रवा आणि खोबर्‍याचे लाडू

Submitted by दिनेश. on 12 October, 2009 - 02:01
rava khobare ladu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

चार कप बारिक रवा, दोन कप बारिक वाटलेले ओले खोबरे ( एका मध्यम नारळाचे एवढे होते)
एक कप तूप, तीन कप साखर, मोठी चिमूट केशर (किंवा हवा तो स्वाद ), बेदाणे व काजू
(आवडीप्रमाणे )

क्रमवार पाककृती: 

जाड बुडाच्या भांड्यात थोडे तूप घालून रवा भाजायला घ्या. फ़ार गुलाबी करायचा नाही.
शक्य असेल तर खोबरे वाटताना फ़क्त शुभ्र भाग घ्या (मी आळस केला ) रवा भाजत आला
कि त्यात खोबरे घाला. परतत रहा, रवा परत हाताला हलका लागला पाहिजे ( खोबर्‍याचा
ओलेपणा रहायला नको. ) लागेल तसे तूप घालत रहावे.
दुसर्‍या भांड्यात साखर आणि दिड कप पाणी घालून पाक करत ठेवा. सतत ढवळत रहा.
पाकातच केशर किंवा वापरत असाल तो स्वाद घाला. उकळी येउन फ़ेस आला कि गॅस मंद
करा. पाकातला चमचा वर काढून, थोडासा पाक अंगठा आणि पहिले बोट यांच्यामधे धरुन
बोटे हळूहळू लांब करा. एखादी तार दिसायला लागली कि गॅस बंद करा व अर्ध्या कपापेक्षा
थोडा जास्त पाक काढून ठेवा. मग पाकात रव्याचे मिश्रण घालून ढवळा.
दोन तीन तास झाकण न ठेवता मुरु द्या. मग लाडू वळायला घ्या. मिश्रण कोरडे वाटले तर
काढून ठेवलेला पाक कोमट करुन लागेल तसा मिसळा. (रवा किती जाड आहे, यावर किती
पाक लागेल, ते ठरते ) मिश्रण हाताला शिऱ्यापेक्षा थोडे घट्ट लागेल, इतका पाक घाला. लाडु
वळताना, हवे तसे बेदाणे व काजू वगैरे वापरा. (मी भाजलेला काजू लाडूच्या आत ठेवलाय, त्याने
लाडवाचा ओलावा कमी होतो. )

मला रव्याचे लाडू मऊसर आवडतात. (तसे नसले तर रांगोळीचा लाडू खाल्यासारखा वाटतो मला.)
हा लाडु मऊसर होतो. फ़ारसा टिकणार नाही, पण चवीला मस्त लागतो. (फ़्रीजमधे आठवडाभर
राहील. ) या प्रमाणात ५० ते ६० लाडू होतात. (कपाच्या आणि लाडवाच्या आकारावर अवलंबून )

वाढणी/प्रमाण: 
५० ते ६० लाडू होतील.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्ध्या कपापेक्षा थोडा जास्त पाक काढून ठेवा.>>>> असं का? कमी पडेल म्हणून की काय.त्यापेक्षा पाण्याचे प्रमाण कमी केले तर नाही का चालणार?

देवकी, रव्याच्या जाडीनुसार पाक कमीजास्त लगतो. नेमका अंदाज असेल तर प्रश्नच नाही पण कमी पडला तर परत पाक करेपर्यंत मिश्रण कोरडे होते. पाक उरलाच तर कशातही अगदी चहा / सरबतातही वापरता येतो.

झंपी, बिघडलेल्या लाडवाचाही शिरा, साटोर्‍या करता येतात.

दिनेशदा, तुम्ही खूप छान रेसिपी दिली आहे. मी आज १/४ प्रमाणात सर्व घेऊन ट्राय केले. मोजून १५ लाडू झाले. लाडू छान वळले गेले आहेत पण चव घेऊन पाहिल्यावर रवा अगदी किंचित कच्चा लागतो आहे. कदाचित नीट मुरल्यावर नाही लागणार.
विचार केल्यावर लक्षात आले की लाडू पांढरेशुभ्र दिसावेत म्हणून मी रवा खमंग भाजला नाही! आत्तापर्यंत इथे आलेले प्रतिसाद वाचून कळले की ही चूक करणारी मी पहिलीच! सो म्हटलं की इथे माझी चूक लॉग करावी म्हणजे कोणाला तरी फायदा होईल! रवा नीट खमंग भाजून घ्यावा नाहीतर लाडू कच्चट लागतात Sad
आत्ता फ्रीजमध्ये ठेवून दिले आहेत. ह्या चुकीला काही troubleshooting option आहे का? Otherwise, १५ च लाडू आहेत आणि तसे खाणेबल झाले आहेत सो संपतील.
दिनेशदा तुमची रेसिपी वाचून मी धाडस केलं! तुम्हाला खूप खूप धन्यवाद!!

. स्मित. एकदा केले ते सासुबाईंनी पुढचे तिनचार दिवस शि-यासारखे खाल्ले. स्मित
>> सासू सुनांच्या सिरियलमध्ये यावर एखादा एपिसोड होऊन जायला हरकत नाही::फिदी:

जिज्ञासा,
रवा कमी भाजला तर तो विरघळतोच. आता परत त्याचे लाडू व्हायचे नाहीत पण ते फोडून त्यात थोडे कढत पाणी घालून ( अगदी चमच्या चमच्याने ) शिर्‍यासारखा प्रकार करता येईल. असे केल्यावर मिश्रण मऊ लागले तर ते सारण वापरून साटोर्‍याही करता येतील.

रवा कमी भाजला तर तो विरघळतोच.>> असे झाले नाही! म्हणजे लाडू नीट वळता आले आणि आता ते बरे लागत आहेत! पण तरी थोडी करकर वाटत्येय! बहूतेक रवा चांगला नसावा आणि शिवाय मी किंचित कमी भाजला असावा!
दिनेशदा, तुमच्या suggestions साठी thank you! आणि तुम्हाला दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

मी किती वेळा हि पाकृ बघते.
पण बिघडले तर खाणार कोण?( घरी एकच मी रवालाडू गोडी आहे) फिदीफिदी<<<< मला पण हाच प्रश्न सतावतो आहे Happy अगदी चांगले जरी झालेत तरी खाणार कोण. मी सगळ सामान आणुन ठेवलं आहे. पण शेवटी शीराच बनावला वीकेंड ला.

आज मी बेसनाचे पण सोपे लाडू लिहिले आहेत. ऑफिसमधल्या ज्या लोकांनी कधी बेसनलाडू बघितलाही नव्हता, त्या लोकांनी पण आवडीने खाल्ले.

मी घाईघाईत हे लाडू आज करायला घेतले. आणि तूप न घालता रवा भाजला. Sad खोबरं घातल्यावर चूक लक्षात आली. मग थोडं थोडं तूप घातलं आणि चांगलं भाजलं. आता मुरायला ठेवलंय. दिड तास झालाय. काही बिघडेल का? आता काही करू का?

~साक्षी

धन्यवाद डीविनिता!

मी जिज्ञासा सारखेच म्हणते.
म्हणजे लाडू नीट वळता आले आणि आता ते बरे लागत आहेत! पण तरी थोडी करकर वाटत्येय! मी किंचित कमी भाजला असावा!

पहिल्यांदा केले होते तेंव्हा खूपच सुंदर झाले होते.

~साक्षी

खुपच छान दिसतात. अगदी साच्यातन काढल्यासारखे.. मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते . नारळ [खोवलेल] व साखर थोडी साय घालुन मिक्स करते व मा वे. त शिजवुन घेते .इ कडे गॅसवर रवा भाजुन घेते. चांगला भाजला कि त्यात १-२ चमचे दूध घालुन सारख करते. नंतर सर्व एकत्र करुन ड्राय. भरड घालुन लाडू बनवते. असेही छान होतात.

नारळाऐवजी डेसिकेटेड कोकोनट वापरून लाडू बनवायचा प्रयत्न केला. दिनेशदांच्या मधल्या पानांवरच्या सल्ल्यानुसार आधी दूध वापरून बनवले तर चक्क शिर्‍याचा लाडू लागत होता. पुढच्या वेळी अजून कमी दूध टाकले तर खूप भगराळ रवा मिक्स्चर(पाकात टाकण्यापूर्वीचे मिक्स्चर) झाले. ऐन वेळी बरीच मारामार केली आणि लाडू बनवले, पण टेस्ट नेहेमीच्या लाडवाच्या जवळपास जाण्यासारखीही नाही आली. काय चुकलं असेल? (किंवा काय करता येईल? : आमच्या इथे चांगलं नारळ वेळेवर मिळण्याची मारामार असते. तेव्हा हे प्रकरण चाललं तर खूप सोप्पं होईल, म्हणून हा पोस्टप्रपंच!)

धारा, नारळ ताजाच लागतो, नाहीतर चव नीट येत नाही. कंडेन्स्ड मिल्कने चांगली चव येईल असे वाटतेय.

येस! धन्यवाद वैशाली! मी हिच रेसिपी म्हणते होते, मी याने त्यावेळेस ताजा नारळ( स.न्पवायचा होता) वाप्रुन केले होते पण, डेसिकेटेड वापरुन ही होतिल चा.न्गले.

रव्याच्या लाडवांना साखरेऐवजी गुळाचा पाक वापरला तर? कुणी बनवलेत गुळ्याच्या पाकाचे लाडू ? (गुळाच्या पाकासाठी तो पाकाचा बाफ वाचते.)

धारा, कडक, चिवट होतील गुळाच्या पाकातले लाडू. लाडू ज्याचा करायचा तो घटक कुरकुरीत असेल ( चणाडाळ, बुंदी, शेंगदाणे, कुरमुरे, डिंक, तीळ वगैरे ) तर गुळाचा पाक चालू शकतो.

बर्‍याच वर्षांनी हे लाडु करायचे धाडस केले आहे. प्रत्येक पायरी काळजीपुर्वक चढुन आता सगळे मिक्स करुन ठेवलेय. देव भले करो त्या लाडवांचे. झाले तर लाडु नैतर सांजोर्‍या म्हणायची वेळ न येवो हीच त्या जगन्नियंत्याचरणी प्रार्थना!!!!

Pages