सुरवंट

Submitted by कौतुक शिरोडकर on 14 August, 2009 - 05:38

तू विरलीस पंचमहाभुतात .......
ती वेळ... ती तिथी... मी गोंदलीय माझ्या मनावर.. ठळकपणे.
प्रहराप्रहराला आठवणी शिंपून देते तजेला त्या हिरव्या जखमेला
जिने व्यापलाय तनामनाचा परिघ आणि
ठसठसतेय माझं संपुर्ण अस्तित्व...
....
......

आनंदाची एकही चाहूल मी उंबर्‍याआत येऊ देत नाही,
सुखाच्या झुळकी कितीदा परतल्यात दरवाज्यावर थाप देऊन...
अजून कुंपणावर थांबलीत फुलपाखरं..
खिडकीत फुललेल्या सदाफुलीला मी कवेत घेईन या अपेक्षेने,
कधी कधी डोकावणारा एखादा कवडसा
डुंबून जातो माझ्या काळोखाच्या डोहात
पुन्हा न परतण्याच्या वचनासह,
पावसाच्या एकाही थेंबाने फुलत नाहीत धुमारे
गोठलेल्या स्वप्नाच्या फांदीला,
अंगणातल्या गुलमोहराने वसंताला केव्हाच झिडकारलयं..
........
तू पुन्हा कितीही आणि कसाही संपर्क साधायचा प्रयत्न केलास तरी
माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीस...

कारण मी झालेय माझ्याच कोषातील आंधळं सुरवंट...

गुलमोहर: 

कौतुक परत वाचली कविता, आता थोडं वास्तविक वाटायला लागलंय.
नाही म्हणलं तरी कविता पुन्हा पुन्हा वाचल्याने जास्ती उमगते.
आवडली तर आहेच, अजून खोल उमगते का ते पाहते. Happy

अगदी आतली, मनाच्या खोल खोल कप्प्यातली कविता आवडली.
पण सुरवंटाला कधीतरी कोषातून बाहेर पडावंच लागतं फुलपाखरू होऊन!

सुरवंटाचं फुलपाखरू होतं यात शंका नाही. स्वत:च्या कोषातच स्वतःला बंदिस्त करणार्‍या या आंधळ्या सुरवंटाकडून मलाही तिच अपेक्षा आहे. पाहू भविष्यात काय वाढून ठेवलय ते !

अप्रतिम!!

उमेश अन क्रान्ती... अनुमोदक...

पाहू भविष्यात काय वाढून ठेवलय ते !>>>>
सुरवंटाचं फुलपाखरू होण हे नियत आहे... होणारच.. शुभेच्छा !!! Happy

गिरिशराव, 'शिरोडकर' म्हटलं की त्याबरोबर फॅमिलीही येते. आडनावाने संबोधणं म्हणजे शेजार्‍याशी तोंडदेखली ओळख असावी तसं वाटतं. त्यापेक्षा कौतूक जास्त बरं. मित्रत्वाचं वाटेल. हे फुकटचे सल्ले !! (डोक्यात आले म्हणून)

कौतुक,
>>स्वत:च्या कोषातच स्वतःला बंदिस्त करणार्‍या या आंधळ्या सुरवंटाकडून मलाही तिच अपेक्षा आहे. पाहू भविष्यात काय वाढून ठेवलय ते ! >> Happy

सुरवंटाची कल्पना छान आहे- या सुरवंटाचा फुलपाखरू होणे हाच शेवट आहे, नाही का?
(अर्थात प्रथमवाचनात मला वाटला तो काटेरी/खाजेरी सुरवंट!. परत वाचल्यावर माझे अज्ञान दूर झाले!)

कौतूक तुम्हाला सर्वोत्तम कवितेचे बक्षिस मिळाल्याबद्दल अभिनंदन. व्हिज्युअल्स बनविता येइल अशी चित्रदर्शी मांडणी आहे.

सहीच कौतुक, मागे नुस्तीच वाचली; लिवायच राहून गेलं. अभिनंदन. तुला तुझ्या कवितांसकट भेटता येईल काय?. मागच्या दोन्ही प्रोग्रॅम्समधून पार्‍यासारखा निसटलायस मित्रा.

विशालदा इकडे लक्ष देतील काय ?

Pages