दाल माखनी

Submitted by अल्पना on 19 March, 2010 - 16:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाउण वाटी आख्खे उडीद, पाव वाटी राजमा, पाव वाटीपेक्षा कमी हरबर्‍याची डाळ, २ चमचे बारीक चिरलेले अद्रक, ४-५ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, १ हिरवी मिरची चिरुन, १ कांदा किसून, २ टॉमेटो किसून, १/२ वाटी ताजी साय, एक मोठा चमचा सायीचं दही
फोडणीसाठी थोडं तेल, जीरे, मेथ्या, हळद, १ चमचा धण्याची पावडर, १/२ चमचा गरम मसाला, १/२ चमचा देगी मिर्च पावडर, चवीप्रमाणे मीठ, चुटकीभर हिंग

क्रमवार पाककृती: 

राजमा व आख्खे उडीद ३-४ तास भिजत ठेवावेत. नंतर यामध्ये हरबर्‍याची डाळ व मीठ व हिंग घालून साधारण्तः तिपटीपेक्षा थोडं जास्त पाणी घेवून कुकरमध्ये ३-४ शिट्ट्याकाढून शिजवून घ्यावं. जर तिन तासापेक्षा जास्त वेळ डाळ / राजमा भिजला असेल तर ३ शिट्ट्यात शिजतं.
बाजूलाच कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करावे.. त्यात जीरे व मेथ्या घालून फोडणी करावी. यात आधी चिरलेलं आलं, लसूण व मिरची घालावी.१-२ मिनिटं मंद आचेवर परतावे. नंतर त्यात किसलेला कांदा टाकून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतावे. हळद घालून घ्यावी. (हळद फोडणीत न टाकता डाळ शिजत असताना कुकरमध्येच टाकली तरी चालेल). कांदा परतल्यावर टॉमेटो घालून परत परतावे. त्यात धण्याची पूड व गरम मसाला घालून परतावे. ५-१० मिनिटं झाकून ठेवावं. यामध्ये आता शिजलेली डाळ घालावी. व एक उकळी येवू द्यावी. नंतर ताजी साय फेटून घालावी. व दाल माखनी मंद आचेवर ठेवावी. मधून अधून हलवत रहावे. किमान १०-१२ मिनिटं तरी नक्कीच उकळू द्यावी. त्यात फेटलेलं सायीचं दही घालून अजून एक उकळी येवू द्यावी.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणं
अधिक टिपा: 

मी शक्यतो मिक्सर वापरत नाही म्हणून कांदा, टॉमेटो किसून घेते. मिक्सर किंवा फुडप्रोसेसर मधून अगदी बारीक केले तरी चालते.
नवरात्रात किंवा सणासुदीला / करवा चौथ वैगरेला कांदा लसूण खात नाहीत. त्यावेळी आल्याचं प्रमाण थोडं वाढवून बाकीचे पदार्थ तसेच ठेवले तरी छान होते.

माहितीचा स्रोत: 
सायोची पनीर माखनी वाचल्यानंतर मी केलेले प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना, तुझ्या पद्धतीने केली आज दाल माखनी. मस्त झालीये एकदम. आख्खे उडीद मोड काढून घेतले. सायीच्या ऐवजी हेवी क्रीम घातले.