रवा आणि खोबर्‍याचे लाडू

Submitted by दिनेश. on 12 October, 2009 - 02:01
rava khobare ladu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

चार कप बारिक रवा, दोन कप बारिक वाटलेले ओले खोबरे ( एका मध्यम नारळाचे एवढे होते)
एक कप तूप, तीन कप साखर, मोठी चिमूट केशर (किंवा हवा तो स्वाद ), बेदाणे व काजू
(आवडीप्रमाणे )

क्रमवार पाककृती: 

जाड बुडाच्या भांड्यात थोडे तूप घालून रवा भाजायला घ्या. फ़ार गुलाबी करायचा नाही.
शक्य असेल तर खोबरे वाटताना फ़क्त शुभ्र भाग घ्या (मी आळस केला ) रवा भाजत आला
कि त्यात खोबरे घाला. परतत रहा, रवा परत हाताला हलका लागला पाहिजे ( खोबर्‍याचा
ओलेपणा रहायला नको. ) लागेल तसे तूप घालत रहावे.
दुसर्‍या भांड्यात साखर आणि दिड कप पाणी घालून पाक करत ठेवा. सतत ढवळत रहा.
पाकातच केशर किंवा वापरत असाल तो स्वाद घाला. उकळी येउन फ़ेस आला कि गॅस मंद
करा. पाकातला चमचा वर काढून, थोडासा पाक अंगठा आणि पहिले बोट यांच्यामधे धरुन
बोटे हळूहळू लांब करा. एखादी तार दिसायला लागली कि गॅस बंद करा व अर्ध्या कपापेक्षा
थोडा जास्त पाक काढून ठेवा. मग पाकात रव्याचे मिश्रण घालून ढवळा.
दोन तीन तास झाकण न ठेवता मुरु द्या. मग लाडू वळायला घ्या. मिश्रण कोरडे वाटले तर
काढून ठेवलेला पाक कोमट करुन लागेल तसा मिसळा. (रवा किती जाड आहे, यावर किती
पाक लागेल, ते ठरते ) मिश्रण हाताला शिऱ्यापेक्षा थोडे घट्ट लागेल, इतका पाक घाला. लाडु
वळताना, हवे तसे बेदाणे व काजू वगैरे वापरा. (मी भाजलेला काजू लाडूच्या आत ठेवलाय, त्याने
लाडवाचा ओलावा कमी होतो. )

मला रव्याचे लाडू मऊसर आवडतात. (तसे नसले तर रांगोळीचा लाडू खाल्यासारखा वाटतो मला.)
हा लाडु मऊसर होतो. फ़ारसा टिकणार नाही, पण चवीला मस्त लागतो. (फ़्रीजमधे आठवडाभर
राहील. ) या प्रमाणात ५० ते ६० लाडू होतात. (कपाच्या आणि लाडवाच्या आकारावर अवलंबून )

वाढणी/प्रमाण: 
५० ते ६० लाडू होतील.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे जमले आहेत तर लाडु "तो खिच मेरी फोटो" म्हणत नाहीयेत का? म्हणत नसतील तरी एक फोटो खिचुन शेअर करा.

आज रवा लाडू केले होते, रवा नारळ पाकात घा त्या पातेल्यावर झाकण ठेवले पातेलं आणि त्यातलं मिश्रण गार होईपर्यत. त्याला चांगले तीन चार तास लागले त्यामुळे पाकात रवा मुरायला सवड मिळाली . लाडू मस्त मऊ तरी ही खुटखुटीत झाले आहेत.
करुन बघा पुढच्या दिवाळीत हे.
हा फोटो.
20231217_144417_0.jpg

Pages