
लेखाचं शीर्षक वाचून “कोकणातल्या जांभा खडकांवर ममोंनी लिहिलं होतंच, आता बहुतेक गणपतीच्या मातीवर लिहिलंय; पण टायपिंग करताना चुकून माती ऐवजी माटी लिहिलं गेलंय," असा विचार नका करू. मला कोकणावर लिहायला कोणताही विषय चालतो. त्यामुळे त्यावरही लिहीन कदाचित कधीतरी! पण हे मात्र मातीवर न लिहिता माटीवरच लिहिलं आहे. माटी म्हणजे काय? कोकणात हिचं महत्त्व काय आहे? कोकणवासीयांच्या मनात हिचं काय स्थान, वगैरे कहाणी ऐकायची असेल तर हातत तांदळाचे चार दाणे घेऊन बसा माझ्या बाजूला!
कोकणात होळी आणि गणपती हे दोन सण धूमधडाक्याने साजरे होतात. कोकणात कायम वास्तव्य नसलेला कोकणी माणूस जिवाचा आटापिटा करून ह्या दोन सणांना कोकणात त्याच्या मूळ घरी जातो. वर्षभर बंद असणारी घरेही या दोन सणांच्या काळातच आपल्या माणसांचा आवाज ऐकतात. सण साजरा करण्याची त्यांची लगबग, उत्साह अनुभवतात आणि स्वतःही आनंदित होतात.
कोकणातले लोक मुळातच हौशी आणि कलोपासक! त्यामुळे घरगुती स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या गणपतीसाठीही अगदी मन लावून दरवर्षी नवीन अशी काहीतरी सजावट घरातलेच सगळे मेंबर मिळूनच करत असतात. सजावट काहीही असली तरी प्रत्येक घरी गणपतीच्या वर माटी मात्र बांधलेली असतेच. ती कोकणातली एक खास परंपरा आहे. माटीला माटवी, मांडवी, माटोळी अशीही नावे आहेत. पण आम्ही माटीच म्हणतो.
चार महिने मुसळधार पडणाऱ्या पावसापासून बचाव करण्यासाठी कोकणातली घरं कौलारू आणि उतरत्या पाख्याची असतात. पूर्वी रात्र झाली की कौलांच्या पट्ट्यांवरून उंदरांचा, घुशींचा सुळसुळाट सुरू होत असेल. त्यांच्यामागे मांजरंही धावत असतीलच. कौलांमधून कधी कधी साप आणि इतर सरपटणारे प्राणी खाली पडत असतील. कधी कौल फुटून खाली पडण्याच्या घटनाही घडत असतील. त्यात लाईट नसल्यामुळे लख्ख प्रकाश माहीतच नव्हता घरांना! अंधार पडला की कंदील, भुत्ये, चिमण्या यांचाच मिणमिणता कारभार सगळा. अश्या परिस्थितीत गणेशोत्सवात काही विपरीत घडू नये; निदान गणपतीची मूर्ती तरी सुरक्षित राहावी, या हेतूने कोकणात गणपतीच्या आसनावर माटी बांधण्याची प्रथा पडली असेल, हा माझा तर्क.
माटी म्हणजे गणपतीच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या मखरावर/आसनावर केलेलं एक ॲडिशनल छप्पर. तीनेक फूट लांबरुंद अशी ही लाकडाची एक चौकट असते आणि तिच्यावर ठराविक अंतर सोडून उभ्याआडव्या पट्ट्या मारलेल्या असतात. काही ठिकाणी या पट्ट्यांच्या वरही एक लाकडाची फळी लावून माटी वरून बंदिस्त केलेली असते. अश्या वरून बंदिस्त असणाऱ्या दोन माटी कोकणात आमच्याकडे आहेत. एक आम्ही कायमस्वरूपी देवघरावर बांधली आहे आणि दुसरी माजघरात जिथे गणपती बसवतो, तिथे. ही माटी गणपतीच्या आसनाच्या/मखराच्या वर तीनचार फूट राहील अशी ऍडजस्ट करून कौलाच्या पट्ट्यांमधून दोऱ्या घालून नीट घट्ट बांधली जाते. काही घरांत त्या जागी हूकही मारलेले असतात. ठराविक अंतर सोडून मारलेल्या लाकडाच्या उभ्याआडव्या पट्ट्यांमुळे तयार झालेल्या जाळीचा उपयोग माटीची सजावट करायला होतो.
ऐपत असेल त्याप्रमाणे माटीला चारी बाजूने नक्षीची बॉर्डरही असते, ज्यामुळे माटीचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. तसेच ज्याच्यात्याच्या ऐपतीप्रमाणे सागवानी, शिसव, शिवण असे लाकूड वापरले जाते.
पूर्वी कोकणात रोख पैसा कमी होता, "गेलं बाजारात आणली वस्तू," असं मार्केटही नसे जवळपास! त्यामुळे सड्यावरच्या रानात आणि घराच्या आसपास मिळणाऱ्या नैसर्गिक वस्तूच माटीला बांधून गणपतीची सजावट करण्याची कोकणातली परंपरा आहे. माटी कोकणी लोकांच्या मनाच्या इतकी जवळची आहे की शहरातही काही कोकणी घरांत गणपतीच्या आसनावर विकतच्या वस्तूंनी सजवलेली माटी आपल्याला पाहायला मिळते. माटीशिवाय गणपतीच्या आराशीला पूर्णत्व नाही, हेच खरे.
माटीच्या सजावटीचा पहिला मान शुभ समजल्या जाणाऱ्या असोल्या नारळाचा. नैसर्गिक आणि मजबूत असणारा केवणीचा दोर किंवा हल्ली सुतळी, दाभणाने नारळाच्या चोड्यात ओवून,; नंतर तो माटीच्या मधोमध असणाऱ्या त्या उभ्या आडव्या पट्ट्याना घट्ट बांधतात आणि माटीच्या सजावटीचा शुभारंभ होतो. नारळाखालोखाल मान सुपारीचा. सुपारीच्या फुलांचे लोंबणारे पांढरे शुभ्र घोस आवर्जून लावले जातात. त्या लोंबणाऱ्या घोसांमुळे माटी खूप सुंदर दिसायला लागते. मग हिरवेगार आंब्याचे टाळे चारी कोपऱ्यांत आणि मध्येही लावतात. आगारातली जून झालेली तवसं माटीला टांगतात. तसेच मोठीमोठी भेंडी, छोटे दुधी भोपळे, केळ व्यायलेली असेल तर एखादी केळ्याची फणी, मक्याचं कणीस , वांगी अश्या अनेक नैसर्गिक वस्तू माटीला बांधल्या जातात.
भाद्रपदात सड्यावरच्या रानात तीनचार महिने झालेल्या पावसामुळे अनेक प्रकारची फुलं फुललेली असतात. तेरडा, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे लाल पिवळी दिसणारी अग्निशिखा किंवा बोलीभाषेत कळलावी, कुड्याच्या फुलांचे निळे, गुलाबी तुरे, रानात सहज मिळणारी पिवळी हरणं किंवा सोनकी , गोल चेंडूसारखी दिसणारी पिवळ्या, नारिंगी किंवा लाल रंगाची कवंडळं अश्या परिसरात मिळणाऱ्या अनेक गोष्टींची सुंदर रंगसंगती साधून माटीची सजावट करतात. गणपतीची इतर काहीही आरास केली तरी माटी बांधणे सजावटीचा एक अनिवार्य भाग आहे कोकणात! मला एका गोष्टीचं नवल वाटतं की गुलाब, जास्वंद अशी फुलं माटीला कधीच लावली जात नाहीत. सजावटीसाठी अशीच फुलं, फळ परंपरेने वापरली जातात, जी झाडावरून तोडली तरी पटकन कोमेजणार नाहीत. त्यामुळे गणाशोत्सवाचे सर्व दिवस माटीचं सौंदर्य टिकून राहते. तसेच ह्यातल्या बहुतेक वनस्पती औषधीही आहेत . माटीच्या परंपरेमुळे आपसूकच त्यांचं संगोपन, संरक्षण आणि संवर्धनही रानात केलं जातं. आपल्या आजूबाजूच्या परिसरात मिळणाऱ्या साहित्यातून आपल्या हातांनी विविध रंगांनी जेव्हा माटी सजते, तेव्हा तिच्याकडे बघताना एक वेगळंच समाधान मिळतं.
हल्ली बाजारात स्वस्त, सहज उपलब्ध असणाऱ्या आणि वर्षानुवर्षे छान टिकणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू - जसे मण्यांची तोरणं, प्लास्टिकच्या फुलांचे गुच्छ, निरनिराळी फळं, विजेच्या दिव्यांच्या माळा ह्यांच्या आक्रमणात निसर्गातील जैवविविधता जपणारी, रोजचं जगणंही निसर्गाच्या हातात हात घालून जगायला शिकवणारी ही माटीच्या सजावटीची कोकणातील समृद्ध परंपरा अशीच कायम टिकून राहू दे हीच त्या विघ्नहर्त्या गजाननाच्या चरणी प्रार्थना !
मनीमोहोर
माटवी ह्या मूळ शब्दाचा
माटवी ह्या मूळ शब्दाचा अपभ्रंश माटी! गणपतीच्या आधी
एखाद दोन दिवस माटी बांधायला सुरुवात होते. " माटी बांधल्यास काय ? " हा त्या दोन दिवसात हमखास कानी पडणारा प्रश्न ! आपापल्या आवाठात (म्हणजे वाडी किंवा जवळपासच्या घरांचा समुह) आरतीला गेल्यावर त्या घरची माटी बघणे ( आणि कोकणी स्वभावानुसार तिरकस कमेंट्स देणे) हा कार्यक्रम आधी आणि नंतर आरती (आरत हा कोकणी शब्द) करणे.
हल्ली मुंबईत देखील माटवीचें सामान मिळते पण कोणाच्या घरी माटवी नसते. परंपरा जपण्याचा प्रयत्न अजूनही होतो ह्यात आनंद मानून घ्यायचा.
सिंधुदूर्गातील माटी/माटवी जरा
सिंधुदूर्गातील माटी/माटवी जरा वर रत्नागिरीत आलात की 'मंडपी' होते. काही ठिकाणी माटळी/माटोळीसुद्धा म्हणतात. बाकी सगळं सारखंच.
छान आहे हा लेख.
लेख आवडला
लेख आवडला
>>>>>> माटीच्या परंपरेमुळे
>>>>>> माटीच्या परंपरेमुळे आपसूकच त्यांचं संगोपन, संरक्षण आणि संवर्धनही रानात केलं जातं.
_/\_
सुंदर माहीती
सुंदर माहीती.
सुंदर माहीती.
फोटो ही असता तर छान झालं असतं.
शर्मिला, लेखाच्या सुरूवातीलाच
शर्मिला, लेखाच्या सुरूवातीलाच फोटो आहे.
प्रतिसाद edit केला.
प्रतिसाद edit केला.
(No subject)
संयोजकांना हा लेख माबो वर
संयोजकांना हा लेख माबो वर प्रकाशित केल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे ही आभार.
सिंधुदूर्गातील माटी/माटवी जरा वर रत्नागिरीत आलात की 'मंडपी' होते. काही ठिकाणी माटळी/माटोळीसुद्धा म्हणतात >> अगदी अगदी , प्रदेशानुसार थोडा फरक पडतो उच्चारात.
भ्रमर फोटो अगदी सुंदर आलाय. आमच्याकडे फार वस्तू नाही बांधल्या आहेत, तुमची माटी मस्त दिसते आहे हिरवीगार.
आरतीला आरत म्हणणे अगदीच पटलं. एखाद्या मुलीचं नाव आरती असेल तर तिला ही आरत च केलं जातं.
बाकी कोकणी रिमार्क वगैरे ही अगदी परफेक्ट.
बाकी आणखी ही कोणी माटी बांधत असतील तर इथे फोटो दाखवा, छान कलेक्शन होईल.
मला हा प्रकार माहीत नव्हता.
मला हा प्रकार माहीत नव्हता. हा लेख वाचल्यावर गावच्या गणपतीच्या फोटोंमध्ये आधी मांडवी बघायला लागलो.
हे दोन मालवणहून आलेत. मावसबहिणीच्या आणि मावशीच्या घरचे गणपती.

भरत छान फोटो.
भरत छान फोटो.
माटी प्रकार माहीत नव्हता,
माटी प्रकार माहीत नव्हता, नवीन माहिती 👍
फोटोंमुळे नीट समजले. पण लेख मनीमोहोर यांचा आणि प्रकाशित करणारे “संयोजक” हे का ते नाही समजले
मलाही माटी/मंडपी माहिती
मलाही माटी/मंडपी माहिती नव्हती. अर्थात आमच्या घरी गणपती नसायचा. मी लहानपणी गणपतीसाठी आजोळी जायचे. पण ते बहुधा चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीपासून. त्यामुळे सजावट आधीच झालेली असायची.
लेख छान झाला आहे.
गोव्याकडे गेले की माटोळी
गोव्याकडे गेले की माटोळी म्हणतात
अनिंद्य, संयोजकांनी तो लेख
अनिंद्य, संयोजकांनी तो लेख मायबोली गणेशोत्सवासाठी खास लिहवून घेतला आहे ; त्यामुळे संयोजकांनीच प्रकाशित केला आहे.
छान लेख. मला हे माटी प्रकरण
छान लेख. मला हे माटी प्रकरण सातवीत असताना समजले जेव्हा मी पहिल्यांदा गणपतीला गावी गेलो. त्यावेळी आमच्या चाळीमध्ये जे पंधरा-सोळा घरगुती गणपती असायचे त्यांच्यात फक्त एकाच्याच घरी माटी बांधली जायची. त्यामुळे पाहिली असली तरी ते त्यांचे डेकोरेशन वाटायचे. गावाला गेल्यावर समजले की ती एक परंपरेचा भाग म्हणून कॉमन आहे.
गावी मामाच्या गणपतीला अजूनही दरवर्षी इतर मखर मॉडर्न प्रकारचे असले तरी परंपरा म्हणून वर माटी असतेच. वर भ्रमर यांची जशी भरगच्च आहे. तितकी मात्र नसते.
या लेखामुळे त्यात काय काय असते, ते का असते, त्याचे फायदे आणि एकूणच माटी बांधायची प्रथा का सुरू झाली असावी वगैरे बरीच माहिती मिळाली. ममोताईचे लेख यामुळेच माझ्यासारख्या शहरातील कोकणी लोकांना जास्त भावतात.
आमच्याकडे माटवी नाहि माटोळी
आमच्याकडे माटवी नाहि माटोळी म्हणतात. माटवी सुद्धा काहि ठिकाणी आच्या भागात म्हणतात.
आता बहुतेक गणपतीच्या मातीवर
आता बहुतेक गणपतीच्या मातीवर लिहिलंय; पण टायपिंग करताना चुकून माती ऐवजी माटी लिहिलं गेलंय," असा विचार नका करू..... .... असंच वाटलं होते.
छान लेख.
माटवी ऐकले होते. आजी ' आरत ' म्हणायची
काही दिवसांपूर्वीच एका गृपवर
काही दिवसांपूर्वीच एका गृपवर माटोळी या भूषण भावे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाची माहिती मिळाली
कोकणी भाषेतील छान पुस्तक आहे
त्यात या परंपरेविषयी तसेच माटीमध्ये असणा-या फुलं, फळं याविषयी सुंदर माहिती आहे .
ठाणे, रायगड भागात पूर्ण छताला सजावट करत नाही पण गणपतीच्या वर असोला नारळ आणि दोन तीन रानटी फळं बांधली जातात
आताशा छताला शक्य नसेल तर एखादी चुक मारुन तरी ही फळं टांगली जातात
सर्वांना धन्यवाद..
सर्वांना धन्यवाद..
भरत छान फोटो दोन्ही.
सावित्रीच्या लेकी छान माहिती.
संयोजकांनी तो लेख मायबोली गणेशोत्सवासाठी खास लिहवून घेतला आहे ; त्यामुळे संयोजकांनीच प्रकाशित केला आहे. >> बरोबर ..
माटी हा एक सजावटीचा वेगळा आणि अनिवार्य भाग आहे हे माहित नसल्यामुळे तो एक सजावटीचाच भाग आहे अशी समजून झाल्याने माटी कोकणातल्या ही सर्व लोकांना माहीत नसावी. बाकी नॉन कोकणा वासियांना तर त्याबद्दल माहिती असण्याची शक्यता कमीच. असो. त्यामुळे त्यावर लिहिलं हे बरं झालं असं वाटतंय. आता लिखित स्वरूपात कायम राहिल.
आणखी कोणाकडे असतील फोटो तर इथे अवश्य दाखवा.
गोव्याकडे माटोळी हा शब्द
...
पूर्वी असोला नारळ आणि क वरुन
पूर्वी असोला नारळ आणि क वरुन काहीतरी नाव असलेली फळे, जी आणतो तेव्हा हिरवी असतात आणि मग लाल-नारिंगी रंग चढतो, बारीक पेअर च्या आकाराची असतात पण गोल असतात. आणि घड लागल्यासारखी बारीक बारीक अशीच लाल-गुलाबी होणारी दुसरी एक फळं आजोबा हमखास गणपतीच्या आराशीत लावायचे. कोकणची आठवण म्हणूनच असावी. दोन्ही खायची नसतात. रानटी फळेच असतात. तेव्हा ठाण्याला जांभळी नाक्याच्या बाजारात ही मिळत असत.
ती फळं + कृष्ण कमळ, केवडा. मग त्या केवड्याचं एक बारिक गाठ मारुन आत्या फुल करुन ते गणपतीच्या सोंडेत किंवा मुकुटासारखं करुन शिरपेचात खोवत असे.
अमित , कवंडळ का? वर लेखात आहे
अमित , कवंडळ का? वर लेखात आहे ते नाव.
कवंडळ (शास्त्रीय नाव: Trichosanthes tricuspidata किंवा Trichosanthes bracteata) ही प्रामुख्याने महाराष्ट्र, कोकण आणि गोवा परिसरातील जंगलात आढळणारी एक रानवेल आहे। इंग्रजीत तिला 'रेड बॉल स्नेक गॉर्ड' (Redball Snake Gourd) किंवा 'बिटर स्नेक गॉर्ड' म्हणतात।
फळे: ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान या वेलीवर चेंडूएवढी मोठी, ठसठशीत लाल रंगाची फळे येतात। पिकल्यावर त्यांच्यावर केशरी रेषा असतात।
कोकण आणि गोव्यात गणेशोत्सवादरम्यान गौरी-गणपतीच्या मांडवात (माटोळीत) लावली जाणारी ही एक महत्त्वाची वनस्पती आहे।गणपतीच्या आसनाभोवती किंवा मखर सजावटीमध्ये कवंडळांचे घोस बांधण्याची पारंपरिक प्रथा आहे।
विषारी फळे: ही फळे कडू आणि विषारी असल्यामुळे खाण्यासाठी वापरली जात नाहीत।
लगेच ए आय ला विचारलं
कवंडळं बरोबर!
कवंडळं बरोबर! तुमच्या, भ्रमरच्या आणि ममोंच्या फोटोत आहेत.
तुमच्या फोटोत हिरवी पण आहेत आणि रंग बदललेली पण आहेत.
ती लाल नारिंगी गोल फळं म्हणजे
ती लाल नारिंगी गोल फळं म्हणजे कवंडळ आणि बारीक लाल केसरी फळांचा घोस असतो त्या कंगण्या. आमच्याकडे बाकी काही मिळालं नाही तरी हे दोन नक्की बांधतात.
आमच्याकडे सातारा भागात माटवी
नेहमीप्रमाणेच सुंदर माहितीपूर्ण लेख.
आमच्याकडे सातारा भागात माटवी / माटी/ माटोळी हा प्रकार नसतो. पण देवघराच्या वर माटोळी सारखीच लाकडी मंडपी असते. नवरात्रीत देवापुढे घट बसतात तेव्हा त्याला फुलांच्या माळा, कडकणी बांधतात.
गणपती बसतात तेव्हा गणपतीच्या वर कापडी छत बांधले जाते.
इथे मुंबईत जेव्हा फुलं पत्री आणायला जातो तेव्हा मात्र मी आवर्जून मालकांगोणी (ज्योतिष्मती) आणि कवंडळ आणतो आणि त्याची सजावट करतो.
अरे! मस्त! घरी गणपती दीड
अरे! मस्त! घरी गणपती दीड -दिवसाचा असल्याने गणपती गेल्यावर मखरात ती उकलायची/ रंग बदलायची ते आणि त्यांचा काहीसा उग्र रानटी वास ही नाकात जाणवला.
बरोबर, कवंडळंच ती ..
बरोबर, कवंडळंच ती ..
मग त्या केवड्याचं एक बारिक गाठ मारुन आत्या फुल करुन ते गणपतीच्या सोंडेत किंवा मुकुटासारखं करुन शिरपेचात खोवत असे. Happy >> आम्ही ही ही करायचो आमच्या लहानपणी. हल्ली केवडा एवढा दिसत नाही.
ऋतुराज मस्त फोटो...
मस्त लेख हेमाताई!
मस्त लेख हेमाताई!
माझ्या कानात कोकणातल्या आरत्या वाजायला लागल्या.
ह्या माटी/ माटवीचा मागे इन्नाने उल्लेख केला होता.
कवंडळं माहिती नाही, आम्ही कांगण्या आणतो बऱ्याचदा.
खूप छान वाटतात त्या फुटलेल्या हिरव्या केशरी बिया.
खूपच मस्त लेख. ममोताई. नवीन
खूपच मस्त लेख. ममोताई. नवीन माहिती समजली.
कवंडळ माहिती आहे. इकडे विदर्भात इंद्रफळ म्हणतात. आम्ही दिवाळीच्या आराशीत वापरतो
Pages