मुगाचं बिरडं

Submitted by मेधा on 8 June, 2010 - 17:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

वाटीभर मूग
दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून
नारळाचं दूध किंवा ओलं खोबरं
२ चमचे मालवणी मसाला
२-३ कोकम
एक मोठा लाल कांदा बारीक चिरून
हळद, हिरवी मिरची, जिरं, तेल, मीठ
७-८ काड्या कोथिंबिर

क्रमवार पाककृती: 

मूग भिजवून , मोड काढून, सालं काढून तयार करून घ्यावेत.
मुगामधे थोडी हळद , ठेचलेली लसूण, मीठ अन मालवणी मसाला नीट कालवून घ्यावा.
थोड्या तेलावर जिरं, हिरवी मिरची घालून परतून मग कांदा घालून परतावे

कांदा मऊ झाला की मूग घालावे, थोडे पाणी घालून झाकण ठेऊन शिजवावे.
शिजत आले की नारळाचे दूध घालावे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी
( कधी नारळाचे दुध काढायचा कंटाळा आला की ओला नारळ अन कोथिंबीरीच्या काड्या मिक्सर मधून भरड वाटून घालते मी )

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यावर अवलंबून .
अधिक टिपा: 

सिंडरेलाच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासाठी कृती !

माहितीचा स्रोत: 
इकडून तिकडून वाचून अन स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मटकीचं बिरडं मी पण नाही केलं/खाल्लं कधी. पण खिचडीत घालणार असेल तर कधी तरी (मूड असेल तर) काढते सालं. छान वाटते पांढरी मटकी.

मला तरी सालं काढायची कल्पना काही केल्या रुचली नाही. याचा अर्थ सालाचे महत्त्व तुम्हा लोकांना माहिती नाही...असेल पण अगदी थोडेसे. आपल्या शरिरातील large intestines/small intestines ना फायबरची अत्यंत गरज असते ती अशा साला/चोथा/कोंड्या मार्फतचं मिळते. मी तरी बटाट्याचे साल अगदी कितीही खराब असले तरी खातो.. तसेच चिकूचेही.

बी, सालं काढून करायचं म्हणूनच त्याला मुगाचं बिरडं म्हणतात. सालं ठेवून केली असती तर त्याला मुगाची उसळच म्हटलं असतं ना. Wink

बी , तुला आवडत नसेल तर तु नको काढूस सालं. तुला सालांचं, चोथ्याचं, फायबरचं मह्त्व सांगायचं असेल लोकांना तर त्याबद्दल नीट माहिती देऊन स्वतंत्र लेख लिही.
इथे का अट्टहास करतोयस ?

नाही आमच्याकडे बहुतेक विदर्भात वालाचं बिरडं हा प्रकारचं नाही. मी तरी कधी पाहिला नाही. वालाचे साल काढत असतील कारण लालू म्हणाली तसे वालाचे साल जिभेला लागतात.. म्हणून कदाचित असे असावे ते. साल वाळवून मला पाठवून द्या. हल्ली मुंबईत कोंडा विकत मिळतो. मी साल विकेन Happy

>>बिरडं म्हणजेच साल काढलेलं कडधान्य
हे मला माहीत नव्हतं. Happy मी ते पदार्थाचं नाव समजत होते. कोरडी ती उसळ आणि रस्सा असलेलं ते बिरडं.

लालू चुक... साल काढलेल्या कडधान्याला मोगर म्हणतात. तू जर राजस्थानकडे कधी गेली असशील तर कळेल.. तिथेही साल काढलेल्या धान्याला तेही मोगरचं म्हणतात.

मी अकोल्याला धान्य बाजारात पाहिले आहे जुने मराठी लोक मुगाचे मोगर द्या, उडीदाचे मोगर द्या असाचं शब्दप्रयोग करतात आणि धान्य विकणारा बरोबर साल काढलेले धान्य देतो.

मुगाचा मोगर हलकासा शिजवून त्याचे छान पराठेही होतात. मी खाल्ले आहेत. खंग्री लागतात अगदी.

>>बिरडं म्हणजेच साल काढलेलं कडधान>>>> ही व्याख्या चुक आहे लालु.

>>बिरडं म्हणजेच मोड आलेल्या कडधान्याचं साल काढलेलं कडधान>>>> असं हवं होतं

मुगाचा मोगर हलकासा शिजवून त्याचे छान पराठेही होतात. मी खाल्ले आहेत. खंग्री लागतात अगदी.>>> मग तुझा प्रश्न सुटला की बी. वर दिलेल्या कृती प्रमाणे बिरडं कर आणि सालं वाया जाऊ नयेत म्हणून त्याचे खंग्री पराठे कर. फोटो काढ. नी रेसिपी इथे टाक. Happy

ती व्याख्या मी केलेली नाही. अमृताने लिहिलेले वाक्य पुन्हा लिहून उलट ही व्याख्या मला माहीत नव्हती असं मी म्हणते आहे. मी दिलेली लिंक पहा. त्यात बिरडं शब्दाचा सोलण्याशी काही संबंध सांगितलेला नाही.

बी ती व्याख्या मी टाकलेली, लालूने नाही.. मी 'मोड आलेल्या' हे वाक्य टाकायला विसरले. आणि मी टाकयला विसरले असले तरी लालूने बरोबर अर्थ काढला असावा कारण इथे आपण मोड आलेल्या धान्याबद्दलच बोलतोय.

मुगाचे बिरडे हा खास सी के पी लोकांचा पदार्थ आहे (संबंधित दखल घेतीलच). मी मालवणचा असून मालवणी मसाल्याचे बिरडे कधी खाल्ले नव्हते. गोव्यात असा प्रकार मूगागाठी म्हणून करतात.
मुगाची साले काढण्याचे एक तंत्र आहे. हवे तसे मोड आले कि मूग कोमट पाण्यात ठेवतात, मग आणखी पाणी घालून हाताने अलगद खालीवर करतात. अश्या रितीने बरीच साले वेगळी होतात व वर तरंगतात. पाण्याबरोबर निघून जातात. वालाप्रमाणे एक एक मूग सोलावा लागत नाही.
धान्याच्या टरफलात फारशी पोषणमूल्ये नसतात. मुगाची साल पातळ असते म्हणून ठिक, पण काही कडधान्याची साल काढावीच लागते. ते पचवण्याची शक्ती आपल्यात नसते.
मोड यायला अंधारच हवा. मोड आल्यानंतर थोडा वेळ उजेडात ठेवले तर त्यात हरितद्रव्य तयार होते, पण मोड काढताना कोंब यावा अशी अपेक्षा नसते, म्हणून अंधार हवा.
चीनी पद्धतीचे बीन स्प्राऊट्स करायचे असतील तर हि घरगुति पद्धत बघा. एक उंच काठाचा थाळा घ्या. त्यात राहील असा सपाट तळाचा कोलँडर घ्या. त्यात जाड रेतीचा एक इंच थर द्या. थाळ्यात तो ठेवा. रेती ओली करा. मग त्यावर आठ दहा तास भिजवलेल्या मूगाचा एकेरी थर द्या. कोलँडर्वर झाकण ठेवा. आणि हे सगळे मोठ्या भांड्याने झाकून ठेवा. अशा रितीने मूगाला दोन इंच लांब जाड मोड येतात. हीच पद्धत मेथीला मोड काढण्यासाठी पण वापरता येते.

चीनी पद्धतीचे बीन स्प्राऊट्स करायचे असतील तर हि घरगुति पद्धत बघा >>>> हे काय आता ? Uhoh

आर्च, आमटी नाही ऊसळ म्हणतात. बिरड्याला (घाटी लोक) बिरड्याची उसळ म्हणतात. नगरच्या लग्न कार्यालयांमध्ये बिरड्याची उसळ हा शब्दप्रयोग फार पापिलर आहे.

नाही सिंडे. उसळीला आम्ही उसळच म्हणतो. जशी वालाची उसळ, मुगाची उसळ. पण मोड आल्यावर सालं काढून त्याची आमटी होते त्याला बिरडं म्हणतो. जसं वालाच बिरडं, मुगाच बिरडं ,आणि चवळीचं बिरडं. आमच्याकडे ही तीनच बिरडी बनतात.

पण मोड आल्यावर सालं काढून त्याची आमटी होते त्याला बिरडं म्हणतो. >>>> आर्च, एक लक्षात येतय का इथे कोणीही नॉन-सीकेपी 'आम्ही त्याला आमटी म्हणतो' असं सांगत नाहीयेत. आमटी पण तुच म्हणते आहेस आणि बिरडं पण तुच.

लाल चवळीचे बिरडे पानपोळ्यासोबत खायचे असते. (पानपोळ्या म्हणजे तांदळ आणि खोबरे एकत्र वाटून, त्याचे पानाप्रमाणे पातळ पोळे )
कधी कधी वाल सोलताना काही वाल कच्चे राहतात (त्यांना बहुतेक कुसर म्हणतात,) ते अंगणात फेकले जातात किंवा शेतातून शेंगा काढल्यावर काहि दाणे शेतातच पडतात, असे दाणे पहिल्या पावसात रुजतात. ते मातीच्या वर आले कि पाने फूटण्यापुर्वीच ते उपटतात, त्यांना पण बिरडेच म्हणतात. त्याची भाजी छान लागते.

Pages