२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार

Submitted by निंबुडा on 6 August, 2010 - 00:49

२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार

बाळ ५-६ महिन्यांचे झाले कि हळू हळू आपण त्याला दूधाव्यतिरिक्तचे अन्न पदार्थ द्यायला सुरुवात करतो. घरात वडीलधारी माणसे असतील तर नक्की कशापासून आणि किती प्रमाणात सुरुवात करायची या बाबतीत मार्गदर्शन मिळते. पण बर्‍याच आयांना (विशेषतः सेपरेट कुटुंबातील) ते कसे करावेत याची माहीती असेलच असे नाही. अन्यथा मैत्रिणी / पुस्तके / आंतर्जाल इ. वर हवाला ठेवावा लागतो.

मूल साधारण १ वर्षाचे झाले की त्याला आपण जेवतो ते सर्व अन्न पदार्थ (भाजी + वरणभात + पोळी etc) देता येतात. अर्थातच कमी तिखटाचे. ५ महिने ते २ वर्ष काय काय पदार्थ देता येतील, ते करण्याची कृती काय, कोणत्या वेळेला काय काय देता येईल, काय काय पचू शकेल,अजून दात न आलेल्या, किंवा २-३ दात आलेल्या १ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे स्पेशल खाऊचे प्रकार, मूल २ वर्षांचे होईपर्यंत हळू हळू आहारात बदल करून मोठ्यांसारखे सर्व अन्नपदार्थ खायला लागणे इ. बद्दलची माहीती व प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बीबी! उपयुक्त टीप्स, खाऊ ज्यातून भरवायचा ती utensils etc या विषयीची माहीती ही शेअर करु या.

सर्व would be mothers ना आणि ज्यांची बाळे ५ महिने ते २ वर्ष या वयोगटात मोडतात त्या पालकांना हे फायद्याचे ठरेल असे वाटतेय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दलियाची गोड खीर गव्हाच्या खीरि सारखीच करतात >>>
म्हणजे गुब्बी म्हणालीये तसं आधी तूपावर परतून घेऊ का? नंतर पाण्यात ढवळत राहून शिजतील का दलिया पटापट?? Uhoh
मला वाटलं होतं की कूकर मध्ये आधी एखादी शिटी काढावी लागेल की काय.

तूपावर परतून नंतर दूध आणी गूळ घालुन शिजवायची..शिजते तसे लवकर..

दलियाचा भाज्या घालुन उपमा हि करतात..म्हणजे सारखे गोड गोड होत असेल तर...

तसेच माझ्या डॉ ने सजेस्ट केले होते आणी मी थोडे माझ्या मनाने बदलुन असे त्याला पेजेचे हि पीठ करायचे त्याची माहिती थोड्या वेळाने टाकते..

निंबुडा, माबोवर कृती आहे दलिया खिरीची http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/46689.html

आणि पंढरपुरी डाळं म्हणजे फुटाण्याचं डाळं! Happy

अन्य खिरींमध्ये गाजराची/ दुधीची/ राजगिर्‍याच्या लाह्यांची खीर करता येते. रताळे/ बटाटा/ केळे कुस्करून तो भरवता येतो. वरणाचे पाणी, कळण, पेज इत्यादी भरवता येते. मुगाच्या डाळीची तांदूळ व डाळ भाजून मग केलेली पातळसर, सरसरीत सौम्य खिचडी मुलांना देता येते. अजूनही आहे यादी. आता जरा बिझी आहे. पण देते नंतर थोडा वेळ मिळाल्यावर! Happy

सगळ्या प्रकारच्या पीठांचं पॉरीज करता येतं. गहू/ज्वारी/नाचणी/बाजरी/मका कुठलंही पीठ एक टेबलस्पून घेऊन ते तुपावर खमंग भाजायचं. गार झालं की त्यात हळूहळू दीड कप दूध घालून गूठळ्या न होऊ देता ढवळून घ्यायचं. चवीनुसार साखर घालून छान उकळवायचं. हे दाटसर पॉरीज दात नसलेल्या मुलांना एकवेळ तरी द्यावं. पोटभर होतं.

भाज्यांची सूप्स: लाल भोपळा,गाजर,टोमॅटो,दूधी प्रत्येकी दोन-दोन तुकडे शिजवून घेऊन मीठ घालून मिक्सरमधून काढून न गाळता मुलांना देता येईल. तसेच पालक-टोमॅटो चे सूप देता येईल.

बारीक रवा थोड्या तुपावर खमंग भाजून पाणी घालून नुसतं मीठ, जिरेपूड घालून जरा लिक्विड उपमा करता येईल.

डाळ-तांदूळाची खिमटी शिजवताना त्यात घरात असलेली एखादी भाजी घालता येईल.

सगळी मोसमी फळं मुलांना आवर्जून द्यावीत. अगदी पाचव्या महिन्यापासून मुलांना फळं देता येतात. चिकूचे साल काढून तुकडे/केळ्याचे तुकडे/संत्र-मोसंब्याच्या बिया, सालं काढून फोडी/डाळिंबाचे दाणे/कलिंगडाचे तुकडे ह्यापैकी जे असेल ते एका स्वच्छ धुतलेल्या मलमलच्या फडक्यात घेऊन त्याला गाठ बांधावी आणि ती पुरचुंडी बाळाच्या तोंडात धरावी. ते चोखत बसण्यात मुलांचा वेळही मजेत जातो शिवाय आवश्यक तो आहार पोटात जातो.

सोया आणि दलियाची खिचडी: (७ महिन्यांनंतर चालू करावे.)

१ वाटी (मीडीयम साइज्ड) मूगाची डाळ (मी असोली मूगाची डाळ घेते. तिच्यामुळे फायबर चा फायदा मिळतो. मिळत नसल्यास साधी मूगाची डाळ सुद्धा चालेल.)
१/२ वाटी तूरीची डाळ
१/३ वाटी मसूर डाळ
१/४ वाटी दलिया (गव्हाचा रवा)
२ टेबलस्पून सोया ग्रॅन्युअल्स ग्राउंड (हे म्हणजे नक्की काय, i don't know Uhoh मी तरी सोया पावडर वापरली. ज्यांना माहीतीये त्यांनी जरा प्रकाश टाका.)
२ वाटी तांदूळ (हातसडीचा असल्यास उत्तम. पण शिजायला जरा वेळ लागतो.)

हे सर्व जिन्नस एकत्र करून हवाबंद डब्यात ठेवून द्यावे. व खालील पद्धतीने खिचडी करावी.

१) वरील मिश्रणातील ४ टेबलस्पून घेऊन नीट पाण्याने धुवून घ्यावेत.
२) प्रेशर कूकर मध्ये पुरेसे पाणी घालून त्यात वरील धुतलेले मिश्रण + मीठ + हळद + मी मागे दिलेली जिरं व बडीशोप इ. ची पावडर + एक लहान टोमॅटो घालून शिजवून घ्यावे.
३) कूकरचे झाकण निघाले की हाटणयंत्राने (पावभाजी हाटण्यासाठी वापरले जाते ते) मस्त हाटून घ्यावे. किंबा बाळाला अजून दात आले नसल्यास सरळ मिक्सर मधून वाटून घ्यावे.
४) यात खिचडीबरोबरच उकडलेला टोमॅटो स्मॅश करून त्याची प्युरी टाकावी.
५) यात तूप + लिंबाचा थोडा रस घालून खायला घालावे.

निंबुडा, माबोवर कृती आहे दलिया खिरीची >>> येस्स. धन्स, अकु. त्या कृतीत दलिया कुकर मध्ये शिजविण्याविषयीच म्हटलंय. या विकांताला करून बघते. Happy

गूळ आणि दूध माझ्या मते एकत्र चालत नाही. वरच्या अकुने दिलेल्या लिंक वर दलियाच्या खीरीची रेसिपी दिलीय त्यात पण हेच म्हटलंय की दूध + साखर किंवा गूळ घालायचे असल्यास नारळाचे दूध घालायचे.

अ‍ॅप्पल स्ट्यू:(५-६ महिन्यापासून चालू करता येईल)

सफरचंदाचे साल व मधला भाग काढून फोडी करून घेऊन त्या प्रेशर कुकर मध्ये शिजवाव्यात. मग ektra पाणी बाजूला काढून त्यांना मस्त स्मॅश करून त्यात साखर + वेलची पावडर + दालचिनी पावडर (ही फक्त ९ महिन्यांनंतर चालू करावी) अ‍ॅड करावे. या अ‍ॅपल स्ट्यू ला हवे तसे पातळ बनविण्यासाठी चाळून बाजूला ठेवलेले पाणी वापरता येईल.
हा पदार्थ केल्या केल्या शक्यतो लगेच भरवावा. कारण सफरचंद काळे पडू लागते व चव बिघडते. काही बाळांना सफरचंदामुळे constipation चा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सलग रोज रोज हा पदार्थ देऊ नये.

गहु आणी दुध सर्दी असेल तर एकत्र देवु नये अस म्हणतात. >>> गव्हाबद्दल माहीत नाही, पण सर्दी असताना दूध देऊ नये असे म्हणतात. दूधामुळे कफ वाढतो म्हणे. असे आयुर्वेद सांगते म्हणे. खरे खोटे माहीत नाही. पण अ‍ॅलोपथीवाले डॉ. यावर विश्वास ठेवत नाहीत.

सफरचंदाचे साल व मधला भाग काढून फोडी करून घेऊन त्या प्रेशर कुकर मध्ये शिजवाव्यात. मग ektra पाणी बाजूला काढून त्यांना मस्त स्मॅश करून त्यात साखर + वेलची पावडर + दालचिनी पावडर (ही फक्त ९ महिन्यांनंतर चालू करावी) अ‍ॅड करावे. या अ‍ॅपल स्ट्यू ला हवे तसे पातळ बनविण्यासाठी चाळून बाजूला ठेवलेले पाणी वापरता येईल.

हे चवीला खुप छान होईल. पण पोषण मुल्य अगदिच नगण्य Sad

मुलाना फळ वर मंजुडी म्हणाली आहे तशी द्यावी. एक जाळी पण मिळते.

.
http://www.nuby.com/en/nuby/solid-feeding/5360

पण पोषण मुल्य अगदिच नगण्य >>> कागं? Uhoh
सफरचंदात काहीच पोषणमूल्य नाही का? कॅल्शियम साठी सफरचंद चांगले म्हणतात ना? Uhoh

निकिता, तू दिलेल्या लिंक मधले बेबी प्रॉडक्ट्स कित्ती छान आहेत. Happy पण इंडीयात आहे का कुठे यांचे आऊटलेट??
मदर केअर आणि मॉम & मी चे आऊटलेट्स आहेत. त्यांचे प्रॉडक्ट्स विश्वासाचे वाटतात.

फळं शक्यतोवर मंजूडी म्हणाली तशी द्यावीत. साधी सरळ कापुन आणि सगळी सिझनल फळं.
आमच्या पेडींनी स्पष्ट सांगीतलं की ज्युस बिस प्यायचा तर तो तू पी, तिला फळांचा गर दे. दात यायला लागल्यावर तर मॅश्ड फळं बंद. Happy

खरबूज, टरबूज, कलिंगड, पपई, चिक्कू, अंजीर, द्राक्षे, आंबा यांसारखी मऊ गर असलेली फळे, साल काढून, थोडी मॅश करून द्यावीत मुलांना! आवडीने खातात व आरोग्याला चांगली.

वेगवेगळ्या भाज्यांची प्यूरी, त्यात चवीला किंचित मीठ, मिरपूड घालून द्यावी.
कस्टर्ड देखील मुले आवडीने खातात. पण त्याचे पोषणमूल्य मला माहीत नाही.
वर अ‍ॅपल स्ट्यू दिला आहे तसेच चावायला कठीण असणार्‍या फळांचे, भाज्यांचे स्ट्यू करून देता येतात.
नारळाची खीर, पायसही आयुर्वेदानुसार लहान मुलांसाठी उत्तम. मऊभात, वरणभात, मेतकूटभात इ. इ. तर असतेच!

मुलांसाठी खायला बनवताना ते त्यांना चावताना व गिळताना काही त्रास होणार नाही ना, हे पहावे व त्या पदार्थाची पोषणमूल्ये बघावीत.

रैना व मंजूडी ला अनुमोदन. सफरचंद वगैरे सरळ कापून एक फोड (मूल जरा बसायला लागल्यावर) हातात द्यायची, बसतात कितीच्या किती वेळ चघळत्/लाळ गाळत.... गाजराचा तुकडा सुद्धा चालतो पुढचे २ दात आल्यावर Happy

तसंच, मी मुक्ता ला, त्या वेळी मिळतील त्या सर्व भाज्या कूकरमधे वाफवून कुस्करून तशाच भरवायचे. अर्थात, तिने आवडीने खाल्ले, पण नंतर ज्यांना ज्यांना मी हे सांगितलं त्या सर्वांच्या बाळांनी अशा भाज्यांचं खतकल तोंडातून बाहेर काढलं Sad मुक्ता मात्र आता कुठलीही भाजी खाऊ शकते.

निंबे, मी सरळ आपली पोळ्यांची कणीक भाजूनच ठेवायचे आणि आयत्या वेळी गूळ घालून शिजवायची, त्यासाठी तो केमिकलरहित गूळ मिळतो तोही आणला होता Happy

निंबुडा ,

अगं बर्‍याच ठिकाणी मिळतात. मी मुंबंईतच आहे. तु cap gemini मध्ये आहेस ना? r-mall मध्ये पन मिळतील. star bazar , मध्ये मिळतात. nuby चि उत्पादन आहेत का विचाराय्च>

सफरचंदात काहीच पोषणमूल्य नाही का? कॅल्शियम साठी सफरचंद चांगले म्हणतात ना?

सफरचंदात खुप पोषणमूल्य आहेत. पण अशी शिजवल्याने सगळी नष्ट होतात. खास करुन पाण्यात विरघळणारी जिवनसत्व. फळ फारवेळ कापुन पण थेवु नयेत. मी मझ्या मुलीला फळ अगदी लहान पणापासुन कच्चीच दिली. आधी सफरचंदाच ज्युस द्यायचे. आता फोडी देते. वर लिंक मध्ये दिलिय ती जाळी मी तिल ५ महिन्यात दिलि डाळींबाचे दाणे घालुन. मस्त खायची.

खुप
जवळ जवळ सगळी फळ ज्यांच्या फोडी करता येतात. सफरचंद, चीकु....

गाजर., काकडी

एखादी चिक्की पण देता येईल. पण मग साफ् करताना नाकी नउ येतील.

ह्यांच्या जास्तीच्या जाळ्या पण मिळतात.

अजून कोणी लिहीले नाही म्हणुन लिहीते आहे. Happy
मुलांना खाण्याच्या सवयी (आणि एकंदरित कुठल्याही) लावायच्या तर Do as I say पेक्षा Do as I do हे महत्त्वाचे आहे. त्यांनी पौष्टिक खावं आणि आपण चमचमीत/ चरबरीत पदार्थांवर ताव मारावा असे होत नाही. आपण जितकी फळं खातो इन जनरल तितकी ते खाणार, आपण कुरकुरे खाल्ले तर तेही, आणि आपण पोळीभाजी खाल्ली तर तीही.

आम्ही फक्त पहिल्यावर्षी शक्यतोवर गोड पदार्थ दिले नव्हते, दुधातही साखर टाकली नाही, तिला दिलेला प्रत्येक पदार्थ/ प्रत्येक वेळी चाखुन पाहिला, तो ताजाच होईल याची तेवढी काळजी घेतली. आणि जेव्हा तिला स्वतःच्या मॅश्ड पदार्थांपेक्षा आमच्याच ताटात जास्त रस वाटतो आहे हे समजले तेव्हा पोळीभाजी सुरू केली. तूप्/कढी/साधंवरणभात हे तिच्यासाठी अल्टीमेट परब्रम्ह आहे. सर्वप्रकारचे धिरडी/दोसे/इडल्या वगैरेही प्रचंड आवडते.

अजून कोणी लिहीले नाही म्हणुन लिहीते आहे.
मुलांना खाण्याच्या सवयी (आणि एकंदरित कुठल्याही) लावायच्या तर Do as I say पेक्षा Do as I do हे महत्त्वाचे आहे. त्यांनी पौष्टिक खावं आणि आपण चमचमीत/ चरबरीत पदार्थांवर ताव मारावा असे होत नाही. आपण जितकी फळं खातो इन जनरल तितकी ते खाणार, आपण कुरकुरे खाल्ले तर तेही, आणि आपण पोळीभाजी खाल्ली तर तीही.
>>>>
रैना, तुला खंडीभरून साजुक तूपाचा शिरा. Happy
घरात या सवयी लावण्यासाठी काय उपाययोजना करावी यासाठी वेगळा बीबी चालू करावा काय? Wink
jokes apart, पण रैना च्या बोलण्यात १००% तथ्य आहे.

बरं मला एक सांगा. लहान मुलांच्या रेसीपीज मध्ये कधी कर्ड तर कधी योगर्ट असा उल्लेख करतात. या २ही मध्ये काय फरक आहे? Uhoh

पेजेसाठी भरड

२ वाट्या तांदुळ : धुवुन वाळवुन मग गुलाबी रंगावर भाजावेत
१ वाटी : मुग डाळ असोली किंवा मग नेहमीची धुवुन वाळवुन मग भाजावी
१ वाटी : उडीद डाळ असोली किंवा मग नेहमीची धुवुन वाळवुन मग भाजावी
१/२ वाटी : ह. डाळ किंवा डाळं धुवुन वाळवुन मग भाजावी. (डाळ्म असेल तर भाजायची गरज नाही)
१ वाटी : नाचणी ६ तास भिजवुन, मग मोड आणुन भाजावी
१ १/२ वाटी : गहु १२ तास भिजवुन, मग मोड आणुन भाजावेत
१ वाटी : ज्वारी / बाजरी (थंड / उष्ण बघुन) धुवुन वाळवुन मग भाजावी
१ वाटी : दाणे भाजुन
१ वाटी : बदाम
१ मोठा चमचा ओवा
१ छोटा चमचा मेथ्या
१ मोठा चमचा जिरे
हिंग
हे सगळे एकत्र करुन दळुन आणावे

आणि देताना २ चमचे पावडर पाण्यात घालुन मीठ घालुन शिजवावे वरुन मस्त तुप घालुन भरवावे.
साखर + दुध घालुन खीर हि करता येइल

बाळ थोडे मोठे झाले कि यातच रोज एक पालकाचे पान, टोमॅटो अशी काहि ना काहि भाजी घालावी

सुरुवातिला (बाळ ४-५ महिन्याचे झाल्यावर) फक्त वरचे पाणी पाजावे मग हळुहळु घट्टपणा वाढवत न्यावा
तसेच सुरुवतिला फक्त तांदुळ आणी मूग किंवा उडीद डाळीपासुन सुरुवात करावी मग हळुहळू एकेक घटक वाढवत न्यावा

ते वाचून काही कळलं नाही, निकिता मला. Blush
कर्ड म्हणजे आपण नेहेमी विरजण लावून करतो ते दही हे माहीतीये. आपल्या इथे इंडीयात योगर्ट वापरले जाते का? बाजारात रेडीमेड मिळते का?

निंबुडा, जिकडे जिकडे योगर्ट/कर्ड आहे तिकडे दही वापर. काही फरक पडत नाही. फार विचार करतेस बाई तू. Happy

आणि जसं आपण थोडे जंक फूड खातो, सतत पौष्टीक खात नाही तसे थोड्याफार प्रमाणात मुलांनाही दिले तरी चालत असावे. तुझी वरची पोस्टस बघुन तू बरेच गोड पदार्थ देते आहेस राजसला असेही जाणवले. तेही बरोबर नाही ना? लहान मुलं बिनासाखरेचे दुध, बिनासाखरेच्या खिरी वगैरे व्यवस्थित आवडीने पितात.
माझ्या मुली अजुनही बिनासाखरेचे दुध पितात. कमी गोड खिरी खातात.

१ वर्षानंतर आपण जे खातो तेच मुलांना द्यायचे, कमी तेल/तिखट्/मसाला घालुन. दात आले नसतिल तर थोडे कुस्करुन द्यायचे. शक्यतो मिक्सरमधुन काढुन, एकदम गरगट करुन नाही द्यायचे.
पोळिचे/पराठा/थालिपिठाचे/डोश्याचे छोटे तुकडे हातात दिले तर बराच वेळ आवडीने खात बसतात मुलं.

वर सगळ्यांनी म्हटले आहे त्याप्रमाणे कच्चीच फळे द्यायची. ज्या भाज्या कच्च्या खाऊ शकतो त्याही कच्च्याच द्यायच्या.

तुझी वरची पोस्टस बघुन तू बरेच गोड पदार्थ देते आहेस राजसला असेही जाणवले. >>>
अरे, मी मुलांच्या खाण्या पिण्याला उपयोगी पडतील असे पदार्थ इथे देतेय म्हणजे ते सगळे मी एकाच दिवशी लागोपाठ भरवते असे नव्हे. Happy

मला माहीतीत असलेले पदार्थ देतेय on random basis Happy

ओके. पण बरं झालं, यावरून आठवलं. राजसचा दररोजचा मेन्यू असा आहे.

सकाळी उठल्या उठल्या - स. ६:३० ते स. ७:३० च्या दरम्यान - नाचणीची खीर (गोड)
सकाळी न्याहारीला - स. ०९:३० ते १०:३० च्या दरम्यान - दूध + पोळी कुस्करून / रव्याची खीर/ सातूची खीर
दुपारच्या जेवणात - वरण-भात / तांदूळ+मूगडाळ खिचडी / वर सांगितलेली दलिया खिचडी/ हातसडीच्या तांदळाची भरड + उकडलेला बटाटा / पालक सूप / उकडलेल्या टोमॅटोची प्युरी / उकडलेल्या दूधीची प्युरी / उकडलेल्या लाल भोपळ्याची प्युरी
दुपारी झोपून उठल्यानंतर - दु.४ ते दु.५ च्या मध्ये - नेस्टम राईस दूधातून
संध्याकाळी - ६ ते ७ च्या दरम्यान - सेरीलॅक किंवा मारी (ओट्स्/गहू) बिस्कीट + दूध
रात्री जेवताना - ९ च्या आसपास - सुपारच्या जेवणाप्रमाणेच फक्त दुपारी दिलं ते सोडून व्हरायटी म्हणून अजून काहीतरी.

यात काही चूकत असेल तर सांगा प्लीज. किंवा काही चेंज हवा असेल तर सांगा.

राजसला सकाळी उठल्या उठल्या नुसतं दूध द्यायचा प्रयत्न करून पाहिला मी. पण पठ्ठ्या पीत नाही अजिब्बात. काहीतरी दाट हवं असतं त्याला.

रागावू नकोस. पण यातही सकाळी सलग २ वेळा खिरच आहे ना?
मी नाचणिचे सत्व पाण्यात शिजवुन त्यात जीरेपावडर, किंचित मीठ आणि तूप घालून देत होते.
सकाळी उठल्यावर साधे दुध किंवा सरळ ब्रेकफास्ट (weetabix दुधात कालवून) भरवायचे. चांगले पोटभरीचे होते.

>>नेस्टम राईस दूधातून
हा काय प्रकार आहे?
आणि फळे कधी देतेस?

माझ्या मुली लहान असताना (८ ते १२ महिने):
ब्रेकफास्ट : वीटाबिक्स + दुध (वीटाबिक्सचे प्रमाण वयानुसार वाढवत नेले, दुध तेव्हढेच ठेवले, म्हणजे लहान असताना पातळ मग थोडे सैलसर )
साधारण २ तासानंतर दुध आणि फळांचे तुकडे/खजूर वगैरे काहीतरी (मुलीला हवे असेल ते).
दोन्ही वेळा जेवणात : वरण-भात /खिचडी/ पोळी (परोठा/डोसा किंवा तत्सम काहीतरी) भाजीच्या रसात्/वरणात कुस्करुन
दुपारी झोपायच्या आधी/नंतर: दुध
झोपून उठल्यावर : नाचणीचे सत्व जीर पूड घालुन्/ सैलसर उपमा/पौष्टिक धिरडी ताकात कुस्करून (माझी बेबीसिटर तर दुधात कुस्करुन द्यायची)
रात्रीचे जेवण ७ वाजता
झोपायच्या आधी दुध.

येता जाता/आम्ही खात असलो तर फळांचे/भाज्यांचे तुकडे.
आता हेच बरोबर होते वगैरे काही मला म्हणायचे नाहीये. पण मला जे योग्य वाटत होते ते मी केले.

Pages