स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.
..............................................................................................................................................
"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्यांना समावेशिणार्या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!
हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे
हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्
हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.
स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल
हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !
हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.
"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..
इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.
हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"
आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.
स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.
"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.
आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.
आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?
ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.
हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे
आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....
"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही
'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -
हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत
हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......
कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्या समाजाशी असणार्या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.
हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.
संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे
त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत
वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.
आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....
"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.
राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...
माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे
वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.
मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !
या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.
माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!
त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!
जय हिंद !
विशाल कुलकर्णी
संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org
याच्यावर बोटे तुटेस्तवर, तोंड
याच्यावर बोटे तुटेस्तवर, तोंड फाटेस्तवर, शाई, टोनर संपेपर्यंत, कागद संपेपर्यंत, स्क्रीन फुटेस्तवर, कीबोर्ड झिजून जाइस्तवर, इन्टर्नेटच्या तारा, केबल, सॅटेलाईट जळून जाइस्तवर, काँप्युटर जळून जाईस्तवर, मेंदूचा पार भुगा होईस्तवर चर्चा झाली आहे.
सावरकरांचे म्हणणे पटले तरी प्रत्यक्षात आणणे कठीण आहे, म्हणून नुसती उलट सुलट चर्चा होते. नि मग
नुसता वादविवाद. कृति नाही, प्रयत्न नाही.
तर सद्ध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत काय बदल केल्याने हे उद्दिष्ट साध्य होईल याचा विचार करायला पाहिजे. सुरुवात कुठून करावी, पुढील टप्पे काय, याबद्दल चर्चा व्हावी, असे वाटते.
झक्कीकाका, इथे मला कुणाकडुनच
झक्कीकाका, इथे मला कुणाकडुनच काहीही अपेक्षित नाही. चर्चा चालेल, वाद तर मुळीच नाही. केवळ इथे नवीन असलेल्या आणि स्वा. सावरकरांवर प्रेम, भक्ती असलेल्या लोकांसाठी त्यांचे काही विचार मांदावेत असे वाटले म्हणुन लिहीले. प्रत्येक वेळी असे विषय वाद विवादासाठीच वापरले जावेत असा अट्टाहास कशाला?
नव्या पिढीपर्यंत काही चांगले विचार पोहोचवणे एवढा साधा सरळ हेतु असुच शकत नाही का?
विश, खुप अभ्यास पूर्ण आणि
विश, खुप अभ्यास पूर्ण आणि माहिती पूर्ण लेख , खुप खुप आवडला, आवर्जुन वाचावा असाच आहे
त्यांच्या सारख्या धेय्य वादी माणसांची नितांत गरज आहे आज देशाला
ह्या वर चर्चा करण्यासारख काही आहे अस वाटत नाही, त्यांचे विचार वाचुन थोडे फार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या पेक्षा अस वाटत.
<<सिंधुस्थान ही ज्याची केवळ
<<सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुम>>
क्रूपया, खोट्या गोष्टीचा प्रचार करु नका. ही हिंदुंची भुमी नाही, तर उत्तर भारत गोंडाची भुमी आहे व दक्षिण भारत द्रविडांची. राहिला प्रश्न सिंधुसंस्क्रुतिचा ती स्वतंत्र संस्क्रुती होती, हिंदुच्या हजारो वर्षा आधी होती. आणी आर्य लोकानी सिंधूसंस्क्रुतीमधुन काही गोष्टी वेदीक संस्क्रुतीमधे बळजबरीने घुसविल्या, हे पुराव्यानीशि सिद्द झालेलं आहे.
हिंदु हे आज भारतीय आहेत ( पण मुळात हिंदु व मुसलीम उपरे आहेत). हे क्रुपया विसरु नका.
राहीला प्रश्न सावरकरांचा, त्यांच्या कविता वाचुन तर वाटते की ते देशभक्त होते. पण देशातिल कुठल्या नागरिकांसाठी ते स्वातंत्र्याची मागणी करत होते याचा पण विचार/चर्चा झाली पाहीजे. सावरकारानी जेंव्हा जेंव्हा मात्रुभुमी म्हटले तेंव्हा तेंव्हा हिंदु हे शब्द न चुकता उच्छारले आहे, त्या मुळे त्याना नुसते देशभक्त म्हणुन चालणार नाही तर हिंदुत्ववादी देश भक्त असे म्हणने जास्त शोभेल. हा देश हिंदुंच्या मालकीची जागीर आहे असा त्यांचा समज होता हे त्यांच्या प्रत्येक लेख व कवितांतुन उघड दिसते. ज्या माणसाची देशभक्ती एक विशिष्ट धर्माभोवति फिरते, तीला देशभक्ति म्हणताना आपल्याला खरंतर लाज वाटायला पाहीजे. देशभक्ती ही व्यापक व सर्वसामावेशक असावी, ती फक्त महात्मागांधी व नेताजी (मार्ग जरी वेगळा होता)यांची होती.
तुमच्या भावना दुखवायची इच्छा नाही, पण जे सत्य ते सत्य.
तसे भारताला त्यानी "हिंदभुमी" म्हणून आपलि पहिली फसवणुक केलीच आहे.
<<इतर हिंदूंच्या धर्मांना
<<इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल.>>
हा सावरकरांचा बामणी कावा नाहीतर काय म्हणायचे याला. आज ते जिंवत नाहीत, नाही तर या कारणावरुन त्यान परत तुरूंगात डांबता आले असते. कसले हे त्यांचे विचार! म्हणे देशभक्त.
अहो बामण भक्त म्हणा बामण भक्त.
माफ करा पण खालील सत्य तुम्ही नाकारु नाही शकत.
तुम्ही लोकं चुकिचं लिखान करायला खुपच पटाईत आहात. असच घुसडवलं होतं त्या दादोजी कोंडदेवाचं व समर्थ रामदासांचं नावं, शिवाजे राज्यांचे गुरु म्हणुन. बरं झालं शासनानी हा कावा हाणुन पाडला, व पुस्तकातील हे विचित्र उल्लेख बदलले.
वा वा मधुकरराव, माहितीबद्दल
वा वा मधुकरराव, माहितीबद्दल धन्यवाद !
विशाल, अतिशय सुंदर लेख.
विशाल, अतिशय सुंदर लेख. माहिती पण छानच.
सावरकरांचा हिंदू धर्माबद्दलचा अभ्यास किती प्रगाढ होता, ते अनेकांना माहित असेलच.
उगाच गरळ ओकणार्यांकडे लक्ष द्यायची गरज नाही.
मधुकर << आणी आर्य लोकानी
मधुकर
<< आणी आर्य लोकानी सिंधूसंस्क्रुतीमधुन काही गोष्टी वेदीक संस्क्रुतीमधे बळजबरीने घुसविल्या, हे पुराव्यानीशि सिद्द झालेलं आहे. >>
उदाहरण आणी पुरावा द्या!
विशाल,
लेख आवडला.
विशाल, झक्कास! प्रखर
विशाल,
झक्कास! प्रखर देशाभिमान अन प्रचंड कर्तुत्व याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वा. सावरकर.
भारताच्या इतीहासातील एक प्रचंड विलक्षण पण दुर्लक्षित व्यक्तीमत्व.
असच घुसडवलं होतं त्या दादोजी
असच घुसडवलं होतं त्या दादोजी कोंडदेवाचं व स्वामी समर्थांचं नाव शिवाजे राज्यांचे गुरु म्हणुन.>>>
मधुकरराव इथेच तुमची अफ़ाट विद्वत्ता आणि तगडा व्यासंग दिसुन येतो. वा वा , क्या बात है! शिवाजी राजांचे गुरु म्हणुन दादोजींबरोबर समर्थ रामदासांचे नाव घेतले जाते स्वामी समर्थांचे नव्हे. कोपरापासुन .......
विशाल अगदी "बामणी" काकनजर हो
विशाल
अगदी "बामणी" काकनजर हो ही! 
)
अहो मधुकरराव, बोला हो तुम्ही! तुमची मते देखिल व्हॅल्युएबल आहेत!
(त्रिकालाबाधित सत्याच्या व्हॅल्यु काढायची मात्र पद्धत नाहीये
अरे वा, आमच्या लेखनावर
अरे वा, आमच्या लेखनावर लिंबुदांची मेहेरनजर...
भरुन पावलो देवा !
विशाल, मस्त संकलन रे !
विशाल, मस्त संकलन रे !
मधुकर बोलत आहेत, ते अगदीच
मधुकर बोलत आहेत, ते अगदीच चुकीचे नाही.... या देशात वैदिक धर्म आणि मूर्तिपूजक असणारे शैव व इतर अनेक धर्म नांदत होते.... ते एकमेकांशी भांडत देखील होते...शंकर, गणपती, शक्ती अशा किती तरी देवता वैदिकानी उचललेल्या आहेत .. कालांतराने ते एका धार्मिक छत्राखाली आले.. हजारो वर्षे या एका छत्राला नावच नव्हते, जे परकीयानी दिले आणि मग तेच प्रचलित झाले.... हिन्दु धर्म.... हिन्दु धर्माला एक प्रेषित , एक पुस्तक नसल्याने आता काही तरी व्याख्या ही करावीच लागणार.. मग सावरकरानी केलेली व्याख्या हिन्दुना स्वीकारायला मधुकरराव, काय प्रॉब्लेम आहे?
आता सगळेच भारताचे नागरिक आहेत.. नॅशनॅलिटी इन्डियन... पासपोर्टवर एवढेच येते..
रेशन कार्डेदेखील आता सर्वाना आहेत.. आता द्रविड, आर्य, अनार्य, वैदिक- त्यात परत यजुर्वेदी, अथर्ववेदी, क्षत्रिय, शुद्र, असे भेद करायचे म्हटले आणि वैदिकाना ( म्हणजे ब्राह्मणानाच का?
) परत उत्तर ध्रुवावर नेऊन टाकून यायचे म्हटले तरी ते शक्य आहे का? आज आर्य हे आर्य नाहीत.. द्रविडही द्रविड नाहीत.. सगळे मिळून हिन्दु आहेत......... हिन्दु या शब्दाला ब्राह्मण, वेद , ब्राह्मणी विचार हे सगळे समानार्थी शब्द म्हणून का पहाता आहात?
सावरकरानी बौद्धाना व अनेकाना हिन्दु हेच लावायला सुचवले आहे, ते मात्र चुकीचे वाटते.... धर्म हा अखेर ज्याने त्याने आपापल्या मर्जीनेच सांभाळायला हवा....
मुळात ब्राह्मणाना आणि वेदाला झोडपणार्यानी आधी त्यांची भूमिका क्लिअर करावी... हे सगळे उत्तर ध्रुवातून आले, हे इथले नव्हते, म्हणून आधी झोडपून झाले... पण उलट त्यातून वेदांचा इतिहास, त्याचे इतर धर्मातील ग्रंथांशी असणारे साम्य , त्यांची प्राचीनता हे सगळे आणखीनच सुप्रसिद्धीला आले... त्याचबरोबर लगेच उलट कांगावादेखील सुरु झाला, ब्राह्मण हे मूळ इथलेच ! त्यांचा धर्म हा इथल्या मूर्तीपूजक धर्मातूनच आला आणि त्यातच तो कालांतराने संपलादेखील म्हणे ! हे कुठले ध्रुवावरून आले? ( संदर्भ- हिन्दु धर्माचा शैव इतिहास, संजय सोनावणी) .... दोन्हीकडून ब्राह्मणाना झोडपून झालेले आहे...... काही का असेना, पण अनेक संप्रदाय, धर्म विलीन होऊन हिन्दु धर्म तयार झालेला आहे, हे मात्र सत्य आहे.... मग आता ज्यानी हिन्दु धर्म सोडलेला आहे, त्यानी इतराना हिन्दु धर्माची व्याख्या ठरवायला विरोध कशाला करायचा?
आणि मधुकरराव, काही माहिती देऊ शकाल का? अवांतर म्हणून... भारतातील बौद्ध हे नेमक्या कोणत्या पंथाचे आहेत? वज्रयान ( महायान) की हीनयान? का ते स्वतःला केवळ बौद्धच म्हणवतात... बुद्धाच्या निर्वाणानंतर अनेकाना नुसत्या अहिंसेवर जगणे अशक्य असल्याचे जाणवले आणि बौद्ध अनुयायांचे मनोधैर्य राखण्यासाठी वज्रयान पंथाने वज्रपाणि या एका सशस्त्र ( वज्र असणार्या) देवाची पूजा सुरु केली म्हणे.... ( हा वज्रपाणि म्हणजेच भक्तांचे रक्षण करणारा हिन्दु धर्मातील स्कंद ..... वज्रपाणि, स्कंद, कुमारस्वामी, कार्तिकेयन, सुब्रमण्यम, मुरुगन ही सगळी एकाच देवाची विविध प्रदेशातील नावे आहेत.... असे मी वाचलेले आहे.. आधी आस्तित्वात असणार्या धर्मातील संकल्पना उचलणं ही काही फक्त हिन्दुंचीच मक्तेदारी नव्हे, साहेब !
)
विशाल.. शीर्षकातले नाव वाचले,
विशाल.. शीर्षकातले नाव वाचले, त्या नावालाच लक्ष लक्ष वंदन!
त्या नावापुढे काही बोलायचे (चांगलेच) तरी शब्द वापरताना धाकधुक होते ईतक प्रचंड व्यक्तिमत्व... खर तर दैवतच आहे ते.
बाकी संकलन छानच केलयस.
मला मधुकर.७७ यांच्या एव्हढी
मला मधुकर.७७ यांच्या एव्हढी माहिती किंवा अक्कलहि नाही. पण एक कळले, की दुसर्याला खोटे करण्याचा प्रयत्न करण्या पलीकडे काहीहि विधायक काय करावे याबद्दल त्यांनी काही लिहीले नाहीये.
शिवाय पूर्वी बरेच काही काही होते. आता काय आहे नि त्यातून काय मार्ग काढावा याचा विचार करावा. मधुकर यांचे त्याबाबतीत काय सांगणे आहे? की काही न करता स्वस्थ बसावे, नि कुणि काही बोलले की हा ब्राह्मणांचा कावा आहे असे म्हणायचे?
माझी श्री. मधुकर यांना कळकळीची विनंति की त्यांनी काही महिने पाकीस्तानात जाऊन रहावे. तिथे त्यांना ब्राह्मण किंवा हिंदू यांचा त्रास होणार नाही. तिथे त्यांना सांगा की हा देश मुसलमानांचा नाही, इतर कुणाचा होता, नि खोटे लिहून तुम्ही फसवणूक करता आहात्. मग तिथून जर जिवंत पर आलात तर तुम्हाला पटेल की ब्राह्मणी असले तरी तुम्हाला जिवंत सामावून घेण्याइतके चांगले लोक आहेत इथे. त्यांना मदत करा, तुमचे मत सांगा, बरोबर वाटले तर घेऊच विचारात.
<<आणी आर्य लोकानी सिंधूसंस्क्रुतीमधुन काही गोष्टी वेदीक संस्क्रुतीमधे बळजबरीने घुसविल्या,>>
निदान स्वतःच्याच संस्कृतीत घुसवल्या. गोर्या लोकांसारखे किंवा मुसलमानांसारखे दुसर्याची संस्कृति बळजबरीने नाहीशी करून, स्वतःची संस्कृति इतरांवर बळजबरीने लादली नाही. यासाठी तरी हिंदू धर्मियांची बाजू घ्या.
मधुकरराव, तुमची मते क्रांतिकारक असतील पण खरी असायला पाहिजेत हो! तरच लोक तुम्हाला मानतील.
तुम्ही सर्वजन इतिहास संशोधक
तुम्ही सर्वजन इतिहास संशोधक मा . म . देशमुख यांची पुस्तके वाचा तुम्हाला हीन्दु धर्मा बद्दल खुप माहीती मीळेल . ही पुस्तके विद्रोही साहीत्य संमेलनात मीळतात .
जामोप्या,
जामोप्या, झक्कीकाका...धन्यवाद!
खरेतर मला हेच अपेक्षित होते. ही माहिती एवढी वैविध्यपुर्ण आहे की इथे खरेतर कुठलेही वाद निर्माण करणेच चुकीचे आहे. बाकी मधुकररावांच्या भुमिकेला माझा विरोध नाहीये. फ़क्त जे काही ते म्हणताहेत ते त्यांनी सप्रमाण सिद्ध करावे. आणि महत्वाचे म्हणजे हा लेख ब्राह्मणांवर चर्चा करण्यासाठी लिहीलेला नाही. मधुकरराव, तुमचा ब्राह्मणांवरचा राग मी समजु शकतो, पण स्वा. सावरकरांसारख्या महान देशभक्तावर असले आरोप करणे, तेही केवळ ते ब्राह्मण होते म्हणुन हे मान्य नाही.
स्वा.सावरकरांचा मोठेपणा, त्यांची प्रखर देशभक्ती, त्यांचा त्याग या देशातील कोणीच नाकारु शकणार नाही. जो नाकारेल त्याच्यासारखा करंटा तोच असेल.
तुम्ही सर्वजन इतिहास संशोधक
तुम्ही सर्वजन इतिहास संशोधक मा . म . देशमुख यांची पुस्तके वाचा तुम्हाला हीन्दु धर्मा बद्दल खुप माहीती मीळेल . ही पुस्तके विद्रोही साहीत्य संमेलनात मीळतात .>>>
घ्या.... आता हिंदुधर्माची माहिती मा.म.देशमुख देणार. यापेक्षा मोठा विनोद तो कुठला असेल?
विशाल, छान लेख
विशाल, छान लेख
एक छान लेख. माहिती संग्रही
एक छान लेख. माहिती संग्रही ठेवण्यासारखी
अमोल
----------------------
माझा ब्लॉग
विशाल, अप्रतिम संकलन! आणि
विशाल, अप्रतिम संकलन! आणि तुझे यथार्थ परिश्रम!
विशाल अतिशय सुरेख व
विशाल अतिशय सुरेख व माहितीपुर्ण लेख. अशा लेखांची खरोखर गरज वाटते. स्वा. सावरकरांना फक्त ब्राह्मण म्हणन पुर्नपणे चुकीचे आहे.ज्या महान आत्माने देशाकरिता दिलेल्या बलिदानांची नुसती यादी जरी केली व आज आपन आपल्या देशाकरिता काय केले आहे याची पहाणि केली तरी आपल्याला लाज वाटेल.
सगळ्यांचे मनापासुन आभार !
सगळ्यांचे मनापासुन आभार !
विशाल, झक्की, मधुकर.७७
विशाल, झक्की, मधुकर.७७ यांना,
आमच्या एका प्राध्यापकांनी एक आठवण सांगितली होती ती इथे लिहावी असे वाटते.
"एक पाकिस्तानी प्राध्यापक भारताच्या दौर्यावर आले होते. त्यांच्याशी माझे हिंदूधर्माविषयी वाद झाले. त्यांचे म्हणणे :- 'कसला तुमचा देश? आणि कसला तुमचा धर्म? एक शंकराचार्य उठतो आणि एक विधान करतो. दुसरा उठतो आणि वेगळे विधान करतो. मग दोघांचे वाद. त्यात तिसरा कोणीतरी फोडणी घालतो. मग तो वाद चिघळतो, चिघळत राहतो ... जोपर्यंत नवीन वाद निर्माण होत नाही. आमच्या देशात या. तुम्हाला अशी भांडणे, असे वाद सापडणारच नाहीत................कारण तिथे तोंडच उघडू दिले जात नाही!!' "
सांगायचा उद्देश हा की हिंदूधर्म सहिष्णू सर्वसमावेशक असा आहे; आणि म्हणूनच भारतासारख्या वैविध्याने नटलेल्या देशासाठी तो योग्यच आहे. हे सत्य सावरकरांना (इतर राजकीय नेत्यांप्रमाणेच) समजले होते. मात्र बाकीच्यांनी या मुद्द्यावर देश पेटवला नाही; कारण त्यांना वाटत होते की मुस्लिम समाज काँग्रेसबरोबर येईल आणि फाळणी टळेल. पण फाळणीचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. आणि म्हणूनच मला सावरकरांच्याबद्दल आदर आहे.
शरद
विशाल, संकलन सुरेख आहे.
विशाल, संकलन सुरेख आहे. सावरकरांबद्दल शंका व्यक्त करणार्यांनी आधी 'सावरकर' वाचावा
(तोही इतरांच्या दृष्टीकोनातून रेखला गेलेला) हे माझे स्पष्ट मत. प्रत्येकाने आपली अमुल्य मते मांडावी, फक्त त्यांना योग्य आधार असावा. नाहीतर ते 'उचलली जीभ..' च्या सदरात मोडेल.
विशाल सुरेख आणि माहीतीपुर्ण
विशाल सुरेख आणि माहीतीपुर्ण लेख आहे. धन्यवाद .
विशाल लेख छान.. वर दिलेल्या
विशाल लेख छान..
वर दिलेल्या संस्कृत अवतरणांचं मराठी भाषांतर केलं तर बरं होईल.
मधुकरराव- ब्राह्मण = आर्य = बाहेरून आलेले लोक, ह्याला कुठलाही पुरावा नाही. युरोपियनांनी काढलेला प्रपोगंडा फक्त. आणि आपले politicians ते जागं ठेवतात, तुमच्या सारख्या लोकांना पेटवायला. आणि तुम्ही पेटता!
आपली सिंधुसंस्कृती ही सिंधू, सरस्वतीच्या काठावर उगम पावली. मोहंजोदरो हडप्पा, राणीबंग, लोथलं वगैरे ठिकाणी. पुढे आवर्षणामुळे सरस्वती आटली आणि तिच्या काठावरचे लोक पुढे सरकले.
रामदास स्वामींबद्दल - ते आणि शिवाजीमहाराज नसते तर.. वेगळा पाकिस्तान झालाच नसता कदाचित- कारण आपल्यातल्या बर्याच जणांचं already धर्मांतर झालं असतं - त्यामुळे ह्या लोकांबद्दल चांगल बोलता नाही आलं तर (वाईट बोलण्यापेक्षा) काही न बोललेलंच चांगलं.
दादोजी कोंडदेवांबद्दल - इतिहासाला डिस्टोर्ट करून इतिहास बदलता येत नाही - घडवता तर अज्जिबात नाही.
आणि तुमचा ब्राह्मणांवर राग का? तर त्यांनी काही विशिष्ट जातीतल्या लोकांना केवळ ते एका विशिष्ट जातीत जन्मले म्हणून जसं वागवलं ते चुकीचं होतं - कारण जन्म काही कुणाच्या हातात नाही - हो ना?
मग तिच चूक तुम्हीही करताय - ब्राह्मणांबद्द्ल blind द्वेष बाळगून. अनेक ब्राह्मण समाजाकरता झटलेत (eg. आमटे family) - तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, मी ब्राह्मण आहे हे मला माझ्या घरातून नाही कळलं - हे मला द्वेष पसरवणार्या society च्या घटकांकडून कळलं. आपण सगळेच जण एक माणूस म्हणून दुसर्या माणसांकडे कधीच नाही का बघू शकणार? जाती, धर्म, वर्ण, देश, बाई- पुरुष:- स्वतःचाच घात करून घेतोहोत आपण ह्या सगळ्या वादांनी.
द्वेषानं द्वेष वाढतो फक्त. जर खर्या अर्थानं grow व्हायचं असेल तर आपल्याला as a society एकत्र आलं पाहिजे. आपल्या समाजात करण्यासारख काम प्रचंड आहे - ते करायचं सोडून भांडत का हो बसलायत!
असो.. ही भूमिका तुम्हाला कधीतरी कळेल आणि तुम्ही अशा petty गोष्टींमधून बाहेर पडाल- अशी आशा आहे! शुभेच्छा!
विशाल, तुला प्रतिक्रिया कळवायला गेले आणि भलतीच भरकटले - पण राहावलं नाही.. असो!
हिंदुत्वावर किती धागे आहेत?
हिंदुत्वावर किती धागे आहेत?
झाले बहु, होतील बहु. पण तरीहि
झाले बहु, होतील बहु. पण तरीहि काही उपयोग होणार नाही.
कुणालाहि दुसर्याची मते पटणार नाहीत. जो तो स्वतंत्र बुद्धीचा. तोच खरा हिंदू.
नाहीतर आहेच, आमच्या पुस्तकात जे लिहीले तेच खरे नि ज्यांना त्याबद्दल शंका असेल त्यांना मारून टाका!! हिंदू धर्माला त्याबद्दलहि काही आक्षेप नाही!
दुर्दैवाने, पराकोटीचा संकुचित स्वार्थ, अदूरदृष्टी, फितुरी, लाचलुचपत यांचा अतिरेक झाल्याने, अहिंसा, क्षमा, शांति यांच्या खोट्या कल्पनांमुळे आता हिंदू, हिंदुत्व वगैरे नुसते शब्द उरले आहेत! नुसता गोंधळच गोंधळच.
आणि सतत मागे काय झाले, दुसर्या कुणाचे तरी चुकले म्हणून आम्ही नालायक असे म्हणून स्वस्थ बसायचे. करायचे काही नाही, वायफळ बडबड!
म्हणे, मागे काय चुका झाल्या ते पाहिले म्हणजे सुधारता येईल!! नानाची टांग! जेव्हढी सुधारणा त्याच्या दसपट, शंभरपट नुसता गोंधळ, आपसात वादावादी, मारामारी नि विध्वंस! यापलीकडे काहीहि करत नाहीत असे ९० टक्के, उरलेल्यांना काय करायचे ते करतातच, इथे येऊन लिहीले नाही तरी!!
हा सगळा त्या हटकेश्वराचा एक गंमतीचा, आवडता खेळ आहे. भारतात जसे क्रिकेट, तसे हटकेश्वराचा हा खेळ, सतत खेळत रहायचे!!
Pages