मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

टिव्हीवर येणारी मालिका एकता कपूरची आहे असे म्हटल्याने काही बिघडत नाही. जगात सगळे देवाने बनवले आहे तसेच टिव्हीचे आणि एकता कपूरचे आहे. तिने प्रत्यक्ष बनवली नसेल तरी अप्रत्यक्ष सहभाग असेलच.

>>>द लायब्ररी नावाचे झोरान झिवकोविच यांचे एक पुस्तक आहे>>
शेवटी एकदा जालावर हे पुस्तक सापडले. रात्रीच वाचून काढले. फार छान आहे.
मायबोलीवर शोधा यात हे शोधल्यावर दोन ठिकाणी यांचे उल्लेख/धागे आढळले. त्यामुळे आता अधिक लिहीत नाही. झोरान झिवकोविचच्या Impossible Stories या पुस्तकात चार कथा आहेत त्यातली ही एक कथा आहे. नावच Impossible असल्याने डोकं थोडं बाजूला ठेवून कथा वाचायच्या. विचार केल्यावर लक्षात येते की लेखकाने उपरोध, व्यंगोक्ति, विडंबन वापर करून माणसांचे स्वभाव उघड पाडले आहेत. पुस्तकं कधीही न वाचणारे किंवा अधाशासारखे वाचणारे तसेच भरपूर पुस्तकं साठवणारे सगळ्यांना घेरलं आहे. आता उरलेल्या तीन कथा वाचून काढणार. हा लेखक आवडला आहे.

द मॅन-ईटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग - जिम कॉर्बेट

कॉर्बेटच्या सर्वाधिक लोकप्रिय पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे. आठ वर्षे गढवाल भागात, रुद्रप्रयागच्या आजूबाजूच्या परिसरात दहशत माजवलेल्या एका बिबट्याच्या शिकारीवरचं हे पुस्तक आहे. अधिकृतपणे १२५, पण प्रत्यक्षात त्याहून जास्त माणसांचा बळी घेणारा हा बिबट्या अनेक वेळा हुलकावणी देऊन शेवटी कॉर्बेटच्या गोळीची शिकार बनला.
कॉर्बेटच्या लेखनातली मला आवडणारी सगळी वैशिष्ट्यं या पुस्तकात आहेत. हिमालयावरचं, तिथे राहणाऱ्या माणसांवरचं त्याचं अस्सल प्रेम, त्यांच्या परिस्थितीबद्दल त्याला वाटणारी कणव, निसर्गाकडे बघण्याची, सौंदर्याची कदर करणारी दृष्टी, बंदुकीचा ट्रिगर दाबायच्या मोहावर मात करणारा, ट्रिगर न दाबण्याचा संयम, त्याचा ब्रिटिश नर्मविनोद हे सगळं या पुस्तकातून समोर येतं.
१९२६ साली हा बिबट्या कॉर्बेटने मारला. १९४२ साली अनपेक्षितपणे एका जखमी सैनिकाशी त्याची भेट झाली, जो गढवालचा होता आणि हा नरभक्षक बिबट्या मारला गेला तेव्हा तो खूप लहान असल्याने वडिलांबरोबर बिबट्या बघायला आणि त्याला मारणाऱ्या 'साहेबांना' बघायला जाऊ शकला नव्हता. आता कॉर्बेटला याचि देही याचि डोळा बघून तो अक्षरशः धन्य झाला होता आणि उत्साहाने सांगत होता की मी आता गावी गेल्यावर सगळ्यांना सांगणार आहे की मी तुम्हाला बघितलं आणि तुमच्याशी बोललोसुद्धा. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना युद्धात अपंग झालेला हा मुलगा हे बोलत होता. यावर कॉर्बेट लिहितो, ' A typical son of Garhwal, of that simple and hardy hill-folk ; and of that greater India, whose sons only those few who live among them are privileged to know. It is these big-hearted sons of the soil, no matter what their caste and creed, who will one day weld the contending factions into a composite whole, and make of India a great nation.
पुस्तक संपल्यावर ते संपल्याची हुरहूर वाटत रहावी, अशी काही पुस्तकं असतात. त्यापैकी हे एक पुस्तक आहे.

वावे हे पुस्तक मला इथे तुमच्यामुळे कळले, त्यासाठी धन्यवाद!
***

Iru - The Remarkable Life of Irawati Karve

आधी इरावती कर्वे आणि युगांत हे एक समीकरण माहीत होतं. पण हे पुस्तक वाचल्यावर इरावती बाईंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समजले, त्यांच्या कार्याचा अवाका किती मोठा होता याचा अंदाज आला.

भारतातील पहिल्या महिला समाजशास्त्रज्ञ/ मानववंशशास्त्रज्ञ, संशोधक, तत्वज्ञ, शिक्षिका, लेखिका अशा अनेक भूमिका त्यांनी मोठ्या कौशल्याने उत्तमरित्या पार पाडल्या. एक पहिली भारतीय मानव वंश शास्त्रज्ञ म्हणून प्रथमच
त्यांनी संशोधन आणि संस्कृतादी भाषेत असलेले साहित्य, ऐतिहासिक पुरावे यांची सांगड घालत भारतीय समाजव्यवस्थेच एक मूळ रूप जगासमोर मांडलं, तोपर्यंत भारतीय समाजाचा अभ्यास फक्त आंग्लदृष्टिकोनातून झाला होता.

पुस्तक वाचताना त्यांची कर्तव्य कठोरता, ध्येयासक्ती, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, वाचनाचा व्यासंग, विचारातली सुस्पष्टता, शिकण्याची ओढ, परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता, ज्ञानोपासना हे व असे अनेक गुण समोर येतात.

तसेच अजून एक महत्वाचे म्हणजे इरु आणि दिनू ( दिनकर कर्वे) हे समकालीन समाजव्यवस्थेपेक्षा अतिशय वेगळे, एकमेकांना समजून घेणारे, संतुलित, समतोल साधणारे जोडपे होते ह्याचा प्रत्यय येतो- मग ते इरुला शिक्षणासाठी परदेशी जायला दिलेले प्रोत्साहन असो किंवा संशोधनासाठी दिवसोंदिवस घराबाहेर, गावाबाहेर राहायला लागत असताना समर्थपणे दिनूने सांभाळलेली घरादाराची , मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असो, किंवा लिखाण - संशोधनात मग्न असलेल्या बायकोला आवश्यक तो आधार द्यायचा असो किंवा वेळोवेळी इरावती बाईंनी पतीप्रती दाखवलेली कृतज्ञता आणि आदरभाव असो.

असे असले तरी युगांत या त्यांच्या पुस्तकाला मिळालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारानिमित्ताने जेव्हा त्यांची ओळख महर्षी कर्व्यांची सून आणि दिनकर करव्यांची पत्नी म्हणून करून दिली जाते. तेव्हा स्त्री ची परिपूर्ती शेवटी कुणाची तरी mulagi, बायको, सून किंवा आई म्हणूनच होते या पारंपरिक विचारसरणीने व्यथित होतात.
त्यावेळी आज इतक्या दशकांनंतरही आजच्या काळातील आधुनिक, प्रगत (?) महिला जेव्हा नवऱ्याच्या पडछायेत राहूनच काम करणेच पसंत करतात ते बघून गंमत वाटते.

***

उर्मिला देशपांडे - इरावती कर्वेंची नात आणि थिएगो पिंटो बार्बोसा ( एक मानव वंशशास्त्राची विद्यार्थिनी) या दोघींनी मिळून, इतिहासातील काही नोंदी, कुटुंबातील लोकांचे अनुभव या सर्वांच्या आधारे हे चरित्रात्मक पुस्तक लिहिले आहे.

पुस्तकाची सुरुवात १९२९ मध्ये पीएचडी साठी इरुच्या जर्मनीकडे केलेल्या प्रयाणाने होते. मुंबई युनिव्हर्सिटी मधून समाजशास्त्रामध्ये मास्टर्स केल्यानंतर पुढील शिक्षण परदेशात करणे त्याकाळी क्रमप्राप्त ठरते. परक्या देशात, लोकांत, भाषेशी संस्कृतीशी जुळवून घेत स्वतःला सिद्ध करत त्या संशोधन चालू ठेवतात.
संशोधनाअंती, युरोपियन वंशवादाच्याक्षेत्रातील प्रस्थापित, डॉ. युजिन फिशर, जे त्यांचे पीएचडीचे प्रबंध मार्गदर्शक ही असतात, यांच्या मताविरुद्ध जाणारे निरीक्षण/ पडताळणी हाती लागल्यावर, ते ठामपणे मांडायला न डगमगणारी एक तीक्ष्ण बुद्धिवादी करारी स्त्री अभ्यासक आपल्याला भेटते आणि पुस्तक तिथेच पकड घेते.

पुस्तकात त्यानंतर त्यांचा भूतकाळ - बालपण, हुजूरपागतील शालेय दिवस, रँग्लर परांजपे यांच्या कुटुंबाशी होणारी जवळीक, त्यातून घडत गेलेले त्यांचे व्यक्तिमत्व, पुढे दिनकर कर्वेंशी जुळलेले सूत, विवाह - उलगडत जातो.
पुढे घर-गृहस्थी, मुलंबाळं, तुटपुंज्या संसाधनासह केलेले संशोधन - त्यासाठी महाराष्ट्राच्या/ देशाच्या काना कोपऱ्यात केलेली भ्रमंती, प्रसंगी कुटुंबियांकडून मिळालेली मदत, त्यांचे लिखाण - महाभारताला ऐतिहासिक दर्जा देत त्याचा नवीन अन्वयार्थ सांगितलेलं “युगांत, Kinship Organization in India सारखे काम, शिवाय अनेक निबंध, डेक्कन कॉलेजमध्ये सांभाळलेली समाजशास्त्र शाखेची धुरा अशा अनेक बाजू समोर येत जातात.
त्यानिमित्ताने आपल्याला तत्कालीन समाजाचे त्यातील विविध स्तरांचे ओझरते दर्शनही घडते.

गुजरातेतील लहंगंज जवळील खोदकामा / संशोधना दरम्यान १५००० वर्ष जुने मानवी अवशेष हाती लागतात. त्या उत्खननात मिळालेल्या स्त्री अवशेषांनी इरुच्या मनात होणारी आंदोलने एका क्षणी वाचकापर्यंतही पोहोचतात. कुठेतरी त्या ८o वर्ष जुन्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्यासारखे क्षणभर आपल्यालाही वाटून जाते.

पुढे इंग्लंड, अमेरिकेतील वास्तव्य, बदलत्या परिस्थितीत वाढणाऱ्या स्वतःच्या मुलांबाबत जाणवलेली जनरेशन गॅप, एका आईचं empty nester बनताना आलेलं हळवेपण त्यांच्यातील सर्वसाधारण बाजू दाखवते.
त्याच वेळी एखाद्या सामान्य घरात आढळणारे सासर माहेरातील, सासू-सुनेमधील रुसवे फुगवे जेव्हा अशा असामान्य घरांमध्ये ही असल्याचे कळल्यावर थोडी मौजही वाटते.

आयुष्यभर निरीश्वर वादी किंवा नास्तिकतेचे धडे गिरविलेल्या / बाळकडू मिळालेल्या इरावतीबाई जेव्हा विठ्ठलमय होताना दिसतात तेव्हा आपण विस्मयचकित होतो. अखेरच्या काही वर्षात विठ्ठलाच्या चरणांशी मिळवलेला solace ( दिलासा) त्यांची मानवी बाजूही अधोरेखित करते.

त्यांची राम-सीता यांच्यावरील मते समजून घेताना तोकडे पडल्यासारखे वाटते.

फक्त पुस्तकाविषयी किंवा त्यातील भाषेविषयी बोलायचं झालं तर मला भाषा/ वाक्यरचना थोडी क्लिष्ट किंवा आडवळणाची वाटली. काही गोष्टींचा वारंवार होणारा उल्लेखही टाळता आला असता असाही जाणवलं.

काळाच्या कितीतरी पुढे असलेल्या इरावतीबाईंसारख्या विदुषीच्या , १९०५ ते १९७०, ह्या ६५ वर्षांच्या आयुष्यातील त्यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा घेतलेला आढावा आजच्या काळातही निश्चितच प्रेरणादायी आहे.

मॅन मिटिंग टायग्रेस ऑफ चंपावत अशी डॉक्युमेंटरी पाहिली होती. वाघाची मादी होती ती. इथे 150 जणांना मारण्याआधी नेपाळ मधे 300जणाना तिने मारले होते. ती नरभक्षक का झाली याचे कारण धक्कादायक आहे. यानंतर जिम कॉर्बेट ने शिकार बंद केली आणि सेव्ह टायगर मोहीम सुरू केली.
प्रचंडगड चा वाघ आणि इतर वाचायचे आहे. रुद्रप्रयाग ही वेगळी कथा आहे की चंपावत आणि ती एकच आहे?

पुल देशपांडेपासून अनेक जुने लेखक आता वाचू नये असे मत झालं आहे. नवीन पिढीला श्रीमान योगी बोअर करते. आपणही बदलले पाहिजे. इरावती कर्वे पण बोअर करतात.

छन्दिफन्दि, छान परिचय लिहिलाय तुम्ही.
एक बारीकशी दुरुस्ती- थिआगो पिंटो बार्बोसा हा पुरुष आहे, स्त्री नाही Proud
एक लेखक, माझ्या आठवणीनुसार चंपावतची वाघीण ही कॉर्बेटने केलेली नरभक्षक वाघाची पहिली शिकार आणि ठाकची वाघीण ही शेवटची (नरभक्षक वाघाची) शिकार. ठाकनंतरही कॉर्बेटने वाघाची शिकार केली, पण नरभक्षक ती शेवटची.

वाचायला लागेल. चंपावतच्या वाघिणीचे दोन सुळे बंदूकीच्या गोळीने तुटले होते. त्यामुळे तिला शिकार करणे अशक्य झाले. म्हणून ती सॉफ्ट टार्गेट म्हणजे माणसाकडे वळली. ती नरभक्षक व्हायला माणूस कारणीभूत होता असे जिम कॉर्बेट ने म्हटलंय. हे त्या डॉक्युमेंटरीत होतं. जमलं चल लिंक देतो. तोपर्यंत लल्लनटॉपचा रिपोर्ताज बघू शकता.
https://youtu.be/tmNQ9COPnww?si=WpZWBDdR5sauitZZ

>>>पुल देशपांडेपासून अनेक जुने लेखक आता वाचू नये असे मत झालं आहे. नवीन पिढीला श्रीमान योगी बोअर करते. आपणही बदलले पाहिजे. इरावती कर्वे पण बोअर करतात....> Submitted by एक लेखक
मलाही तसंच वाटतं. .जिम टार्गेट आपलं कौतूक पात्रांनी माणसांनी केलं हे पुढेपुढे फार करतो. केनेथ अँडरसन वेगळा आहे.

मागच्या आठवड्यात आनंद यादवचं झोंबी वाचलं. मी घरातल्या अडचणी निभावून दहावीपर्यंत शाळा कशी केली ते लिहिलंय. परंतू त्याचा बाप रत्नू जकाते याचंच चरित्र आहे. आईला मारझोड, नऊ मुलं, शेतीवाडीचा कारभारी म्हणून गावात बैठका मारत फिरणे आणि आंन्द्याला ( लेखकाला) कामाला लावून सडकून चोपणे, शाळेला जाऊ न देणे याचं वर्णनच अधिक.

दलित साहित्य, भटके विमुक्त साहित्य किंवा ग्रामीण साहित्य सकस नक्कीच आहे. पुलं च्या भाषेत रोज रोज गोडाचं जेवण जेवल्यानंतर झणझणीत पिठलं भाकरीचा स्वाद कसा न्याराच असतो तसं आहे. पण दुसर्‍या बाजूने विचार केला तर ते निराशावादी आहे. कोणत्याही समूहाला प्रेरणा म्हणून विजयाचे धडे द्यायचे असतात. हे असे साहित्य प्रेरणा देते का ? नक्कीच नाही. पण दलित साहित्यिकांना यातून पूर्वीच्या लोकांना मिळालेली प्रसिद्धी खुणावत असल्याने एकामागून एकाने अन्याय सहन केल्याची आत्मचरित्रे प्रकाशित केली.

याचा भाषेला उपयोग झाला का ? तर नक्कीच झाला. पण ते बेंचमार्क म्हणून सेट होणे हे पटत नाही.

आनंद यादवांनी व्यथा मांडली. त्यांच्याच नात्यागोत्यातील, ओळखीच्या लोकांनी बापाला समजावण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ. रत्नूच्या त्रासाची उदाहरणे झाली अगणित आणि तोचतोचपणा येऊन पुस्तक झाले कंटाळवाणे. दलित साहित्य म्हणून पाहायचे का या प्रश्नाचे उत्तर होय पण पुस्तक म्हणून फारच लांबले.

आनंद यादव यांची झोंबी खूप पूर्वी शाळेत असताना वाचलं होतं.
तसेच त्या दरम्यान नरेंद्र जाधवांच आमचा बाप आणि आम्ही,
किशोर शांताबाई काळे यांचं कोल्ह्याटाच पोर
ही पुस्तकही वाचली होती.

पण मला का वाचायचं, किंवा कंटाळवाण वाटलं नव्हतं.
उलट प्रत्येकाचे संघर्ष , राहणीमान, विचार - आचार वागळे असतात ही जाणीव झाली.

पुस्तक वाचण्याचे प्रत्येकाचे हेतू, गरज, आवड, समज वेगवेगळी असते.

जरा उशीर झालाय, पण तरी ...
२०२५ मध्ये वाचलेली पुस्तकं :

तडा (गणेश मतकरी) कथासंग्रह - आवडलं.
नॉर्वेजियन वूड (मुराकामी) कादंबरी - अर्धवट सोडलं.
बेअरटाऊन (फ्रेडरिक बॅकमन) कादंबरी - खूप आवडलं.
इति-आदी (अरुण टीकेकर) - आवडलं.
बाळूच्या अवस्थांतराची डायरी (किरण गुरव) कथासंग्रह - आवडलं.
गॉगल लावलेला घोडा (निखिलेश चित्रे) कथासंग्रह - आवडलं.
व्हाइट रोझ अँड ब्लॅक फॉरेस्ट - कादंबरी - चांगलं वाटलं.
एम्पायर्स ऑफ द इण्डस (अ‍ॅलिस अल्बिनिया) नॉन फिक्शन - खूप आवडलं.
द नॅचरलिस्ट (अ‍ॅन्ड्रू मेन) कादंबरी - ठीकठाक वाटलं.
गोठण्यातल्या गोष्टी (हृषीकेश गुप्ते) - आवडलं.
क्षुधाशांती भुवन (किरण गुरव) कथासंग्रह - खूप आवडलं. (याचा सविस्तर रिव्ह्यू लिहायचा आहे.)
दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी (बालाजी सुतार) - ठीकठाक वाटलं.
फ्री फॉल (गणेश मतकरी) कथासंग्रह - खूप आवडलं.
पनिशमेंट (अ‍ॅन होल्ट) - ठीकठाक वाटलं.
एक होती माया (अनंत सोनवणे) - आवडलं.
पर्मनण्ट रेकॉर्ड (एडवर्ड स्नोडेन) - खूप आवडलं.

जिम कार्बेट, खुशवंत सिंग, मनोहर माळगावकर, आर के नारायणन, प्रभाकर पाध्ये आपल्या इथे व्यंकटेश माडगूळकर अशा सर्व लोकांचे काही वाचू वाटत नाही. मला एक त्यांच्याबद्दल कसली तरी विचित्र अढी आहे.

ललिता, तुम्ही फक्त आवडती पुस्तकं वाचता का ?
>>>

लिहिलय की त्यांनी न आवडलेली (फारशी न आवडलेली) पुस्तके तसेच अर्धवट सोडलेली पुस्तके. संपादनाच्या कामात तर बरेच न आवडणारे वाचायला लागत असेल.

पुस्तक वाचायला घेतल्यावरच कळते की पुढे वाचायचं की नाही. वाचनालयातून आणल्याने लगेच परत करून टाकतो. तिथे चाळल्यावर पुस्तकाचा विषय काय आहे तो कळतो; शीर्षकावरून कळत नाही.

पण एक गोष्ट हल्ली माझ्या लक्षात आली की पुस्तक कशाबद्दल आहे किंवा लेखकाची थोडक्यात माहिती दिलेली नसते.

टवणे सर, स्माईली टाकायची राहिली. ललिता, प्रश्न मजेत विचारला होता.

तुम्ही संपादक आहात हे माहिती नव्हते. आता मी तुमच्या वाटेला जात नाही. संपादक म्हणजे 'सख्खा भाऊ पक्का वैरी'.

दुरुस्ती......एक गोष्ट हल्ली माझ्या लक्षात आली की पुस्तक कशाबद्दल आहे किंवा लेखकाची थोडक्यात माहिती पुस्तकाच्या पुढच्या किंवा मागच्या पानांवर दिलेली नसते.

संपादनाच्या कामात तर बरेच न आवडणारे वाचायला लागत असेल. >>> अगदी! यावर मी एक मोठं ललित पाडू शकते... एक का, चार-पाच होतील Wink

रॉय, तुम्ही संपादक सोडून इतर सर्वांच्या वाट्याला जाता का? Proud

खुशवंत सिंग यांनी त्यांच्या पुस्तकाबद्दल अगोदरच मत दिलं आहे...... लोकांना gossip ( चहाटळपणा) वाचायला आवडते आणि मी ते लिहिणारच. ज्यांच्यावर लिहिलं ते अर्थात मिळतातच. फिल्मफेअर मासिकात हे काम देवयानी चौबळ करत असे. तर शोभा डे थेट त्या व्यक्तिंबद्दल न लिहिता तसे पात्र कादंबरीत निर्माण करायची. मग ती व्यक्ती तिला सांगायची की मला माहीत आहे हे पात्र माझ्यावरच बेतले आहे.

बाकी संपादक प्रकाशक का नेमतात तर पुस्तकात काही राजकीय आणि सामाजिक आक्षेपार्ह मजकूर येऊ नये. व्याकरण तपासणे तर आलेच. तसे नको असेल तर लेखकाने आपले पुस्तक आपणच छापून घेऊन बाजारात आणावे. संपादक बाद.

बाकी संपादक प्रकाशक का नेमतात तर पुस्तकात काही राजकीय आणि सामाजिक आक्षेपार्ह मजकूर येऊ नये.

>>>

आणि श्रीपु हसले!

पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्या मजकुरांसाठी ते बाजारातून मागे घेणे परवडणारे नसते. आणि मग श्रीपु रडतील.
--------
लेखक तर लिहून जातो काही सनसनाटी व्हावे म्हणून... पण. ते प्रकरण अंगाशी येईल प्रकाशकाने हक्क विकत घेऊन छापल्यावर. त्याने स्वतः च्याच कुटुंबातील व्यक्तिंविषयी लिहिणे वेगळे.

आणि श्रीपु हसले >> Biggrin
अहो 'या पेक्षा' संपादक खूप काही करतो असं म्हणायचं आहे. कठिण आहे एकुणच!
तुम्ही वाईट संपादकाने संपादित केलेली पुस्तके वाचलीत की तुम्हाला समजेल संपादकाविना चांगल्या लेखकाच्या चांगल्या होऊ शकेल अशा पुस्तकाची कशी माती होते!
प्रीती, लेख/ सिरीज होऊन जाऊ द्या!

संपादकाच्या उपयुक्ततेवरुन झालेल्या गहन चर्चेवरुन आठवले.
कथेला टोके काढणे, कधेचा अवकाश भरून टाकणे, वगैरेंसाठी (कु)प्रसिद्ध असलेल्या सत्यकथेतील दर्जेदार कथांचे हे संकलन नव्याने उपलब्ध झाले आहे. त्यात बाळकृष्ण प्रभेदेसाईंची जहाज ही कथा समाविष्ट आहे हे एकच कारण मला हे संकलन विकत घेण्यासाठी पुरेसे आहे. ज्यांना संपादकाची महती समजते अश्यांना हे संकलन नक्की आवडेल.

सत्वकथा - सत्यकथेतील १९६१-१९७० च्या दशकातील निवडक लघुकथा.
https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4847242855793790541

माझ्यासारख्या अनेकांनी ज्यांनी सत्यकथाचा अंकच पाहिलेला नाही, त्यांना ही एक परवणीच आहे.

साहित्याच्या निरनिराळ्या प्रवाहाबरोबरच संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तूकला यांचेही महत्त्व अधोरेखित करणारे *सत्यकथा* हे एकमेव मासिक होते. त्याची जागा कुणालाही घेता आली नाही. ' सत्यकथे 'च्या दृश्यात्मकतेविषयी स्वतंत्र लेख लिहिता येईल, इतके त्यांचे योगदान आहे. आजवर एकाही नियतकालिकाला त्याची कॉपीही करणे जमले नाही.--
ज्येष्ठ चित्रकार / मुखपृष्ठकार रविमुकुल यांची सत्यकथा मासिकाबद्दलची टिप्पणी.

टवणे सर,

बाळकृष्ण प्रभुदेसाई यांचा एक (मेव?) कथासंग्रह बुकगंगवर उपलब्ध होता . त्याची प्रिंट खूपच जुनी होती (कदाचित पहिलीच आवृत्ती अजून खपली नसावी !!!! गेल्या ५० ६० वर्षांत) तो खूप स्वस्तात मिळाला होता. १० रुपये की काहीतरी.

माझ्या एका लेखक मित्राने अनुभव मासिकाच्या संपादकांचा एक अनुभव सांगितला होता की त्याच्या कथेत संपादकांनी स्वतःहून बदल करून सगळ्या कथेचा विचकाच केला होता.

त्यामुळे कथेला टोक काढणे वगैरे कल्पना मला तरी एका लिमिट नंतर हास्यास्पद वाटतात. आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार?

परंतु संपादकाने स्वतः हून बदल करण्याला मी तरी विरोध करतो. त्यांनी लेखकाला फीडबॅक द्यावा आणि पटत नसेल तर कथा घेऊ नये.

चांगला संपादक मिळणे खूप भाग्याचे असते.

सत्यकथेचे अंक मौज काढणार काढणार म्हणून गेले काही वर्षे ते दिवाळी अंकांतून जाहिराती करत असतात.

एकदाच काय तो त्यांचा खजाना लुटून चार कॉलेजच्या पोरांना पैसे देऊन दोन रात्रीत अख्खे अंक ऑनलाइन अपलोड करून टोरेंट फिरवावेत असे खूप मनात येते.

पडत्या अपोकॅलिप्टिक काळात असेच मेझर्स घेतले पाहिजेत.

तसेही त्या लेखकांचे कथासंग्रह पन्नास पन्नास वर्षे खपले नव्हते.

Pages