गणपतीची माटी

Submitted by संयोजक on 15 September, 2026 - 02:11

लेखाचं शीर्षक वाचून “कोकणातल्या जांभा खडकांवर ममोंनी लिहिलं होतंच, आता बहुतेक गणपतीच्या मातीवर लिहिलंय; पण टायपिंग करताना चुकून माती ऐवजी माटी लिहिलं गेलंय," असा विचार नका करू. मला कोकणावर लिहायला कोणताही विषय चालतो. त्यामुळे त्यावरही लिहीन कदाचित कधीतरी! पण हे मात्र मातीवर न लिहिता माटीवरच लिहिलं आहे. माटी म्हणजे काय? कोकणात हिचं महत्त्व काय आहे? कोकणवासीयांच्या मनात हिचं काय स्थान, वगैरे कहाणी ऐकायची असेल तर हातत तांदळाचे चार दाणे घेऊन बसा माझ्या बाजूला!

कोकणात होळी आणि गणपती हे दोन सण धूमधडाक्याने साजरे होतात. कोकणात कायम वास्तव्य नसलेला कोकणी माणूस जिवाचा आटापिटा करून ह्या दोन सणांना कोकणात त्याच्या मूळ घरी जातो. वर्षभर बंद असणारी घरेही या दोन सणांच्या काळातच आपल्या माणसांचा आवाज ऐकतात. सण साजरा करण्याची त्यांची लगबग, उत्साह अनुभवतात आणि स्वतःही आनंदित होतात.

कोकणातले लोक मुळातच हौशी आणि कलोपासक! त्यामुळे घरगुती स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या गणपतीसाठीही अगदी मन लावून दरवर्षी नवीन अशी काहीतरी सजावट घरातलेच सगळे मेंबर मिळूनच करत असतात. सजावट काहीही असली तरी प्रत्येक घरी गणपतीच्या वर माटी मात्र बांधलेली असतेच. ती कोकणातली एक खास परंपरा आहे. माटीला माटवी, मांडवी, माटोळी अशीही नावे आहेत. पण आम्ही माटीच म्हणतो.

चार महिने मुसळधार पडणाऱ्या पावसापासून बचाव करण्यासाठी कोकणातली घरं कौलारू आणि उतरत्या पाख्याची असतात. पूर्वी रात्र झाली की कौलांच्या पट्ट्यांवरून उंदरांचा, घुशींचा सुळसुळाट सुरू होत असेल. त्यांच्यामागे मांजरंही धावत असतीलच. कौलांमधून कधी कधी साप आणि इतर सरपटणारे प्राणी खाली पडत असतील. कधी कौल फुटून खाली पडण्याच्या घटनाही घडत असतील. त्यात लाईट नसल्यामुळे लख्ख प्रकाश माहीतच नव्हता घरांना! अंधार पडला की कंदील, भुत्ये, चिमण्या यांचाच मिणमिणता कारभार सगळा. अश्या परिस्थितीत गणेशोत्सवात काही विपरीत घडू नये; निदान गणपतीची मूर्ती तरी सुरक्षित राहावी, या हेतूने कोकणात गणपतीच्या आसनावर माटी बांधण्याची प्रथा पडली असेल, हा माझा तर्क.

माटी म्हणजे गणपतीच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या मखरावर/आसनावर केलेलं एक ॲडिशनल छप्पर. तीनेक फूट लांबरुंद अशी ही लाकडाची एक चौकट असते आणि तिच्यावर ठराविक अंतर सोडून उभ्याआडव्या पट्ट्या मारलेल्या असतात. काही ठिकाणी या पट्ट्यांच्या वरही एक लाकडाची फळी लावून माटी वरून बंदिस्त केलेली असते. अश्या वरून बंदिस्त असणाऱ्या दोन माटी कोकणात आमच्याकडे आहेत. एक आम्ही कायमस्वरूपी देवघरावर बांधली आहे आणि दुसरी माजघरात जिथे गणपती बसवतो, तिथे. ही माटी गणपतीच्या आसनाच्या/मखराच्या वर तीनचार फूट राहील अशी ऍडजस्ट करून कौलाच्या पट्ट्यांमधून दोऱ्या घालून नीट घट्ट बांधली जाते. काही घरांत त्या जागी हूकही मारलेले असतात. ठराविक अंतर सोडून मारलेल्या लाकडाच्या उभ्याआडव्या पट्ट्यांमुळे तयार झालेल्या जाळीचा उपयोग माटीची सजावट करायला होतो.
ऐपत असेल त्याप्रमाणे माटीला चारी बाजूने नक्षीची बॉर्डरही असते, ज्यामुळे माटीचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. तसेच ज्याच्यात्याच्या ऐपतीप्रमाणे सागवानी, शिसव, शिवण असे लाकूड वापरले जाते.

पूर्वी कोकणात रोख पैसा कमी होता, "गेलं बाजारात आणली वस्तू," असं मार्केटही नसे जवळपास! त्यामुळे सड्यावरच्या रानात आणि घराच्या आसपास मिळणाऱ्या नैसर्गिक वस्तूच माटीला बांधून गणपतीची सजावट करण्याची कोकणातली परंपरा आहे. माटी कोकणी लोकांच्या मनाच्या इतकी जवळची आहे की शहरातही काही कोकणी घरांत गणपतीच्या आसनावर विकतच्या वस्तूंनी सजवलेली माटी आपल्याला पाहायला मिळते. माटीशिवाय गणपतीच्या आराशीला पूर्णत्व नाही, हेच खरे.

माटीच्या सजावटीचा पहिला मान शुभ समजल्या जाणाऱ्या असोल्या नारळाचा. नैसर्गिक आणि मजबूत असणारा केवणीचा दोर किंवा हल्ली सुतळी, दाभणाने नारळाच्या चोड्यात ओवून,; नंतर तो माटीच्या मधोमध असणाऱ्या त्या उभ्या आडव्या पट्ट्याना घट्ट बांधतात आणि माटीच्या सजावटीचा शुभारंभ होतो. नारळाखालोखाल मान सुपारीचा. सुपारीच्या फुलांचे लोंबणारे पांढरे शुभ्र घोस आवर्जून लावले जातात. त्या लोंबणाऱ्या घोसांमुळे माटी खूप सुंदर दिसायला लागते. मग हिरवेगार आंब्याचे टाळे चारी कोपऱ्यांत आणि मध्येही लावतात. आगारातली जून झालेली तवसं माटीला टांगतात. तसेच मोठीमोठी भेंडी, छोटे दुधी भोपळे, केळ व्यायलेली असेल तर एखादी केळ्याची फणी, मक्याचं कणीस , वांगी अश्या अनेक नैसर्गिक वस्तू माटीला बांधल्या जातात.

भाद्रपदात सड्यावरच्या रानात तीनचार महिने झालेल्या पावसामुळे अनेक प्रकारची फुलं फुललेली असतात. तेरडा, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे लाल पिवळी दिसणारी अग्निशिखा किंवा बोलीभाषेत कळलावी, कुड्याच्या फुलांचे निळे, गुलाबी तुरे, रानात सहज मिळणारी पिवळी हरणं किंवा सोनकी , गोल चेंडूसारखी दिसणारी पिवळ्या, नारिंगी किंवा लाल रंगाची कवंडळं अश्या परिसरात मिळणाऱ्या अनेक गोष्टींची सुंदर रंगसंगती साधून माटीची सजावट करतात. गणपतीची इतर काहीही आरास केली तरी माटी बांधणे सजावटीचा एक अनिवार्य भाग आहे कोकणात! मला एका गोष्टीचं नवल वाटतं की गुलाब, जास्वंद अशी फुलं माटीला कधीच लावली जात नाहीत. सजावटीसाठी अशीच फुलं, फळ परंपरेने वापरली जातात, जी झाडावरून तोडली तरी पटकन कोमेजणार नाहीत. त्यामुळे गणाशोत्सवाचे सर्व दिवस माटीचं सौंदर्य टिकून राहते. तसेच ह्यातल्या बहुतेक वनस्पती औषधीही आहेत . माटीच्या परंपरेमुळे आपसूकच त्यांचं संगोपन, संरक्षण आणि संवर्धनही रानात केलं जातं. आपल्या आजूबाजूच्या परिसरात मिळणाऱ्या साहित्यातून आपल्या हातांनी विविध रंगांनी जेव्हा माटी सजते, तेव्हा तिच्याकडे बघताना एक वेगळंच समाधान मिळतं.

हल्ली बाजारात स्वस्त, सहज उपलब्ध असणाऱ्या आणि वर्षानुवर्षे छान टिकणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू - जसे मण्यांची तोरणं, प्लास्टिकच्या फुलांचे गुच्छ, निरनिराळी फळं, विजेच्या दिव्यांच्या माळा ह्यांच्या आक्रमणात निसर्गातील जैवविविधता जपणारी, रोजचं जगणंही निसर्गाच्या हातात हात घालून जगायला शिकवणारी ही माटीच्या सजावटीची कोकणातील समृद्ध परंपरा अशीच कायम टिकून राहू दे हीच त्या विघ्नहर्त्या गजाननाच्या चरणी प्रार्थना !

मनीमोहोर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माटवी ह्या मूळ शब्दाचा अपभ्रंश माटी! गणपतीच्या आधी
एखाद दोन दिवस माटी बांधायला सुरुवात होते. " माटी बांधल्यास काय ? " हा त्या दोन दिवसात हमखास कानी पडणारा प्रश्न ! आपापल्या आवाठात (म्हणजे वाडी किंवा जवळपासच्या घरांचा समुह) आरतीला गेल्यावर त्या घरची माटी बघणे ( आणि कोकणी स्वभावानुसार तिरकस कमेंट्स देणे) हा कार्यक्रम आधी आणि नंतर आरती (आरत हा कोकणी शब्द) करणे.

हल्ली मुंबईत देखील माटवीचें सामान मिळते पण कोणाच्या घरी माटवी नसते. परंपरा जपण्याचा प्रयत्न अजूनही होतो ह्यात आनंद मानून घ्यायचा. Happy

सिंधुदूर्गातील माटी/माटवी जरा वर रत्नागिरीत आलात की 'मंडपी' होते. काही ठिकाणी माटळी/माटोळीसुद्धा म्हणतात. बाकी सगळं सारखंच.
छान आहे हा लेख.

>>>>>> माटीच्या परंपरेमुळे आपसूकच त्यांचं संगोपन, संरक्षण आणि संवर्धनही रानात केलं जातं.
_/\_
सुंदर माहीती

सुंदर माहीती.
फोटो ही असता तर छान झालं असतं.

संयोजकांना हा लेख माबो वर प्रकाशित केल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे ही आभार.
सिंधुदूर्गातील माटी/माटवी जरा वर रत्नागिरीत आलात की 'मंडपी' होते. काही ठिकाणी माटळी/माटोळीसुद्धा म्हणतात >> अगदी अगदी , प्रदेशानुसार थोडा फरक पडतो उच्चारात.
भ्रमर फोटो अगदी सुंदर आलाय. आमच्याकडे फार वस्तू नाही बांधल्या आहेत, तुमची माटी मस्त दिसते आहे हिरवीगार.
आरतीला आरत म्हणणे अगदीच पटलं. एखाद्या मुलीचं नाव आरती असेल तर तिला ही आरत च केलं जातं.
बाकी कोकणी रिमार्क वगैरे ही अगदी परफेक्ट.
बाकी आणखी ही कोणी माटी बांधत असतील तर इथे फोटो दाखवा, छान कलेक्शन होईल.

मला हा प्रकार माहीत नव्हता. हा लेख वाचल्यावर गावच्या गणपतीच्या फोटोंमध्ये आधी मांडवी बघायला लागलो.

हे दोन मालवणहून आलेत. मावसबहिणीच्या आणि मावशीच्या घरचे गणपती.mandvi.jpgmandvi2.jpg

माटी प्रकार माहीत नव्हता, नवीन माहिती 👍

फोटोंमुळे नीट समजले. पण लेख मनीमोहोर यांचा आणि प्रकाशित करणारे “संयोजक” हे का ते नाही समजले

मलाही माटी/मंडपी माहिती नव्हती. अर्थात आमच्या घरी गणपती नसायचा. मी लहानपणी गणपतीसाठी आजोळी जायचे. पण ते बहुधा चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीपासून. त्यामुळे सजावट आधीच झालेली असायची.
लेख छान झाला आहे.

अनिंद्य, संयोजकांनी तो लेख मायबोली गणेशोत्सवासाठी खास लिहवून घेतला आहे ; त्यामुळे संयोजकांनीच प्रकाशित केला आहे.

छान लेख. मला हे माटी प्रकरण सातवीत असताना समजले जेव्हा मी पहिल्यांदा गणपतीला गावी गेलो. त्यावेळी आमच्या चाळीमध्ये जे पंधरा-सोळा घरगुती गणपती असायचे त्यांच्यात फक्त एकाच्याच घरी माटी बांधली जायची. त्यामुळे पाहिली असली तरी ते त्यांचे डेकोरेशन वाटायचे. गावाला गेल्यावर समजले की ती एक परंपरेचा भाग म्हणून कॉमन आहे.
गावी मामाच्या गणपतीला अजूनही दरवर्षी इतर मखर मॉडर्न प्रकारचे असले तरी परंपरा म्हणून वर माटी असतेच. वर भ्रमर यांची जशी भरगच्च आहे. तितकी मात्र नसते.

या लेखामुळे त्यात काय काय असते, ते का असते, त्याचे फायदे आणि एकूणच माटी बांधायची प्रथा का सुरू झाली असावी वगैरे बरीच माहिती मिळाली. ममोताईचे लेख यामुळेच माझ्यासारख्या शहरातील कोकणी लोकांना जास्त भावतात.