथा बौद्धवाङ्मयाचा महत्त्वाचा ठेवा आहेत. या कथा एकूण ५४४, आणि या ५४४ कथांत अजून सुमारे दहा हजार उपकथानकं.

प्राचीन जैन किंवा बौद्ध वाङ्मय रचलं गेलं ते इसवी सनपूर्व ६०० ते इ. स. २०० या काळात. या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे सोपी, ओघवती भाषा. सर्वसामान्यांना समजेल अशी. बरंचसं साहित्य गद्य असलं तरी त्याला पद्य वाङ्मयाचा डौल आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातलं बहुतेक वाङ्मय हे सूत्रबद्ध आहे, आणि वैदिक सूत्रवाङ्मयाला ते बर्‍यापैकी समकालीन आहे. ब्राह्मणग्रंथांतील यज्ञयागासंबंधीची माहिती ही बरीच संकीर्ण स्वरूपाची होती. शिवाय ती बरीचशी शब्दबंबाळही होती. त्यांत अनेकदा विषयांतरही असे. म्हणून या सर्व माहितीची छाननी करून विशिष्ट क्रमाने आणि नेमक्या शब्दांत धर्मकृत्यांची माहिती देण्यासाठी कल्पसूत्रांची रचना झाली होती. म्हणजे नियम आणि कर्तव्यांची माहिती देणं, हा सूत्रग्रंथांचा उद्देश होता. बौद्ध व जैन वाङ्मयातील सूत्रं ही क्वचित वैदिक सूत्रांपेक्षाही सखोल विवेचन करणारी आहेत. ही सूत्रं मोक्ष मिळवण्यासाठी कुठले नियम पाळावेत, हे सांगतात. उत्तम भिक्षू कसा असावा, याचं विवेचन करतात. शिवाय या सूत्रांच्या जोडीला अनेक कथा, आख्यायिकासुद्धा आहेत. लहानपणी आजीनं रात्री सांगितलेल्या गोष्टीतला बकासुर जसा गाडाभर वरणभात खातो, तसंच या कथांतून तत्कालिन समाज कसा होता, हे कळतं.

बुद्धाचा मुक्काम वाराणशीत होता तेव्हाची ही गोष्ट. सुप्रिया नावाची त्याची एक शिष्या होती. संघात सेविका म्हणून ती काम करत असे. आजारी भिक्षूंची सेवा करणं हे तिचं मुख्य काम. तर एकदा तिला संघात एक खूप आजारी असा वृद्ध भिक्षू दिसला. सुप्रियेनं त्याच्या जवळ जाऊन त्याची चौकशी केली. ’खायला काही आणू का?’ असंही विचारलं. तो म्हणाला, ’मला मांस खायचं आहे. तेच आणून दे.’ इतक्या आजारपणात एका भिक्षूनं मांसाची मागणी करावी, याचं तिला आश्चर्य वाटलं. पण भिक्षूंच्या आज्ञांचं पालन करावं, इतकंच काय, त्यांच्यासमोर कायम मान खाली घालून उभं राहावं, अशी बुद्धाची शिकवण असल्यानं मांस आणण्यासाठी ती आपल्या घरी आली. घरी काम करणार्‍या सेवकाला मांस आणायला तिनं सांगितलं. पण तो सेवकही बुद्धाचा शिष्य. तो मांसाहार करत असला तरी त्याच्या दृष्टीनं प्राणिहत्या करणं हे पाप. भोजनासाठी प्राणिहत्या करू नये, असं बुद्धानं सांगितलेलं. त्यामुळे मांस विकत आणणंही निषिद्ध. त्यानं कुठे भिक्षा म्हणून मांस मिळतं का, ते बघितलं. पण नेमकं त्या दिवशी जवळपासच्या घरांत मांस शिजलं नव्हतं. तो निराश होऊन घरी परतला.

आता सुप्रिया पेचात पडली. त्या आजारी भिक्षूची इच्छा पूर्ण कशी करायची? तिनं मग एक धारदार सुरा आणला आणि आपल्या उजव्या मांडीवर चालवला. मांडीचं मांस कापून काढलं. सेवक घाबरला. सुप्रिया म्हणाली, 'हे मांस आता मी त्या भिक्षूला नेऊन देते. अन्नासाठी मी प्राणिहत्या केलेली नाही. माझ्याच शरीरावरचं मांस कापलं आहे. म्हणजे मी नियम मोडलेला नाही. तेव्हा हे मांस त्या भिक्षूला नक्की खाता येईल.' सुप्रिया तशीच लंगडत गेली, आणि ते मांस त्या भिक्षूला देऊन आली.

थोड्या वेळानं उपासक, सुप्रियेचा नवरा, घरी आला. (सुप्रियेच्या नवर्‍याचं नाव उपासक नसावं. उपासक म्हणजे उपासना करणारा बुद्धाचा शिष्य. कथेत त्याचं नाव न देता त्याला उपासक असं म्हटलं आहे. म्हणून आपणही त्याला उपासक असंच म्हणू.) सेवकानं त्याला सगळी हकिकत सांगितली. त्याला सुप्रियेचा अभिमानच वाटला, पण तो जरा चिंतेतही पडला. उपासक हाही बुद्धाचा शिष्य. वाराणशीतला एक प्रतिष्ठित असामी. दुसर्‍या दिवशी बुद्ध उपासकाच्या घरी आपल्या शिष्यांसह जेवायला, म्हणजे भिक्षा मागायला येणार होता. आता अशा अवस्थेत सुप्रिया बुद्धाला सामोरी कशी जाणार?

दुसर्‍या दिवशी बुद्ध उपासकाच्या घरी आला तेव्हा उपासकानंच त्याला भिक्षा वाढली. सुप्रिया उठण्याच्याही परिस्थितीत नव्हती. बुद्धानं सुप्रियेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आता मात्र उपासकाला खरं काय ते सांगावंच लागलं. बुद्धानं तरीही सुप्रियेला बाहेर येण्यास सांगितलं. ती लंगडत बाहेर आली. आणि काय आश्चर्य! बुद्धाला पाहताच तिची जखम लगेच भरून आली. सर्वांनी हा चमत्कार पाहिला, आणि बुद्धाला भक्तिभावानं नमन केलं.

संघात परतल्यावर बुद्धानं सार्‍या भिक्षूंना बोलावून विचारलं, 'सुप्रियेकडे मांसाची मागणी कोणी केली?' त्या वृद्ध भिक्षूनं हात वर केला.
बुद्धानं विचारलं, 'तू ते मांस खाल्लंस?'
तो भिक्षू उत्तरला, 'होय, भगवान.
' ते मांस कोणाचं होतं हे ठाऊक आहे?'
'नाही, भगवान.'
'ते मांस सुप्रियेचं होतं.'

हे ऐकताच सर्व भिक्षू स्तब्ध झाले. मांस मागणार्‍या वृद्ध भिक्षूकडे सर्वजण घृणेनं पाहू लागले.
बुद्ध म्हणाला, 'यापुढे भिक्षेत कोणी वाढलं तरी मानवी मांस खाऊ नये. स्त्रीचं मांस तर अजिबात नाही. याशिवाय हत्ती, घोडा, कुत्रा, सिंह, साप, चित्ता, वाघ, अस्वल यांचंही मांस खाऊ नये.'
भिक्षूंनी विचारलं, 'भगवान, या प्राण्यांचं मांस खाल्ल्यास काय होईल?'
बुद्ध म्हणाला, 'या प्राण्यांचं मांस खाणारा पापाचा धनी होईल, व त्यास प्रायश्चित्त घ्यावं लागेल.'

बुद्धाची मांसाहाराविषयीची मतं सांगणारी ही कथा. जैन व बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळात मांसाहाराचं बरंच प्रस्थ होतं. प्राचीन जैन व बौद्ध ग्रंथांतील संदर्भांवरून हे सहज लक्षात येतं. जातककथा व विनयपिटकात मिथिलेतील खाटीकखाने, मासळीबाजार, तिथली गर्दी, वाराणशीतील हरणाचं मांस विकणारी दुकानं यांचे उल्लेख येतात. जातककथांमध्येच हरणाचं, डुकराचं मांस (न्यग्रोध), तसंच, बैल, घोडा, माकड, कबुतर यांचं मांस खाणार्‍या क्षत्रियांचे व ब्राह्मणांचे उल्लेख आहेत. 'जाळ्यात अडकलेल्या पक्ष्याच्या नशिबी निखार्‍यांशिवाय काय असेल?' असं म्हणणारा पक्षीही जातककथेत भेटतो. जैन ग्रंथांमध्येही गोमांस, तसंच वेगवेगळे पक्षी, प्राणी यांचा बळी देऊन त्यांचं मांस खाण्याचे उल्लेख आहेत. हरीण, मासे, पक्षी यांचं मांस वापरून सूप व कबाब करत असत. मांस शिजवण्यासाठी दही, तूप आणि मसाल्यांचा वापर केला जाई. रोहित माशाचं कालवण आणि भात खास प्रसंगी केलं जात असे. मात्र उपासाच्या दिवशी (उपोस्थ दिवस) मांसाहार केला जात नसे.

त्या काळचा समाज हा बहुतांशी मांसाहारी असल्यानं बौद्ध व जैन ग्रंथांमध्ये हे संदर्भ ओघाने आलेच. रोजच्या आहारात मांसाहाराची सवय असलेल्या समाजाला एकदम शाकाहाराकडे वळणं जडच गेलं असणार. मांसाहाराला अधिक महत्त्व मिळालं होतं ते यज्ञविधींतील आहुतीच्या प्रथेमुळे. यज्ञांत दिल्या जाणार्‍या बळींमुळे मांसाहाराला सामाजिक व धार्मिक मान्यता होतीच आणि याचे अगणित उल्लेख वैदिक वाङ्मयात सापडतात.ऋग्वेद, अथर्ववेद, याज्ञवल्क्यसंहिता, शतपथब्राह्मण, गृह्यसूत्र इत्यादींमध्ये बळी देण्यासाठी योग्य असलेले प्राणी, विविध धार्मिक कार्यांत बळी देण्याचे शास्त्रशुद्ध विधी, मांस शिजवण्याच्या पद्धती यांचं बैजवार विश्लेषण केलं आहे. आपस्तंभ आणि बौद्धायन धर्मसूत्रांत श्राद्धविधींत गेंड्याचं मांस अत्यावश्यक असल्याचं सांगितलं आहे. या विधींत गेंड्याच्या हाडांपासून तयार केलेली भांडीच वापरावीत, असंही पुढे लिहिलं आहे. अस्वलायन गृह्यसूत्रात श्राद्धप्रसंगी गायीचा बळी द्यावा, असं सांगितलं आहे. जातककथांत कबुतर, माकड, हत्ती यांच्या मांसाचे पदार्थ खास अतिथीसाठी रांधल्याचे उल्लेख आहेत. बृहत् संहितेत या प्राण्यांच्या जोडीला म्हैस आणि पालीही येतात. इसवी सनाच्या तिसर्‍या किंवा चौथ्या शतकात लिहिल्या गेलेल्या विष्णूपुराणातही यज्ञप्रसंगी ससा, साळींदर, बकरी, चितळ, हरीण, मेंढी यांचं मांस शिजवावं, असं सांगितलं आहे. समस्त वेद, सूत्रग्रंथ, स्मृति यांचा आढावा घेतला तर मांसाहाराला सामाजिक व धार्मिक मान्यता होती, हे सहज लक्षात येतं.

वैदिक धर्मातील प्राणिहत्येच्या प्रथेला सर्वप्रथम विरोध केला तो जैन धर्मियांनी. अहिंसेला विलक्षण महत्त्व देणार्‍या जैनांना यज्ञात दिली जाणारी आहुती अमान्य होती. शिवाय अन्यवेळीही त्यांचा मांसाहाराला विरोध होता. बुद्धानंही यज्ञातील प्राण्यांच्या आहुतीला कडाडून विरोध केला, मात्र त्यानं मांसाहाराला विरोध केला नाही. बुद्ध हा शककुळातला क्षत्रिय होता, हे त्यामागचं एक कारण असू शकेल. शिवाय मनाची शुद्धता व अन्न यांचा संबंध असतो, हे बुद्धाला मान्य नव्हतं. विनयपिटकात मांस आणि मासे खाण्यास परवानगी दिली आहे. मात्र भोजनासाठी मुद्दाम प्राणिहत्या करू नये, असं त्याचं ठाम मत होतं. भिक्षेत मांस दिलं तर ते स्वीकारण्यास, खाण्यास बुद्धाची ना नव्हती. भिक्षूंसाठी मुद्दाम प्राणी मारण्यास मात्र त्याची परवानगी नव्हती. कारण प्राणिहत्या करणं हे पाप, त्या प्राण्याचं मांस खाणं हे पाप नाही, असं त्याचं मत होतं. आजारी भिक्षूंसाठी क्वचित प्रसंगी बौद्धसंघात मांस शिजवल्याचे काही दाखले विनयपिटकात मिळतात.

जैनांचा मात्र कोणत्याही प्रकारच्या हिंसेला पूर्ण विरोध होता. याच कारणामुळे रात्री जेवण्यावरसुद्धा बंदी होती. मांसाहार तर अर्थातच पूर्णपणे निषिद्ध होता. भगवतीसूत्र, बृहतकल्पसूत्र भाष्य अशा काही ग्रंथांत मात्र काही जैनधर्मीयसुद्धा मांसाहार करत असल्याचा उल्लेख आहे. भगवतीसूत्राच्या पंधराव्या अध्यायात महावीरानं आजारपणात कबुतराचं मांस खाल्ल्याचाही उल्लेख सापडतो. बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झाला, असं डॉ. र्‍हिस डेव्हिडस् व काही भारतीय अभ्यासकांचं मत आहे. दीघनिकाय या पाली ग्रंथाचा एक भाग असलेल्या महापरिनिब्बानसूत्तात ही कथा सांगितली आहे.

अजातशत्रूनं विज्ज राज्यावर स्वारी केली, त्यावेळी बुद्ध आपल्या शिष्यांसह तिथेच होता. पावसाळ्याचे दिवस होते, आणि विज्ज राज्यातल्याच एखाद्या विहारात पूर्ण पावसाळाभर राहण्याची बुद्धाची योजना होती. या चार महिन्यांत बुद्धाची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्याला सतत तीव्र वेदना होत, असं महापरिनिब्बानसूत्तात म्हटलं आहे.

पावसाळा संपल्यानंतर बुद्ध आपल्या शिष्यांसह पावापुरीस आला. तिथे कुन्द नावाचा एक सोनार राहत होता. कुन्दानं बुद्धाची महती ऐकली होती. बुद्ध रोज आपल्या शिष्यांना संध्याकाळी उपदेश करत असे. कुन्द बुद्धाचं दर्शन घ्यायला संध्याकाळी गेला तेव्हा बुद्धाचं प्रवचन सुरू होतं. बुद्धाचं प्रवचन ऐकून कुन्द विलक्षण प्रभावित झाला, आणि तत्क्षणी त्यानं बुद्धाचं शिष्यत्व पत्करलं. बुद्धानं आपल्या घरी जेवायला यावं, अशी साहजिकच त्याची इच्छा होती. त्यानं बुद्धाला तशी विनंती केली, आणि बुद्धानं कुन्दाचं आमंत्रण स्वीकारलं. अतिशय आनंदात कुन्द आपल्या घरी परतला आणि त्या रात्री जागून कुन्दानं बुद्ध व त्याच्या शिष्यांसाठी अनेक पदार्थ रांधले.

दुसर्‍या दिवशी कुन्द बुद्ध राहत होता त्या आमराईत गेला, व बुद्ध व त्याच्या शिष्यांना सन्मानपूर्वक आपल्या घरी घेऊन आला. बुद्धाला तो म्हणाला,'भगवान, मी आपल्यासाठी आज खास सूकरमद्दव तयार केलं आहे. कृपया त्याचा आस्वाद घ्यावा.' बुद्ध म्हणाला, 'सूकरमद्दव फक्त मला वाढ. इतर कोणाला नको.' कुन्दानं बुद्धाला सूकरमद्दव वाढलं, आणि इतरांना उरलेले पदार्थ वाढले. बुद्धानं जेमतेम काही घास खाल्ले असतील आणि त्याच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. त्याच वेळी बुद्धानं कुन्दानं उरलेलं सूकरमद्दव एका खोल खड्ड्यात पुरून टाकायला सांगितलं. बुद्धानं आपलं जेवण पूर्ण केलं आणि काही मिनिटांतच बुद्धाला रक्ताचे जुलाब सुरू झाले. प्रचंड हुडहुडी भरली. आनंद, बुद्धाचा पट्टशिष्य, बुद्धाच्या आज्ञेनुसार त्याला कुशीनगरास घेऊन गेला. तिथेच वयाच्या ऐंशीव्या वर्षी बुद्धाला महानिर्वाण प्राप्त झालं.

death_of_buddha.jpg

बुद्धाचा मृत्यू, तिसरे शतक, गांधार शैली, कुशाण काळ, पाकिस्तान. Gray Schist, प्रकाशचित्र - The Photograph Studio, The Metropolitan Museum of Art. © The Metropolitan Museum of Art, New York. (www.metmuseum.org)

पाली भाषेतली ही कथा एकोणिसाव्या शतकात डॉ. र्‍हिस डेव्हिडस् यांनी इंग्रजीत भाषांतरीत केल्यावर पुन्हा एकदा प्रकाशात आली. तोपर्यंत चिनी व तिबेटी सूत्रग्रंथांचाच दाखला दिला जात असे. महापरिनिब्बानसूत्रात उल्लेखलेला सूकरमद्दव हा पदार्थ नेमका काय, याची चर्चा मग सुरू झाली. सूकरमद्दव या शब्दाचं भाषांतर डुकराचं मऊ मांस असं डॉ. डेव्हिडस् यांनी केलं आहे. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झालेल्या विषबाधेमुळे झाला, असा निष्कर्ष काढला गेला. मात्र हाच निष्कर्ष इसवी सनाच्या पाचव्या शतकात बुद्धघोषानंसुद्धा काढला होता. सुमण्गल विलासिनी या आपल्या टीकाग्रंथात बुद्धघोषानं सूकरमद्दवाबद्दल लिहिलं होतं. डुकराचं मऊ मांस या अर्थाबरोबरच त्याने अन्य दोन अर्थही लावले होते. 'काही लोक म्हणतात की सूकरमद्दव म्हणजे गायीच्या मांसापासून तयार केलेला सुपासारखा पातळ पदार्थ. तर काही जणांच्या मते सूकरमद्दव हे एक औषध होतं. भगवान बुद्धांना दीर्घायुष्य मिळावं या हेतूने ते रसायनातील कृतीनुसार तयार केले असावे', असं बुद्धघोषानं लिहिलं आहे.

बुद्धयशस हा बुद्धघोषाचा समकालीन. हा काबुलचा राहणारा. इ. स. ४०२मध्ये तो बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी चीनला गेला. तिथं त्याने दीघनिकायचं चिनी भाषेत भाषांतर केलं. या ग्रंथाचं नाव दीर्घागम. या ग्रंथात बुद्धयशस सूकरमद्दव या शब्दाचं चंदनाच्या झाडाच्या कानांचं सूप असं भाषांतर करतो. चंदनाच्या झाडाचे कान म्हणजे अळंबी. चीनमध्ये आजही झाडावर उगवणार्‍या अळंबीला झाडाचे कान (木耳 - मूएर) म्हणतात.

पण अळंबीचा आणि सूकराचा, म्हणजे डुकराचा, काय संबंध? सूकर म्हणजे डुक्कर आणि मद्दव म्हणजे मऊ. सूकरमद्दव या शब्दाचा एक अर्थ डुकराने मऊ केलेले, म्हणजे लाथाडलेले, असाही होतो. हे वर्णन अळंबीला लागू पडतं. आयुर्वेदिय ग्रंथांमध्येही सूकरकन्द, सूकरपादिका, सूकरेष्ट अशी नावं भाज्यांना दिली आहेतच.

कुन्दानं बुद्धाचं शिष्यत्व पत्करलं होतं. बुद्धाचा प्राणिहत्येला असलेला विरोध त्याला ठाऊक असणारच. त्यानं बुद्धासाठी मुद्दाम डुकराचं मांस शिजवावं, हे त्यामुळे पटत नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बुद्धानं जेवण सुरू केल्यावर काही क्षणांतच त्याला वेदना सुरू झाल्या. अन्नातून होणार्‍या विषबाधेचे परिणाम इतक्या लवकर दिसत नाहीत. बुद्ध हा पावसाळ्यापासूनच आजारी होता. हाच आजार कुन्दाच्या घरी बळावला असणार. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झालेल्या विषबाधेमुळे झाला, हा निष्कर्ष फारसा पटत नाही. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू नेमकं काय खाऊन झाला, यावर आजही चर्चा सुरू असतात.

बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध व जैन धर्म स्वीकारलेल्या राजांनी मांसाहाराला जोमानं विरोध करायला सुरुवात केली. यात आघाडीवर होता सम्राट अशोक. अशोकाचे आजोबा म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्तानं जैन धर्म स्वीकारला होता, आणि त्याच्या मुलानं, म्हणजे बिंबिसारानं आजिवकांकडून दीक्षा घेतली होती. तरीही सम्राट अशोक हा अहिंसेचं पालन करणारा नव्हता. कलिंगाच्या युद्धानंतर हिंसेतील निरर्थकता अशोकाला कळली, आणि तो बौद्ध धर्माकडे आकर्षित झाला. या परिवर्तनाचे पुरावे म्हणजे अशोकानं खोदलेले ३३ शिलालेख. या शिलालेखांत अशोकाचा उल्लेख पियदसी (प्रियदर्शी) असा केला आहे. भारत, नेपाळ आणि पाकिस्तानापर्यंत पसरलेले हे शिलालेख बौद्ध धर्माची व्याप्ती किती होती, हे तर दाखवतातच, पण अशोकानं केलेला प्राणिहत्येला विरोध ठळकपणे समोर येतो.

ashoka_edict.jpg

अशोकानं पहिला शिलालेख गुजरातेतल्या गिरनारजवळ खोदला. या शिलालेखात लिहिलं होतं -
'देवांना अतिशय प्रिय असलेल्या राजा पियदसीच्या आज्ञेवरून हा शिलालेख कोरला आहे. राजाज्ञेनुसार यापुढे मेजवान्यांसाठी कोणीही प्राणिहत्या करू नये. राजा पियदसीच्या मते अशा मेजवान्यांसाठी प्राणिहत्या करणे हे सर्वोच्च पाप आहे. या आधी अशा मेजवान्यांना परवानगी होती व देवाच्या लाडक्या राजा पियदसीच्या भोजनासाठी व देवाच्या लाडक्या राजा पियदसीने दिलेल्या मेजवान्यांसाठी रोज हजारो प्राण्यांचा बळी दिला जात असे. मात्र, हा शिलालेख कोरतासमयी राजवाड्यात भोजनासाठी रोज फक्त दोन लांडोर व एका हरिणीचा बळी दिला जातो. यापुढे काही काळानंतर या प्राण्यांचाही बळी दिला जाणार नाही.'

पाचव्या शिलालेखात लिहिलं आहे - 'राज्यग्रहण करून सव्वीस वर्षं झाल्यानंतर मी पोपट, मैना, अरुण, हंस, बदक, नंदीमुख, गेलत, वटवाघुळ, मुंग्या, मासे, वेदरेयक, गंगापुपुटक, कासव, साळींदर, खार, हरीण, बैल, ओकपिन्ड, गाढव, कबुतर आणि इतर सर्व चतुष्पाद प्राणी या सर्वांना संरक्षित असा दर्जा देतो. पिल्लं असलेल्या गायी, बकर्‍या आणि सहा महिन्यांपेक्षा लहान असलेली पिल्लं यांचंही रक्षण केलं जावं. कोंबड्यांची झुंज लावली जाऊ नये. गवत आणि जंगलातली झाडं तोडू किंवा जाळू नयेत. एक प्राणी दुसर्‍या प्राण्यास खायला देऊ नये.'

मात्र अशोकानं प्राणिहत्या पूर्णपणे बंद केली नाही. यज्ञात बळी दिले जात नव्हते, मात्र घरी मांसाहार करण्यास हरकत नव्हती. मेजवान्यांमध्ये प्राण्यांच्या संख्येवर मर्यादा होती. शिकारीवरही बंदी होती. हरणाची शिकार केल्यास १०० पानांचा दंड होता.

शाकाहाराचा पुरस्कार करणार्‍या या जैन व बौद्ध राजांना प्राणिहत्या बर्‍याच प्रमाणात कमी करण्याचं श्रेय जात असलं तरी अन्नासाठी प्राणिहत्या करावी का, याबाबत आर्यांनी फार पूर्वी विचार करायला सुरुवात केली होती. धार्मिक आणि शेतीकार्यांत उपयोगी असणार्‍या गायीला केंद्रस्थानी ठेवून हा विचार झाला होता. यज्ञकर्मांत बळी देण्यासाठी निवडलेली गाय ही भाकड असावी, असं अथर्ववेदात सांगितलं आहे. ऋग्वेदातही अदितीच्या गौरवार्थ काही ऋचा आहेत. शतपथ ब्राह्मणात गोमांस खाणं धर्मबाह्य असल्याचं सांगितलं आहे. बौद्धायनातही गोहत्येला विरोध केला गेला आहे. आपस्तंभसूत्रात तर बैलाचा बळी देण्यासही परवानगी नाकारली आहे. आर्थिक कारणांमुळे गायीचा बळी देणं निषिद्ध मानलं गेलं, आणि कालांतरानं या विचाराला धार्मिक अधिष्ठान मिळालं. गायीला देवता मानलं जाऊ लागलं आणि आपोआपच गायीचा बळी देण्याची प्रथा बंद झाली. हळूहळू एकंदरीतच प्राणिहत्या होऊ नये, हा विचार दृढावत गेला. याच दरम्यान शेतीकलेतही प्रगती होत होती, आणि मांसाहाराची गरज कमी झाली होती. मात्र तरीही यज्ञात प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा पूर्णपणे थांबली नव्हतीच. गायीच्या ऐवजी इतर प्राण्यांचा बळी दिला जात असे. ही प्रथाही हळूहळू कमी झाली. पुढे शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य यांनी यज्ञात दिल्या जाणार्‍या बळीला विरोधच केला. जिवंत प्राण्याऐवजी कणकेपासून तयार केलेल्या प्राण्याचा यज्ञात वापर करावा, असं मध्वाचार्यांनी सांगितलं होतं. कालांतरानं लाल भोपळा, किंवा गुलाल लावलेला नारळ यांचा यज्ञात प्रतिकात्मक वापर होऊ लागला. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मनुस्मृतिसारख्या ग्रंथांत मांसाहाराची निंदा करणारे ५४ श्लोक समाविष्ट केले गेले. यज्ञात बळी देणार्‍या व मांस विकणार्‍या ब्राह्मणाला घरी जेवायला बोलावू नये, असं मनुस्मृतित सांगितलं गेलं.

पाचव्या शतकात फा श्यॅन आणि नंतर सातव्या शतकात शुअ‍ॅन त्सांग भारतात आले, तेव्हा बौद्धधर्माचा सार्वत्रिक प्रसार झाला होता. मात्र भारताविषयीची निरीक्षणं नोंदवताना त्यांनी भारताला बौद्ध चष्म्यातून पाहिले. प्रत्येक भारतीय हा शाकाहारी आहे, आणि भारतात प्राणिहत्या अजिबात होत नाही, पशुपालनही फार नाही, असं या दोघांनीही लिहून ठेवलं आहे. अकराव्या शतकात भारतात आलेल्या अल् बिरुनीची मतं मात्र वेगळी होती. तो लिहितो - 'प्राणिहत्या न करण्याचा नियम बहुतेक ब्राह्मण पाळतात, कारण ब्राह्मण हे धर्माचे रक्षक असल्याने त्यांनी मोहाला बळी पडणे योग्य नाही. पण तरीही ब्राह्मणांना प्राणिहत्या करण्याची परवानगी आहे. प्राण्यांचा बळी देताना त्यांचा गळा दाबूनच त्यांना मारलं पाहिजे, असा नियम आहे. मात्र गाय, घोडा, खेचर, उंट, हत्ती, पाळीव कोंबड्या, कावळा, पोपट, मैना यांचा बळी देण्यास मज्जाव आहे. ब्राह्मणांनी अंडी खाऊ नयेत व मद्यपान करू नये, असा नियम आहे. पण हा नियम सर्वच ब्राह्मण पाळतात, असं नव्हे. शूद्रांना मद्यपान करण्यास पूर्ण परवानगी आहे. मात्र शूद्र मद्य व मांस यांची विक्री करू शकत नाहीत. त्यांनी तसं केल्यास त्यांना शिक्षा केली जाते.'

अल् बिरुनी भारतात आला तेव्हा गोमांस खाण्याची व गायीचा बळी देण्याची प्रथा नामशेष झाली होती. त्याबद्दल तो लिहितो - 'गोमांस खाल्ल्याने शारीरिक दौर्बल्य येतं, आणि मनुष्य आपली कर्तव्यं पूर्ण करू शकत नाही, असा समज झाल्यानं गोमांस खाणं निषिद्ध केलं गेलं, असं मला एका ब्राह्मणाने सांगितलं. पण मांसभक्षण केल्याने शारीरिक दौर्बल्य येत नाही, तेव्हा हे कारण खरं नसावं. दुसर्‍या एका ब्राह्मणानं मला सांगितलं की, गोमांस हे जाड, जड व थंड असतं, व ते योग्य रीतीने पचवायचे असल्यास जेवणानंतर विडा व सुपारी खाणं आवश्यक असतं. तरीही काही ब्राह्मण गोमांस पचवू शकत नाहीत. म्हणून गोमांस खाण्याची प्रथा मागे पडली. या दोन कारणांपैकी कुठलं कारण खरं, ते मला ठाऊक नाही. एक मात्र खरं की, गाय हा मनुष्यास उपयोगी पडणारा पशू आहे. गायी व बैल गाड्या ओढून मनुष्यांस वाहून नेतात, शेतात नांगरणी व पेरणी करण्यास मदत करतात, घरासाठी दूध देतात, आणि दुधापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. गायीच्या शेणाचासुद्धा उपयोग केला जातो. त्यामुळे फक्त आर्थिक कारणांमुळे गोमांस खाणे निषिद्ध समजले गेले असावे.'

शाकाहाराला धार्मिक अधिष्ठान मिळाल्याचा एक परिणाम असा झाला की, शाकाहार आणि शुद्ध धार्मिक आचरण, अशी सांगड घातली गेली. मांसाहार, मद्यपान, लैंगिक व्यवहार यांच्याकडे तुच्छतेनं पाहिलं जाऊ लागलं. इतर धर्मीयांपेक्षा आपण वरचढ आहोत हे आपण शाकाहारी असल्याचं दाखवून सिद्ध केलं जाऊ लागलं. लंकावतारसूत्तात याबाबत एक मजेदार दाखला मिळतो. हा ग्रंथ पाचव्या शतकात रचला गेला. त्या काळी सत्तेवर असलेले गुप्त राजे वैष्णव होते. या राजांना मांसाहार निषिद्ध होता. बौद्ध धर्मीर्यांबद्दल हे राजे सहिष्णू होते. मात्र हीनयानांच्या या ग्रंथात 'धर्मबुडवे, वाट चुकलेले वैष्णव जर मांसाहार करत नाहीत, तर आपणही तो करू नये', अशा अर्थाची सूत्रं सापडतात. महापरिनिब्बानसूत्तात असलेली मांसाहाराला मान्यता गृहित धरून बौद्ध धर्मिय तेव्हा मांसाहार करत होते, हेच यावरून लक्षात येतं. बौद्ध धर्म जेव्हा भारताबाहेर गेला तेव्हाही मांसाहाराला मान्यता कायम राहिली. चीन व इतर आशियाई देशात लिहिल्या गेलेल्या बौद्ध ग्रंथांमध्ये मांसाहार हे फार मोठं पाप नसल्याचं सागितलं आहे. मांसाहारापेक्षा मोठं पाप म्हणजे खोटं बोलणे.

शाकाहाराला धार्मिक अधिष्ठान मिळाल्यावर दुर्दैवानं बौद्ध व जैन धर्मातील अन्य विचार झाकोळले गेले. खरंतर बुद्ध व महावीराच्या काळात, म्हणजे आजपासून सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी आपली पाककला बरीच पुढारलेली होती. स्वयंपाक करणं ही एक कला आहे, असं खुद्ध अजातशत्रूनं बुद्धाला एका पत्रात लिहिलं होतं. पुरणपोळी, दहीवडे, कबाब असे आजही अस्तित्वात असणारे अनेक पदार्थ त्या काळी केले जात असत. तळण्यासाठी तेल आणि तूप वापरावं, भाज्या करताना हिंगजिर्‍याची फोडणी करावी (धूपन) हेही लोकांना ठाऊक होतं. दुर्दैवानं हे सारं दुर्लक्षित राहिलं. शिवाय, आपल्या शिष्यांसाठी नियम तयार करताना बुद्ध व महावीरानं अन्न व अन्नसेवनाचा सांगोपांग विचार केला होता. काय, कधी, कसं, केव्हा खावं यासाठीचे अनेक नियम घालून दिले होते. 'शाकाहार हाच सर्वश्रेष्ठ' हा विचार फोफावला आणि या दोन धर्मांतील अन्नविचार फार मागे पडला.

चतुर्विध अन्न कोण काय | तें पंडुराय-नंदना ऐक ||३०|| दुग्धघृत शर्करेसी घेणें | दहीं इत्यादि 'पेय' बोलणें | कथिका सांबरिया 'लेह्य' म्हणे | वरपणें चाटणें या लागीं ||३१|| आंबे जांबळ बोरें चारें | चोखूनि खाती म्हणूनि 'चोष्य' बा रे | चारोळ्या द्राक्षें खोबरें इत्यादि बरें खाद्य जाण ||३२|| वडा घारी तेलवरी रोटी पोळी मांडा सांजवरी | खांडवी भात गुळवरी | हेही परी खाद्याची || ३३|| रोटी पोळी क्षीरभात | इत्यादिकास षड्रसी गणतात | कां दही दूध तूप लोणी खाय...

रमावल्लभदासांनी सतराव्या शतकात श्रीमद्भगवदगीतेवर लिहिलेल्या चमत्कारी टीका या टीकेत चतुर्विध अन्न या प्रकरणात पदार्थांच्या वर्गीकरणाबद्दल उदाहरणं देऊन भाष्य केलं आहे. बौद्ध व जैन ग्रंथांमध्येही साधारण अशीच वर्णनं वाचायला मिळतात. या ग्रंथांत अन्नाचं कठीण पदार्थ, मऊ पदार्थ, पेय आणि चोखता येण्यासारखे पदार्थ अशा चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं आहे. विनयपिटकात या चार प्रकारच्या पदार्थांची उदाहरणं आहेत. कठीण पदार्थ (खादनीय) म्हणजे मुळं, पानं, फळं आणि फुलं. मऊ पदार्थ (भोजनीय) म्हणजे भात (ओदन), जवस व कडधान्यांची खिचडी (कुम्मास), मांस, मासे (मच्छ). जैन ग्रंथांमध्ये कठीण पदार्थांना खाईम, मऊ पदार्थांना असन, पेयांना पान आणि चोखण्यायोग्य पदार्थांना साईम म्हटलं आहे.

भारतातल्या बहुतेक सर्व प्रदेशांत भात प्रामुख्यानं खाल्ला जात असे. विश्रामगृहांमध्येही थकलेल्या प्रवाशांना भात दिला जाई. वृहि आणि साळी अशा भाताच्या दोन जाती लोकप्रिय होत्या. यांपैकी वृहि हा थोडा स्वस्त आणि म्हणून गरिबांना परवडणारा असा तांदूळ होता. रक्तशाली (याला ग्रीक राजा मेनेन्दर म्हणजे मिलिन्द शालिलोहितक असंही म्हणतो), कलमशाली (हा मगध देशात पिकत असे), गन्धशाली आणि महाशाली अशा साळी तांदुळाच्या चार जाती धनिकांच्या घरी वापरात होत्या. उपासकदशांगात कलमशालीहा जगातला सर्वोत्कृष्ट तांदूळ असल्याचं सांगितलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलं घालून भात शिजवला जात असल्याचा उल्लेख जातककथांत आहे. भात नेहमी गरमच खावा, गार आणि शिळा भात तब्येतीस बरा नव्हे, असा उपदेशही एका जातककथेत सापडतो. तीळ घालून शिजवलेला भात (तिलोदन) आवडीने खाल्ला जात असे. तांदुळाची पिठी वापरून अनारसे, साश्कुली असे पदार्थ केले जात. पोह्यांना झामभत्ता असं नाव होतं. या पोह्यांमध्ये गुळ घालून खात किंवा चिवडा (पिहुय / पृथुक) केला जाई. जवस, गहू, मूग, उडीद, चणे, मसूर, कुळीथ, वाटाणे (कलाय) यांचाही वापर होई. कडधान्यांपासून वडे आणि पापड (पर्पटस) केले जात. कडधान्यं पाण्यात भिजत घालून, शिजवून, पातळ आमटी केली जाई. या पदार्थाला जूस म्हणत.

बौद्ध व जैनांच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांना महत्त्वाचं स्थान होतं. दूध, दही, ताक, लोणी आणि तूप हे पदार्थ खाण्यास बुद्धाची परवानगी होती. सर्दी नाहीशी व्हावी, म्हणून दुधात तिखट औषधं घालून प्यावं, असं बुद्ध सांगत असे. जैन वाङ्मयातसुद्धा सर्दी झाल्यास दुधात तिखट औषधं घालून पिण्याचा उल्लेख आहे. गाय, म्हैस, उंट, बकरी यांचं दूध सर्वसामान्य लोक वापरत असत. बरेचदा न्याहारीसाठी दूधभात असे. दही, ताक, लोणी, तूप यांचाही रोजच्या आहारात समावेश होता. मूग आणि उडीद भिजत घालून, वाटून, त्यात काळी मिरी घालून वडे तळले जात. हे वडे सुंठ घातलेल्या ताकात भिजवून खात. या पदार्थाला साग असं नाव होतं. अनेक जैन ग्रंथांमध्ये या पदार्थाचा उल्लेख येतो. श्रीखंड हे अनेकांचं आवडतं पक्वान्न होतं. आठ भाग चक्का, त्यात दोन भाग साखर, अर्धा भाग तूप, अर्धा भाग मध, आणि आवडीनुसार काळी मिरी, तमालपत्र, वेलदोडा, दालचिनी, नागेश्वर इत्यादी वापरून श्रीखंड केले जाई.

रोजच्या स्वयंपाकात मधाचा वापर होई. मधमाशांच्या आकारमानावरून मधाची प्रतवारी ठरवली जाई. लहान मधमाशीनं तयार केलेला मध जास्त मधुर समजला जाई. मात्र मधापेक्षाही महत्त्वाचा होता ऊस. बुद्धाने आपल्या शिष्यांना गूळ खाण्यास परवानगी दिली होती, असे उल्लेख त्रिपिटकांत आहेत. एवढंच नव्हे तर गुळाची प्रतवार कशी करायची, उसापासून उत्तम गूळ कसा मिळवायचा हे सगळं या बौद्धसूत्रांत वाचायला मिळतं. बौद्धसूत्रांत दोन प्रकारचे ऊस सांगितले आहेत. पुण्ड्र (पिवळा) आणि काजळी (गडद जांभळा). या दोन जातींवरून गंगेच्या पूर्वेकडील बंगालच्या प्रदेशास पुण्ड्रदेश व पश्चिमेकडील प्रदेशास काजोलक असे नाव मिळाले. पुण्ड्रदेशातील ऊस उत्तम समजला जायचा. वाळवलेला ऊस व त्याच्या धांड्यांची राख गूळ करताना या प्रदेशात वापरत असत. पुढे सातव्या शतकांत बौद्ध भिक्षुंनी ऊस व गूळ चीनमध्ये पोहोचवला.

फाणित (काकवी) आणि मत्स्याण्डिका (साखरेच्या गोळ्या), मधुलाज (गूळ व मध घातलेले पोहे), लाडू लहान मुलांना अतिशय आवडत. या साखरेच्या गोळ्यांचा आकार थोडा माशाच्या अंड्यांसारखा होता, म्हणून मत्स्याण्डिका हे नाव. आर्य मंजुश्रीमूलकल्प, निषिथसूत्त, अंतकृतदशांग यांसारख्या ग्रंथांमध्ये मधुशीर्षक (पुरणपोळी, पण कणकेऐवजी तांदुळाच्या पिठाची), गुललावणिय (गोलपापडी), घयपुण्ण (घीवर), सीहकेसर (तांदुळाच्या पिठाची गोड धिरडी), माण्डक (पुरण भरलेले मांडे), मोरेण्डक (पाणी काढलेल्या दह्याचे गूळ घातलेले अंडाकृती गोळे तूपात तळायचे) या गोड पदार्थांचे उल्लेख वारंवार येतात. या सार्‍या पदार्थांत गुळ, मध, साखर यांच्या जोडीला किंचित मीठ, काळी मिरी यांचाही वापर होत असे. शिवाय वेलदोडे, दालचिनी हे मसालेही असत.

इतर पदार्थांतही काळी मिरी, पिंपळी, जिरं, हिंग, सुंठ, हळद यांचा सढळ हातानं वापर केला जाई. मोहरी, लवंगा यांचाही वापर होई. विनयपिटकात लोणकार (समुद्राचं पाणी आटवून तयार केलेलं मीठ), काळं मीठ, लाल मीठ आणि घरगुती वापराचं मीठ अशा चार प्रकारच्या मिठांचा उल्लेख आहे. बुद्धसंघात या चारही प्रकारच्या मिठांचा वापर होत असे. मात्र हे मीठ प्राण्यांच्या हाडांपासून तयार केलेल्या भांड्यांत साठवण्यावर बंदी होती. मीठ आणि भरपूर मसाले घालून जैन राजांच्या राजवाड्यांत तळलेले पदार्थ करत असत. हे पदार्थ जेवणानंतर खाण्याची पद्धत होती. त्यांना उत्तरीभण्गम् असं म्हणत. हे पदार्थ तिळाच्या तेलात तळत असत. एरंडेल, सरकी आणि करडईचं तेल स्वयंपाकात वापरलं जाई. प्राण्यांच्या चरबीपासून काढलेलं तेलही वापरात होतं. अस्वल, मासे, मगर, डुक्कर आणि गाढव यांच्या चरबीपासून काढलेल्या तेलाचा वापर करण्याची परवानगी बुद्धानं आजारी भिक्षूंना दिली होती. तीळगुळाचे लाडू, तिळाची पूड (तिलपिठ्ठ) आणि तिळाचे पापड (तिलपप्पड) भिक्षूंना विशेष आवडत.

तेल, मीठ, मसाले यांचा वापर भाज्यांमध्येही केला जात असे. पडवळ (अळाबू), कमळाची देठं (बिस), वांगी, काकडी, मुळा, रताळी (पिण्डालुक), कारले (कारवेल्ल) या भाज्या खाल्ल्या जात. बुद्धानं पालेभाज्या खाण्यासही परवानगी दिली होती. कांद्याच्या शेतात शिरून सगळे कांदे तोडणार्‍या बौद्ध भिक्षूणींची उल्लेख जातककथांत येतो. लसूण खाण्यास मात्र परवानगी नव्हती, कारण मग तोंडाला वास येई आणि इतर भिक्षूंना त्याचा त्रास होत असे. मात्र, सर्दी झाल्यास लसूण खायला बुद्धाची काही हरकत नव्हती.

बुद्धानं आपल्या शिष्यानं सर्व फळं खाण्याची परवानगी दिली होती. शिवाय, संघात फळांचं वाटप योग्य प्रकारे व्हावं, म्हणून एक अधिकारीही नेमला होता. बोरं, आंबे, फणस, नीरफणस, शिंगाडे (शृंगाटक), आवळे, खजूर, नारळ, चारोळी (प्रियाल), कवठ (कपिथ्थ), पळशी (परूशक), करवंद (करमर्द) ही फळं खाल्ली जात असत. आंबा खायचा असेल तर आंब्याचं साल अग्नी वापरून किंवा सुरीने काढावं, नखं वापरू नयेत, असं बुद्धानं सांगितलं होतं. या फळांपासून शाडव नावाचा जॅमसारखा पदार्थ केला जाई. रोजच्या आहारात बुद्धानं आठ प्रकारची सरबतं प्यायला परवानगी दिली होती. पिकलेला आंबा, राजेळी केळी, कमळाचं देठ, मध, फाळसा, नारळ, जांभूळ इत्यादी वापरून ही सरबतं तयार केली जात. गूळ आणि साखर वापरूनही काही सरबतं तयार केली जात. त्यांना अनुक्रमे गुडोदकसख्खरपानक अशी नावं होती. बौद्धसंघातील भिक्षू व बुद्धाचे अनुयायी रात्री जेवत नसत. त्यामुळे भूक लागल्यास ही सरबतं प्यायली जात. खजूर, डाळिंबं, बोरं, आवळे, चिंचा वापरून तयार केलेल्या काही सरबतांचा उल्लेख जैन ग्रंथांत आढळतो.

जैन व बौद्ध ग्रंथांमध्ये मद्यपानाचे भरपूर उल्लेख सापडतात. मद्यगृहं आणि मद्य विकणारी दुकानं भरपूर होती. ही दुकानं वेगळी ओळखता यावीत म्हणून त्यांवर रंगीत ध्वज लावलेले असत. अगदी कडक अशा दारूला मद्य म्हणत, मात्र धान्यापासून गाळलेल्या दारूला सुरा असं म्हटलं जाई. विनयपिटकात तांदुळापासून तयार केलेल्या पाच प्रकारच्या सुरेचे उल्लेख आहेत. मैरेय हे मद्यही बरंच लोकप्रिय होतं. यात महाशृंगी, साखर, काळी मिरी, त्रिफळा इत्यादी घालत असत. मोहाच्या फुलांपासून तयार केलेली माधवी, खजुरापासून केलेली वारुणी, तांदुळाची पिठी आणि मसाल्यांपासून गाळलेली प्रसन्ना, उसाच्या रसापासून केलेली सीधु मद्यगृहांमध्ये मिळत असत. याखेरीज चन्द्रप्रभा, मणिशिलाक, ऋस्टभ, जाम्बुआसव ( जांभळापासून तयार केलेलं मद्य), कालिका, दुग्धज्योति, मृद्विकासार, वांशि, सोवीर, खर्जूरसार, सुपक्वेक्षुरस इत्यादी मद्यांचा उल्लेख जैन ग्रंथांमध्ये सापडतो.

सणासुदीला मद्यगृहांमध्ये विशेष गर्दी असे, तसंच स्त्रिया व भिक्षूही मद्यपान करत असल्याचा उल्लेख एका जातककथेत आहे. चण्ड पज्जोट, वत्सराज उदयन, राजा दुवय यांसारख्या राजांच्या मद्यपानाच्या कथा धम्मपद अट्टकथा, ज्ञातधम्मकथांग यांसारख्या ग्रंथांत रंगवून सांगितल्या आहेत. कदंबाच्या फुलांपासून तयार केलेल्या कादंबरी मद्याच्या व्यसनामुळे राज्य गमावणार्‍या बडवईच्या राजपुत्राची कथा उत्तराध्यायनसूत्रात सांगितली आहे. लोकांना मद्यपानापासून परावृत्त करणं, हा या कथेचा उद्देश होता. अंगुत्तरणीकाया, धम्मपद, भिख्खु पातिमोक्ख यांसारख्या ग्रंथांतही अशा कथा आणि लोकांनी मद्यपानापासून दूर राहावं, म्हणून नियम सांगितले होते.

अर्थात, जैन व बौद्ध धर्माच्या शिकवणुकीनुसार मद्यपान व मद्यविक्री यांना परवानगी नव्हती. भिक्षूंनी तर मद्याला स्पर्शही करू नये, मद्य साठवून ठेवलं असेल अशा जागी राहू नये, असं बुद्ध व महावीर या दोघांनीही सांगितलं होतं. मात्र, अगदी गंभीर अशा आजारपणात बौद्ध व जैन भिक्षूंना माफक मद्यपानाची परवानगी होती.

डोंगरांतील झर्‍यांमधून वाहत आलेलं पाणी पिण्यासाठी साठवून ठेवत. हे पाणी गाळण्यासाठी बौद्धसंघांत आठ प्रकारच्या गाळण्यांचा वापर केला जाई. एका लंबुळक्या लाकडी पेटीच्या दोन टोकांना कापडी जाळी बसवलेली असे. या जाळीतून गाळलेलं पाणी पेटीच्या मधल्या कप्प्यात जमा होई. या गाळण्याला दण्ड परिस्सवन असं नाव होतं. चार समांतर नळ्यांच्या तोंडावर कापड बांधून तयार केलेल्या गाळण्याला ओठ्ठनिका म्हणत. धम्मकरक या प्रकारात एकावर एक तीन मडकी रचून ठेवत. वरच्या दोन मडक्यांमध्ये वाळूचे थर असत. सर्वांत खालच्या मडक्यात शुद्ध पाणी गोळा होई. याशिवाय कफनीचं टोकही पाणी गाळण्यासाठी वापरत असत. गाळून शुद्ध केलेलं पाणी मोठाल्या माठांमध्ये ठेवत. हे माठ ठेवण्यासाठी लाकडी किंवा दगडी तिवया बुद्धानं मुद्दाम करवून घेतल्या होत्या. जैन भिक्षू शक्यतो पावसाचं पाणी साठवून वापरत. तांदूळ, तीळ व जवस धुण्यासाठी आणि कणीक भिजवण्यासाठी वापरलं जाणारं पाणी वेगळं साठवून ठेवलं जाई. हे पाणी पिण्यास जैन भिक्षूंना परवानगी नव्हती.

स्वयंपाकघरात बसून जेवू नये, तसंच तिथे धान्य, मसाले वगैरे साठवून ठेवू नयेत, असं बुद्धानं सांगितलं होतं. जेवणघराला उपस्थानशाला व साठवणुकीच्या खोलीला कप्पभूमी अशी नावं होती. श्रीमंतांच्या घरी खास स्वयंपाकी असत. गृहिणीला स्वयंपाकाचा किंवा गृहस्थाला रोज तेच ते खाऊन कंटाळा आला, तर बाजारातून तयार जेवण विकत आणण्याची सोय होती. या दुकानांना ओदनियघर म्हणत. इथल्या स्वच्छतेवर, पदार्थांच्या दर्जावर खास लक्ष ठेवलं जाई. त्यासाठी अधिकार्‍यांची नेमणूक होत असे. बुद्धानंही भिक्षुसंघात अन्नवाटपासाठी व जेवणाच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकार्‍यांची नेमणूक केली होती.

बौद्ध भिक्षू तांबं, लाकूड किंवा मातीपासून तयार केलेली भांडी वापरत असत. धनिकांघरी सोन्याचांदीची भांडी असत. या भांड्यांवर मौल्यवान रत्नं असत. सर्वसामान्य लोकांच्या घरीं तांब्याची, लाकडी किंवा मातीची भांडी आणि गरीबांच्या घरीं पत्रावळ्या, पानांपासून तयार केलेली भांडी (पण्णपुट) किंवा मडकी असत. बौद्ध भिक्षू मातीची भांडी वापरत. मात्र एखादा भिक्षू जर अति वेंधळा किंवा भांडी फोडण्यात अति तरबेज असेल, तर त्याला तांब्याची किंवा लाकडी भांडी आणि पखाली वापरण्याची परवानगी होती. प्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेली भांडी भिक्षूंनी वापरू नयेत, असा बुद्धाचा आदेश होता. प्रत्येक भिक्षूकडे पाणी साठवण्यासाठी एक मोठं भांडं (भृंगार), पाणी पिण्यासाठी लहान पेला (सरक), पाणी साठवण्याची मोठी पिशवी (ठाविका), एक मोठी टोपली (पिटक), भात, भाज्या शिजवण्यासाठी एक भांडं (कुम्भी) आणि एक तवा (कडपिय) असे. जेवण्यासाठी एक ताट (तट्टक) व एक लहान ताटली (परियोग) असे. आजारी भिक्षू पिकदाणीचाही वापर करत. विनयपिटकात तसे उल्लेख सापडतात. पिकदाणीचा हा भारतातला पहिला उल्लेख. भिक्षा मागण्यासाठी भिक्षापात्राचा वापर करणं सक्तीचं होतं. भिक्षापात्रातील भिक्षा खराब होऊ नये, म्हणून त्यावर एक झाकण असे. या झाकणाला पिण्डोपधान असं म्हणत. बौद्धसंघात भिक्षा मागून आणलेलं अन्न साठवण्यासाठी मोठाली भांडी असत. पातळ पदार्थ साठवण्यासाठीच्या भांड्याला आलिंदा आणि इतर पदार्थ साठवण्यासाठीच्या भांड्याला गोपिटक असं म्हणत. जैन ग्रंथांमध्ये भाज्या व फळं कापण्यासाठी सुरी ( सथ्थ), गाळणी (खलग), खल (खारगालण), पाणी उकळण्यासाठी किटली (सुफणी), लहान भांडी (कराई), मोठी भांडी (वराई), पातेली (पिहडई), पाणी साठवण्यासाठी माठ (घडई), कळशी (कळसई), सुरई (उथ्थिय) इत्यादी भांड्यांचे उल्लेख सापडतात.

अतिथीची सेवा करणं हे प्रत्येक बौद्धधर्मियाचं कर्तव्य आहे, दारावर आलेल्या भिक्षेकर्‍याला अन्न दिल्यानं पापं धुवून निघतात, स्वार्थ नाहीसा होतो, असं बुद्धानं सांगितलं होतं. भुकेल्याला अन्न नाकारणं हे त्यामुळे मोठं पाप समजलं जाई. जैन ग्रंथांतदेखील प्रत्येक पाहुण्याचं योग्य ते आतिथ्य करण्याबद्दल सांगितलं आहे. दारी आलेला अतिथी चांडाळ जरी असला, तरी तो पोटभर जेवल्याशिवाय परतू नये, असं उत्तराध्ययनसूत्रात सांगितलं आहे. 'खालच्या जाती'तल्या व्यक्तीकडून अन्नग्रहण करण्यानं अन्न दूषित होत नाही, असा निर्वाळा बुद्धानं व महावीरानं दिला होता. अन्न नीट शिजवलेलं नसलं तरी अन्नाचा अव्हेर करू नये, अशीही बुद्धाची शिकवण होती.

आपल्या कुण्या शिष्यानं गैरमार्गानं अन्न मिळवू नये, याबाबत बुद्ध दक्ष असे. वाईट मार्गानं मिळवलेल्या अन्नापेक्षा एखाद्या कुत्र्याचं उष्ट खाणं बरं, असं त्याचं मत होतं. भिक्षूनं एखादं पाप, अथवा कुकर्म केल्यास त्याला संघाबरोबर जेवण्यास बंदी घालण्यात येत असे. अन्नाचा अव्हेर केल्यासही हीच शिक्षा होती. ब्राह्मण व क्षत्रियांमध्ये प्रचलित असणार्‍या शुद्धाशुद्धतेच्या कल्पनांपेक्षा अतिशय वेगळी अशी ही मतं होती. जातककथांमध्ये त्या काळी प्रचलित असलेल्या या रुढींचा उल्लेख येतो. ब्राह्मणांना क्षत्रियांनी रांधलेलं खाण्यास हरकत नसे, मात्र शूद्रांच्या हातचं अन्न कधीही खाल्लं जात नसे. उष्टं अथवा शूद्राच्या हातचं खाल्ल्यास वाळीत टाकत असत. चांडाळाच्या हातचं जेवून पश्चात्ताप करणारा ब्राह्मण, शूद्र पत्नीच्या पोटी जन्माला आली म्हणून आपल्या मुलीच्या हातचं पाणी न पिणारा क्षत्रिय, चांडाळांनी भात करण्यास वापरलेल्या पाण्यास स्पर्श केला म्हणून वाळीत टाकले गेलेले ब्राह्मण आपल्याला या जातककथांत भेटतात. बुद्ध व महावीराची शिकवण मात्र सर्वस्वी वेगळी होती. या दोघांनीही अस्पृश्यतेला कधीही थारा दिला नाही.

सकाळी गृहिणीचा स्वयंपाक झाला असेल, पण घरची जेवणं व्हायची असतील अशा वेळी भिक्षा मागावी, असं बुद्धानं सांगितलं होतं. जेवणं व्हायच्या आधी भिक्षा मागितली म्हणजे ताजं, गरम अन्न मिळतं, आणि तपश्चर्या करायची असेल, तर भिक्षूनं तब्येत सांभाळली पाहिजे, असं बुद्धाचं मत होतं. महावीरानं मात्र आपल्या भिक्षूंना घरची जेवणं झाल्यावर भिक्षा मागायचा आदेश दिला होता. भरल्या पोटी तप होत नाही, आणि त्यामुळे भिक्षा जितकी कमी तितकी उत्तम, असं महावीरानं सांगितलं होतं. उपासाला सर्वाधिक महत्त्व होतं. सर्वाधिक उपास करणारा भिक्षू सर्वोत्तम समजला जात असे.

शिष्यांनी उत्तम खावं असं वाटत असलं तरी मर्यादित अन्नसेवनासाठी बुद्धानं काही नियम घालून दिले होते. दुपारनंतर जेवणास मज्जाव होता. गरजेपेक्षा जास्त जेवणं अयोग्य समजलं जाई. अन्नपदार्थांची साठवणूक करण्यास परवानगी नव्हती. मात्र आजारी भिक्षूंना लोणी, तूप, तेल, साखर असे पदार्थ दिले जात, व आठवडाभर हे पदार्थ साठवण्यास बुद्धाची हरकत नव्हती. एका वेळी भिक्षेमध्ये तीन भांड्यांपेक्षा अधिक भिक्षा स्वीकारण्यास परवानगी नव्हती. जैन भिक्षूही याच नियमांचं पालन करत असत. काही भिक्षू केवळ तळहातावर मावेल एवढ्याच अन्नाचा स्वीकार करत. उपास केल्यानं शरीराचं सामर्थ्य वाढतं, आणि त्यामुळे मिताहार उत्तम, अशी महावीराची शिकवण होती.

बुद्ध व जैन भिक्षूंनी चमचमीत पदार्थ खाऊ नयेत, रोजचा आहार अतिशय सात्त्विक असावा, या नियमाची कडक अंमलबजावणी होत असे. सकाळच्या न्याहारीत ताकभात, दुपारी जेवणात भात आणि एखादी भाजी, त्यानंतर दुपारी भूक लागल्यास तूप, लोणी, मध किंवा काकवी घालून केलेला एखादा लाडू. भिक्षू रात्री जेवत नसत. झाडांची पानं, कंदमुळं, मध, मोहरी घालून शिजवलेला, मुळा, कमळाचं देठ, बोरं, आवळे खाऊन राहणारे काही भिक्षूही होते. काही दिगंबर जैन भिक्षू उभ्यानेच जेवत, जेवल्यानंतर हात धुण्यासाठी पाणी न वापरता चाटून स्वच्छ करत. या दिगंबर भिक्षूंना मांसाहर वर्ज्य होता व भात, तांदळाची पेज, गवत व झाडांवरून पडलेली फळं खाऊन हे भिक्षू जगत असत. काही बौद्ध भिक्षूंना मात्र मांसाहार वर्ज्य नव्हता व हे भिक्षू आंबे, कांदे, लसूण आवडीने खात असत. मद्यपान मात्र पूर्णपणे वर्ज्य होतं. मसालेदार व गोड पदार्थांची चटक लागू नये, म्हणून एखाद्या मंगल समारंभाप्रसंगी भिक्षा मागणे टाळावे, असा सल्ला भिक्षूंना दिला जात असे. सुदृढ भिक्षूनं भिक्षा म्हणून तूप, लोणी, साखर, तेल, मासे, दूध, दही, मांस यांची मागणी गृहिणीकडे करू नये, असा बुद्धाचा आदेश होता. अर्थात, गृहिणीने स्वतःहून वाढलंच तर काकवी, तेल, तूप, लोणी, दही, दूध, मासे, मांस यांचा स्वीकार करण्यास बुद्धाची हरकत नव्हती. जैन भिक्षूंनीही तूप, लोणी, साखर, तेल, दही अशा बलवर्धक पदार्थांचं सेवन करू नये, असा दंडक होता, कारण या पदार्थांमुळे 'शरीरास अतिरिक्त ऊर्जा मिळते, व ज्याप्रमाणे पक्षी फळांनी लगडलेल्या झाडाकडे धाव घेतात, त्याचप्रमाणे या शक्तीमुळे इच्छा शरीरात प्रवेश करतात'. त्यामुळे फार चमचमीत पदार्थ नियमितपणे न शिजवणार्‍या किंवा कोरडे पदार्थ वाढणार्‍या घरींच भिक्षा मागण्याकडे भिक्षूंचा कल असे. अन्नावर वासना जडू नये, म्हणून खात असलेल्या पदार्थाची कृती, त्या पदार्थाचे घटक, यांबद्दल विचार करण्यासही मज्जाव होता. आपण काय व किती खाल्लं, याचा उल्लेखही करू नये, असं जैन भिक्षूंना सांगितलं जात असे.

अन्नपदार्थांच्या शुचितेबाबत आणि जेवताना पाळायच्या स्वच्छतेबाबत भगवान बुद्ध व महावीर अतिशय आग्रही होते. दातकोरणीनं दात स्वच्छ केल्याशिवाय भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना जेवायची परवानगी देत नसत. जेवणानंतरही दात स्वच्छ करणं सक्तीचं होतं. जेवताना प्यायचं पाणी दोनदा गाळून घेतलेलं असे. फळं, भाज्या खाण्यापूर्वी त्यांवर किडे, मुंग्या नाहीत, याची खात्री केली जात असे. याच कारणामुळे सूर्यास्तानंतर काहीही खाऊ नये, असा संकेत होता. कीटक व हिरवी झाडं नसलेल्या व चारही बाजूंना भिंती असलेल्या ठिकाणी जेवावं, असा जैन भिक्षूंचा संकेत होता. जेवताना जमिनीवर एक स्वच्छ कापड अंथरलं जाई. बौद्धसंघातील काही मंडळी मात्र लाकडी बाकांवर बसून जेवत. मोठ्या खाद्यगृहांमध्ये लाकडी बाकांवर मऊ उशाही असत.

भिक्षूनं जेवताना पाळायचे नियमही बुद्धानं घालून दिले होते. घास घेताना पूर्ण तळहात वापरू नये. तोंडात घास असताना बोलू नये. भाताचे गोळे करू नयेत. मोठा घास घेऊ नये. उष्टा हात हलवून भाताची शितं, अन्नाचे कण उडवू नयेत. जेवताना जीभ बाहेर काढू नये. तोंडाचा आवाज करू नये. तिखट लागल्यास 'स्स्स्स्स' असा आवाज करू नये. बोटं चाटू नयेत. उष्ट्या हातानं भांडं उचलू नये. भातात फार भाजी घालू नये. किंवा भात कोरडाही खाऊ नये. संघात प्रत्येकाला सारखंच जेवण दिलं जाई, आणि सर्वांत ज्येष्ठ भिक्षूही प्रत्येकाचं पान वाढून झाल्याशिवाय जेवायला सुरुवात करत नसे. एकट्यानं चमचमीत पदार्थ (उत्तरीभण्ग) खाणंही अशिष्ट समजलं जाई. गावात भिक्षा मागून इतरांपेक्षा अगोदर पोहोचलेले भिक्षू ताटवाट्या मांडणे, पाण्याची व्यवस्था करणे, हाततोंड पुसायला स्वच्छ पंचे तयार ठेवणे अशी कामं करत. जेवणं झाल्यानंतरची आवरासावर, स्वच्छता उशिरा परतलेले भिक्षू करत.

बुद्धानं वेळोवेळी घालून दिलेले सर्व नियम पाळणारा तो उत्तम भिक्षू. बुद्धानं उत्तम भिक्षूची काही लक्षणं सांगितली होती. अन्नासाठी प्राणिहत्या न करणं, भिक्षेमध्ये एका घरी एकच पदार्थ स्वीकारणं, अवेळी न जेवणं, मांसाहारी पदार्थ व न शिजवलेले अन्न न स्वीकारणं, जेवताना मऊ आसनं किंवा खुर्च्यांवर न बसणं ही त्यांपैकी काही लक्षणं होती.

दहाव्या शतकानंतर बौद्ध धर्म भारतातून नाहीसा झाला, आणि मग हे नियमसुद्धा विस्मृतीत गेले. बुद्धाची शिकवण विसरू नये, म्हणून बौद्ध भिक्षू किरमिजी रंगाची वस्त्रं परिधान करत असत. मोराच्या मांसाचा रंग म्हणे किरमिजी असतो. हे मांस कधीच कुजत नाही, अशी समजूत. बुद्धाची शिकवणसुद्धा कायम अशीच अमर राहावी म्हणून किरमिजी वस्त्रं आली. आज उरले आहेत ते फक्त रंग. किरमिजी, पांढरा, निळा, भगवा, हिरवा. बुद्ध आणि महावीरानं दाखवलेली वाट आपण कधीच सोडून दिली आहे.

मागे एकदा दुर्गाआजीकडे गेलो तेव्हा खाली कसली तरी सभा सुरू होती. आजीच्या घरासमोर बरीच जुनी पारशी घरं होती. संध्याकाळी सगळे आजीआजोबा दारात बसून असत. कुठे कोणाकडे एखादं सेरेनाद वाजत असेल तितकंच, पण बाकी पूर्ण शांतता. त्या दिवशी मात्र बराच गोंधळ होता. सभेत तीन वक्ते होते. 'पारशी मूळचे शाकाहारी, आपल्याला असिरियन व बाबिलॉनियनांनी मांसाहाराची सवय लावली. हा काही शुद्ध धर्म नव्हे. आपण क्रांती करायला हवी, मांसाहाराला विरोध करायला हवा. असं केलं तरच आपण खर्‍या धर्माचं आचरण करू' वगैरे वगैरे.

आजी खिडकीत उभी राहून हे ऐकत होती. मग म्हणाली, 'स्वयंपाकाचा आणि संस्कृतीचा संबंध आहेच. 'संस्कृ' याचा अर्थच मुळी स्वयंपाक करणे. स्वयंपाकाला, अन्नाला धर्मात स्थान मिळालं ते यामुळेच. बुद्धानं आणि महावीरानं म्हणूनच तर सगळ्या गोष्टींचा विचार केला होता. पण आपण त्यांनी जे सांगितलं ते पार विसरलो. कारण आपण सगळेच फार पोकळ आहोत. बुद्ध काय किंवा महावीर काय.. दोघांच्याही अनुयायांनी युद्धं केली, रक्तपात केला. करुणा आणि अहिंसा फक्त खाण्यापुरती मर्यादित ठेवून काय उपयोग? तृष्णा, मोह यांचा त्याग करायचा तर ही करुणा आणि अहिंसा सर्वव्यापी हवी. आज आपण काय बघतो? आपल्यापेक्षा वेगळं खाणार्‍यांना आपण घरं देत नाही. बुद्धानं कधी कोणाचा दुस्वास केला नाही, पण भारतातला आजचा बौद्ध धर्म तिरस्कारावर उभा आहे. धर्मात सांगितलेली तत्त्वं पाळायची असतात ती आपल्या बुद्धीला जागं ठेवून. बुद्धी झोपली की आपण असहिष्णू होतो. मग आपण परमेश्वर नाही असं मानणार्‍या बुद्ध आणि महावीरासारख्या माणसांना देवत्व देतो. या गोष्टी काहींना पटत नाहीत. मग ते स्वतःचा मार्ग शोधतात. बहुसंख्यांची बुद्धी झोपली की आपला मार्ग आपणच शोधायचा असतो. बुद्ध आणि महावीरानं वेगळं काय केलं आणि सांगितलं?'

खारकेसारखी सुरकुतलेली आजी खिडकीतून ती भाषणं नंतर परत ऐकत बसली. मग जरा वेळानं शांतपणे खिडकी बंद करून टाकली.

त्या मंचकावर आता मला जरा बरं वाटतं. शेजारी पडलेल्या दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा फारसा त्रास आता होत नाही.

bamiyan.jpg

***
लेखात वापरलेली सर्व चित्रे प्रताधिकारमुक्त.
***

संदर्भ -

1. Early Buddhist Jurisprudence - Ms. Durga Bhagwat, Thesis published by University of Bombay, 1933.

2. Buddhist Children's Stories - Nishu Utsuki, Bureau of Buddhist Books, Kyoto, 1937.

3. Buddhist Jataka Tales of Ancient India - E. Ueders, Oriental Publishers, Birmingham, 1922.

4. Buddhist Layman's Code of Discipline - A. P. Thera, Buddhist Information Centre, Colombo, 1969.

5. Buddhist Maharashtra : A Cultural Study - Thesis submitted to Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad - Sheshrao Kachraji Meshram, 1988

6. Buddhist Suttas - T. W. Rhys Davids, Motilal Banarasidas Publishers Pvt. Ltd., New Delhi, 2001

7. Buddhist Texts through the Ages - E. Conze, Oxford University Press, 1953.

8. Buddhism and Buddhist Civilization in India - R. C. Dutt, Seema Publications, New Delhi, 1983.

9. Les Inscriptions de Piyadasi - M. Senart, Paris, 1934.

10. Jain Culture - Dr. Mohan Lal Mehta, P. V. Research Institute, BHU, Varanasi, 1969.

11. बुद्धघोसाचरियविरचितो विसुद्धिमग्गो (हिन्दीरूपान्तरसहितो) - संपा. स्वामी द्वारिकादासशास्त्री, बौद्धभारती, वाराणसी, १९९२.

12. Last Days of the Buddha - The Maha Parinibbana Sutta - Sister Vajira and Francis Story, Buddhist Publication Society, Sri Lanka, 1988.

13. Buddhist Stories from the Dhammapada Commentary - E. W. Burlingame, Buddhist Publishing Society, Kandy, Sri Lanka, 1982.

14. Jain Culture - A Comprehensive View - P. K. Srivastava, University of Calcutta, 1954

लेखातील संदर्भ बृहत्कल्प सूत्रभाष्य, जातककथा, विनयपिटक, उपासकदशांग, अकारांगसूत्र, उत्तराध्यायनसूत्र, प्रज्ञापनासूत्र, घतिकासूत्र, रट्ठपालसूत्र, अण्गुत्तरनिकाय, विपाकसूत्र, सूत्तनिपात, धम्मपद, भिक्खुनि पातिमोक्ख या ग्रंथांतून घेतले आहेत.

***

स्रोत -

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे, यांचे ग्रंथालय व एशियाटिक लायब्ररी, मुंबई.

***

क्रमशः

Protected by Copyscape Online Plagiarism Tool
प्रकार: 

चिनूक्स, तुझे लेख म्हणजे मनप्रसन्न मेजवानी असते! हा लेखही सुंदर, रोचक व माहितीपूर्ण! Happy

चिनूक्स, काय लिहू? नेहमीप्रमाणेच अत्यंत अभ्यासपूर्ण नि उत्तम लेख. खरंच, असे लोक मायबोलीवर आहेत नि त्यांचं साहित्य नियमित वाचायला मिळतं ही केवढी अभिमानाची गोष्ट.

नेहेमीप्रमाणेच अप्रतिम ,अभ्यासपूर्ण लेख !
दुर्गाआजींचे विचार सर्वांनाच पटले आणि 'पचले' असते तर अजून काय हवं होतं ? Happy

उत्कृष्ट लेख.

>>सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मनुस्मृतिसारख्या ग्रंथांत मांसाहाराची निंदा करणारे ५४ श्लोक समाविष्ट केले गेले. यज्ञात बळी देणार्‍या व मांस विकणार्‍या ब्राह्मणाला घरी जेवायला बोलावू नये, असं मनुस्मृतित सांगितलं गेलं

या विषयी अजून वाचायला आवडेल. एखाद्या ग्रंथात असे नवे श्लोक कसे समाविष्ट केले गेले, आणि जर मांसाहार ही सर्वमान्य संस्कृती होती तर नुसता ग्रंथ बदलून शाकाहारी कशी काय झाली? की आधी लोक शाकाहारी झाले आणि मग ग्रंथ बदलले गेले? जुन्याकाळी संपर्काच्या, संवादाच्या संधी, साधने मर्यादित असूनही नवे नियम, नव्या चालीरीती कश्याकाय पसरल्या?

मृदुला,

विचार बदलले, पटले नाहीत म्हणून ग्रंथांमध्ये भर पडत गेली.. मनुस्मृति काय, किंवा वेद काय, या ग्रंथांत बळी कसा द्यावा याची वर्णनं आहेत, आणि बळी देऊ नये, असंही सांगितलं आहे. शाकाहाराकडे जसजसा लोकांचा ओढा वाढू लागला, तसतसे या ग्रंथांमध्येही बदल झाले, आणि या ग्रंथांमधले नियम सर्वांनी पाळावेत, असं सांगितलं गेलं.

उत्तम!!
पण हयावेळचा विषय मांसाहार असल्याने मी नेहमीसारखा आस्वाद घेऊ शकले नाही. Sad त्यातही पहिला परीच्छेद वाचताना शहारे आले Sad
सॉरी.

अतिशय उत्तम. _/\_
सादरीकरणासकट उत्तम. संशोधन तर नेहमीच उत्तम होते, प्रत्येक लेखागणिक त्यात मानवीकरण, सुलभीकरण आणि लेखकाचा दृष्टीकोण दिसायला लागले आहे.

मराठी प्रकाशकांना फु.स. - छापा. Proud

(रच्याकने: जातक कथा वाचायला जरा बोर. सारखं काय अमक्या जन्मात असं, आणि तमक्या जन्मात तसं. बुद्धाला किंवा अनुयायांना का गरज पडली एवढ्या जन्मजन्मांतरीचा चिरंतन व्यक्तिपूजक मोठेपणा सिद्ध करायची ? हे काही पटले नाही. )

उत्तम लेख, माहितिपुर्ण आणि रंजकहि _/\_. आपला देश, आपलि संस्कृति, आपले पुर्वज खुप पुढारलेले होते अस नेहमि ऐकण्यात/वाचण्यात येत पण त्याचे पुरावे मात्र क्वचित मिळतात. 'पुर्वि गृहिणिंना क्वचित का होइना पण स्वयंपाकाचा कंटाळा यायचा आणि पर्याय म्हणुन उत्तम दर्जाचि खात्रि असलेल अन्न सहज उपलब्ध होत' हे वाचुन मात्र खरच आपण आधि खुपच पुढारलेलो होतो अस वाटायला लागलय.

उत्तम लेख नेहमीप्रमाणेच. या लेखमालिकेचे पुस्तक यावे व आल्यास नक्की घेणार. दुर्गाआजींच्या परिच्छेदास अनुमोदन.

करुणा आणि अहिंसा फक्त खाण्यापुरती मर्यादित ठेवून काय उपयोग? तृष्णा, मोह यांचा त्याग करायचा तर ही करुणा आणि अहिंसा सर्वव्यापी हवी. आज आपण काय बघतो? आपल्यापेक्षा वेगळं खाणार्‍यांना आपण घरं देत नाही.>> खुपच मार्मिक. हवेतील जीवजंतु मारले जाउ नयेत म्हणुन तोंडाला कापड बांधणार्‍या धर्मात sex ratio मात्र १०००:८०० आहे.

फार सुरेख. मोहाचा त्याग करता यावा यासाठी आध्यात्मिक पातळीपासून अत्यंत व्यवहारी पातळीपर्यंत असा केवढा खोल, विस्तृत विचार झालाय! थक्क करणारे आहे आणि विचारात पाडणारेसुद्धा आहे.
या सर्वच लेखांमध्ये जी सुसूत्रता आहे तिला तोड नाही रे. एवढा माहितीचा धबधबा झेलतानाही कुठे घाबरायला होत नाही, दडपण येत नाही. हळूहळू जिरवता येत आहे. शिवाय या सर्वच लेखांना जी सविस्तर व विस्तृत संदर्भसूची आहे त्यामुळे लेखांची विश्वासार्हता वादातीत ठरते. विश्वासार्हता म्हणजे आतापर्यंत झालेल्या संशोधनाशी पूर्ण प्रामाणिक राहणे अश्या अर्थाने अपेक्षित. रैनाला मानवीकरणाबाबत अनुमोदन. मानवीकरण होत आहे, तरीसुद्धा अभिनिवेश वाटत नाही. अभिनिवेश न ठेवता लिहिणे किती अवघड काम आहे याचा केवळ अंदाजच करू शकतो.
शेवटच्या परिच्छेदाइतका अचूक सारांश पाहिला नाही.

चिनूक्सा! धन्यवाद रे. माहितीचा धबधबा अगदीच. मग त्यात त्याचा ओघ, भरीव नितळपणा पाहून अवाक होणं आणि त्याखाली उभं राहून बर्‍याच चिंब करणार्‍या पण किंचीत टोचर्‍या थेंबाचे लाड पुरवणं ही आलं! थांबू नकोस.
सुरुवात आणि शेवट यांची इतकी सुंदर गाठ एखाद्या मोत्यांच्या माळेला शोभेल अशी. Happy

लसूण खाण्यास मात्र परवानगी नव्हती, कारण मग तोंडाला वास येई आणि इतर भिक्षूंना त्याचा त्रास होत असे. >> रच्याकने, यावर उपाय आहे. लसूण खाणं आरोग्यासाठी उत्तम आहे त्यामुळे दर्प जाण्यासाठी चिमूटभर गूळ खावा.

मांसाहाराला विरोध करणारे उतारे वाचून फार मस्त वाटलं. त्याबद्दल खास धन्यवाद.
लेख छान चिकाटिने लिहिला आहे. त्यामागचे परिश्रम जाणवतात.

माझी माहिती चुकीची असु शकते कारण माझा ह्या विषयातला व्यासंग फारसा नाही ,पण कांदा,लसुण खाल्ल्याने कामेच्छा बळावते असे आयुर्वेद सांगते , म्हणुनच जैन ,बौध्द भिक्षूंना कांदा लसुण वर्ज्य केलेले असते असे कुठेतरी वाचलेले आठवते.

Pages