न्यास

Submitted by क्रांति on 20 August, 2009 - 14:55

या जिवाला एक ज्याचा ध्यास होता
तोच की त्याचा खुळा आभास होता?

भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी,
सक्तमजुरी आणि कारावास होता

रंगलेल्या मैफली उधळून जाणे
हा कुणाचा सांग अट्टाहास होता?

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले,
फक्त ओल्या पालवीचा वास होता

राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी
गोंदलेला आमरण वनवास होता

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता

गुलमोहर: 

>>हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता
वा!

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता

क्या बात है! मस्तच.

व्वा! एक एक शेर पुन्हा पुन्हा वाचावा, मनात उतरवून ठेवावा आणि त्याचं आतल्या आत चिंतन होत रहावं असं वाटतं.

छान!

सीतेवरून इलाहींचा एक शेर आठवला:

"चौदा वर्षे पतीविना राहिली उर्मिला,
'हाच खरा वनवास', म्हणालो, चुकले का हो?

शरद

न्यास - अतिशय सुंदर...

क्रांती : तुमच्या गझलेतली वेदना मनावर खुप घाव घालते...

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता>>> क्या बात है! मस्त गजल!

कारागिरी का म्हणू जवाहिरी ही
ह्या गजलचा प्रत्येक शेर खास होता.

माफ करा पण न्यास म्हणजे लयबद्ध हालचाल ना ? नक्की आठवत नाहीये म्हणून विचारतोय. Happy

धन्यवाद मंडळी. शरदजी, इलाहींच्या शेराची आठवण करून दिल्याबद्दल खास धन्यवाद.
अमितजी, आपला प्रतिसाद अगदी विशेष! हो, न्यास म्हणजे लयबद्ध हालचाल, पण हा अर्थ नृत्यासाठी. गायन किंवा वादनात न्यास म्हणजे एखादं गीत किंवा बंदिश गाताना एखाद्या स्वरावर थांबणं, त्याच स्वरावर वारंवार येणं. हा स्वर त्या बंदिशीतला महत्वाचा स्वर असतो. ग्रह स्वर म्हणजे सुरुवातीचा स्वर आणि न्यास स्वर म्हणजे शेवटचा स्वर. इथे हा न्यास गृहित आहे.

वा वा...
हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी,
सक्तमजुरी आणि कारावास होता
वाह..

आवडली गझल...
पुलेशु..

क्रांती: सर्वच शेर खुप छान!
गझल एकदम मनाला भिडते...
<<हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता>> हा शेर मला खुप आवडला.
पुलेशु...

क्रांती :
पामराने या कलाकृतीवर लिहीणे साहसाचे आहे पण दाद अट्टाहासाची आहे... फारच छान !!!!
सगळेच शेर जमलेयत.... अमितन अगदी समर्पक दाद दिलीय....!!!!
"मी निषादाभोवती गुंतून गेले,हाय, त्याचा पंचमावर न्यास होता
रंगलेल्या मैफली उधळून जाणे हा कुणाचा सांग अट्टाहास होता?
चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले, फक्त ओल्या पालवीचा वास होता "----: क्या बात है !!!!
जियो मॅडम... ब्रावो !!!!

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता

संपुर्ण गंजल अतिशय सुंदर्..... कितीतरी वेळेस वरच्या द्विपदी वाचल्या!!!

व्वा!!! सुरेख गझल!
हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता>>>>सही!

खुपच छान गझल!आणि शरद पाटलान्चा शेर फारच सुन्दर!(अनुस्वार काम करत नाही आहे)

Pages