मुगाचं बिरडं

Submitted by मेधा on 8 June, 2010 - 17:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

वाटीभर मूग
दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून
नारळाचं दूध किंवा ओलं खोबरं
२ चमचे मालवणी मसाला
२-३ कोकम
एक मोठा लाल कांदा बारीक चिरून
हळद, हिरवी मिरची, जिरं, तेल, मीठ
७-८ काड्या कोथिंबिर

क्रमवार पाककृती: 

मूग भिजवून , मोड काढून, सालं काढून तयार करून घ्यावेत.
मुगामधे थोडी हळद , ठेचलेली लसूण, मीठ अन मालवणी मसाला नीट कालवून घ्यावा.
थोड्या तेलावर जिरं, हिरवी मिरची घालून परतून मग कांदा घालून परतावे

कांदा मऊ झाला की मूग घालावे, थोडे पाणी घालून झाकण ठेऊन शिजवावे.
शिजत आले की नारळाचे दूध घालावे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी
( कधी नारळाचे दुध काढायचा कंटाळा आला की ओला नारळ अन कोथिंबीरीच्या काड्या मिक्सर मधून भरड वाटून घालते मी )

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यावर अवलंबून .
अधिक टिपा: 

सिंडरेलाच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासाठी कृती !

माहितीचा स्रोत: 
इकडून तिकडून वाचून अन स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृती छान आहे मेधा. करुन पाहीन. मुगाचे साल काढायलाचं हवे का? मला वाटतं त्यात बरचं फायबर असतं ते मग वाया जाईल.

मी हेच म्हणणार होते. ते फायबरचं तर आहेच, पण जरा किचकट काम आहे Wink मुगाची सालं एवढी दाताखाली येणार नाहीत. वाल मात्र सोलावेच लागतात.

लागणारा वेळ:
३ दिवस

>>>मेधा, तीन दिवस कशाला हवेत??? मूगाला मोड आणायलाच ना??? अन्यथा अख्खी पाकृ, अर्ध्या पाऊण तासात होतेच !!! Happy

माझ्या नवर्‍याची खासियत आहे, वालाचं बिरडं. हे मूगाचं पण चांगलं करेलच तो. Proud

माझ्या नवर्‍याला मोड आलेले मुग कडु लागतात. काही उपाय?

मोड आल्यावर भाजी करायच्या आधी कडधान्ये परत एकदा हलक्या हाताने, मोड तुटणार नाहीत याची काळजी घेत धुवुन घ्यावीत. मोड येताना जी प्रोसेस होते त्यामुळे एक थोडासा बुळबुळीत थर धान्यावर चढतो कदाचित त्यामुळे कडवटपणा जाणवत असेल.

पाकृ चांगली आहे. मला साले काढुन केलेली मुगाची भाजी फार आवडते. जरा वेळकाढु आहे, बट वर्थ इट.. Happy

मला वाटतं मुगाचे साल काढायचे असतील तर त्याला आणखी एक दिवस मोड येऊ द्यावेत. नाहीतर तसे मोडे एक दिवसात येतील -- एक रात्र भिजवायचे आणि दुसरा दिवस मोड आणायला ठेवायचेत. पण हवामानानुसार कमीअधिक तास लागू शकतात.

जर कडधान्य चाळणीत पुर्ण पाणी निथळून होईपर्यंत ठेवले तर ते एकदम कोरडे होतात. मग त्याला कापडात बांधून परत त्याच चाळणीत ठेवायचे. मोड कोरडे येतात.. नासत नाहीत.

धन्यवाद बी.. मी बाजारातुन मोडयंत्र आणलंय, पण त्याच्यात जागा खुपच कमी आहे.. फडक्यात बांधायचा मी नेहमी कंटाळा करते आणि तसेच चाळणीत झाकुन ठेवते. पण असे केल्याने खाली राहिलेल्या धान्याला नीट मोड येत नाहीत... Sad

साधना, कडधान्याला मोड आणताना ते उजेडी ठेवायचे.. झाकून तर मुळीच ठेवू नये. त्यानीचं उलट मोड येतायेता ते मधेच नासतात आणि कुबट वास येतो मग. माझ्याकडे मी स्टीलची टोपलीच्या आकाराची चाळणी घेतली आहे. ती मला रोज कशाला ना कशाला तरी उपयोगात येते. त्यातच मी मोड आणतो. कधीकधी तर मोड कापड फाडून चाळणीच्या छिद्रांवाटे बाहेर येतात.

मी दगडी/जाड पोहे देखील एकदा उपसून काढले की एक तास कापडात बांधून ठेवतो. अगदी सुटे.. मऊ होतात ते.

मी पण जाळीच्या भांड्यात मोड आणते. पाण्यातुन उपसले की त्यात एक मिरची मोडून ठेवली की मोड लवकर येतात. करुन बघा.

कडधान्याला मोड आणायला ते भिजुन पुर्ण निथळायचे मग, चाळणीत ठेवुन वर घट्ट बसेल अशी एक ताटली ठेवायची त्यावर जड काहितरी (दगड्,बत्त्ता)ठेवायचे. चाळणीच्या खाली एक ताटली ठेवायची आणी हे सगळ उबदार ठिकाणी ठेवायचे.मस्त लांब मोड येतात. शिवाय, सगळ पटकन वॉशेबल.
ही मेधाचिच टिप आहे.

कडधान्याला मोड आणताना ते उजेडी ठेवायचे.. झाकून तर मुळीच ठेवू नये

हे आताच कळले. मला तर मोड काढायचे असल्यास झाकुनच ठेवावे असे शिकवले गेलेय :).. मीही त्याच स्टिलच्या टोपल्यात मोड काढते, पण वर झाकण ठेवुन.. आता उद्या झाकण न ठेवता बघते. मला तर मोड येणारच नाही असे वाटतेय. इतक्या वर्षांची सवय.... Happy

ओह्ह्ह.. कापडात बांधले म्हणजे तसे झाकले गेलेच की.. मी ते कापडाचे विसरुनच गेले होते.. मी सरळ उघडेच ठेवणार होते.. Happy (काय भयानक स्मरणशक्ती आहे. बहुतेक तिथेही चाळणीच आहे Proud )

साधना, मी त्या मोडयंत्रातच मोड आणते. माझ्याकडे ते तीन थराचं आहे त्यामुळे भरपूर जागा मिळते. आणि ते पण चांगलं ऊन येईल असा ठिकाणी ठेव. त्यामधे दीड दिवसातच चांगले मस्त मोड येतात.

कापडाच्या आत सुर्यकिरण आतबाहेर शिरतात. तसे झाकणाचे होत नाही. एकदा झाकण ठेवले की सुर्यकिरण फक्त झाकणापर्यंतच पोचतात. आत नाही. त्यामुळे photosynthesis ची प्रक्रिया नीट होत नाही. कापड पाणी शोषून आर्द्रता राखायला मदत करू शकतो.

आज संध्याकाळी मुग भिजत घालते आणि उद्या प्रयोग करते कापडात बांधुन ठेवण्याचा.. Happy सगळ्यांच्या टिप्सबद्दल धन्यवाद..

वर दिलेल्या मुगाच्या बिरड्याची रेसिपी मटकीला पण चालेल काय???

मालवणी मसाला नसेल तर लाल तिखट्,धण्या जिर्‍याची पूड अन थोडा गरम मसाला असं घालता येईल.
मी गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घालून कधी केलं नाही.

मोड आलेले मूग थोडा वेळ कोमटपेक्षा थोड्या जास्त गरम पाण्यात बुडवून ठेवले तर सालं पटकन निघतात.
मी अगदी सगळी सालं काढत नाही, पण ७०-७५% टक्के काढते .

सही!.. पण मी पण मुगाची सालं काढु शकेन कि नाही माहित नाही Proud
लगेच मुग भिजत घालते. उद्या सकाळी बिरडं. Happy

मटकीची पण सालं अशीच निघतात. आपण काही रोज भाज्यांचे सत्व फेकून देत नाही. एखादे दिवशी सालं काढून मूग खाल्ले तर काही हरकत नाही.

मोड आलेले मूग भरपूर पाण्यात (थोडसं कोमट) टाकले की आपोआप सालं वर येतात.

छान आहे कृती. मला स्वःताला मूग फारसे आवडत नाहीत त्यामुळे घरच्यांसाठी बिरडं करेन. मी त्याच बिरड्यात माल मसाला घालून कामचलाऊ मिसळ करून खाईन Proud

Pages