उद्योजकता विकास संघ- संकल्पना

Submitted by चंपक on 14 January, 2010 - 03:57

दहा-पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करावेसे वाटते. एका मायबोलीकराने तर तब्बल साडे तीन महिन्यांच्या नोकरी च्या अनुभवावर स्वतः ची कंपनी सुरु केली अन ते आज एक यशस्वी उद्योजक गणले जात आहेत! 'स्वः निर्मीती चा आनंद काही वेगळाच असतो' हे अनुभवाने माहिती झालेले असते. अश्या वेळी आपल्या सारखे कुणी आसपास आहेत का हे बघणे गरजेचे असते. असतील तर आनंद होतो. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' ह्या संतवचनाची आठवण होते.

महाराष्ट्राला सहकार चळवळीची मोठी परंपरा आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विट्ठलराव विखे पाटलांच्या प्रयत्नांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक गावी उभा राहिला. अन संपुर्ण देशात सहकारी संस्थांचे जाळे पसरले. भले-बुरे लोक या प्रयत्नांनी जीवनातील यशस्वींपैकी एक म्हणुन गणले गेले. हीच सहकाराची परंपरा खाजगी क्षेत्रातही दिसुन येते. दिवंगत श्री. धीरुभाई अंबानींच्या रुपाने प्रथमच 'पब्लिक इस्स्यु' हे प्रकरण सर्वसामान्य लोकांना समजले अन आज रिलायंस इंडस्त्रिज हे एक अद्भुत सत्य म्हणुन आपणा समोर उभे आहे. 'गांव करिल ते रांव करिल काय?' ह्याची सार्थता पटते. अन म्हणुन, मायबोलीवर वेगवेगळ्या कारणांनी वावरणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात मोठा अनुभव असणारे लोक अश्या उद्योजक निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सामावुन घ्यावे ह्या उद्देशाने हे पहिले पाउल आहे.

कुणासाठी:
१)'संपत्ती निर्माण करणारे उद्योग उभे रहावेत' असे वाटणार्‍यांसाठी.
२)ज्या लोकांना उद्योग व्यवसाय करायचा आहे- अशी इच्छा आहे.
३)ज्या लोकांचा उद्योग आहे, अजुन काही मदत हवी आहे.
४)काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी भुतं दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी सुंदर मुली/मुले दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी पैसा दिसतो... असे पैसा दिसणार्‍या लोकांसाठी!

काय करावे:
१)इथे अशा कल्पना लिहिल्या जाव्यात ज्या प्रत्यक्षात संपत्ती निर्माण करु शकतील. (मला काय करायला आवडले असते- हे नाही तरी चालेल.)
२)मांडलेली कल्पना व्यावहारिकतेच्या कसोटीवर पुर्णतः उतरली पाहिजे. (कल्पना विस्तृत स्वरुपात मांडली तर उत्तम)
३)अगदी व्यावसायिक गुपीते लिहिली नाही तरी चालतील. अर्थात सक्सेस स्टोरीज वाचायला आवडतील Happy
४) एखादा मायबोलीकर एका शहरात उद्योग करत आहे, अन दुसर्‍या शहरातील कुणा मायबोलीकराला असा उद्योग करण्याची इच्छा झाली, तर माहिती अन शक्य असेल तर लॉजिस्टिक ची मदत व्हावी.
५) फ्रॅन्चाईसी च्या संकल्पनेचा विस्तार व्हावा. काही मायबोलीकरांनी/ कुटुंबियांनी/मित्रांनी एकत्र येउन नवे उद्योग उभारावे.
६) मायबोलीकरांच्या अस्तित्वात असलेया उद्योगाचे विस्तारिकरण व्हावे.
७) छोट्या उद्योगाला लागणारे मनुष्यबळ, आर्थिक पाठबळ अन प्रसंगी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी एका सेतु ची गरज आहे, असा सेतु बणण्याचा प्रयत्न आहे. असंख्य वानरांनी एक एक दगड टाकुण जसा एक रामसेतु बनवला अन श्री रामचंद्रांनी लंकेमध्ये प्रवेश करुन रावणावर विजय मिळवला, त्याप्रमाणे ह्या सेतु वरुन असख्य श्रीराम प्रवास करोत अन संपत्तीच्या श्री-लंके मध्ये प्रवेश करते होवोत. Happy
८) बिसनेस इज अ टीम स्पोर्ट- ह्याचे प्रत्यक्षात अनुकरण व्हावे.

उदा. लक्ष्मण नावाच्या एका मायबोलीकराला गावाकडील मित्राने त्याचा भाजीपाला पुण्यामध्ये विकण्यासाठी काही मदत मागितली होती. जोवर शक्य होते, तोवर लक्ष्मण ने ती केलीही. पण, पुढे त्याला हे शक्य झाले नाही. अश्या वेळी जर, कुणी मायबोलीकर अथवा त्याच्या ओळखीचा अथवा कुटुंबीय जर त्याला उपलब्ध होउ शकला असता, तर तो किफायतशीर उद्योग आजही सुरु राहिला असता. गावाकडील तो मित्र अन शहरातील मायबोलीकर मित्र आज एका यशस्वी उद्योगाचे धनी झाले असते. पण असे घडले नाही! दुर्दैव! अशा उदयोन्मुख उद्योजकांना एकत्र आणण्याचा हा अल्पसा प्रयत्न!

मायबोली ही एक मराठी लोकांनी एकत्र येण्याची जागा आहे, असे समजुन इथे येणारे सर्व लोक मराठी आहेत हे ग्राह्य धरतो. ज्या प्रमाणे गुजराती/पंजाबी लोक उद्योग व्यवसायात एक्मेकांना हरतर्‍हेची मदत करतात, त्याच धरतीवर हा एक प्रयत्न!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुण काका माझ्या वडिलांचे खास मित्र आहेत .ते माझ्या वडिलांना सांगून दमले पण पुन्हा तेच मुली आहेत शेतीचा काय उपयोग? पण मला आता तुम्हा सगळ्यांमुळे धीर आला आहे. धन्यवाद मा.बो.करांनो!!

उत्तम धागा. सहभागी व्हायला आवडेल.
मी छोटा बिझनेस करते. नवरापण स्वतंत्र व्यवसाय करतो. आमच्याकडे तयार नऊवारी साडी मिळते. आणि कॉम्प्यूटर्स मधील सर्वकाही नवर्‍याकडे. आमची ही छोटीशी स्क्सेस स्टोरी.
नवर्‍याने १० वर्षांपूर्वी नोकरी सोडून कॉम्प्यूटर हार्डवेअरचा स्वतंत्र व्यवसाय चालू केला. कॅपिटल नसल्यामुळे फार जास्त अडचणी आल्या. सुरुवातीला ऑफिस झाड्ण्यापासून सर्व कामे आम्ही दोघंच करायचो. सेल्स टॅक्स नोंदणी, एक्साइज नोंदणी, शॉप अ‍ॅक्ट लायसन्स इ. सगळीकडे उमेद खच्ची करणारा अनुभव यायचा. उद्योजक हा व्यावसायिक नसून चोर आहे व तो सरकार , ग्राहक अशा सगळांची फसवणूकच करणार अशा नजरेने सगळे सरकारी कायदे बनवले आहेत असं वाटायचं. नातेवाइकांचे पण बरे-वाईट अनुभव आले. (मानिनी मधील जयश्री गडकर सारखे, आई -बाबा मात्र खूप समजून घ्यायचे. मुलाला आनंदाने सांभाळायचे) अशी २ वर्षे गेल्यावर लोक म्हणू लागले, आता उत्साह आटोपता घ्या. किती दिवस हा खटाटोप? तुझ्या बरोबरचे इंजेनीअर पार कुठच्याकुठे गेले, घर - गाडी अजून काहेच मिळवता आलं नाही तुला. ऑफिसपण भाड्याचंच. मुलाला चांगल्या शाळेत अ‍ॅड्मिशन घ्यायला तरी पैसे आहेत का तुमच्याकडे? इ. मग आम्ही निराश व्हायचो.
पण नवर्‍याची जिद्दच होती की मी स्वतःचाच उद्योग करणार. मग मी पार्टटाइम नोकरी घेतली व उरलेल्या वेळात त्याचे हिशोब, बॅंक व अ‍ॅड्मिन पाहू लागले. तो माल आणणे, अ‍ॅसेंब्ली, माल पोहोचविणे, दुरुस्ती, मार्केटिंग, कायद्याच्या पूर्तता इ. सगळ्या गोष्टींवर लढायचा. ३-४ वर्षांनी थोडा थोडा जम बसला. मग झाडायला-पुसायला बाई ठेवण्याइतपत चैन करू लागलो. माझा पगार धंद्यात कॅपिटल म्हणून जात होता. बँकेत खड्खडाटच होता. त्या नंतर हळू हळू १-१ कामगार घेऊ लागलो. मग १ इंजिनीअर, १ हिशोबनीस मुलगी करत करत व्याप वाढवला. माझ्या शिक्षकी पेशाला आवश्यक म्हणून पीएच. डी. पण केली. सुदैवानी मुलगापण हट्टी नव्हता. आई-बाबांकडून प्रेमापेक्षा जास्त पैशांची अपेक्षा न करणारा. त्यामुळे ते दिवस कष्टाचे असले तरी दु:ख नव्हतंच. पी. एम्.टी., एस. टी. ने त्याला घेऊन हिंडायचो. एम. टी. डी. सी. च्या स्वस्तात स्वस्त योजनांचा फायदा घ्यायचो. थोडा पैसा समाज सेवेलाही द्यायचो. लग्न झाले तेव्हा नवर्‍याची सायकल होती. स्कूटर घेतल्यावर जग जिंकल्यासारशं वाटलं.
. स्वतःच्या व्यवसायामुळे बिझनेस दुनियेतील सर्व बाजूंची ओळख झाली. फक्त इंजीनीअरिंग नाही, तर काय्दे-कानून, माणसे जोडणे, रोजगार निर्मितीतील आनंद, सर्जनशीलता, कामाचा प्रचंड वेग, बदलत्या तंत्रज्ञानाशी चटकन जुळवून घेणे, प्रदर्शनांमधून स्टॉल लावणे, ग्राहकाच्या गरजा समजून त्याला सर्व्हिस देणे, रोजचे खेळते भांडवल सांभाळ्णे, नोकरांकडून कामे करवून घेणे, या सगळ्याला विवेकबुद्धीची जोड देणे, संपत्तीची निर्मिती इ. अगणित गोष्टी शिकायला मिळाल्या.
आता आमच्याकडे १०-११ जण नोकरीला आहेत. आख्ख्या पुण्यात ग्राफिक्स कार्डचे डिस्ट्रिब्यूटर फक्त आम्हीच आहोत. घर-गाडी झालं. मुलगा हुशार असल्याने शाळेच्या अ‍ॅड्मिशनला अड्चण आली नाही. पण अजूनही आम्ही कमीत्-कमी १२ तास काम करतोच. त्या अनुभवाने माझे कॉलेजमधील शिकवणे सुधारले. (मी एम्.बी.ए. ला शिकवते) आम्ही श्रीमंत अजूनही झालेलो नाही. डोक्यावर होम लोन व बिझनेस लोनचा डोंगर आहे. १ तारखेला सर्वांचा पगार देताना परमेश्वर आठ्वतो. १० तारखेला कर्जाचे हप्ते फेड्ले की उरलेला महिना जेमतेम पुरेल एव्ह्ढेच पैसे उरतात. मग आम्ही आठ्वतो तो दिवस - जेव्हा आमच्या दोघांकडे मिळून २ रुपयेच शिल्लक होते. आणि पाव लिटर दुधाची पिशवी ३.५० रुपयांना होती. त्या दिवशी आम्ही चहा घेऊ शकलो नव्ह्तो. अजून खूप पल्ला गाठायचा आहे हे तर खरंच, पण सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढून आम्ही म्हणतो, किती प्रगती केली आपण! आपल्या धंद्याच्या भरोशावर १० कुटुंब नुसता रोजचा चहाच नाही तर जेवण्ही मिळावतात.

खूपच छान लिहिल आहे सुस्मिता, तुम्ही या ग्रूपच्या सदस्य नसाल तर कृपया तुमचा दूरध्वनी क्रमांक ई- मेलद्वारे कळवा. नियमानुसार एकदा फोनवर बोलून आपल्याला सदस्य म्हणून सामील करून घेता येईल.
आपल्या प्रोफाइलमध्ये बाकी आवश्यक ती माहिती आहेच.

जीएस, माझा फोन ९२२६५६४७४२. वर्गावर असेन तर फोन उचलू शकणार नाही. पण मिस्स्ड कॉल पाहून नंतर फोन नक्की करीन

सुस्मिता, छान लिहिलत!! प्रेरणादायी आहे.
जॉब सोडून स्वतंत्र व्यवसाय करताना अडचणी येतातच, पण तुम्ही त्यांना धैर्याने सामोरे जाताय हे प्रशंसनीय आहे.
तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला शुभेच्छा!

सुस्मिता खरेच मनापासून कौतुक. मला हेच लिहायचे होते. स्वतः चा उद्योग म्हण्जे स्वतः चे मूल असल्यासारखेच आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा.

मग आम्ही आठ्वतो तो दिवस - जेव्हा आमच्या दोघांकडे मिळून २ रुपयेच शिल्लक होते. आणि पाव लिटर दुधाची पिशवी ३.५० रुपयांना होती. त्या दिवशी आम्ही चहा घेऊ शकलो नव्ह्तो.>> अगदी अगदी. पण त्या दिवशी तुम्ही दोघे होतात ना, यातच सर्व आले.

मी यावर्शी २०% ग्रोथ अचिव केली पण तो आनंद शेअर करायला कोणी नाही. त्यासाठी किती रक्त आटवावे, केस पांढरे करावे लागले याची कल्पना दुसर्‍याला येणे शक्यच नाही. एम्प्लॉयी फक्त तुम्हाला एक पैशाचा सोर्स समजतात ते पट्वून घेणे फार अवघड आहे.

मी चार स्टेट्स मध्ये प्रत्येक मार्केट मध्ये पायी फिरले व ग्राहकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रत्येक वेळी आय हॅव हॅड अ रवी मोमेन्ट. मग डोळे पुसून कामाला लागायचे. कारण आपल्याला सर्वाइव करायचे असते. टार्गेट्स असतात, फॉलोअप करायचा असतो.

अजुनही माझ्याहातून फार खर्च होतो पण मुलीला बेबी सिटर कडे एक रात्री पेक्षा ठेवणे मला पटत नाही. नातेवाइक फक्त दुरून आपण फेल होतो आहोत का ती वाट बघतात. तिच्यावर लक्क्ष ठेवायला एक खात्रीचा नातेवाइक कोणी पुढे येत नाही व म्हणत नाही की जा तू वाढव तुझा बिझनेस आम्ही घरचे बघू. ( मग इथे राहिले काय नी अमेरिकेत राहिले काय. निदान अमेरिकेत रोजचे जीवन तरी सुखकर आहे, उद्योजकांना सुविधा आहेत
मुळात जास्त संधी आहेत असे वाटते)

१९८० च्या दशकात लूना वरून अक्वा गार्ड विकत असे, १९९१ मध्ये रंग विकले. त्यामानाने मला हे सेल्स चे काम बरे वाटते. माझी एक नम्र सूचना आहे टॅली नावाचे अकाउन्टिन्ग सॉफ्ट्वेअर जरूर घ्यावे उद्योजकांनी. दुसरे घेताना स्वस्त वाटते पण मग त्रास होतो हा स्वानुभव.

टॅली खरंच चांगलं पॅकेज आहे. माझ्याकडे विकत मिळेल. मी ऑथोराइझ्ड टॅली चॅनेल पार्टनर आहे.

पण त्या दिवशी तुम्ही दोघे होतात ना, यातच सर्व आले.>>> अगदी खरे. आणि मुलाला आजी आजोबा असल्याने त्याचे शून्य हाल झाले. पाळणाघरात कधीच जावे नाही लागले. मामी, तुमच्या मानाने माझे कष्ट फारच क्षुल्लक आहेत.

नातेवाइक फक्त दुरून आपण फेल होतो आहोत का ती वाट बघतात. >>> खरंच, आपण अमेरिकेला नावं ठेवतो, की तिथे नाते संबंध कच्चे असतात इ. पण भारत फार वेगाने त्याच दिशेने चाललाय.

नवीन व्यावसायिकांनी बँकेच्या व एम. सी. ई. डी. च्या उद्योजकता शिबिरांना इ. अवश्य जावे. छान माहिती मिळते.

जी.एस, रंगासेठ, चिनूक्स, भ्रमर थँक्स.

मामी, तुमच्या मानाने माझे कष्ट फारच क्षुल्लक आहेत. >> असे म्हणु नकोस. तुम्ही किती लहान आहात. त्यामानाने इतकी जबाबदारी. पगार द्यायच्या दिवशी कसे तरी होते कि नाही? मला पण Happy

बघ तुला टॅली चे एक टेस्टिमोनिअल मिळाले की नाही. झिन्दाबाद.

सुस्मिता आणि अश्विनीमामी ,तुम्हा दोघांचीही कहाणी नविन व्यवसाय करू पहाणार्‍यांना खूपच प्रेरणादायी आहे... धन्यवाद इथे आपला अनुभव सांगितल्याबद्दल.. Happy

सुस्मिता आणि अश्विनीमामी मलाही खुप उत्साह वाटला तुमचं वाचुन..
मी २ महिन्यांपुर्वी चांगल्या पगाराची नोकरी सोड्लिये माझ्या मुलीसाठी. सध्या करमत नाहिये घरात .
नविन नोकरी कि परत तेच.. मुलीचे हाल नाहित करायचे. पण मला पण स्वस्थ बसवत नाहिये..
कोणी काही सुचवाल का की ३-४ तास करता येइल असं काय करु??

मस्त आहे उपक्रम..
मलाही यात सहभागी व्हायला आवडेल..
मी पण एका फुड प्रोसेसिंग इंड्स्ट्री मध्ये १० वर्षे होतो.. त्यामुळे त्याचा उपयोग करुन काही करता येइल का हा विचार कायम मनात येतो.. नक्की काहीतरी करायला हवे. पण कसे ते कळत नाही. आणी मेन म्हणजे डेअरींग करता आले पाहीजे. नोकरीपेक्षा उद्योगाचे भवितव्य चांगले आहे.

मेन म्हणजे डेअरींग करता आले पाहीजे.>>> अगदी खरं>>>>

माझ्या आधीच्या ऑफिसमधल्या कलीगने जॉब सोडुन काहीतरी नवीन करायचे म्हणुन गव्हांकुर तृणरस चालु केला सुरवातीला अगदी छोट्या प्रमाणावर, पण आता पुण्यातल्या बर्‍याच जिम मध्ये पहाटे सप्लाय करते. त्याबरोबरच नाचणी बिस्कीटे, वगैरे सारखे पदार्थ पण चालु केले आहेत. चांगले चालु आहे...

सुस्मिता
खूप प्रेरणादायी लिहीलय तुम्ही तुमच्या अनुभवांबद्दल. तुमच्या कष्टांचे चीज होवो.

सुस्मिता अन मामी .. खुपच प्रेरणादायी लिहलय्..सलाम..

आपल्या धंद्याच्या भरोशावर १० कुटुंब नुसता रोजचा चहाच नाही तर जेवण्ही मिळावतात.>>> अगदी खर..

आपल्या धंद्याच्या भरोशावर १० कुटुंब नुसता रोजचा चहाच नाही तर जेवण्ही मिळावतात.>>> असा व्यापक दृष्टिकोन असेल तर यश मिळतेच! थोडे कष्ट अन वाट पहायची तयारी हवी!

सुस्मिता...प्रेरणादायी अनुभव. मी प्रिंट काढुन बायकोला वाचायला दिला! ...आमच्या तुम्हाला शुभेच्छा! Happy

डेअरिंग कुठल्याच बाजारात विकत मिळत नाही. अन, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही! Happy

माझे काही अनुभव व विचार आहेत कृपया हा धागा असाच चालु ठेवावा वेळ मिळाला की सविस्तर लिहीन .
शेती मालाचा कुठे कसा कुणाला उपयोग होउन , त्याचा फायदा शेतकरी आणी तो व्यवसाय करणार्याला होउ शकतो का या करीता काय करावे लागेल , कोणी काय करायचे , कसे करायचे , हे सगळा माझ्या डोस्कयात आहे पन राव येळ च मिळत नाही , Sad कारण आमच कामच आस हाय की साहेब म्हन्ला लक्ष्या आमके तमके काम आहे ते पुर्ण करयाचे आहे मग आम्ही ते पुर्ण केल्याशिवाय थांबत नाही .त्या मुळे मा बो वर पण मी महीनो महीने येत नाही
( ग्रामिन भागतला आसल्या मुळे कष्ट आणी ईमानदरी आसल्या गोष्टी आमच्या फादर आणी मदर ने शिकविल्या हायत त्या मुळ आमी हाइ तीतच आहोत Sad ) पण आमच्या बरोबरीचे गेली की राव पूढ,
ह्या धाग्यामुळे नविन विचार चक्र सुरु झालय एवढ मात्र नक्की.

Pages