ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग ५

Submitted by बेफ़िकीर on 24 September, 2010 - 03:00

कॉलेज सुरू होऊन पंधरा दिवस झाले आणि रूम नंबर २१४ मधील चारही मने एकमेकांमधे मिसळून एक पाचवाच रंग तयार होऊ लागला. रोज निदान अर्धी बाटली तरी संपायला लागली. आता आत्मानंदच्या कानावर ओल्ड मंक, नंबर वन व्हिस्की, ओ.सी., ब्ल्यु रिबॅन्ड वगैरे नावे पडू लागली. तो अजूनही लांब बसून सर्वांकडे टक लावून बघत बसायचा आणि मनातल्या मनात जप करायचा. सगळ्यांचे पिणे झाले की हातातल्या भांड्यातील पाणी सगळ्या खोलीत शिंपडायचा अन मगच झोपायचा. कित्येकदा त्याची थट्टा करण्यासाठी मग वनदास पुन्हा त्याने शिंपडलेल्या पाण्यावरून बाटलीतले काही थेंब शिंपडायचा. दारू अशी शिंपडल्यामुळे मग दिल्या वनदासला एक फटका लावायचा. मग तिघेही हसत हसत झोपायचे.

आत्मानंद प्रत्येक लेक्चरला मात्र बसायचा. अगदी सिन्सियरली बसायचा. त्याच्या वह्या भरू लागल्या होत्या. अक्षर मोत्याच्या दाण्यांसारखे होते. स्पेलिंग मिसटेक नाही, खाडाखोड नाही. प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर गणेशाची व स्वामी समर्थांची प्रार्थनेची एक एक ओळ! सुबक प्रकरण होते सगळे! त्याला खोलीचा एक कोपरा मिळाला होता. त्या कोपर्‍यात त्याच्या दोन बॅगा आणि सर्व किरकोळ सामान, कपडे वगैरे असायचे. अभ्यास नसेल तेव्हा तो नामस्मरण करत बसायचा. पण लक्ष सगळं या तिघांकडे ठेवायचा. लक्ष ठेवण्याची तीन प्रमुख कारणे होती. एक म्हणजे दिल्या कधीही कुणालाही फटका लावायचा. तो आपल्याला बसू नये असे आत्मानंदला प्रामाणिकपणे वाटायचे. दुसरे म्हणजे स्त्री या विषयावर काही अद्भुत चर्चा व्हायची अन त्यातून मन सुखवायचे. आणि तिसरे म्हणजे पिऊन ते तिघे गोंधळ घालायला सुरुवात करायचे. या गोंधळात काहीही व्हायचे. आपली कोणतीही वस्तू त्यात नष्ट होऊ नये अशी इच्छेने आत्मानंद सगळे झोपेपर्यंत जागाच राहायचा.

आत्मानंद ठोंबरे! आजवर अत्यंत सुरक्षित वातावरणात व धार्मिक संस्कारात वाढलेल्या या मुलावर त्याच्या आजी आजोबांच्या जुन्या वळणाचा फार प्रभाव होता. त्यामुळे आपले बोलणे चालणे हे इतर समवयीन मुलांसारखे नाही आहे हे त्याच्या लक्षातच यायचे नाही. तो प्रॉपर चतुर्थी वगैरे करायचा. मंगळवार करायचा. आणि हे तिघे त्याची थट्टा करत करत त्याच्यासमोर अपेयपान आणि अभक्ष्यभक्षण करायचे. पण अंगात दम नसल्यामुळे तो बिचारा सहन करायचा ते! पण त्याच्या आता लक्षात यायला लागले होते. तिघे जरी व्यसनी असले तरीही तिघांचेही आत्मानंदवर खूप प्रेम बसलेले होते. आणि त्यामुळे आता त्याचेही त्या तिघांवर प्रेम बसलेले होते.

आजही तिघांना रात्री साडे आठलाच पूर्ण चढलेली होती आणि आत्मानंद त्याच्या पलंगावर बसून रोखून प्रत्येकाकडे पाहात होता. आत्मानंदच्या मसाजमुळे दिल्या आठ दिवसांपुर्वीच टुणटुणीत झाल्यामुळे आता शिर्के वचकून होता. पण दिल्या भाकड नव्हता. कुठेतरी बेसावध असताना शिर्केला तुडवायचा ही अशोकची कल्पना त्याने साफ फेटाळून लावलेली होती. त्याच्या मते समोरासमोर आव्हान देऊन सर्वांसमक्ष तो शिर्केला धडा शिकवणार होता. पण तो विषय आता चर्चेत फारसा येत नव्हता. कारण दिल्याने सांगून टाकले होते की शिर्केचे जे करायचे ते तो एकटाच करणार आहे. त्या गोष्टीचा बाकीच्यांशी संबंध नाही.

आजच्या चर्चेचा... खरे तर आज'ही' पिण्याचे कारण ठरणारा विषय फार वेगळा होता.

दीपा बोरगे नावाची वर्गातील एक गोरी पान मुलगी वनदासला फारच आवडलेली होती व ती त्याच्याकडे पाहाते हे त्याचे आज ठाम मत झाले होते. आणि त्यावरूनच गदारोळ चाललेला होता.

अशोक - तिने नेमकं कसं पाहिलं तुझ्याकडे??

वनदास - म्हणजे ... काय झालं ते मी सांगतो...मी चाललो होतो ना क्लासमधून बाहेर.. तेव्हा ती आत येत होती... ती अन ती उर्मिला.. दोघीही... एकदम समोरासमोर आल्यावर मी तरी काय करणार रे?? मी एकदम बघायलाच लागलो तिच्याकडे...

दिल्या - हेच... अश्क्या मी हेच तुला म्हणतोय मगाचपासून...

अशोक - थांब ना... हां ... बोल रे..

वनदास - तर तिने जायचं की नाही निघून पुढे??

अशोक - सरळ आहे...

वनदास - तर ती उर्मिला गेली पुढे.....

अशोक - अन ही??

वनदास - अरे तिथेच... असे... हे बघ हे असे डोळे मिसळून पाहात राहिली...

दिल्या - फेकतंय सालं...

अशोक - किती वेळ...

वनदास - आता किती वेळ... असेल दोन अडीच सेकंद... मी काय मोजणार आहे का??

अशोक - नाही पण दोन अडीच सेकंद ट्रॅफिक जॅम म्हणजे फार झालं वन्या...

दिल्या - अरे कसलं ट्रॅफीक जॅम? हा फेकतोय अन तू ऐकतोयस...

अशोक - तिने काय घातलंवतं??

दिल्या - त्याचा काय संबंधय??

वनदास - ड्रेसरे.. चक्क ड्रेस घालून बघत होती माझ्याकडे...

दिल्या - म्हणजे काय? तू दिसल्यावर काय कपडे बदलून येऊन बघायचं का तुझ्याकडे...

वनदास - अश्क्या... हा नाही त्या गोष्टीत अश्लील बोलतो हां... आधीच सांगतोय..

अशोक - ए दिल्या.. तू गप पी ना... इथे गंभीर बोलणी चाललीयत अन तुझं काय हे मधेमधे..??

दिल्या - अरे हा वाटेत उभा होता.. सरकत नव्हता म्हणून ती पाहात होती...

वनदास - हे बघा.. हे बघा... च्यायला एखाद्याचं चांगलं होतंय ते बघवत नाही यांना...

अशोक - घाल रे यात एक लार्ज....

वनदास - तर तुला सांगतो...काय लेका तिचे डोळे आहेत...

अशोक - नेमके कसे आहेत...??

वनदास - म्हणजे असं एखादं खोल तळं असतं ना??

अशोक - तळं??

वनदास - हां.. म्हणजे असं... असं एकदम खोल खोलच गेल्यासारखं वाटतं तिच्या डोळ्यात पाहिलं की

अशोक - किती ??

वनदास - खूपच रे... तसं मांडता नाही येणार शब्दात....

अशोक - पण... म्हणजे ... भावना काय होत्या डोळ्यातल्या??

दिल्या - हा कोण छपरी आला मधेच समोर...

वनदास - अश्क्या हा नाठ लावणारे माझ्या निष्पाप प्रेमाला....

दिल्याने 'निष्पाप' हा शब्द ऐकून भिंतीवर एक मुष्टीप्रहार केला व हासला.

अशोक - तू मला सांग रे... हां... भावना काय होत्या डोळ्यांत..??

वनदास - जणू काही याच नजरानजरीच्या खेळाची मी कित्ती कित्ती जन्म वाट पाहात होते...

अशोक - वन्या... मला चढते हे ठीक आहे... पण एवढी नाय चढत...

वनदास - विश्वास नाही ना?? तुझाही विश्वास नाही ना??

अशोक - लेका पहिल्या नजरेत तुला एवढं कळलं होय??

वनदास - अरे... मी कविता केलीय कविता तिच्यावर....

'कविता' हा शब्द ऐकल्यावर मात्र दिल्याने एक सण्णकन वाजवली वन्याच्या पाठीत...

दिल्या - असले फालतू प्रकार मला या रूमवर चालायचे नाहीत... कविता बिविता...

वनदास - दिल्या.. तुला प्रेमातल्या भावना नाही कळणार... अरे कविता स्फुरते अशी...

'कविता स्फुरते' हे दोन शब्द वनदासने म्यानातून तलवार किंवा प्यान्टीतून बेल्ट ओढून काढावा तशी हालचाल करत उच्चारले.

अशोक - ऐकव..

वनदास - खरंच..??

अशोकने फर्माईश करणे व वन्याने खिशातून कागद काढणे या अपराधांसाठी दोघांनाही दिल्याकडून एक एक अस्सल शिवी भेट मिळाली.

आत्मानंद - यांना कविता पठण करूदेत... मनुष्याचे सर्वात सुंदर व्यक्तीकरण म्हणजे कविता...

आता मगाचपेक्षा जहरी शिवी आत्मानंदला मिळाली. दिल्याला घाबरून वन्या कविता बाहेर काढत नव्हता खिशातून!

अशोक - तू वाच रे कविता...

वनदास - अरे हे मारतं ना पण??

अशोक - ए दिल्या... च्यायला दादागिरी करू नको हां...

आता दिल्यालाही उत्सुकता वाटू लागली होती की आपल्या रूममधे चक्क एकाने कविता केली?? कशी आहे ती कविता??

दिल्या - मला जर आवडली नाही ना? तीन दिवस दारूला स्पर्श करू देणार नाय तुला..

वनदास - आवडेल आवडेल...

अशोक - अरे वाच ना...

वनदास - हां! ऐका...

दीपा माझी राणी...
.... आज तुला पाहिलं वर्गाच्या दारात... आणि....
मी... मलाच हरवून बसलो बघ... ते तुझे बदामी... गुलाबी... स्वप्नील चक्षू...

दिल्या - चक्षू म्हणजे काय??

अशोक - डोळे डोळे...

दिल्या - च्यायला डोळे गुलाबी असतात का??

वनदास - अरे प्रेमात पडलेल्या युवतींचे डोळे गुलाबी दिसतात... ऐकवू का पुढचं??

अशोक - बिनधास्त!

वनदास - दीपा माझी राणी.... आज तुला....

दिल्या - अबे पुढे चल ना?? तिथेच अडकतंय ग्रामोफोन सारखं..

वनदास - ऐका...

ते तुझे बदामी... गुलाबी... स्वप्नील चक्षू...
त्यातील ती आळसटलेली छटा... एक अखंड इंतजार... टिळकांनी सांगीतलेल्या मार्गावर समाजाला न्यायची...एक दुर्दम्य इच्छा....

हे ऐकून दिल्याने लाथ घातली वनदासला..!

वनदास - क... आता काय झालं??

दिल्या - टिळक कुठे आले इथे??

अशोक - दिल्या तू मारतोस फार हां पण याला...

दिल्या - आधी मला सांग तिच्या डोळ्यांवर कविता केली त्यात टिळकांचा संबंध काय??

वनदास - दिल्या... ही आपल्या समाजाची दारूण शोकांतिका आहे....

दिल्या - कसली??

वनदास - साहित्यात जोवर थोरांचे उल्लेख होत नाहीत तोवर त्या साहित्याची नोंद घेतली जात नाही...

दिल्या - म्हणून टिळक??

वनदास - टिळकांचा उल्लेख रिप्लेसेबल आहे..

दिल्या - म्हणजे काय??

वनदास - टिळकांऐवजी कोणतेही थोर नाव चालेल..

दिल्या - लय ब्येक्कार मार खाणारेस तू....

अशोक - ए ऐकव रे...

वनदास - ऐका...

तू जागी होताच.... पहाट सुगंधी होते... कोकिळा मधूर कूजन करतात...
... मला तर वाटतं... तू सारखी जागीच होत राहावंस...
ती तुझी अंगडाई... दवाला ज्यापासून नशा मिळते...
ते तुझे ओठ... ज्यांच्यापासून मॅक्डोवेल नंबर वन व्हिस्की कैफ चोरते...
ते तुझे कोमल हात... जे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ... आ SSSSSSSSSSS

ए... आपण नाय वाचणार... च्यायला.. कविता करायची अन मार खायचा होय???

दिल्या - अश्क्या... तूच सांग... टिळक, कोकिळा, व्हिस्की अन स्वातंत्र्य यांचा काही संबंधय का??

आता अशोक गदगदून हसू लागला. वनदासला राग आलेला होताच.

वनदास - एक मारतं, एक तिथे शिवायचं नसल्यागत लांब बसतं अन एक कविता ऐकून हसतं...तिच्यायला होस्टेल आहे का इस्पीतळ??

अशोक - वन्या... तू काही म्हण लेका... पण.. टिळक कोकिळा व्हिस्की अन स्वातंत्र्यलढा हे काय एकत्र बसत नाय राव...

वनदास - मला वाटलंच होतं.. खेचतायत माझी... भर.. लार्ज भर...

दिल्या - हात लावायचा नाय दारूला आता तीन दिवस....

वनदास - हा घोर अन्याय आहे...

दिल्या - हाच न्याय आहे.. कविता ऐकवतो काय???

दिल्याने कवितेचा कागद हातात घेऊन त्याचा बोळा करून फेकला. आत्मानंदने तो घाईघाईत उचलला अन नीट सरळ करून घडी घालून खिशात ठेवला. तिकडे कुणाचे लक्षच नव्हते.

पण उदार मनाने वन्याला दारू प्यायची परवानगी मात्र दिली दिल्याने!

आत्मानंद - तुमच्या वाचास्वातंत्र्यावर गदा आली असे वाटत नाही का तुम्हाला??

वनदास - आली ना राव... गदाच काय.. भाले आले.. तोफा आल्या..

अशोक अजून हसतच होता.

दिल्या - पुन्हा या रूममधे कवितेतला 'क' काढायचा नाय..

आत्मानंद - त्यांचं पुढे काय झालं??

वनदास - कुणाचं?

आत्मानंद - दीपाताईंचं???

दीपाला 'ताई' लावलेलं पाहून आता दिल्याही हसायला लागला. भिंतीवर दोन बुक्या बसल्या. एवढंच काय वनदासही हासला!

अशोक - वहिनी म्हण लेका वहिनी...

आत्मानंद - छे छे! विवाहापुर्वी असे संबोधन एखाद्या युवतीच्या नाहक बेअब्रूस कारणीभूत ठरेल..

अशोक - ह्याचं बोलणं एकदा टेप करून ठेवायचंय राव मला...

आत्मानंद - मी स्वतःच करून देईन... टेप रेकॉर्डर आणू परवडेल तेव्हा..

अशोक - वन्या.. पण खरंच... पुढे काय झालं रे?

वनदास - अरे ती बेंचवर बसल्यावर मी दाराबाहेर दोन मिनीटे थांबलो ना?? त्या दोन मिनिटांमधेही आमची तीन वेळा नजरानजर झाली...

अशोक - दिल्या.. हे गंभीर आहे हां??

वनदास - तुला सांगतो... इतकी मधाळ बघते रे...

अशोक - लेका उद्या यावर बसलं पाहिजे...

आत्मानंद - मग आज कशावर बसला आहात??

अशोक - तुम्ही मधे अडथळे आणू नका...

वनदास - मला तर काही सुचतच नाय राव... काय करू रे आता दिल्या? पुढची स्टेप काय??

दिल्या - मार खाणे...

वनदास - याला विचारण्यात काय अर्थच नाय...

अशोक - मला वाटतं तू बोल एकदा तिच्याशी...

वनदास - काय बोलू??

अशोक - मन मोकळं कर ना??

वनदास - एवढं सोपंय होय??

अशोक - त्यात काय? सांगायचं.. बरेच दिवस आपण एकमेकांकडे पाहतो आहोत... आज मला वाटले की आपल्याशी बोलावे.. खूप इच्छा आहे मनात बोलण्याची...

वनदास - दार वाजतंय... ए आत्म्या... दार उघड की????

रात्रीचे साडे दहा वाजलेले होते. आत्मानंदने दार उघडले. बाहेर शिपाई होता.

"आत्मानंद ठोंबरे???"

आत्मानंद - मीच....

शिपाई - फोन आहे...

आत्म्याला आलेला फोन हा त्या रूममधील या वर्षीचा पहिला फोन होता. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. पाच मिनिटांनी आत्मानंद रूममधे आला... शांत होता...

अशोक - काय हो?? काही विशेष...

त्यानंतर आत्म्याने उच्चारलेले वाक्य ऐकून ताडकन सगळे उभे राहिले अन खोली आवरायला लागले...

"बाबा येतायत.. उद्या पहाटे चारला..."

गुलमोहर: 

.... वाहावा...... इंतजार का फल मीठा होता है...

सगळे खोली आवरायला लागले म्हणजे सगळ्यांत अजून विद्यार्थी जिवंत आहे....

जबराट बेफिकिरभौ....

हा हा हा हा...................

आईशप्पथ,........ जाम हसलो................

"त्यातील ती आळसटलेली छटा... एक अखंड इंतजार... टिळकांनी सांगीतलेल्या मार्गावर समाजाला न्यायची...एक दुर्दम्य इच्छा....

हे ऐकून दिल्याने लाथ घातली वनदासला..!

वनदास - क... आता काय झालं??

दिल्या - टिळक कुठे आले इथे??"

हा हा हा हा हा हा ......

एकापेक्षा एक असे सरस....जोक्स आहेत...

वनदास - अश्क्या हा नाठ लावणारे माझ्या निष्पाप प्रेमाला....

ते तुझे बदामी... गुलाबी... स्वप्नील चक्षू...
त्यातील ती आळसटलेली छटा... एक अखंड इंतजार... टिळकांनी सांगीतलेल्या मार्गावर समाजाला न्यायची...एक दुर्दम्य इच्छा....
...ग्रेट ग्रेट ग्रेट..

वनदास - साहित्यात जोवर थोरांचे उल्लेख होत नाहीत तोवर त्या साहित्याची नोंद घेतली जात नाही...

दिल्या - म्हणून टिळक?? .....वा क्या बात...क्या बात

होस्टेल आहे का इस्पीतळ?? ............हीहीही...हीहीही

आत्मानंद - तुमच्या वाचास्वातंत्र्यावर गदा आली असे वाटत नाही का तुम्हाला??

वनदास - आली ना राव... गदाच काय.. भाले आले.. तोफा आल्या..

आत्मानंद ----हा नित्याचा आनंद---आनंदी आनंद...झकास...

सावरी

बेफिकिर, बासस......, अहो, हसुन हसुन गाल दुखायला लागलेत.

वनदास - ड्रेसरे.. चक्क ड्रेस घालून बघत होती माझ्याकडे...
दिल्या - म्हणजे काय? तू दिसल्यावर काय कपडे बदलून येऊन बघायचं का तुझ्याकडे... >>> हा हा हा.

वनदास - अश्क्या... हा नाही त्या गोष्टीत अश्लील बोलतो हां... आधीच सांगतोय.. >> आत्माराम चा प्रभाव.

वनदास - दिल्या.. तुला प्रेमातल्या भावना नाही कळणार... अरे कविता स्फुरते अशी...
'कविता स्फुरते' हे दोन शब्द वनदासने म्यानातून तलवार किंवा प्यान्टीतून बेल्ट ओढून काढावा तशी हालचाल करत उच्चारले. >>> बापरे, हा कडेलोट होता, कडेलोट.

तू जागी होताच.... पहाट सुगंधी होते... कोकिळा मधूर कूजन करतात...
... मला तर वाटतं... तू सारखी जागीच होत राहावंस...(काय कंसेप्ट आहे, थोड imagine करुण बघा.)
ती तुझी अंगडाई... दवाला ज्यापासून नशा मिळते...
ते तुझे ओठ... ज्यांच्यापासून मॅक्डोवेल नंबर वन व्हिस्की कैफ चोरते...
ते तुझे कोमल हात... जे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ...
आ SSSSSSSSSSS >>> अरे कुणितरि थांबवारे ह्यांना, हसुन हसुन वाट लागलिय.

अशोक - लेका उद्या यावर बसलं पाहिजे...
आत्मानंद - मग आज कशावर बसला आहात?? >>> खुप खुप दिवस, आणि खुप किस्से आठ्वले. Happy
बेफिकिर, आज तुमच्या मुळे हे दिवस परत जगयला मिळाले, खुप खुप ध्न्यवाद, अगदि मनापासून धन्यवाद.

बेफिकीर ....
लय भारी ...

'कविता स्फुरते' हे दोन शब्द वनदासने म्यानातून तलवार किंवा प्यान्टीतून बेल्ट ओढून काढावा तशी हालचाल करत उच्चारले. >>> Biggrin

ते तुझे बदामी... गुलाबी... स्वप्नील चक्षू...
त्यातील ती आळसटलेली छटा... एक अखंड इंतजार... टिळकांनी सांगीतलेल्या मार्गावर समाजाला न्यायची...एक दुर्दम्य इच्छा.... >>> बोंबला तिच्यायला !

बेफिकीर ... पुढचा भाग लवकर लिहा ... नाहीतर दिल्याला बोलवेन ! Happy

http://www.maayboli.com/node/4981#comment-926123

हा एक धागा पाहिला कुठेतरी मायबोलीवर!

म्हणजे लेखन न आवडणारे 'आवडले नाही' असे इतरत्र लिहीतात व मूळ लेखनावर लिहीत नाहीत असे जाणवले. (स्मितहास्य).

तसेच, असेही जाणवले की माझ्या कादंबर्‍यांवर सकारात्मक प्रतिसाद देणारे काही किंवा अनेक आय डी फसवे असावेत. (पुन्हा स्मितहास्य)

असो! इट कान्ट स्टॉप मी... हा हा हा हा!असेपण हे सगळे जरा वेगळेच वाटले.

सर्वांचे (या धाग्यातीलही) मनःपुर्वक आभार मानतो. जमेल तसे लिहीन, पण लेखनावरच बरे वाईट प्रतिसाद दिल्यास आणखीन बरे वाटेल.

-'बेफिकीर'!

>>त्यानंतर आत्म्याने उच्चारलेले वाक्य ऐकून ताडकन सगळे उभे राहिले अन खोली आवरायला लागले... << अगदी Happy हा अनुभव आम्ही आजपण घेतोय. रूममधील कुणाचेही आई-बाबा अथवा रूमचे मालक येणार असतील, तर रूम अक्षरशः चकाक्चक होते.

चांगली चाललीये कादंबरी.

http://www.maayboli.com/node/4981#comment-926123

हा वाहून जाणारा धागा आहे बिफिकिरजी, त्यामुळे तुम्हाला अभिप्रेत असलेली चर्चा सध्या इथे पहाता येत नाही. असो...

तुमच्या लेखनावर सकारात्मक प्रतिसाद द्यायला डु.आय.ची काय गरज आहे...... नकारात्मक असेल तर ठीक आहे...

आणि लेट द प्रतिसाद बी सकारात्मक ऑर नकारात्मक..... कीप रायटींग..प्ली...ज.

बेफिकीर जी......
हि लिंक टाकण्यामाग्चा उद्देश कळला नाही.......

कारण.... त्या लिंक वर काही निरर्थक बडबड चाललेली वाचली...... Happy

बेफिकीर,

पण लेखनावरच बरे वाईट प्रतिसाद दिल्यास आणखीन बरे वाटेल.

लेखक म्हणुन माबो वरील वाचक वर्गाची नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन आपण आमच्या सुचनाचा विचार करता....यातच तुमचे मोठेपण...

सावरी

बेफिकीर,
तुमचा ईथला वाढता प्रभाव बघवत नाहीये काही लोकाना. तुम्ही एकमेव आहात या माबोवर ज्यांच्या लेखनाची अत्यंत बेचैनीने वाट बघितली जाते. फक्त काही महिन्यातील हि तुमची घोडदौड आहे.

पुलेशु.

.

झक्काSSSस...!
पहिल्या भागानंतर सुसाट वाचत सुटले होते.. म्ह्टलं... निवांत देउया प्रतिसाद... प्रतिसाद नाही तरी वाच्तेय बर्का मी....
सगळे खोली आवरायला लागले म्हणजे सगळ्यांत अजून विद्यार्थी जिवंत आहे....>> आम्ही याला मुन्नाभाई म्हणायचो... लांबूनच कोणतरी ओरडायची... बाबूजी आ रहे हे बाबूजी आ रहे हे... मग आई, बहीण कोणीही येवो (खरंतर वडील आणि भाऊ रूम मध्ये येऊ शकायचे नाही गर्ल्स हॉस्टेल असल्यामुळे तरी पिक्चरमध्ये होतं म्हणून बाबूजी आ रहे हे)

मग दोर्‍यांवरचे कपडे, गाद्यांवरची पुस्तके, टेबलावरचे पेन्स, ड्रॉईंग्चे साहित्य, कंगवे आणि प्रसाधनाचे इतर सामान आवरले जायचे... रूम मुलांची असो वा मुलींची इंजिनिअरिंगच्या हॉस्टेल रूम्स हॉटेलसारख्या सुबक निटनेटक्या कधीच नसतात.. म्हणून त्या सजीव आणि भरलेल्या वाटतात...

पटापट येऊंदे बेफिकीर!

आणि लोकांकडे लक्ष देऊ नका... निंदकाचे घर असावे शेजारी..>>>>>>> अनुमोदन
बेफिकिर
तुम्ही खरंच खुप छान लिहीता ...अगदी त्या लिखाणाची ओढ लागते.
डोळे आपोआप मायबोलीवर तुमच्या लिखाणाचा शोध घेतात.

बाकी कांदबरी छान चालु आहे.
हसुन हसुन वाट लागली हो ....
कविता एकदम मस्त Happy

Pages