ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कविता

Submitted by Admin-team on 26 October, 2009 - 01:18

ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कवितांची निवड
सर्वप्रथंम ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कवितांची निवड करायला खूपच उशीर झाला त्याबद्द्ल मनापासून क्षमायाचना!कारणे वैयक्तिक व अपरिहार्य होती.पण त्याचबरोबर सर्व कविता वारंवार वाचणे
हेहि तितकेच आवश्यक तसेच दुसरे परीक्षक श्री.गिरीश कुलकर्णी हे परदेशात असल्याने संपर्कासाठीही
वेळ गेला. असो.
कवितांची निवड करतांना सर्वांत आधी शुद्धलेखन,कवितेचा परिणाम (इम्पॅक्ट) व आशय व तद्नंतर रचनाकौशल्य, गझल सारख्या रचनेत तांत्रिक बाजू अर्थात वृत्ताची (मीटर) अचूकता इत्यादिंबाबतचा विचार निवड करताना केला आहे.आम्हां दोघांच्या मते खालील ३ कवितांची सर्वोत्तम म्हणून निवड
केली आहे. कविता चांगली असून शुद्धलेखन नसेल तर ती बाद ठरवली आहे.

सुरवंट (कौतुक शिरोडकर)
या कवितेत आशय, परीणाम व रचना लक्षणीय आहेत. जास्त सांगत नाही.ही कविता मुळातूनच वाचावी.

ती (सुनील पाटकर)

ही एक छोटी,साधी पण विलक्षण निरागस कविता. दीर्घकाळ मनात रेंगाळणारी.

न्यास (क्रान्ती)

ही गझल तंत्रशुद्ध तर आहेच पण गझलच्या इतर अंगानीसुध्दा परिपूर्ण आहे.

इतर चांगल्या कवितामध्ये:
अजब (उत्साह), अनुराधा म्हापणकर (व्हू केअर्स), हरीश दांगट (शेतकर्‍याची व्यथा) देवदत्तजी (भेट)
गिरीश कुलकर्णी (आयुष्य),उमेश कोठीकर (पाऊस्,अर्पणपत्रिका), विशाल कुलकर्णी (आईच्यान सांगतु), कौतुक शिरोडकर(मल्ह्रारसांज,क्षेत्र) क्रान्ती (जोगवा,पुन्हा, नकोशी) लिमयेपरेश (उशीर) मानस६(घायाळ हरिणी..) वैद्य (उशीर,नको नको,तू)
पूजा दिवाण (दंश) पुलस्ति (माळ) राधा कुलकर्णी (संवेदना) वेदनगंधा(बांध) ह्या उल्लेखनीय आहेत.
त्या जरूर वाचाव्यात.
सर्व कवींचे अभिनंदन व आभार.
तसेच 'मायबोली' चे आभार.
आपलेच,
जयन्ता५२ , गिरीश कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व कवींचे अभिनंदन. Happy
आइच्यान सांगतो - हि कविता विशाल कुलकर्णीची आहे ना? चुकुन उमेश कोठिकरच्या नावापुठे लिहीली आहे.

सर्वप्रथम तर अ‍ॅडमिन टीम ला एक सूचना करावीशी वाटतेय की यावेळी 'ऑगस्ट महिन्याची सर्वोत्कृष्ट कविता' या नावाने वरील जो बाष्कळपणाचा आणि अजागळपणाचा नमुना आपण जो पोस्टलात ना त्याकडे एकदा डोळे उघडे ठेवून नीट बघा.
केवळ वरील पद्धत चालू ठेवायची आहे म्हणून घाईघाईत काहीतरी थातूरमातूर घोषणा करायची हीच परिस्थिती तर एव्हढ्या चांगल्या या प्रथेवर ओढवणार असेल तर त्यापेक्षा सर्वोत्कृष्ट कविता निवडण्याची प्रथा बंद केलेले केंव्हाही चांगले.
विशाल कुलकर्णी यांची कविता माझ्या नावासमोर दाखवली आहे. कविता वाचल्यात तरी का कोणाच्या आहेत ते?
आणि गिरीश कुलकर्णी परदेशात राहतात की मु. पो. ढेबेवाडीला राहतात हे माहित नव्हते का तुम्हाला?
आणि म्हणे ते परदेशात असल्यामुळे संपर्कासाठी वेळ गेला......काय पोस्टाने पत्र पाठवीत होते का त्यांना?
कौतुक शिरोडकरांची आणि क्रान्ति यांच्या कविता सर्वोत्कृष्ट...आहेतच. मग त्यांच्या बाकी उल्लेखनीय कवितादेखील निवडायची काय गरज? आणि अजून पन्नास साठ उल्लेखनीय कविता( तेरा कविता निवडल्या आहेतच) निवडल्या असत्या तर ते पण चालले असते ना....किंवा प्रत्येकच कवितेमधे उल्लेखनीय काय आहे याची पण जंत्री दिली असती तर अजून चांगले झाले असते. वर्षभर पुरवून पुरवून तेच वाचले असते. तीन किंवा पाचच कविता ह्या उल्लेखनीय म्हणून बर्‍या वाटतात.
उल्लेखनीय कवितांमधे काही कविता ह्या जाड टाईप मधे काही बारीक टाईप मधे....त्यात पण भेदभाव आहे का? आणि मागील सर्वोत्कृष्ट कवितेचा विजेता हाच परीक्षक असला पाहिजे असा काय नियम आहे का?
केवळ मागेपुढे लिहू लागलेले आणि केवळ मागील महिन्यातील सर्वोत्कृष्ट कवितेचा सन्मान मिळाला म्हणून अशा कवींना मा बो वरील प्रथितयश आणि जेष्ठ व श्रेष्ठ कवींच्या कवितांचे परीक्षण करायला आपण सांगावे? माफ करा; मला कोणा व्यक्तीबद्दल नाही बोलायचे आहे. पण किमान कवींमधे असलेल्या प्रथितयश कवींच्या तोलामोलाचा तर परीक्षक निवडा. एक से एक विद्वान मंडळी आहेत ना तुमच्याकडे त्या दर्जाची.
आणि परीक्षक गिरीश कुलकर्णी यांची पण कविता 'उल्लेखनीय' मधे... हा हा हा..हे मात्र टू मच हं.
असो. सदर प्रथा ही एक दर्जेदार मानाची पद्धत आहे आणि त्या प्रथेबद्दल आदर आहे म्हणून एव्हढा लेखनप्रपंच.
यामधे कोणावरही वैयक्तिक टीका करण्याचा उद्देश नाही. तसे कोणी कृपया समजूही नये. तरी पण कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आताच माफी मागतो.

गिरीश कुलकर्णी परदेशात राहतात की मु. पो. ढेबेवाडीला राहतात हे माहित नव्हते का तुम्हाला>>> गिरीशना परदेशातील कार्यबाहुल्यामुळे वेळ लागला असणार असा अंदाज आहे.

मागील सर्वोत्कृष्ट कवितेचा विजेता हाच परीक्षक असला पाहिजे असा काय नियम आहे का>>> नियम नाही असं वाटतं, पण आम्ही जेव्हा हे करत होतो त्यावेळेला खरोखर असं वाटलं की निवड करणारे बदलत रहावेत, नाहीतर वेगवेगळे दृष्टीकोण आपल्याला कसे मिळतील ? निवड प्रक्रिया संक्रमीत होत राहिली पाहिजे.
कुठलाही उपक्रम पालखीसारखा असतो, वाहणारे भोई बदलत रहावेत एवढाच उद्देश.
महिन्याला २५०+ कविता पुन्हा पुन्हा वाचून त्यातील एक/ काही निवडणे या प्रक्रियेला वेळ लागतोच आणि कार्यबाहुल्यामुळे/ कसल्या न कसल्या व्यक्तिगत कामांमुळे उशीर होतो, म्हणूनही नवनवीन सदस्यांनी निवड प्रक्रियेत सामिल होणे इष्ट.

परीक्षक गिरीश कुलकर्णी यांची पण कविता 'उल्लेखनीय' >>> हे मलाही तितकसं पटलं नाही. परंतू या आणि इतर प्रश्नांची उत्तरे ही निवड समिती देईलच.

त्यापेक्षा सर्वोत्कृष्ट कविता निवडण्याची प्रथा बंद केलेले केंव्हाही चांगले. >>> सहमत. त्यापेक्षा म्हणजे जेव्हा या उपक्रमात काही राम राहिला नाही असे वाटेल तेव्हा.

मी अ‍ॅडमिन टीममध्ये नाही. तरीही लिहील्याशिवाय रहावलं नाही. असो.

उमेशला मोदक!!!
न पटणार्‍या बर्‍याच गोष्टि आहेत. मुळात मला एक अतिशय बेसिक प्रश्न आहे कोणी निरसन केल्यास उत्तम निवड समिती ठरवते कोण?..काही मतदान घेतात का यावर? कि कोणी काम करायचे?...
लिहिल्याशिवाय रहावले नाही

कवितांची निवड करतांना सर्वात आधी शुध्दलेखन,कवितेचा परीणाम (इम्पॅक्ट) व आशय व तद् नंतर रचना कौशल्य, गझल सारख्या रचनेत तांत्रिक बाजू अर्थात वृत्त (मीटर)ची अचूकता इत्यादी बाबतीचा विचार निवड करतांना केला आहे.आंम्हा दोघांच्या मते खालील ३ कविताची सर्वोत्तम म्हणून निवड
केली आहे. कविता चांगली असून शुध्दलेखन नसेल तर ती बाद ठरवली आहे. >>
दहावेळा लिहा Happy

परिणाम ( र्‍ह्स्व रि )
शुद्धलेखन
वृत्ताची
इत्यादि बाबींचा विचार वा इत्यादि बाबत विचार. ( "बाबतीचा विचार" हे चूक आहे )
कवितांची ( अनुस्वार हवा )
करताना ( अनुस्वार नको )

गझलच्या इतर अंगाने सुध्दा परिपूर्ण आहे. >> अंगांनीसुद्धा परिपूर्ण

जास्त सांगत नाही>> का ? निवडसमितीनेच जर जास्त सांगितलं नाही तर मग कोण सांगणार ?

विजेत्यांचं अभिनंदन Happy

इथे शुद्धलेखनाच्या काही चुका काढलेल्या दिसल्या म्हणून,

इत्यादि नव्हे, इत्यादी.
आणि इत्यादींबाबत.
रचनाकौशल्य
सर्वांत
त्याचबरोबर
तंत्रशुद्ध
तद्नंतर
आम्हां (आंम्हा नव्हे)

Happy

अरे व्वा , कविता चांगली असुनही अशुध्द लेखन असल्यामुळे बाद ठरवणार्‍या मंडळींचं अशुध्द लेखन पाहुन गम्मत वाटली .

मंडळी,
सर्वप्रथम काही त्रुटी राहिल्यात. अनावधानाने उल्लेख चु़कल्याने विशाल कुलकर्णी यांची मनापासून क्षमा, तसेच अत्यंत घाईत पोस्ट केल्याने शुध्दलेखनाच्या बाबतीतल्या चुका झाल्या हेही अक्षम्य! सफाई देत नाही.हे सर्व मान्य.
बाकी इतर कारणे खरी आहेत.पटो अगर न पटोत उदा: गिरीश यांच्याशी संपर्काबद्दलची अडचण,त्यांचे व माझे कार्यबाहुल्य!गिरीश कुलकर्णी परदेशात राहतात की मु. पो. ढेबेवाडीला राहतात हे माहित होते पण खरी अडचंण मो़कळेपणानी सांगीतली तर त्याची ज्या भाषेत संभावना झाली आहे ते वाचून मन उद्विग्न झाले आहे.
केवळ मागेपुढे लिहू लागलेले आणि केवळ मागील महिन्यातील सर्वोत्कृष्ट कवितेचा सन्मान मिळाला म्हणून अशा कवींना मा बो वरील प्रथितयश आणि जेष्ठ व श्रेष्ठ कवींच्या कवितांचे परीक्षण करायला आपण सांगावे? माफ करा; मला कोणा व्यक्तीबद्दल नाही बोलायचे आहे. पण किमान कवींमधे असलेल्या प्रथितयश कवींच्या तोलामोलाचा तर परीक्षक निवडा. एक से एक विद्वान मंडळी आहेत ना तुमच्याकडे त्या दर्जाची....
जो बाष्कळपणाचा आणि अजागळपणाचा नमुना वगैरे...

मायबोलीने प्रथेनुसार माझ्यावर परीक्षकाची जबाबदारी सोपवलेली होती. मी ती मागून घेतली नव्हती!मी एक अतिसामान्य कवि आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.केवळ मागील महिन्यातील सर्वोत्कृष्ट कवितेचा सन्मान मिळाला म्हणून मला काही दर्जा आहे असा कुठलाही भ्रम मला नाही!पण जुलै महिन्यात माझ्या गझलेची सर्वोत्तम म्हणून निवड झाल्यावर मला उमेश कोठीकर यांनी निरोप पाठवून लिहले होते :

"जयंतराव, हार्दिक अभिनंदन. हा तुमचा किंवा तुमच्या गझलेचा सन्मान नसून त्या पुरस्काराचाच सन्मान असू शकेल.आपल्या अफाट प्रतिभेने आमच्यासारख्या नवकवींना पण खुप प्रेरणा मिळते."
हे मी केवळ त्यांचेच मत म्हणून देत आहे.आत्मप्रशंसा म्हणून नाही.

असो. मी कुवतीनुसार मी परीक्षण केले.ते सर्वाना पटेलच असे अपेक्षित नाही. ह्याला "बाष्कळपणाचा आणि अजागळपणा" असे म्हणणार असाल तर आम्ही केलेल्या प्रामाणिक मेहनतीचा तो अपमान आहे.

प्रत्येकच कवितेमधे उल्लेखनीय काय आहे याची पण जंत्री दिली असती तर अजून चांगले झाले असते
ह्या या कवितेत ही कल्पना, ही ओळ,ही उपमा चांगली अशी जंत्री (!)द्यावी काय?

परीक्षक गिरीश कुलकर्णी यांची पण कविता 'उल्लेखनीय' >>> हे मलाही तितकसं पटलं नाही.
परीक्षक गिरीश कुलकर्णी यांची कविता मला स्वतःला 'उल्लेखनीय' वाटली तर केवळ ते परीक्षक आहेत
म्हणून त्यांच्या चांगल्या कवितेचा साधा उल्लेख सुध्दा करू नये हा कुठला न्याय?

हे सर्व वाचून माझे मन व्यक्तिगतरित्या फारच उद्विग्न झाले आहे.एखादे काम पूर्ण प्रामाणिकपणे करून त्याबद्दल जे काही व ज्या पध्दतीने लिहल्या गेले आहे त्यामुळे इतकी नाचक्की झाल्यानंतर 'मायबोली'वर यापुढे लिखाण न करण्याचा निर्णय मी अत्यंत खेदपूर्वक घेत आहे.आतापर्यंत मला 'मायबोली'वर जे प्रेम व आपुलकी मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद! निरोप द्यावा.

जयंता,
उमेश कोठीकर म्हणजे मायबोली नव्हे. त्यांच्या वैयक्तिक मतांमुळे उदविग्न होऊन तुम्ही मायबोली सोडावीत हे तुमच्या रचनांना प्रामाणिक प्रतिसाद देणार्‍यांशी न्याय्य ठरणार नाही.

निवड समिती सदस्य आणि कवी ह्या दोन वेगळ्या भुमिका आहेत. ह्या दोन्ही भुमिकांच्या वेगळ्या गरजा आणि वेगळे व्यक्तीमत्व लक्षात घेऊन तुम्ही निर्णयाचा जरूर फेरविचार करावा.

इथे मायबोलीवर तुमच्यासारखे संवेदनशील आणि उत्कृष्ट रचनाकार बोटांवर मोजण्याइतकेही नाहीत.
मला आवडतात खूप तुमच्या रचना. तुम्ही इतर ठिकाणी लिहिता त्याचाही मी न चुकता आस्वाद घेतो.
इथे नाही मिळाल्यातरी इतर ठिकाणी तुमच्या रचना वाचायला मिळतीलच यात शंका नाही पण तरी एकंदरीत ह्या अशा कारणांवरून मायबोलीचे प्रतिभावान साहित्यिकांशी नाते असे सॅड नोट वर तुटावे हे मला बरोबर वाटत नाही.

उमेश कोठीकर म्हणजे मायबोली नव्हे. त्यांच्या वैयक्तिक मतांमुळे उदविग्न होऊन तुम्ही मायबोली सोडावीत हे तुमच्या रचनांना प्रामाणिक प्रतिसाद देणार्‍यांशी न्याय्य ठरणार नाही. >>>>>> अगदी अगदी... विशाल ला अनुमोदन !!! तुमच्या गझला छान असतात.. त्या इथे नक्की लिहिल जा....

पण त्याच बरोबर उमेश कोठीकरांनी मांडलेले मुद्दे ही विचार करण्याजोगे आहेत. मायबोलीवरच्या वेगवेगळ्या कमिट्या, मंडळे हे ठरवताना काय निकष असतो / असावा ?, कमिट्या / मंडळांमधल्या लोकांची योग्यता आणि त्यांचे निर्णय / त्यांची भाषा ह्यातला ताळमेळ तपासून पहाणे ह्यासाठी कुठल्यातरी प्रकारे चर्चा घडावी किंवा अ‍ॅडमिन टिमचे जे काय निकष आहेत ते त्यांनी कुठे तरी व्यक्त करावे असं मला वाटतं...

आणि हे काम निवड समितीचं नसल्याने एकूणच नेमल्या गेलेल्या परिक्षकांचा हिरमोड होऊ नये याची पण काळजी घेतली गेली पाहिजे.

एखादे साहित्य समीक्षण करण्याची एखाद्या व्यक्तीची पात्रता आहे की नाही हा वाद पुरातन काळापासून चालत आला असावा, judges' decision is final हे कायमच लक्षात ठेवले पाहिजे.

जयंतराव, आपली क्षमा मागून मी आधीच स्पष्ट करतो आहे की माझा कोणाही विशिष्ट व्यक्तीवर रोख नाही. आपल्याबद्दलचे किंवा गिरीशजींबद्द्लचे एक कवी म्हणून माझे तेच मत अजूनही कायम आहे. पण ज्या पद्धतीने मागील तीन चार महिन्यांपासून या मानाच्या प्रथेकडे केवळ एक उरकून टाकायची गोष्ट म्हणून बघितल्या जात आहे त्याबद्दलचा माझा उद्वेग व्यक्त झाला आहे. मला असा खेळखंडोबा हा कवींच्या मनाला दुखावण्याचा प्रकार वाटतो. आपण एक कवी म्हणून, एक परीक्षक म्हणून श्रेष्ठ असाल; नव्हे आहातच. पण मी आपणास उद्देशून नव्हे तर अ‍ॅडमिन टीमला उद्देशून वरील सगळे म्हटले आहे. मागील महिन्याची सर्वोत्कृष्ट कविता कोणती ही पाहण्याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. पण मागील काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की वारंवार विचारणा करून देखील याबाबतीत उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. जून महिन्याचा निकाल ऑगस्ट मधे तर जुलै महिन्याच्या निकाल सप्टेंबर मधे लावला जातो. जणू काही वाचकांनाच फार गरज आहे या पद्दतीने त्रोटकपणे दोन चार वाक्यात निकाल विवेचनासह गुंडाळला जातो. यापूर्वी तर कवीचे नाव न सांगायची पण कंजुषी केली जात होती.
शिवाय केवळ महिन्याची सर्वोत्कृष्ट कविता हा सन्मान परीक्षक नेमण्याचा निकष कसा काय होउ शकतो?
की केवळ जबाबदारी व काम टाळण्याची ही अ‍ॅडमिन टीमची पळवाट? मग केवळ दोन कविता लिहिलेल्या संदेश ढगे यांना परीक्षकांनी महिन्याचा सर्वोत्कृष्ट कवी ठरवले म्हणून त्यांनी पुलस्तींच्या गझलांचे परीक्षण करायचे का? योग्य वाटेल का ते?
बरे; एखादी कविता सर्वोत्कृष्ट का ठरली याविषयी विस्तृत विवेचन आवश्यक आहेच ना. त्यामधे त्या कवितेचाही सन्मान आहे आणि आमच्यासारख्या नवोदीतांना शिकायलादेखील मिळणे आवश्यक आहे. असे असतांना ' जास्त काही सांगत नाही....कविताच वाचा' म्हणजे वाचकांना अडाणी ठरवताय की मी म्हटल्याप्रमाणे केवळ 'निकाल' एक उपचार म्हणून उरकताय?
बरे उशीर का झाला याबाबतची जी कारणे( ती पण यावेळी दिली तरी) एव्हढी बालीश आहेत की वाट बघणारे लोक म्हणजे केवळ गरजवंत आणि अज्ञानी आहेत असाच समज होतो. ही वाचकांच्या भावनेशी प्रतारणा नाही का? आणि दोन महिने कालापव्यय करूनही जर अशा पद्धतीने अजागळपणे आमच्या माथी 'घ्या एकदाचा निकाल' म्हणून वरील पोस्ट मारीत असाल तर ते कसे स्विकारायचे? परीक्षण, निकाल हा परिपूर्ण असला पाहिजे. त्यात कसली घाई?
आणि परीक्षकांनीच एकमेकांच्या कलाकृतींचे मूल्यमापन करणे योग्य नाही वाटले जयंतराव. म्हणून तसे म्हटले.
आणि परीक्षकांनी शुद्धलेखनातल्या चुका काढण्याऐवजी त्यांच्याच चुका जर वाचक काढू लागले तर मग ही प्रथा, हा निकाल, त्याचे महत्व हा चेष्टेचा विषय ठरेल.
आणि जयंतराव, महिन्याची सर्वोत्कृष्ट कविता ही फार फार तर एक, दोन किंवा उल्लेखनीय कवितांसह चार पाच असू शकतील. बारा-तेरा कविता निवडून त्या स्पर्धेचे महत्व कमी करताय असे वाटत नाही का तुम्हाला? मग 'आमचीबी कविता उल्लेखनीय' असा पोरखेळ होईल.
आधीच कविता या प्रकाराकडे आजकाल मा बो वर तेव्हढे गांभीर्याने बघितले जात नाहीय. आणि अशा प्रकारे वाचकांच्या उदासीतनेमधे अशा पद्धतीने भर घातली गेली तर मग मी म्हटल्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट कविता निवडण्याची ही पद्धत कवितेला प्रोत्साहन देण्याऐवजी कविता या प्रकाराला अजूनच सामान्य ठरवेल.
आणि ज्या पद्धतीने हा निकाल सादर केला गेला त्याला मी अजागळपणा म्हटलय जयंतराव. आपल्या प्रामाणिक मेहनतीबद्दल माझ्या मनात किंतु नाही.
आणि केवळ कवितेपोटी आणि या स्पर्धेपोटी असलेल्या आपुलकीमुळे मी स्पष्टपणे मांडलेल्या या म्हणण्यामुळे जर आपण उद्विग्न होउन मा बो चा निरोप घेण्याचा विचार करीत असाल जयंतराव तर माझ्याएव्हढा अपराधी कोणी नसेल. आपल्याला दुखावल्याबद्दल परत मी आपली जाहीर क्षमा मागतो.
आपण असे करू नका...प्लीज.

जून महिन्याचा निकाल ऑगस्ट मधे तर जुलै महिन्याच्या निकाल सप्टेंबर मधे लावला जातो. जणू काही वाचकांनाच फार गरज आहे या पद्दतीने त्रोटकपणे दोन चार वाक्यात निकाल विवेचनासह गुंडाळला जातो. <<<

कोठीकर, अहो हा एक स्वयंसेवकांच्या मदतीने चालविला जाणारा उपक्रम आहे. ही काही वर्गणी भरून पुरवली जाणारी सेवा नाही. आपल्या वैयक्तिक जबाबदार्‍या बघत बघत लोक या उपक्रमांत सहभागी होतात. त्यामुळे थोडे मागेपुढे होणारच.

या उपक्रमांत सुधारणेला नक्कीच जागा असेल. तुम्हाला काही सुधारणा सुचवाव्याशा वाटल्या तर त्या (योग्य शब्दांत) सांगा. म्हणजे सगळ्यांनाच मोजक्याच पण चांगल्या कविता विनासायास वाचायला मिळण्यास मदत होईल.

सर्वप्रथम जयंत कुलकर्णी आणि गिरिश कुलकर्णी यांनी त्यांच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून निवडीचं काम केलं याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

वरती निवड समितीबद्दल प्रश्न आला आहे म्हणून हा खुलासा. हा उपक्रम वैभव जोशी यांनी स्वाती आंबोळे यांच्या सहकार्याने चालू केला. त्यानंतर पुढली निवड स्वाती आंबोळे यांनी केली. त्यापुढले दोन महिने रैना, स्लार्टी आणि दाद यांनी काम पाहिले. हा उपक्रम पुढे कायमस्वरूपी चालवायचा असेल तर नवीन लोक आली पाहिजेत असा समितीचा निर्णय झाला. त्या अनुषंगाने आदल्या महिन्यातील सर्वोत्तम कवी पुढल्या महिन्यात हे काम पाहू लागले.

दर महिन्यात येणार्‍या २५०/३००+ कविता वाचून त्यातून सर्वोत्तम कविता निवडायची हे बरंच काम आहे. आणि एकंदर व्यापामुळे कितीजण यात वेळ देऊ शकतील हे नक्की नसल्याने हा उपक्रम कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत सध्या स्थगीत करण्यात येत आहे. तुमच्याकडे हा उपक्रम चालवण्याकरीता जर काही सूचना असतील तर त्या ईथे मांडा.

मंडळी शुद्धलेखनाबाबत आपण कोणाला काय शिकवत आहोत याचं थोडंस भान असावं. जो माणुस सातत्यानी चांगल्या गजल आपल्याला वाचायला देतो त्याच्याकडून शुद्धलेखनाच्या चुका झाल्या आहेत हा गैर(?)समज तरी कसा करून घेतलात तुम्ही लोकांनी? या केवळ टायपो होत्या एवढ साधं लक्षात आलं नाही कोणाच्या? दिसलं कुठेतरी काही चुकलेलं की लागले लगेच शहाणपणा शिकवायला. हीच का तुमची प्रगल्भता? कामाच्या धबडग्यामधे वेळात वेळ काढून या दोघांनी चांगल्या कविता निवडून आपल्यासाठी दिल्या. हे काम दोघही टाळू शकले असते. आणि कवितांबद्दल जास्त काही लिहीत नाही हे म्हणणं म्हणजे त्यांनी टाळलं आहे असा समजही चुकीचा आहे. प्रत्येकालाच दुस-याच्या कलाकृतींबद्दल चांगल वा वाईट बोलता येतच असं नाही.

इथे मायबोलीवर हे हल्ली जरा जास्तच व्हायला लागलंय कोणीही उठतो आणि दुस-याला शहाणपणा शिकवायला लागतो. कबुल इथे बरीच मंडळी शुद्धच लिहितात पण म्हणून ज्यांना लिहायची हौस आहे, लिहावं वाटत त्यांनी लिहूच नये का?

जेव्हा जेव्हा असे वाद होतात त्या प्रत्येक वेळेला समोरच्या व्यक्तीचा जराही विचार न करता अगदी अपमानास्पद वाटेल अश्या शब्दात हेटाळणी केली जाते.

चांगल्या शब्दात अथवा पर्सनली या दोघांना मेल टाकून किंवा अ‍ॅडमीनला कळवून हा जो टायपोचा गोंधळ झाला तो सुधारता आला असता. पण आम्हाला ते नकोच असतं कोणाला कसं कमी लेखता येईल याची वाट बघत बसणा-यांकडून यापेक्षा दुसरं काय अपेक्षीत.

मायबोली आपली आहे आणि या कविता निवडून सादर करणारी अ‍ॅडमीन टीम आहे तेंव्हा आपण मायबोलीवरच टिका करण्यासाठी आपले किबोर्ड वापरत आहोत याचीही जाण प्रत्येकानी ठेवायला हवी.

मायबोली आपली आहे आणि या कविता निवडून सादर करणारी अ‍ॅडमीन टीम आहे तेंव्हा आपण मायबोलीवरच टिका करण्यासाठी आपले किबोर्ड वापरत आहोत याचीही जाण प्रत्येकानी ठेवायला हवी>>>>>> हो प्रत्येकाने ठेवावे हे अपेक्षीत...

इथे मायबोलीवर हे हल्ली जरा जास्तच व्हायला लागलंय कोणीही उठतो आणि दुस-याला शहाणपणा शिकवायला लागतो.>>>>>> अगदी प्रत्येक बाबतीत. हा एक हौशी मंच न रहाता, कुणाचे कूठे काय चुकले हे दाखवणारा मंच झालाय. होत काय की फक्त चुकाच दाखवण्याच्या नादात मूळ कलाकृतीचा आशय काय , तो चांगला की नाही यावर टिपण्णी न होता केवळ चु़कांवर चर्चा होते. मूळ विषय बाजूला राहुन केवळ चुकांवर चर्चा..चुकाही कळायला हव्यात पण चुकांबरोबर चांगल काय हे ही दाखवाना.. चाम्गल्याच ही कौतुक करा... नाहीतर सगळेच बी बी सुचना बी बी करा...

निवडलेल्या कवितांची संख्या जरा जास्त आहे असं वाटलं.
त्या त्या वेळेला त्या त्या निवडणार्‍याचे मत आणि आवड अंतिम मानले पाहीजेत. मग आपलं मत त्यासारखं असो वा नसो.
येणार्‍या कवितांची संख्या बघता वेळेचा मुद्दा निकालात निघतो असे वाटते.

आपल्या घरचं काम असेल तर थोडंसं खालीवर झालं तर चालवून घेतो ना आपण? मग माझं अनुभवविश्व समॄद्ध करणार्‍या मायबोलीच्या उपक्रमांनाही घरचंच काम नाही का मानू शकत मी? जर तसं मानतो तर आपल्या नातलगांच्या (पक्षी मायबोलीकरांच्या) भावनांना टेच न पोहोचवता सौम्यपणे माझं म्हणनं मी मांडु शकतो ना? आणि जर मी तसं मानतच नाही तर सार्वजनिक संकेतस्थळ म्हणून जरी इथे लिहिण्याचा अधिकार मला असला तरी इथल्या उपक्रमांवर टिका करण्याचा नैतिक अधिकार मला नाही असं मी मानतो.

वास्तविक उमेश कोठीकरांची पोस्ट ही मायबोलीच्या उपक्रमांबद्दलच्या कळकळीतूनच आली हे स्पष्ट आहे. तरिही त्यांच्या भावना पोहोचवण्यासाठी त्यांनी ज्या शब्दांचा वापर केला त्याची परिणती अप्रत्यक्षरित्या उपक्रम बंद होण्यात आणि मायबोलीवरील एक रत्न गमावण्यात झाली. नीट अवलोकन केल्यास असं दिसेल की इथे 'चूक' कोणाचीच नाही, किंबहूना 'मायबोलीविषयीची कळकळ' ही एकच भावना इथे अधोरेखित झाली. तरिही मित्रांनो, शब्द हे शस्त्र आहेत हेच पुन्हा एकवार इथे सिद्ध होतं.

मायबोली कुटूंबाचे आपण सारे नातलग आहोत आणि एकमेकांच्या हळूवार भावना जपनं हेही या कुटुंबाचे सदस्य या नात्याने आपलंच कर्तव्य आहे. नाही का?

जयंतराव, आपल्यासारख्या प्रतिभावान कवीचा हा निर्णय आम्हा सर्वांसाठी क्लेशदायक आहे. आपल्या घरातल्या माणसावर रागावल्यावर घर सोडून जाणं हा पर्याय नाही ना होऊ शकत? कृपया आपण फेरविचार करावा अशी विनंती मी आपल्या कवितांचा वाचक आणि कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने करतो.

हा उपक्रम कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत सध्या स्थगीत करण्यात येत आहे.
>> अ‍ॅडमिन,
तुम्ही हे पाऊल उचलू नयेत, असे मला मनापासून वाटते. तोडगा शोधला तर सापडतो, पण त्यासाठी उपक्रम स्थगित ठेवण्याचे काय कारण? गणेशोत्सव किंवा दिवाळी अंकाचे संपादक मंडळ, स्वयंसेवक यांचा चमू तयार करताना तुम्ही आधी जाहीर आवाहन केले होतेच ना? मग कवितांचे परीक्षक मंडळ निवडण्यासाठीही तसेच करा ना. मी वर एक तोडगा सुचवला होता त्याचाच थोडा विस्तार करतो. कल्पना पटली तर स्वीकारा. माबोकरांनीही त्रुटी दाखवाव्यात.

१) सर्वप्रथम तुम्ही अशा परीक्षक मंडळात काम करण्यास इच्छुकांची नावे मागवून घ्या.

२) या परीक्षकांचे दोन गटांत वर्गीकरण करा
(अ) ज्येष्ठ सदस्य असलेले साहित्य जाणकार (पाच वर्षांपुढील सदस्य कालावधी असलेले) : हे परीक्षक सहा महिने काळासाठी स्थायी असतील. त्यानंतर त्यांची जागा दुसरे घेतील.
(ब) अनुभवी सदस्य (किमान एक ते पाच वर्षे सदस्यत्व असणारे) : हे परीक्षक तीन महिन्यांसाठी असतील व नंतर त्याची जागा दुसरे घेतील.

३) तिसरा परीक्षक एक वर्षाखालील सदस्य असलेल्यांतील उल्लेखनीय कवींमधील असावा. तो दर महिन्याला बदलता राहील.

या तिघांच्या मतांचा व निवडीचा आदर व्हावा. अंतिम शब्द अ‍ॅडमिनचा असेल. परीक्षकांपैकी एखाद्याला ऐनवेळच्या अडचणीमुळे शक्य न झाल्यास इतर दोघांनी कविता निवडीचे काम बघावे. परीक्षक केवळ कवीच पाहिजेत असे नाही. साहित्यप्रेमी आणि संवदनशील असले म्हणजे पुरे.

महिना पूर्ण झाल्यावर पुढचा पूर्ण आठवडा या परीक्षकांनी निवडीसाठी घ्यावा आणि निकाल जाहीर करावा.

किमान एक तरी करा. यावर तोडगा निघेपर्यंत कुणी दोन ज्येष्ठ सदस्यांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून परीक्षक म्हणून काम पाहावे.

उपक्रम स्थगित मात्र करू नका कारण त्यातून चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.

या केवळ टायपो होत्या एवढ साधं लक्षात आलं नाही कोणाच्या? दिसलं कुठेतरी काही चुकलेलं की लागले लगेच शहाणपणा शिकवायला. हीच का तुमची प्रगल्भता? >> श्यामली.. यात शहाणपणा शिकवायचा कुणी प्रयत्न केलाय असं मला तर वाटत नाही.. पण ज्यांनी शुद्धलेखनासाठी काही कविता नाकारल्या त्यांनीतरी लिहिताना शुद्ध लिहावं. मान्य आहे की त्या टायपो असू शकतील मग कवींनी ज्या कविता टाकल्या असतील (आणि ज्या नाकारल्या गेल्या) त्यातल्यापण शुद्धलेखनाच्या चुका म्हणजे टायपो असू शकतील.

आधीच कविता या प्रकाराकडे आजकाल मा बो वर तेव्हढे गांभीर्याने बघितले जात नाहीय.>>
कळीचा मुद्दा आहे. पण याला अ‍ॅडमिन टीम किंवा निवड समिती जबाबदार आहे का ?
शुद्धलेखन अन टायपो कडे लक्ष न देता कवितांचे रतीब टाकणारे कवि/कवयित्री, 'तोडलंस / फोडलंस' अशा ( अर्थहीन) प्रतिक्रिया देणारे नेहेमीचेच वाचक, एखाद्याने शंका विचारली, किंवा कवितेबद्दल नावड, नाराजी दर्शवली तर त्यांच्यावर हल्ला करणारे कवि/कवयित्रीचे चाहते यांची काहीच जबाबदारी नाही ?

उत्तम कविता निवडण्याचा उपक्रम हा काही मायबोलीकरांच्या चांगुलपणाने सुरु झाला. म्हणून सर्व कवींनी दर महिन्यात अमक्याच वेळात कविता जाहीर झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे रास्त आहे का ? या आधी दहाबारा वर्षे मायबोलीवर उत्तमोत्तम कविता येत नव्हत्या का ? त्याबद्दल चर्चा होत नव्हती का ? अशी निवड सुरु व्हायच्या किती आधीपासून बेटीच्या , जयाविच्या, शमाच्या , मिल्याच्या, वैभवच्या कविता लोकांना मुखोद्गत आहेत !

दिसलं कुठेतरी काही चुकलेलं की लागले लगेच शहाणपणा शिकवायला. हीच का तुमची प्रगल्भता?>> ज्या निवेदनात कविंतांच्या शुद्धलेखनावर इतका कटाक्ष आहे त्याच निवेदनात शुद्धलेखनाच्या डझनभर चुका मला खटकल्या अन त्या मी निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यात शहाणपणा शिकवायचा प्रयत्न कसा काय येतो?

आणि कवितांबद्दल जास्त काही लिहीत नाही हे म्हणणं म्हणजे त्यांनी टाळलं आहे असा समजही चुकीचा आहे. >>या आधी निवडसमितीतल्या लोकांनी रसग्रहण/ विश्लेषण, केलंच आहे ना सर्व कवितांचं. ते सर्व देखील आपापल्या इतर जबाबदार्‍या सांभाळून मायबोलीवरच्या प्रेमाखातर, कवितांमधे त्यांना असलेल्या इंटरेस्टखातरच हे सर्व करत होते. चांगल्या कविता करणार्‍या, अनुभवी निवडसमितीकडून रसग्रहणाची अपेक्षा ठेवण्यात काय गैर आहे ? 'तोडलंस , फोडलंस' अशा प्रतिक्रिया येतच असतात. त्यातून सर्वसामान्य वाचकाला काय शिकायला मिळणार? कवितांबद्दलची उदासीनता दूर करायची असेल तर असे रसग्रहण करणे आवश्यक नाही काय ?

शुद्धलेखन अन टायपो कडे लक्ष न देता कवितांचे रतीब टाकणारे कवि/कवयित्री, 'तोडलंस / फोडलंस' अशा ( अर्थहीन) प्रतिक्रिया देणारे नेहेमीचेच वाचक, एखाद्याने शंका विचारली, किंवा कवितेबद्दल नावड, नाराजी दर्शवली तर त्यांच्यावर हल्ला करणारे कवि/कवयित्रीचे चाहते यांची काहीच जबाबदारी नाही ?>>>>आहे नक्कीच आहे जाणवत असत मलाही.. पण दरवेळेला नुसतंच चुकांवर बोट ठेवणं पटत नाही

चुकाच दाखवण्याच्या नादात चांगल्या कलाकृतींकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये. आणि चुका सांगूच नका असं कोणालाच म्हणत नाहिये मी. पण ती सांगायची पद्धत चुकीची आहे. समोर असणारी व्यक्ती एक गजलकार दुसरी चांगल्या कविता लिहिणारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पोस्ट करणारी अ‍ॅडमीन टीम. या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करुन लगेच न बोलता थोडी वाट पाहिली असती किंवा अ‍ॅडमीनला कळवलं असतं (म्हणजे इश्यु होऊ नये पण चुका तर टाळल्या गेल्या पाहिजेत या भावनेनी) तर टायपो सुधारलेल्या दिसल्याही असत्या.

जयंतरावांनी काय ते स्पष्टीकरण दिलेलच आहे त्यामुळे मी फार काही बोलायची गरज नाही.

कवितांची निवड करतांना सर्वात आधी शुध्दलेखन>>श्यामली हे वाक्य आल्यावर त्यावर शोनूची आलेली प्रतिक्रिया अजिबात खटकू नये. कमीत कमी तिच्या पोस्टमधे हेटाळणीचा किंवा आरोप करणारा सूर जाणवत नाही. मला तरी एखादा चिमटा काढल्यासारखी पोस्ट वाटली.

Pages