टोमाटियोची आमटी.

Submitted by मेधा on 3 October, 2010 - 16:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी तुरीची डाळ, शिजवून
५-६ मध्यम टोमाटियो
सुकी मिरची, मोहरी कडिपत्ता, हिंग , हळद , तेल फोडणीसाठी
मीठ,
धने जिरं पूड १ च चमचा
मालवणी मसाला १-१/२ च चमचा
.

क्रमवार पाककृती: 

या दिवसात फार्मर्स मार्केट मधे टोमाटियो खूप मिळतात. हिरव्या टोमेटो सारखं दिसणारं फळ- याला बाहेरुन अगदि पातळ आवरण असतं. मेक्सिकन स्वैपाकात याचा साल्सा करतात. दरवेळेस साल्सा काय करायचा म्हणून एकदा आमटी करुन पाहिली.

टोमाटियो चं आवरण काढून, धुउन, मध्यम चिरुन घ्यावेत.
पातेल्यात तेल गरम करून फोडणी करावी. त्यावर चिरलेले टोमाटियो घालावेत म मध्यम आचेवर ४-५ मिनिट परतावेत. मग त्यावर शिजलेली डाळ घालावी. धने जिर्‍याची पूड व मालवणी मसाला घालावा.
चवीपुरते मीठ घालावे व उकळी आल्यावर २ मिनिटांनी गॅस बंद करावा.
मालवणि मसाला नसल्यास लालतिखट व थोडासा गरम मसाला घालता येईल.

वाढणी/प्रमाण: 
४-५ लोकांना
अधिक टिपा: 

tomatillo (Physalis philadelphica) या नावाने शोधल्यास फोटो अन इतर रेसिपी पण सापडतील. जराशी आंबटसर चव असते. थोडासा चीक पण अस्तो त्यामुळे कच्चे चांगले लागत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे तुमचा प्रयोग. इथे भारतात हिरवे टोमॅटो वापरून करून पहायला हरकत नाही. गोडा मसाला वापरल्यास भाजी छान आंबट-गोड होईल असे वाटते.

फोटू टाकायचा की..

मला शीर्षक वाचल्या वाचल्या चायनीज टोयो आमटीत माटी वगैरे घातलीये की काय असे वाटून गेले एकदम... Happy

हे तर इथे कोकणात असत. आम्हि शाळेत जाताना रस्त्यावरचे तोडुन खयचो. पण त्याचा आकार फार छोटा असायचा. अगदी मटार एवढा.

मी नेटवर फोटू पाहिले आणि अगदी रिमासारखेच वाटले. कोकणात काय इथेही भरपुर आहेत. आजउद्या फोटो टाकते म्हणजे जाणकारांनी सांगावे हेच का ते ते....

रिमा आणि साधना तूम्ही म्हणताहात त्या गूजबेरीज. महाबळेश्वरला मिळतात. त्या पिकल्यावर
पिवळ्या होतात. आणि फळवाल्यांकडे मिळतात. आता शहरातदेखील मिळतात. पण त्याला
फळवाले काय म्हणतात ते माहित नाही.
हि भाजी मात्र आकाराने मोठी असते. कदाचित कूळ एकच असेल, पण भाजी नक्कीच वेगळी आहे.

मेधा, आयडिया मस्त आहे. करुन पहाणेत येईल. अत्तापर्यन्त याचा फक्त सालसा केला होता. आता हे देखील करेन Happy

रिमा आणि साधना तूम्ही म्हणताहात त्या गूजबेरीज.

दिनेश त्या माहित आहेत मला. त्या वेगळ्या. त्यांना इथले भय्ये फळवाले रसभरी म्हणतात. मी जे म्हणतेय ते भाजीच्या मळ्यात weed म्हणुन उगवते. माझ्या कुंडीत एक आलेले. त्याची फळे पाहुन मी खुश झाले. म्हटले घरच्या घरी रसभरी मिळताहेत. पण ती साधारण बेबी टोमॅटोएवढी/जरा लहान होऊन पडुन गेली, शेवटपर्यंत हिरवा रंग सोडला नाही त्यांनी. फोडुन पाहिले तर आतली रचना पुर्ण गराने आणि टोमॅटो/वांग्याच्या बियांसारख्या बियांनी भरलेली. तशी रसभरीही अशीच असते. पण ती पिकल्यावर मस्त लागते. मी बघते कुठे दिसते का ते आणि फोटु टाकते.

हो ते झाड बघितलेय मी (लहानपणी आम्ही पण खायचो त्या. आंबटच लागायच्या. पण जास्त खाल्ल्या तर डोके दुखायचे.) पण ती फळे पिकत नाहीत. गूजबेरीचाच रानटी प्रकार आहे तो.

माझ्या आजोळी , उत्तर कर्नाटकात, व कारवारच्या दक्षिणेला समुद्र किनार्‍यालगतच्या भागात कोकणीत चिरपुट म्हणून ओळखलं जाणारं एक फळ पण याच कुळातलं आहे. पिकल्यावर जांभळट- गडद गुलाबी होतात अन आंबट गोड लागतात असं ऐकुन आहे. छोटी झुडुपं माळावर, डोंगर दर्‍यांमधून जंगली वाढतात. मी कधी खाल्ली , पाहिली नाहीत. पण त्याची भाजी करत नाहीत. मुलांचा रानमेवाच फक्त.

आमच्याकडे कोकणात ही फळं 'चिबडं' म्हणून मिळतात/खातात. (चिबूड नव्हे चिबडं )
कोकणात रानात, विशेषतः हळदीच्या वाफ्यात वगैरे उगवतात. पण खूप लहान असतात. मटार पेक्षा थोडी मोठी.. Happy
पिकल्यावर खातात... Happy

http://images.google.com/images?hl=en&source=imghp&biw=1152&bih=652&q=to...

कोकणात मिळातात ती चिबडं आवळ्यासाईजची असतात. त्यांची आंबटगोड चटणी करतात चुलीत भाजून गूळ वगैरे टाकून.

वरच्या फळाची भरली टॉमेटो सारखी भाजी गूळ टाकून, नाहीतर चिकन अचारी मध्ये अचार मसाला टाकून पन मस्त लागते.
कैच्याकै आंबट असतात मात्र.

एकदा बॉबीफ्लेने मस्त ग्रिल करून ब्रॉउन शुगर टाकून व बटर टाकून सॉस करायची रेसीपी दाखवलेली.