वाचनाची आवड अशीही!!!!!!!!!!!

Submitted by हर्ट on 7 April, 2010 - 11:35

या बीबीचा उद्देश -- वाचन, साहित्य कशाला म्हणतात याची जराही जाण नसताना -- काहीच्या काही वाचन करणारे वाचक नक्की काय वाचतात त्याबद्दल इथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'काहीच्या काही वाचन' असं काही नसतं. जो तो आपल्याला आवडेल ते वाचतो. व्यक्तीपरत्वे वाचनाची आवडही बदलते. मनःस्थिती, वेळ यांचाही वाचनाशी संबंध असतो.
फिल्मफेअर, स्क्रीन, स्टारडस्ट, मिड डे हे मी नियमितपणे वाचतो. वेळप्रसंगी 'कोथरुड मित्र', 'स्वामीसमर्थ कृपाप्रसाद' अशी मासिकंही वाचून काढली आहेत. वाचायला काही नाही म्हणून मी 'संपूर्ण चातुर्मास'मधल्या कहाण्याही वाचल्या आहेत.

पुलं, वपु वाचतो म्हणून तो कमी प्रतीचा वाचक आणि नेमाडे, खानोलकर, पेंडसे आवडतात म्हणून एखादा चांगला वाचक, हेही मला पटत नाही. प्रत्येकानं सगळं वाचलंच पाहिजे असं काही नाही. उलट एखाद्या लेखकाचं एकच पुस्तक वाचून त्या लेखकावर काट मारणारे, किंवा त्या लेखकाला डोक्यावर घेणारेच अधिक असतात.

पण बी वाचन म्हणजे काय पुस्तकं असेच असायला हवे काय? कोणी काय वाचावे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

वेळप्रसंगी 'कोथरुड मित्र' >> अरे चिनूक्सा Lol - मी पण संध्यानंद रोज आणायचो. Happy

वाचन, साहित्य कशाला म्हणतात याची जराही जाण नसताना >>>> ही जाण म्हणजे काय हे माझ्या मते ज्याचं त्याला ठरवू द्यावं. ज्याला जे हवं ते तो वाचेल. चिन्मय म्हणतो तसं बर्‍याचदा काय वाचलेलं आवडतं ते त्या मनस्थिती वर अवलंबून असतं. गंभिर आणि विचारप्रवर्तक वगैरे दरवेळी पचतच असं नाही.. कधीकधी हलकं फुलकं पण वाचलेलं आवडून जातं. !!
अमुक एका प्रकारचं/लेखकाचं लिखाण वाचणारा/आवडणारा(च) फार महान, व्यासंगी, ज्ञानी वगैरे वगैरे आणि तश्याप्रकारचे लिखाण न आवडणारे/न वाचणारे फार तुच्छ अशी वर्गवारी करणं (जे मायबोलीवर सुध्दा चालतं) ते चुकीचं आहे असं मला वाटतं.. (हे मत नुसतं वाचन असच नाही चित्रपट, नाटकं, संगीत ह्याबद्दल पण आहे) ... त्यामुळे 'काहीच्या काही वाचन' हा फंडा अजिबातच पटला नाही..

चिनूक्सला अनुमोदन.
उत्तम, अभिजात वाचन करण्याची वृत्ती जोपासणे अनेक बाबींवर अवलंबून असते. जसे की, लहानपणापासूनचे exposure, वय, आयुष्यात दिशा देणारी/प्रभाव टाकणारी माणसे. आणि हे व्यक्तिपरत्वे भिन्न असते. मी पूर्वी 'गृहशोभिका', 'माहेर', 'शिरवळकर' व तत्सम वाचणार्‍या लोकांपासून शक्यतो दूर रहायचे. (आपण वाचतो ते काय ग्रेट या भ्रमात)
पण एकदा एका विचारवंतांशी (खर्‍या खुर्‍या बरं का) बोलताना लक्षात आलं की अरे, ते तर आपण वाचत असलेल्या दर्जेदार साहित्याला पण क्षुल्लक मानतात. आणि मग वैचारिक वाचनाकडे दिशा मिळाली.
तर मुद्दा असा की कोणालाही कमी न लेखता ज्याचे त्याचे काहीही वाचण्याचे स्वातंत्र्य मान्य करावे!

पुलं, वपु वाचतो म्हणून तो कमी प्रतीचा वाचक आणि नेमाडे, खानोलकर, पेंडसे आवडतात म्हणून एखादा चांगला वाचक, हेही मला पटत नाही>> Happy .... चिनूक्सला अनुमोदन. मला तरी हा लसावी कळलेला नाही खरच.

अमुक एका प्रकारचं/लेखकाचं लिखाण वाचणारा/आवडणारा(च) फार महान, व्यासंगी, ज्ञानी वगैरे वगैरे आणि तश्याप्रकारचे लिखाण न आवडणारे/न वाचणारे फार तुच्छ अशी वर्गवारी करणं (जे मायबोलीवर सुध्दा चालतं) ते चुकीचं आहे असं मला वाटतं.. (हे मत नुसतं वाचन असच नाही चित्रपट, नाटकं, संगीत ह्याबद्दल पण आहे) ... त्यामुळे 'काहीच्या काही वाचन' हा फंडा अजिबातच पटला नाही..>>>>>>>>>>>>>>>>

पराग अगदी अगदी अनुमोदन रे. हेच लिहायला आलेले मी इथे. मायबोलीवर अलिकडे तर फारच अस दिसत दुर्दैवानी.:(
मी मेरी सहेली मासिक अजुन पण भारतात गेले कि विकत घेवुन वाचते. मला आवडत ते. Happy
खुप ग्रेट वाचणारे ग्रेट असतातच अस नाही. किंबहुना इथे लिहुन मारे आपल मत तावातावाने मांडणारे लोक प्रत्यक्षात कसे वागतात ते बघण हाच एक संशोधनाचा विषय ठरेल. त्या दुष्टीन बघायला गेल तर इंटरनेट साईट्स ,फोरम हे एक फसव माध्यम ठरेल. तुम्ही इथे लिहिता किंवा वाचता ते असालच याची गॅरंटी नाही.

मुद्दा हा नाहीच आहे (असं मला वाटतंय Happy )

"साहित्य" प्रकार सोडून (कथा, कादंबरी, कविता, ललित इ.) इतर प्रकार उदा. गृहशोभिका सारखी मासिके ज्यांत साहित्याऐवजी "माहिती" असते. वर्तमानपत्राचेही तेच. जी वाचण्यामागे साहित्याचा आस्वाद घेण्याऐवजी माहिती मिळवणे किंवा वेळ घालवणे हा उद्देश जास्त असतो. तर असं वाचन जास्त करणार्‍या लोकांनी "वाचनाची आवड" आहे असे म्हटले तर ते चालेल का? चालेलही, पण त्यांचा वाचनामागचा उद्देश वेगळा असतो.

चिनूक्सचं अगदी पटलं. खरा वाचक हा भेळेचा कागदही नजरेसमोरुन घातल्याशिवाय टाकून देत नाही.
खरं तर कोण भिकार किंवा कोण दर्जेदार हे असं एखाददुसर्‍या पुस्तकावरुन कधीच नाही ठरवता येत.वेळ कमी असला तर काटेकोरपणे वाचनाला गाळणी लावावीच लागते. नाहीतर मला सर्व प्रकारची पुस्तकं एन्जॉय करता येतात. अंतर्नाद माझं आवडतं मासिक असं मी म्हणते तरी इतर मराठी मासिकांमधे (माहेर/मेनका/कथाश्री/विपुलश्री इत्यादी) काही अत्यंत दर्जेदार कथाही मी वाचल्या आहेत. मला कोणत्याही पुरवणीतली सदरं वाचायला आवडतात. पण ती माझी आवड नाही. आवडत्या नावड्त्या पुस्तकांची लेखकांची यादी हा सर्वस्वी वैयक्तिक आवडीनिवडीचाच भाग असतो आणि असावा. शिवाय तो तुमच्या वयोगटानुसार, मॅच्युरिटी लेव्हलनुसार बदलत जातो.
बेस्ट सेलर्स किंवा चर्चेत असलेली पुस्तकं, नामवंतांना आवडणारी पुस्तकं आम्हीही वाचतो असं दाखवायला आवडणाराही एक शोबाज वाचकवर्ग असतो.

वर सगळ्यांना अगदी १००% अनुमोदन.
काहिच्या काहि वाचन करणारे म्हणजे नक्की काय हेच कळ्ळ नाहिये मला.

वर्तमानपत्राला साहित्य म्हणता येत नाही, पण मासिकांना म्हणता येत. सत्यकथा सारख्या (केवळ एक उदा) मासिकात लिहून अनेक साहित्यीक जन्माला आले आहेत.

मी जे मिळते ते वाचते, मग ते ५०० रुपयांचे विकत घेतलेले पुस्तक असो वा भेळेचा कागद.. हातात कागद आला की तो वाचल्याशिवाय टाकायचा नाही असाच नियम आहे माझा Happy

>>गृहशोभिका सारखी मासिके
असं लिहिलं आहे, नानबानेही हेच उदाहरण दिलंय. तिलाही साहित्य असलेली मासिके अभिप्रेत नसावीत.
वाचनाची आवड असलेली व्यक्ती चौफेर वाचन करते, साहित्य वाचतेच हे आपण गृहित धरतो का, किंवा तो निकष लावावा का असा मला प्रश्न पडला. म्हणजे हे सोडल्यास वर्तमानपत्र, माहिती पुरवणारी मासिके, टेक्निकल पुस्तके इ. गोष्टींचे अफाट वाचन करणार्‍याला "वाचनाची आवड" आहे असे म्हण्ता येईल की केवळ ज्ञान संपादन करण्याची आहे असे? Happy

वर्तमानपत्र, माहिती पुरवणारी मासिके, टेक्निकल पुस्तके इ. गोष्टींचे अफाट वाचन करणार्‍याला "वाचनाची आवड" आहे असे म्हण्ता येईल का >>> वाचन कॅटेगराईज केले तर हो. असते एखाद्याला टेकी गोष्टींच वाचन करायची आवड. पण 'साहित्यक वाचनाची आवड' असाच पर्याय ठेवला तर नाही ! "साहित्य" व्याखेमध्ये टेकी लिखान येत नसेल तर उत्तर मात्र नाहीच येणार. मग तुझा मुद्दा बरोबर आहे.

थँक्स लालू!

'तेही वाचणं आणि तेवढच वाचणं' ह्यात फरक आहे.
कुणी काय वाचावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हे अगदी खरं..
'मला वाचनाची खूप आवड आहे, - मी दररोजचा पेपर वाचतो' असल्या वाक्यांसदर्भात हे भाष्य आहे.
गृहशोभिका हे मासिक माझी एक चांगली मैत्रिण नियमीत पणे विकत घ्यायची..त्यामुळे न वाचताच मत तयार केलय असं नाही, तर ते झालय..

'हे म्हणजेच चांगलं आणि ते म्हणजेच वाईट' ह्याच्या विरुद्ध विचार मांडलेल्यांच मत योग्यच आहे.
पण दुसर्‍याच्या आवडीनिवडीची/ मतांची टिंगल ह्याच लोकांनी कधी केली नाहिये का? आख्या आयुष्यात नाही, मी फक्त माबो वरच्या आयुष्याबद्दल विचारतेय.
(ज्यांनी केली नसेल हे त्यांच्याकरता लागू नाहिये!)

वाचनाची आवड म्हणजे 'वाचन फॉर द सेक ऑफ वाचन' - अशा अर्थी म्हणेन मी. (वर म्हटल्याप्रमाणे भेळेचा कागदही आला त्यात.)

म्हणजे ज्ञानप्राप्ती वगैरे साईड इफेक्ट्स. Happy
'उपयुक्त ज्ञाना'ची प्राप्ती ज्यातून होणार नाहीये तीही 'टेकी' पुस्तकं 'फॉर द सेक ऑफ इट' वाचत असाल तर ती वाचनाचीच आवड.

आणि त्यामुळेच त्यात पंक्तिप्रपंच करणं चूक आहे.

'हे म्हणजेच चांगलं आणि ते म्हणजेच वाईट' अशा विचार मांडलेल्यांच मत योग्यच आहे.
पण दुसर्‍याच्या आवडीनिवडीची/ मतांची टिंगल ह्याच लोकांनी कधी केली नाहिये का? आख्या आयुष्यात नाही, मी फक्त माबो वरच्या आयुष्याबद्दल विचारतेय.
(ज्यांनी केली नसेल हे त्यांच्याकरता लागू नाहिये!)<<<
हे खूपच पटलं नानबा.

"साहित्य" प्रकार सोडून (कथा, कादंबरी, कविता, ललित इ.) इतर प्रकार उदा. गृहशोभिका सारखी मासिके ज्यांत साहित्याऐवजी "माहिती" असते. वर्तमानपत्राचेही तेच. जी वाचण्यामागे साहित्याचा आस्वाद घेण्याऐवजी माहिती मिळवणे किंवा वेळ घालवणे हा उद्देश जास्त असतो.>>
मूळात साहित्याची आवड म्हणून पुस्तके वाचणारे किती जण असतात हा कळीचा मुद्दा. किती जण हातात पडलय म्हणून , किती जण वेळ घालवायला, किती जण फक्त सवय म्हणून, किती जण अमक्याने सांगीतलय म्हणून बघू किंवा कुठे तरी reference वाचला म्हणून बघू अशा अर्थाने वाचायला घेतात तेंव्हा आस्वादाच्या मुद्द्यामधे कितपत तथ्य आहे ?

काहीही वाचायला मिळालं की अधाशासारखा त्यावर तुटून पडणारा माणूस म्हणजे सर्वसामान्य वाचक.
आणि मी स्वतःला सर्वसामान्य वाचक समजते. उत्तम पुस्तक हाती लागले तर क्या बात है! पण तसे नाही झाले तरी बिघडत नाही. मला तर डिक्शनरी, डिरेक्टरी, थिसॉरस, पंचांग, कालनिर्णय, भेळेचा/ खार्‍या दाण्याचा कागद, रद्दीतील वर्तमानपत्र, रस्त्यावरच्या पाट्या, ब्लॉग्ज आणि सचित्र पुस्तकं.... सगळं सगळं वाचायला आवडतं! Happy

आपण नेहमी चांगलं साहित्यच वाचावं असं थोर मंडळी म्हणतात. मी मात्र काहीही वाचतो. अगदी काहीही !!
रविवारचं वर्तमानपत्र (लोकसत्ता) वाचण्याचा क्रम असा :
१) कथा
२) हास्यरंग
२) माहितीपूर्ण लेख
३) बालकथा
४) ठळक बातम्या
५) जाहिराती (प्रदर्शन, शेअर बाजारात हजारो, लाखो कमवा, २४ तासात लाभ (विनोदी साहित्य बाय बंगाली बाबाज), वधू-वर सूचक केंद्राच्या जाहिराती (शेकडो स्थळे, लग्न जुळवूनच देऊ) इ. इ.

घरचे लोक मला गाढव वाचक म्हणतात. ( गाढवाला कसे उकीरड्यावर चरले काय किंवा मालकाने चारा दिला काय, पोट भरण्याशी मतलब ! तसे मला वाचण्याशी मतलब !!)

पुस्तक वाचनासंबंधी निकष पुढीलप्रमाणे :
१) पुस्तकाला जास्तीत जास्त पाने असावीत. (म्हणजे जास्त वेळ चरता येते.)
२) अनुवादित पुस्तकांना प्रथम पसंती. त्याखालोखाल नारायण धारप. (गेले बिचारे आता. आता त्यांच्यासारखा विषय हाताळणारा लेखक नाहीये. )
३) लेखक तितका महत्वाचा निकष नाही.
४) लेखिकांची पुस्तके टाळण्याकडे पूर्वी जास्त कल असायचा. (आता नाही विशेषतः मेघना पेठे आणि कविता महाजन वाचल्यावर)
५) मन उदास असेल तेव्हां मात्र हटकून गोनिंदा, माडगुळकर आणि जुन्या जमान्यातील बाळबोध वळणाच्या कथा !

पण दुसर्‍याच्या आवडीनिवडीची/ मतांची टिंगल ह्याच लोकांनी कधी केली नाहिये का? आख्या आयुष्यात नाही, मी फक्त माबो वरच्या आयुष्याबद्दल विचारतेय.<<<

भले वैयक्तिक आयुष्यात असो वा मायबोलीवरच्या आयुष्यात.
अभिव्यक्तीचा मार्ग, प्रगल्भता, आवडीनिवडी यावरून जाहीर टिंगल करणे म्हणजे दुसर्‍याला कमी लेखणेच नव्हे काय?
प्रत्येक जण विकासाच्या/प्रगल्भतेच्या वेगवेगळ्या वाटेवर वेगवेगळ्या टप्प्यावर पुढे प्रवास करत असतो. त्यामुळे हे सर्व खुप सापेक्ष आहे.

विंदांच्या एका मुलाखतीतला काही भाग दोन-तीन वर्षांपूर्वी अंतर्नाद मासिकात वाचला होता. त्यात त्यांनी वाङ्मयाची तुलना जंगलाशी केली होती. काही उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते हे खरं, पण कोणत्याही देशात बागेप्रमाणेच जंगलंही पाहिजेत, वाळवंटं पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडं पाहिजेत असं त्यांचं निरनिराळ्या लेखनाबद्दल मत होतं. शिवाय समाजातल्या एका मोठ्या वर्गाची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम ते करतात, हा मुद्दाही त्यांनी मांडला होता. बाकी अगदी चाळिशीतला गृहस्थही चांदोबा किंवा ठकठक तन्मयतेने वाचत असला, तरी त्याचं त्यात रंगून जाणं महत्त्वाचं वाटतं.

बाकी एकंदरीत भेळेचा कागद - वाचन फॉर द सेक ऑफ वाचन - याबद्दल स्वातींशी सहमत. या संदर्भात सॉमरसेट मॉमचं एक वाक्य लक्षात राहिलं आहे -- Some people read for instruction, which is praiseworthy, and some for pleasure, which is innocent; but not a few read from habit, and I suppose that this is neither innocent nor praiseworthy. Of that lamentable company am I.

नंदन, मस्त संदर्भ दिले आहेस. अभिजात, प्रायोगिक, व्यावसायिक, प्रेक्षकाभिमुख, प्रेक्षकपराङ्मुख (:P) हे सगळे प्रकार त्या अर्थी सारखेच महत्त्वाचे असतात कोणत्याही कलेच्या प्रवासात. शिवाय मुळात हे रकानेच सापेक्ष आहेत. केवळ व्यक्तिसापेक्षच नव्हे, काळानुसारही बदलत जातात हे निकष. कालचं ग्रेट आज थोतांड वाटू शकतं आणि आजचं सामान्य उद्या अभिजात ठरू शकतं. कित्येक त्यांच्या हयातीत नाकारले/हेटाळले गेलेले लेखक/कलाकार (किंवा खरंतर लेखन/कलाकृती म्हणू) कालांतराने थोर ठरल्याची उदाहरणं कमी नाहीत.

ज्याला जे वाचावसं वाटतं (आणि वाचता येतं) त्याने ते वाचावं...इतकं साधं, सोपं, सरळ आहे हे माझ्यासाठी Happy
'काहीच्या काही' वाचन असं काही नसावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

अरुंधतीला अनुमोदन. मी पण कधी काळी वेळ जात नाही अन वाचायला काही नाही म्हणून संपूर्ण चातुर्मास वाचले होते अंथरुणात लोळून अन खूप शिव्याही खाल्ल्या होत्या त्याबद्दल Sad

चिनूक्सच्या अख्ख्या पोस्टला अनुमोदन. Happy

>> वाचन, साहित्य कशाला म्हणतात याची जराही जाण नसताना << काहीबाही, सुमार, माहीतीपुर्ण आणि उत्तम असं सगळंच वाचल्याशिवाय ही जाण येत नसावीच.
(४ पदार्थ टेस्ट केले की मगंच कळते की नक्की कोणता चवदार आहे ते.) खरंतर कितीही वाचन केलं तरी आपल्याला साहित्याची जाण आली असं समजणं म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं. त्यामुळे अमुकतमूक लेखकंच उत्तम, दुसरा अगदी टुकार... असं काहीही नसतं.

माझ्या संपुर्ण वैयक्तिक मतानुसार; ज्या वाचनातून आपल्याला अनुभुती मिळते, काहीतरी शिकायला मिळतं, त्यातलं एखादं वाक्य किंवा अर्थ मनाला भावून जातो ते खरं सुंदर साहित्य... मग ते काहीही असो.
गृहशोभिका ह्या मासिकाला कायम कमी लेखले जाते, पण माझ्या अंदाजानुसार सध्यस्थितीत सर्वात जास्त तेच खपते...

कधीकाळी मी अजारी होते. आठवडाभर घरी विश्रांती घेताना सगळी पुस्तकं संपली वाचून, शेवटी मी बहिणीकडून कमलाबाई ओगले यांचं पाककृतींचं पुस्तक वाचून काढून, रावणभाताची रेसिपी पाठ केलेली... (नुसतीच पाठ केली, बनवला कधीच नाही.) Proud

Pages