मोकळ भाजणी

Submitted by स्वाती_आंबोळे on 9 September, 2010 - 12:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

थालीपिठाची भाजणी
कांदा - मध्यम बारीक चिरलेला
फोडणीचं साहित्य
लाल तिखट
मीठ
चिंचेचा किंवा आमसुलाचा कोळ
गूळ

(सर्व साहित्य चवीनुसार)

क्रमवार पाककृती: 

भाजणीत तिखट, मीठ, हिंग, हळद, चिचेचा कोळ (मी आगळ घालते) आणि गूळ हे चवीनुसार घालावे.
हळूहळू पाणी मिसळत थालीपिठांसाठी भिजवतो त्यापेक्षा सैल मिश्रण भिजवावे.
थोड्या जास्त तेलाच्या फोडणीवर कांदा परतून मग त्यावर हे मिश्रण घालावे.
अधून मधून परतत आधणाचे झाकण ठेवून वाफेवर मोकळे होईपर्यंत शिजवावे.
खातांना वरून खोबरे, कोथिंबीर आणि तूप घालून घ्यावे.

अधिक टिपा: 

थालीपिठाच्या भाजणीचं माझ्या आईचं प्रमाण :

२ भांडी तांदूळ
१ भांडं ज्वारी
१ भांडं बाजरी
१ भांडं चणाडाळ
अर्धं भांडं उडीदडाळ
पाव भांडं गहू
अर्धं भांडं धने
१ टेबलस्पून जिरं
१ टीस्पून मेथी
अर्धी वाटी पोहे

सर्व जिन्नस भाजून (कणकेपेक्षा सरसरीत) दळून घेणे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या प्रकाराबद्दल मी आधी कधी ऐकले नव्हते. करून बघेन आता.
स्वाती, इथे भांडं आणि वाटी अशी २ वेगवेगळी मापं अपेक्षित आहेत का?

रूनी, हो.
भांडं म्हणजे भारतात पाणी प्यायचं फुलपात्र असतं ते. (साधारण सव्वादोनशे ते अडीचशे ग्रॅम्सचं असतं सहसा. वाटी आमटीची - साधारण दीडशे ग्रॅम. ही ग्रॅम्समधली प्रमाणं हे माझे अंदाज आहेत.)

चिंच/ आगळ व गूळ घालतात हे माहीत नव्हतं! आतापर्यंत खाल्लेल्या (केलेल्या नव्हे, प्लीज नोट! ;-)) मोकळ भाजणीत ती चव चाखली नव्हती कधी! आता अशीही भाजणी करायची फर्माईश करायला हवी मुदपाकखान्यात! Happy

भारीच सोपं आहे. कधी ऐकला नव्हता मात्र हा पदार्थ.

>> भाजणी तिखट, मीठ, हिंग, हळद, चिचेचा कोळ (मी आगळ घालते) आणि गूळ हे चवीनुसार घालून (थालीपिठांसाठी भिजवतो त्यापेक्षा सैल) भिजवायची.
>>>
हे 'भाजणी तिखट, मीठ, हिंग, हळद, चिचेचा कोळ' असं लिही. माझ्यासारख्या नवशिक्यांना अवघड जातं वाचायला. मी ते भाजणी-तिखट असं वाचत होतो (भाजणीतिखट हा तिखटाचा एक प्रकार आहे असे समजून).

खाल्लीय आईने केलेली, पण त्यात चिंच गुळ नव्हता. त्याला बहुतेक भाजणिची उकड म्हणतात घरी.
आता चिंच गुळ वाली करायला हवि Happy

हा पदार्थ ऐकलेला नुसता.. बघायचा/खायचा योग आला नाही कधी..

तयार झाल्यावर एकदम सुक्क्या पिठल्यासारखा दिसेल ना??

आमच्याकडे ही नेहमी केली जाते , पण चिंच गूळ न घालता . अर्थात चिंच गुळाने अजून मस्त लागेल असं वाटतंय Happy .
माझ्या आजीच्या पद्धतीने केलेली थालिपिठाची भाजणी बर्‍यापैकी डार्क ब्राऊन रंगावर असते . म्हणून माझा मामा , ज्याला ही मोकळ भाजणी अजिबात आवडत नाही , त्याला ही खाताना " माती " खातोय असं वाटतं . Rofl

वा! तों पा सु Happy

चिंच गूळ घातलेली कधी खाल्ली नाहीये आणि ती चव आमच्याकडे कोणाला आवडेल याबद्दल खात्री नाही. मी गोडा मसाला पण घालते मोकळ भाजणीत आणि कधीकधी तिखटाच्या ऐवजी ताजी हिरवी मिरची उभी कापून फोडणीत घालते. थालिपीठं लावायला वेळ नसेल तर मोकळ भाजणी करायची, अगदी तीच चव Happy तेल मात्र जरा जास्त घालावं लागतं. गरम गरम भाजणीत साजूक तूप घालून खायचं.. अहाहा!!

आजी पावटे घालून भाजणीचा काहीतरी सॉलिड खमंग पदार्थ करते, काय ते विचारायला पाहिजे.

छान

हळूहळू पाणी मिसळत थालीपिठांसाठी भिजवतो त्यापेक्षा सैल मिश्रण भिजवावे.>>> सैल म्हणजे कशी कन्सिटन्सी असावी? इडलीच्या पीठाएवढी का?

भज्यांच्या पिठाइतपत. मग लागेल तसं झाकणातलं आधण घालता येतं. भाजणी छान शिजून मोकळी व्हायला हवी.
आधीच पाणी जास्त घातलं तर वाईट होणार नाही, पण आळायला वेळ लागेल.

मस्त वाट्तेय रेसिपी. माझ्याकडे भारतातून आणलेली भाजणी आहे बहुतेक जुनी झाली आहे ती चालेल का?फ्रीज्मध्ये ठेवली होती. Happy
आणि हे भांड्याच्ञा बुडाशी लागु नये म्हणून काय करावं? शिजल्याची खात्री कशी करतात ...सॉरी खूप प्रश्न आहेत पण मी हे केलं किंवा खाल्लहॉ नाहि सो डोकं बंद होणार हे माहितेय
आभार्स Happy

जुनी भाजणी चालेल.
जास्त तेलावर आणि मध्यम आचेवर करायची. नाही लागत.
शिजल्यावर साधारण उपम्यासारखं टेक्श्चर येईल. लक्षात येईल तुमच्या. Happy