रानभाजी १२) मायाळू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 July, 2010 - 01:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मायाळूच्या भजीचे साहित्य :
मायाळूची आख्खी पाने स्वच्छ धुवुन
बेसन १ वाटी
हिंग चिमुटभर
पाव चमचा हळद
चवीपुरते मिठ
दोन चिमुट ओवा असल्यास
अर्धा चमचा तिखट
तळण्यासाठी तेल

मायाळूची पिठ पेरुन भाजीचे (भगरा) साहित्य :
मायाळूची पाने धुवुन चिरुन
बेसन पाव वाटी
१ मोठा कांदा
फोडणी : राई, जिर, हिंग
हळद
१ चमचा मसाला किंवा २-३ मिरच्या
पाव चमचा साखर
अर्धा चमचा गोडा मसाला
चविपुरते मिठ

क्रमवार पाककृती: 

मायाळूच्या भजीची पाककृती :
मायाळूची पाने आख्खी स्वच्छा धुवुन घ्यावीत. मग तेल सोडून साहीत्यात दिलेले सगळे जिन्नस थोडे पाणी घालून मिक्स करावे. थोडे घट्टच ठेवावे. बटाट्याच्या भजीला ठेवतो तसे. मग मायाळूचे एक एक पान भिजवलेल्या पिठात बुडवुन गरम तेलात सोडावे. गॅस मिडीयम ठेवाव. थोड्या वेळात भजी पलटून मग भजीला किंचीत लालसर रंग आला की काढाव्यात.

मायाळूच्या भाजीची (भगरा) पाककृती :
प्रथम कढईत वरील फोडणी द्यावी मग कांदा घालून थोड परतवुन हळद, हिंग मिरची किंवा मसाला घालावा. त्यावर मायाळूची चिरलेली पाने घालावीत. आता थोडावेळ पाने शिजवुन मग त्यात कोरडेच बेसन भुरभुरावे. मग त्यात गोडा मसाला, मिठ साखर घालून वाफेवर शिजू द्यावे. गॅस मंद ठेवावा नाहीतर खाली लागते. बेसन शिजले की गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

मायाळूच्या पानांचा वेल खुप पसरतो. ही पाने वर्षभर मिळतात. त्याला छोट्या काळ्या बिया येतात त्या जमिनीवर पडल्या कि तिथे ह्याचि भरपुर रोपे उगवतात.
मायाळुच्या पानांची आमटीही करतात. पालकाच्या आमटीप्रमाणे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटू बी टाका बाई.. म्हणजे मी जिला मायाळु समजते ती खरेच मायाळू आहे का हे कळॅल... ह्या नावाची एक भाजी बाजारात मिळते म्हणुन...

मायाळूची कारवारी पद्धतीची आमटी मस्त लागते. (लाल मिरची, धणे, खोबर्‍याचे वाटण लावून.) त्यात फणसाच्या बिया टाकायच्या.
याच्या फळाला आम्ही लहानपणी शाईची फळे म्हणायचो. भिंतिवर रंगरंगोटी करायला उपयोगी पडायची. लाल देठाप्रमाणेच, हिरव्या देठाची पण असते. तिचे कोवळे देठ आमटीत घेतात.
सुकट घालून पण हिची भाजी करतात.
नायजेरियात याला वॉटर लिफ म्हणतात.

बरे झाले फोटो टाकलास ते. बाजारात एक वेलीसारखी भाजी येते, जाड देठ असतात आणि देठागणिक पाने असतात. पुर्ण देठासकट हिरवी भाजी. मला भय्याने 'मायालु' म्हणुन तिचे नाव सांगितले. जरा मांसल असते. मुळांचा वगैरे पत्ता नसतो. बारातेरा अर्धा फुट कापलेल्या वेलीच बांधलेल्या असतात जुडीत. आता ही कोण ते कोणाला माहित आहे काय??

नाही ना. त्याची पाने ह्याहुन मोठी असतात, अशी सुबक नसतात आणि जवळजवळ असतात.. पानांमुळे देठ दिसत नाही त्याचा.

मायाळूची कारवारी पद्धतीची आमटी मस्त लागते.>> दिनेश अगदि खरं! आमच्या बाजुला कामत राहतात हि करी खुप छान बनवायची. तिच्यामुळेच हि मायाळुची भाजी कळली.

मलाही साधना म्हणते आहे तीच भाजी मायाळू म्हणुन माहितीये. जरा उग्र वास येतो तिचा. आणि चव आवडली नाही. एखाद्या दिवशी बदल म्हणुन ठिक. Happy

जागूची मायाळु वेगळी दिसते आहे.

जागू कोठल्या कोठल्या भाजा टाकतेस ___/\___ बाई तुला.
गिनिज बुकातच टाकले पाहिजे तुला..
आता तळ ठोकून राहतेच बघ तुझ्याकडे, चांगली महिनाभर; मग मला रोज नवी भाजी Happy

रैना हा खुप पहिल्यापासुन आहे आमच्याकडे मायाळु. आमच्या बाजारातपण हिरवा मायाळू येतो. तु भजी करुन बघ उग्र वास नाही येत त्याला.

असा मायाळू पाहिला नव्हता. इथे भारतीय ग्रोसरीत पोही नावाने भाजी मिळते, ती माझ्या माहितीनुसार मायाळू. शिजवल्यावर जरा बुळबुळीत होते. पालकासारखी ताकातली भाजी करतात.

जागू, तुझ्यामुळे खूप वर्षांनी पोईचा वेल (फोटोत का होईना) दिसला. याच्या पानांची भजी तर अफलातून होतात. वेलाच्या एरोण्यांसारख्या फळांमधून शाईसारखा जांभळा द्रव निघतो. लहानपणी त्याने मेंद्या आणि मेकअप. Proud

ताकातल्या पातळभाजीपेक्षा पीठ पेरलेली कोरडी भाजी मस्त लागते.

इथली पोही/ पोइ नावाची भाजी मिळते त्याची कोलंबी किंवा सोडे घालून पण मस्त 'आंबट' करतात.
( आंबट म्हणजे कोकणी मधे साधारण पळीवाढा / पातळ करी टाइप प्रकशकतो)

स्वाती बरोबर आहे ही भाजी शिजल्यावर बुळबुळीत होते. म्हणून नुसती भाजी करत नाहीत ह्याची. पिठपेरुन छान होते.
मृण्मयी मी सुद्धा लहान असताना ह्याच्या बियांचा कलर करायचे.
मेधा आता मी पण कोलंबीमध्ये टाकुन बघेन.

आजच मायाळू आणली आहे. मोठे मोठे देठ आहेत ते कुंडीत खोचून ठेवले आहेत पुढे देवाजीच्या भरवशावर. मोठी पानं काढून ठेवली आहेत ती आंबटवरणात ढकलण्यात येतील.